Sunday, February 13, 2022

संजीवनी रायकर, एक लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व प्रति, श्री.संपादक, तरूणभारत , मुंबई आपल्या सूचनेनुसार लिहिलेला सोबतचा थोडासा लांबलेला लेख प्रसिद्ध करण्याचे बाबतीत योग्य तो निर्णय व्हावा, ही विनंती. आपला स्नेहाकांक्षी, वसंत काणे. गुरुवार, दिनांक10/02/2022 संजीवनी रायकर, एक लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व ! वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड माजी अध्यक्ष, एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? मुंबईच्या बालमोहन विद्यालयातील मराठीच्या यशस्वी शिक्षिका, शिक्षक परिषदेचा महिला आघाडीप्रमुख, कार्याध्यक्षा आणि नंतरच्या अध्यक्षा, अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षिक महासंघाच्या महिला आघाडीप्रमुख आणि नंतरच्या उपाध्यक्षा, अखिल भारतीय माध्यमिक शिक्षक संघाच्या अध्यक्षा, सतत 18 वर्षे शिक्षक आमदार, वात्सल्य ट्रस्टच्या अध्यक्षा अशा विविध जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या हाताळणाया संजीवनी रायकर यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाल्याचे कळले आणि दु:खासोबत आश्चर्याचाही धक्काच बसला. धक्का यासाठी त्यांनी कोरोनावर मात केल्याची वार्ता काही दिवसांपूर्वीच कानावर आली होती. त्यावेळी त्यांना फोन करून फक्त ‘अभिनंदन’ एवढेच शब्द उच्चारायचे आणि फोन ठेवायचा असे ठरविले होते. संजीवनीताईंनी फोन उचलला आणि मी ‘अभिनंदन’, असे म्हणताच त्या म्हणाल्या, ‘वसंतराव, तुम्हालाही कळलेलं दिसतय’. नंतर मात्र लगेच त्यांनीच माझ्या आणि घरच्यांच्या प्रकृतीची चौकशी करायला सुरवात केली. त्यांच्या बोलण्यात थकवा जाणवत होता म्हणून शेवटी मीच बोलणे आटोपते घेतले. कोरोनाशी यशस्वी दोन हात केल्यानंतर निधनाचे वृत्त अचानक कानावर येईल, असे वाटले नव्हते. शिक्षक परिषदेची स्थापना विदर्भातली,1970 सालची. मुकुंदराव कुळकर्णी, ज.ग.भावे, धो.वि. देशपांडे आदींच्या विचारानुसार विदर्भातील शिक्षक परिषदेची कार्यकक्षा महाराष्ट्रव्यापी करायची, असे ठरले आणि आजच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची निर्मिती झाली. आमदार दिवाकर जोशी हे विस्तारित शिक्षक परिषदेचे अध्यक्ष होते. त्यांच्या तोंडून संजीवनीताईंचे नाव प्रथम ऐकायला आले होते. त्या आमदार होत्या आणि त्या तीन चाकी स्कूटरवरून (स्टेपनीवाल्या) मुंबईत फिरतात, हे कळल्यानंतर आश्चर्य आणि कुतुहल जागे झाले होते. पुढे दिवाकर जोशींचे अकाली निधन झाले आणि परिषदेच्या अध्यक्षपदाची सूत्रे माझ्याकडे आली. त्या 1988 साली त्यांनी शिक्षक मतदार संघातून उभे रहावे असे मुकुंदराव कुळकर्णींनी सुचविले, तेव्हा शाळाशाळांना भेटी देते आणि पत्रके वाटते आहे, तेवढेच मला पुरेसे आहे’, असे त्या म्हणाल्या. पण शेवटी मुकुंदरावांच्या आग्रहाखातर त्या उभ्या राहिल्या आणि शिक्षक मतदार संघातून दिग्गजांचा पराभव करूनन निवडूनही आल्या. 1994 सालीही त्या निवडणूक लढवायला तयार नव्हत्या पण कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच पुन्हा उभ्या राहिल्या आणि निवडून आल्या. 