Monday, July 27, 2020

चेकाळलेल्या चीनच्या चोरवाटा

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लाॅगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. तसेच हा लेख ॲाडिओ-व्हिज्युअल स्वरुपात https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew वर सब्सक्राईब करून मिळविता येईल.
चेकाळलेल्या चीनच्या चोरवाटा
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   हे युग विस्तारवादाचे नाही, विकासवादाचे आहे, हे मोदी ठणकावून सांगत असतांना, सीमावाद उकरून काढून आपल्या सीमा शेजाऱच्या देशात सरकवणे, प्राचीन इतिहासकाळातील दाखले पुढे करीत प्रदेशांवर, नव्हे देशांवरच, अधिकार सांगणे, समुद्रातील आणि उपसागरातील बेटांवर आपला अधिकार गाजवणे किंवा प्रसंगी कृत्रिम बेटेही तयार करणे आणि नवीन प्रदेश जिंकून सामील करून घेणे, असे चीनचे चार विस्तारवादी प्रकार, निदान दीड डझन देशांबाबत तरी नक्कीच सुरू आहेत.
    फार विचार करण्याची गरज नाही, चीनच्या आजच्या नकाशातून फक्त तिबेट जरी बाजूला काढला तर त्याचे क्षेत्रफळ किती कमी होते, ही नोंद घेण्यासारखी बाब आहे. दुसरे असे की, 1911 मध्ये किंग घराण्याचा अंत होताच, मंगोलियाने आपले स्वातंत्र्य घोषित करून, ही घोषणा 1921 साली प्रत्यक्षात आणली, ती रशियाच्या मदतीने. म्हणून चीन आजही मंगोलियावर आपला अधिकार सांगत असतो आणि रशियावर नाराज असतो. चीनमध्ये लालक्रांती झाल्यानंतर तर मंगोलिया व रशियाचे संबंध जनस्तरावरही आणखी दृढ झाले आहेत. मे 2015 मध्ये याच मंगोलियाला भेट देणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान आहेत. त्यांनी हंबा लामा यांना गंदन मठात रोवण्यासाठी बोधी वृक्षाचे रोपटे, भेट म्हणून सोबत आणले होते. यावेळी अटलबिहारी बाजपेयी इनफर्मेशन टेक्नॅालॅाजी प्रशिक्षण सेंटरची कोनशीला सुद्धा त्यांनी बसवली होती. मोदींची ही भेट आपल्यापेक्षाही  मंगोलिया, रशिया आणि चीन यांच्याच लक्षात नक्की असणार. मंगोलियाला ही भेट आवडली, रशियाला चालली पण चीनला मात्र खुपली. चीनने चेकाळावे अशा अनेक घटना या अगोदर व नंतरही घडल्या आहेत
चीनने उकरून काढलेले सीमावाद
भारत आणि चीन - 1962 मध्ये अक्साई चीन जिंकून चीनने 38,000 चौ.किमी. भूभाग बळकावला आहे.  तसेच पाकने बळकावलेल्या भागातून चीनला बहाल केलेली शक्सगाम नदी व खोऱ्यासकटची लांब पट्टीही चीनच्या ताब्यात आहे. याशिवाय  अरुणाचलमधील 90,000 चौ. किमी. भागावर चीनने दावा ठोकला आहे. तिकडे उत्तराखंडची 545 किलोमीटर लांबीची सीमा चीनला (तिबेट) लागून आहे. या भागातील निरनिराळ्या ठिकाणी मिळून एकूण 2450 चौ.किमी. भूभाग चीनला हवा आहे.
चीन आणि नेपाळ - आजचा नेपाळ चीनच्या ताटाखालच्या मांजरासारखा दिसत/वागत असला तरी चीनने नेपाळमध्ये घुसखोरी करून हडपलेली एकूण 64 हेक्टर जागा ढोलाखा, हुमला आदी सहा जिल्ह्यात विखुरलेली आहे. नेपाळ-चीन सीमा 1415 किमी. लांब आहे. या सीमेवर ठिकठिणी पिलर्स लावलेले होते. यापैकी 98 पिलर्स उखडून फेकण्यात आले आहेत तर इतर काही पिलर्स नेपाळच्या सीमेत आत सरकवण्यात आले आहेत. नेपाळी कॅांग्रेसने याबाबत नेपाळच्या संसदेत ठराव मांडून चीनने नेपाळची हडपलेली भूमी परत मिळविण्यास ओली सरकारला सांगितले, पण व्यर्थ!
