Monday, July 1, 2024

 युरोपीयन युनीयनमधील उजवे वादळ 

(उत्तरार्ध)

तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक ०२/०७/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.     

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 


20240628 युरोपीयन युनीयनमध्ये उजवे वादळ  

(उत्तरार्ध)

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

      

  युरोपीयन युनीयनमध्ये  पक्षांना देशाच्या मर्यादा नाहीत. बहुतेक पक्ष एकापेक्षा जास्त देशात कार्यरत आहेत. त्यांना मिळणाऱ्या जागाही निरनिराळ्या देशातून मिळालेल्या असतात. युरोपीयन युनीयनमध्ये दर 5 वर्षांनी निवडणूक घेतली जाते. 27 देशात त्या त्या देशातील राजकीय पक्ष आपापले उमेदवार उभे करतात. 2024 च्या या निवडणुकीत 37 कोटी मतदारांपैकी 51% मतदारांनी मतदान केले. मतदार संख्येचा विचार केला तर भारतानंतर युरोपीयन युनीयनचा क्रमांक लागतो. बेल्जियम, बल्गेरिया, ग्रीस, लक्झेंबर्ग या देशात मतदान करणे सक्तीचे होते. निरनिराळ्या देशांच्या वाट्याला असलेले प्रतिनिधित्व असे आहे. जर्मनी 96 जागा, फ्रान्स 81, इटली 76, स्पेन 61 याशिवाय इतर देशांना उरलेल्या जागाही  डिग्रेसिव्ह प्रपोर्शनॅलिटीच्या तत्त्वानुसार, जागा मिळाल्या आहेत. डिग्रेसिव्ह प्रपोर्शनॅलिटीच्या तत्त्वानुसार जास्त लोकसंख्या असलेल्या देशाना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा मिळत नाहीत तर थोड्या कमी जागा मिळतात. तसेच कमी लोकसंख्या असलेल्या देशाना लोकसंख्येच्या प्रमाणानुसार कमी  जागा मिळत नाहीत तर थोड्या जास्त जागा मिळतात. असा 720 जागांचा हिशोब आहे. 

 निवडणुकीत संरक्षण आणि सुरक्षा हे विषय महत्त्वाचे ठरावेत, हे युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर सहाजीकच म्हटले पाहिजे. याशिवाय आर्थिक स्थिती, रोजगार, दारिद्र्य निर्मूलन, मध्यपूर्व आणि आफ्रिकेतील आसरा मागणाऱ्यांच्या बाबतीतले प्रवेशासंबंधीचे धोरण (कुणाला प्रवेश द्यायचा आणि कुणाला नाही), आरोग्य, हवामानबदल आणि युरोपचे भवितव्य या विषयांना समोर ठेवून मतदारांनी मतदान केले आहे. आफ्रिका आणि मध्यपूर्वेतून आसरा मागण्याच्या निमित्ताने आलेल्यात अनेक उपद्रवी घटक/अतिरेकी/दहशतवादी आहेत. या उपद्रवी घटकांपायी अख्खा युरोप आज बेजार झाला आहे.

   उजव्यांची स्ट्राँग मायनॅारिटी 

  निवडून आलेल्यांचे दोन गटात वर्गीकरण करता येईल. ईपीपी म्हणजे युरोपियन पीपल्स पार्टी ही ख्रिश्चनांचा लोकशाही, पुराणमतवादी आणि उदारमतवादी आणि पुराणमतवादी सदस्यपक्षांसह तयार झालेली एक राजकीय आघाडी आहे. हिचे स्वरुप  एका आंतरराष्ट्रीय संघटनेसारखे असून ती युरोपीयन युनीयनमधील अनेक राजकीय पक्षांची बनलेली आहे. ही उजवीकडे झुकलेली मध्यममार्गी आघाडी आहे आणि जोडीला एस अँड डी. म्हणजे प्रोग्रेसिव्ह अलायन्स ऑफ सोशॅलिस्ट अँड डेमोक्रॅट्स हा पक्ष आहे.  या दोघांच्या आणि अन्य काहींच्या वाट्याला आलेल्या जागा (189+135 +अन्य काही) पाहता सध्याच्या उर्सुला व्हॅान डर लेयेन यांनाच युरोपीयन कमीशनच्या अध्यक्षा म्हणून आणखी एक संधी मिळेल, असे दिसते. पण अति उजवेही फार मोठ्या संख्येत निवडून आले आहेत. त्यांची ‘स्ट्राँग मायनॅारिटी’ आहे. त्यामुळे युरोपीयन युनीयनमध्ये छुप्या दहशतवादींसह येणाऱ्या व आलेल्या आश्रयार्थींना प्रवेश देण्याबाबतचे नियम सावधगिरीसह आणखी कडक होतील. येणाऱ्यांमधले खरे आश्रयार्थीं कोण आणि छुपे दहशतवादी कोण  हे बाह्यरूपावरून कसे ठरविणार?  हा एक बिकट प्रश्नच आहे. तसेच हवामानबदलाबाबतचा मुद्दाही बराचसा मागे पडणार आहे.   पार्लमेंटमध्ये पूर्वी पार पडलेल्या निवडणुकीमध्ये मध्ममार्गी (सेंटरिस्ट) पक्षांचे वर्चस्व होते. 2024 मध्ये झालेल्या निवडणुकीतही तीच स्थिती, पण कमकुवत स्वरुपात, कायम असल्याचे दिसून येते. उजव्या विचारसरणीचे सदस्य इटली, जर्मनी, फ्रान्स या बड्या देशातून निवडून आले आहेत. आपापल्या राष्ट्रांबाबतचा कडवा अभिमान, सध्या युरोपात मध्यपूर्वेतून किंवा आफ्रिकेतून होत असलेल्या लोकांच्या स्थलांतरणाला  विरोध, आपण युरोपीयन सगळे एक ह्या भूमिकेचा ऱ्हास ही उजव्या विचारसरणीची  ठळक वैशिष्ट्ये सांगता येतील.  

