Saturday, December 3, 2022

केला जरी पोत बळेची खाले तरूणआरत, मुंबई ४/१२/२०२२ ‘केला जरी पोत बळेची खाले’ वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? ‘केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी ते वरती उफाळे’. खरंतर अलंकार गटामध्ये येणार्‍या ‘अन्योक्ती’ अलंकाराचे उदाहरण मराठीचे सर आम्हाला समजावून सांगत होते. कशावरही बंदी घातली, की ती स्वीकारली जात नाही. रामदास स्वामींनी हे 16 व्या शतकातच सांगून ठेवलं आहे. पण आपण ते शिकायलाच तयार नाही. सरांनी काहीसं विषयांतर करीत म्हटलं! चीनमध्ये आज जे सुरू आहे, ते वाचलं आणि आज 2022 मध्ये एकदम 1944 या वर्षातला 48 वर्षांपूर्वीचा ‘तो’ मराठीचा तास आठवला. आजच्या चीनमध्ये संघटन आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अनेक अटी लादल्या आहेत. तसं पाहिलं तर माओ झेडाँग यांनी 1976 या वर्षी जगाचा निरोप घेतल्यानंतर, चीनमध्ये विरोध आणि असहमती ‘व्यक्त करण्याच्या घटना घडतच आहेत. 1959 मध्ये तिबेटमध्ये उठाव झाला होता. 1998 मध्ये तियानानमेन चौकातील आंदोलन तर पाशवी बळ वापरून चिरडण्यात आले होते. 1999 मध्ये फालून गाँग किंवा फालून डाफा ही सांस्कृतिक स्वरुपाची ध्यान/चिंतन (मेडिटेशन), व्यायाम योग, सत्यता (ट्रुथफुलनेस), अनुकंपा (कंपॅशन), सहिष्णुता ( फॅारबिअरन्स) यांचा पुरस्कार करणारी एक निरुपद्रवी सांस्कृतिक चळवळही काहीशा अशाच प्रकारे दडपली गेली होती. यात आता 2022 मध्ये कोविड -19 च्या विद्युतवेगी साथीला आवरण्यासाठी घातलेल्या टाळेबंदीच्या (लॅाकडाऊन) विरोधात सुरू असलेल्या ठिकठिकाच्या आंदोलनाविरुद्धची कारवाई समाविष्ट झालेली आढळते आहे. तियानानमेनचा धडा या पैकी तियानानमेनचे 1998 या वर्षीचे आंदोलन चीनने चिरडले होते खरे पण त्या आंदोलनाची झळ चिनी शासन, प्रशासन व्यवस्थेला कायमस्वरुपी स्मरणात राहील अशी ठरली आहे. 1980 च्या दशकात चीनमध्ये अनेक बदल व्हायला सुरवात झाली होती. शासन करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाने काही खासगी कंपन्यांना आणि परदेशी गुंतवणुकीला परवानगी द्यायला सुरुवात केली होती. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि राहणीमानाचा दर्जा सुधारेल अशी कम्युनिस्ट नेते डेंग श्याओपिंग यांची अपेक्षा होती. पण या बदलांसोबतच भ्रष्टाचारालाही सुरुवात झाली. हे सगळं घडत असतानाच होत असलेल्या बदलांचा स्वाभाविक परिणाम असा झाला की, राजकीय बाबींमध्येही पारदर्शकता असावी अशा अपेक्षा चिनी जनमानसात व्यक्त होऊ लागली. खुद्द कम्युनिस्ट पक्षातच दोन गट पडले होते. बदल वेगाने व्हायला हवेत असं एका गटाला वाटत होतं. तर कडक निर्बंध कायमच रहावेत, असं दुसऱ्या कट्टर गटाला वाटत होतं. या पार्श्वभूमीवर 1980 च्या दशकाच्या मध्यात जे आंदोलन सुरू झाले होते, त्यातले अनेक परदेशात राहून आले होते, यात विद्यार्थी मोठ्या संख्येत होते. या सर्वांनी चांगल्या राहणीमानाचा अनुभव घेतला होता. व्यक्तिगत स्वातंत्र्य काय असत, ते त्यांनी अनुभवलं होतं. 