   मे 2020 मध्ये चीनच्या ग्लोबल टेलिव्हिजन नेटवर्कने, माऊंट एव्हरेस्ट चीनच्या हद्दीत आहे, नेपाळच्या नव्हे, असे घोषित केले. नेपाळमध्ये संतापाची लाट उसळताच मात्र हे ट्विट डिलिट करण्यात आले. चीन आणि नेपाळमध्ये 1788 ते 1792 या काळात युद्ध झाले होते. त्याचा हवाला देत 64 हेक्टर जागेवर चीन आपला अधिकार सांगतो आहे. नेपाळचे विद्यमान पंतप्रधान ओली हे स्वत: साम्यवादी असून, चीनमधील साम्यवादी शासनाशी असलेली त्यांची घट्ट जवळीक पाहता, या प्रश्नावर नेपाळ का मूग गिळून गप्प बसला आहे, हे स्पष्ट होते. हाच नेपाळ भारताशी कसा वागतोय ते पहा. नेपाळने अर्थेन दास्यता या उक्तीला अनुसरून धनको चीनच्या इशाऱ्याप्रमाणे  भारताशी भांडण उकरून काढले आहे.
चीन आणि भूतान- जुलै 2017 मध्ये भूतानने चीनला बजावले होते की, दोन देशादरम्यान झालेल्या सहमतीला अनुसरून वागावे. पण छे! डोकलाम प्रकरणानंतरही चीन भूतानमध्ये  ठिकठिकाणी घुसखोरी करीत असतो. भूतानी गुराख्यांना भूतानी प्रदेशातूनच चिनी गस्ती तुकड्यांनी अनेकदा हुसकून लावले आहे. चीनने भूतानच्या साकतेंग अभयारण्यावर दावा करून भारतालाही शह देण्याचा प्रयत्न केला आहे.
चीन आणि रशिया - चीनने रशियामधील 1लक्ष 60 हजार चौरस किमी. जागेवर दावा ठोकला आहे. या संभाव्य घुसखोरीमुळे रशियात तीव्र संताप व्यक्त होत आहे. रशियाचा पूर्व किनारा विरळ लोकवस्ती असलेला पण खनीजविपुल आहे. येथील बंदर आहे, व्ह्लाडिव्होस्टॅाक. 1860 मध्ये हा एका तहान्वये रशियाचा भाग झाला. चीनला आज तो परत हवा आहे. पण रशिया संतापताच चीनने भूमिका बदलली आणि आमचा उद्देश फक्त ऐतिहासिक सत्यघटना सांगण्याचा होता, अशी मखलाशी केली. एका कायदेशीर तहान्वये रशियात सामील झालेले व्ह्लाडिव्होस्टॅाक, हे आज रशियाचे प्रचंड मोठे बंदर असून त्यामुळे रशियाला पॅसिफिक महासागरात (जपानी समुद्र) प्रवेश करता येतो.
उकरून काढलेले अन्य  सीमावाद
  दक्षिण चीन उपसागर आणि प्रशांत महासागरात चीनने जवळपास सर्व देशांशी सीमावाद उकरून वातावरण तापवले आहे. चीनचे तायवान, ब्रुनाई, इंडोनेशिया, मलायाशिया, फिलिपिन्स, व्हिएटनाम आणि जपानबरोबर सागरविषयक प्रश्नी वाद आणि संघर्ष आहेत. समुद्रातील साधनसंपतीबाबत, जुने पुराणे ऐतिहासिक दाखले दाखवत, चीन अधिकार गाजवण्याच्या प्रयत्नात असतो. तसेच, दक्षिण चिनी समुद्र आणि त्यातील लहानमोठी बेटे, समुद्रात जेमतेम बुडालेली बेटे, किनारे, यावर चीन आपला अधिकार गाजवत असतो.
मालकीहक्कासाठी कोणतेही निमित्त पुरेसे
   व्हिएटनाम, जपान, तायवान, फिलिपिन्स, सिंगापूर, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, लाओस, तजिकिस्तान, कंबोडिया या सारख्या देशांवर ते चिनी उपसागराला किंवा प्रशांत महासागराला लागून असल्यामुळे, किंवा तिबेटप्रमाणे इतिहासकाळात ज्यांच्यावर कधीतरी चीनचे अंशत: किंवा पूर्णत: स्वामित्व असल्यामुळे किंवा काही सागरातील बेटे असल्यामुळे, ती जणू आपल्या तीर्थरूपांच्याच मालकीची आहेत, असा आव आणून चीन त्यांच्यावर आपला अधिकार सांगतो आहे.
जिंकून गिळंकृत केलेले प्रदेश
 याशिवाय उरल पर्वत व सैबेरिया दरम्यानचा 16 लाख चौकिमी भाग, इनर मंगोलियाचा 12 लाख चौकिमी भाग, तायवानचा 36 हजार चौकिमी हिस्सा, हॅांगकॅांगचा 11 शे चौकिमी व मकावचा 33 चौकिमी भाग चीनने जिंकून आपल्या देशाला जोडला आहे, ते वेगळेच. देशांच्या सीमा मानवनिर्मित असतात, परमेश्वरनिर्मित नसतात, हे ऐतिहासिक सत्य आहे, हे.खरे असले तरी
आजच्या चीनच्या व त्याने दावा केलेल्या भूभागांना गृहीत धरून जर उद्या सीमा खरेच निश्चित झाल्या, तर त्या मानवनिर्मित नव्हे तर दानवनिर्मित असतील, असे म्हटले तर ते चुकेल का?

