Monday, April 24, 2023

 फिनलंडच्या सदस्यतेतून उठणारी वादळे 

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २५/०४/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.      

फिनलंडच्या सदस्यतेतून उठणारी वादळे 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

 नॅार्थ अटलांटिक ट्रिटी ॲार्गनायझेशन म्हणजेच नाटो ही 30 देशांची एक आंतरराष्ट्रीय युती असून ती 1949 साली 12 देशांनी मिळून स्थापन केली आहे. पुढे 1952 या वर्षी 2 आणि 1955 आणि 1982 मध्ये एकेक देश या युतीत सामील होत गेला.1999 यावर्षी 3, 2004 यावर्षी एकदम 7, 2009 यावर्षी 2, 2017 व 2020 मध्ये एकेक देश सामील झाला. युरोप, अमेरिका आणि आशियातील देश याचे सदस्य आहेत. या युतीच्या करारातील कलम 5 नुसार कुणाही एका देशावर झालेला हल्ला हा सर्वांवर झालेला हल्ला मानला जाईल आणि गरज भासल्यास ते सैन्यदलासह त्या एकाच्या साह्याला धावून जातील. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या दोन देशांच्या दोन गटात जगाची विभागणी झाली. रशियाच्या संभाव्य आक्रमणाच्या भीतीने बरेच देश अमेरिकाकेंद्रित ‘नाटो’ संघटनेचे सदस्य बनले. साम्यवादी रशियाच्या अरेरावीस विरोध करणे, साम्यवादाचा प्रसार रोखणे अशी करारात लिखित नसलेली उद्दिष्टेही ‘नाटो’  सदस्य देशांची आहेत, असे मानले जाते. 

  नाटोचा 31वा सदस्य फिनलंड

   अल्बामा, बेल्जियम, बल्गॅरिया, कॅनडा, क्रोएशिया, झेक रिपब्लिक, डेनमार्क, एस्टोनिया, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, आईसलंड, इटली, लॅटव्हिया, लिथुॲनिया, लक्झेंबर्ग, मॅांटेनिग्रो, नेदरलंड्स, नॅार्वे, पोलंड, पोर्च्युगाल, रोमॅनिया, स्लोव्हॅकिया, स्लोव्हॅनिया, स्पेन, टर्की, युनायटेड किंगडम, युनायटेड स्टेट्स आणि आता 2023 या वर्षी फिनलंड, असे 31 देश नॅार्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशनचे (नाटोचे) सदस्य आहेत.

   रशियाने फिनलंडच्या नाटोप्रवेशावरून युद्ध भडकेल अशी  धमकी दिली आहे. युक्रेनच्या युद्धातच रशियाची पुरतेपणी दमछाक झालेली असतांना सुद्धा पुतिन यांनी युद्धाची भाषा वापरली आहे. कदाचित हे शब्द संतापाच्या भरात त्यांच्या तोंडून बाहेर पडले असतील. हे काहीही असले तरी फिनलंडचा नाटोत प्रवेश होणे ही बाब रशियाला अतिशय गंभीर बाब वाटते आहे, हे स्पष्ट आहे.

  लॅटव्हिया, इस्टोरिया, लिथुअॅनिया आणि पोलंड हे नाटो सदस्य देश असून यांच्या सीमा रशियाला स्पर्श करतात. या सर्वांची मिळून  रशियाला लागून असलेली एकूण सीमा 1,215 किलोमीटर भरते. एकट्या फिनलंडची रशियाला लागून असलेली सीमा 1,300 किलोमीटर आहे. त्यामुळे आता रशियाला लागून असलेली नाटो सदस्य राष्ट्रांची एकूण सीमा  2515 किलोमीटर इतकी होईल, म्हणजे जवळजवळ दुपटीने वाढेल.

  रशियाचा जळफळाट का? 