1989 मध्ये या आंदोलनांनी खूपच जोर धरला, अधिक राजकीय स्वातंत्र्य मिळावं अशी मागणी वाढू लागली. त्यानुसार लोकप्रिय हू याओबांग यांनी काही बदल घडवून आणलेही होते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळावं, सरकारची सेन्सॅारशिप कमी व्हावी, अशाही मागण्या आंदोलक करत होते. दोनच वर्षांपूर्वी हू यांना कम्युनिस्ट पक्षातल्या ज्येष्ठ पदावरून हटवण्यात आलं होतं, तेव्हापासूनच बदलाची प्रक्रिया एकदम ठप्प झाली होती आणि आंदोलकांमधला असंतोष वाढता चालला होता. पुढच्या काही आठवड्यांमध्ये बीजिंगमधल्या तियानानमेन चौकामध्ये आंदोलक जमत गेले. एका दिवशी तर या चौकात 10 लाख आंदोलक गोळा झाले होते, असे सांगतात. सुरुवातीला सरकारने आंदोलकांच्या विरुद्ध कोणतीही थेट पावलं उचलली नाहीत. या आंदोलनांना नेमकं कसं उत्तर द्यायचं याबद्दल कम्युनिस्ट पक्षात मतभेद होते. काहींना वाटत होतं की, आंदोलकांना काही प्रमाणात सूट देण्यात यावी तर कठोर पावलं उचलावीत असं इतर काहींना वाटत होतं. शेवटी कट्टर मतं असणाऱ्यांचं पारडं जड झालं आणि मे महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये बीजिंगमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले. 3 आणि 4 जूनला सैन्यानं तियानानमेन चौकाच्या दिशेनं कूच केलं. गोळीबार करत, आंदोलकांना चिरडत, अटक करत त्यांनी या परिसराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. 5 जूनच्या दिवशी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या रणगाड्यांच्या ताफ्यासमोर एक माणूस उभा ठाकला. त्याला टाळीत जरा बाजूला सरकत पुढे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या रणगाड्यांना तो पुन्हा पुन्हा समोर येऊन रोखत होता. या व्यक्तीला आज जग 'टँक मॅन' म्हणून ओळखतं. कुठूनतरी दोन माणसं अचानक आली आणि त्याला ओढून घेऊन गेली. त्याचं पुढे काय झालं, हे कळू शकलं नाही, कधी कळणारही नाही. तरीही हा या आंदोलनातील अविस्मरणीय बलिदान म्हणून हा प्रसंग ओळखला जातो. या आंदोलनात नक्की किती लोक मारले गेले, हे कोणालाच माहिती नाही! 200 नागरिक आणि 25 च्यावर सुरक्षा रक्षक मारले गेल्याचं चीन सरकारनं जाहीर केलं होतं. पण इतर काही अंदाज हजारो निदर्शक मारले गेल्याचे सांगतात. 2017 मध्ये ब्रिटनने काही कागदपत्रं सावर्जनिक केली. यामध्ये तेव्हा चीनमध्ये असणारे ब्रिटिश राजदूत सर अॅलन डॉनल्ड यांनी पाठवलेली एक तारही आहे. त्यात 10,000 लोक मारले गेल्याचं म्हटलंय. तियानानमेन चौकात जे काही घडलं त्याविषयी चीनमध्ये उघड चर्चा कधीच झाली नाही. दबक्या आवाजात होणारी चर्चा मात्र कधीच थांबली नाही. ज्या घटनेचा विसर पडावा म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न झाले, ती घटना अशा प्रकारे निदान अजूनतरी विस्मृतीत गेली नाही. या घटनेविषयी आजही सोशल मीडियावर नियमितपणे पोस्ट्स टाकल्या जात असतात आणि त्या लगेच त्याच गतीने काढूनही टाकल्या जात असतात. 34 वर्षांपूर्वीची ही गोष्ट! यावेळी चीनमध्ये सुरू झालेल्या जगातल्या बहुदा सर्वात मोठ्या निदर्शनांचं केंद्र होतं बीजिंगमधला तियानानमेन चौक. चीनमधल्या कम्युनिस्ट शासकांनी ही निदर्शनं अत्यंत क्रूरपणे चिरडली. नुकत्याच म्हणजे 16 ऑक्टोबर 2022 ते 22 ऑक्टोबर 2022 या काळात कम्युनिस्ट पार्टी ॲाफ चायनाच्या बेजिंग येथील याच कुप्रसिद्ध तियानानमेन चौकातील ‘दी