चीनची काश्मीरमधील घुसखोरी

गिलगिट व बाल्टिस्तान, पाकिस्तानने चीनला बहाल केलेला भूभाग, अक्साई चीन, लडाख, जम्मू व काश्मीर, पाकने बळकावलेला भाग व ताबारेषा
 

Monday, July 20, 2020

चंद्रकोरी पेंगॅांगवरील चिनी अरिष्ट!

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लाॅगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. तसेच हा लेख ॲाडिओ-व्हिज्युअल स्वरुपात https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew वर सब्सक्राईब करून मिळविता येईल.
चंद्रकोरी पेंगॅांगवरील चिनी अरिष्ट!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   पेंगॅांग त्सो म्हणजे चंद्रकोरीसारखे सरोवर. 1962 मधील संघर्षानंतर चीनने एकतर्फी माघार घेतल्यावर अस्तित्वात आलेली प्रत्यक्ष ताबारेषा मुख्यत: जशी जमिनीवरून जाणारी आहे, तशीच ती या चंद्रकोरी पेंगॅांग सरोवरातूनही जाते. 4350 मीटर उंचीवरचे, 134 किमी लांबीचे, सुमारे 700 चौ.किमी. क्षेत्रफळाचे, भारत आणि तिबेटला स्पर्श करणारे, चंद्रकोरीच्या आकाराचे, महत्तम रुंदी 5 किमी आणि महत्तम खोली 100 मीटर असलेले, निम्यापेक्षा जास्त लांबी तिबेटमध्ये असलेले, पर्यटकांचे आवडते पेंगॅांग सरोवर! वाहत येणारे पाणी साठून तयार झालेले, भूवेष्ठित असल्यामुळे खाऱ्या पाण्याचे, हिवाळ्यात पूर्णपणे गोठणारे! याला न नदी येऊन मिळते न यातील पाणी वाहून समुद्राला/दुसऱ्या नदीला मिळते न कधी याचा ओव्हरफ्लो होतो! न सिंधूचे आकर्षण, न तिच्या उपनद्यांवर ह्याची मर्जी, हे आहे पूर्णपणे स्वतंत्र! गोठल्यानंतर  स्केटिंग आणि पोलो खेळांसाठी तसेच चित्रपटांच्या चित्रिकरणासाठीसुद्धा, हे  सोयीचे आणि आवडीचे ठरले आहे. या सरोवरातील पाण्याचा रंग ऋतूपरत्वे निळ्याचा हिरवा आणि हिरव्याचा लाल होत असतो. त्यामुळे हे पर्यटकांच्याही विशेष आवडीचे झाले आहे. पण...
     नाठाळ चीन
    1962 ते 2020 या कालखंडात या भागात अनेकदा संघर्षाच्या ठिणग्या उडाल्या आहेत. पेंगॅांग सरोवराचा किनारा सरळ रेषेत नाही. सिरिजप पर्वताचे सुळके मध्येच आत सरोवरात घुसून फाट्यांसारखा आकार निर्माण झाला आहे, त्यांना लष्करी भाषेत फिंगर्स असे म्हणतात. फिंगर 4 आणि 8 यात खंदक आणि टेहेळणी केंद्रे आहेत. ही काढून टाकून पूर्वस्थितीत म्हणजे फिंगर 8 पर्यंत चीनने मागे सरकणे अपेक्षित आहे. कारण मेच्या प्रारंभापर्यंत भारताच्या गस्ती तुकड्या फिंगर 8 पर्यंत गस्त घालीत. पण  चीन आता म्हणतो आहे की, भारतीय सीमा फिंगर 4 पर्यंतच आहे. चीन असाच सोकावला तर तो अशीच घुसखोरी डेपसांग, चुमर, डेमचोक, चुशूल या भागातही करू शकेल. चीनला इथून आपल्या ठाण्यांची टेहेळणी करणे, त्यावर आक्रमण करणे, किंवा टेहेळणी करणाऱ्यांची वाट आडवणे सहज शक्य आहे. म्हणून चीनला या भागात घुसखोरी करू न देणे तसेच फिंगर 8 पर्यंत माघार घेण्यास लावणे खूप आवश्यक आहे. खुद्द संरक्षणमंत्र्यांनी नुकतीच लडाखला भेट देऊन सर्व तयारीची पाहणी केली, ही सामान्य बाब नाही.
   ताबारेषेवर परत जा
   चीनचे असे म्हणणे असे आहे की, भारताने फिंगर 4 पासून फिंगर 2 पर्यंत व चीनने फिंगर 4 पासून  फिंगर 6 पर्यंत मागे जावे. चीन फिंगर 6 पर्यंत मागे गेला तरी तो फिंगर 8 पर्यंत मागे न गेल्यामुळे दोन फिंगर पुढेच राहतो व भारताला मात्र काही कारण नसतांना फिंगर 4 पासून फिंगर 2 पर्यंत उगीचच मागे यावे लागेल. म्हणून चीननेच फिंगर 8 पर्यंत मागे गेले पाहिजे. 