Monday, November 20, 2023

 कर्ता- करविता कोण?

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक 21/11. 2023 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो.

कर्ता, करविता कोण?

लेखांक पाचवा 

वसंत गणेश काणे, बी एस्सी, एम ए (मानसशास्त्र), एम.एड.  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022   9422804430    

Email- - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

   7ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलवर अचानक हल्ला केला. हा हल्ला सामान्य कुरापतीसारखा नव्हता तर सर्व प्रकारच्या तयारीनिशी केलेला, सर्व प्रकारची आधुनिक शस्त्रास्त्रे वापरून केलेला, आक्रमण म्हणावे अशा तीव्र स्वरुपाचा होता.  केवळ 365 चौरस किमी क्षेत्रफळ असलेल्या चिमुकल्या गाझा पट्टीत परस्परांशी जोडलेल्या 500 किलोमीटर लांबीच्या अद्ययावत आणि सर्व सुखसोयींनी युक्त अशा भूमिगत भुयारांचे हमासने जाळे तयार केले होते. पॅलेस्टाईनचा एक प्रांत असलेली  आणि इस्रायलला लागून असलेली गाझापट्टी हमास या दहशतवादी संघटनेच्या राजकीय शाखेच्या नियंत्रणाखाली होती. त्यामुळे हमासच्या दहशतवादी शाखेला रान मोकळे मिळाले होते. याचा पुरेपूर फायदा घेत हमासने गाझापट्टीत भुयारांचे हे जाळेच तयार केले. यात युद्ध करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रकारच्या व्यवस्था होत्या. शस्त्रांचा साठा होता, आसरा घेता येईल अशी सोय होती. एका ठिकाणाहून दुसऱ्या  ठिकाणी आतल्या आत निसटून जाता येईल, अशा प्रकारे ही भुयारे जोडलेली  होती. भुयारांचे एक मुख शाळा, हॅास्पिटल किंवा मशीद यात उघडत असे तर दुसरे मुख हल्ला करण्यास सोयीचे होईल, अशा जागी उघडत असे. एकमेकांशी जोडलेली  ही भुयारांची रचना  स्थापत्यशास्त्रातील कमाल म्हणावी अशा तोडीची होती. हे काम एका मोठ्या प्रकल्पासारखे होते. गाझामधील निदान काही नागरिकांना किंवा कुंपणापलीकडच्या इस्रायलला याचा किंचितसाही सुगावा लागू न देता अशी रचना उभारणे ही अशक्यप्राय बाबही युद्धांच्या  इतिहासाने नोंद घ्यावी अशी असणार आहे. स्वसंरक्षणाच्या बाबतीत जन्मापासून सतत सजग असलेला इस्रायल यावेळी बेसावध गाठला गेला याचे आश्चर्य वाटते. कारण इस्रायलला लागून असलेल्या या चिंचोळ्या गाझापट्टीची जास्तीत जास्त रुंदी 25 ते 30 किलोमीटरपेक्षा जास्त नसेल. आता इस्रायल एकेक भुयार नष्ट करीत लपलेल्या दहशतवाद्यांचा, लपवून ठेवलेल्या ओलिसांचा शोध घेतो आहे. या सुमारे 250  ओलिसात परदेशी नागरिक, इस्रायलचे युद्धात सहभागी नसलेले नागरिक, महिला व मुले आणि इस्रायलचे पकडलेले सैनिक आहेत.

   यावेळी केलेली ही सर्व उभारणी एकट्या हमासने स्बळावर केली असणे शक्यच नाही. या हल्ल्यामागे इराणची चिथावणी आणि छुपा सहभाग तर आहेच. अशी संधी इराण बरी सोडेल? कारण इराणला इस्रायल बरोबरचे अनेक जुने हिशोब चुकते करायचे आहेत.  इस्रायलने इराणच्या अण्वस्त्र निर्मिती प्रकल्पाला अनेकदा बॅाम्ब हल्ले करून हानी पोचविली आहे कारण पाकची अण्वस्त्रे जशी भारत आणि इस्रायलवर हल्ला करण्यासाठी आहेत, त्याचप्रमाणे इराणची अण्वस्त्रे इस्रायलला संपवण्यासाठी आहेत, हे स्पष्ट आहे. 

   चीन आणि रशियाने संघर्षात मारल्या गेलेल्या निरपराध नागरिकांच्या मृत्यूबदल दु:ख व्यक्त केले आहे. संघर्ष थांबवा, असे आवाहनही केले आहे. पण हमासच्या आक्रमणाबद्दल एक शब्दही उच्चारलेला नाही. याची नोंद घेणे आवश्यक आहे. युक्रेनबाबत मात्र त्यांचे  मत असे नाही,  याचीही  नोंद घ्यावयास हवी. उलट युक्रेनच्या सोबतीने आणखी एक आघाडी उघडली गेली तर रशियाला ते हवेच आहे. पाश्चात्यांची मदत आता युक्रेन आणि इस्रायल यात विभागली जाईल. चीनला तैवानवर ताबा मिळवायचा आहे. पण अमेरिका तैवानच्या पाठीशी उभी आहे, ही चीनची मुख्य अडचण आहे. आता अमेरिकेची मदत तैवान, युक्रेन आणि इस्रायल यात विभागली गेली तर ते चीनला नको असेल का?

