Thursday, April 25, 2019

द दा व्हिन्सी कोड - एक वादग्रस्त कादंबरी

द दा व्हिन्सी कोड - एक वादग्रस्त कादंबरी 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 
नागपूर ४४० ०२२   
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 

   द दा व्हिन्सी कोड ही 2003 मध्ये प्रसिद्ध झालेली आणि डॅन ब्राऊन लिखित  कादंबरी ही एक गूढ, रोमांचक, रहस्यमय कलाकृती आहे. पॅरिसमधील जगातील सर्वात मोठ्या लाॅर्व्हे वस्तुसंग्रहालयात (म्युझियममध्ये) झालेल्या खुनाच्या घटनेनंतर प्रतीकवादी राॅबर्ट लॅंगडन आणि सांकेतिक/कूटलीपीतज्ञ सोफी नेव्ह्यू यांना अनुसरून हे लेखकाचे  लिखाण आहे. सीन नदीच्या काठावर आणि पॅरिसच्या मध्यभागी असलेले हे जगातील सर्वात मोठे लाॅर्व्हे वस्तुसंग्रहालय (म्युझियम) ऐतिहासिक स्मारकही असल्याचे मानतात. 
   लिओनार्डो द व्हिन्सी आणि ऐझॅक न्यूटन या सारखे नामवंत सदस्य असलेली ‘प्रायोरी आॅफ सिआॅन’ नावाची एक गुप्त संघटना आणि ओपस डी नावाची कॅथोलिक संस्था यात भीषण युद्ध झाले होते.  द दा व्हिन्सी कोड या कादंबरीत जीझस ख्राइस्ट आणि मेरी मेंडलीन ही ज्यू महिला पतीपत्नी स्वरुपात दाखविले आहेत. चार अधिकृत ख्रिस्त कथानुसार मेरी मेंडलीन ही जीझसची फक्त शिष्या होती, पत्नी नव्हती. ती त्याच्यासोबत सतत असायची. ख्रिस्ताचे सुळावर चढविले जाणे, दफन आणि पुनरागमन या तिन्ही प्रसंगांची ती साक्षीदार होती.
   लिओनार्डो द व्हिन्सी या इटालियन चित्रकाराने मानवाची प्रमाणबद्ध आकृती (व्हिट्रुव्हिअन मॅन) रेखाटली असून या आकृतीसोबत एक गणितीय संदेश लिहिला आहे. तसेच त्या मानवाच्या छातीवर एक पंचकोनी ताराकृतीही त्याच्याच रक्ताने अंकित केली आहे. प्राचीनकाळी ग्रीस आणि बाबिलोनियामध्ये अशी पंचकोनी ताराकृती विश्वासाचे प्रतीक मानली जात असे. ख्रिश्चन लोकात जे स्थान क्राॅसला आहे, तसेच स्थान ज्यू लोकात या पंचकोनी ताराकृतीला आहे. हिलाच स्टार आॅफ डेव्हिड म्हणून संबोधले जाते. हिचा जादूटोण्याशी संबंध असल्याचे मानले जाते.
   द दा व्हिन्सी कोड या कादंबरीत एक पर्यायी धार्मिक सिद्धांत प्रस्तुत केलेला आहे. फ्रान्स देशाच्या इतिहासात मेरोव्हीच राजघराणे होऊन गेले आहे. यातील एक वंशज चेड्रिक हा अतिशय पराक्रमी होता, असे म्हणतात. याच्या पराक्रमाच्या कथा आजही वंशपरंपरेने सांगितल्या जातात. चेड्रिक इतका पराक्रमी होता की मेरोव्हीच या प्रदेशाशी सादृश्य असलेला भूभाग फ्रान्समध्ये आजही दाखविला जातो. या राजवंशाचे जीझस आणि मेरी मॅंडलीन या दांपत्याशी रक्ताचे नाते होते/आहे असे या कादंबरीत मानले आहे. पवित्र रुधिर आणि पवित्र कलश (होली ब्लड व होली ग्रेल) या ख्रिश्चन धार्मिकातील उल्लेखित बाबींचा उपयोग संशोधन सामग्री म्हणून या कादंबरीत  केलेला आढळतो.