15 तासांचे चर्चासत्र सर्वात जास्त वेळ चाललेले चर्चासत्र का आहे, हे यावरून लक्षात येईल. सैन्ये मागे सरकण्याची पद्धती व वेळापत्रक यात दीर्घसूत्रीपणा असणे व या निमित्ताने वेळकाढूपणाचा अवलंब चीनने करणे मुळीच अनपेक्षित नाही. फिंगर 4 पासून चीन मागे हटायला तयार आहे, फिंगर 5 पर्यंत सरकलाही आहे. पण डेपसांग आणि अन्य फिंगर्स मधून पूर्णत: हटायला तयार  नाही. उलट चीन इथे एक हेलिपॅड तयार करण्याच्या खटपटीत आहे, त्याने लढाऊ विमाने,तोफा व क्षेपणास्त्रे आत होटान हवाई तळावर आणून ठेवली आहेत, अशी उलटसुलट वृत्ते कानी येत आहेत. त्यामुळे चीनला डोकलामप्रमाणे सन्माननीय माघार घेण्यासाठी (ॲानरेबल रिट्रीट)  निमित्त स्वरुपात आणखी काही बैठकांचे गुऱ्हाळ चालू ठेवावे लागेल, असे दिसते. चढाईपेक्षा माघारीची प्रक्रिया अनेकदा गुंतागुंतीचीही असते कारण प्रत्येक टप्यावर पडताळणी करायची असते. शिवाय गलवान दगलबाजीनंतर चीनची विश्वसनीयता शून्याच्याही खाली गेली आहे, हेही लक्षात घ्यावयास हवे.
    5 ॲागस्ट 2019 ची घोषणा गंभीरपणे का घेतली?
   सामरिक लाभाचा विचार करून सैनिकी डावपेचात  चीन प्रत्यक्ष ताबारेषेबाबत गेली सहा दशके सतत बदल सुचवीत आलेला आहे. म्हणूनच गलवान खोरे, पेंगॅांग सरोवर,  डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी यांची संघर्षासाठी चीनने निवड केली आहे, त्याचवेळी प्रत्यक्ष ताबारेषेसाठी दळणवळणाच्या सोयीही आपल्या ताब्यातील भागात निर्माण केल्या आहेत. मात्र हीच कृती मोदी शासनाने भारतात आपल्या बाजूने पूर्ण करीत आणताच, चीन भडकला. याशिवाय, अमेरिका, भारत, जपान आणि ॲास्ट्रेलिया यांच्यातील जवळीक (क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॅाग- क्यूएसडी किंवा क्वाड); कोरोना प्रकरणी फसवणूक केल्यामुळे झालेली जगाची नाराजी; अनेक देशांनी केलेली व्यापारीसंबंधविच्छेदाची व बहिष्काराची तयारी; उलट भारताशी मात्र प्रमुख देशांचे मजबूत संबंध; यामुळे चिनी अर्थकारणावर निर्माण झालेले गंभीर सावट; या सर्वांचा परिणाम  चीनच्या अडचणीत वाढ होण्यात झाला आहे. पण तरीही इकडे अक्साई चीन, पूर्ण पेंगॅांग सरोवर, गलवान खोरे हे प्रदेश आपल्याच ताब्यात असावेत, यासाठी चीन धडपडत आहे. पाकिस्तानने बळकावलेला काश्मीरचा भाग, त्यातली चीनला बहाल केलेली शक्सगाम नदी व खोऱ्यासकटची लांब पट्टी आणि अक्साई चीन असे सर्व प्रदेश भारताचे अधिकृत भाग आहेत व ते भारताला मिळाले पाहिजेत, ही भारताची तशी पूर्वापार चालत आलेली भूमिका होती व आहे. पण 5 ॲागस्ट 2019 ला, उक्ती कृतीत आणणाऱ्या मोदी सरकारने, सर्व संसदसदस्यांच्या सहमतीने याच भूमिकेचा पुनरुच्चार केला, तेव्हा मात्र पाकिस्तान व चीन खडबडून का जागे झाले, हे सांगायलाच हवे काय?
   शांतता हवी, पण….
   सर्व चर्चांमध्ये पेंगॅांग सरोवरातील आठ फिंगर्स केंद्रस्थानी असणार/होते, यात शंका नाही. शत्रूला आमच्या सैन्यशक्तीचा आणि संतापाचा अनुभव आलेला आहे. आम्ही शांततेचे पुरस्कर्ते आहोत, पण हा आमचा दुबळेपणा आहे, असे कुणी समजू नये, अशा शब्दात मोदींनी नाव न घेता चीनला ठणकावले आहे. (खुद्द शी जिनपिंग यांनीही भारताचे नाव घेऊन लडाख प्रकरणी भाष्य केलेले नाही). चीनचा विस्तारवाद आणि पाकिस्तानप्रणित दहशतवाद व घुसखोरी यांच्याशी एकाचवेळी लढण्याची तयारी भारताने केली आहे. ‘यानंतर जो संघर्ष होईल, तो ताबारेषेपुरता सीमित राहणार नाही. ते दोन देशातील युद्धच असेल, ते परवडेल का?’, हे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी स्पष्ट करताच चक्रे वेगळ्या दिशेने फिरू लागलेली दिसताहेत. पण तरीही बेसावध न राहता, भारत या घटनांवर समर्थांच्या सांगण्याला अनुसरून नजर ठेवून आहे. ‘अखंड सावधान असावे ! दुश्चित कदापी नसावे ! तजविजा करीत बैसावे ! येकान्त स्थळी !!’.


