Saturday, March 11, 2023

 ईशान्य भारतातील निवडणुका2023 

मेघालय 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

    मेघालय हे सुमारे 23 हजार चौकिमी क्षेत्रफळ असलेले  भारताच्या ईशान्य भागातील राज्य असून त्याच्या उत्तर व पूर्वेला आसाम राज्य तर पश्चिम व दक्षिण दिशेला बांगलादेश आहे. 1972 साली मेघालय राज्य आसामपासून वेगळे केले गेले. मेघालयाची राजधानी शिलॅांग असून मेघालयात  21 लक्ष मतदार असून ते खासी, प्नार, गारो आणि इंग्रजी यापैकी एक किंवा अनेक भाषा बोलता. मेघालयात विधानसभेच्या 60 जागा आहेत. सद्ध्या 18 जागा रिकाम्या आहेत. 

   नॅशनल पीपल्स पार्टीचा (एनपीपी) प्रभाव फक्त मेघालय आणि थोडासा आसपासच असला असला तरी ती अखिल भारतीय पार्टी आहे. लोकसभेचे माजी अध्यक्ष पी ए संगमा यांची नॅशनल काँग्रेस पार्टीतून (एनसीपी-राष्ट्रवादी)हकालपट्टी झाल्यानंतर त्यांनी या पक्षाची स्थापना केली. 

    2023 ची विधानसभेची निवडणूक जाहीर होताच  मेघालय विकास आघाडी तोडून भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि नॅशनल पीपल्स पार्टी  (एनपीपी) वेगळे होऊन निवडणूक लढले. आसाम आणि मेघालय यात 12 भूभागांचे बाबतीत सीमावाद असून यांचे एकूण क्षेत्रफळ  2,700 चौकिमी आहे. प्रत्यक्ष सीमा सुमारे 900 किमी आहे. या वादाचा परिणाम निवडणुकीवर होऊ नये म्हणून हे दोन पक्ष ठरवून वेगळे होऊन निवडणूक लढले आणि निवडणूक संपताच पुन्हा एकत्र आले, असे मानले जाते. मेघालय विधानसभा निवडणुकीमध्ये विद्यमान मुख्यमंत्री कॉनराड संगमा यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) हा पक्ष 26 जागी विजयी होऊन सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. मात्र, बहुमताचा 31 चा आकडा गाठण्यात त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे भाजप (2जागा) आणि एनपीपी हे दोन्ही पुन्हा एकत्र येत आहेत. पण तरीही ही बेरीज 28 इतकीच होते. पण आणखी काही अपक्षांना सोबत घेऊन कॉनराड संगमा पुन्हा मुख्यमंत्री होणार आहेत, याबद्दल कुणाच्याही मनात शंका नाही.

   2018 च्या निवडणुकीत  मेघालयामध्ये काँग्रेसला 21 जागा मिळाल्या  होत्या. 2023 मध्ये मात्र फक्त पाचच जागा कॅांग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत. हा कॅांग्रेससाठी मोठा पराभव मानला जातो. लोकसभेचे माजी अध्यक्ष पी. ए. संगमा यांनी नॅशनल पीपल्स पार्टीची स्थापना केली खरी पण तिला नावारूपाला आणले ते  त्यांचे पुत्र  कॉनराड यांनी. त्यांच्याकडे नेतृत्व असलेल्या 'एनपीपी'ने यावेळी आपले वर्चस्व निर्माण केले. काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एनपीपी आणि  भाजप या पक्षांनी 'मेघालय विकास आघाडी'ची स्थापना केली होती. मात्र 2023 च्या  निवडणुकीपूर्वी या तिन्ही पक्षांनी ठरवून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री कॉनराड संगमा दक्षिण तुरा मतदारसंघातून निवडून आले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विन्सेंट पाला यांचा सून सुतंगा साईसंग मतदारसंघात दारूण पराभव झाला,   पी. ए. संगमा यांच्या निधनानंतर कॉनराड यांच्याकडे नेतृत्व येताच त्यांनी राज्यातील राजकीय पोकळी भरून काढली. कॉनराड संगमा 2008 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले आणि सुरुवातीलाच  अर्थमंत्रिपदाची जबाबदारी त्यांच्याकडे आली तर 2009 ते 2013 या काळात विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी त्यांच्याकडे होती. गेल्या निवडणुकीत 19  जागांसह 'एनपीपी' दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष  ठरला आणि ईशान्येतील 'एनपीपी'च्या प्रभावाला सुरुवात झाली. आसाममध्ये भाजप सत्तेवर असून, मेघालयात या दोघांची आघाडी सत्तेवर होती. या दोन राज्यातील सीमावादाचा फटका बसू नये, यासाठी कॉनराड यांनीच त्यांच्याबरोबरील संबंध तोडण्यास भाजपला प्रवृत्त केले असे सांगतात. निकाल जाहीर होताच संगमा यांनी अमित शहा यांना फोन करून त्यांच्याशी संवाद साधला. नवीन सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्याकडून आशीर्वाद आणि पाठिंबा मागितला, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांनी म्हटले आहे. यावरून हे ठरवून झालेले वेगळेपण होते, हे  स्पष्ट होण्यास मदत होईल. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही 'एनपीपी'ला पाठिंबा देण्याच्या सूचना मेघालयातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

   मेघालयातील 2023 मधील पक्षनिहाय संख्या अशी आहे. 

