Monday, February 7, 2022

तालिबान्यांच्या परागंदा झालेल्यांसाठी पायघड्या! वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आली आणि ती येताना किंवा आलेली पाहून घनी राजवटीशी संबंध असलेले आणि पश्तून नसलेले अनेक अफगाणी नेते परगंदा झाले. याचा अर्थ एकच की तालिबानी राजवटीत आपल्या जीवाला धोका आहे किंवा देशात स्वतंत्रपणे वावरणे, व्यक्त होणे कठीण आहे, हे त्यांना म्हणजे ताजिक, हजारा आणि उझबेक नेत्यांना जाणवले होते, म्हणूनच होता हा देशत्याग! अफगाणिस्तानमधली सध्याची राजवट तालिबानीमधील पश्तून वंशीय गटच चालवीत असल्यामुळे ती सर्वसमावेशी आणि प्रातिनिधिक नाही. प्रशासन सर्वांना सोबत घेऊन चालणारे आणि स्वत: प्रातिनिधिक नसेल तर ज्या अनेक अडचणी येतात, त्या बंदुकीच्या जोरावर सोडविणे अशक्य असते. त्यामुळे पूर्वापार चालत आलेले वैर विसरून विरोधकांशी समेट घडवून आणण्याचा प्रयत्न विद्यमान तालिबानी राजवटीने सुरू केलेला दिसतो आहे. विद्यमान तालिबानी राजवटीचे पाकिस्तानशी खटके उडायलाही सुरवात झाल्याच्या बातम्या बाहेर येत आहेत. पण तालिबानी राजवटीला जगातल्या कोणत्याही देशाने मान्यता दिली नसल्यामुळे उर्वरित जगाशी संपर्क करण्यासाठी तालिबान्यांना पाकिस्तानचा आधार घेणे भाग पडते आहे. जे देशात राहिले असते, त्यांना निश्चितच मारले गेले असते, निदान बेड्यातरी नक्कीच घातल्या असत्या, अशा देश सोडून गेलेल्या विरोधकांशी तालिबानी राजवट सध्या संपर्क साधण्याचा आणि त्यांनी देशात परत यावे यासाठी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करतांना दिसते आहे. त्यासाठी तालिबानी राजवट पाकिस्तानच्या आयएसआय या गुप्तहेर संघटनेची मदत घेते आहे. परागंदा झालेल्यांनी आता देशात परत यावे म्हणून पायघड्या अंथरण्याची वेळ ताालिबानींवर आली आहे. काळ सूड घेतो म्हणतात, तो असा. प्रमुख परागंदा नेते अमरुल्ला सालेह हे ताजिक वंशीय नेते अगोदरच्या घनी यांच्या शासनकाळात अफगाणिस्तानचे पहिले उपाध्यक्ष होते. काबूल पडताच घनी देश सोडून गेले. म्हणून 17 ॲागस्ट 2021 ला सालेह यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचे कार्यकारी अध्यक्ष (ॲक्टिंग प्रेसिडेंट) म्हणून घोषित केले होते. अफगाणिस्तानच्या घटनेतील कलम 60 आणि 67 नुसार अध्यक्षांच्या अनुपस्थितीत पहिले उपाध्यक्ष अध्यक्षांची कर्तव्ये पार पाडतील, असे आहे. पण पुढे नाइलाजाने अमरुल्ला सालेह हे काबूल सोडून गेले आणि अहमद मसूद सोबत पंजशीर व्हॅलीत प्रगट झाले. पंजशीरच्या पाडावानंतर सालेह ताजिकीस्तानात पळून गेल्याचे वृत्त अमेरिकन गुप्तहेर खाते आणि पेंटॅगॅानने दिले होते. पण हे वृत्त खुद्द ताजिकीस्तान सरकारने नाकारले होते. तेव्हापासून सालेह यांच्या बाबतची माहिती समोर येत नव्हती. पण आता यांचा आणि इतर परागंदा झालेल्या काही नेत्यांचा ठावठिकाणा, ते काहीसे उघडपणे वावरू लागल्यानंतर माहीत झाला आहे . पाकिस्ताने एका आयएसआयच्या मोठ्या अधिकाऱ्याची नियुक्ती, परागंदा झालेल्या नेत्यांशी बोलणी करण्यासाठी केली असून त्याच्यावर परागंदा झालेल्या नेत्यांचे मन वळवून त्यांना अफगाणिस्तानमध्ये परत येण्यास प्रवृत्त करण्याची जबाबदारी सोपविली आहे. हे करतांना पाकिस्तानने दोन उद्देश समोर ठेवले आहेत. पहिला उद्देश असा आहे की, सगळ्या जगाला हे कळावे की, तालिबानी राजवट असली तरी अफगाणिस्तानवर प्रत्यक्षात त्याचेच नियंत्रण आहे आणि पालकत्वाची भूमिका