Monday, October 10, 2022

युरोपच्या भवितव्याची दिशा सूचित करणारी निवडणूक वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? इटलीसारख्या देशांतील निवडणुकीत काय होते, कोणता पक्ष जिंकतो ही बाब फारशी महत्त्वाची ठरण्याचे कारण नव्हते. पण युरोपीयन महासंघाच्या भवितव्याचा अंदाज या निवडणुकीच्या निकलावरून बांधता येत असेल तर? तर मग ही निवडणूक महत्त्वाची ठरणार नाही का? इटलीत पार्लमेंटच्या (संसदेच्या) निवडणुका दर 5 वर्षांनी होत असतात. संसदेची दोन सभागृहे आहेत. 1) चेंबर ॲाफ डेप्युटीज 2) सिनेट ॲाफ दी रिपब्लिक. या दोन्ही सभागृहांच्या निवडणुका एकाच वेळी होत असतात. चेंबर ॲाफ डेप्युटीज (कनिष्ठ सभागृह) चेंबर ॲाफ डेप्युटीज मध्ये 400 जागा असतात. त्यापैकी 392 जागा इटलीतील मतदारसंघातून तर 8 जागा बाहेर देशात राहणाऱ्या इटलीच्या नागरिकांच्या मतदारसंघातून प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने भरल्या जातात. 392 पैकी 147 जागा सिंगल मेंबर डिस्ट्रिक्ट्स मधून भरल्या जातात. या पद्धतीनुसार ज्या उमेदवाराला सर्वात जास्त मते (ती निम्यापेक्षा जास्त असलीच पाहिजेत, असे नाही) तो उमेदवार निवडून येतो. जसे की भारतात आहे. 392 पैकी 245 प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निवडून येतात. म्हणजे समजा एखाद्या जिल्ह्यात 10 जागा आहेत. एका पक्षाला 50% मते पडली तर त्याने दिलेल्या 10 उमेदवारांच्या यादीतील पहिले 5 निवडून येतील. दुसऱ्या आणि तिसऱ्या पक्षाला समजा 30% आणि 20 % मते मिळाली तर त्याच्या यादीतील पहिले 3 आणि 2 उमेदवार निवडून येतील. जो नागरिक मतदानाच्या दिवशी 18 वर्षपूर्ण वयाचा असेल तो मतदार होण्यास पात्र असतो. सिनेट ॲाफ दी रिपब्लिक (वरिष्ठ सभागृह) या सभागृहाचे सदस्य प्रदेशानुसार (प्रांतानुसार?) निवडले जातात. अपवाद असतो देशाबाहेरील जागांचा. सिनेटची सदस्य संख्या 200 आहे. 196 देशातील मतदार संघातून तर 4 देशाबाहेरील नागरिकांमधून प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निवडले जातात. 196 पैकी 74 जागी सिंगल मेंबर डिस्ट्रिक्ट्स मधून सर्वात जास्त मते मिळविणारा उमेदवार निवडून येतो. जसे की भारतात आहे. 196 पैकी 122 प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निवडून येतात. कोणत्याही प्रदेशाला 3 पेक्षा कमी जागा दिल्या जात नाहीत. मात्र मोलीस या पर्वतीय प्रदेशाला 2 जागा तर एओस्टा या आल्प्स पर्वतातील फ्रान्स आणि स्वित्झरलंड यांना लागून असलेल्या दरीतील मतदारांना एक जागा दिलेली आहे. इटलीमध्ये मारिओ द्रागी सरकारने जुलै 2022 मध्ये अचानक राजीनामा दिल्यामुळे 25 सप्टेंबर 2022 निवडणूक घेण्यात आली. युरोपमधील जनता सध्या अतिउजव्या आणि राष्ट्रवादी पक्षांच्या प्रभावाखाली आलेली आहे. हंगेरी आणि स्वीडन या देशातही नाझीवाद प्रभावी ठरला आहे. इटालीतही जॉर्जिया मेलोनी वय वर्ष 45 यांचा पुराणमतवादी, समलिंगी विवाह आणि गर्भपात विरोधी ‘ब्रदर्स ऑफ इटली’ हा पक्ष सत्तेत येतो आहे. या पक्षाची मुळे ही बेनिटो मुसोलिनी यांच्या फॅसिस्ट पक्षामध्ये दिसून येतात. वडील डाव्या तर आई उजव्या विचारसरणीच्या असलेल्या आणि आईवडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर आईच्या तालमीत वाढलेल्या आणि एकेकाळी पत्रकारिता केलेल्या जॉर्जिया मेलोनी या इटालीच्या पहिल्या महिला पंतप्रधान असतील. अतिउजव्यांना