एकूण जागा 60, त्यापैकी नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) 26, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी  (यूडीपी) 11, काँग्रेस 5,  तृणमूल काँग्रेसही  5, व्हॉइस ऑफ पीपल पक्ष (व्हिपीपी) 4, भाजप पूर्वीप्रमाणे 2, एचएसपीडीपी 2, पीडीएफ 2, अपक्ष 2, (उमेदवाराच्या निधनामुळे एका जागेवरील निवडणूक लांबणीवर पडली आहे.)

मेघालयात बरेच राजकीय पक्ष आहेत. त्यांना 2018 आणि 2023 मध्ये मिळालेल्या जगांचा तुलनात्मक हिशोब असा आहे.  

1) नॅशनल पीपल्स पार्टी(एनपीपी) कॅानरॅड संगमा हे या पक्षाचे नेते आहेत. 2018 च्या निवडणुकीत 20.60% मते  आणि 20 जागा मिळाल्या होत्या.

2023 च्या निवडणुकीत 31.42% मते  आणि 26 जागा मिळाल्या. या पक्षाने 57 जागा लढवल्या आणि  6 जागा पूर्वीपेक्षा  जास्त मिळवल्या.

2) युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी(युडीपी) मेतबाह लिंगडोह हे या पक्षाचे नेते आहेत. 2018 च्या निवडणुकीत 11.61% मते  आणि 6 जागा मिळाल्या होत्या. 2023 च्या निवडणुकीत 13.56% मते  आणि 11 जागा मिळवल्या. या पक्षाने 46 जागा लढवल्या आणि  5 जागा पूर्वीपेक्षा जास्त मिळवल्या.

3)  ऑल इंडिया तृणमूल कॅांग्रेस (एआयटीसी) मुकुल संगमा हे या पक्षाचे नेते आहेत. 2018 च्या निवडणुकीत 0.35% मते  आणि 0 जागा मिळाल्या होत्या. या पक्षाने 2023  च्या निवडणुकीत 13.79 % मते  आणि 5 जागा मिळवल्या. युडीपीने 56 जागा लढवल्या आणि 5 जागा पूर्वीपेक्षा जास्त मिळवल्या. 

4) इंडियन नॅशनल कॅांग्रेस (आयएनसी) व्हिनसेंट पाला रिकी ए जे सिंगकोन हे या पक्षाचे नेते आहेत. 2018 च्या निवडणुकीत 28.50 % मते  आणि 21 जागा मिळाल्या होत्या. या पक्षाला 2023  च्या निवडणुकीत 13.17 % मते  आणि 5 जागा मिळाल्या. कॅांग्रेसने 60 जागा लढवल्या या पक्षाला16 जागांचा तोटा झाला.

5) व्हॉइस ऑफ दी पीपल पार्टी (व्हिपीपी) रिकी ए जे सिंगकोन हे या पक्षाचे नेते आहेत. 2018 ची निवडणूक  लढले नव्हते. 2023  च्या निवडणुकीत किती मते मिळाली ते बाहेर यायचे आहे पण या पक्षाने 4 जागा मिळवल्या. हा पक्ष 18 जागी लढला आणि  4 जागा पूर्वीपेक्षा (शून्यापेक्षा) जास्त मिळवल्या. 

6) भारतीय जनता पक्ष (भाजप) अर्नेस्ट मावरी हे या पक्षाचे नेते आहेत.

2018 च्या निवडणुकीत 9.6% मते  आणि 2 जागा मिळाल्या होत्या.

2023  च्या निवडणुकीत 9.30 % मते  आणि 2 जागा मिळवल्या.भाजपने सर्व म्हणजे 60 जागा लढवल्या पूर्वीइतक्या म्हणजे   दोनच जागा मिळाल्या 

7)अन्य पक्षांनी मिळविलेल्या जागा अशा आहेत. 

