Monday, September 2, 2019

हा माल विकणे नाही.

हा माल विकणे नाही.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
 (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   ग्रीनलंड विकायचे आहे का, अशी चौकशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी करावी, हे जसे आश्चर्यकारक नाही, तसेच तुमचा प्रस्ताव हास्यास्पद व बिनडोक (ॲबसर्ड) आहे असे डॅनिश (डेन्मार्क) सरकारच्या पंतप्रधानांचे नाराजीने व चिडून दिलेले उत्तरही आश्चर्य वाटण्यासारखे नाही! यामुळे नुसता नकार कळवता, बिनडोक म्हटले म्हणून,  चिडून जाऊन चिडखोर डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांनी मेटी फ्रेडरिकसन यांना एक घाणेरडी / ओंगळ (नॅस्टी) बाई म्हणून शिवी हासडली आहे. नंतर लगेचच आपले संबंध अधिक चांगले, मैत्रीचे व बळकट करण्याच्या हेतूने आखलेला डेन्मार्कचा दौराच रद्द करावा, याचे तर मुळीच आश्चर्य वाटायला नको!!
  असं काय आहे या ग्रीनलंडमध्ये?
   जवळजवळ 22 लक्ष चौरस मीटर क्षेत्रफळ असलेले हे महाकाय व खनीजसंपन्न बेट आर्क्टिक आणि अटलांटिक महासागर यांच्यामध्ये आणि कॅनडालगतच्या बेटसमूहाच्या पूर्वेला आहे. आज ग्रीनलंड हा डेन्मार्कचा स्वायत्तप्रदेश आहे. तसा हा भूभाग उत्तर अमेरिकेला लागून आहे. पण राजकीय आणि सांस्कृतिक दृष्टीने पाहिले तर तर तो युरोपशी सांधलेला आहे. ग्रीनलंडच्या नैरुत्य भागातच लोकवस्ती असून उरलेले बेट जवळजवळ मानवविरहितच आहे. येथील विमानतळाचे व्यवस्थापन मात्र अमेरिकेकडे आहे.
   ग्रीनलंड जगातील सर्वात मोठे बेट मानले जाते. सर्व बाजूनी पाण्याने वेढलेल्या भूभागाला बेट म्हणतात. या व्याख्येनुसार आॅस्ट्रेलिया आणि अंटार्टिका बेटेच आहेत, तसेच ती ग्रीनलंडपेक्षा कितीतरी मोठीही आहेत. पण ते जलवेष्टित खंडप्राय भूभाग मानले जातात. तीनचतुर्थांश ग्रीनलंड तर कायमस्वरूपी बर्फाच्छादितच असते. या बर्फाचे वजन एवढे प्रचंड आहे की मधला भूभाग समुद्रसपाटीपासून 300 मीटर खाली दबून संपूर्ण ग्रीनलंडला कढईचा किंवा तसराळ्याचा (बेसिनचा) आकार प्राप्त झाला आहे.
  अशा या ग्रीनलंडची भुरळ अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना पडावी यात आश्चर्य ते काय? . पण आश्चर्य वाटते ते याचे की, व्हाईट हाऊसलाही (अमेरिकन प्रशासन) खरेदी करण्याची शक्यता पडताळून पहाविशी वाटली. चीननेही या बेटावरील एक नाविक तळ खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो डेन्मार्कने शहाणपणाने, आर्थिक चणचण असून सुद्धा, चीनचा हा प्रस्ताव साफ नाकारला.
   बिंग फुटले
   असे सौदे नेहमी खालच्या आणि दबक्या आवाजात करायचे असतात. त्यातही डोनाल्ड ट्रंप हे मूळचे व्यापारी आणि उद्योजक असल्यामुळे त्यांनी या बाबतीत पुरेपूर काळजी घेतली होती. पण अमेरिकन पत्रकार आजकाल फारच भोचक होत चालले आहेत. वाॅल स्ट्रीट जरनलच्या एका उपद्व्यापी वार्ताहराचे कान तर फारच तिखट होते! त्याने या गोपनीय सौद्याची माहिती उघड केली. झाले! मग काय? हा सौदा किती किफायतशीर ठरेल, याची रसभरित वर्णने व चर्चा सुरू झाली.