पाकिस्तानकडेच आहे. त्यामुळे तालिबान राजवटीची धोरणे ठरविणे प्रत्यक्षात पाकिस्तानच्याच हाती आहे. दुसरा उद्देश तालिबानी नेते आणि हे परागंदा नेते यांना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी मध्यस्थ म्हणून केवळ आपलाच आधार आहे, हे जनमानसावर बिंबवण्याचा आहे. पाकिस्तानची ही गुप्त मोहीम गेले दोन महिने सुरू होती. तिच्याबद्दलचे वृत्त नुकतेच झिरपत झिरपत बाहेर आले आहे. संपर्क साधण्याची इच्छा तालिबानींची असली तरी पुष्कळशी सूत्रे पाकिस्तानने आपल्याच हाती ठेवली आहेत. भेटीगाठींचे यजमानपद पाकिस्तानकडे असणार आहे. या साठी नेमस्त केलेला आयएसआयचा अधिकारी सध्या तुर्कस्तानमध्ये गेलेला आहे. या अधिकाऱ्याने अफगाणिस्तानच्या जुन्या राजवटीतील मंत्र्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता काहींनी स्वत: भेट न घेता अगोदर आपल्या प्रतिनिधीची भेट घेण्यास सांगितल्याचे वृत्त आहे. बहुदा त्यांना तालिबानी आणि आयएसआयच्या अंतरीच्या हेतूबद्दल शंका असावी. हे सर्व परागंदा नेते तालिबानी नसून त्यांचा कल भारताकडे आहे, हे विशेष. यापैकी एक नेता अब्दुल रसूल सय्याफ हा आहे. दुसरा नेता आहे अफगाणिस्तानचा माजी परराष्ट्रमंत्री सलाहुद्दीन रब्बानी आणि तिसरा आहे अब्दुल रशीद दोस्तम. भेटीत नक्की काय घडले, याबद्दलची बातमी बाहेर आलेली नाही. एक मात्र स्पष्ट आहे की, या तिघांच्याही मनात पाकिस्तान आणि तालिबानी यांच्या अंतस्थ हेतूबद्दल जबरदस्त शंका आहे. कारण एकेकाळी तालिबानी यांच्या जिवावरच उठले होते आणि आपण देश सोडून पळालो म्हणूनच वाचलो, हे त्यांना पक्के ठावूक आहे. सय्याफ याचे वय 70 च्या आतबाहेर आहे. अश्रफ घनी यांचे सरकार पडले, आणि तालिबान्यांनी काबूलचा ताबा ॲागस्ट 2021 मध्ये घेताच सय्याफ प्रथम भारतात पळून आले. पण भारतापेक्षा तुर्कस्तानमध्ये राहूनच तालिबान विरोधकांना एकत्र आणणे सोपे आहे, हे जाणवून त्यांनी तुर्कस्तानमध्ये प्रवेश केला आहे. अनेक तालिबानी विरोधक या अगोदरच तुर्कस्तानमध्ये एकत्र आले आहेत आणि अज्ञातवासातील शासन निर्माण करण्यासाठी त्यांनी अज्ञातवासियांचे संघटन उभारले आहे. वृत्तीने राजकारणी असलेले सय्याफ हे मुजाहिद्दीनचे कमांडरही राहिलेले आहेत. पुढे सालेह रब्बानीसह नॅार्दर्न अलायन्समध्ये सामील झाले. तालिबानविरोधी भूमिका असलेल्या नॅार्दर्न अलायन्सला भारतासह इराण, रशिया, ताजिकीस्तान, तुर्कमेनिस्तान आणि इस्रायलचाही पाठिंबा होता. पश्तून तालिबान्यांनी काबूल ताब्यात घेताच स्वत: पश्तून असूनही सय्याफ त्यांच्याशी हातमिळवणी न करता भारतात पळून आले. ताजिक वंशीय अट्टा मुहंमद नूर यांनी स्थापन केलेल्या ताजिकीस्तानमधील अज्ञातवासातील सरकार (गव्हर्मेंट इन एक्झाईल) मध्ये सामील होण्याचा त्यांचा विचार आहे. अब्दुल रशीद दोस्तम - हे उझबेक नेते आहेत. जिधर दम, उधर हम, अशी भूमिका घेत टोपी फिरवणारा हा एक पराक्रमी पण कुप्रसिद्ध दलबदलू नेता आहे. दोस्तम हे अफगाणिस्तानमधील एक वादग्रस्त व्यक्तिमत्वच मानले गेले आहे. एक पराक्रमी योद्धा म्हणून ते उझबेक लोकात ‘पाशा’ या उपाधीने लोकप्रिय आहेत. पण त्यांच्यावर युद्धगुन्हेगारी आणि अत्याचाराचे आरोप करणारेही काही कमी नाहीत. सलाउद्दिन रब्बानी- परराष्ट्रव्यवहारनिपुण राजकारणी असलेले रब्बानी हे घनी मंत्रीमंडळात परराष्ट्रव्यवहारमंत्री होते. पुढे मात्र रब्बानी मतभेद होऊन 2019 मध्ये मंत्रिमंडळातून बाहेर पडले. भारताला अनुकूल