Monday, May 2, 2022

मॅक्रॅान यांनी फ्रान्सचे अध्यक्षपद तर जिंकले पण… तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक ०३ /०५ /२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल. मॅक्रॅान यांनी फ्रान्सचे अध्यक्षपद तर जिंकले पण…. वसंत गणेश काणे, बीएस्सी,एमए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? फ्रान्सचे इमॅन्युअल मॅक्रॅान, वय वर्ष फक्त 44, हे मध्यममार्गी (सेंटरिस्ट), युरोपीयन युनीयनचे खंदे पुरस्कर्ते, 58.5% मते मिळवून पेन यांच्यावर 17% मताधिक्याने मात करीत विजयी झाले. हा त्यांचा सलग दुसरा विजय आहे. दोन दशकापूर्वी 2002 मध्ये जॅक शिराक असेच दुसऱ्यांदा निवडून आले होते. पाश्चात्य राष्ट्रांनी समाधान व्यक्त करण्यात किंचितही कसर ठेवली नाही. संयुक्त राष्ट्र संघटनेचा संस्थापक सदस्य, सुरक्षा समितीचा कायम सदस्य, नॅार्थ अटलांटिक ट्रिटी अलायन्स आणि युरोपीयन युनीयनचा संस्थापक सदस्य एवढीच फ्रान्सची ओळख नाही. तर खरऱ्याखुऱा धर्मातीत आणि लोकशाहीवादी राष्ट्र हीही फ्रान्सची ओळख आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन म्हणाले की, फ्रान्स हा अमेरिकेचा सर्वात जुना मित्र आहे. तो आमचा जागतिक आव्हानांचा सामना करतांनाचा महत्त्वाचा साथीदार आहे. युक्रेनप्रकरणी सघन सहकार्य करणारा युरोपमधला महत्त्वाचा देश आहे, लोकशाहीचे संरक्षण करतांनाचा विश्वासू मित्र आहे, हवामानबदलाचा निष्ठेने सामना करणारा सहकारी आहे. अशा शब्दात त्यांनी फ्रान्सवर स्तुतिसुमने उधळली आहेत. 41.5 % मतदारांचा अतिउजव्या रशियनधार्जिण्या पेन यांना पाठिंबा मॅक्रॅान यांनी पेनवर मिळविलेले मताधिक्य 2017 मध्ये 32% होते. पण पेन या कडव्या उजव्या उमेदवाराची मतांची 2017 तील 33.9 ही टक्केवारी 2022 मध्ये वाढून 41.5 इतकी झाली. तर मॅक्रॅान यांची मतांची टक्केवारी 61.1 वरून 58.5 पर्यंत घसरली. अध्यक्षीय निवडणुकीच्या पहिल्या फेरीत 10 एप्रिल 2022 ला मॅक्रॅान यांना फक्त 28 % मते पडली. तर पेन यांना 23% मते पडली. तिसऱ्या क्रमांकावर जीन-लक मॅलेनकॅान या अतिडाव्या उमेदवाराला 22 % मते मिळाली. मॅक्रॅान यांना 2017 च्या तुलनेत यावेळी यावेळी 4% मते जास्त पडली आहेत. पेन यांना यावेळी 2 % मते जास्त पडली आहेत. तिसऱ्या क्रमांकावरील जीन-लक मॅलेनकॅान यांना 2% मते जास्त मिळाली. म्हणजे तिन्ही प्रमुख पक्षांना 2017 च्या तुलनेत जास्त मते पडली आहेत. 2017 च्या निवडणुकीत पहिल्या दोघांच्या मतात 3% चा फरक होता. यावेळी 2022 मध्ये 5 % आहे. जीन-लक मॅलेनकॅान या तिसऱ्या क्रमांकावरच्या अति डाव्या उमेदवारला बाद करून मॅक्रॅान आणि पेन यात 24 एप्रिलला मतदानाची दुसरी फेरी पार पडली आणि मॅक्रॅान यांना 58.5% तर पेन यांना 41.5% मते मिळून मॅक्रॅान विजयी झाले. 