Sunday, December 10, 2023

  


हेन्री किसिंजर पूर्ण


तरूणभारत, मुंबई, 9 व 10 डिसेंबर२०२३

वयाच्या शेवटच्या टप्प्यावरही राजकीयदृष्ट्या सक्रिय असलेले हेन्री किसिंजर यांचा जन्म दिनांक 27 मे 1923 तर निधन दिनांक 29 नोव्हेंबर 2023 हा आहे. त्यांचे या दिनांकाला बुधवारी  म्हणजे  शंभरी पार केल्यानंतर 6 महिन्यांनी   अमेरिकेमधील कनेक्टिकट प्रांतातील लिचफिल्ड काऊंटीतल्या (जिल्हा) केंट या लहानशा गावी  (लोकसंख्या सुमारे (3000) रहात्या घरी  सकाळी 5 चे सुमारास निधन झाले. विशेष म्हणजे त्या अगोदर जुलै 2023 मध्ये ते शी जिनपिंग यांची भेट घेण्यासाठी गुपचूप जाऊन आले होते. अत्यंत बुद्धिमान अमेरिकन मुत्सद्दी, आंतरराष्ट्रीय संबंधक्षेत्रातील प्रपितामह, विरोधकांकडून युद्ध गुन्हेगार म्हणून व  पूर्व पाकिस्तानमधील मानवीहक्कहनन व वंश विच्छेद याकडे दुर्लक्ष करणारे म्हणून धिक्कारलेले  पण चाहत्यांनी शांततेसाठीचे नोबेल पारितोषिकाचे मानकरी ठरविलेले हेन्री किसिंजर नक्की कसे होते, हे सांगणे कठीण आहे. पण एक मात्र नक्की की, भारतासाठी त्यांच्या कारकिर्दीचा कालखंड भारत अमेरिका संबंधाचा विचार करता पराकोटीचा वाईट कालखंड मानला जातो.

