Tuesday, July 14, 2020

कथा, कुळकथा, व्यथा, गलवान नदी आणि खोऱ्याची

  हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लाॅगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. तसेच हा लेख ॲाडिओ-व्हिज्युअल स्वरुपात https://www.youtube.com/c/TarunBharatnagpurnew वर सब्सक्राईब करून मिळविता येईल.
कथा, कुळकथा, व्यथा, गलवान नदी आणि खोऱ्याची
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    गलवान नदी आणि खोऱ्याची कथा आणि कुळकथा जेवढी रोचक आहे, तेवढीच व्यथा चीड आणि संताप आणणारी आहे. काराकोरम पर्वताच्या पूर्वभागातील सॅमझुंगलिंग येथे उगम पावून जेमतेम 80 किमी लांबीची अतिवेगवान गलवान नदी, चीनने 1962 साली बळकावलेल्या अक्साई चीनमधून पश्चिमेकडे लडाखमध्ये खळाळत वाहत येऊन शेवटी शोक या सिंधूच्या उपनदीला मिळते. दोन पर्वतांमध्ये  चेचली गेल्यामुळे ही अतिवेगवान झाली आहे.
   सामान्य पण मूळ शोधकर्त्याचा गौरव
   लेह येथील एक लडाखी वाटाड्या, गुलाम रसूल गलवान, याच्या नावावरुन या नदीचे नाव गलवान नदी व खोऱ्याचे नाव गलवान खोरे असे पडले आहे. हा वाटाड्या 1899 मध्ये ब्रिटिश शोधमोहिमेच्या पथकासोबत होता. त्या काळात जो चंग चेन्मो खो दरी ही सर्वांच्या माहितीतली होती. पण तिच्या  उत्तरेकडील भाग मात्र अज्ञात होता. या भागात हे पथक शोध घेत चालले असतांना, ते एका अज्ञात नदीच्या खोऱ्यात गेले आणि त्यांना एक नदी गवसली. तीच ही गलवान नदी, तेच हे गलवान खोरे, तेच मध्यंतरी पेटले होते आणि तेच अजूनही धुमसत आहे. अशाप्रकारे एखाद्या मुख्य भौगोलिक रचनेचे नाव, सामान्य पण मूळ शोधकर्त्याच्या नावावर ठेवले जाण्याचे उदाहरण क्वचितच आढळून येते. बक्षिसी म्हणून येथील एक भूखंड  गुलाम रसूल गलवान याला बहाल करण्यात आला होता.  त्याच्या वंशजांजवळ आजही ही सर्व नोंद आहे. तसेच हा सर्व वृतांत सांगणारा तपशील एका छोटेखानी ग्रंथात नोंदवलेलाही आहे. आता गलवान नदी व खोरे कोणाच्या मालकीचे, ते सांगायलाच हवे काय? आज परत फिरताना दिसणाऱ्या आक्रमक चीनला मात्र हे पुन्हापुन्हा सांगावे लागणार आहे, हे विसरून चालणार नाही.
    वाढता वाढता वाढे दावा, हिंसा पहिली 1962 ची  तर  दुसरी 2020 ची
   गलवान नदीवर 1956 पर्यंत चीनने दावा ठोकला नव्हता. मात्र 1960 मध्ये चीनने आपली सीमारेषा आणखी पश्चिमेला सरकवून गलवान नदी पर्यंत वाढविली. याच काळात संपूर्ण अक्साई पठारावर आपला अधिकार असल्याची जाणीव भारताने चीनला करून दिलेली आहे/होती, हे मुद्दाम नोंदविणे आवश्यक आहे.
   1962 साली 4 जुलैला भारताच्या टेहेळणी तुकडीने एक चौकी स्थापन करून सॅमझुंगलिंग ला जाणारा चीनचा मार्ग बंद केला. हा हल्ला मानून चिनी सैन्याने सुमारे 100 मीटर अंतर राखून चौकीला चहूबाजूंनी वेढा घातला. या कृतीचे गंभीर परिणाम होतील, अशी जाणीव करून दिल्यानंतरही चार महिने वेढा कायम होता. या काळात वेढलेल्या तुकडीला हेलिकॅाप्टरच्या साह्याने सर्वप्रकारचा पुरवठा भारत  करीत असे.
  20 ॲाक्टोबर 1962 च्या अगोदरच भारताने त्या चौकीत सैनिकांची एक कंपनी तैनात केली होती. 20 ॲाक्टोबरला चिनी सैनिकांच्या एका बटॅलियने तोफा डागीत चौकीवर आक्रमण केले. 33 भारतीय सैनिक शहीद तर अनेक जखमी झाले, इतर अनेकांना बंदी करण्यात आले. शेवटी अशाप्रकारे 1960 चा दावा चीनने प्रत्यक्षात आणला. तेव्हापासून हा बेकायदा ताबा कायम आहे. 16 जून 2020 ला संघर्ष होऊन भारताचे 20 सैनिक व चीनचे कितीतरी जास्त सैनिक मारले गेले. यावेळी सैन्य माघारीबाबत संयुक्त पत्रक न निघता चीन व भारत यांनी वेगवेगळी पत्रके जाहीर केली ही बाबही विचार करण्यास बाध्य करणारी आहे. आता चीनची माघार सुरू होतांना दिसत असली तरी खातरजमा केल्याशिवाय, नव्हे खारजमा झाल्यानंतरही, वैऱ्याच्या रात्रीचा विसर पडता कामा नये, हाचि बोध खरा!
गलवान खोरे
