Tuesday, August 10, 2021

बायडेन यांचे प्रगतीपुस्तक वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? ज्यो बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली, त्याला 6 महिने होत आहेत. घरच्या आघाडीवर बायडेन यांच्या वाट्याला अनेक आव्हाने अगोदरच्या राजवटीचा वारसा म्हणून आली होती. त्यावेळी अमेरिकेत कोरोना ऐन भरात होता. याचा परिणाम म्हणून अमेरिकेच्या अर्थकारणाला एक जबरदस्त हादरा बसला होता. जोडीला सामाजिक आणि वांशिक वादही विकोपाला पोचले होते. अमेरिका एकप्रकारे विव्हल झाली होती. बायडेन यांचे संकल्प आणि फलश्रुती अमेरिकेच्या केंद्रीय राजकारणात सहमतीचे, सहयोगाचे आणि सामंजस्याचे युग पुन्हा आणीन आणि कोरोना विषाणूचे दुष्परिणाम दूर करीन, अमेरिकेच्या अर्थकारणाला पुन्हा उभारी मिळवून देईन, समानतायुक्त आणि सर्वसमावेशी व्यवहारांना उत्तेजन देईन, असे संकल्प बायडेन यांनी जाहीररीत्या मांडले होते. याला अनुसरून लसीकरणाची एक जंगी मोहीम त्यांनी हाती घेतली. कोरोनाच्या प्रभावामुळे संकटात सापडलेल्या कुटुंबांना पुन्हा आपल्या पायावर उभे होण्यासाठी भरघोस अर्थसाह्य केले, आर्थिक टंचाईतून बाहेर पडण्यास जनतेला मदत होईल अशी भांडवली गुंतवणूक केली, आणि लोककल्याणकारी शासन जनतेला पूर्वस्थितीवर आणण्यासाठी काय करू शकते याचा वस्तुपाठच घालून दिला. आज अमेरिकेचा आर्थिक प्रगतीचा आलेख वरवर चढत चालला असून कोरोना मावळतीकडे वळला आहे. या आशयाचे सफलतेबाबतचे दावे कोणीही नाकारलेले नाहीत. पण तरीही अजून बरेचकाही साध्य झालेले नाही. 2020 च्या निवडणुकीत बायडेन यांना तिहेरी यश मिळाले. म्हणजे अध्यक्षपदासह, हाऊस आणि सिनेटमध्ये बहुमत मिळून सुद्धा अमेरिकेतील संसदेमध्ये सरकारला अनेकदा कोंडी फोडता आलेली नाही. अपूर्ण आणि स्पर्शच न केलेले मुद्दे अजून बरेच प्रश्न सुटायचे आहेत तर काही प्रश्नांना तर अजून हातच घातलेला दिसत नाही. या निवडणुकीत मतमोजणीवरून बरेच वाद झाले होते. असे पुन्हा होऊ नये याबाबत केलेले उपाय आणि झालेली प्रगती, अपेक्षा पूर्ण करणारी नाही. या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचे प्रामाणिक प्रयत्न सुरू असले तरी प्रत्यक्षात अजूनही काहीही घडलेले नाही. संपूर्ण देशासाठी एकच निवडणूक आयोग नसणे आणि राज्यागणिक निवडणूकविषयक कायदे वेगवेगळे असणे हा मोठाच अडसर ठरला आहे. परदेशातून अमेरिकेत कायमचे वास्तव्य करण्यासाठी येणाऱ्यांचा प्रश्न (इमिग्रेशन) बिकट झाला होता. तो अजूनही तसाच लोंबकळत पडलेला दिसतो आहे. अमेरिकन पोलिसांचे गुन्हेगारांना हाताळण्याच्या प्रश्नी सुधारणा करण्याचे आश्वासनही जसे पूर्ण झालेले नाही, तसेच गुन्ह्यांचे प्रमाणही कमी झालेले नाही. अमेरिकेतील लसीकरण मोहीम पहिल्या 100 दिवसात बायडेन यांनी लसीकरणाची जंगी मोहीम राबविली. परिणामत: मृत्युसंख्या एकदम खाली आली. पण सर्वसामान्य लोक लस टोचून घेण्यासाठी पुढे येत नव्हते. नागरिकांची उदासीनता, विरोध आणि बेदरकारपणा त्यामुळे 70% प्रौढांना 4 जुलै पूर्वी निदान लसीची एक मात्रा टोचण्याचे बायडेन यांचे लक्ष पूर्ण झाले नाही. बायडेन नागरिकांच्या कानीकपाळी ओरडत होते, ‘तुम्ही जर लसीच्या दोन्ही मात्रा टोचून घ्याल तर तुम्हाला उच्च दर्जाची सुरक्षा प्राप्त होईल. तुम्हाला कोरोना झालाच तर त्याची तीव्रता कमी असेल, रुग्णालयात दाखल व्हावे लागणार नाही आणि दाखल व्हावे लागलेच तरी मृत्यूचे तर नावच नको. म्हणून माझे तुम्हाला कळकळीचे आवाहन आहे की, लस टोचून घ्या. ताबडतोब.’ बायडेन यांच्या या आवाहनाचा, निरनिराळ्या प्रलोभनांचा, सवलतींचा परिणाम झाला नाही. आतातर रुग्णांची संख्या आणि मृत्यूचे प्रमाण अमेरिकेत पुन्हा वेगाने वाढू लागले आहे. अमेरिकेचा रेस्क्यू प्लॅन बायडेन यांचे 1.9 ट्रिलियन डॅालरची आर्थिक मदत देणारे पॅकेज ‘अमेरिकन रेस्क्यू प्लॅन’, म्हणून सर्वज्ञात आहे. या पॅकेजने जनतेला प्रोत्साहित केले, छोट्या आणि मध्यम उद्योगांना उभारी मिळवून दिली, कोरोना चाचणी मोहीम आणि लसीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला. पण या मोहिमेसाठी, निवडणूक प्रचारादरम्यान घोषित केल्याप्रमाणे, रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा मात्र त्यांना मिळविता आला नाही. हे पॅकेज दोन्ही सभागृहात एकही रिपब्लिकन मत मिळवू शकले नाही. तरीही कोविड19 च्या साथीच्या काळात अमेरिकन जनजीवनात निराशा आणि अंध:कार यामुळे जी अवकळा पसरली होती. यावर मात करून जोमदार विकास घडवून आणण्यात बायडेन यशस्वी झाले, त्यांनी भरपूर रोजगार पुरवले आणि कामगारांना नवनवीन संधी उपलब्ध करून दिल्या. अशाप्रकारे अर्थकारणाच्या चाकोरी सोडलेल्या गाड्याला पुन्हा रुळावर आणले. जोडीसजोड म्हणून रस्ते आणि पूल यांची निर्मिती आणि दुरुस्ती अशा पूर्वापार चालत आलेल्या विकासकामांनाही त्यांनी गती दिली. पण बायडेन यांना निवडणुकीत तिहेरी यश मिळाले असले तरी तसे ते नावालाच आहे. हाऊस आणि सिनेटमध्ये निसटते बहुमतच मिळालेले आहे. त्यामुळे बालकल्याणासारख्या शाश्वत मानवी विकासासाठी हाती घ्यायच्या कार्यक्रमांसाठी आवश्यक असलेली 3.5 ट्रिलियन डॅालरची तरतूद हाऊस आणि सिनेटमध्ये मंजूर करून घेणे अतिशय कठीण जाते आहे. कारण यासाठी रिपब्लिकन पक्षाची मते मिळण्याची सुतराम शक्यता नाही. याशिवाय कोरोनाच्या नव्याने उफाळलेल्या साथीचा सामना करतांना भाववाढ होणार नाही, याकडेही त्यांना लक्ष पुरवावे लागणार आहे. कायमच्या वास्तव्यासाठी परदेशातून होणारे आगमन (इमिग्रेशन) या मुद्याने सध्या अमेरिकेत अतिशय तीव्र रूप धारण केले आहे. बिनापरवाना सीमा ओलांडण्याचे प्रकार कधी नव्हे इतके वाढले आहेत. या स्थलांतराकडे लक्ष देण्यास बायडेन यांनी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांची योजना केली. त्यांनी मेक्सिको आणि ग्वाटेमाला या देशांचा दौरा केला. अशाप्रकारचे बेकायदा स्थलांतर न करता आपल्या घरीच थांबून आश्रयासाठी रीतसर अर्ज करा, असे पटवण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. पण भ्रष्टाचार, मादकपदार्थांमुळे निर्माण होणारे संघर्षाचे प्रसंग आणि प्रतिकूल हवामान यांच्या प्रभावमुळे त्यांच्या आवाहनाचा परिणाम मध्य आणि दक्षिण अमेरिकेतील नागरिकांवर झाला नाही. तुम्ही तुमच्या देशांतच रहा. मदत करून आम्ही तिथलीच परिस्थिती सुधारेल, असा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगून पाहिले. पण व्यर्थ. या देशांमध्ये हिंसा थांबवण्याचे कितीही प्रयत्न केले, आपत्ती निवारणाची शर्थ केली, आर्थिक मदत केली, अन्नधान्य मुबलक मिळेल, अशीही व्यवस्था केली तरी जोपर्यंत भ्रष्टाचाराला आवर घालता येणार नाही, तोपर्यंत स्थलांतराचे प्रयत्न थांबणार नाहीत, असे हताश उद्गार काढण्याची वेळ कमला हॅरिस यांच्यावर आली. प्रवासबंदी उठविली काही ठराविक मुस्लिम देशांच्याच नागरिकांवर डोनाल्ड ट्रंप यांनी घातलेली प्रवासबंदी बायडेन यांनी उठविली. ज्यांच्यावर अमेरिकेत बेकायदा प्रवेश केला एवढाच गुन्हा दाखल असेल, त्यांना हद्दपार करण्याचा