   असे होते हेन्री किसिंजर 

  1969 ते 1977 अशी सात वर्षे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री व  राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर असलेले हेन्री किसिंजर हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुत्सद्दी, लेखक, विश्लेषक, विचारवंत, प्रतिभा आणि प्रज्ञा प्रसन्न असलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व लाभलेले, आयुष्यभर प्रकाशझोतात वावरणारे, आयुष्यभर व्यसनी असूनही शतकभर आयुष्य लाभलेले, आंतरराष्ट्रीय राजकारणावर विपुल आणि मार्गदर्शक लिखाण करणारे, दशसहश्स्रेषु वक्ता असलेले, नोबेल शांतता पुरस्कार विजेते, विसाव्या आणि एकविसाव्या शतकातील एक अत्यंत प्रभावी राजकारणी आणि युगप्रवर्तक घटनांचे  साक्षीदार असलेले, तत्त्विकतेपेक्षा वास्तववादाला जपणारे, धोरणनिर्धारणापेक्षा रणनीतीवर भरवसा असलेले, परराष्ट्र धोरण लष्करी सामर्थ्य असेल तरच टिकू शकते, असे मानणारे, जर्मनीच्या बिस्मार्कला गुरुस्थानी मानणारे, अमेरिकेचा एकाकी पडलेल्या चीनशी संपर्क सुरू करणारे, अमेरिका व चीन यांची मैत्री रशियाला काटशह देऊ शकेल असे मानणारे, माओपासून चीनच्या प्रत्येक सर्वोच्च नेत्याशी संपर्कात असलेले, डेमोक्रॅट केनेडी ते रिपब्लिकन ट्रंप आणि पुन्हा डेमोक्रॅट बायडेन या काळातील अनेक अध्यक्षांचे सल्लागार असलेले, प्रथम हार्वर्ड विद्यापीठात विभागप्रमुख व  नंतर राजकारणी झालेले, सनातनी ज्यू असलेले, जर्मनीतील नाझी  छळवादातून वयाच्या 15 व्या वर्षी सुटका करून घेऊन 1938 मध्ये अमेरिकेत पलायन करून आलेले व पुढे नागरिक झालेले,  व्हिएटनाम युद्धात नामुष्की झालेल्या अमेरिकेला सन्मानपूर्वक बाहेर काढण्यासाठी पॅरिस शांतता परिषदेचे यशस्वी आयोजन करणारे, युद्ध टाळता आले तर पहावे या मताचे असलेले, संघर्ष संपवता न आला तरी त्याची तीव्रता कमी करता येते यावर विश्वास असलेले, म्हणून अमेरिकेला रशियाशी सौम्य धोरण स्वीकारण्यास लावून शस्त्र नियंत्रण कायद्याचा मार्ग प्रशस्त करणारे, रिचर्ड निक्सन सारख्या अमेरिकेच्या धसमुसळ्या अध्यक्षाला भरकटण्यापासून दूर ठेवणारे सल्लागार, आखाती देशांशी अमेरिकेचे संबंध सुधारावेत म्हणून सतत दौरे केल्यामुळे ‘शटल डिप्लोमसी’ या बॅक डोअर डिप्लोमसी टेक्निकला  जन्माला घालणारे, 1970 च्या दशकातील तीव्र भारतद्वेष्टे असलेले, भारतीय लोक गेली 600 वर्षे खुषमस्करी करणारे भिक्कारडे लोक होते, असे दूषण  भारतीयांना देणारे, इंदिरा गांधी यांच्या विषयी पराकोटीची वर्णद्वेषी व स्त्रीद्वेषी विधाने  व शिवीगाळ करणारे, पण त्याचवेळी भारताकडून आपल्याला हवे ते पदरात पाडून घेणारे महान अप्पलपोटे असलेले,  पुढे सपशेल माफी मागून इंदिरा गांधींविषयी आपल्याला अपार आदर आहे अशी त्यांची स्तुतीही करणारे, 1972 मध्ये भारत आणि जपानला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीचे स्थायी सदस्यत्व दिले जावे अशी रोखठोक भूमिका घेणारे, 1974 आणि 2012 मध्ये भारताला भेट देणारे, आपण भारतविरोधी भूमिका घेतली होती, ही चूक 2012 साली कबूल करणारे पण ही भूमिका आपण दबावाखाली घेतली होती, अशी सारवासावरही करणारे, शीतयुद्धाच्या समाप्तीनंतर अमेरिकेने भारताशी असलेले संबंध आणखी दृढ करावेत, असा आग्रह धरणारे, स्वत:च स्वत:ला बुद्धिमान मुत्सद्दी म्हणवून घेणारे आणि प्रत्यक्षात तसे असणारे, मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे प्रभावित झालेले, 2018 साली भारताच्या परराष्ट्र धोरणाचे तोंडभर कौतुक करणारे, जून 2023 मध्ये मोदी अमेरिकेच्या भेटीवर असतांना प्रकृती ठीक नसतांनाही सरकारी मेजवानीसाठी आवर्जून उपस्थित राहणारे, त्यावेळचे मोदींचे भाषण लक्षपूर्वक ऐकणारे, नंतर पुढाकार घेऊन मोदींशी स्वत:हून संवाद साधणारे,   महिलांच्या संगतीत रमणारे आणि हा तर माझा ‘विरंगुळा’ आहे, त्यात लपवण्यासारखे काय आहे, असा प्रतिपक्षालाच प्रश्न विचारणारे, जिल सेंट जॅान, शर्ली मॅक्लेन, मार्लो थॅामस या सारख्या विख्यात अभिनेत्री आणि सौंदर्यवती महिलांच्या संगतीत रममाण होणारे, कोणत्याही महिलेला प्राथम्याने ज्याच्याबरोबर डेटला जावे अशी भुरळ पडेल असे व्यक्तिमत्त्व (वूमनायझर) असलेले किसिंजर पाकिस्तानचे चाहते होते, ते का? तर चीनशी गुप्त भेटीगाठी घडवून आणण्याच्या प्रयत्नात त्यांना तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान याह्याखान यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते.  यावेळी ते प्रथम भारतात आले, काही दिवस भारतात राहून भारत खूश होईल अशी विधाने करीत राहिले व नंतर पाकिस्तानमध्ये गेले आणि तिथून पाकिस्तानचे विमान वापरून गुप्तता राखीत चीनला गेले. बहुदा म्हणूनच भारताला अमेरिकेने शस्त्रे पुरवू नयेत यासाठी त्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली. शेवटी भारताने ॲागस्ट 1971 मध्ये रशियाशी शांतता, मैत्री  व सहकार्य करार केला. तो आजही टिकून आहे. 

