Monday, March 7, 2022

विनोदी अभिनेता ते कणखर नेता - वोलोदिमिर झेलेन्स्की वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? कोणताही राजकीय अनुभव किंवा पृष्ठभूमी नसतांना एकदम युक्रेनच्या अध्यक्षपदी 2019 पासून आरूढ झालेला; मुळातला विनोदी अभिनेता असलेला; सर्व्हंट ॲाफ दी पीपल या विनोदी टीव्ही मालिकेत युक्रेनच्या अध्यक्षाची भूमिका वठवणारा, यहुदी वंशाचा वय वर्ष 44 असलेला, देशवासियांसाठी युक्रेन तर रशियनांना कळावे म्हणून बोलता बोलता रशियन भाषेत बोलू शकणारा सव्यसाची वक्ता असलेला, वोलोदिमिर झेलेन्स्की आज यहुदीविरोधी युक्रेनमध्ये नायक म्हणून संबोधला जातो आहे, हे वास्तव कल्पितापेक्षाही अधिक चमत्कारिक म्हटले पाहिजे. इस्रायलचा प्रमुख यहुदीच असेल हे उघड आहे. पण जगातल्या इतर कोणत्याही देशाचा प्रमुख यहुदी नाही. अपवाद आहे तो फक्त युक्रेनचा. मुरब्बी राजकारणी अशी नवीन ओळख मिळालेला झेलेन्स्की आणि त्याची वास्तुविशारद पत्नी ओलेना, यांना ओलेक्सॅंड्र नावाची 17 वर्षांची मुलगी आणि ऱ्यामा हा 9 वर्षांचा मुलगा आहे. आजच्या बिकट परिस्थिततीत हेही देशाबाहेर न जाता युक्रेनमध्येच राहिले आहेत, ही बाबही नोंद घ्यावी अशीच आहे. अभिनय हा प्रारंभ जीवनाचा कायद्याचे शिक्षण घेतल्यानंतर वोलोदिमिर झेलेन्स्की याने सुखपर्यवसायी नाट्यस्तूची निवड करीत क्वार्टल 95 नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीने सुखपर्यवसायी, विनोदी, आणि कार्टूनसारखे चित्रपट निर्माण केले. ‘सर्व्हंट ॲाफ दी पीपल’ या उपहासपूर्ण विनोदी मालिकेत झेलेन्स्की हा एका कर्तव्यदक्ष शिक्षकाच्या भूमिकेत होता. भ्रष्टाचाराची चीड असलेला हा शिक्षक सोशल मीडियाद्वारे भ्रष्टाचाराविरोधात रान उठवतांना दाखविला आहे. या भूमिकेमुळे तो लोकप्रिय होतो आणि त्यालाच अध्यक्षपदाचे उमेदवार घोषित करण्यात येते आणि तो निवडणुकीत विजयी होतो. ही पडद्यावरची कल्पित कथा पुढे प्रत्यक्षातही उतरते, असे दुसरे उदाहरण शोधले तरी सापडेल का? ही मालिका 2015 ते 2019 या कालखंडात दाखविली गेली. तिने लोकप्रियतेचे सर्व उच्चांक मोडले. ‘सर्व्हंट ॲाफ दी पीपल’ याच नावाचा राजकीय पक्ष क्वार्टल 95 या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी निर्माण केला. मालिकेचे नाव राजकीय पक्षाला, हे तरी कुठे सापडेल का? असो. युक्रेनमधील निवडणुकीचे नियम युक्रेनमध्ये अध्यक्षाची कारकीर्द 5 वर्षांची असते. पाचव्या वर्षीच्या मार्च महिन्यातील शेवटच्या रविवारी नवीन अध्यक्षाची निवडणूक झालीच पाहिजे. 2019 हे या दृष्टीने पाचवे वर्ष होते. या वर्षी मार्च महिन्यातला शेवटचा रविवार 31 या तारखेला होता. यानुसार 26 नोव्हेंबर 2018 ला युक्रेनच्या पार्लमेंटने 31 मार्च 2019 ही निवडणुकीची तारीख मुक्रर केली. निवडणूक म्हटली की, पहिला प्रश्न असतो निवडणूक निधीचा. सर्वात जास्त निवडणूक निधी पेट्रो पोरोशेन्को याच्या गाठीशी होता. निधीच्या बाबतीत झेलेन्स्कीचा क्रमांक तिसरा होता. 