Monday, December 4, 2023

 शी जिनपिंग आणि ज्यो बायडेन यांच्या भेटीचे फलित 

लेखांक दुसरा 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 

Email- kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee?

   शी जिनपिंग आणि ज्यो बायडेन यांच्या भेटीचे फलित 

 लेखांक दुसरा 

  आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य व्यासपीठाच्या शिखर समितीची /एशिया-पॅसिफिक एकॅानॅामिक कोऑपरेशनची (एपीइसी)  30 वी बैठक अमेरिकेतील सॅनफ्रान्सिसको येथे 15 ते 17 नोव्हेंबर 2023 ला झाली. 1989 मध्ये ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरा येथे आशिया-पॅसिफिक क्षेत्रातील प्रमुख 12 देशांनी या व्यासपीठाची स्थापना केली होती. आज या व्यासपीठातील सदस्यांची संख्या 21 आहे. यावेळी म्हणजे 2023 मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याकडे यजमानपद होते. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग  आणि ज्यो बायडेन यांच्यात फावल्या वेळात सकारात्मक वातावरणात चर्चा झाली. काही विषयांवर सहमती झाली तर काहींवर वाद कायमच राहिला आणि दोन्ही देशांनी आपापल्या भूमिका ठासून मांडल्या. आदल्याच वर्षी म्हणजे 2022 मध्ये जी20 च्या शिखर परिषदेत इंडोनेशियातील बाली  येथेही हे दोघे भेटले होते. पण या एका वर्षात बरेच काही घडून गेले आहे. ऑगस्ट 2022 मध्ये अमेरिकी प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांनी चीनच्या विरोधाला न जुमानता तैवानचा दौरा केला होता. तोही प्रसिद्धीचे ढोल पिटत! तेव्हापासून  चिडलेल्या चीनने दोन्ही देशांतील सैनिकी संपर्काचे मार्गच स्थगित केले होते.  अचानक युद्ध सुरू होऊ नये म्हणून दोन देशातील सेनाप्रमुखांची ही सेफ्टी व्हॅाल्व  सारखी संपर्क व्यवस्था होती. अशा परिस्थितीत शी जिनपिंग  2017 नंतर पहिल्यांदाच अमेरिकेत आशिया-पॅसिफिक आर्थिक शिखर समितीच्या बैठकीचे निमित्त साधून आले होते. फावल्या वेळातील ही दोन राष्ट्रप्रमुखांची भेट  मैत्रीपूर्ण वातावरणात झाली असे उभयपक्षी सांगण्यात आले. तसे ते सांगायचेच असते.  

   भेटीसाठी उत्सुक कोण?

  आपली चीड, संताप गुंडाळून ठेवून शी जिनपिंग यांनी बायडेन यांची भेट का घेतली असावी? तसेच बायडेनही या भेटीसाठी का तयार झाले असावेत?  

  एक असे की,  गेल्या वर्षी अमेरिकेने चीनवर लागू केलेल्या आर्थिक निर्बंधांचा जाच आता चीनला वाढत्या प्रमाणात जाणवू लागला आहे. दुसरे असे की,   चीनच्या ‘बीआरआय’ प्रकल्पाला अनेक देशांतून अनपेक्षित विरोध होत असल्याने चीनच्या प्रभावाला तडा गेला आहे. हा प्रकल्प ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’,  ‘बीआरआय’,  किंवा बी अँड आर’ अशा नावांनी जगभर ओळखला जातो. तर खुद्द चीनमध्ये हा प्रकल्प ‘वन बेल्ट वन रोड’ (ओबीओआर) म्हणून ओळखला जातो.  ही चीनने 2013 मध्ये आखलेली जागतिक स्तरावरची वाहतुक व्यवस्था आहे. 2013 मध्ये 150 पेक्षा जास्त देशांनी या योजनेला सहमती दर्शविली होती. खुद्द शी जिनपिंग यांचे हे विशाल स्वप्न आहे. हे पूर्ण होताच चीनकडे वाहतुक क्षेत्रातील जागतिक नेतृत्व चालून येणार आहे. काही विश्लेषक तर या प्रकल्पाची अमेरिकेच्या ‘मार्शल प्लॅन’शी तुलना करतात. दुसऱ्या महायुद्धानंतर पश्चिम युरोपातील देशांची आर्थिक व्यवस्था पार कोलमडली होती. ती सावरावी म्हणून अमेरिकेने कोट्यवधी डॅालर युरोपकडे वळविले होते. ही ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’, योजना बारगळली तर चीनचे आर्थिक नुकसान तर होईलच पण त्याचबरोबर चीनच्या जगातील वर्चस्वालाही धक्का पोचेल.  तिसरे असे की, हमास आणि इस्त्रायल यांच्यातील  युद्धात तात्पुरता युद्धविराम झालेला असला तरी हे युद्ध किती काळ चालेल हे सांगता येत नाही.  या युद्धात अमेरिका इस्त्रायला मदत करीत असून आज ना उद्या चीन रशिया आणि इराण यांना हमासच्या बाजूने उघडपणे उभे रहाावेच लागेल. म्हणजे तिसरे महायुद्ध सुरू झाल्यासारखेच आहे. चौथे असे की, नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान दौऱ्यामुळे चिडलेल्या चीनने दोन्ही देशांतील सैनिकी संपर्काचे मार्ग स्थगित केले खरे पण ही स्थिती अशीच कायमस्वरुपी रहावी, हे चीनच्या हिताचे नाही. यातून चीनला बाहेर पडायचे असून ‘उभयपक्षी सैनिकी संपर्काचे मार्ग’ पुन्हा सुरू करायचे होते. 