2017 मध्ये मात्र दुसऱ्या फेरीत मॅक्रॉन यांना 66.1 % तर पेन यांना 33.9 % मते मिळाली होती. म्हणजे 2022 मध्ये मॅक्रॅान यांची मते 66.1- 58.5 = 7.6% ने घटली तर पेन यांची मते मात्र 41.5 - 33.9 = 7.6 ने वाढलेली दिसतात. म्हणजे 41.5% जनमत फ्रान्सने युरोपीयन युनीयन आणि नाटोमधून मधून बाहेर पडावे आणि रशियाधार्जिणी भूमिका घ्यावी, असे झाले आहे. ही बाब मॅक्रॅानसाठी चिंताजनक आहे, तर पेन यांचा उत्साह वाढविणारी आहे. दुसरे असे की, मॅक्रॉन यांच्या वाट्याला आलेली ही शेवटची 5 वर्षेच आहेत. कारण फ्रान्सच्या घटनेनुसार कोणालाही दोनपेक्षा जास्तवेळा अध्यक्ष राहता येत नाही. 2027 ची चिंता म्हणून 2027 साली पेन यांना ज्याच्याशी सामना करावा लागेल, ती व्यक्ती मॅक्रॅान नव्हे तर कुणी नवीनच असेल. मॅक्रॉन यांना येत्या 5 वर्षात आंतरराष्ट्रीय विषयांबरोबरच अंतर्गत प्रश्नांवरही लक्ष केंद्रित करावे लागेल. ‘फ्रान्सच फर्स्ट’, हे खरेतर पेन यांचे घोषवाक्य! हा अतिउजवा अतिरेक टाळून फ्रेंचांचे राहणीमान कसे उंचावेल, महागाई कशी कमी होईल याकडे अधिक लक्ष मॅक्रॅान यांना द्यावे लागेल. त्यांना धार्मिक उन्मादाला आवर घालतांना उदारमतवादही जपायचा आहे. ही तारेवरची कसरत करतांना पण मॅक्रॅान यांना जागतिक राजकारणाकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. डावपेचाचे राजकारण कुणाही राजकारण्याला टाळता आलेले नाही पण विश्वात्मकतेकडे सुरू असलेला फ्रान्सचा प्रवासही मॅक्रॅान यांना थांबवता यायचा नाही. पक्षोपपक्षांची बजबजपुरी, टोकाचे मतभेद आणि मतांचा गलबला यावर मात करून जनतेत आत्मकेंद्री आणि संकुचित भूमिका निर्माण होणार नाही आणि पेन यांच्यासमोर 2027 सालीही एक नवा दमदार पर्याय उभा करायचा, ही करामत मॅक्रॅान यांना करायची आहे. उमेदवार आपल्या मतदारांची मते कितपत वळवू शकातात? मॅक्रॅान आणि पेन यांच्या पहिल्या फेरीतील मतांची बेरीज 28+ 23 = 51 % इतकी होते. म्हणजे उरलेल्या नऊ उमेदवारांमध्ये 49% मते विखुरली आहेत. दुसऱ्या फेरीत यांची या दोघात कशी विभागली होणार, हा महत्त्वाचा मुद्दा होता. ही 49% मते मतदारांनी दुसऱ्या फेरीत कुणाला द्यावीत, याबाबतचे आवाहन त्या त्या उमेदवारांचे असे होते. पहिल्या फेरीत बाद झालेल्या 9 उमेदवारांपैकी एकूण 4% मते मिळविणारे दोन उमेदवार तटस्थ राहिले, त्यांनी दुसऱ्या फेरीसाठी कोणालाही पाठिंबा दिला नाही. मुख्य म्हणजे 22 % मते मिळविणारे जीन-लक मॅलेनकॅान आणि आणि आणखी दोघे अशा तिघांनी दुसऱ्या फेरीसाठी पेन यांना पाठिंबा दिला. या तिघांना पहिल्या फेरीत मिळालेली एकूण मते 26 % होती. उरलेल्या चार उमेदवारांनी दुसऱ्या फेरीसाठी मॅक्रॅान यांना पाठिंबा दिला. या चौघांना पहिल्या फेरीत मिळालेली एकूण मते 19% होती. ही विभागणी पाहता पहिल्या फेरीतील 5% चा फरक आपण भरून काढू असा विश्वास पेन यांच्या मनात निर्माण झाला आणि त्यांनी दुसऱ्या फेरीसाठी अत्यंत हिरिरीने प्रचार केला. पण ज्या उमेदवाराला आपण पहिल्या फेरीत मतदान केले, त्याच्या आवाहनाला अनुसरून त्याचे मतदार दुसऱ्या फेरीतही मतदान करतीलच असे नसते, याचा प्रत्यय यावेळीही आला. बाद झालेल्या उमेदवारांनी केलेल्या आवाहनाला अनुसरून सर्व म्हणजे 49 % मतदारांनी मतदान केले नाही. 49 % चे दोन भाग पडले. 