2018 मध्ये अपक्ष 3, पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीएफ) 4, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (एचएसपीडीपी) 2, राष्ट्रवादी कॅांग्रेस 1,   खून हायनिट्रेप नॅशनल अवेकनिंग मूव्हमेंट (केएचएनएएम) 1

2023 मध्ये अन्य पक्षांनी मिळविलेल्या जागा अशा आहेत. अपक्ष 2, पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (पीडीएफ) 2, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक फ्रंट (एचएसपीडीपी) 2, (एका जागेवर निवडणूक लांबणीवर पडली आहे)

2023 मध्ये मेघालय विकास आघाडी विषयी  नाराजी (अॅंटिइन्कम्बन्सी)  खूप प्रमाणात होती. तरीही आघाडीला यश कसेकाय मिळाले हा एक अभ्यासाचा विषय आहे. मेघालयात खासी, जंठिया आणि गारो या तीन प्रमुख जमाती आहेत. खासा-जंठिया बहुल भागात 36 जागा आहेत, तर गारो टेकड्यात कमी म्हणजे 24 जागा आहेत. यांचे वांशिक वारसे भिन्न आहेत. गारोंना आपला मुख्यमंत्री हवा असतो म्हणून त्यांनी 18 जागी एनपीपीला  नाराजी (अॅंटिइन्कम्बन्सी)  कडे दुर्लक्ष करीत विजय मिळवून दिला. उरलेल्या 8 जागा उरलेल्या भागातून मिळविणे एनपीपीला सहज शक्य होते. निवडणुकीनंतर 26 जागा मिळाल्यानंतर एनपीपीला खासा-जंठिया बहुल भागातून 11 जागा मिळविणाऱ्या युडीपीशी   युती करण्यात काहीच अडचण नव्हती. पण युडीपीचे नेते यांना स्वत:ला मुख्यमंत्री व्हायचे आहे। हा प्रश्न कसा सुटणार?  मात्र भाजपचे दोन उमेदवार मात्र कॅानराड यांच्या साथीला आहेत. हे आता 28 होतात. आता उरले दोन. ते जर कॅाराड मिळवू शकले तर युडीपीची ‘बार्गेनिंग पॅावर’ एकदम कमी होईल. युडीपीची दुसरी मागणी ही आहे की, भारत सरकारने खासी आणि गारो भाषांचा 8 व्या परिशिष्टात (स्केड्यूलमध्ये) समावेश करावा.अडचण ही आहे की ही मागणी पूर्ण केल्यास अशा इतर भाषांचाही विचार करावा लागेल. व्हिपीपी सुद्धा आपल्या चार सदस्यांसह कॅाराड संगमा यांच्या साह्याला येऊ शकेल. काहीही झाले तरी कॅानराड तृणमूलचा पाठिंबा मागणार नाहीत. कारण त्यांचा नेता माजी मुख्यमंत्री असून तोही एक संगमाच आहे.  कॅानराड संगमा सर्व समर्थकांसह राज्यपालांची भेट घेणार आहेत

   मेघालयाचे माजी मुख्यमंत्री कॅांग्रेसचे मुकुल संगमा यांनी तृणमूल कॅांग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ते दोन ठिकाणून उबे होते. थ्यांना एका जागी पराभव तर दुसऱ्या जागी यश मिळाले. त्यांची कन्या मीयानी डी शिर निवडून आली तर पत्नी दिकांची डी शिरा यांनी मात्र आपटी खाल्ली. त्यामुळे विधानसभेत बापलेकच असतील.या तीन आणि उरलेल्या दोन जागी अन्य उमेदवार निवडून आले. असा तृणमूलचा पाच जागांचा हिशोब लागतो. तृणमूल कॅांग्रेसने भाजपचा छुपा साथीदार असा आरोप एनपीपीवर ठेवला आणि कडक आणि कडवा प्रचार केला. लोकसभेतही एनपीपीवर तृणमूलने भ्रष्टाचाराचा आरोप करून धमाल उडवून दिली होती. हे सर्व करूनही तृणमूलच्या हाती फक्त 5 जागाच लागल्या. आज तृणमूलला मेघालयात काहीही स्थान उरलेले नाही, असे पोलपंडितांचे मत आहे. तर काही तृणमूलला चंचूप्रवेशाचे श्रेय देतात.

  गारो जमात पीएन संगमा यांना आपला उद्धारकर्ता मानीत असे. त्यांच्या पुत्रावरही गारो जमातीच्या लोकांचा तसाच लोभ आहे.  लोककल्याणाच्या अनेक योजना कॅानराड यांनी हाती घेतल्या होत्या. त्यामुळे तरूणवर्ग त्यांच्यावर खूश होता. निवडणूकपूर्व आघाडी केली असती तर ? निकाल असाच लागला असता का? हे प्रश्न आता अभ्यासापुरते (ॲकॅडेमिक) मानले पाहिजेत. 



 



No comments:

Post a Comment