   बांगलादेशचे युद्ध आणि दुक्कलीचे मनसुबे 

  बांगलादेश युद्धाचे वेळी किसिंजर आणि निक्सन ही जोडगोळी भारताला धमक्या देत होती. भारताची अमेरिकेत असलेली संपत्ती जप्त करू, अशी विधाने करीत होती. भारताला थोपवण्याठी अमेरिकेचे 7वे आरमार बंगालच्या उपसागराच्या दिशेने निघाले सुद्धा होते. पण भारताने विमानमार्गे जाऊन पाकिस्तानचे सेनाप्रमुख जनरल नियाझी यांनाच ताब्यात घेतले आणि पुढे पूर्व पाकिस्तानचे रुपांतर बांगलादेशमध्ये झाले. उरलेले पाकिस्तानही भारत काबीज करील, अशी भीती या दुक्कलीला वाटत होती. या घटनेमुळे भारत अमेरिका यातील संबंधात निर्माण झालेली कटुता अनेक वर्षे टिकून होती.

   किसिंजर आणि हार्वर्ड विद्यापीठ

   किसिंजर यांची शैक्षणिक कारकीर्द हेवा वाटावा अशी होती. पण हार्वर्ड विद्यापीठात शिकत असताना येथे आपणास प्राध्यापकपदाचा दर्जा मिळावा अशी त्यांची तीव्र इच्छा होती. ती मात्र पूर्ण होऊ शकली नाही. प्राध्यापकपद सोडल्यास हेन्री किसिंजर यांना हार्वर्डमध्ये इतर सर्व सन्मान मिळाले. हार्वर्ड विद्यापीठाने आपल्या ‘आंतरराष्ट्रीय परिसंवाद शाखे’चे प्रमुखपद किसिंजर यास दिले, त्यांचा प्रबंधही डॉक्टरेटसाठी स्वीकारला पण प्राध्यापक होण्याचे त्यांचे स्वप्न काही पूर्ण झाले नाही. गुरुनाम गुरू अशी पात्रता असलेले हेन्री  किसिंजर हार्वर्ड विद्यापीठात प्राध्यापक होऊ शकले नाहीत. पण हार्वर्ड विद्यापीठातील  साधनसामग्रीचा पुरेपूर उपयोग करणाऱ्या  किसिंजर यांना कल्पकतेचीही साथ होती.  यांच्या  भरवशावर किसिंजर हार्वर्ड विद्यापीठात उत्तमोत्तम कार्यक्रम आयोजित करीत असत. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची अनुमती मिळालेले स्वत:स धन्य मानीत. 

   किसिंजर आणि रशिया 

   सोव्हिएत युनियनची आण्विक शक्ती व क्षमता आणि तिचा सामना कसा करावा यावर किसिंजर यांनी सर्व तपशीलांना स्पर्श करणारा ग्रंथस्वरुपी अहवाल तयार केला. हा अहवाल त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या वाचनात आला. एखादे चांगले लिखाण वाचनात आले तर तसे लेखकांना कळविण्यासाठी आवश्यक असलेली गुणग्राहकता  राजकारणी असूनही निक्सन यांच्या स्वभावात होती. त्यांनी किसिंजर यांना  हा अहवाल अतिशय आवडल्याचे कळविले. या निमित्ताने या दोघात आलेला संबंध या दोघांच्या एकत्र राजकीय प्रवासास निमित्त ठरला. दररोज भेटी, आठवड्यात एकदा ‘खास’ भोजन असा कार्यक्रम नित्याचा झाला. या अहवालाने प्रभावीत होऊन हार्वर्डने किसिंजर यांना  प्राध्यापकपद देऊ केले. पण आता हेन्री किसिंजर यांनी ही ‘ऑफर’ नाकारली. विद्यापीठ एका चांगल्या प्राध्यापकास मुकले खरे पण  आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीक्षेत्राला मात्र  एक प्रभावी मार्गदर्शक लाभला. 

