Monday, December 19, 2022

 चीनची फसलेली महाउड्डाणे 

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २०/१२/२०२२ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

  

चीनची फसलेली महाउड्डाणे 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   कोविडचा प्रादुर्भाव काहीकेल्या कमी होत नाही, हे पाहून चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी टोकाची पावले उचलली आहेत. कोविडची जेव्हा सुरवात होती, त्याचा प्रसार कसा होतो, त्याच्यावरचा प्रभावी उपाय कोणता, हेही नीट माहीत नव्हते, तेव्हा, लॅाकडाऊनला पर्यायच नव्हता. आज मुखाच्छादन, घरात खेळती हवा, गर्दी टाळणे किंवा पुरेसे अंतर राखून चालणे यासारखे उपाय आणि लस टोचून घेणे ही माहिती उपलब्ध असतांना एखाद्या वस्तीत एक जरी रुग्ण आढळला तरी तिथल्या सर्व व्यक्तींना दिवसचे दिवस बाहेर पडण्यास मज्जाव करणे यासारखे उपाय सहन होण्यासारखे नसणार हे उघड आहै. चीनमध्ये तयार झालेली लस परिणामकारकतेत उणी पडली अशा वार्ता/अफवा बाहेर ऐकू येत आहेत, ते वेगळेच. आज चीन सोडला तर अन्य देशात काही खबरदाऱ्यांसह मुक्त व्यवहार सुरू झाले आहेत. मग आपल्याच देशात कडक लॅाकडाऊन आणि बंधने का, असा प्रश्न चीनमध्ये देशभर विचारला जातो आहे. या प्रश्नाचे समाधानकारक  उत्तर मिळत नसल्यामुळे चिनी जनता अक्षरशहा पेटून उठली आहे. लोकक्षोभ शांत होत नाही, हे पाहून चिनी सरकारने काहीशी नरमाईची भूमिका घ्यायला सुरवात केली आहे, पण तिचाही फारसा उपयोग होताना दिसत नाही. लोकक्षोभ कायमच आहे.

   आज चीनमध्ये अशी अतिशय अस्वस्थता आहे. लॅाकडाऊनची बंधने झुगारून देशभरातील हजारो नव्हे लाखो नागरिक रस्त्यावर उतरून नव्या टाळेबंदीचा निषेध करीत आहेत. विद्यापीठे ओस पडली असून  लाखो मुलेमुली  न वर्गात थांबायला तयार आहेत न  वसतिगृहांच्या खोल्यात स्वत:ला कोंबून घ्यायला तयार आहेत. जागोजागी करोनानियंत्रक आणि सामान्य नागरिक यांच्यात केवळ खटकेच नाहीत तर चकमकीही उडत आहेत. वयाचा मान न राखता  ज्येष्ठ नागरिकांवरही छड्यांची बरसात होते आहे. पांढऱ्या कपड्यांतील करोनानियंत्रकांची ही कृष्णकृत्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभर बघितली जात आहेत. असा जनउद्रेक प्रचंड वाढला तरी पूर्वीची रणगाडावापराची मात्रा न योजण्याचा धडा चिनी प्रशासनाने घेतला असल्यामुळे आता काय करावे ते प्रशासनाला सुचेनासे झाले आहे. सध्या रात्री रस्त्यावर बिजिंगमध्ये लष्कराच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहेत. मात्र, आंदोलन चिरडण्यासाठी 34 वर्षांपूर्वीचा तियानानमेन चौकामधला रणगाडे वापरण्याचा हुकमी उपाय आज वापरणे परवडणार नाही, हा धडा सध्यातरी कायम दिसतो आहे. यासाठीचे आणखी एक  प्रतिरोधन (डिटेरंट) हेही आहे की हा उद्रेक बिजिंगपुरता सीमित नाही. असंतोषाचा वणवा देशभर पसरतो आहे, नव्हे पसरला आहे, नव्हे त्याला संघटित जनआंदोलनाचे स्वरूप येत चालले आहे. याला आवरायला पूर्वीप्रमाणे रणगाडे किंवा स्वयंचलित रायफली किंवा  अगदी अण्वस्त्रे सुद्धा पुरी पडणार नाहीत, हे चिनी प्रशासन जाणून आहे. ‘करोनाचा सामना करायचा हे ठीक पण म्हणून सर्व जनतेला घरात डांबून ठेवायचे, कामगारांना कारखान्यातच मुक्काम करण्याची सक्ती करायची, हा कुठला उपाय?’, असा परखड सवाल अख्खा चीन प्रशासनाला विचारतो आहे. जोडीला लसीकरण वारंवार का फसते आहे, आर्थिक स्थिती एकदम एवढी बिकट का झाली, महागाईआणि बेकारी का वाढते आहे, औद्योगिक उत्पादन का कमी होते आहे, असेही प्रश्न विचारले जाऊ लागले आहेत. हा असंतोष नाही, तर धुमसता ज्वालामुखी आहे.