30.5 % मतदारांनी मॅक्रॅान यांना मतदान केले म्हणून त्यांची टक्केवारी दुसऱ्या फेरीत 28+ 30.5 = 58.5 % इतकी झाली. म्हणजे मॅक्रॅानवर नाराज असून सुद्धा मॅलेनकॅानच्या अनेक मुस्लीम मतदारांनी मॅक्रॅान यांना दुसऱ्या फेरीत मते दिली. कारण त्यांना पेन तर मुळीच नको होत्या. तर 18.5 % मतदारांनी मात्र पेन यांना मतदान केले म्हणून त्यांची टक्केवारी दुसऱ्या फेरीत 23.0 + 18.5 = 41.5 टक्के इतकीच झाली आणि मॅक्रॅान हे सलग दुसयांदा 17% मताधिक्याने निवडून आले. उदारमतवादी सेंटरिस्ट रिपब्लिक पक्षाचे किंवा एन मार्शे पक्षाचे मॅक्रॅान हे खरेखुरे सेक्युलॅरिस्ट (धर्मनिरपेक्ष) वृत्तीचे आहेत. युरोपीयन युनीयनचे खंदे पुरस्कर्ते आहेत. अमेरिकेची री ओढणे त्यांना मान्य नाही. त्यांचा युक्रेनला पाठिंबा आहे पण रशियाला युद्धापासून परावृत्त करावे, नच जमले तरच कठोर भूमिका घ्यावी, या मताचे आहेत. नॅशनल असेम्ब्लीतही स्पष्ट बहुमत आवश्यक पण मॅक्रॅान यांनी अध्यक्षपदी विजय मिळवून अर्धीच लढाई जिंकली आहे. आता नॅशनल असेम्ब्लीच्या 577 सदस्यांसाठी 12 जूनला पहिली फेरी आणि 19 जूनला दुसरी फेरी पार पडणार आहे. बहुमतासाठी स्वबळावर 289 जागा मिळविणे हे आता मॅक्रॅान यांचे पुढचे उद्दिष्ट असेल. ज्याला पहिल्याच फेरीत 1) 50 % पेक्षा जास्त मते मिळतील आणि 2) शिवाय ही संख्या मदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 25% असेल तो उमेदवार पहिल्याच फेरीत निवडून येतो. हे दोन उंबरठे कुणीच पार केले नाहीत तर ज्या उमेदवारांना त्या मतारसंघातील एकूण मतदारांच्या संख्येच्या 12.5% टक्के किंवा त्यापेक्षा जास्त मते पहिल्या फेरीत मिळाली असतील त्यांच्यातच दुसऱ्या फेरीत पुन्हा मतदान घेतले जाते आणि ज्याला सर्वात जास्त मते असतील तो निवडून येतो. 2017 चा नॅशनल असेम्ब्लीतील जागांचा हिशोब 1) मध्यममार्गी (सेंटरिस्ट) आघाडी दोन घटक पक्ष होते. मॅक्रॅानचा पक्ष यात सामील होता. मिळालेल्या जागा 350 आणि मतांची टक्केवारी 61%. यात मॅक्रॅान यांच्या पक्षाला 308 जागा म्हणजे पूर्ण बहुमत आणि 53.4. % मते मिळाली होती. पुढे मात्र पाच वर्षात अनेक सदस्य पक्ष सोडून गेलेले आढळतात. 2) उजव्यांच्या (रायटिस्ट) आघाडीत तीन घटक पक्ष होते पेन यांचा पक्ष यात सामील होता. यांना मिळालेल्या जागा136 आणि मतांची टक्केवारी 24.%. 3) डाव्यांच्या (लेफ्टिस्ट) आघाडीत तीन घटक पक्ष होते ॲालिव्हर फोर यांचा समाजवादी पक्ष यात सामील होता. यांना मिळालेल्या जागा 45 आणि मतांची टक्केवारी 7 %. 4) अन्य 9 पक्ष 46 जागा आणि मतांची एकूण टक्केवारी 8%. यापैकी पहिल्या फेरीत फक्त 4 च उमेदवार 50% पेक्षा जास्त मते मिळवून निवडून आले होते. उरलेले 573 उमेदवार दुसऱ्या फेरीत निवडून आले आहेत. यावरून फ्रान्समध्ये पक्षांची बजबजपुरी आणि मतांचे विभाजन कसे होत आहे, हे लक्षात येईल. 2022 मधील जून महिन्याच्या निवडणुकीत निदान 289 जागा मिळाल्याशिवाय आपली धोरणे मॅक्रॅान यांना अमलात आणता येणार नाहीत. हे फार मोठे आव्हान आहे. 41.5 % जनमत आपल्या बाजूला झुकलेले पाहून नॅशनल असेम्ब्लीमध्ये आपण मॅक्रॅान यांना बहुमतापासून दूर ठेवू शकू, असा विश्वास पेन यांना वाटू लागला आहे. म्हणून आता वाट 19 जूनच्या असेम्ब्लीच्या निवडणुकीच्या निकालाची!

No comments:

Post a Comment