   द दा व्हिन्सी कोड ही कलाकृती कादंबरी म्हणून अतिशय गाजली. पवित्र कलश आणि मेरी मॅंडलीन यांच्या विषयीच्या आख्याइकांना साहित्यक्षेत्रातच नाही तर जनसामान्यातही प्रचंड कुतुहल प्राप्त झाले. ख्रिश्चानिटीच्या इतिहासात या आख्याइकांचा नक्की प्रभाव किती हा विषय जगभर चर्चिला गेला. रोमन कॅथोलिक चर्चने मात्र या कादंबरीचा अत्यंत तीव्र शब्दात निषेध केला आहे. तिच्यावर बंदी घालावी अशी त्यांची मागणी आहे. उल्लेखनीय बाब ही आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे अनेक डुढ्ढाचार्य या विषयी मूग गिळून गप्प बसलेले आढळतात. या कादंबरीवर ऐतिहासिक व वैज्ञानिक अशा दोन्ही दृष्टींनी आक्षेप घेतलेले आढळून येतात, ही वस्तुस्थिती मात्र मान्य केली पाहिजे. हे लेखन किमानपक्षी चूक आहे, असे आक्षेपकांचे म्हणणे आहे. तरीही आजवर 44 भाषेत भाषांतर, 80 लक्ष प्रतींची विक्री, 9 आवृत्या (पायरेटेड वेगळ्या) हे साहित्यसृष्टीतील विक्रम या कादंबरीच्या खाती नोंदवलेले आढळतात.
  गुप्तचर कथा, गूढ, रोमांचक, रहस्यमय व कटकारस्थानयुक्त काल्पनिक कलाकृती अशी या कादंबरीची जातकुळी आहे. ब्राऊन या लेखकाची ही दुसरी कादंबरी आहे. या कादंबरीवरील चित्रपटही असाच गाजला/गाजतो आहे.
कथानक
  गुरु (टीचर) या नावाने आणि पदवीने प्रसिद्ध असलेल्या व्यक्तीच्या वतीने सिलॅस या नावाचा ॲलबिनो कॅथोलिक मठवासी साधू /सन्यासी (माॅंक) लव्हर म्युझियममध्ये जॅक्वस साॅनीर या नावाच्या क्युरेटरवर एका रात्री जीवघेणा हल्ला करतो. म्युझियममधील कमानीतल्या मध्यवर्ती दगडाचा (कीस्टोनचा) शोध घेण्याचा ध्यास गुरुला लागलेला असतो. हा दगड सापडला (शोधता आला) तर पवित्र कलशाची माहिती मिळणे सोपे होईल, असे गुरुला वाटत असते.
   क्युरेटर जॅक्वस साॅनीरचे शव पोलिसांना सापडते ते व्हिट्रुव्हिअन मॅनच्या (मानवाची प्रमाणबद्ध आकृती) विशिष्ट मुद्रेच्या (आसनस्थ - पोज) स्वरुपात! हे कोडे उलगडण्यासाठी बेझू फॅचे हा पोलिस अधिकारी राॅबर्ट लॅंगडन नावाच्या संशोधक प्राध्यापकाला पाचारण करतो. राॅबर्ट लॅंगडन हा योगायोगानेच पण काही कामासाठी त्या गावी आलेला असतो. जॅक्वस साॅनीरने मरतामरता एका कूट/गुप्त/सांकेतिक लीपीत काही मजकूर लिहून ठेवला असतो. हा मजकूर आकड्यांच्या स्वरुपात असतो. 2, 4, 8, … ह्या अंकक्रमाला ‘फिबाॅनॅसी सिक्वेन्स’ असे म्हणतात. असाच अंकक्रम जॅक्वस साॅनीरने मरतामरता लिहिलेला असतो पण त्यातील मजकूर लगेच कळू नये म्हणून अंकांची क्रमवारी बदलून लिहिलेला असतो. हे कोडे उलगडून दाखविण्यासाठी राॅबर्ट लॅंगडन ला बोलविलेले असते.
