Monday, September 23, 2019

मैत्री, तीही बरोबरीच्या नात्याने!

तरूणभारत  २४. ०९. २०१९ 
   मैत्री, तीही बरोबरीच्या नात्याने!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
   इस्टर्न एकाॅनाॅमिक फोरम (इइएफ) हे एक आंतरराष्ट्रीय व्यासपीठ असून रशियात व्लादिवोस्तोकला आंतरराष्ट्रीय गुंतवणूक व्हावी या हेतूने या व्यासपीठाच्या विद्यमाने  2015 पासून दरवर्षी एक परिषद आयोजित होत असते. या निमित्ताने पंतप्रधान मोदी रशियाला गेले असतांना जी द्विपक्षीय बातचीत झाली तिचे दोन परिणाम होऊ घातले आहेत. एक म्हणजे या दोन देशातील औद्योगिक सहकार्य वाढीस लागेल. दुसरे असे की, या दोन देशातील स्नेहसंबंध बरोबरीच्या नात्याने आणखी दृढ होतील. 
     मोदी प्रमुख पाहुणे 
     तसे मोदी या 5 व्या इस्टर्न एकाॅनाॅमिक फोरम (इइएफ) मध्ये प्रमुख पाहुणे या नात्याने उपस्थित होते, ही बाबही अधोरेखित करायला हवी आहे. पण त्याचबरोबर महत्त्वाचे असे की, उर्जा, संरक्षण, पायाभूत सुविधा अशा अनेक क्षेत्रात भारत आणि रशिया यात द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि सहकार्य यांना बळकटी प्राप्त होणार आहे. हा सर्व व्यवहार बरोबरीच्या नात्याने होत आहे.
   युद्धखोर पाकिस्तानचे गुरगुरणे व बोचकारणे हा सगळ्या दक्षिण आशियासाठी महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. भारत व रशिया यांनी एकमताने या प्रश्नाबाबत सारखीच भूमिका घ्यावी, हीही या बैठकीची महत्त्वाची उपलब्धी ठरावी.
   केवळ रशियासोबतच नाही तर युरेशियन एकाॅनाॅमिक युनीयन (रशिया, कझखस्तान, किरगिस्तानआरमेनिया व बेलारस) आणि भारत यांचे मिळून एक मुक्त व्यापारक्षेत्र उदयाला यावे व आर्थिकक्षेत्रात स्थायी विकासाचा पाया घातला जावा, हीही एक फार मोठी घटना ठरणार आहे.
   बरोबरीच्या सहकार्याची पातळी 
   भारत व रशिया यात आजपर्यंत विक्रेता आणि खरेदीदार असेच संबंध बहुतांशी असायचे. त्यात बदल होऊन त्याऐवजी बरोबरीच्या सहकार्याची पातळी निर्माण होते आहे. रशियाचा पूर्व भाग खनीजसंपन्न आहे. याचा विकास व्हावा म्हणून भारताने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे, ही बाब तर या सर्वावर कडी करणारी ठरावी, अशी आहे.
  तारेवरची कसरत 
    भारताने रशिया आणि अमेरिका यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. एवढ्यात अमेरिकेशी भारताचे संबंध बरेच सुधारले आहेत. पण याच काळात आपला जुना मित्र, रशिया मात्र काहीसा दूर जाऊ लागला होता. रशियाने सुरक्षा समितीत व्हेटोचा (नकाराधिकाराचा) वापर करून भारताची साथ केली आहे. बांग्लादेश निर्मितीच्या वेळी अमेरिकेचे सातवे आरमार बांग्लादेशाचे दिशेने कूच करू लागताच, रशियाच्या युद्धनौकाही भारताच्या मदतीसाठी धावून आल्या होत्या. तो रशिया चीनची बाजू घेईल की काय अशी शंका निर्माण झाली होती. तसेच रशिया पाकिस्तानला चुचकारतो आहे, असेही वाटू लागले होते. या भेटीच्या निमित्ताने रशिया व भारत अधिक जवळ आले आहेत, तेही बरोबरीच्या नात्याने. योग्य अर्थकारण मैत्री दृढ करण्याचे एक प्रभावी साधन आहे. अाता अमेरिकेचा पापड मोडण्याची भीती आहे. पण तिकडूनही आपण भरघोस खरेदी करतो आहोत. ‘हाउडी मोदी’ या कार्यक्रमात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हे उपस्थिती लावणार आहेत. कारण एकाच वेळी 50,000 श्रोते ही बाब अमेरिकेतही एक दुर्लभ संधी आहे. आंतरराष्ट्रीय संबंधात तारेवरची कसरत करावी लागते. जागतिक राजकारणातील दोन प्रतिस्पर्ध्यांशी सारखेच स्नेहाचे संबंध राखण्यात तर राजकीय कूटनीती कसाला लागत असते. तसेच नुसते घेणेकरी असून चालत नाही तर देणेकरीही असावे लागते. असे असेल तरच बरोबरीच्या नात्याचे संबंध प्रस्थापित होऊ शकतात. त्यातून डोनाल्ड ट्रंप यांच्यासारखा लहरी, अरेरावी, शीघ्रकोपी साथीदार असेल तर प्रश्न आणखीनच बिकट होऊन बसतो. तसेच आवश्यक ती एस - 400 सारखी शस्त्रप्रणाली रशियाकडून खरेदी करणारच, हे अमेरिकेला ठणकावून सांगतांना तुटेपर्यंत ताणले जाणार नाही, याचेही भान ठेवावे लागते.  ही सर्व भट्टी छान साधली आहे. याचे कारण बडी राष्ट्रे आता समर्थ भारताकडे बरोबरीची भूमिका घेऊन वागू लागली आहेत.