2000 साल उजाडले आणि त्यांनी पुन्हा उभे रहावे असा प्रस्ताव समोर येताच त्यांचे आणि आमचे भांडणच झाले. त्यांचा स्वभाव तसा चांगलाच हट्टी होता पण तरीही त्यांचे मन वळवण्यात आम्हाला यश आले आणि त्या तिसऱ्यांदा निवडून आल्या. 2006 मध्ये मात्र त्यांनी आमची डाळ शिजू दिली नाही आणि चौथ्यांदा निवडून यायचा चौकार हुकला. हा सर्व तपशील यासाठी महत्त्वाचा आहे की, प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणूनच केवळ त्या निवडणूक लढवायला तयार झाल्या होत्या, हे स्पष्ट व्हावे. 18 वर्षांच्या आमदारकीच्या दीर्घ कालखंडात त्यांचा महाराष्ट्रातील प्रवास एसटीनेच होत असे. एसटीनेच प्रवास करणारे जे बोटावरच मोजता येतील असे आमदार असतील त्यात संजीवनी रायकरांचे नाव घेतले जायचे. एकदा एसटी बंद पडली. वाहतुक नियंत्रकाचा, एसटीत आमदार आहे, या चालकाच्या म्हणण्यावर विश्वासच बसत नव्हता. शेवटी त्याने ओळखपत्र पाहून खात्री करून घेतली होती. महाराष्ट्रभर तसेच अखिल भारतात त्या एकट्यानेच प्रवास करीत. बैठकीला वेळेवर पोचायचे आणि बैठक संपल्यानंतरच सहलीसारख्या अन्य कार्यक्रमात सहभागी व्हायचे, यावर त्यांचा कटाक्ष असे. मुंबई आणि अन्यत्रही महिलांना त्यांचा आधार वाटायचा. मुंबईत शिक्षिकांची चमू त्यांच्यासोबत सतत असायची. त्यांच्या आमदारकीच्या दीर्घ कार्यकाळात सचिवातील आणि अन्य कार्यालयातील कर्मचारी पदोन्नतीची एकेक पायरी चढत उच्च पदावर पोचलेले त्यांनी पाहिले होते. त्यामुळे हे सर्व कर्मचारी आणि त्यांच्यात एक ‘रॅपोर्ट’ निर्माण झाला होता. आमदारांना आमदार निवासात दोन खोल्या (फ्लॅट्स) मिळत. संजीवनीताईनी मनोरा आमदार निवासात एकाच माळ्यावर एकालाएक लागून 2 फ्लॅट्स घेतले होते. आमदारकीच्या काळात त्या या ठिकाणी निवासासाठी 18 दिवसही थांबल्या असतील असे वाटत नाही. कितीही उशीर होवो, बैठक आटोपताच त्या शिवडीला घरी मुक्कामाला जात असत. माझ्या अध्यक्षपदाच्या काळात त्या फ्लॅट्सच्या डुप्लिकेट किल्यांचा एक सेट माझ्याजवळच असायच्या. अखिल भारतातून बैठकीसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांचा मुक्कामही या ठिकाणी असायचा. मुंबईला उपचारांसाठी येणाऱ्या अनेक रुग्णांचे नातेवाईकही इथेच थांबत असत. 26 जुलैला मुंबईला अतिवृष्टी झाली होती. मंत्रालयात काम करणाऱ्या अनेक मुली (हा रायकरांचाच शब्दप्रयोग) पावसामुळे घरी जाऊ न शकल्यामुळे मनोरा आमदार निवासात येऊन या फ्लॅट्समध्येच काही वेळ हक्काने थांबल्या होत्या. त्यावेळी मीही मुंबईत अडकून पडलो होतो, म्हणून मला हा तपशील माहीत आहे. विधान परिषद सदस्यत्वाच्या दीर्घ काळात मंत्रालयात नव्याने कनिष्ठ पदावर लागलेली अनेक मुले व मुलींचा एक गट (हाही संजीवनीताईंचाच शब्दप्रयोग) पुढे यथावकाश पदोन्नती मिळून मोठ्या पदावर पोचला होता. संजीवनीताई मंत्रालयात कामे घेऊन जात तेव्हा ही सर्व मंडळी त्यांनी सांगितलेली कामे तत्परतेने पार पाडीत. त्या अतिशय वेगाने चालत असत. त्यांच्या सोबत असलेल्या आम्हाला, आपण मागे पडू नये म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागायचे. विधान सभागृहातील अनेक आमदारही त्यांच्या समोरच ‘मोठे’ झाले होते. यात सर्व पक्षांचे आमदार होते. त्यातले काहीतर पुढे मंत्रीपदावरही आरूढ झाले होते. या सर्व मंडळींच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदरभाव आम्हालाही त्यांच्यासोबत असतांना जाणवायचा. एकदा परिषदेचा