   पोलिस अधिकाऱ्याचा समज असतो की जॅक्वस साॅनीरने मरतामरता आपल्या छाताडावर लिहिलेला हा अंकक्रम भूतपूजेशी संबंधित आहे. पण हे म्हणणे संशोधक राॅबर्ट लॅंगडन खोडून काढतो. तो सांगतो की, क्युरेटर जॅक्वस साॅनीर हा दैवी कलाकृतीतज्ञ होता. त्याने स्वत:च्या रक्ताने रेखाटलेली कलाकृती देवतेचा अप्रत्यक्ष उल्लेख करणारी आहे, ती दैत्याकृती असूच शकत नाही.
   क्युरेटर जॅक्वस साॅनीरची नात सोफी नेवी ही पोलिस खात्यातील सांकेतिक लीपी तज्ञ असते. ती संशोधक राॅबर्ट लॅंगडनच्या कानात सांगते की, ती क्युरेटर जॅक्वस साॅनीरची दुरावलेली नात आहे. तसेच पोलिस अधिकारी बेझू फॅचेला मनातून वाटते आहे की, संशोधक राॅबर्ट लॅंगडन हाच साॅनीरचा खुनी आहे, हेही ती राॅबर्ट लॅंगडनला हळूच सांगते. तिला असे का वाटते? कारण तिच्या आजोबाच्या संदेशातील तिच्यासाठी लिहिलेली शेवटची ओळ पोलिस अधिकारी बेझू फॅचेने लॅंगडन येण्यापूर्वीच खोडून टाकलेली असते. काय असते या ओळीत? ‘संशोधक राॅबर्ट लॅंगडनचा शोध घ्या’, अशी ती ओळ असते. सोफी नेवी आजोबा क्युरेटर जॅक्वस साॅनीरची एक आठवण सतावत असते. काय असते ती आठवण? आजोबा क्युरेटर जॅक्वस साॅनीर ही दुसऱ्या धर्मावर विश्वास ठेवणारी व्यक्ती (पगन) असते, हे तिला माहीत असते. पण तिला खात्री असते की आपल्या आजोबाच्या मनात संशोधक राॅबर्ट लॅंगडनने सांकेतिक लीपीतील अर्थ उलगडून सांगावा, असेच असले पाहिजे. या अर्थानुसार पोलिस बॅंक आॅफ झूरिचच्या पॅरिसमधील शाखेतील एका सेफ डिपाॅझिट बाॅक्सपर्यंत येऊन ठेपतात. झूरिच शहर स्वित्झरलंडमधील एक जागतिक महत्त्वाचे बॅंकिंगचे आणि अर्थकारणाचे केंद्र आहे.
   सोफी नेवी आणि लॅंगडन पोलिसांची नजर चुकवून बॅंकेत प्रवेश करतात. तिथे एका सेफ डिपाॅझिट बाॅक्समध्ये त्यांना एका पेटी ठेवलेली असते. त्या पेटीला टेलिफोनच्या डायलप्रमाणे दिसणारे पण अंकांऐवजी अक्षरे असलेले गुप्त/कूट कुलुप लावलेले असते. अक्षरांची योग्य जुळवणी करताच/होताच ते कुलुप उघडते. व परवलीचा शब्द (पासवर्ड) कळतो. पण जोर लावून उघडल्यास मात्र व्हिनेगार असलेली कुपी फुटून त्यातील द्रवात समुद्र लव्हाळ्यावर लिहिलेला मजकूर विरघळून जात असतो. सोफी नेवी आणि लॅंगडन यांना ही पेटी परवलीच्या योग्य शब्द शोधून काढतात. योग्य अक्षर जुळवणी होताच तयार होणारा शब्द असतो ‘सोफी’. म्हणजे साॅनीरने आपल्या नातीचे ‘सोफी’ हे नाव परवलीचा शब्द म्हणून योजले असते. परवलीच्या शब्दाच्या आधारे पेटी उघडण्यात लॅंगडन व सोफीला यश येते. या पेटीत कमानीतील मध्यवर्ती दगड (कीस्टोन) ठेवलेला सापडतो.
  ती दोघे हा दगड घेऊन लॅंगडनच्या मित्राकडे सर ली टीबिंगकडे जातात.  हा  पवित्र कलशतज्ञ असतो. त्याला प्रायोरीची आख्याइका माहीत असते. तो सांगतो की कलश म्हणजे एक कप नसतो. ते एक थडगे असते. यात मेरी मॅगडलीनच्या अस्थी ठेवलेल्या असतात. 