     पर्शियन आखातावरील अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न 
    तसेच खनीज तेल, नैसर्गिक वायू आणि पोलाद तयार करतांना लागणारा विशिष्ट दर्जाचा कोळसा (कोक) या आपल्या काही प्रमुख गरजा आहेत. अमेरिकेच्या धमकीला भीक न घालता, केवळ  भारतीय तेल कंपन्याच नाहीत, भारत सरकारनेही सैबेरियातील तेलक्षेत्रामध्येही गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊन भारत हा रशियात गुंतवणूक करणारा देश होतो आहे, ही भारतासाठी एक अभिमानाची बाब आहे. तसेच या करारामुळे आपलेही पर्शिअन आखातावर ऊर्जैच्या संदर्भात असलेले अवलंबित्व कमी होण्यासही मदत होणार आहे.
   मेक इन इंडिया 
   लढाऊ विमाने आणि हेलिकाॅप्टर्स यांची निर्मिती अपेक्षित दर्जाची आणि पुरेशा संख्येत आपण अजूनही निर्माण करू शकलेलो नाही. त्यासाठी आपल्याला फ्रान्स, रशिया, अमेरिका व इस्रायलवर अवलंबून लागते आहे. यावर उपाय आहे, मेक इन इंडिया.
     पाणबुड्या - मेक इन इंडिया अंतर्गत पाणबुड्यांचे बाबतीत १२ पाणबुडय़ा विदेशात तर १२ पाणबुडय़ांची निर्मिती भारतात ही अट टाकून आपण टेंडर काढले आहे. ही अट मान्य करून रशिया टेंडर भरतो आहे.
   क्षेपणास्त्रे व प्रक्षेपक - आखूड पल्याची 5000 इग्ला-एस क्षेपणास्त्रे व शत्रूच्या क्षेपणास्त्राला हवेतच नष्ट करू शकतील अशी 800 प्रक्षेपक अस्त्रे यासाठी भारत वरशिया यात करार होऊ घातला आहे.
   फ्रिगेटस - वेग आणि चपळ हालचाली करणाऱ्या 2 फ्रिगेट  युद्धनौका रशियात तर 2  भारतात तयार होणार आहेत.    
ब्राह्मोस -  भारतातील ब्रह्मपुत्रा आणि रशियातील माॅस्क्वा नदी या नद्यांच्या नावांची जोड करून ब्राह्मोस हे संयुक्त नाव तयार झाले आहे.  ती फ्रिगेटवर बसवण्यात येतील. रशिया व भारत  यांचा हा संयुक्त प्रकल्प आहे. 
कलाश्निकोव्ह -  कलाश्निकोव्ह अर्थात एके-२०३ या जातीच्या  साडेसात लाख रायफल्स तयार करण्यासाठीचा असाच संयुक्त प्रकल्प अमेठीजवळ उभारला जातो आहे. 
       भारत व नेपाळ 
    भारत व नेपाळ संबंधातही अशीच घडामोड घडते आहे. दक्षिण आशियामधली या दोन देशांच्या सीमारेषा ओलांडून इंधन वाहून नेणारी पाईप लाईन 15 महिने अगोदरच बांधून तयार झाली आहे. आता उरलेले प्रकल्पही असेच वेळेत पूर्ण होतील. दुसरे असे की, तेलाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे भारत व नेपाळ यात मागे कटुता निर्माण झाली होती, ती आता दूर होईल. तिसरे असे की, चीनचे परराष्ट्र मंत्री आपला नेपाळ दौरा आटोपत असतांनाच हा उद्घाटन समारंभ पार पडला आहे. यावरून चीनला जाणवले असावे की, भारत व नेपाळ यातील संबंध एका नव्या वळणावर आले आहेत.  भारत व चीन यातून एकाची निवड करायची झाली तर कुणाची निवड करावी हे नेपाळच्या लक्षात आले असेल. द्विपकल्प स्वरुपी भारत व भूवेष्ठित नेपाळ यात केवळ भौगोलिक जवळीकच नाही तर या दोन राष्ट्रात दृढ सांस्कृतिक संबंध आहेत. दोन देशातील जनता तर दररोजच एकमेकीच्या संबंधात येत असते. अशी ही नैसर्गिक मैत्री आकाराला येते आहे.
   मालदिव घोषणापत्रातील 32 मुद्दे
   मोदींच्या मालदिव दौऱ्याचे निमित्ताने  त्यांचे तिथे  गरमजोशीत स्वागत झाले. यावेळी सोबत एकूण 32 लहानमोठे करार करण्यात आले. भौगोलिक सान्निध्य, वांशिक, ऐतिहासिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक संबंध यांच्याशी असलेल्या दोन्ही देशांच्या बांधिलकीचा पुनरुच्चार करीत त्यांच्या दृढीकरणावर दोन्ही नेत्यांनी भर दिला. लोकशाही, विकास आणि शांततापूर्ण सहजीवन यावर दोन्ही देशांचा विश्वास असल्याचीही त्यांनी ग्वाही दिली. मध्यपूर्वेतील इजिप्त व पाकिस्तान सारखे देश आपल्याला गृहीत धरून चालतात, ही वेदनाही त्यांनी व्यक्त केली. त्या तुलनेत भारत स्नेह व आपुलकीच्या भावनेने वागतो, या बाबीचा अध्यक्ष इब्राहिम मोहंमद सोलीं यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला आहे! बरोबरीच्या नात्याने मैत्री, हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचे सूत्र राहिलेले आहे!!

No comments:

Post a Comment