17 देशांच्या 19 मान्यताप्राप्त संस्थांचे 2,369 प्रतिनिधी निरीक्षक म्हणून उपस्थित होते. खुद्द युक्रेनमधील 139 अशासकीय संस्थाही निवडणुकीवर लक्ष ठेवून होत्या. निवडून आलेला अध्यक्ष हा जनमताचे खरेखुरे प्रतिनिधित्व करीत होता किंवा नव्हता हा मुद्दा, हा तपशील पाहता निकालात निघतो. पण तरीही अशी शंका घेणाऱ्या इतरांबरोबर रशियाही होता. झेलेन्स्कीने युक्रेनच्या अध्यक्षपदाची निवडणूक देशाचा तत्कालीन अध्यक्ष पेट्रो पोरोशेन्को याच्याविरुद्ध लढविली आणि जिंकली, ती अशी. ही निवडणूक दोन फेऱ्या होऊन पार पडली. पहिली फेरी 31 मार्च 2019 ला रविवारी झाली तर दुसरी फेरी 21 एप्रिल 2019 ला रविवारीच पार पडली. पहिल्या फेरीत एकूण 34 उमेदवार उभे होते. क्रिमियाचा टवका रशियाने अगोदरच तोडला होता, तर डॅानेट्सचे ॲाब्लास्ट आणि लुहॅंन्स्क हे भूभाग रशियाधार्जिण्या फुटिरतावाद्यांच्या ताब्यात होते. त्यामुळे या तिन्ही ठिकाणी निवडणूक घेणे शक्य नव्हते म्हणून ते वगळून झालेल्या पहिल्या फेरीच्या मतदानात 62.9% मतदान झाले. पण कुणालाही 50% पेक्षा जास्त मते मिळाली नाहीत. झेलेन्स्कीला 30 % तर पेट्रो पोरोशेन्कोला 16 % मते मिळाली आणि ते अनुक्रमे पहिले व दुसरे होते. मतदानाची दुसरी फेरी तीन आठवड्यानंतर पार पडली. या फेरीत पहिलीपेक्षा थोडे कमी म्हणजे 62.1% मतदान झाले आणि ‘सर्व्हंट ॲाफ दी पीपल’ या टीव्ही सिरियल मध्ये युक्रेनच्या अध्यक्षाची भूमिका वठवणारा झेलेन्स्की, ‘सर्व्हंट ॲाफ दी पीपल’ या त्याच नावाच्या राजकीय पक्षाचा अध्यक्षपदाचा खराखुरा उमेदवारही असलेला झेलेन्स्की 73.22 % मताधिक्याने निवडून आला. प्रस्थापितांचा विरोध (ॲंटी इनकंबन्सी) ही मतदारांची भूमिका, सीमांचे प्राणपणाने रक्षण करीन हे आश्वासन आणि भ्रष्टाचाराचा समूळ नायनाट करण्याची हमी ह्या झेलेन्स्कीच्या भूमिका त्याच्या विजयाला कारणीभूत ठरल्या. झेलेन्स्कीला 1,35,41,528 (1 कोटी, 35 लाख, 41 हजार 528) तर पेट्रो पोरोशेन्कोला फक्त 45,22,320 (45 लाख, 22 हजार, 320) मते मिळाली होती. ही आकडेवारी यासाठी महत्त्वाची ठरते की, यावरून लोकमत प्रस्थापितांच्या कारभाराला किती विटले होते, ते लक्षात यावे. मतदारांनी फार मोठ्या अपेक्षा उराशी बाळगून मोठ्या विश्वासाने एका अभिनेत्याकडे, खऱ्या नेत्याची भूमिका प्रत्यक्ष राजकीय जीवनात सोपविली होती. 2019 ते 2022 हा कालखंड तसा फारसा मोठा म्हणता यायचा नाही. पण या अल्पकाळातही झेलेन्स्कीच्या कार्यकर्तृत्वाचा आलेख सरसर वरच चढत गेला. नेटो आणि झेलेन्स्की तशी नेटोमध्ये सामील होण्याची भूमिका युक्रेनने 2014 सालीच स्वीकारलेली आहे. त्यावेळी झेलेन्स्कीचे नावही किती मतदारांना माहीत असेल कुणास ठावूक? या काळात तो एखाद्या नुक्कडमध्ये छोटी मोठी भूमिका वठवून गल्लीकरांची मने रिझवीतही असेल, कदाचित. पण गल्लीतील नाट्यनायकाला मतदारांनी दिल्लीत (चुकलो! कीव या राजधानीत असे म्हणायला हवे) मुख्य नायकाची भूमिका प्रत्यक्षात पार पाडण्यास पाठवले आणि झेलेन्स्कीने या संधीचे आणि नागरिकांच्या त्याच्यावरील