Saturday, March 11, 2023

    

निवडणूक निकाल ईशान्य भारत 2023

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 



नागालॅंड  हे ईशान्य भारतातील एक राज्य आहे. या राज्याच्या पश्चिमेला आसाम, उत्तरेला अरुणाचल प्रदेश व आसामचा काही भाग, तर पूर्वेकडे म्यानमार हा देश आणि दक्षिणेला मणिपूर राज्य आहे. हे राज्य सृष्टिसौंदर्याने व विविध लोकसंस्कृतींनी नटले आहे. नागालॅंड राज्याचे क्षेत्रफळ 16,579  चौ.किमी असून लोकसंख्या 19,80,602 एवढी आहे. कोहिमा ही नागालॅंडची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. ॲंगमी व चॅंग ह्या येथील प्रमुख भाषा आहेत. शेती, हातमाग व विणकाम हे नागालॅंडमधील प्रमुख उद्योग आहेत. तांदूळ, डाळ, ऊस व कापूस ही येथील प्रमुख पिके आहेत. या राज्याची साक्षरता 80%  टक्के पेक्षा जास्त  आहे. या भागात शांतता आणि सुव्यवस्थाविषयक अनेक प्रश्न निर्माण झाले असून बंडखोरीचेही प्राबल्य या भागात दिसते आहे. या समस्या दूर होण्याचे दृष्टीने सुरू असलेले प्रश्न या निवडणुकीनंतर अधिक वेगाने मार्गी लागतील, असे मत 2023 च्या निकालानंतर निरीक्षकानी नोंदविले आहे. हे ख्रिश्चनबहुल राज्य असूनही आणि भाजपवर ख्रिश्चन आणि अल्पसंख्यांक विरोधी असल्याचा आरोप होत असूनही या राज्यातील प्रमुख राजकीय पक्षाने भाजपवर विश्वास ठेवीत युती केली आहे.

नागालँडमध्ये 60 वर्षांनंतर महिला विजयी झाल्या आहेत. 1963 ला नागालँडला राज्याचा दर्जा मिळाला तेव्हापासून येथे एकदाही महिला आमदार म्हणून निवडून आली नाही. तब्बल 60 वर्षानंतर पहिल्यांदा एनडीपीपीच्या हेकानी जाखलू व सलहूत क्रुसे या विजयी झाल्या. जखालू यांनी दिमापूर-3 या विधानसभा मतदारसंघात लोकजनशक्ती पक्षाच्या अजेतो जिमोमी यांचा 1,536 मतांनी पराभव केला. क्रुसे यांनी पश्चिम अंगामी मतदारसंघात अपक्ष उमेदवार केनेजाखो नखरो यांचा केवळ 12 मतांनी पराभव केला.

  भारतीय जनता पक्ष व नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी) यांच्या युतीने नागालॅंडमध्ये बहुमत मिळवून दुसऱ्यांदा सत्तेचा सोपान सर केला. या युतीने 60 पैकी 37  जागा जिंकल्या. भाजपने 12 तर एनडीपीपी 25 वर विजय मिळविला. एनडीपीपीसीने 40 तर भाजपने 20 जागांवर उमेदवार उभे केले होते. भाजपमध्ये केवळ 20 जागाच वाट्याला आल्या म्हणून सुरवातीला स्थानिक पातळीवर  नाराजी होती. पण भाजपचा स्ट्राईक रेट 60% तर एनडीपीपीचा स्ट्राईक रेट 62.5% इतका आहे, ही बाब हानिर्णय बरोबर होता, हे दर्शविते. 

  2018च्या निवडणुकीत एनडीपीपी युतीला 29 जागा मिळाल्या होत्या. मागील निवडणुकीत एकहाती 27 जागा जिंकणाऱ्या नागा पीपल्स फ्रंटला या निवडणुकीत (2) दोनच जागांवर समाधान मानावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 7 जागांसह नागालँडमध्ये आपले खाते उघडले, सर्वाधिक जागा जिंकणारा हा तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला. नॅशनल या पीपल्स पार्टीला (एनपीएफ) 5 जागा  मिळाल्या. विशेष म्हणजे रिपब्लिकन पार्टी  ऑफ इंडियाने (आठवले गट) (2) दोन जागा ला जिंकल्या. हा विजयही लक्षवेधी ठरला. लोकजनशक्ती पक्ष (रामविलास पासवान) 2 जागांवर, तर संयुक्त जनता दल (1) एका जागेवर विजयी झाला. 4 अपक्षांनीही 'विजय मिळविला. काँग्रेसला एकही जागा जिंकता आली नाही. मागील निवडणुकीतही काँग्रेसला खाते उघडता आले नव्हते. 2022 मध्ये नागा पीपल्स फ्रंटचे 21 आमदार हे एनडीपीपीमध्ये विलीन झाले. होते. या पक्षबदलाचा यंदाच्या निवडणुकीत थेट परिणाम दिसला.

नेफ्यू रियो पाचव्यांदा होणार मुख्यमंत्री

  नागालँडच्या निवडणुकीत कोहिमा जिल्ह्यातील उत्तर अंगामी मतदारसंघावर सगळ्यांची नजर होती. या मततदारसंघातून मुख्यमंत्री नेफ्यू रियो निवडणूक लढवित होते. त्यांना काँग्रेसचे सेईविली साचू यांचे आव्हान होते. रियो यांनी साचू यांचा 15,824 'मतांनी पराभव करीत विजय नोंदविला. रियो विक्रमी पाचव्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार हे निश्चित मानले जात आहे. यापूर्वी एस. सी. जमीर यांनी तीन वेळा नागालँडच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.

2023 ची विविध पक्षांची स्थिती

   नॅशनल डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह पार्टी (एनडीपीपी)  25, भारतीय जनता पक्ष (भाजप) 12,  राष्ट्रवादी कॉंग्रेस 7, नॅशनल पीपल्स पार्टी (एनपीपी) 5 रिपाई (आठवले गट) 2, लोकजनशक्ती पक्ष (रामविलास पासवान) 2, नागा पीपल्स फ्रंट (एनपीएफ) 2, संयुक्त जनता दल 1, अपक्ष 4

1) नॅशनल डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने 32.22% मते घेत 40 जागा लढवून 25 जागा जिंकल्या व 2018 च्या तुलनेत 7 जागा अधिक मिळविल्या.

2) भाजपने 32.22% मते घेत 20 जागा लढवून 12 जागा जिंकल्या व 2018 मध्ये होत्या तेवढ्याच जागा मिळविल्या. 

3) राष्ट्रवादी कॅांग्रेसने 9.56 % मते घेत 12 जागा लढवून 7 जागा जिंकल्या व 2018 च्या तुलनेत 7 जागा अधिक मिळविल्या.

4) नॅशनल पीपल्स पार्टीने 5.76 % मते घेत 12 जागा लढवून 5 जागा जिंकल्या व 2018 च्या तुलनेत 3 जागा अधिक मिळविल्या.

5) लोकजनशक्ती पार्टीने(रामविलास) 8.65% मते घेत 15 जागा लढवून 2 जागा जिंकल्या व 2018 च्या तुलनेत 2 जागा अधिक मिळविल्या.




No comments:

Post a Comment