Monday, April 17, 2023

 पाकिस्तान से जिंदा भाग!

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक १८/०४/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

    भारत आणि पाकिस्तान हे देश 1947 मध्ये दोन स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आले. आज भारत कोणत्या स्थितीत आहे आणि पाकिस्तानची अवस्था काय आहे, हे आपण सर्व जाणतो. 1947 मध्ये पाकिस्तानमध्ये घोषणा दिली जायची ‘पाकिस्तान जिंदाबाद’. आज म्हणजे 2023 मध्ये पाकिस्तानमध्ये घोषणा दिली जाते आहे, ‘पाकिस्तान से जिंदा भाग’. हे विडंबन आहे. अन्नान दशा झालेल्या पाकिस्तानमधील त्रस्त आणि भ्रमनिरास झालेल्या आणि मृत्यूच्या दिशेने वादळाच्या गतीने जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांच्या मुखातून बाहेर पडलेलं!! समोर मृत्यू दिसत असल्यामुळे हताश झालेल्या नागरिकांच्या मुखातून याही अवस्थेत बाहेर पडते आहे,‘भाग पाकिस्तान से जिंदा भाग’! ‘

जिनांचे स्वप्न 

      पाकिस्तान हे एक कायद्याने चालणारे राज्य असेल, प्रत्येक पाकिस्तानी नागरिक हा एक जबाबदार नागरिक असेल, पाकिस्तानच्या प्रगतीसाठी प्राणपणाने झटेन असा त्याचा निर्धार असेल, पाकिस्तानी नागरिक सचोटीने वागणारे असतील, सहिष्णुता हा त्यांचा गुणविशेष असेल, पाकिस्तानमध्ये बहुपक्षीय लोकशाही असेल, वेगवेगळी मते बाळगून मुक्तपणे वावरणारे राजकीय पक्ष असतील, सुप्रशासनावर पाकिस्तानी नागरिकांची निष्ठा असेल. असे जिनांच्या स्वप्नातले पाकिस्तान होते. हे त्यांनी वेळोवेळी व्यक्त केलेल्या विचारांमधून स्पष्ट झाले होते. पण यातले पाकिस्तानमध्ये काहीही का घडले नाही? 

    14 ऑगस्ट 1947 हा पाकिस्तानचा जन्मदिवस आणि 11 सप्टेंबर 1948 ला पाकिस्तानचे जन्मदाते जिना अल्लाला प्यारे झाले. पाकिस्तानला आपल्या इच्छेप्रमाणे घडविण्याची संधी त्यांना मिळालीच नाही. त्यामुळे संधी मिळाली असती तर काय झाले असते, असा विचार करण्यात अर्थ नाही. मुळातच चुकीच्या आधारावर झालेल्या निर्मितीनंतर लगेचच म्हणजे 16 ऑक्टोबर 1951 ला पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकतअली खान यांचा तर खूनच झाला. लियाकत अली खानांच्या हत्येनंतर सत्तेची सूत्रे तर अशा व्यक्तींच्या हाती गेली की ज्यांच्या कारकिर्दीत  लष्कर आणि नोकरशहा यांचा वरचष्मा निर्माण झाला. जन्मानंतर 9 वर्षेपर्यंत पाकिस्तानला स्वत:ची घटनाच नव्हती. पहिली घटना 1956 साली अस्तित्वात आली. मग 9 वर्षे पाकिस्तान कोणत्या दिशेने आणि कोणती उद्दिष्टे समोर ठेवून चालला होता? उद्दिष्ट फक्त एकच होते. भारतद्वेश. बरे पुढे तरी 1956 सालच्या घटनेनुसार चालावे ना? तर तेही नाही. ही घटना अल्पजीवी ठरली. ती दोनच वर्षांनी रद्द करण्यात आली. दुसरी घटना अस्तित्वात यायला 1962 साल उजाडावे लागले. अशा स्थितीत पाकिस्तानने 1947 ते 1958 या 11 वर्षात एकूण 7 नामधारी पंतप्रधानांची पण खऱ्या अर्थाने लष्कराची जुलमी राजवट सहन केली. 