प्रतिसाद का? अतिउजव्या आणि राष्ट्रवादी विचारांच्या प्रसाराचे मूळ हे युरोपीय महासंघाच्या (युनियन) काही धोरणांमध्ये दडले आहे. देशांतर्गत संघर्षामुळे मध्यपूर्वेतून आलेल्या स्थलांतरितांना (जसे-सीरिया) आश्रय देण्याचे युरोपीय महासंघाचे धोरण आहे. जर्मनी आणि फ्रान्स या दोन देशांतील सरकारांनी हे धोरण स्वागत करीत स्वीकारले आहे. पण या देशातही नाराजीचे सूर उमटतातच. मात्र युरोपमधील छोट्या देशांना हे धोरण मान्य नाही. याची दोन कारणे सांगितली जातात. पहिले कारण असे आहे की, फ्रान्स आणि जर्मनीसारखे मोठे देश स्थलांतरितांमुळे पडणारा अधिकचा आर्थिक भार सोसू शकतात. तर लहान देशांना ते जड जाते. दुसरे कारण असे आहे की, स्थलांतरितांबरोबर काही दहशतवादीही घुसतात आणि आश्रय देणाऱ्या देशात कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. या प्रश्नाची झळ फ्रान्स आणि जर्मनी या बड्या देशांनाही चांगलीच बसते आहे. बड्या देशांप्रमाणे लहान देश या उपद्रवाचा सामना करू शकत नाहीत. त्यांची गुन्हेगार नियंत्रण व्यवस्था काहीशी कमी पडते. लहान देशातील सरकारे महासंघाच्या धोरणाला नाइलाजाने अनुसरत असली तरी त्या देशांतील अन्य विरोधी पक्ष मात्र या धोरणाला कडाडून विरोध करीत आहेत आणि सहाजीकच या पक्षांची विशेषत: कडव्या उजव्या पक्षांची लोकप्रियता या देशात वेगाने वाढत चालली आहे. याचा परिणाम महासंघाच्या एकसंधपणावर झाल्याशिवाय राहणार नाही. आणखी एकादे ब्रेक्झिट महासंघाला परवडणार नाही. महासंघातील घटक राष्ट्रे पुन्हा वेगळी होतील. इटलीतील निवडणुकीत उजव्या पक्षांचा बहुमताकडे वाटचाल करणारा निकालही हीच भीती जाणवून देत आहे. ब्रदर्स ऑफ इटली या पक्षाचा बुचकळ्यात टाकणारा विजय इटलीमध्ये २५ सप्टेंबरला सार्वत्रिक मतदान झाले. 2018 च्या निवडणुकीत नगण्य असलेला, फक्त 4% मते मिळविणारा पक्ष, ‘ब्रदर्स ऑफ इटली’ आता सत्तेत येतो आहे. जॉर्जिया मेलोनी या अतिउजव्या, अत्याग्रही आणि आक्रमक नेत्या म्हणून ओळखल्या जातात. आज त्या नाटो, युक्रेन, युरोपीय महासंघ यांच्या बाजूने आहेत. पण सत्तारूढ होताच त्यांची भूमिका हीच राहील का? राजकीय निरीक्षकांमध्ये याबाबतीत शंका आहे. त्यांची भूमिका पुढेही आजच्यासारखीच राहील, अशी खात्री बहुतेकांना वाटत नाही. त्यांनी किमान वेतन धोरण संपवणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे बांगलादेशी लिबियन सीरियन यांना वाटणारे इटलीचे भरपूर वेतनासंबंधीचे आकर्षण संपणार आहे. इटालियन करांच्या पैशातून प्रति बालकाला 700 युरो देण्याची सवलत यापुढे लागू असणार नाही. ‘यांच्या’ जोडप्यागणिक 10-12 मुलांची जबाबदारी इटलीने का उचलावी, असा त्यांचा सवाल आहे, असे म्हणतात. नवीन मशीद बांधता येणार नाही. इमामाची नेमणूकही सरकार करील. यातील कारभार व शिक्षण इटालियन भाषेतच होईल. अशी पावले उचलली जाणार आहेत, असे वृत्त आहे. मुसोलिनीच्या कट्टर समर्थक मेलोनी जॅार्जिया मेलोनींची राजकीय कारकीर्द विद्यार्थीदशेतच सुरू झाली होती. प्रखर आणि टोकाचा राष्ट्रवाद, स्थलांतरितांना विरोध ही युरोपातील अन्य उजव्या नेत्यांची धोरणेच मेलोनीही राबवतील अशी अनेकांना शंका वाटते आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युरोपीयन महासंघांचे जन्म झाला. हा महासंघ उदारमतवादी आहे. ही दुसऱ्या महायुद्धाला कारणीभूत असलेल्या संकुचित राष्ट्रवादी भूमिकेची प्रतिक्रिया