 किसिंजर आणि व्हिएटनाम युद्ध

  अमेरिका आणि व्हिएटनाम युद्धात (1954 ते 1975) किसिंजर यांची भूमिका महत्त्वाची आणि वादग्रस्त राहिलेली आहे. सुरवातीला अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले किसिंजर युद्धाचे समर्थक होते. पण पुढे हे युद्ध अमेरिकेसाठी एक ओझे होऊन बसले आणि अमेरिकेच्या प्रतिष्ठेला धक्क्यावर धक्के बसू लागले तेव्हा त्यांनी गुप्त वाटाघाटी करून तहाचा एक मसुदा तयार केला. पण हा मसुदा त्यावेळचे अमेरिकेचे अध्यक्ष असलेल्या रिचर्ड निक्सन यांना आवडला नाही त्यांनी तो नाकारून, जंगलात लपून बसून गनिमी पद्धतीने लढणाऱ्या व्हिएटनामी सैनिकांचा  शोध घेण्यासाठी व्हिएटनामवर नापाम बॅाम्ब वर्षाव करून व्हिएटनाममधील जंगलेच  निष्पर्ण केली. पण पुढे तहाचा काहीसा असाच मसुदा मान्य करून अमेरिका व्हिएटनाम युद्धातून 1973 मध्ये बाहेर पडली. यालाच पॅरिस शांतता करार म्हणून संबोधले जाते. 

   किसिंजर आणि नोबेल पारितोषिक 

   1973 मध्ये, हेन्री किसिंजर यांना अमेरिकेचे परराष्ट्र सचिव म्हणून नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण या काळात त्यांचे नाव कंबोडियावरील अमेरिकेच्या गुप्त बॉम्बहल्ल्याशी आणि दक्षिण आफ्रिकेतील क्रूर लष्करी राजवटीशी जोडले गेले होते, त्यामुळे त्यांच्या नावावरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्यासोबत वाटाघाटीत सहभागी असलेले उत्तर व्हिएटनामचे ले डक थो यांनाही किसिंजर यांच्या बरोबर नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते पण त्यांनी नोबेल पारितोषक नाकारले. त्यांचे म्हणणे असे होते की, आमच्यातील वाटाघाटीनंतर अजूनही शांतता निर्माण झालेली नाही. यावेळी  नोबेल शांतता समितीच्या निवड समितीत तीव्र मतभेद झाले होते. दोन सदस्यांनी तर आपल्या पदाचा राजीनामाच दिला होता. 

