Monday, May 4, 2020

अमेरिकेत लढतीतील पठ्ठे निश्चित

   
अमेरिकेत लढतीतील पठ्ठे निश्चित
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    अमेरिका या जागतिक महासत्तेच्या सर्वोच्चपदी कोण बसतो, ही बाब, पूर्वी कधी नव्हती इतकी आज महत्त्वाची झाली आहे. पण सध्या कोरोना (कोविड19) विषाणूबाबतच्या बातमीशिवाय दुसरी कोणताही बातमी टी व्हीवर ब्रेकिंग न्यूज ठरू शकत नाही, की वृत्तपत्रात फर्स्ट लीडची बातमी ठरू शकत नाही. कोविड 19 च्या अमेरिकेतील व जगातील थैमानाकडेच अमेरिकेसकट सर्व जगाचे लक्ष केंद्रित झालेले दिसते आहे.
 बर्नी सॅंडर्स यांची आश्चर्यकारक माघार
   त्यामुळे 3 नोव्हेंबर 2020 ला होऊ घातलेल्या अमेरिकेतील अध्यक्षपदासाठीच्या डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवाराबाबतचे भाकीत चुकीचे ठरून बर्नी सॅंडर्स यांच्याऐवजी जोसेफ बायडेन यांची निश्चितपणे होऊ घातलेली आश्चर्यकारक निवड, कुणाचेही लक्ष फारसे वेधू शकली नाही. बर्नी सॅंडर्स हे बिनदिक्कतपणे आपण समाजवादी विचारसरणीचे आहोत, असे सांगत असत. साम्यवाद/समाजवाद या शब्दांचे अमेरिकेत वावडे असल्याचा काळ आता बराच मागे पडला असून तरूणवर्ग तर समाजवादी धोरणांकडे अपेक्षेने पाहू लागला आहे, असे मत अमेरिकेत व्यक्त होऊ लागले होते. त्यातून बर्नी सॅंडर्स यांच्या अन्य भूमिकाही मतदारांना आकृष्ट करीत असल्याच्या वार्ता सर्वस्तरातून येऊ लागल्या होत्या. पर्यावरणपूरक भूमिका, सरसकट सर्वांना आरोग्य सुविधा, कल्याणकरी राज्यकारभार, स्थलांतरितांबाबत अनुकूल दृष्टीकोन या घोषणांची तर तरुणांना सोबत इतरांनाही चांगलीच भुरळ पडली होती. सर्व वांशिक गटांचा पाठिंबा (डोनाल्ड ट्रंप गोऱ्यांचे विशेष कैवारी मानले जातात), तरुणांबरोबर प्रौढांनाही आकर्षक वाटावी अशी कल्याणकारी भूमिका, वैचारिकतेला आवाहन करण्याच्या भूमिकेमुळे एरवी उदासीन असलेला मतदार मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडण्याची निर्माण झालेली शक्यता अशी भरभक्कम तटबंदी बर्नी सॅंडर्स यांनी उभी केली होती. त्यामुळे डेमोक्रॅट पक्षाची उमेदवारी त्यांनाच मिळेल असे वाटू लागले होते. पक्ष कार्यकर्ते व मतदार यांचा कौल लक्षात घेऊनच अमेरिकेत राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चित होत असतात. हा कौल जाणून घेण्याच्या दृष्टीने होत असलेल्या मतचाचण्यांमध्येही बर्नी सॅंडर्स यांनी आघाडी घेतली होती. त्यांचा वारू असा चौफेर उधळत चालला असतांना त्यांनी अध्यक्षपदासाठीच्या पक्षांतर्गत लढतीतून माघार घेत व ज्यो बायडेन यांना पाठिंबा घोषित करून सर्वांनाच आचंबित केले आहे.  
डोनाल्ड ट्रंप विरुद्ध ज्यो बायडेन
    अनेक राज्यातील डेमोक्रॅट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी ज्यो बायडेन यांच्या बाजूने मतदान केले. कृष्णवर्णीयांनीही मोठ्या संख्येने बायडेन यांनाच पसंती दिली. तसेच पर्यावरणसंवर्धन आणि सर्वांनाच आरोग्यसुविधा या त्यांच्या भूमिका मतदारांना विशेष भावल्या असे दिसते. त्यातच लक्ष्मीचा वरदहस्तही त्यांचे तारू तारून नेण्यास कारणीभूत  झाला. त्यामुळे प्रचाराच्या उत्तरार्धात मतदारांच्या व पक्ष कार्यकर्त्यांच्या बदलत्या मनोभूमिकेचा कानोसा येऊन (?) बर्नी सॅंडर्स यांनी स्पर्धेतून माघार घेतली, असे मत व्यक्त होत आहे. आपण जे मुद्दे घेऊन उभे होतो, त्यांचाच पाठपुरावा ज्यो बायडेनही करतील/ करणार आहेत, असा विश्वास व साक्षात्कार व्यक्त करीत बर्नी संडर्स यांनी आपणही 2020 च्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांचाच प्रचार करणार असल्याची घोषणा केली. अशाप्रकारे 2020 ची अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूक डेमोक्रॅट पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून ज्यो बायडेन व रिपब्लिकन पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून डोनाल्ड ट्रंप यांच्यात लढली जाईल, हे निश्चित झाले आहे. अधिकृततेची औपचारिक घोषणा व्हायचेच कायते शिल्लक आहे.
