Monday, July 6, 2020

अमेरिकेतील पुतळे हटाव मोहीम

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लाॅगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
तसेच हा लेख ॲाडिओ-व्हिज्युअल स्वरुपात  https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew वर सब्सक्राईब करून  मिळविता येईल.https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew वर सब्सक्राईब करून  मिळविता येईल

अमेरिकेतील पुतळे हटाव मोहीम
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   अमेरिकेतील न्यूयॅार्क शहरातील अमेरिकन म्युझियम ॲाफ नॅचरल हिस्टरी या जगविख्यात वस्तुसंग्रहालयाच्या प्रवेशद्वारी 1901 ते 1909 या कालखंडातील अध्यक्ष असलेल्या रिपब्लिकन थिओडोर रुझवेल्टचा (डेमोक्रॅट फ्रॅंकलीन रुझवेल्ट नव्हे) एक अश्वारूढ भव्य पुतळा आहे. तो हटवावा अशी मोहीम अमेरिकेत सुरू झाली असून तिला विरोध करीत डोनाल्ड ट्रंप यांनी तो हास्यास्पद प्रकार आहे, असे म्हटले आहे. पणअमेरिकेत पुतळे हटाव मोहीम तीव्र झाली असून तिचे पडसाद युरोपसह अन्य देशातही उमटत आहेत.
   25 मे 2020 ला जॅार्ज फ्लॅाईड या अश्वेतवर्णी व निशस्त्र व्यक्तीची, एका गोऱ्या शिपायाने अमानुषपणे हत्या केल्यानंतर अमेरिकेत श्वेतवर्चस्ववाद्यांविरुद्ध निदर्शने व आंदोलनांचा आगडोंब उसळला आहे.
  थिओडोर रुझवेल्ट यांच्यावर रोष का?
  याचा राग थिओडोर रुझवेल्ट याच्या पुतळ्यावर का? तर या एका गोऱ्या व्यक्तीच्या या पुतळ्याच्या एका बाजूला सेवक स्वरुपात एक मूळची अमेरिकन व दुसऱ्या बाजूला एक अश्वेतवर्णी व्यक्ती दाखविली आहे. अमेरिकेतील मूळच्या अमेरिकनांचा वंशविच्छेद करून युरोपातील विविध देशातून आलेल्या लोकांनी तिथे आपला जम बसवला तर कृष्णवर्णीयांना पशुवत वागणूक दिली, हे एक ऐतिहासिक सत्य आहे.
    1901 ते 1909 या कालखंडात थिओडोर रुझवेल्ट ही दिमाखदार व निडर व्यक्ती अमेरिकेच्या अध्यक्षपदी विराजमान होती. अमेरिकेला सागरी महासत्ता बनविण्यात हिचे मोठे योगदान होते. त्याचबरोबर वांशिक भेदाभेद करणारा आणि वसाहतवादाचा पुरस्कर्ता, अशीही थिओडोर रुझवेल्टची ओळख आहे.
       गुलामगिरी आणि वसाहतवादाचा पुरस्कार नको
   गुलामगिरीचे आणि वसाहतवादाचा पुरस्कार करणाऱ्या व्यक्तींचे पुतळे हटवावेत, ही मागणी आता अमेरिकेत चांगलाच जोर पकडू लागली आहे. हे पुतळे हटविण्याची वेळ आली आहे, असे मत म्युझियमच्या अध्यक्षा एलेन फ्युटर  यांचेही मत आहे. हा निर्णय पुतळ्याबाबतच आणि तेवढ्यापुरताच आहे, सागरी सामर्थ्य योजनेच्या आद्यप्रवर्तकांपैकी एक म्हणून थिओडोर रुझवेल्ट यांच्याकडे आम्ही आदरानेच पाहतो, अशी त्यांची भूमिका आहे.
जगविख्यात नॅशनल मेमोरियलचे काय?
    या निमित्ताने अमेरिकेत एक बिकट परिस्थिती निर्माण होते आहे. साऊथ डाकोटा प्रांतात माऊंट रशमोअर नॅशनल मेमोरियल नावाचे एक 60 फूट उंचीचे शिल्प आहे.  यात थिओडोर रुझवेल्ट, जॅार्ज वॅाशिंगटन, थॅामस जेफरसन, आणि अब्राहम लिंकन या चौघांचे चेहरे दाखवणारे हे शिल्प आहे. यापैकी लिंकनचा अपवाद वगळला तर इतर सर्वांवर  ते त्याकाळी गुलाम बाळगणारे असल्यामुळे निदर्शकांचा रोष आहे. ट्रंप यांनी वंशवादाचा निषेध करणाऱ्यांवर टीकास्त्र सोडले असून निदर्शकांचे वर्तन आक्षेपार्ह होते/आहे, अशी त्यांनी निदर्शकांची निर्भर्त्सना केली आहे.
   गुलामगिरीचा पुरस्कार  करणाऱ्यांविरुद्ध सुरू झालेली ही निदर्शने आता अनेक महापुरुषांच्या विरोधात सुरू झाली आहेत. पुतळ्यांपुरते असलेले आंदोलन आता अमेरिकन ऐतिहासिक महापुरुषांच्या दिशेने वळत आहेत. आजच्या अमेरिकेचे त्या काळातले निर्माते थॅामस जेफरसन, जॅार्ज वॅाशिंगटन आणि थिओडोर रुझवेल्ट हेही आजच्या निदर्शकांच्या रोषाला पात्र झाले आहेत.