   किसिंजर यांचे सव्यसाचित्व 

   राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपद आणि परराष्ट्रमंत्रीपद ही दोन्ही खाती एकाचवेळी सांभाळण्याचे सव्यसाचित्व किसिंजर यांच्या ठायी होते. कित्येक दशके अमेरिका आणि चीन यातून विस्तव जात नव्हता. या पदावर असतांना किसिंजर यांनी  विख्यात अमेरिकी माध्यमांमधील दिग्गज वार्ताहरांना थांगपत्ताही लागू न देता  चीनच्या माओशी संपर्क प्रस्थापित केला. पुढे किसिंजर यांचा चीन दौराही असाच या कानाचे त्या कानाला कळू न देता पार पडला. नंतर अध्यक्ष निक्सन आणि हेन्री किसिंजर हे चीन दौऱ्यावर रीतसर भेट देऊन आले.  ही सर्व मोहीम किसिंजर यांनी एकहाती आखली होती. चीनचे बहिष्कृतपण अशाप्रकारे संपले. यामुळे खूश होऊन माओ यांनी किसिंजर यांस ‘लाओ पेंग्यु’ (खरा मित्र) अशी पदवी बहाल केली होती.  पण चीनसंदर्भातले किसिंजर यांचे त्यांचे अंदाज साफ चुकले. अमेरिकेने चीनमध्ये गुंतवणूक करावी, असा त्यांचा सल्ला होता. अमेरिकेने त्या प्रमाणे केले. स्वस्त वीज, जमीन, पाणी आणि मनुष्यबळाचा फायदा अमेरिकन औद्योगिक क्षेत्राला झाला पण इकडे चीनही बलसंपन्न झाला. पण पुढे मात्र  किसिंजर यांच्या अपेक्षेप्रमाणे घडले नाही. चीनवरील बहिष्कार संपला आणि तो जागतिक राजकारणाचा एक हिस्सा झाला की, तो अधिकाधिक लोकशाहीवादी होईल, अशी किसिंजर यांची धारणा होती. याच भ्रमात या नंतरचे अनेक अध्यक्षही होते. पण प्रत्यक्षात चीनने या सर्वास कशी धोबीपछाड दिली हा सर्व घटनाक्रम इतिहासाचा एक महत्त्वाचा हिस्सा झाला आहे. ठकावर   महाठकाने मात केली, ती अशी. 