    15/16 जून 2020 च्या संघर्षानंतर 19 जून 2020 ला संपूर्ण गलवान खोऱ्यावरच  चीनचा दावा पुढे केला. लगोलग पीपल्स लिबरेशन आर्मीने सांगितले की, गलवान खोऱ्यावर चीनचेच स्वामित्व आहे. भारतानेही ताबडतोब ठणकावले की हा दावा  अतिशयोक्त व मान्य होण्यासारखा नाही. आज मागे सरकणाऱ्या चीनकडे डोळ्यात तेल घालून पहावे लागणार आहे, ते यामुळेच. सध्या नदीला पूर असल्यामुळे तर ही माघारी नाहीना, अशा संशयाची पाल चुकचुकते आहे, ती उगीच चुकचुकत आहे का?
   गलवान खोरे दोन उंच पर्वत रांगात अक्षरश: चेंगरलेले आहे. पश्चिमेला  लडाख व पूर्वेला अक्साई चीन आहे. अक्साई चीनवर आज चीनचा अवैध ताबा असल्यामुळे या खोऱ्याला सामरिक दृष्ट्या अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. शोक नदीच्या पश्चिमेला डर्बुक-शोक- दौलत बेग ओल्डी (डीएसडीबीओ) रस्ता भारताने आपल्या सीमेत बांधला आहे. दौलत बेग ओल्डी च्या पूर्वेला जवळच चीनचा हायवे आहे, हे लक्षात घेतले की,  दौलत बेग ओल्डी व तिथले विमानतळ चीनच्या डोळ्यात का सलते आहे, त्याचा थयथयाट का होतो आहे, ते सांगायला नको!
चीनच्या मते ताबारेषा नक्की कुठे आहे?
  खरेतर गलवान आणि शोक नदीच्या संगमाच्या पूर्वेला ताबा रेषा आहे. इथपर्यंत दोन्ही देशांच्या सैनिकी तुकड्या आपापल्या बाजूने गस्त घालीत असत. 15 जूनपासून चीनने दावा करायला सुरवात केली आहे की, सगळे गलवान खोरे ताबारेषेच्या आत त्याच्या बाजूला आहे. चीनने मे पासूनच भारत आपल्या भागात करीत असलेल्या रस्त्याच्या बांधकामावर हरकत घ्यायला सुरवात केली आहे/होती. 1959 मध्ये चीनचे तेव्हाचे पंतप्रधान चाऊ एन लाय म्हणाले होते की, 1956 सालचा नकाशा सीमा बिनचुक दाखवतो. यात संपूर्ण गलवान खोरे भारतात दाखविले आहे. पण जून 1960 मध्ये चीनने नवीन नकाशा प्रसारित करून संपूर्ण गलवान खोऱ्यावर आपला दावा जाहीर केला. 1962 च्या नोव्हेंबर महिन्यातही संपूर्ण गलवान खोऱ्यावर चीनने आपला अधिकार सांगितला खरा पण त्यातही गलवान नदीच्या पश्चिम टोकाचा समावेश नाही/नव्हता.
   कोणाचा भाग कोणता आणि प्रत्यक्ष ताबारेषा नक्की व नेमकी कोणती हा मुद्दा बाजूला ठेवला तरी आत्ताआत्तापर्यंत दोन्ही बाजूंनी एका उभयमान्य ताबारेषेचे पालन होत होते. वाद ताबारेषा थोडी इकडे का थोडी तिकडे एवढाच   होता, संपूर्ण प्रदेशाबाबत वाद कधीच नव्हता. चीनने भारताचा 38,000 चौ.किमी भाग तर 1962 मध्येच हडपला आहे. तरीही भारत विद्यमान ताबारेषेचे पालन करीत आलेला आहे. ताबारेषा आखलेली नाही म्हणून ताबारेषेबद्दल वेगळ्या समजुती असू शकतात. अशी डझनापेक्षा जास्त ठिकाणेही असू शकतात. पण संघर्षाची स्थिती आली नव्हती. ती आत्ताच का बरे आली?
एकतर्फी कारवाईवर उपाय कोणता?
   कारण आज कोरोना लपविल्यामुळे निर्माण झालेला जागतिक संताप व ढासळत चाललेली अर्थव्यवस्था यामुळे चीनची गोची झाली आहे. यावरील लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी संपूर्ण गलवान खोऱ्यावर व गलवान आणि शोक नद्यांच्या संगमावरही दावा ठोकून चीन ताबारेषेत एकतर्फी बदल करू पाहतो आहे. इतर देशांशीही सीमावाद व अन्य वाद उकरून काढतो आहे.  1993 साली भारत व चीन यांच्या बीपीटीए (बॅार्डर पीस ॲंड ट्रॅंक्विलिटी ॲग्रीमेंट) वर स्वाक्षऱ्या आहेत. यानुसार दोन्ही पक्षांनी प्रत्यक्ष ताबारेषेचे काटेकोर पालन करणे अपेक्षित आहे. 1959 व 1962 च्या एकतर्फी मांडलेल्या सीमारेषा विचारात घेतल्या जाणार नाहीत, असे ठरले आहे/होते. काही मतभेद झाल्यास चर्चेने प्रश्न सोडवावेत, असेही ठरले होते. पण चीनने यावेळी चर्चेला सुरवात करण्यासाठी आवश्यक असलेल्या नकाशांच्या अदलाबदलीलाच नकार दिल्यामुळे आता कोणता उपाय उरला? त्याचीच तयारी भारताने केली होती!! त्याची फळे दिसू लागली होती!! आजही दिसताहेत!!! पण तरीही लबाडाच्या निमंत्रणाबद्दलची, हत्तीच्या दाखवायच्या आणि खऱ्याखुऱ्या दातांबद्दलची वचने यापुढेही  नित्य स्मरणात ठेवावी लागतील, ही मात्र दगडावरची रेघ  आहे.

No comments:

Post a Comment