 नवीन मध्यपूर्व उभारण्याच्या प्रयत्नांना खीळ 

  मध्यपूर्वेतील अशांतता दूर व्हावी, इस्रायल आणि अरब राष्ट्रे यात समेट घडवून आणावा यासाठी पाश्चात्यांचे विशेषत:  अमेरिकेचे प्रयत्न सुरू आहेत. त्याला बऱ्यापैकी यशही येत चालले होते. सौदी अरेबिया समेटासाठी तयार होत होता. आता तो इस्रायलसोबत मैत्री करण्यास अनुकूल राहील का? इतर अरब राष्ट्रेही अशीच बिचकणार नाहीत का? अरबांसोबत यापूर्वी झालेल्या मैत्रिकरारांनाही या हल्ल्याची झळ लागणार नाही का? चीनच्या बेल्ट अँड रोड प्रकल्पाच्या सारखा एक जमीन, जल आणि वायूमार्ग यांचा उपयोग करून भारत, आखाती देश आणि युरोप जोडले जाणार आहेत. जी20च्या दिल्ली बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाबाबत सहमती झाली होती. यात इस्रायल आणि जॅार्डनही असणार होते. इस्रायलचे एक ठीक आहे. पण जॅार्डन आता  सहमत होईल का? 

  या शिवाय अरब जगतात सद्ध्या काय घडामोडी होत आहेत, तिकडेही लक्ष दिले पाहिजे. अरब राष्ट्रांचे प्रमुख नेते आणि शियाजनप्रधान इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी सुन्नीजनप्रधान सौदीच्या राजधानीत तातडीच्या बैठकीसाठी एकत्र आले आहेत. ही शिया आणि सुन्नी या हाडवैऱ्यांची भेट आहे. गाझामधील इस्रायल-हमास युद्धाचे लोण इतर देशांत पसरण्याआधीच थांबावे, या आग्रही मागणीसह अन्य उपाययोजनांवर विचारविनिमय करण्यासाठी अरब राष्ट्रांची संघटना  ‘अरब लीग’ आणि ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ची (ओआयसी) ही बैठक होती. या भेटीमागचा बोलविता धनी कोण असावा? रशिया आणि चीनला  इस्रायल आणि हमास व त्याच्या साथीला लेबनॅानमधून हिजबुल्ला आणि येमेनमधून हूती दहशतवाद्यांचे सीमा न ओलांडताही होणारे प्रखर हल्ले थांबावेत असे वाटण्याचे काहीच कारण कारण नाही. पाश्चात्यांची मदत युक्रेन, इस्रायल आणि तैवान यात वाटली जाणे त्यांच्या सोयीचे आहे. मग उरतो कोण? तर अमेरिका. पण इस्लामजगताचा अमेरिकेवर आक्षेप आहे की, अमेरिकेची इस्रायलवर मेहेरनजर असते. तरी हा चमत्कार अमेरिकेने घडवून आणला असेल का?

    ठरल्याप्रमाणे  स्वतंत्र बैठका न होता या दोन संघटनांची एकत्रित बैठक होईल, असे सौदीने जाहीर केले. गाझामघ्ये  निर्माण झालेली अत्यंत स्फोटक स्थिती लक्षात घेऊन अरब राष्ट्रे आणि इस्लामिक राष्ट्रांचे या युद्धाविषयी एकच धोरण असावे, एकजूट दिसावी, यासाठी ही बैठक आयोजित होती. पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी, इस्रायलचा निषेध करण्यासाठी अरब राष्ट्रांकडून आंतरराष्ट्रीय स्तरावर सहमती मिळविण्याचे ‘अरब लीग’चे उद्दिष्ट असल्याचे या गटाचे  सहाय्यक सरचिटणीस होसम झाकी यांनी सांगितले. पण आंतरराष्ट्रीय राजकारणात पोटात एक आणि ओठावर दुसरे अशी स्थिती असते. अरब हुकुमशहा पॅलेस्टाइनच्या बाजूने असले तरी त्यांनाही हमाससारख्या दहशतवादी संघटनांचे वर्चस्व वाढलेले नको आहे. कारण या संघटना उद्या त्यांनाही उपद्रवकारी ठरणार हे ते जाणून आहेत. इसिसचा उपद्रवी भस्मासूर पुरतेपणी गारद झालेला नाही, हे ते जाणून आहेत. इस्रायलवर सरसकट बहिष्कार टाकावा अशा आशयाचा ठराव, सौदी अरब, युएई, जॅार्डन, इजिप्त, बहरिन, सुदान, मोरोक्को, मॅारिटानिया, जिबुती यांच्या विरोधामुळे  पारित होऊ शकला नाही, याची नोंद घ्यायला हवी.

   युक्रेनचे युद्ध सुरू झाले आणि शेअरचे भाव गडगडले होते. ते सावतात न सावरतात तोच हा हमासचा हल्ला होताच सर्व शेअर बाजार पुन्हा एकदा गडगडले आहेत. अगोदरच जगभर मंदीचे वातावरण आहे. हमास आणि इस्रायलमधला संघर्ष म्हणजे दुष्काळातला तेरावा महिनाच ठरणार आहे. या युद्धात उद्या इराणने उडी घेतली तर अमेरिकेला इस्रायलच्या बाजूने प्रत्यक्ष संघर्षात उतरावेच लागेल. म्हणजे तिसरे महायुद्ध सुरू होईल.  पण ते तर चीन सोडला तर इतर  कुणालाही नको आहे. मग हमासच्या हल्ल्यामागचा कर्ता करविता कोण असेल बरे?

No comments:

Post a Comment