         गीता, कौटिल्य आणि हेन्री किसिंजर

  गीता, कौटिल्य आणि हेन्री किसिंजर ही तीन नावे एकत्र पाहिल्यानंतर कुणाच्याही भुवया आश्चर्याने उंचावल्या नाहीत तरच आश्चर्य! पहिली दोन नावे एकत्र उच्चारली तर कुणालाही आश्चर्य वाचावयास नको. हेन्री किसिंजर हे नावही अनेक सामान्यजनांना माहीत नसेल. पण जागतिक राजकारणात मात्र या अमेरिकन कूटनीतिज्ञाला लोक ओळखून आणि वचकून असत. अमेरिका आणि चीन यांच्यात दोस्तीचे तसेच व्यापारी संबंध निर्माण करण्याचे श्रेय फार मोठ्या प्रमाणात हेन्री किसिंजर यांना दिले जाते. या कूटनीतिज्ञाच्या कार्यकर्तृत्वाचा,  स्वभाववैशिष्ट्याचा, चतुराईचा परिचय करून देणाऱ्या कथा लोकांमध्ये अनेकदा सांगितल्या जातात. त्यापैकी दोन नमुन्यादाखल नमूद कराव्याशा वाटतात. चर्चा करण्यासाठी जेव्हा हेन्री किसिंजर आपल्या परदेशी समपदस्थासोबत चर्चेला बसत असत तेव्हा त्या दोघांमध्ये सहाजिकच एक टेबल असे. समोरच्या व्यक्तीसमोर संदर्भासाठी मुद्द्यांचे टाचण असे. हेन्री किसिंजर यांना टाचणातील अक्षरे उलटी दिसत आणि त्यामुळे त्यात काय लिहिले आहे ते दिसूनही कळत नसे. यावर उपाय म्हणून असा उलटा दिसणारा मजकूर वाचण्याचा सराव त्यांनी केला होता. आता प्रतिपक्ष कोणकोणते पर्याय घेऊन आला आहे, हे त्यांना कळत असे. यामुळे अमेरिकेसाठी वाटाघाटीने  जास्तीतजास्त किफायतशीर  सौदा करणारा राजकीय प्रतिनिधी असा त्याचा लौकिक होता, असे म्हणतात. हेन्री किसिंजर यांना अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा एक अत्यंत विश्वसनीय सहकारी मानले जाते. ही मैत्री वैयक्तिक पातळीवरही आहे, असा निक्सन यांचा समज होता. प्रतिपक्षाच्या वॅाटरगेट नावाच्या कार्यालयात काय खलबते चालतात हे कळावे म्हणून निक्सन यांच्या संमतीने म्हणा किंवा मान्यतेने म्हणा मायक्रोफोन बसवण्यात आले होते, असे म्हणतात. पुढे हा प्रकार उघडकीला आला आणि निक्सन यांची नाचक्की होऊन त्यांच्यावर देशभर टीकेची झोड उठवण्यात आली. अशा प्रसंगी आपली ही विश्वसनीय सल्लागार व्यक्ती नक्की उपयोगी पडेल, अशा खात्रीने निक्सन यांनी  हेन्री किसिंजर यांना भेंटीला बोलवून ‘आता मी काय करू’, असे अत्यंत काकुळतीने विचारले. पण एक अक्षरही न बोलता हा कूटनीतिज्ञ चिरूट ओढीत एका कोपऱ्याकडे एकटक पाहत राहिला, असे सांगतात. ‘या पापाला राजीनामा देण्याशिवाय दुसरे प्राय:श्चित्त नाही’, असेच जणू हेन्री किसिंजर यांना सुचवावयाचे असावे. कारण या भेटीनंतर निक्सन राजीनामा देऊन पायउतार झाले. एका राजकारण्याला आपल्या ‘शब्दाविण्या झालेल्या या संवादात’, हेन्री किसिंजर यांनी नक्की काय सांगितले असेल, यावर अनेक माध्यमात चर्चा होत होती, असे म्हणतात. हेन्री किसिंजरच्या व्यक्तिमत्त्वाचा पूर्ण परिचय  अर्थातच या दोन कथातून होणार नाही हे खरे असले तरी  झलक मात्र नक्की मिळेल, असे वाटते.
                        गीतेनुसार जगाचा व्यवहार