  पण खुद्द व्हाईट हाऊसमध्येच या प्रस्तावाबाबत दोन तट आहेत. एक मत असे होते की, याची गणना भरभक्कम आर्थिक रणनीतीत  (साॅलिड एकाॅनाॅमिक स्ट्रॅटजी) मध्ये करायला हवी. तर दुसऱ्या मतानुसार हे दुसरे तिसरे काही, असे म्हणत  प्रस्तावाची गणना ते मुंगेरीलालच्या हसीन सपन्यात करीत होते.
  तसे पाहिले तर, अमेरिकेचा हा खटाटोप 1867 पासून सुरू आहे. नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही अमेरिकेने यादृष्टीने अयशस्वी प्रयत्न केले होते. आतातर काय, एक सुप्रसिद्ध (?) उद्योगपतीच अमेरिकेचा अध्यक्ष आहे. ‘ हे कदापि होणे नाही’, असे आपले मत असल्याचे कुलसुक या गावाच्या बेंट अबिलसेन या नावाच्या सामान्य रहिवाशानेही सीएनएनच्या प्रतिनिधीला निक्षून सांगितले आहे.
   तसे पाहिले तर ग्रीनलंडमध्ये अमेरिकेचा विमानतळ 1951 पासूनच आहे. रडार आणि  ‘बॅलिस्टिक मिसाईल अर्ली वाॅर्निंग सिस्टीम’ च्याद्वारे  हजारो मैल दूर असलेल्या रशियन प्रदेशावर इथून सतत जागता पहारा ठेवला जात असतो. पण वाॅलस्ट्रीट जर्नलच्या मते या बेटाचे सैनिकी महत्त्वही मर्यादितच आहे. पण मूळचे बिल्डर असलेल्या डोनाल्ड ट्रंप यांचे तसे नाही. त्यांची दृष्टी व्यापारीही, नव्हे व्यापारीच आहे.
    डेन्मार्कचा योग्य निर्णय आणि अमेरिकेची आदळआपट
   डेन्मार्कला सध्या आर्थिक चणचण जाणवते आहे. ग्रीनलंडपासून उत्पन्न फारसे नाही त्यामुळे ग्रीनलंडला पोसण्याचा भार त्याला सोसेनासा झाला आहे. तरीही डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटी फ्रेडरिकसन यांनी डोनाल्ड ट्रंप यांची भूमिका हास्यास्पद आहे अशा शब्दात त्यांची संभावना केली आहे. ‘ग्रीनलँड विकणे नाही’ असे त्यांनी ठणकावून सांगताच आणि प्रस्तावाला हास्यास्पद व बिनडोक म्हणताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या आहेत. त्यांनी मेटी फ्रेडरिकसन यांना घाणेरडी / ओंगळ (नॅस्टी) बाई म्हणून शिवी हासडली आहे. पण त्या बधत नाहीत हे पाहताच आपला डेन्मार्कचा दौराच रद्द करून तर कहतच केला आहे.
