Monday, May 11, 2020

एकच उणीव, ती एक स्त्री आहे!

 
एकच उणीव, ती एक स्त्री आहे!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   बहुतेक राजघराण्यांमध्ये जेव्हाजेव्हा सत्तासंघर्ष होत आलेला आहे तेव्हातेव्हा तो हिंसक स्वरूपच धारण करीत आला आहे. उत्तर कोरियातील किम घराणेही याला अपवाद असण्याचे कारण नाही. किम जोंग-उन हा सध्या उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा असाच सत्तासंघर्ष करून सत्ताधीश झालेला आहे. त्याच्या मृत्यूबाबतच्या/ आजारपणाच्या वार्तांना आता पूर्णविराम मिळालेला दिसत असतांनाच किम जोंग-उन मेलाच असून समोर येतोय तो त्याच्या सारखा दिसणारा तोतया आहे, असेही वृत्त आहे. एकीकडे चीनमधून एक वैद्यकीय चमू त्याच्या शुश्रुषेसाठी आत  कोरियात गेली तर दुसरीकडे चिनी फौजा व रणगाडे सरहद्दीला लागून उभ्या ठेवण्यात आल्या आहेत, अशाही वार्ता येत आहेत.  क्षेपणास्त्रांना अमेरिकेविरुद्ध डागण्याची तयारी असल्याची बातमी तर अगदी ताजी आहे. तरीही या सत्तासंघर्षाकडे अंगुलीनिर्देश करणाऱ्या बातम्या पोलादी चौकट भेदून बाहेर येतच होत्या/आहेत. नक्की काय आहे, ते कळायला वेळ लागेल.
  किम यो-जोंग
   सत्ताधीशाची बहीण म्हणून, उत्तर कोरियाच्या राजकारणातील उगवता तारा या शब्दात किम यो-जोंगचा गौरवपूर्ण उल्लेख बाह्यजगात केला जात असे. 2018 साली दक्षिण कोरियातील शीतकालीन ॲालिंपिक स्पर्धेत तिने उत्तर कोरियाच्या चमूचे प्रमुखपद भूषविले होते. या मुक्कामात तिने अनेक राजकीय मसलतीही पडद्यामागे राहून पार पाडून महत्त्वाची भूमिका बजावली होती. तिची प्रतिमा निर्माण करण्याचा हा तिच्या भावाचा प्रयत्न होता, असेही काहींचे मत आहे.
किम प्यॅांग-इल
   किम प्यॅांग इल उत्तर कोरियाचा जनक किम सुंग याचा जिवंत असलेला सगळ्यात धाकटा व कर्तृत्ववान पुत्र आहे. सत्तास्पर्धेत हारल्यानंतर गेली चार दशके त्याला मायदेशापासून दूर ठेवण्यासाठी निरनिराळ्या देशात वकील म्हणून पाठविण्यात आले होते. तो 2019 पासून मायदेशी परत आला आहे. किम यो-जोंगच्या तुलनेत तो उजवा यासाठीच ठरतो की तो एक पुरुष आहे. पण चार दशकांच्या विजनवासामुळे त्याचा देशांतर्गत संपर्क अत्यल्प आहे.
किम जोंग - च्यूल व अन्य
    किम जोंग - च्यूल हा किम जोंग उनचा ज्येष्ठ बंधू आहे. पण त्याला महत्त्वाकांक्षाच नाही. त्याला गिटार वाजवणेच आवडते. प्रसिद्ध गिटारवादक एरिक क्लॅप्टन हा ब्रिटिश गिटारवादक व कवी म्हणजे त्याच्यासाठी सर्वेसर्वा आहे. तो सतत संगीत व काव्यविश्वातच वावरत असतो. उत्तर कोरियाचा जनक किम सुंगचा भाऊ म्हणजे सध्याच्या सत्ताधीशाचा काका शंभरी गातो आहे. त्यामुळे तो उत्तराधिकारी असण्याचा प्रश्नच नाही. तसेच किम ज्यू-ई ही सध्याच्या सत्ताधीशाची कन्या तर आज बालवयातच आहे. म्हणजे सत्तासंघर्षातून तीही बाद!
बहीण सर्वगुणसंपन्न पण...
  बहिणीचे कर्तृत्व बहुपेडी आहे. गेली बहुतेक वर्षे राज्यशकट हाकण्यात तिचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. तुफानी प्रचारआघाडीचे स्वरुप निश्चित करण्याबरोबरच ती प्रभावीपणे राबवण्याचे कर्तृत्वही तिचेच आहे. उत्तर कोरियात आपल्या भावाची प्रतिपरमेश्वर ही प्रतिमा उभी करण्याचे कामी तिने आपले कौशल्य पणाला लावले आहे. उत्तर कोरियात चित्रवाणी आणि नभोवाणीवर सकाळपासूनच त्याचे गुणगान सुरू होत असते, हेही तिच्याच अविरत प्रयत्नांचे, ठाम भूमिकेचे व बंधुनिष्ठेचे फळ आहे. त्यामुळे पराकोटीचे दारिद्र्य व हालअपेष्टा वाट्याला येऊनही अख्खा उत्तर कोरिया किम जोंग-उनच्या भजनी लागला आहे. क्रौर्य