      अशा या हेन्री किसिंजर यांनी एकूण 27 पुस्तके लिहिली आहेत. ती सर्व सारखीच सरस आहेत.  त्यापैकी एक पुस्तक तसे जुने असले तरी पेन्ग्विनने हिंदुस्थानात चारपाच वर्षांपूर्वी प्रसिद्ध केले आहे. ‘वर्ल्ड ॲार्डर: रिफ्लेक्शन्स ऑन द कॅरेक्टर ऑफ नेशन्स अँड द कोर्स ऑफ हिस्टरी’, असे भलेमोठे शीर्षक असलेले हे  पुस्तक आहे. या पुस्तकातील ‘गीतेनुसार जग’ (द वर्ल्ड ॲकॅार्डिंग टू गीता) याबद्दलचे त्यांचे विचार जाणून घेण्याची उत्सुकता अनेकांना असेल. या शिवाय कौटिल्याचे अर्थशास्त्र याबद्दलही त्यांनी आपले विचार मांडले आहेत. आजवर गीतेचे अनेक अभ्यासक होऊन गेले आहेत. लोकमान्य टिळकांना गीतेत कर्मयोग गवसला, कुणाला भक्तियोग तर कुणाला संन्यास योग गवसला. डॅाक्टर चान्सरकरांना तर त्यात अर्थशास्त्रातील तत्त्वे आढळली. किसिंजर यांना या ग्रंथात अनेक चक्रे (सायकल्स) आढळतात. प्रत्येक चक्र सहस्रावधी वर्षांचे असते. साम्राज्यांचाच नव्हे तर विश्वाचा सुद्धा नाश होतो पण तो पुन्हा निर्माण होण्यासाठी. मानवी अनुभवाचे वास्तविक स्वरूप त्यांनाच कळते ज्यांचा स्वतःचा त्यात सहभाग असतो. गीतेत किसिंजर यांना नैतिकता (मोरॅलिटी) आणि सामर्थ्य (पॅावर) यांतील संबंधांची चर्चा केलेली आढळते. युद्धाचे दुष्परिणाम, त्यात होऊ घातलेला स्वकीय आणि निरपराध लोकांचा होणारा विनाश या सर्वाला आपण कारणीभूत होणार या कल्पनेने गांगरलेला आणि गलितगात्र झालेला अर्जुन युद्धाचे समर्थनच होऊ शकत नाही या निष्कर्षाला कसा पोचतो, याची नोंद किसिंजर घेतात आणि भगवान श्रीकृष्ण त्याचे समाधान कसे करतात हेही ते विस्ताराने सांगतात.  हे सर्व विस्ताराने या छोटेखानी लेखात सांगणे शक्य नाही आणि तो या लेखाचा हेतूही नाही.
                        गीता - आध्यात्मिक शब्दकोष
      ‘तू आपले कर्म कर’, हा भगवान श्रीकृष्णाचा आग्रह (अपील) अर्जुनाला पटतो आणि तो कसा नि:शंक होऊन युद्ध करण्यासाठी सज्ज होतो हे किसिंजर सारख्या एकेकाळच्या सैनिकी पेशाच्या आणि वृत्तीच्या राजकारण्यालाही पटले आणि भावले यांचे आश्चर्य वाचावयास नको. नैतिकतेचा निषेध न करता, प्राप्त परिस्थितीत तात्काळ कर्तव्याची कृतीच कशी महत्त्वाची असते, या गोष्टींची नोंद त्यांनी घ्यावी ही बाबही किसिंजर यांच्या कारकिर्दीशी मिळतीजुळती वाटते. निर्भय मनाने युद्ध करावे, असा गीतेचा संदेश आहे, असे ते म्हणतात पण त्याचवेळी महात्मा गांधी गीताला आपला आध्यात्मिक शब्दकोष (स्पिरिच्युअल डिक्शनरी) मानीत असत, याची त्यांना आठवण आहे.
                        कौटिल्याची विशेषता
          यानंतर किसिंजर वळले आहेत ते थेट कौटिल्याकडे. कौटिल्य  इसवीसनापूर्वीच्या चौथ्या शतकात होऊन गेल्याची नोंद ते आवर्जून घेताना दिसतात. भारतात मौर्य घराण्याच्या उदयाचे कारकत्त्व ते कौटिल्याला देतात, ते योग्यच म्हटले पाहिजे. एकाच राज्याच्या कारकिर्दीत ‘अलेक्झांडर द ग्रेट’ला भारतीय उपखंडातून पिटाळून लावून उपखंडात एकछत्री अंमल निर्माण करणारा कौटिल्य अर्थशास्त्रातही तेवढ्याच अधिकारवाणीने लिहितो यामुळे किसिंजर काहींसे विस्मित झाल्याची जाणीव होते.
                      कौटिल्य आणि पाश्चात्य चिंतक