     भारतीय मतदारांची द्विधा मन:स्थिती
  ज्यो बायडेन हे 2009 ते 2017 या 8 वर्षांच्या दीर्घ कालखंडात अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबत उपाध्यक्षपदी  काम करीत होते. ते कायद्याचे पदवीधर आहेत. 1970 पासून त्यांनी निरनिराळ्या पदांवर निवडून येऊन काम केलेले आहे. ते प्रत्येक वेळी जागतिक व सामाजिक प्रश्नांवर निश्चित भूमिका घेत आले आहेत. अमेरिकेच्या अध्यक्षपदी कोण निवडून येतो, याकडे भारतही विशेष लक्ष ठेवून आहे. अमेरिकेतील भारतीय मतदार सध्या द्विधा मन:स्थितीत आहेत. सामान्यत: अमेरिकन भारतीय मतदार डेमोक्रॅट पक्षाला मतदान करीत आला आहे. स्थलांतरितांबाबत डेमोक्रॅट पक्षाची भूमिका केवळ सौम्य व उदारमतवादीच नाही तर अनुकूल व समावेशी राहिली आहे. म्हणून भारतीय मतदार डेमोक्रॅट पक्षाला मदत करीत आला आहे/होता. पण नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रंप यांच्यातील स्नेहसंबंध त्यांना रिपब्लिकन पक्षाकडे वळवतांना दिसत आहेत. अमेरिकन मुस्लीम मतदारांनी मात्र सरळसरळ डेमोक्रॅट पक्षाची बाजू घेतली आहे. डेमोक्रॅट पक्षही आजवर पाकीस्तानचीच बाजू घेत आला आहे. अमेरिकेतील भारतीय मतदार निदान काही राज्यात तरी निकालावर प्रभाव टाकू शकतील, इतपत मोठ्या संख्येत आहेत. त्यामुळे ज्यो बायडेन यांना त्यांनाही दुर्लक्षून चालण्यासारखे नाही. मुस्लीम मतदारांचा पाठिंबा कायम ठेवून भारतीय मतदारांना आपल्या बाजूला वळवतांना त्यांना तारेवरची कसरतच करावी लागणार आहे.
   मतदार डोनाल्ड ट्रंप यांच्यावर नाराज
   कोविड19 चे थैमान सुरू होण्याअगोदर डोनाल्ड ट्रंप यांचा विजय गृहीत धरला जात होता. पण डोनाल्ड ट्रंप यांनी कोविड19 प्रकरण ज्या प्रकारे हाताळले आहे, त्यामुळे अमेरिकन जनता त्यांच्यावर चांगलीच नाराज झाली आहे. डोनाल्ड ट्रंप यांच्या बाबतीत कोरोनाची साथ येण्याअगोदर 47 % मतदार नाराज होते, आता नाराजांचे प्रमाण 55 % झाले आहे. पण अध्यक्षाची निवड पॅाप्युलर व्होट्सनुसार नाहीतर इलेक्टोरल व्होट्सच्या आधारे होत असते, हेही लक्षात ठेवले पाहिजे. कोणते राज्य कुणाला अनुकूल, हे ठरविण्यापुरताच पाॅप्युलर व्होट्सचा विचार केला जातो.                      
                  ज्यो बायडेन यांच्यावर विनयभंगाचा आरोप
   याच काळात तारा रीड नावाच्या राजकीयक्षेत्रात व ज्यो बायडेन यांच्या सिनेट कार्यालयात काम करणाऱ्या महिलेने ज्यो बायडेन यांच्यावर विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. ही घटना 1993 ची असून त्याबाबत आपण याबद्दल तेव्हाच अनेकांना सांगितले होते, असे तिचे म्हणणे आहे. याचे खंडन ज्यो बायडेन यांच्या प्रवक्त्याने  व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे 1993 सालच्या  विनयभंगाच्या आरोपाकडे मतदार किती गंभीरतेने पाहतील, हाही एक प्रश्नच आहे. उलट जनमत चाचणीत तर ते सध्याच 4%च्या फरकाने आघाडीवर आहेत.
   मिलीजुली कुस्ती?
   एक वेगळे मत असेही आहे की, अमेरिकेत एक व्यक्ती फक्त दोनदाच अध्यक्षपदी राहू शकत असल्यामुळे एकदा अध्यक्षपदी निवडून आलेल्याच दुसऱ्यांदा ती संधी देण्याची प्रवृत्ती केवळ मतदारांमध्येच नाही, तर राजकीय पक्षातही असते. त्यामुळे डेमोक्रॅट पक्षाने मुद्दामच कच्चा उमेदवार दिला असण्याचीही शक्यता आहे. पण घोडामैदान अजून बरेच दूर आहे. चीनचा बागुलबुवा या काळात पक्क्याचा कच्चा व कच्च्याचा पक्काही करू शकतो. पण मतदान 3 नोव्हेंबर 2020 ला आहे. तोपर्यंत वाॅशिंगटनमधील पोटोमॅक नदीतून बरेच पाणी वाहून जाणार आहे, हे मात्र नक्की.

No comments:

Post a Comment