    3 लक्ष 37 हजार चौ. किमी क्षेत्रफळ असलेला फिनलंड (भारत 33 लक्ष चौ,किमी क्षेत्रफळ)  हा स्कॅंडिनेव्हियातील एक देश आहे.  रशिया हा क्षेत्रफळाने जगातला सर्वात मोठा देश असून त्याचे क्षेत्रफळ 1 कोटी 71 लक्ष चौरस किमी आहे. रशियाच्या तुलनेत चिमुकला असलेल्या फिनलंडच्या पश्चिमेला स्वीडन, उत्तरेला नॉर्वे, पूर्वेला रशिया तर दक्षिणेला फिनलंडचे आखात आहे. हेलसिंकी ही फिनलंडची राजधानी आहे. फिनिश व स्वीडिश ह्या दोन्ही भाषा बोलल्या जाणाऱ्या फिनलंडची लोकसंख्या 50 लाखापेक्षा थोडीशीच जास्त आहे. ही विरळ लोकवस्तीही देशाच्या दक्षिण भागात राहते. असे असले तरीही औद्योगिकदृष्ट्या प्रगत असलेला फिनलंड उत्तम सामाजिक व राजकीय स्थैर्य असलेला देश आहे. या लहानशा देशाचा दुसऱ्या महायुद्धाच्या अगोदर रशियाने लचका तोडला आहे. पण त्यावेळी फिनलंडने  चांगलीच झुंज देत रशियाला जेरीस आणले होते. या युद्धाची तुलना आजच्या युक्रेन युद्धाशी करता येईल. हा अनुभव गाठीशी असल्यामुळेच फिनलंड नाटोचा सदस्य होतो आहे, ही बाब रशियाला का रुचलेली नाही, हे लक्षात येईल.

  टर्कीचा कोलदांडा

    दुसऱ्या महायुद्धानंतर फिनलंड आणि स्वीडन हे देश तटस्थ आहेत. मात्र, रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर त्यांना असुरक्षितता भेडसावत आहे. फिनलंड आणि रशिया यांच्यात तेराशे किलोमीटर लांबीची सीमा आहे. ही अन्य कोणत्याही नाटो सदस्य देशाच्या रशियाशी असलेल्या सीमेपेक्षा  जास्त लांब आहे. त्यामुळे फिनलंडला रशियन आक्रमणाची सर्वात जास्त भीती होती. म्हणून नाटोचे सदस्यत्व स्वीकारण्यास फिनलंडमधले सर्व पक्ष एका पायावर तयार होते. पण फिनलंड आणि स्वीडनाला ‘नाटो’मध्ये प्रवेश देण्यास टर्कीचा विरोध होता. टर्कीचा आक्षेप असा होता की, टर्कीमधील बेकायदा आणि बंडखोर कुर्दिस्तान पीपल्स पार्टीच्या सैनिकांना फिनलंडने 1984 मध्ये आसरा दिला होता. या संशयित दहशतवाद्यांना फिनलंडमधून हाकलून देऊ असते आश्वासन फिनलंडने दिल्यानंतर टर्कीने आपला नकाराधिकार (व्हेटो) मागे घेतला आणि फिनलंडला नाटोत प्रवेश देण्यास सर्व म्हणजे 30 सदस्य राष्ट्रे तयार झाली. स्वीडननेही असेच आश्वासन दिले होते पण स्वीडनच्या न्यायालयाने स्वीडनचा निर्णय रद्दबातल ठरविला आणि त्यामुळे स्वीडनचा नाटोमधला प्रवेश अडकून पडला आहे. नाटोच्या घटनेप्रमाणे प्रत्येक सदस्य देशाला, दुसऱ्या देशाला सदस्य करून घेण्याच्या प्रश्नाबाबत,  नकार देण्याचा (व्हेटोचा) अधिकार असतो. 

   सुखी, समाधानी आणि संमृद्ध फिनलंड, स्वीडन तर रशिया….