विश्वासाचे सोने केले. तो खराखुरा राष्ट्रनायक ठरला. नवीन आणि अननुभवी अध्यक्षाच्या पाठीवर अपेक्षांचे गाठोडे पराभूत उमेदवार पेट्रो पोरोशेन्कोने निकालानंतर प्रतिक्रिया देताना टिप्पणी केली की, युक्रेनियनांनी नवीन आणि अननुभवी उमेदवार अध्यक्ष म्हणून निवडला आहे. तो रशियाच्या प्रभावाखाली लगेचच जातो की नाही ते पहा. काहींची टीका होती की झेलेन्स्कीची युक्रेनमधील धनदांडग्या कोलोमोयस्की याच्याशी घनिष्ट मैत्री आहे. याच्या आणि पुतिनच्या समोर या नाटक्याचा काय निभाव लागतो, ते दिसेलच. युरोपीयन युनीयनने मात्र झेलेन्स्कीचे अभिनंदन करून सहकार्यासाठी हात पुढे केला. ब्रिटनचे परराष्ट्र सचिव जेरेमी हंट म्हणाले, ‘या विजयाने जनतेला खराखुरा जनसेवक (सर्व्हंट ॲाफ दी पीपल) मिळाला आहे’. त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी निवडणुका शांततेत आणि लोकशाही पद्धतीने पार पडल्याबाबत समाधान व्यक्त करीत झेलेन्स्कीचे अभिनंदन केले. रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री ग्रिगोरी कारासिन यांची प्रतिक्रिया इतरांच्या तुलनेत काहीशी वेगळी होती. ‘नवीन नेतृत्वाने जनतेच्या आशा अपेक्षा समजून घेतल्या पाहिजेत. त्या पूर्ण होतील अशीच धोरणे देशांतर्गत आणि परराष्ट्रव्यवहारात स्वीकारली पाहिजेत’, या दोन्ही बाबतीत जनतेच्या अपेक्षा तर झेलेन्स्कीने पूर्ण केल्या, पण त्या रशियाच्या अपेक्षांशी जुळणाऱ्या नव्हत्या. थोडक्यात काय, तर पाश्चात्य जगाने झेलेन्स्कीच्या विजयाचे मन:पूर्वक स्वागत केले. रशियाने सावधगिरीचा इशारा दिला होता पण प्रत्यक्ष विरोध मात्र दर्शविला नव्हता. सध्या सुरू असलेल्या युक्रेन संकटाचा तीव्र प्रतिकार करण्याची भूमिका वोलोदिमिर झेलेन्स्की याने घेतली आहे. त्याला युक्रेनमधील जनतेची अभूतपूर्व साथ मिळते आहे. झेलेन्स्की पळून गेला आहे किंवा त्याने आत्मसमर्पण करण्याचे आदेश दिले आहेत अशी अफवा पसरवली जात असतांना, त्याने सेल्फी व्हिडिओपोस्ट द्वारे तिचे खंडन केले आहे. "मी युक्रेनमध्येच आहे. आम्ही शस्त्र खाली न ठेवता देशाचे रक्षण करू, ”असे सांगत त्याने गनिमी पद्धतीने युद्ध करून सैन्याला साथ देण्याचे आवाहन देशवासियांना केले आहे. पेट्रोल बॅाम्ब तयार करण्याचा गृहउद्योग देशभर सुरू झाला आहे. वृद्ध आणि मुले वगळता उरलेली तरूण पिढी पूर्वी घेतलेल्या शस्त्रशिक्षणाला उजाळा देत किंवा नव्याने शिकत आक्रमकांना तोंड देण्यासाठी देशातच थांबली आहे. अमेरिकेकडून आलेली सुरक्षित स्थळी पोचवण्याची ऑफर झेलेन्स्की याने धुडकावून लावली आणि ‘मला दारूगोळा हवा आहे, सुखरूप बाहेर पडण्यासाठीची मदत नको आहे, तेव्हा शस्त्रे हवी आहेत, ती पुरवा, मला राईड ((रपेट) नको’, असे त्याने अमेरिकेसह सर्व जगाला सांगितले आहे. रशियाचा विचार झेलेन्स्कीला पकडायचे आणि त्याच्या जागी एखादे बाहुले बसवून युक्रेनला आपल्या दावणीला बांधण्याचे असा दिसतो. तो झेलेन्स्की याने आजपर्यंत तरी यशस्वी होऊ दिलेला नाही.

No comments:

Post a Comment