चंद्रकोरी पॅनगॅांग सरोवर (google map)

 पेंगॅांग सरोवर
1ते 8 फिंगर्स, तुटक रेषा (चीनला अभिप्रेत सीमारेषा), सलग रेषा (भारताला अभिप्रेत सीमारेषा)



Tuesday, July 14, 2020

कथा, कुळकथा, व्यथा, गलवान नदी आणि खोऱ्याची

  हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लाॅगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. तसेच हा लेख ॲाडिओ-व्हिज्युअल स्वरुपात https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew वर सब्सक्राईब करून मिळविता येईल.
कथा, कुळकथा, व्यथा, गलवान नदी आणि खोऱ्याची
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    गलवान नदी आणि खोऱ्याची कथा आणि कुळकथा जेवढी रोचक आहे, तेवढीच व्यथा चीड आणि संताप आणणारी आहे. काराकोरम पर्वताच्या पूर्वभागातील सॅमझुंगलिंग येथे उगम पावून जेमतेम 80 किमी लांबीची अतिवेगवान गलवान नदी, चीनने 1962 साली बळकावलेल्या अक्साई चीनमधून पश्चिमेकडे लडाखमध्ये खळाळत वाहत येऊन शेवटी शोक या सिंधूच्या उपनदीला मिळते. दोन पर्वतांमध्ये  चेचली गेल्यामुळे ही अतिवेगवान झाली आहे.
   सामान्य पण मूळ शोधकर्त्याचा गौरव
   लेह येथील एक लडाखी वाटाड्या, गुलाम रसूल गलवान, याच्या नावावरुन या नदीचे नाव गलवान नदी व खोऱ्याचे नाव गलवान खोरे असे पडले आहे. हा वाटाड्या 1899 मध्ये ब्रिटिश शोधमोहिमेच्या पथकासोबत होता. त्या काळात जो चंग चेन्मो खो दरी ही सर्वांच्या माहितीतली होती. पण तिच्या  उत्तरेकडील भाग मात्र अज्ञात होता. या भागात हे पथक शोध घेत चालले असतांना, ते एका अज्ञात नदीच्या खोऱ्यात गेले आणि त्यांना एक नदी गवसली. तीच ही गलवान नदी, तेच हे गलवान खोरे, तेच मध्यंतरी पेटले होते आणि तेच अजूनही धुमसत आहे. अशाप्रकारे एखाद्या मुख्य भौगोलिक रचनेचे नाव, सामान्य पण मूळ शोधकर्त्याच्या नावावर ठेवले जाण्याचे उदाहरण क्वचितच आढळून येते. बक्षिसी म्हणून येथील एक भूखंड  गुलाम रसूल गलवान याला बहाल करण्यात आला होता.  त्याच्या वंशजांजवळ आजही ही सर्व नोंद आहे. तसेच हा सर्व वृतांत सांगणारा तपशील एका छोटेखानी ग्रंथात नोंदवलेलाही आहे. आता गलवान नदी व खोरे कोणाच्या मालकीचे, ते सांगायलाच हवे काय? आज परत फिरताना दिसणाऱ्या आक्रमक चीनला मात्र हे पुन्हापुन्हा सांगावे लागणार आहे, हे विसरून चालणार नाही.
    वाढता वाढता वाढे दावा, हिंसा पहिली 1962 ची  तर  दुसरी 2020 ची
   गलवान नदीवर 1956 पर्यंत चीनने दावा ठोकला नव्हता. मात्र 1960 मध्ये चीनने आपली सीमारेषा आणखी पश्चिमेला सरकवून गलवान नदी पर्यंत वाढविली. याच काळात संपूर्ण अक्साई पठारावर आपला अधिकार असल्याची जाणीव भारताने चीनला करून दिलेली आहे/होती, हे मुद्दाम नोंदविणे आवश्यक आहे.
   1962 साली 4 जुलैला भारताच्या टेहेळणी तुकडीने एक चौकी स्थापन करून सॅमझुंगलिंग ला जाणारा चीनचा मार्ग बंद केला. हा हल्ला मानून चिनी सैन्याने सुमारे 100 मीटर अंतर राखून चौकीला चहूबाजूंनी वेढा घातला. या कृतीचे गंभीर परिणाम होतील, अशी जाणीव करून दिल्यानंतरही चार महिने वेढा कायम होता. या काळात वेढलेल्या तुकडीला हेलिकॅाप्टरच्या साह्याने सर्वप्रकारचा पुरवठा भारत  करीत असे.
  20 ॲाक्टोबर 1962 च्या अगोदरच भारताने त्या चौकीत सैनिकांची एक कंपनी तैनात केली होती. 20 ॲाक्टोबरला चिनी सैनिकांच्या एका बटॅलियने तोफा डागीत चौकीवर आक्रमण केले. 33 भारतीय सैनिक शहीद तर अनेक जखमी झाले, इतर अनेकांना बंदी करण्यात आले. शेवटी अशाप्रकारे 1960 चा दावा चीनने प्रत्यक्षात आणला. तेव्हापासून हा बेकायदा ताबा कायम आहे. 16 जून 2020 ला संघर्ष होऊन भारताचे 20 सैनिक व चीनचे कितीतरी जास्त सैनिक मारले गेले. यावेळी सैन्य माघारीबाबत संयुक्त पत्रक न निघता चीन व भारत यांनी वेगवेगळी पत्रके जाहीर केली ही बाबही विचार करण्यास बाध्य करणारी आहे. आता चीनची माघार सुरू होतांना दिसत असली तरी खातरजमा केल्याशिवाय, नव्हे खारजमा झाल्यानंतरही, वैऱ्याच्या रात्रीचा विसर पडता कामा नये, हाचि बोध खरा!