   टोकाची पावले उचलणारा चीन 

   कडक आणि टोकाचे उपाय योजण्यासाठी चीन कुप्रसिद्धच आहे. पुरतेपणी विचार न करता योजलेले उपाय आज अंगलट येत आहेत. लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी जोडप्यागणिक एक मूल या उपायाची कथा तर मुद्दाम सांगावी अशी आहे. या धोरणामुळे चीनमध्ये स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण एकदम वाढले. कारण आपल्याला निदान एकतरी पुत्र असावा अशी प्रत्येक जोडप्याची इच्छा असायची. अशावेळी मुलगी झाल्यास ते जोडपे काय करीत असेल, हे सांगायलाच हवे काय? पण या आणि अशा धोरणांचा परिणाम म्हणून देशात बाल आणि तरुणांचे प्रमाण कमी झाले आणि वृद्धांचे प्रमाण वाढले. यावर उपाय म्हणून अधिक मुलांना जन्माला घाला असा फतवावजा बदल शासकीय धोरणात करण्यात आला. पण अपत्यसंभवाशिवाय सुखोपभोगाची चटक जनमानसाला अशी काही लागली होती की जनतेत हा विचार काहीकेल्या रुजेना. लोकसंख्येचा समतोल तर  बिघडला आणि समाजमनात केवळ उपभोग ही भावना दृढ झाली, ती काहीकेल्या बदलेना. असाच एक भयंकर प्रयोग चीनमध्ये कीड आणि तत्सम अन्य जीवजंतू कायमचे नष्ट करण्यासाठी केला गेला होता, त्याची आठवण झाल्याशिवाय रहात नाही.

   1958 ते 1962 चा कालखंड

 चीनचे सर्वेसर्वा माओ झे डॅांग यांच्या मनाने घेतले की, एक महाउड्डाण घेतल्याशिवाय (ए ग्रेट लीप फॅार्वर्ड) चीनची आर्थिक आणि सामाजिक उन्नती होणार नाही. यासाठी चार प्रकारच्या किडी नष्टच केल्या पाहिजेत. त्याशिवाय चिनी समाजाचे कल्याण होणार नाही. ही मोहीम ‘चिमण्या महा मोहीम’  (दी ग्रेट स्पॅरो कॅंपेन) या घोषवाक्याने ओळखली जाते. एक चिमणी वर्षभरात 2 किलो धान्य खात असते. अशाप्रकारे चिमण्या पिके फस्त करतात, तर हव्यातच कशाला चिमण्या? उंदरांमुळे प्लेग होतो ना? मग नष्ट करूया की उंदीर! डासांमुळे जर मलेरिया होत असेल, तर ठेवायचेच कशाला हे गुणगुण करीत मागे भुणभुण लावणारे डास? माशांमुळे जर कॅालरा आणि टायफॅाईड  होत असेल तर करूया की वार त्या माशांवर! माओ सारख्या महान योध्याच्या आणि आधुनिक चीनच्या जन्मदात्याच्या मनात हा विचार पक्का होताच चीनमधल्या डासांची, माशांची, उंदरांची आणि चिमण्यांची शंभर वर्षे भरलीच की! देशभर फलक  लागले. कीटक मारण्याची निरनिराळी यंत्रे/तंत्रे विकसित झाली, यांना घाबरवण्यासाठी ढोल ताशे पिटले जाऊ लागले, उंदीर मारायच्या चिमुकल्या बंदुका तयार करणारे कारखाने उभे राहिले, माशा मारण्यासाठी तरवारी तयार करण्याचे मात्र कुणाला सुचले नाही, हे मात्र माशांचे आणि मानवांचे नशीब! चिनी सैनिकांसमोर चिमण्यांचा का निभाव लागणार होता? चिमण्यांची घरटी हा हा म्हणता नष्ट झाली, घरट्यातली अंडी फोडून टाकण्यात आली, आपल्यासाठी आई अन्न घेऊन येणार या विश्वासाने अन्नाची वाट पाहत सारखी चोच उघडत चिवचिव करणारी चिमण्यांची पिले चिरडली गेली. भेदरलेल्या चिमण्या जीव वाचवण्यासाठी आकाशात उडत राहत आणि शेवटी थकून  उरी फुटत आणि त्यांची कलेवरे जमिनीवर जमिनीवर टपटप पडत. ‘चीनने चिमण्या चेचल्या’ असा पराक्रम इतिहासात नोंदवला गेला. या सर्वांच्या कलेवरांचे वजन हजारो टन भरले असते. काहींनी तर जिवागणिक वजने किती, म्हणजे मारलेल्या एकूण चिमण्यांचे वजन किती, माशांचे किती, डासांचे किती, उंदरांचे किती अशी तपशीलवार   नोंद केली होती. हे तपशीलही उपलब्ध आहेत. मोहिमेला अभूतपूर्व यश मिळाले होते. पण  एक जीवशृंखला तुटली. चिमुकली चिमणी इकोसीस्टिमचा एक अविभाज्य घटक होती/आहे. निसर्गात एक समतोल साधलेला असतो. चिमण्या फक्त धान्यच खातात असे नसते, तर त्या पिकांचे किडीपासून रक्षणही करतात. त्या जसे कणसातले दाणे खातात तसेच त्या कणसातील दाण्यांचा फडशा पाडणाऱ्या टोळ आणि अन्य किडीलाही फस्त करतात. असो. चिमण्या गेल्या आणि टोळांचे फावले. चीनभर टोळधाडी पडल्या. त्यांनी चीनमधले संपूर्ण पीक फस्त केले. चीनमध्ये अभूतपूर्व दुष्काळ पडला आणि मोजून लक्षावधी (36 मिलियन?) लोक उपासमारीने मेले. चूक चीनच्या लक्षात आली आणि मग  एकेकाळी पारध केलेल्या चिमण्यांसारखे जीव शोधून शोधून चीनमध्ये आणावे लागले.