   पोलिसांच्या हातावर तुरी देऊन टीबिंगच्या खाजगी विमानाने पळून जातात.  पेटी उघडल्यानंतर त्यांना आणखीही एक गुपित कळते. त्याच्या आधारे ते तिघे लंडनमधील वेस्टमिनीस्टर ॲबे येथे येऊन पोचतात. इथे असलेल्या ऐझॅक न्यूटनच्या  थडग्यापाशी ते येऊन पोचतात.
  विमानात आपापसात बोलतांना सोफी आपल्यात व आपला आजोबा साॅनीर यात दहा वर्षांपूर्वी दुरावा का निर्माण झाला ते सांगते. एके दिवशी ती विद्यापीठातून अचानक आजोबांच्या घरी आली असतांना तळघरात विवाहोत्तर प्रजोत्पादनविषयक धार्मिक कार्यक्रम सुरू होता. ती आडून हा कार्यक्रम पाहते. यावेळी तिचे आजोबा साॅनीर काही महिला आणि पुरुष उपस्थित होते. काही महिलांनी बुरखा घातला होता व त्या देवतेची स्तुतीपद्ये गात होत्या. ती त्वरेने घरातून बाहेर पडते आणि आजोबांशी कायमचा संबंधविच्छेद करते. लॅंगडन तिला समजावूनसांगतो की, हा गैरप्रकार नसून तो एक पवित्र विवाह समारंभाचा कार्यक्रम होता.
   ते वेस्टमिनीस्टर ॲबेपर्यंत येत असतांना उघड होते की, ली टीबिंग हाच गुरु असतो व सिलॅस त्याच्याच साठी काम करीत असतो. टीबिंगला पवित्र कलशाचा उपयोग करयाचा असतो. त्याच्या समजुतीप्रमाणे हा कलश म्हणजे एक दस्तऐवज असतो. त्यातील माहितीनुसार या कागदपत्रावरून हे उघड होणार असते की, जीझस ख्राईस्टचे मेरी मॅगडेलीनशी विवाह झालेला असतो आणि त्यांना मुलेही असतात. हे रहस्य उघड होताच व्हेटिकन शहरातील रोमन कॅथोलिक चर्चची दुष्कीर्ती होऊन तो नष्ट होईल. पिस्तुलाचा धाक दाखवून टीबिंग त्याला दसरा परवली शब्द उकलण्यास भाग पाडतो. लॅंगडनच्या लक्षात येते की परवलीचा दुसरा शब्द ॲपल हा आहे. तो वापरून लॅंगडन ती पेटी टीबिंगला कळू न देता उघडतो. त्यातील सामग्री काढून घेतो आणि ती रिकामी पेटी फेकून देतो.
   इन्सपेक्टर फेच टीबिंगला अटक करतो. लॅंजडन निर्दोष असल्याची त्याला आता खात्री पटलेली असते. बिषप ॲरिंगोरोझा हा ओपस डी नावाच्या कॅथोलिक संस्थेचा प्रमुख  व सिलॅसचा मार्गदर्शक असतो. सिलॅसचा वापर निर्दोष व्यक्तींची हत्या करण्यासाठी झाल्याचे कळताच त्याला पकडून देण्यासाठी तो पोलिसांना मदत करण्यासाठी धावून जातो. सिलॅस ओपस डी च्या केंद्रातच लपून बसलेला असतो. हीे लोक आपल्याला मारण्यासाठीच आले आहेत, अशी कल्पना करून घेऊन तो केंद्रातून बाहेर पडतो व चुकून आपल्या मार्गदर्शकालाच - बिषप ॲरिंगोरोझालाच- गोळी घालतो. या जीवघेण्या हल्यातून बिषप ॲरिंगोरोझा सुखरूप बाहेर पडतो पण खुद्द सिलॅसच गोळीबारात मारला जातो.