निर्णयही बायडेन यांनी मागे घेतला. स्थलांतरितांबाबत एक सर्वसमावेशक धोरण स्वीकारावे, अशी सूचना बायडेन यांनी हाऊस आणि सिनेट या दोन्ही सभागृहांना केली होती, पण यासंबंधी पुढे कोणतीही हालचाल झाली नाही. ज्या लहान मुलांना अमेरिकेत बेकायदा पद्धतीने आणलेले आहे, त्यांना हद्दपार करण्यावर न्यायालयांनीच बंदी घातली होती. अमेरिकेत येऊन स्थायिक व्हावे, असे स्वप्न उराशी बाळगून जे नागरिक मुलाबाळांसह अमेरिकेत जरी बेकायदा प्रकारे आले असले तरी त्यांच्याबाबतीत सकारात्मक निर्णय घेण्याबाबतचा न्यायालयांचा तगादा पाहता काहीतरी निर्णय लवकरच घ्यावा लागेल, असे दिसते. नागरिकत्व प्रदान करण्याच्या प्रश्नबाबत स्थायी स्वरुपाचा उपाय फक्त कॅांग्रेसच म्हणजे हाऊस आणि सिनेट ही दोन सभागृहेच घेऊ शकतात. आपली स्वप्नपूर्ती केव्हा होणार याची आतुरतेने आणि चिंताग्रस्त स्थितीत जे प्रतीक्षा करताहेत, त्यांचे समाधान केवळ याच मार्गाने होऊ शकेल, असे बायडेन यांनी दोन्ही सभागृहांना उद्देशून म्हटले आहे. पण दोन्ही सभागृहात त्यांना फारसा प्रतिससाद मिळवता आला नाही. पोलिसदलात सुधारणा करण्यात अपयश पोलिसदलात सुधारणा करण्याचे बाबतीत बायडेन यांचे प्रयत्नही यशस्वी झाले नाहीत. याबाबतचे बिल पास करण्याचे बाबतीत कॅांग्रेसमध्ये (दोन्ही सभागृहात) चालढकलच सुरू आहे. निवडून आल्यानंतर पहिल्या शंभर दिवसातच पोलिस सुधारणा प्रश्नी आयोग नेमीन अशी घोषणा बायडेन यांनी केली होती, ती पहिल्या सहा महिन्यानंतरही पूर्ण झालेली दिसत नाही. आतातर बायडेन यांच्या ज्येष्ठ सल्लागार सुसान राईस यांनी अशी भूमिका मांडली आहे की, जोपर्यंत या बाबतीत सर्वसंबंधितांमध्ये एकवाक्यता निर्माण होत नाही, तोपर्यंत घाईघाईने पुढे जाण्याने परिणामकारक बदल प्रत्यक्षात घडून येणार नाहीत. म्हणजे काय, तर हा विषय थंड्या बस्त्यात पडला. शस्त्र बाळण्याबाबतचे नियम कडक करता आले नाहीत. रिपब्लिकन पक्षाच्या चिथावणीवरून कॅपीटोलवर निवडणुकीनंतर निदर्शकांनी आक्रमण केल्यापासून शस्त्रास्त्रे बाळगण्यावर कठोर निर्बंध घातले पाहिजेत, याबाबत अमेरिकेत गंभीरपणे विचार करण्यास नव्याने सुरवात झाली आहे. पूर्वीच्या कायद्यातील पळवाटा दूर करण्याचे दृष्टीने प्रशासकीय आदेश काढून काही उपाययोजना बायडेन यांनी केली पण तरीही बायडेन यांच्या पहिल्या सहा महिन्यांच्या कार्यकाळातच बेछुट गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या आहेत. अमेरिकेत घोस्ट गन्सवर बंधन घालायला हवे आहे. कोणतेही निर्बंध न पाळता कोणालाही अगदी गुन्हेगारांना आणि लहानमुलांना सुद्धा शस्त्रे बाळगता येतात. हे थांबले पाहिजे. न्याय खात्याने ‘रेडफ्लॅग लेजिस्लेशन’चा मसुदा तयार करावा म्हणजे धोकादायक व्यक्तींजवळची शस्त्रे सरकारजमा करण्याचा अधिकार शासनाला मिळेल, असे बायडेन यांनी सुचविले होते. शस्त्राचार थांबवण्यासाठी एका स्वतंत्र मनुष्यबळाची उभारणी करण्याची बायडेन यांची कल्पना होती. या दलातील समुपदेशक आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी विकृत मनोवृत्तीच्या व्यक्तींचे प्रबोधन करावे, अशी अपेक्षा होती. हे आजतरी प्रत्यक्षात उतरलेले नाही. आतातर 2022 मध्ये हाऊसच्या 435 आणि सिनेटच्या 100 पैकी एकतृतियांश सदस्यांच्या म्हणजे 33 सदस्याच्या निवृत्तीनंतर निवडणुका होणार आहेत. अशावेळी हितकर असले तरी अप्रिय असलेले निर्णय घेण्याचे धोरण सर्वच पक्ष टाळतात. याला बायडेन यांचा डेमोक्रॅट पक्ष तरी कसा अपवाद राहील?

No comments:

Post a Comment