गलवान खोरे
    15/16 जून 2020 च्या संघर्षानंतर 19 जून 2020 ला संपूर्ण गलवान खोऱ्यावरच  चीनचा दावा पुढे केला. लगोलग पीपल्स लिबरेशन आर्मीने सांगितले की, गलवान खोऱ्यावर चीनचेच स्वामित्व आहे. भारतानेही ताबडतोब ठणकावले की हा दावा  अतिशयोक्त व मान्य होण्यासारखा नाही. आज मागे सरकणाऱ्या चीनकडे डोळ्यात तेल घालून पहावे लागणार आहे, ते यामुळेच. सध्या नदीला पूर असल्यामुळे तर ही माघारी नाहीना, अशा संशयाची पाल चुकचुकते आहे, ती उगीच चुकचुकत आहे का?
   गलवान खोरे दोन उंच पर्वत रांगात अक्षरश: चेंगरलेले आहे. पश्चिमेला  लडाख व पूर्वेला अक्साई चीन आहे. अक्साई चीनवर आज चीनचा अवैध ताबा असल्यामुळे या खोऱ्याला सामरिक दृष्ट्या अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. शोक नदीच्या पश्चिमेला डर्बुक-शोक- दौलत बेग ओल्डी (डीएसडीबीओ) रस्ता भारताने आपल्या सीमेत बांधला आहे. दौलत बेग ओल्डी च्या पूर्वेला जवळच चीनचा हायवे आहे, हे लक्षात घेतले की,  दौलत बेग ओल्डी व तिथले विमानतळ चीनच्या डोळ्यात का सलते आहे, त्याचा थयथयाट का होतो आहे, ते सांगायला नको!
चीनच्या मते ताबारेषा नक्की कुठे आहे?
  खरेतर गलवान आणि शोक नदीच्या संगमाच्या पूर्वेला ताबा रेषा आहे. इथपर्यंत दोन्ही देशांच्या सैनिकी तुकड्या आपापल्या बाजूने गस्त घालीत असत. 15 जूनपासून चीनने दावा करायला सुरवात केली आहे की, सगळे गलवान खोरे ताबारेषेच्या आत त्याच्या बाजूला आहे. चीनने मे पासूनच भारत आपल्या भागात करीत असलेल्या रस्त्याच्या बांधकामावर हरकत घ्यायला सुरवात केली आहे/होती. 1959 मध्ये चीनचे तेव्हाचे पंतप्रधान चाऊ एन लाय म्हणाले होते की, 1956 सालचा नकाशा सीमा बिनचुक दाखवतो. यात संपूर्ण गलवान खोरे भारतात दाखविले आहे. पण जून 1960 मध्ये चीनने नवीन नकाशा प्रसारित करून संपूर्ण गलवान खोऱ्यावर आपला दावा जाहीर केला. 1962 च्या नोव्हेंबर महिन्यातही संपूर्ण गलवान खोऱ्यावर चीनने आपला अधिकार सांगितला खरा पण त्यातही गलवान नदीच्या पश्चिम टोकाचा समावेश नाही/नव्हता.
   कोणाचा भाग कोणता आणि प्रत्यक्ष ताबारेषा नक्की व नेमकी कोणती हा मुद्दा बाजूला ठेवला तरी आत्ताआत्तापर्यंत दोन्ही बाजूंनी एका उभयमान्य ताबारेषेचे पालन होत होते. वाद ताबारेषा थोडी इकडे का थोडी तिकडे एवढाच   होता, संपूर्ण प्रदेशाबाबत वाद कधीच नव्हता. चीनने भारताचा 38,000 चौ.किमी भाग तर 1962 मध्येच हडपला आहे. तरीही भारत विद्यमान ताबारेषेचे पालन करीत आलेला आहे. ताबारेषा आखलेली नाही म्हणून ताबारेषेबद्दल वेगळ्या समजुती असू शकतात. अशी डझनापेक्षा जास्त ठिकाणेही असू शकतात. पण संघर्षाची स्थिती आली नव्हती. ती आत्ताच का बरे आली?
एकतर्फी कारवाईवर उपाय कोणता?
   कारण आज कोरोना लपविल्यामुळे निर्माण झालेला जागतिक संताप व ढासळत चाललेली अर्थव्यवस्था यामुळे चीनची गोची झाली आहे. यावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी संपूर्ण गलवान खोऱ्यावर व गलवान आणि शोक नद्यांच्या संगमावरही दावा ठोकून चीन ताबारेषेत एकतर्फी बदल करू पाहतो आहे. इतर देशांशीही सीमावाद व अन्य वाद उकरून काढतो आहे.  1993 साली भारत व चीन यांच्या बीपीटीए (बॅार्डर पीस ॲंड ट्रॅंक्विलिटी ॲग्रीमेंट) वर स्वाक्षऱ्या आहेत. यानुसार दोन्ही पक्षांनी प्रत्यक्ष ताबारेषेचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे. 1959 व 1962 च्या एकतर्फी मांडलेल्या सीमारेषा विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे ठरले आहे/होते. काही मतभेद झाल्यास चर्चेने प्रश्न सोडवावेत, असेही ठरले होते. पण चीनने यावेळी चर्चेला सुरवात करण्यासाठी आवश्यक असलेल्या नकाशांच्या अदलाबदलीलाच नकार दिल्यामुळे आता कोणता उपाय उरला? त्याचीच तयारी भारताने केली होती!! त्याची फळे दिसू लागली होती!! आजही दिसताहेत!!! पण तरीही लबाडाच्या निमंत्रणाबद्दलची, हत्तीच्या दाखवायच्या आणि खऱ्याखुऱ्या दातांबद्दलची वचने यापुढेही  नित्य स्मरणात ठेवावी लागतील, ही मात्र दगडावरची रेघ  आहे.