   किलर ॲंड्र्यू जॅकसन !
   निदर्शकांनी नुकताच आपला मोर्चा ॲंड्र्यू जॅकसन याच्याकडे वळवला आहे. गुलाम बाळगणारा सैनिकीपिंडाचा हा गडी पुढे अमेरिकेच्या अध्यक्षपदी पोचला होता. व्हाईट हाऊस (अमेरिकन अध्यक्षाचे कार्यालय) जवळचा ॲंड्र्यू जॅकसन यांचा पुतळा निदर्शकांनी खाली पाडला व  चबुतऱ्यावर लिहिले हत्यारा (किलर) ! यानंतर आलेल्या पोलिसांनी मिरपूड वापरून निदर्शकांना पांगवले. डोनाल्ड ट्रंप यांनी या कृत्याची कठोर शब्दात निर्भर्त्सना केली व गुन्हेगारांना कारावासात खितपत पडावे लागेल, असे सुनावले.
   अमेरिकेतील आदरणीय ऐतिहासिक पुरुषांचे पुतळे हटविण्यासाठी सुरू झालेला संघर्ष, असे या आंदोलनाला एका अमेरिकन इतिहासतज्ञाने संबोधले आहे. अमेरिकेच्या दक्षिणेतील राज्यामधील लोक या व्यक्तींकडे आदराने पाहतात, असेही ते म्हणाले आहेत. पण गुलामगिरीच्या पुरस्कर्त्यांबाबत यापुढे ही भूमिका चालणार नाही, असे निदर्शकांनी प्रत्युत्तरादाखल म्हटले आहे.
   गुलामगिरीचा पुरस्कार करणाऱ्या जनरल रॅाबर्ट लीचा पुतळा हटवा
  1861-1865 या कालखंडात अमेरिकेत गृहयुद्ध झाले व पुढे गुलामगिरीची प्रथा कायद्याने बंद झाली. गुलामगिरीचा पुरस्कार करणाऱ्या कॅानफेरडेट पक्षीयांचा सेनापती होता, जनरल रॅाबर्ट ली. त्याचा पुतळा हटवा, अशी निदर्शकांनी मागणी केली आहे. या पुतळ्याच्या पायावर वंशभेदविरोधी भित्तिचित्रे अगोदरच काढण्यात आली आहेत.
   मी बलात्कारी जेफरसनची संतान
  अमेरिकन स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करणाऱ्या जेफरसनकडे 600 गुलाम होते. काळे हे गोऱ्यांपेक्षा कनिष्ठ आहेत, असे त्याचे मत होते. त्याचे ठिकठिकाणी असलेले पुतळे खाली खेचा, अशी निदर्शकांची मागणी आहे. शॅनॅान लानीर ही एक टी व्ही ॲंकर / कलाकार आहे. जेफरसनला  गुलाम महिलांपासून अनेक मुले झाली होती. त्यापैकी कुणाएकीची ही वंशज आहे. तिचे विचार सामान्यत: असे आहेत. आमच्या ज्या पूर्वजांच्या पदरी गुलाम होते, ज्यांनी काळ्यांचे खून पाडले, जे श्वेतवर्णियाच्या श्रेष्ठत्वाचे पुरस्कर्ते होते, त्यांची कृत्ये विसरण्यासारखी नाहीत. त्यांचे उभारलेले पुतळे खाली खेचलेच पाहिजेत, अशी थॅामस जेफरसनची वंशज, शॅनॅान लानीर हिची भूमिका आहे. मग यातून जॅार्ज वॅाशिंगटनही सुटणार नाही. कारण त्याच्या पदरीही 100 गुलाम होते. ज्यांच्याविषयी आपल्या मनात पूज्यभाव असतो, त्यांचे आपण पुतळे उभारतो. इतर अनेक चांगली कामे केली म्हणून गुलामगिरीचा पुरस्कार करणाऱ्यांचा गौरव आज आम्ही का करीत आहोत? पण याचवेळी ती हेही मान्य करते की, गुलामगिरीचा विरोध करणाऱ्यात अनेक गोरेही होते. अब्राहम लिंकन तर त्यांचा मुकुटमणी शोभतो.
  पुतळे न पाडता सर्व तपशील नोंदवा.
   डॅनिअल डॅामिंग हे एक इतिहासतज्ञ आहेत. त्यांची सूचना अशी आहे की, जेफरसनचा पुतळा न पाडता, पुतळ्याच्या पायथ्यावर जो मजकूर आहे, त्याच्या सोबत त्याच्या या काळ्या बाजूचाही तपशील नोंदवावा. आज जॅार्ज वॅाशिंगटन ते गांधी असा वैचारिकतेचा प्रवास झाला आहे. या दोन टोकांच्या दरम्यान इतिहासात अनेक पुरुष होऊन गेले आहेत. यात भेद दाखवणारी रेषा आपण कुणाकुणाबाबत व कशी आखणार आहोत?
   पुतळे नष्ट करून इतिहास पुसला जाणार नाही. जो इतिहासाचा भाग आहे, तो तसाच ऐतिहासिक दस्तऐवजात आणि वस्तुसंग्रहालयात राहणारच आहे. पुतळे पाहून आपल्याला सगळी इतिहास कळतो, असे थोडेच आहे. पुतळा असला काय आणि नसला काय, जॅार्ज वॅाशिंगटन इतिहासात असणारच आहे, पण त्याच्याही मर्यादांसह !

No comments:

Post a Comment