व जुलुमजबरदस्तीत भावाबहिणीत डावेउजवे करता येणार नाही. किम यो-जोंग चे रौद्ररूप, ती जेव्हा प्रतिपक्षाला उत्तर देत असते, तेव्हा चांगलेच प्रत्ययाला येते. मध्यंतरी उत्तर कोरियाने आपल्या सैनिकी सामर्थ्याचे प्रदर्शन करतांना खरोखरच्या युद्धाचे चित्र साकारले होते. यावर दक्षिण कोरियाने आक्षेप नोंदवताच, किम यो-जोंगने आपली तीव्र, तिखट व जळजळीत प्रतिक्रिया जाहीर केली. दक्षिण कोरियाची प्रतिक्रिया म्हणजे, भेदरलेल्या कुत्र्याचे केकाटणे आहे, असे म्हणत तिने दक्षिण कोरियाला झापले होते. राजकीय व शासकीय पातळीवर एकेक पायरी ती वरवर चढतच गेली आहे. तिच्यात राजकीय चातुर्यही आहे. अमेरिकेने तिच्यावर मानवीहक्कांची पायमल्ली केल्याचा आरोप ठेवून ‘ब्लॅकलिस्ट’ केले आहे. तरीही डोनाल्ड ट्रंप यांनी कोविड-19 चा सामना करण्यासाठी उत्तर कोरियाला मदत देऊ करताच तिने डोनाल्ड ट्रंप यांची वारेमाप व जाहीर स्तुती केली. राजकारणात केव्हा काय भूमिका घ्यावी, याचे अचुक ज्ञान तिला उपजतच आहे. तसेच पक्ष कार्यकर्त्यांमध्ये तिच्या खानदानी रक्ताबद्दल दरारायुक्त आदर आहे. पण तरीही उत्तर कोरियन जनतेची मानसिकता पाहता ती भावाची जागा घेऊ शकणार नाही, असे अनेक राजकीय पंडितांना वाटते.
          कन्फ्युशसच्या विचारांचा पगडा
    बंडखोर  केन इओम पूर्वी एक सेनाधिकारी होता. त्याने बंड करीत उत्तर कोरियातून मोकळ्या आणि स्वतंत्र जगात आश्रय घेतला आहे. त्याच्या मते उत्तर कोरिया स्त्री सत्ताधीशाला कधीच मान्यता देणार नाही. परंपरावादी  जनता आज किम जोंग-उन याच्या जुलमी राजवटीत गुलामाप्रमाणे आणि पशुवत जीवन जगत असून सुद्धा त्याच्याशी पुरतेपणी एकनिष्ठ आहे. असे असूनही उद्या त्याच्याच इच्छेनुसार सत्तेवर आलेल्या त्याच्या बहिणीचे नेतृत्व मात्र ती स्वीकारणार नाही, असे ठामपणे म्हटले जाते, हे कसे? या प्रश्नाच्या उत्तरासाठी आपल्याला कोरिया, जपान आणि चीन आदी देशांच्या प्राचीन इतिहासात डोकावून पहावे लागेल. या भूखंडातील मानवसमाजावर आजही कनफ्युशस या त्यावेळच्या महान विचारवंताच्या विचारांचा पगडा कायम आहे. कनफ्युशसला स्त्रीपुरुष समानता मान्य नव्हती. स्त्रीचे स्थान पुरुषाच्या तुलनेत दुय्यमच असले पाहिजे, असे तो स्वत: व त्याची शिष्य परंपरा मानीत आली आहे. म्हणून किम जोंग-उन च्या हयातीत, दुसऱ्या क्रमांकावर असली तरी त्याच्यानंतर मात्र सर्वसत्ताधीश म्हणून उत्तर कोरियात किम यो-जोंगला कदापि मान्यता मिळणार नाही.
                सम्राटपदी स्त्री असणार नाही, जपानमध्येही  तरतूद
   सम्राटपदाचा वारस पुरुषच असला पाहिजे, अशी तरतूद जपानच्या घटनेत आहे. राजपुत्र नरुहिटो यांना आयको नावाची मुलगीच असल्यामुळे घटनेतील तरतुदीनुसार ती सम्राटपदी विराजमान होऊ शकणार नव्हती. आयकोचा जन्म झाल्यावर घटनेत बदल करून आयकोला - एका स्त्रीला - राजसिंहासनावर बसवण्याची तरतूद करण्याचा विचार जपानमध्ये पुढे आला. पण दरम्यानच्या काळात आयकोला भाऊ मिळाला. म्हणजे हिसाहिटोचा - सम्राटाच्या नातवाचा - जन्म झाला आणि घटना दुरुस्तीचा विचार मागे पडला तो पडलाच. हा जपान आज विकसित आणि संपन्न देश मानला जातो. पण भौतिक उन्नतीनंतर वैचारिक संपन्नता, प्रगल्भता आणि समृद्धी येईलच असे नसते.
  उत्तर कोरियात न भौतिक संपन्नता आहे न वैचारिक आधुनिकता. साम्यवादाच्या नावाखाली जनता भरडली जात असूनही ती निमुट आहे. पण कितीही योग्य असली तरी किम यो-जोंग सर्वसत्ताधीश होऊ शकणार नाही. कारण एकच आहे! तिच्यात एकच उणीव आहे!! ती ही की, ती एक स्त्री आहे!!!


No comments:

Post a Comment