Monday, July 6, 2020

अमेरिकेतील पुतळे हटाव मोहीम

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लाॅगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
तसेच हा लेख ॲाडिओ-व्हिज्युअल स्वरुपात  https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew वर सब्सक्राईब करून  मिळविता येईल.https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew वर सब्सक्राईब करून  मिळविता येईल

अमेरिकेतील पुतळे हटाव मोहीम
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   अमेरिकेतील न्यूयॅार्क शहरातील अमेरिकन म्युझियम ॲाफ नॅचरल हिस्टरी या जगविख्यात वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारी 1901 ते 1909 या कालखंडातील अध्यक्ष असलेल्या रिपब्लिकन थिओडोर रुझवेल्टचा (डेमोक्रॅट फ्रॅंकलीन रुझवेल्ट नव्हे) एक अश्वारूढ भव्य पुतळा आहे. तो हटवावा अशी मोहीम अमेरिकेत सुरू झाली असून तिला विरोध करीत डोनाल्ड ट्रंप यांनी तो हास्यास्पद प्रकार आहे, असे म्हटले आहे. पणअमेरिकेत पुतळे हटाव मोहीम तीव्र झाली असून तिचे पडसाद युरोपसह अन्य देशातही उमटत आहेत.
   25 मे 2020 ला जॅार्ज फ्लॅाईड या अश्वेतवर्णी व निशस्त्र व्यक्तीची, एका गोऱ्या शिपायाने अमानुषपणे हत्या केल्यानंतर अमेरिकेत श्वेतवर्चस्ववाद्यांविरुद्ध निदर्शने व आंदोलनांचा आगडोंब उसळला आहे.
  थिओडोर रुझवेल्ट यांच्यावर रोष का?
  याचा राग थिओडोर रुझवेल्ट याच्या पुतळ्यावर का? तर या एका गोऱ्या व्यक्तीच्या या पुतळ्याच्या एका बाजूला सेवक स्वरुपात एक मूळची अमेरिकन व दुसऱ्या बाजूला एक अश्वेतवर्णी व्यक्ती दाखविली आहे. अमेरिकेतील मूळच्या अमेरिकनांचा वंशविच्छेद करून युरोपातील विविध देशातून आलेल्या लोकांनी तिथे आपला जम बसवला तर कृष्णवर्णीयांना पशुवत वागणूक दिली, हे एक ऐतिहासिक सत्य आहे.
    1901 ते 1909 या कालखंडात थिओडोर रुझवेल्ट ही दिमाखदार व निडर व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होती. अमेरिकेला सागरी महासत्ता बनविण्यात हिचे मोठे योगदान होते. त्याचबरोबर वांशिक भेदाभेद करणारा आणि वसाहतवादाचा पुरस्कर्ता, अशीही थिओडोर रुझवेल्टची ओळख आहे.
       गुलामगिरी आणि वसाहतवादाचा पुरस्कार नको
   गुलामगिरीचे आणि वसाहतवादाचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींचे पुतळे हटवावेत, ही मागणी आता अमेरिकेत चांगलाच जोर पकडू लागली आहे. हे पुतळे हटविण्याची वेळ आली आहे, असे मत म्युझियमच्या अध्यक्षा एलेन फ्युटर  यांचेही मत आहे. हा निर्णय पुतळ्याबाबतच आणि तेवढ्यापुरताच आहे, सागरी सामर्थ्य योजनेच्या आद्यप्रवर्तकांपैकी एक म्हणून थिओडोर रुझवेल्ट यांच्याकडे आम्ही आदरानेच पाहतो, अशी त्यांची भूमिका आहे.
जगविख्यात नॅशनल मेमोरियलचे काय?
    या निमित्ताने अमेरिकेत एक बिकट परिस्थिती निर्माण होते आहे. साऊथ डाकोटा प्रांतात माऊंट रशमोअर नॅशनल मेमोरियल नावाचे एक 60 फूट उंचीचे शिल्प आहे.  यात थिओडोर रुझवेल्ट, जॅार्ज वॅाशिंगटन, थॅामस जेफरसन, आणि अब्राहम लिंकन या चौघांचे चेहरे दाखवणारे हे शिल्प आहे. यापैकी लिंकनचा अपवाद वगळला तर इतर सर्वांवर  ते त्याकाळी गुलाम बाळगणारे असल्यामुळे निदर्शकांचा रोष आहे. ट्रंप यांनी वंशवादाचा निषेध करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले असून निदर्शकांचे वर्तन आक्षेपार्ह होते/आहे, अशी त्यांनी निदर्शकांची निर्भर्त्सना केली आहे.
   गुलामगिरीचा पुरस्कार  करणाऱ्यांविरुद्ध सुरू झालेली ही निदर्शने आता अनेक महापुरुषांच्या विरोधात सुरू झाली आहेत. पुतळ्यांपुरते असलेले आंदोलन आता अमेरिकन ऐतिहासिक महापुरुषांच्या दिशेने वळत आहेत. आजच्या अमेरिकेचे त्या काळातले निर्माते थॅामस जेफरसन, जॅार्ज वॅाशिंगटन आणि थिओडोर रुझवेल्ट हेही आजच्या निदर्शकांच्या रोषाला पात्र झाले आहेत.