  जेणो काम तेणो थाय !

   माओ एक युगपुरुष होता, आधुनिक चीनचा जन्मदाता हे या महापुरुषाचे स्थान अढळ आहे. पण इकोसिस्टिमची जपणूक हा या महापुरुषाचा विषय नव्हता. हा या विषयाच्या तज्ञांचा विषय होता. तो तज्ञांच्या सल्ल्यानुसारच हाताळायला हवा होता. तसे झाले नाही. आज शी जिनपिंग यांची आकांक्षाही प्रति माओ होण्याची आहे. तिसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होऊन त्यांनी या दिशेने दमदार पाऊलही टाकले आहे. पण कोविडची हाताळणी 1958 सालच्या फसलेल्या महाउड्डाणाची आठवण करून देते आहे. जी चूक माओ यांनी केली तशीच चूक शी जिनपिंग हेही करीत आहेत. 

    लोकक्षोभावर सीमावादाचा तोडगा?

   आता चौकाचौकांमध्ये जमणारे हजारो निदर्शक शी जिनपिंग यांच्या निषेधाच्या, त्यांच्या राजीनाम्यासाठीच्या  घोषणा उघडपणे देत आहेत. ‘नको आम्हाला हुकुमशाही, आम्हाला हवी लोकशाही’, अशा घोषणा नागरिक देत आहेत. चिनी प्रशासनाने एकेक पाऊल मागे टाकीत काही नियम शिथिल केले आहेत. चीनमध्ये काय होणार हा जगाच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा नक्कीच आहे. पण तो आजतरी जगासाठी  तातडीचा मुद्दा नाही. जगाला भेडसावणारी चिंता वेगळीच आहे. ती म्हणजे चीनमध्ये फोफावणारा करोना पुन्हा जगभर पसरला तर काय? दुसरीही एक चिंता आहे. सर्व हुकुमशाही राजवटीत असा जनक्षोभ शमवण्यासाठी एक हमखास उपाय योजला जात असतो. अंतर्गत असंतोष शमवण्यासाठी दुसऱ्या देशाशी भांडण उकरून काढणे हा तो रामबाण उपाय आहे, असे  कूटनीतीत सांगितले आहे. अशाप्रकारे जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवता येते. भारतातील अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात चिनी सैनिकांशी झालेल्या चकमकीत चीनचेच जवान जास्त संख्येत जखमी झाले आहेत, हे खरे असले तरी ही घटना चिनी जनतेचे लक्ष कोविड हाताळणीच्या प्रश्नावरून सीमावादाकडे वळविण्यासाठी तर नाहीना? चकमकीची ही घटना चीनच्या कुटिल नीतीचाच एक भागही असू शकतो, ही शंका अनाठायी तर नक्कीच नाही. 


No comments:

Post a Comment