  ग्रीनलंडचे व्यापारी व सामरिक महत्त्व आणि बुभुक्षित महाशक्ती
   ग्रीनलंडवर ट्रम्प यांचा डोळा का आहे याचे मुख्य कारण व्यापारी तसेच सामरिकही आहे. सर्वच आर्क्टिक भागात तेल, नैसर्गिक वायू आणि अनेक खनिजांचे फार मोठे साठे आहेत. त्यातच जागतिक हवामान बदलामुळे आर्क्टिक भागातील बर्फ वितळू लागला आहे. ही एक फार मोठी जागतिक आपत्ती ठरू शकते. पण महाशक्तींना त्याचे सोयरसुतक नाही. बर्फ वितळला तर एक नवीन सागरी मार्ग नाही का उपलब्ध होणार, असा प्रश्न ते विचारत आहेत. हा मार्ग वाहतुकीबरोबरच लष्करी हालचाली आणि कारवायांसाठी उपलब्ध असणार आहे. त्यामुळे ट्रम्प यांनी ग्रीनलँड खरेदीचा विचार करून चीन आणि रशियावर मात करण्याचे ठरविले आहे/होते. नेहमीप्रमाणे चीनचे एक पाऊल पुढेच आहे. बर्फ वितळेल तेव्हा वितळेल. बर्फ फोडूनही सागरात मार्ग तयार करता येईलच की. असा विचार करीत चीनने बर्फ फोडण्यासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री तयार करायला, गोळा करायला आणि  खरेदी करायला सुरवातही केली आहे, अशा वार्ता आहेत.
 क्षेत्रविस्तारवादी महाशक्ती
  मनगटातील जोराप्रमाणे पैशाच्या जोरावर आपण काहीही हस्तगत करू शकतो अशी गुर्मी एकट्या अमेरिकेचीच नाही तर ती चीन आणि रशियाचीही आहे. अमेरिकेचा तर तसा इतिहासच आहे. अमेरिकेने फ्रान्सकडून लुसियाना 1803 मध्ये 15 मिलीयन डाॅलरला खरेदी केले आहे. त्यावेळी जेफरसन अमेरिकेचे अध्यक्ष होते. या खरेदीमुळे अमेरिकेचे क्षेत्रफळ पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाले. यावरून या महान नेत्याची दूरदृष्टी दिसून येते.
   तसेच अमेरिकेने रशियाकडूनही अलास्का 1867 साली 72 लक्ष डाॅलरला खरेदी केले. त्यावेळी अॅंड्र्यू जाॅनसन अमेरिकेचे अध्यक्ष होते. (14 April 1865 ला अब्राहम लिंकन यांचा खून झाला, तोपर्यंत जाॅनसन उपाध्यक्ष होते). सुरवातीला हा आतबट्याचा व्यवहार ठरेल, असे टीकाकारांचे मत होते. पण अलास्काने शतपटीने भरपाई केली. पुढे 1953 मध्ये जनरल आयसेनहाॅव्हर अमेरिकेचे अध्यक्ष झाले.यांची दृष्टी सैनिकी होती. अलास्काची सरहद्द रशियाला लागून आहे. म्हणून ते अमेरिकेतील इतर राज्यांसारखे एक राज्य असावे, अशी त्यांची भूमिका होती. त्यांनी 1958 साली अलास्काला राज्याचा अमेरिकेच्या 49 व्या राज्याचा दर्जा मिळवून दिला व लष्करीदृष्ट्या सुसज्ज केले. पॅसिफिक महासागरात हवाई बेट 1959 साली अमेरिकेचे 50 वे राज्य झाले आहे. अशाप्रकारे क्षेत्रविस्तार ही अमेरिकेची पूर्वापार भूमिका राहिलेली आहे.
 पण आता 2019 मध्ये अशाप्रकारे प्रदेशांची खरेदी करता येणे शक्य नाही. हे समजण्यात डोनाल्ड ट्रंप कमी पडत आहेत. ग्रीनलंडचे लष्करी महत्त्व, तेथील खनीजे, तिथले निसर्गसौंदर्य पाहता अनेक प्रसार माध्यमांनी ग्रीनलंड खरेदी करण्याच्या कल्पनेचे स्वागत केले आहे पण बहुदा हीच जाणीव डेन्मार्कलाही झालेली असल्यामुळे मेटी फ्रेडरिकसन यांनी हा माल विकणे नाही, असे म्हणत आजच्या अमेरिकन अध्यक्षांचा प्रस्ताव धुडकावून लावला आहे.

No comments:

Post a Comment