Monday, November 27, 2023

 चीनची पांडा मुत्सद्देगिरी

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक 28.11. 2023 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022   9422804430    

Email- - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee?


चीनची पांडा मुत्सद्देगिरी

लेखांक पहिला 

   निसर्गात पांडा नावाचा प्राणी दक्षिण चीनमधल्या काही प्रांतातल्या पर्वतरांगातील बांबूच्या वनात आढळतो. हा काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा बहुरूप्या अस्वल प्रकारचा प्राणी आहे. याच्या कान, डोळे, मझल (नाक आणि तोंड), पाय आणि खांद्यावर काळे आणि इतर जागी पांढरे केस (फर) असतात. असा हा काळा पांढरा रंग या प्राण्याने का ‘निवडला’ या विषयी शास्त्रज्ञात वेगवेगळी मते आहेत. काहींच्या मते हा छद्मावरणाचा (कॅमॅाफ्लेज) प्रकार आहे. बांबूच्या घनदाट वनात आणि बर्फाच्छादित पर्वत रांगात  लपायला हा काळापांढरा रंग उपयोगी पडत असेल असे म्हणावे तर पांडाला शत्रूच नाहीत, मग ही लपाछपीची किमया कुणासाठी आणि कशासाठी? भक्षाला चाहूल लागू नये म्हणून ही रंगसंगती आहे असे म्हणावे तर पांडा 99% शाकाहारी आहे. पण याच्या 1 टक्का आहारात बहुतांशी सडके मास, अंडी व छोटे निरुपद्रवी प्राणी येतात. दुसरे मत असे आहे की, एकमेकांना ओळखण्यासाठी ही रंगसंगती उपयोगी पडत असावी. पण पांडा हा समाजशील प्राणी नाही. एका पांड्याने दुसऱ्याला पाहिले तर ते एकमेकांच्या जवळ यायच्याऐवजी दूर जायला सुरवात करतात. तिसरे मत असे आहे की, काळ्या आणि पांढऱ्या रंगामुळे पांडाला उष्णतामानात समतोल साधण्यात मदत होत असावी. काळा रंग उष्णता शोषतो तर पांढरा रंग उष्णता परावर्तित करतो.     एकमेकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न पांडा सहसा करीत नाहीत. त्याचे डोळे कोणताही भाव प्रदर्शित करीत नाहीत, तर कुतुहल असलेला भाव त्यांच्या चेहऱ्यावर कायमच असतो, असे काहींचे मत आहे. पांडाच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनात काय चालले आहे याचा बोध होत नाही, असे म्हणतात. या अबोल प्राण्याला भांडतांना, खेळतांना किंवा प्रियाराधन करतांना मात्र यांना असाकाही कंठ फुटतो की विचारू नका. सर्व भाव व्यक्त करतांना तो आवाजाचेच माध्यम वापरतो. पांडा बांबूची कोवळी पानेच नव्हे तर कडक बांबूही आवडीने खातो. पांडा केव्हा कशी चाल खेळेल ते सांगता येत नाही, असे म्हणतात. पांडा मुख्यत: चीनमध्येच आढळत असल्यामुळे चीनने त्याला उत्पन्नाचे साधन केले आहे.

  हे पांडा पुराण एवढे विस्ताराने मांडण्याचे मुख्य कारण असे आहे की पांडा आणि चिनी व्यक्ती यात थोडेफार साम्य आहे किंवा कसे, असा विचार मनाला चाटून जातो, हे आहे. 

   चीनची पांडा डिप्लोमसी

  अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि शी जिनपिंग यांच्यामध्ये अमेरिकेतील सॅनफ्रान्सिसको येथे जी चार तासांची बैठक झाली, त्यावेळी शी जिनपिंग यांनी अमेरिकेला 2 नवे पांडा भेट म्हणून देण्याचे सूतोवाच केले आहे. यावेळी ते म्हणाले की, पांडा हा चिनी आणि अमेरिकी लोकांमध्ये मैत्रीचा एक दूत आहे. 1972 मध्येही अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी चीनचा दौरा केला होता. त्यावेळी चाऊ-एन-लाई यांनी अमेरिकेला दोन पांडा भेट म्हणून दिले होते. 

   चीनने नंतरही काही पांडा अमेरिकेला दिले आहेत. पण, ते भाड्याने दिले होते. यासाठी चीन दरवर्षी ५ ते १० लाख डॉलर मोबदला आकारत होता. पांडा एक सुंदर (क्यूट) आणि प्रेमळ प्राणी आहे, असे चीनचे मत आहे. या प्राण्याच्या माध्यमातून चीन आपली प्रतिमा एक मैत्रीपूर्ण देश म्हणून समोर ठेवू पहात आहे. चीनने कॅनडा, फ्रान्स आणि ऑस्ट्रेलिया या देशांना देखील पांडा दिला आहे. तसेच सिंगापूर, मलेशिया आणि थायलँड यांच्यासोबत पांडाच्या बदल्यात चीनने मुक्त व्यापार कराराची तरतूद पदरात पाडून घेतली आहे. अमेरिकेकडे सध्या असलेले चार पांडा चीनला परत करावे लागणार आहेत. त्यामुळे चीन अमेरिकेला पांडा देण्याच्या बहाण्याने वेगळा हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करत आहे, असे बोलले जात आहे.