  जिनांच्याा स्वप्नातील पाकिस्तानचे आयुष्य पक्त 25 वर्षे

  1971 मध्ये भारताच्या मदतीने पूर्व पाकिस्तान बांगला देश या नावाने वेगळा होऊन  अस्तित्वात आला. यावेळी झालेल्या युद्धात पाकिस्तानचा अत्यंत लाजीरवाणा पराभव झाला. याचा अर्थ असा की जिनांच्या पाकिस्तानचे आयुष्य फक्त 25 वर्षाचेच होते.

  दुसऱ्या देशाच्या द्वेशाच्या आधारावर राष्ट्र उभे राहू शकत नाही. पाकिस्तानी राजकारण्यांना, नोकरशहांना आणि लष्करशहांना भारतद्वेशाशिवाय दुसरे काही दिसतच नव्हते. काहीही करून काश्मीर गिळंकृत करायचे, हे एकमेव उद्दिष्ट समोर होते. याच काळात भारत एक जागतिक मान्यतापात्र राष्ट्र म्हणून उभे राहिले आहे. पाकिस्तानात 1947 ते 1958 या काळात 7 पंतप्रधान झाले तर भारतात असे झाले नाही. 

पाकिस्तानच्या दुर्दशेला चार प्रमुख कारणे आहेत, असे अभ्यासकांचे मत आहे.

1)संघटित गुन्हेगारी(माफिया) आणि गटतटांचा वरचष्मा - यामुळे भ्रष्टाचार आणि परिवारवाद, घराणेशाही यांचे चांगलेच फावले. पाकिस्तानात पहिला बळी पडला तो गुणवत्तेचा. सरंजामशाहीमुळे बुद्धिमान मागे पडले, दूरदर्शित्वाचा ऱ्हास झाला आणि सुसंस्कृतपणा संपला. बंगाली बुद्धिमान आणि संख्येनेही जास्त होते, ते मुसलमान होते तरी त्यांची संस्कृती प्रामुख्याने बंगाली होती. ते कट्टरतावादी नव्हते. पंजाबी मुसलमान आणि बंगाली मुसलमान यांचे जुळेनासे झाले. बांगलादेश निर्मितीमागचे हे एक प्रमुख कारण होते.

2) जिनांची पाकिस्तानबाबतीतली कल्पना  नंतरच्या भुरट्यांना मानवली नाही. भ्रष्टाचार, घराणेशाही, कुप्रशासन, बेजबाबदार वृत्ती, सत्तापिपासूपणा, संधिसाधूपणा यांनी पाकिस्तान ग्रासले गेले. शिक्षण,  सुरक्षा आणि विकास या आघाड्यांवर पाकिस्तान नेहमीच निम्न स्तरावर राहिले आहे. चांगल्या राष्ट्राचा एकही गुण जसा पाकिस्तानात औषधाला सुद्धा नव्हता तसा वाईट राष्ट्राच्या एकाही अवगुणापासून पाकिस्तान दूर नव्हते.

3) पाकिस्तानला लोकशाही मूल्ये कधीच मानवली नाहीत. नोकरशाही आणि लष्कर यांच्या दुष्ट युतीच्या टाचेखली पाकिस्तान सतत खितपत होता. हुकुमशाही राजवटीत शिक्षण, आरोग्य आणि वाहतुक यासारख्या सामाजिक क्षेत्रांचा पाकिस्तानात सतत ऱ्हासच होत गेला. गेल्या 75 वर्षात पाकिस्तानात 30 वर्षे लष्करी राजवट होती. तर उरलेल्या 45 वर्षात लोकशाही यंत्रणेची शेंडी लष्कराच्याच हाती असे. अराजकीय शक्ती पाकिस्तानातील क्षीण लोकशाही राजवट मनात येईल तेव्हा उलथून टाकीत असत.