    युरोपात वेस्टफालियाचा तह रूर्ह नदीतिरी झाला त्याच्या कितीतरी आधी कौटिल्याने राज्याराज्यात कायम स्वरूपी संघर्षाची स्थिती असते असते, हे जाणले होते, हे त्यांनी मनमोकळेपणाने मान्य केले आहे. मिचिएवेली या इटालीयन इतिहासकार, तत्त्ववेत्ता, राजनीतिज्ञाप्रमाणेच कौटिल्याची भूमिका होती, असे किसिंजर म्हणतात. पण स्थिती असलीच तर नेमकी उलट होती. कारण कौटिल्याचा काळ मिचिएवेलीच्या काळाच्या कितीतरी अगोदरच्या आहे. रिचिलिऊ हा फ्रेंच धर्ममार्तंड आणि राजकारणी सुद्धा याच विचाराचा होता, पण या दोघात सुमारे दोन हजार वर्षांचे अंतर होते, हे मात्र हेन्री किसिंजर यांनी स्पष्टपणे नोंदवले आहे. राज्य ही मुळातच ठिसूळ (फ्रॅजाईल) संस्था आहे. त्यामुळे ते कायम स्वरूपी राहिलेच पाहिजे, या म्हणण्याला नैतिकतेचा आधार नसतो, हेकिसिंजर यांना जाणवावे यात आश्चर्य ते काय? अमेरिकेची आजवरची धोरणे आणि व्यवहार याच तत्त्वावर अनुसरून राहत आले आहेत.
                    कौटिल्याची भावलेली शिकवण
    राज्याचा स्थापना कशी करावी, त्याचे रक्षण कसे करावे, शत्रूंच्या कारवायांना योग्यवेळ पाहून पायबंद कसा घालावा, प्रदेश कसे जिंकावेत याबाबतचे कौटिल्याचा विचार किसिंजर यांना पटलेले दिसतात. सामर्थ्य बहुआयामी असते. त्याचे घटक परस्परावलंबी असतात. उद्दिष्टानुसार त्यांचा वापर करायचा असतो. भौगोलिक परिस्थिती, आर्थिक पाठबळ, सैनिकी सामर्थ्य, राजकीय डावपेच, हेरगिरी, तत्कालीन कायदे, परंपरा, लोक भावना, अफवा, दंतकथा, मानवी स्वभावविशेष, माणसाचा दुबळेपणा या सर्व बाबी राजाला माहीत असल्या पाहिजेत, या कौटिल्याच्या शिकवणीची नोंद किसिंजर यांनी आपल्या पुस्तकात घेतली आहे. या ठिकाणी त्यांना मिचिएवेली या इटालीयन राजनीतिज्ञाची आणि क्लॅासेविच या जर्मन तत्त्वज्ञाची आठवण होते. यापैकी क्लॅासेविच याने युद्धातील नीतिनियमांचा पाया घातला, असे मानतात.
          सत्तेचा समतोल ही कौटिल्याची संकल्पना
    सत्तेचा समतोल ही संकल्पना पाश्चात्यांना सुचण्याच्या दोन हजार वर्षे पूर्वी कौटिल्याने मांडली, हे किसिंजर मनमोकळेपणाने मान्य करतात. शत्रू आणि मित्र या दोघांवरही पाळत ठेवण्यासाठी आणि माहिती मिळविण्यासाठी फिरते साधू, भटके, जादुगार, ज्योतिषी यांचा उपयोग कसा करून घ्यावा, अफवा पसरवून राज्यात बेदली कशी माजवावी, दोन राज्यांत वैमनस्य कसे निर्माण करावे, शत्रूच्या सैन्यात गोंधळ कसा माजवावा आणि या सर्वांसाठी योग्यवेळ कशी साधावी, याचा वस्तुपाठच कौटिल्याने दिला आहे. ह्या सर्व बाबींचीही तपशीलवार नोंद किसिंजर यांनी घेतली आहे.
    प्रजा असंतुष्ट असणार नाही, याकडे राजाचे कायम लक्ष असले पाहिजे.  मिचिएवेली (युरोपातील पुनर्निर्मितीच्या कालखंडातील तत्त्ववेत्ता)  आणि कौटिल्य यांची तुलना करताना किसिंजर एक महत्त्वाचा फरक दाखवतात, तो असा की, कौटिल्याचे सर्व विवेचन भावनिक आत्मीयतेपासून (नॅास्टॅग्लिया) पूर्णपणे अलिप्त होते.
  अशोकाच्या काळात भारताचा विस्तार आजचे पाकिस्तान, बांग्लादेश, अफगाणिस्तान आणि इराण यांतील काही भाग येथपर्यंत झाला होता, याबद्दल मात्र आपण होकारार्थी किंवा नकारार्थी टिप्पणी करू इच्छित नाही, असे किसिंजर यांनी म्हटले आहे.  आपली वैशिष्ट्ये आणि ज्येष्ठता पाश्चात्यांच्या तोंडून ऐकली म्हणजे अनेकांना लवकर पटते, असा अनुभव आहे. गेलेल्याबद्दल वाईट बोलू नये, असाही संकेत आहे. पण समीक्षा करायची झाली तर व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही बाजू समोर यायला नकोत का?




No comments:

Post a Comment