ग्रेट हॅाल ॲाफ दी पीपल’ या मध्यवर्ती सभागृहात पार पडलेल्या पंवार्षिक संमेलनात जुनीच धोरणे अधिक नेटाने पुढे रेटण्याचा निर्णय घेतला गेला आहे, हे विशेष! तियानानमेन चौकातील आंदोलनाचे दोन परिणाम मात्र नक्की झाले आहेत. सुरवातीची दहशत कमी व्हायला लागलेला काळ वगळला तर चीनमध्ये आंदोलने व्हायला सुरवात झाली. याचा अर्थ असा होतो की, तेव्हापासून जनता वारंवार निषेध नोंदवू लागली आहे. दुसरा परिणाम असा झालेला दिसतो की, तियानानमेन आंदोलनाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी काळजी घ्यायला चिनी प्रशासनाने सुरवात केलेली आढळते. भ्रष्टाचार, जबरदस्तीचे निष्कासन (एव्हिक्शन), थकलेली वेतने, मानवीहक्कांचे हनन, प्रदूषण, धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील अवाजवी बंधने, एकपक्षशाही (वन पार्टी रूल) याबाबत प्रसंगविशेषी आंदोलने ही आता चीनमध्ये नवलाची बाब राहिलेली नाही. आजवरच्या अशा लहानमोठ्या आंदोलनांची संख्या लाखावर गेल्याचे सांगतात. पण तरीही यामुळे चिनी प्रशासनव्यवस्थेला धोका निर्माण झाला आहे, असे अभ्यासकांना वाटत नाही, याचीही नोंद घ्यायला हवी. पण आंदोलने हाताळतांना प्रशासन जपून आणि विचारपूर्वक पावले टाकायला ‘शिकले’ आहे, याबाबत मात्र निरीक्षकांमध्ये एकमत दिसू लागल्याचे दिसते आहे. आंदोलने ती आणि ही आंदोलने झाली आणि विरली याचे प्रमुख कारण असे सांगितले जाते की, ती तुरळक आणि तुटक स्वरुपात निरनिराळ्या ठिकाणी होत असत. त्यात परस्परसंबंध नसे. एकाचवेळी सर्वांनी केलेला योजनाबद्ध संघटित उठाव, असे त्यांचे स्वरूप कधीच नव्हते. आंदोलकांचे लक्ष्य तर अनेकदा स्थानिक पातळीपुरते मर्यादित असे. वास्तवीक संबंधित मुद्दा राष्ट्रपातळीवर न्यावा या स्वरुपाचा होता. व्यवस्थाबदलाशी संबंधित आंदोलनांची संख्याही कमी असायची. काही मुद्दे तर वादातीत होते, त्यामुळे पोलिसी खाक्या दाखविण्यास वावच नसायचा. अनेकदा पोलिस पाश्चात्य देशांतील पोलिसांप्रमाणे बघ्याची भूमिका घेत आणि संयमित बळाचा किंवा वाजवी बळाचा (रिझनेबल फोर्स) वापर करीत. स्थानिक अधिकारी वर्ग कितपत जबाबदारीने वागतो आहे, याची जाणीव या आंदोलनांच्या निमित्ताने वरिष्ठ स्तरावर घेतली जात असे. चीनची झिरो कोविड पॅालिसी पण हे असं बरंच बरं चालू असतांना कोविड-19 चा भस्मासूर चीनमध्ये जो थैमान घालू लागला तो पुरतेपणी कधीही शमला तर नाहीच उलट नव्यानं फोफावू लागला आहे. चीन मध्ये सुरू झालेला कोरोना व्हायरसचा प्रकोप काय वाटेल ते करून थोपवायचाच असा निर्णय घेऊन चिनी प्रशासनाने कठोर पावले उचलायला तशी अगोदरपासूनच सुरवात केली आहे. पण त्याला म्हणावे तसे यश कधीच आलेले नाही. आज तर चीनमधला करोनाचा कहर हा चीनपुरताच मर्यादित विषय राहिलेला नाही. तो पुन्हा जगभर पसरणार की काय अशी भीती वाटू लागली आहे. हे कमी होते म्हणूनच की काय, चीनमधली आर्थिक परिस्थितीही पार बिघडली आहे. त्यामुळेही सध्या उद्रेक उद्भवला असू शकेल, असे एक मत आहे. चिनी जनता स्वातंत्र्यासाठी उठाव करण्यासाठी तर लॅाकडाऊन आणि आर्थिक अडचणींचे निमित्त करीत नाहीना, असाही संशय व्यक्त केला जातो आहे. या शंका ताबडतोब दूर होणाऱ्या नाहीत. कोरोनावर लॅाकडाऊनची मात्रा कितपत