   किलर ॲंड्र्यू जॅकसन !
   निदर्शकांनी नुकताच आपला मोर्चा ॲंड्र्यू जॅकसन याच्याकडे वळवला आहे. गुलाम बाळगणारा सैनिकीपिंडाचा हा गडी पुढे अमेरिकेच्या अध्यक्षपदी पोचला होता. व्हाईट हाऊस (अमेरिकन अध्यक्षाचे कार्यालय) जवळचा ॲंड्र्यू जॅकसन यांचा पुतळा निदर्शकांनी खाली पाडला व  चबुतऱ्यावर लिहिले हत्यारा (किलर) ! यानंतर आलेल्या पोलिसांनी मिरपूड वापरून निदर्शकांना पांगवले. डोनाल्ड ट्रंप यांनी या कृत्याची कठोर शब्दात निर्भर्त्सना केली व गुन्हेगारांना कारावासात खितपत पडावे लागेल, असे सुनावले.
   अमेरिकेतील आदरणीय ऐतिहासिक पुरुषांचे पुतळे हटविण्यासाठी सुरू झालेला संघर्ष, असे या आंदोलनाला एका अमेरिकन इतिहासतज्ञाने संबोधले आहे. अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यामधील लोक या व्यक्तींकडे आदराने पाहतात, असेही ते म्हणाले आहेत. पण गुलामगिरीच्या पुरस्कर्त्यांबाबत यापुढे ही भूमिका चालणार नाही, असे निदर्शकांनी प्रत्युत्तरादाखल म्हटले आहे.
   गुलामगिरीचा पुरस्कार करणाऱ्या जनरल रॅाबर्ट लीचा पुतळा हटवा
  1861-1865 या कालखंडात अमेरिकेत गृहयुद्ध झाले व पुढे गुलामगिरीची प्रथा कायद्याने बंद झाली. गुलामगिरीचा पुरस्कार करणाऱ्या कॅानफेरडेट पक्षीयांचा सेनापती होता, जनरल रॅाबर्ट ली. त्याचा पुतळा हटवा, अशी निदर्शकांनी मागणी केली आहे. या पुतळ्याच्या पायावर वंशभेदविरोधी भित्तिचित्रे अगोदरच काढण्यात आली आहेत.
   मी बलात्कारी जेफरसनची संतान
  अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करणाऱ्या जेफरसनकडे 600 गुलाम होते. काळे हे गोऱ्यांपेक्षा कनिष्ठ आहेत, असे त्याचे मत होते. त्याचे ठिकठिकाणी असलेले पुतळे खाली खेचा, अशी निदर्शकांची मागणी आहे. शॅनॅान लानीर ही एक टी व्ही ॲंकर / कलाकार आहे. जेफरसनला  गुलाम महिलांपासून अनेक मुले झाली होती. त्यापैकी कुणाएकीची ही वंशज आहे. तिचे विचार सामान्यत: असे आहेत. आमच्या ज्या पूर्वजांच्या पदरी गुलाम होते, ज्यांनी काळ्यांचे खून पाडले, जे श्वेतवर्णियाच्या श्रेष्ठत्वाचे पुरस्कर्ते होते, त्यांची कृत्ये विसरण्यासारखी नाहीत. त्यांचे उभारलेले पुतळे खाली खेचलेच पाहिजेत, अशी थॅामस जेफरसनची वंशज, शॅनॅान लानीर हिची भूमिका आहे. मग यातून जॅार्ज वॅाशिंगटनही सुटणार नाही. कारण त्याच्या पदरीही 100 गुलाम होते. ज्यांच्याविषयी आपल्या मनात पूज्यभाव असतो, त्यांचे आपण पुतळे उभारतो. इतर अनेक चांगली कामे केली म्हणून गुलामगिरीचा पुरस्कार करणाऱ्यांचा गौरव आज आम्ही का करीत आहोत? पण याचवेळी ती हेही मान्य करते की, गुलामगिरीचा विरोध करणाऱ्यात अनेक गोरेही होते. अब्राहम लिंकन तर त्यांचा मुकुटमणी शोभतो.
  पुतळे न पाडता सर्व तपशील नोंदवा.
   डॅनिअल डॅामिंग हे एक इतिहासतज्ञ आहेत. त्यांची सूचना अशी आहे की, जेफरसनचा पुतळा न पाडता, पुतळ्याच्या पायथ्यावर जो मजकूर आहे, त्याच्या सोबत त्याच्या या काळ्या बाजूचाही तपशील नोंदवावा. आज जॅार्ज वॅाशिंगटन ते गांधी असा वैचारिकतेचा प्रवास झाला आहे. या दोन टोकांच्या दरम्यान इतिहासात अनेक पुरुष होऊन गेले आहेत. यात भेद दाखवणारी रेषा आपण कुणाकुणाबाबत व कशी आखणार आहोत?
   पुतळे नष्ट करून इतिहास पुसला जाणार नाही. जो इतिहासाचा भाग आहे, तो तसाच ऐतिहासिक दस्तऐवजात आणि वस्तुसंग्रहालयात राहणारच आहे. पुतळे पाहून आपल्याला सगळी इतिहास कळतो, असे थोडेच आहे. पुतळा असला काय आणि नसला काय, जॅार्ज वॅाशिंगटन इतिहासात असणारच आहे, पण त्याच्याही मर्यादांसह !