   ॲपल हा परवलीचा शब्द सोफी व लॅंगडन यांना रोझेलीन चॅपेल (ख्रिस्ती देऊळ) पर्यंत नेऊन पोचवितो. तिथला शिक्षक सोफीचा बेपत्ता झालेला भाऊ असल्याचे त्यांना कळते. लहानपणी झालेल्या कार अपघातात सोफीच्या आईवडलांसोबत हाही मेला, असे मानले गेले होते. रोझेलीन चॅपेलच्या पालक मारी चाॅवेल सेंट क्लेअर ही सोफीची आजवर बेपत्ता असलेली आजी असल्याचे उघड होते. यावरून खुलासा होतो की, सोफी आणि तिचा भाऊ ही दोघे जीझस ख्राइस्ट आणि मेरी मॅगडलीन यांचे वंशज आहेत. प्रायोरी आॅफ सायाॅन यांनी ही माहिती जिवाच्या भीतीने दडवून ठेवली होती.

शेवटच्या संदेशाचा अर्थ असा होतो की, लाॅर्व्हे वस्तुसंग्रहालयाखाली पवित्र कलश पुरला गेला आहे. हे वस्तुसंग्रहालय काचेच्या उलट्या पिरॅमिडसारखे असते. याला धूर जाण्यासाठी धुरांडी असतात. प्रकाश किरण येऊ शकावेत असे मार्ग असतात. लॅंगडन यांचा मागोवा घेत दगडी शवपेटीपर्यंत पोचतो. यातच मेरी मॅगडलीनचे शव असते. त्याच्यासमोर लॅंगडन नतमस्तक होतो.

समीक्षा
इतिहास म्हणून समीक्षा
या ग्रंथावर सडकून टीका झाली. ख्रिस्तीधर्माचे चुकीचे वर्णन, सांकेतिक लीपीचे सदोष उकलन, युरोपियन कला, इतिहास आणि शिल्पशास्त्राचे वपर्यस्त वर्णन आदी विशेषणे असलेला ग्रंथ अशी या ग्रंथाची संभावना करण्यात आली. पण समीक्षक हीएक कल्पित कादंबरी आहे हे विसरले, असेही उत्तरादाखल म्हटले गेले. सर्वच ख्रिस्ती पंथांना यातील गृहीत बाबी अमान्य झाल्या. घोर फसवणुकींनी युक्त निरर्थक लिखाण व खोटेपणा यावर कादंबरीचा डोलारा रचलेला आहे, अशा शब्दात ताशेरे ओढण्यात आले आहेत.
  इतिहासाचे विकृतिकरण व बनाव यावर आधारित लिखाण, विकृत कल्पनाविलास यांची रेलचेल यात आहे. ऐतिहासिक कादंबरीचे लिखाणही मुख्यत:  व मूलत: ऐतिहासिक संशोधन वाटावे, या प्रमुख तत्त्वाला या कादंबरीत हरताळ हरताळ फासला गेला आहे.
  ऐतिहासिक घटनांचे उघडउघड पुनर्लेखन, उलगडा आणि खुलासा  करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे.
   प्रत्यक्ष लेखकाने हे सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत. ऐतिहासिक दस्तऐवज, धार्मिक विधी व कर्मकांड, संकल्पनांचे सुसंघटन, कलाकृती आणि शिल्पकला यांच्याशी प्रतारणा केली, असे एकही उदाहरण या कादंबरीत दाखवता येणार नाही, असे लेखक म्हणतो आहे. इतिहासात असेच घडले असावे, असे तुला वाटते का, असा प्रश्न केला असता, हे असेच घडले असावे, याची मला खात्री वाटते, असे तो म्हणाल्याची नोंद आहे.
साहित्यकृती म्हणून समीक्षा 
याबाबतही दोन मते आहेत. साहित्याने सुद्धा इतिहासाशी प्रामाणिक राहिले पाहिजे, असा आक्षेपकांचा प्रमुख मुद्दा होता.
इतिहासातही कूटस्थळे असतातच, ती उलदडून दाखवतांना व रोमांचकारी व रहस्यमय लिखाण करतांनाही ते आनंददायक असावे, हे पथ्य लेखकाने पाळले आहे.
कहानिमे ट्विस्ट हा प्रकार कादंबरीत अनेकदा आला आहे. त्यामुळे कादंबरीची  रंजकता वाढली आहे.
कायदेशीर समीक्षा 

या कादंबरीच्या लेखकावर वाङ्मयचौर्याचाही आरोप करण्यात आला होता. पण ते दावे न्यायालयात टिकले नाहीत.

No comments:

Post a Comment