असलेल्या या तीन नेत्यांचे मन वळवून त्यांना अफगाणिस्तानमध्ये परत आणण्यासाठी कसोशीचा खटाटोप तालिबानी आणि आयएसआय करीत आहे. पण या कुणाचाही आयएसआय किंवा तालिबानी प्रशासनावर विश्वास नाही. तरीही पाकिस्तानचे या आणि अशा नेत्यांना तालिबानी राजवटीला अनुकूल करून घेण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. यामागे पाकिस्तानचा खरा हेतू वेगळाच आहे. भारताला अफगाणिस्तान प्रकरणी कोणताही वाव असू नये, यासाठी पाकिस्तानची ही सर्व खटाटोप आहे. भारताला पाकिस्तानमार्गे अफगाणिस्तानला अन्नधान्य आणि औषधे पाठविणे सोयीचे आहे. पण पाकिस्तान यासाठी अनुमती देत नसल्यामुळे ही सामग्री समुद्रमार्गे इराणच्या चाबहार बंदरातून अफगाणिस्तानला पाठवावी लागते. पाकिस्तान या धोरणात बदल करायला तयार झाल्याचे वृत्त नुकतेच समोर आले आहे. पण अहो, हे लबाडाचे वचन आहे. अफगाण लोकांजवळचे पैसे संपले आहेत. शेवटी अवयव विकून लोक पैसे उभे करीत आहेत. एका वृत्तवाहिनीने अशा लोकांना रांगेत उभे करून त्यांच्या पोटावरचा किडनी काढल्यानंतर दिसणारा चिरा जगभर दाखविला आहे. यावरून हा अवयवविक्री बाजार अफगाणिस्तानमध्ये सध्या किती गरम आहे, ते जाणवेल. काहींवर पोटची पोरे विकून पोटाची खळगी भरण्यासाठी पैसे उभे करण्याची पाळी आली आहे, तर अनेक मरत नाहीत म्हणूनच जिवंत आहेत. भरीतभर ही की, जे पूर्वीच्या घनी राजवटीशी एकनिष्ठ होते, त्यांचा खातमा स्वत: तालिबानीच करीत आहेत. तालिबानचे परराष्ट्रव्यवहार मंत्री अमीरखान मुत्ताकी यांनी इराणमध्ये जाऊन नॅशनल रेझिस्टन्सचे ताजिक वंशीय प्रमुख अहमद मसूद यांची आणि माजी ताजिक मंत्री इस्माईल खान यांची भेट घेतली आणि विरोध करण्याचे सोडून अफगाणिस्तानमध्ये परत यावे, असे आवाहन केले. ते मुक्त आणि स्वतंत्रपणे अफगाणिस्तानमध्ये हिंडूफिरू शकतील, अशी ग्वाहीही दिली. पण विश्वसनीयता शून्यावर पोचलेल्या तालिबान्यांवर परागंदा झालेल्या नेत्यांचा विश्वास बसत नाही. ‘से नो टु तालिबान’, नॅार्वेतील जनआंदोलन परागंदा झालेल्यांनी परत यावे ही भूमिका घेण्यामागे तालिबान्यांचे हृदयपरिवर्तन झाले आहे, हे कारण खचितच नाही. तसेच तालिबानी मंत्रिमंडळ सर्वसमावेशक आणि सर्व वंशीयांना बरोबर घेऊन चालते आहे, असाही त्याचा अर्थ होत नाही. मुत्ताकी शिष्टमंडळ नॅार्वेत येताच जनतेने ‘से नो टू तालिबान’ हे आंदोलन सुरू केले होते. पण ‘आम्ही शिष्टमंडळाची भेट घेतली किंवा इथे येण्यासाठी विमानाची व्यवस्था केली, याचा अर्थ तालिबान सरकार कायदेशीर रीतीने अस्तित्वात आले आहे किंवा या सरकारला आम्ही मान्यता देतो आहोत, असा होत नाही’, असे नॅार्वेचे परराष्ट्रमंत्री अनिकेन हुटफिल्ड यांनी स्पष्ट केले आहे. ‘तरीही आज अफगाणिस्तानमध्ये जे सत्तेवर आहेत त्यांच्याशीच बोलणे आम्हाला भाग आहे. तिथे मानवांवर ओढवलेली आपत्ती, राजकीय कारणास्तव आणखी बिकट होऊ देणेही आम्हाला शक्य होणार नाही’, अशी भूमिका नॅार्वेने घेतली आहे. आजपर्यंत तरी परागंदा नेत्यांचे मन वळवण्यासाठी गेलेले तालिबानी नेते आणि पाकिस्तानी दूत हात हलवीत परत आले आहेत. परागंदा झालेल्या या अफगाण नेत्यांशी संपर्क साधण्याचे भारताचेही प्रयत्न सुरू आहेत. उद्या काय होणार? या प्रश्नाचे उत्तर आजतरी तालिबान आणि आयएसआय यांच्यासाठी आशादायक नाही. पण जग अफगाणी जनतेला अन्न आणि औषधांविना मरू देणार नाही, हे मात्र तालिबान्यांना पक्के ठावूक आहे.

No comments:

Post a Comment