अध्यक्ष या नात्याने त्यांच्यासोबत मी सचिवांकडे एका महत्त्वाच्या प्रश्नाबाबत चर्चा करायला गेलो होतो. सचिव माझ्याकडे दुर्लक्ष करीत त्यांच्याशीच बोलू लागले. तेव्हा त्या म्हणाल्या, ‘हे बघा, आमदार या नात्याने मी तुमच्यासाठी मोठी असेन. पण वसंतराव आमचे अध्यक्ष आहेत, हे लक्षात ठेवा. ते सहमत झाले तरच मी सहमत आहे, असे समजा’. शिक्षक परिषदेचे अधिवेशन असो, सदस्य नोंदणी मोहीम असो, अशा कोणत्याही वेळी धनसंग्रह करण्याचे बाबतीत किंवा सदस्य नोंदणीबाबत त्यांचा नंबर पहिला असायचा. अशाप्रकारे त्यांच्या आमदारकीच्या दीर्घ काळात त्यांनी संघटनेच्या खात्यात लाखोनी रक्कम जमा केली होती. संघटनेच्या नियमानुसार दरमहा एक ठराविक रक्कम आमदाराने संघटनेला देणगी द्यायची, असे होते. त्यातला काही हिस्सा मुंबई विभागाला मिळावा, असे एका कार्यकर्त्याने म्हटले असता, संजीवनीताईनी त्याला फटकारले. ‘हे बघा, हे पैसे सगळ्या महाराष्ट्राच्या कामासाठी खर्च होत असतात. त्यांना त्यातला वाटा मागू नका. तुम्हाला किती हवेत, ते सांगा. तेवढी रक्कम मी तुम्हाला गोळा करून देईन’. एकदा संघटनेचे अधिवेशन होते, त्या सुमारास आम्ही त्यांच्याबरोबर मंत्रालयात ‘हिंडत’ असतांना अनेक आमदारांची गाठ पडत होती. तेव्हा त्या म्हणायच्या, ‘अहो, ते नमस्कारच जाऊ द्या. आमच्या संघटनेचं अधिवेशन आहे. तेव्हा देणगी किती देता, ते सांगा. निदान हजारतरी हवेतच. पण तुम्हाला जास्त द्यायचे असतील, तरी चालतील’. एकानेही त्यांचा शब्द खाली पडू दिला नाही. त्या काळात मी शिक्षक संदेश या मासिकाचा संपादक होतो. वर्गणीदार नोंदणी आणि जाहिरातींच्या निमित्ताने त्यांनी 3 लाख रुपये मासिकाच्या खात्यात जमा केले होते. संजीवनीताईंनी आमदारांना उपलब्ध असलेली बहुतेक आयुधे वापरली. नियमांमधील तरतुदींबाबतचे त्यांचे प्रभुत्व मात्र बेताचेच होते. त्याबाबत त्या आमच्यावर अवलंबून असत. त्या समोरच्या अधिकाऱ्याला म्हणत, ‘या प्रश्नाबाबत संबंधितावर अन्याय झाला आहे, हे मला समजतं. ते नियमांबाबतचं तुम्ही पहा. पुन्हा भेटायला येईन, तेव्हा काम झालेलं असलं पाहिजे’. पुन्हा भेट व्हायची, तेव्हा काम झालेलं असायचं. सातत्य राखत पाठपुरावा करीत, प्रसूतीरजा आणि बालसंगोपन रजा असे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. तेव्हा एक सचिव म्हणाले होते, ‘ताई, तुमचं काम झालं बरं का’. तेव्हा ‘हे काम माझं नव्हतं, ते खरंतर तुमचंच काम होतं. पण तुन्ही ते करीत नव्हतात, म्हणून मला लकडा लावावा लागला’, असं म्हणून मगच सचिवांना त्यांनी धन्यवाद दिले. अशा प्रसंगी त्यांच्या शब्दांना एक वेगळीच धार चढलेली असायची. अवघड शब्दिक चेंडूवर चौकार ठोकण्यात, त्या कधी चुकल्या नाहीत. अखिल भारतीय संघटनांच्या कामाच्या निमित्ताने त्यांनी देशभर प्रवास, बहुतेक वेळी, रेल्वेनेच केला. या दोन्ही संघटनांचे कार्यकर्ते त्यांचा उल्लेख अत्यंत आदराने ‘रायकरताई’ म्हणूनच करीत असत. अशा अनेक आठवणी मनात गर्दी करीत आहेत. त्यांच्या संपूर्ण कार्यकाळात श्री सुरेश उपाध्ये आणि कै. मुकुंदराव पळशीकर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असत. असे बंधुवत पाठीराखे आजच्या काळात शोधावेच लागतील. असे म्हणावे तर अशी भगिनीही कुणाच्या वाट्याला येत असेल?

No comments:

Post a Comment