मानली जाते. महासंघ जागतिकीरणाचाही पुरस्कर्ता आहे. पण ऑस्ट्रिया, स्वीडन, इटली या देशात, संकुचित राष्ट्रवाद फोफावणे ही बाब महासंघाच्या मुळावर घाव घालणारी सिद्ध होईल, अशी जागतिकीरणवाद्यांना भीती वाटते आहे. फ्रान्समध्ये, आज सत्तेवर नसल्या तरी, मारी ला पेन या अतिउजव्या नेत्या लोकप्रिय आहेत. महासंघाच्या हाती आज रुपेरी किल्ली आहे. महासंघाकडून भरभक्कम निधी मिळत असल्यामुळे आज लहान देश महासंघाची उदारमतवादी धोरणे नाइलाजाने का होईना पण राबवीत आहेत. पण आज ना उद्या युरोपीयन महासंघाच्या पार्लमेंटमध्ये उजव्या विचारसरणीच्या प्रतिनिधींचे प्रभुत्व निर्माण होण्याची शक्यता भरपूर आहे. असे झाले तर युरोपातून उदारमतवादाची आणि जागतिकीकरणाचीही पीच्छेहाट होण्याचा धोका आहे. म्हणून इटलीतील ‘ब्रदर्स ऑफ इटली’ आणि त्याचे उजवे साथीदार यांचा विजय ही घटना त्या देशापुरती मर्यादित राहिली नसून जगाच्या भविष्यावर परिणाम करणारी ठरणार आहे. प्रमुख पक्ष, आघाड्या आणि तटस्थ पक्ष इटलीतील प्रमुख पक्ष आणि त्यांना मिळालेली मते अशी आहेत. उजवी आघाडी 1) जॉर्जिया मेलोनी यांच्या ब्रदर्स ॲाफ इटली या पक्षाला 26% म्हणजे पूर्वीपेक्षा 21% जास्त मते आणि चेंबरमध्ये 119 आणि सिनेटमध्ये 65 जागा मिळाल्या आहेत. 2) मॅटिओ सॅल्व्हिनी यांच्या लीग पार्टी ला 9% म्हणजे पूर्वीपेक्षा 8% कमी मते आणि चेंबरमध्ये 66 आणि सिनेटमध्ये 30 जागा मिळाल्या आहेत. 3) सिल्व्हिओ बर्लुस्कोनी यांच्या फोर्झा इटालिया पक्षाला 8% म्हणजे पूर्वीपेक्षा 6 % कमी मते आणि चेंबरमध्ये 45 आणि सिनेटमध्ये 18 जागा मिळाल्या आहेत. 4) मॅाडरेट पार्टीला 7 जागा मिळाल्या आहेत. अशा प्रकारे चेंबरमध्ये उजव्या आघाडीला 400 पैकी 237 जागा होतात, तर अन्य पक्षांना 163 जागा मिळताहेत. आणि सिनेटमध्ये याचप्रकारे उजव्या आघाडीला 200 पैकी जागा 115 तर अन्यांना 85 जागा मिळाल्या आहेत. डावे आणि तटस्थ 5) एरिन्को लेट्टा यांच्या डेमोक्रॅटिक पार्टीला 19% म्हणजे पूर्वीपेक्षा 0.3 % कमी मते आणि चेंबरमध्ये 69 आणि सिनेटमध्ये 40 जागा मिळाल्या आहेत. 6) फाइव्ह स्टार मूव्हमेंट.’ या पक्षाला (एम5एस) 15% म्हणजे पूर्वीपेक्षा17% कमी मते आणि चेंबरमध्ये 52 आणि सिनेटमध्ये 28 जागा मिळाल्या आहेत. 7) कार्लो कॅलेंडा यांच्या अॅक्शन इटालिया व्हिवा (थर्ड पोल) या नवीन पक्षाला 8% मते आणि चेंबरमध्ये 21 आणि सिनेटमध्ये 9 जागा मिळाल्या आहेत. 😎 इटालियन लेफ्ट/ ग्रीन पार्टीला 4% मते आहेत. याशिवाय अन्य पक्षांना उरलेल्या टक्केवारी इतकी मते तसेच जागा मिळाल्या आहेत. आश्चर्याची आणि लक्ष वेधून घेणारी बाब ही आहे की, दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच उजव्या विचारसरणीला मानणाऱ्या पक्षांची आघाडी इटलीत सत्तेवर येते आहे. या आघाडीत ब्रदर्स ॲाफ इटाली, लीग पार्टी आणि फोर्झा इटालिया हे पक्ष सामील होते. यांना मिळून 43% मते मिळाली आहेत. दुसरी आश्चर्याची आणि तेवढीच विशेष महत्वाची बाब हीही आहे की, ब्रदर्स ॲाफ इटलीची जेवढी मते वाढली आहेत, म्हणजे 4% ची 26% झाली आहेत, जवळ जवळ तेवढीच मते त्याच्या साथीदार पक्षाची कमी झाली आहेत. म्हणजे याचा अर्थ असा होतो की, आघाडीतील आपल्या मित्रपक्षांचीच मते ब्रदर्स ॲाफ इटली या पक्षाने आपल्याकडे वळविली आहेत. असा प्रकार एवढ्या मोठ्या प्रमाणावर जगात बहुदा प्रथमच घडत असावा.

No comments:

Post a Comment