योग्य? आज चीनमध्ये अतिशय अस्वस्थता आहे. लॅाकडाऊनची बंधने झुगारून हजारो नव्हे लाखो नागरिक रस्त्यावर उतरून नव्या टाळेबंदीचा निषेध करीत आहेत. विद्यापीठे ओस पडली असून लाखो मुलेमुली न वर्गात थांबायला तयार आहेत न वसतिगृहांच्या खोल्यात स्वत:ला कोंबून घ्यायला तयार आहेत. जागोजागी करोनानियंत्रक आणि सामान्य नागरिक यांच्यात केवळ खटकेच नाहीत तर चकमकीही उडत आहेत. वयाचा मान न राखता ज्येष्ठ नागरिकांवरही छड्यांची बरसात होते आहे. पांढऱ्या कपड्यांतील करोना नियंत्रकांची ही कृष्णकृत्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर बघितली जात आहेत. असा जनउद्रेक वाढला तरी पूर्वीची रणगाडावापराची मात्रा न वापरण्याचा धडा चिनी प्रशासनाने घेतला असल्यामुळे आता काय करावे ते प्रशासनाला सुचेनासे झाले आहे. सध्या रात्री रस्त्यावर बीजिंगमध्ये लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहेत. मात्र, आंदोलन चिरडण्यासाठी 34 वर्षांपूर्वीचा रणगाडे वापरण्याचा हुकमी उपाय आज वापरणे परवडणारे नाही, हा धडा आजतरी कायम दिसतो आहे. यासाठीचे आणखी एक प्रतिरोधन (डिटेरंट) हेही आहे की हा उद्रेक बीजिंगपुरता सीमित नाही. असंतोषाचा वणवा देशभर पसरतो आहे, नव्हे पसरला आहे, नव्हे त्याला संघटित जनआंदोलनाचे स्वरूप येत चालले आहे. याला आवरायला पूर्वीप्रमाणे रणगाडे किंवा स्वयंचलित रायफली किंवा अगदी अण्वस्त्रे सुद्धा पुरी पडणार नाहीत, हे चिनी प्रशासन जाणून आहे. ‘करोनाचा सामना करायचा हे ठीक पण म्हणून सर्व जनतेला घरात डांबून ठेवायचे, कामगारांना कारखान्यातच मुक्काम करण्याची सक्ती करणे, हा कुठला उपाय?’, असा परखड सवाल अख्खा चीन प्रशासनाला विचारतो आहे. जोडीला लसीकरण वारंवार का फसते आहे, आर्थिक स्थिती एकदम एवढी बिकट का झाली, असेही प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. कोरोनाचा कहर आणि त्यात अंतर्गत असंतोष निदर्शक विद्यार्थ्यांना पकडण्यासाठी सशस्त्र पोलिसांना प्राध्यापकांनी प्रतिबंध केल्याची उदाहरणे समोर येत आहेत. आता चौकाचौकांमध्ये जमणारे हजारो निदर्शक शी जिनपिंग यांच्या निषेधाच्या, त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणा उघडपणे देत आहेत. ‘नको आम्हाला हुकुमशाही, आम्हाला हवी लोकशाही’, अशा घोषणा नागरिक देत आहेत. शी जिनपिंग यांचा आजीवन अध्यक्ष राहण्याचा निर्णय पक्षातील अनेकांना मान्य नव्हता, अशी वृत्ते पूर्वीपासूनच कानावर येत होती. आतातर जनतेला सुद्धा ते मान्य नाही, हे उघड झाले आहे. पण पोलादी चौकटी केवळ शांततामय मार्गांनी नष्ट झाल्याची उदाहरणे इतिहासात आढळत नाहीत. चिनी प्रशासनाने एकेक पाऊल मागे टाकीत काही नियम शिथिल केले आहेत. चीनमध्ये काय होणार हा जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा नक्कीच आहे. पण तो आजतरी जगासाठी तातडीचा मुद्दा नाही. जगाला भेडसावणारी चिंता वेगळीच आहे. ती म्हणजे चीनमध्ये फोफावणारा कोरोना पुन्हा जगभर पसरला तर काय? दुसरे असे की, अंतर्गत असंतोषावर दुसऱ्या देशाशी भांडण उकरून काढणे हाही एक उपाय कूटनीतीत सांगितला जातो. या दृष्टीने कुणी कुणी सावध रहायला हवे, हे सांगायला हवे का?

No comments:

Post a Comment