4) देशाच्या उभारणीसाठी एका स्पष्ट राजकीय दृष्टीकोनाची आवश्यकता असते. एक निश्चित आर्थिक भूमिका असावी लागते. एक सर्वसमावेशी परराष्ट्र धोरण स्वीकारावे लागते. या तिन्ही आघाड्यांवर पाकिस्तानची फरपट झालेली दिसते. त्यामुळे आज पाश्चात्य गट, साम्यवादी गट आणि खुद्द इस्लामी राष्ट्र गट यापैकी कुणालाही पाकिस्तानचा भरवसा वाटत नाही. पाकिस्तानच्या राजकीय आणि आर्थिक आघाड्यांवरील पेचप्रसंगांना तोंड देता देता  पाकिस्तानच्या नाकीनव आले, ते यामुळे. 

   अन्नानदशा कशामुळे ?

  पाकिस्तानमधला पंजाब हे तर अन्नधान्याचे कोठार होते. कोविड-19 च्या प्रकोपाच्या कचाट्यात सर्व जग सापडले होते. पाकिस्तान यातून पुरतेपणी बाहेर येऊ शकला नाही. त्यातच महापुरात 80% पीक वाहून गेल्यानंतर तर पाकिस्तानचे कंबरडेच मोडले. रशियाने गहू पुरवला पण तो बाजारत न येता मध्येच साठेबाजांनी हस्तगत केला. खुल्या बाजारात धान्य पोचलेच नाही. काळ्या बाजारातील दराने गरीब जनता ते घेऊ शकत नाही. परतफेड न केलेल्या कर्जाचा बोजा इतका वाढला आहे की, नवीन कर्ज जुन्या कर्जावरील व्याज देण्यासाठीच वापरावे लागत आहे. पैसा उभारण्यासाठी करवाढ केली, सबसिडी बंद केली तर महागाई गगनाला जाऊन भिडली. तुटवड्याची आणि महागाईची झळ नोकरशहा आणि लष्कराला मात्र पोचत नाही, हे पाहून जनतेत असंतोषाचा आगडोंब उसळला. जे भारताच्या नरेंद्र मोदीला साधले ते आपल्या ‘निकम्म्या’ नेत्यांना का साधत नाही, असा प्रश्न देशातील तरुणाई विचारते आहे. पाकिस्तानमधील अगदी सामान्य माणसाच्या तोंडीही मोदींचे नाव असते. तो मोदींची स्तुती आणि आपल्या नेत्यांची निंदा करीत असतो. 

  पाकिस्तान अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे. आण्विक तंत्रज्ञान त्याने चोरीच्या मार्गानेच मिळविले आहे आणि ते इतर देशांना चोरून विकून पैसेही मिळविले आहेत. पण अण्वस्त्रे पोटाची भूक भागवू शकत नाहीत.  दहशतवादी गट वाटेल ती किंमत देऊन अण्वस्त्रे विकत घ्यायला तयार आहेत. पण असे होऊ नये याबाबत पाश्चात्य आणि साम्यवादी अशा दोन्ही गटात एकमत आहे आणि ते अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती पडू देणार नाहीत. 

  पाकिस्तानची निर्मिती मुळातच चुकीच्या आधारावर करण्यात आली होती.  पाकिस्तानची आजची दशा करंट्या, भ्रष्ट, स्वार्थी आणि लालची राजकारण्यांमुळे आलेली आहे. म्हणून एकेकाळी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ हा नारा पाकिस्तानात दिला जात असे, त्या ऐवजी आता ‘पाकिस्तान से जिंदा भाग’, असा नारा उद्वेगाने दिला जाताना आढळतो आहे. कारण जिंवत रहायचे असेल तर हा एकच मार्ग पाकिस्तानी जनतेला दिसतो आहे! स्वीडनने आपली पाकिस्तानातील वकिलात बंद केली आहे. ही भविष्यात होऊ घातलेल्या अनेक घटनांची नांदी ठरणार आहे.

No comments:

Post a Comment