   म्हणून की काय नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीच्या निमित्ताने झालेला जळफळाट विसरून  शी जिनपिंग यांनी अमेरिकेला 2 पांडा भेट म्हणून देण्याचे सूतोवाच केले.  यावेळी ते म्हणाले की, पांडा हा चिनी आणि अमेरिकी लोकांमध्ये मैत्रीचा एक दूत आहे. या साखरपेरणीला बऱ्यापैकी यश मिळालेले दिसते. मुख्य म्हणजे तुटलेला सैनिकी संपर्क आता परत जोडला जाईल व काही अनर्थ घडण्यापूर्वी दोन्हीकडचे वरिष्ठ सैनिकी अधिकारी चर्चेने तो टाळण्याचा प्रयत्न करतील/करू शकतील. या व्यवस्थेचे महत्त्व समजण्यासाठी थोडे मागे जावे लागेल. सन 2020 मध्ये तेव्हाचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षीय निवडणुकीत यश मिळावे म्हणून जनमत आपल्याकडे वळविण्यासाठी चीनवर हल्ला करतील अशा वावड्या उठल्या होत्या. पण अमेरिका आणि चीन यात सैनिकी संपर्क मार्ग सुरू असल्यामुळे अमेरिकेच्या ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्याने दूरध्वनी करून चीनला वाटणारी शंका दूर केली होती. जगाच्या इतिहासात चुकून किंवा गैरसमज झाल्यामुळे युद्धे सुरू झाल्याच्या घटना काही कमी नाहीत. चुकीचे अंदाज, गैरसमज आणि चुकीची माहिती मिळाल्यामुळे पहिले महायुद्ध सुरू झाले, असे अनेक इतिहासकारांचे मत आहे. संपर्क व्यवस्थेची पुनर्स्थापना होणे ही बाब म्हणून महत्त्वाची ठरते. या चर्चेत हे घडून आले. 

   अमेरिकेतील तरुणाई आणि मादकद्रव्याधीनता

   दुसरे असे की, अमेरिकेतील तरूण पिढी  फेंटानिल या नावाच्या मादक द्रव्याच्या आहारी गेली आहे. त्यामुळे तरूण पिढीचे अतोनात नुकसान होते आहे. ज्या पदार्थापासून हे मादक द्रव्य तयार होते, त्याचे उत्पादन चीनमध्ये होते. हा पदार्थ अमेरिकेला तस्करी करून पाठविला जाणार नाही, अशी व्यवस्था करण्याचे आश्वासन शी जिनपिंग यांनी बायडेन यांना दिले. अमेरिकेसाठी ही मोठीच उपलब्धी म्हणावी लागेल.

  तिसरा मुद्दा कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’शी  (एआय) संबंधित होता. याचा वापर व दुष्परिणाम, हा आज जरी गंभीर विषय नसला तरी त्याचे दुरुपयोग व्हायला सुरवात झाली आहे. वेळीच दक्षता घेतली नाही तर पुढे हा विषय आटोक्याच्या बाहेर जाण्याची भीती आहे. लष्करीक्षेत्रात तर हा भस्मासूर ठरू शकेल.  त्या दृष्टीने  सुरवातीपासूनच उपाययोजना करण्यावर उभयपक्षी एकमत झाले, हा शुभसंकेत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर संरक्षण क्षेत्रात, विशेषतहा आण्विक क्षेपणास्त्रांच्या कार्यप्रणालीत झाला, तर अनर्थ ओढवू शकतो. याचा वापर व दुष्परिणाम, हा सद्ध्या जरी प्रामुख्याने  चर्चेचाच विषय असला, तरी त्याचे सुरुवातीचे दुरुपयोगही झोप उडवणारे आहेत.  

   अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमधील स्पर्धा आर्थिक क्षेत्रापुरती मर्यादित आहे, असे अमेरिकेचे म्हणणे आहे. तर चीन बिघडलेल्या सर्वच संबंधांसाठी अमेरिकेला जबाबदार धरतो आहे. म्हणून  चर्चेदरम्यान काही मतभेद दूर होऊ शकले नाहीत. तैवानचे स्वातंत्र्य, दक्षिण चिनी समुद्रातील चीनची दादागिरी, चीनद्वारे मानवाधिकाराचे होत असलेले उल्लंघन आणि भारताला विश्वासात न घेता झालेले विचारमंथन या मुद्यांचा उहापोह पुढील लेखात. 

No comments:

Post a Comment