   फिनलंड हा लोकशाहीवादी देश आहे. त्याची आर्थिक स्थिती उत्तम आहे. नोकिया नदी फिनलंडमधली. या नदीच्या नावाने बाजारात आलेला नोकिया फोन फिनलंडचा आहे. फिनलंड, स्वीडन हे देश लोकशाहीवादी आहेत आणि तरीही त्यांनी उत्तम आर्थिक प्रगती केली आहे.  एकेक देश एकेका ब्रॅण्डसाठी ओळखला जातो. फिनलंडने नोकिया दिला, तर वोल्वो, बोफोर्स हे  स्वीडनचे ब्रॅंड आहेत. रशिया आणि फिनलंड मधल्या लांबलचक सीमेच्या एका बाजूला असलेला फिनलंड हा सुखी, समाधानी आणि संमृद्ध आहे. यातले एकही विशेषण सीमेच्या दुसऱ्या बाजूच्या असलेल्या रशियाला लागू होत नाही. असा हा फिनलंड आता नाटोत सामील झाला आहे.  युक्रेन यद्धामुळे रशियाची पार दमछाक झाली आहे. म्हणून मदतीसाठी आपल्या धाकट्या भावाचे म्हणजे चीनचे ज्येष्ठत्व मान्य करण्याची वेळ रशियावर आली. पण धाकटा भाऊ चांगलाच बेरकी आहे. त्याने संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत अण्वस्त्रे दुसऱ्या देशात हलविण्याच्या रशियाच्या धोरणाला विरोध केला आहे.

   याच सुमारास फिनलंडमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जगातील सर्वात तरूण महिला पंतप्रधान  सना मरीन यांचा पराभव झाला. खरेतर कोविड-19 ची हाताळणी आणि युक्रेनला पाठिंबा यामुळे त्यांची जगभर वाहवा झाली होती. पण त्यांची आर्थिक धोरणे मतदारांना पसंत पडली नाहीत. वाढलेली महागाई, पेंशन, शिक्षणासाठी वाढीव तरतूद आणि कर्जवाढ  ह्या बाबी मतदारांना आवडल्या नाहीत.

 युतीधर्माचे पालन करणारा फिनलंड

   2 एप्रिल 2023 ला झालेल्या निवडणुकीत फिनलंडच्या संसदेच्या 200 जागांसाठी मतदान होऊन बहुमत कुणालाच मिळालेले नाही. यात पेट्टेरी ऑर्पो यांच्या नॅशनल कोएलेशन या लिबरल कॅान्झर्व्हेटिव्ह पक्षाला पूर्वीच्या तुलनेत  10 जागा जास्त मिळून एकूण 48 जागा आणि 20.8% मते, रिक्का पुर्रा यांच्या फिन्स या उजव्या  पक्षाला पूर्वीच्या तुलनेत  7 जागा जास्त मिळून एकूण 46 जागा आणि  20.1%मते,   सना मरीन या मावळत्या पंतप्रधानांच्या एसडीपी या डावीकडे झुकलेल्या सोशल डेमोक्रॅट पक्षाला   पूर्वीच्या तुलनेत  3 जागा जास्त मिळून एकूण 43 जागा आणि  19.9%मते मिळाली आहेत. उरलेल्या 63 जागा सहा लहान पक्षांना मिळाल्या आहेत. 

  युक्रेनला पाठिंबा देणारे परंपरावादी अॅार्पो हे माजी अर्थमंत्री युतीचे सरकार स्थापन करतील. फिनलंडला युतीच्या कारभाराचे नावीन्य नाही. किमान सामायिक कार्यक्रम ठरवून युतीधर्माचे पालन करण्याची परंपरा फिनलंडमध्ये चांगलीच रुळली आहे. अशाप्रकारे त्रिशंकू स्थिती आणि पक्षोपपक्षांची बजबजपुरी असली तरी हे सर्व पक्ष फिनलंडने नाटोत सामील व्हावे, या मतावर मात्र ठाम आहेत, हे विशेष!


No comments:

Post a Comment