   राजकीय मतभेदावर मार्ग शोधण्याचा उभयपक्षी प्रयत्न

   जगाला आज अमेरिका आणि चीन यात संघर्ष नको आहे. पण या झाल्या शहाणपणाच्या गोष्टी! आज चीनच्या बाबतीत त्याचीच तर वानवा आहे. चीन ही अमेरिकेप्रमाणेच जगातली वेगाने पुढे जात असलेली शक्ती आहे. त्यामुळे या दोघात स्पर्धा, संघर्ष, कुरबुरी होत राहतील, हे चीनने गृहीत धरले आहे.  

   दक्षिण चिनी समुद्र आणि प्रशांत महासागर यात सुरू असलेली चीनची दंडेली अमेरिकेला कदापि मान्य होणार नाही कारण या क्षेत्रातील काही देशांना अमेरिका सुरवातीपासूनच अभय आणि संरक्षण देत आली आहे. चीनला आवरणे एकट्या अमेरिकेला कठीण जाणार आहे. या कामी अमेरिकेचा एकमेव विश्वासू आणि सामर्थ्यवान साथीदार भारतच असू शकतो, अशी अमेरिकेला पक्की जाणीव आहे.  जपान, दक्षिण कोरिया आणि ऑस्ट्रेलिया हे तीन देश एकत्र येऊनही चीनचा प्रतिकार करू शकणार नाहीत, हे अमेरिकेला पक्के ठावूक आहे. जोडीला भारत आला म्हणजे लगेचच परिस्थिती पार बदलेल असे नाही, हे खरे आहे. चीनने अमेरिकेशी समेटासाठी सद्ध्यातरी आटापिटा चालविलेला दिसतो आहे. सॅनफ्रन्सिसको येथील बैठकीबाबतची काही वृत्ते झिरपत समोर येत आहेत ती पाहिली की, आंतरराष्ट्रीय डावपेच कसे बदलत असतात, ते बघून सामान्यांची मती कुंठित होते, ती अशी. 

   अर्थकारण महत्त्वाचे ठरणार 

  ही झाली राजकीय पृष्ठभूमी. पण अर्थकारण राजकीय भूमिकांवर कसे ‘हावी’ होते, हे समजण्यासाठी सॅनफ्रन्सिसको येथील शी जिनपिंग आणि बायडेन यांची भेट उपयोगी पडेल असे वाटत होते, ते तसेच झाले. चीन लष्करी आणि आर्थिक दृष्ट्या पुरेसा बलवान असता, चीनच्या जीडीपीचा जागतिक जीडीपीतील वाटा घसरणीला लागला नसता, तर शी जिनपिंग अमेरिकेत बायडेन यांच्या भेटीला गेले असते काय? अमेरिकेसमोरही लष्करी आणि आर्थिक दृष्ट्या पुरेशी  बलसंपदा  असती तर बायडेन यांनी शी जिनपिंग यांची भेट घेण्यासाठी आजच्याइतकी उत्सुकता दाखविली असती का? जागतिक राजकारणावर या फावल्या वेळी झालेल्या भेटीचे लगेचच काही परिणाम होतील, असे वाटत नाही. कारण मुळात सॅनफ्रन्सिसको येथील बैठक एशिया-पॅसिफिक एकॅानॅामिक कोऑपरेशन (एपीइसी) या व्यासपीठाची होती. 21 सदस्यांचे हे व्यासपीठ   शासकीय स्तरावरील (इंटर-गव्हर्मेंटल) आहे. पॅसिफिक क्षेत्रातील देशात मुक्त व्यापाराचे धोरण अवलंबिले जावे, हा या व्यासपीठाच्या निर्मितीमागचा हेतू आहे. तो विषय बाजूला पडून ही भेटच भाव खाऊन जावी व तिलाच वृत्तसृष्टीने प्राधान्य द्यावे, यात नवल नाही. या दोन बड्या नेत्यांची आमने सामने बसून झालेली ही दुसरी भेट आहे. चीन आणि अमेरिका या  दोन देशात रणनीतीविषयक डावपेच सुरू असतांनाच या भेटींमध्ये आर्थिक डावपेचांना उभयपक्षांनी प्राधान्य दिलेले दिसत होते. जागतिक शांततेपेक्षा दोन्ही देशांना आपापल्या देशांची आर्थिक घसरण दूर करण्याचीच चिंता अधिक होती, कारण आर्थिकव्यवस्था घसरली तर मंदीमुळे येणारी दुरवस्था दूर करणे कठीण असते. चीनच्या नवीन रेशीममार्गातून अनेक देश अंग काढून घेत आहेत, हा दुष्काळातला तेरावा महिनाच आहे. लष्करी सामर्थ्याला आर्थिक सामर्थ्याची साथ असावीच लागते, हे अमेरिका जाणून आहे. आता हे दुसऱ्या  लष्करी महासत्तेलाही कळले म्हणायचे! 






No comments:

Post a Comment