इटली, जर्मनी  आणि फ्रान्समध्ये  उजव्यांना बढत 

   इटलीतील  उजव्या पक्षाने मोठे यश प्राप्त करून  युरोपीय युनीयनमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. गेल्या काही वर्षांपासून युरोपातील अनेक देशात स्वत:चा वेगळा राष्ट्रवाद असावा आणि त्याचेच वर्चस्व असावे ही भूमिका प्रभावी होतांना दिसते आहे. धर्म, वर्ण, वंश आणि लिंग यावर भर नको, या भूमिकेचा झपाट्याने  ऱ्हास होतांना दिसतो आहे. विशेषतहा आर्थिक परिस्थिती अस्थिर असेल, उद्याची भ्रांत असेल तर  धर्म, वर्ण, वंश आणि लिंग यावर  आधारित विचार प्रभावी ठरून जनमतावर त्यांचा पगडा निर्माण होतो, हा अनुभव युरोपीयन युनीयनमध्येही येतांना दिसतो आहे. 

   जर्मनीमध्ये मध्यममार्गी सोशल डेमोक्रॅट आघाडीची सत्ता आहे. पण जर्मनीतही उजव्या विचारसरणीच्या पक्षाने युरोपीयन युनीयनच्या निवडणुकीत तेथील सत्तारूढ सोशल डेमोक्रॅट आघाडीचा सपशेल पराभव केला आहे.  या पक्षाला जर्मनीतील प्रमुख विरोधी आघाडी असलेल्या दुसऱ्या क्रमांकाच्या ख्रिश्चन डेमोक्रॅटिक युनियन या पक्षापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली आहेत.  पहिल्या क्रमांकावर असलेली  चॅन्सेलर ओलाफ शोल्त्झ यांची सत्तारूढ सोशल डेमोक्रॅट आघाडी या निवडणुकीत मात्र तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.    फ्रान्समध्ये तर कहरच झाला. तिथे उजव्या विचारसरणीच्या नेत्या मारी ला पेन यांच्या नॅशनल रॅली या विरोधी आघाडीला सर्वाधिक मते मिळाली. युरोपियन युनीयनच्या पार्लमेंटच्या निवडणुकीत मारी ला पेन यांच्या पक्षाने मिळवलेले भरघोस यश पाहताच अध्यक्ष मॅक्रॉन  चक्रावूनच गेले. त्यांनी तिरीमिरीत येऊन फ्रेंच नॅशनल असेम्ब्ली बरखास्तच केली आणि मुदतीच्या तीन वर्षे आधीच निवडणुका जाहीर केल्या.  अतिरेकी राष्ट्रवाद फ्रान्सला आणि युरोपालाही घातक ठरेल अशी  अध्यक्ष मॅक्रॉन यांची आग्रही भूमिका आहे. दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेल्या मॅक्रॉन यांची अध्यक्षपदाची मुदत 2027 पर्यंत आहे. फ्रान्समध्ये अमेरिकेप्रमाणेच अध्यक्षांना व्यापक अधिकार असतात, परंतु काही निर्णयांसाठी अध्यक्षांना कायदेमंडळावर अवलंबून राहावे लागते. फ्रेंच नॅशनल असेम्ब्ली बरखास्तच करून आणि नव्याने निवडणुका जाहीर करून  मॅक्रॉन यांनी मोठेच धाडस केले आहे.  मारी ला पेन यांच्या पक्षाने फ्रेंच नॅशनल असेम्ब्लीच्या आता होऊ घातलेल्या निवडणुकीतही असेच यश संपादन केले तर? पण मॅक्रॉन यांचा कयास वेगळा आहे. युरोपीयन युनीयनची निवडणूक वेगळी आणि फ्रान्समधली देशांतर्गत निवडणूक वेगळी असा विचार फ्रेंच मतदार करतील, असा त्यांचा विश्वास दिसतो. तर मारी ला पेन यांनी मॅक्रॅान यांना खवचटपणे आश्वासन दिले की, “चिंता करू नका. आम्हाला देशांतर्गत निवडणुकीतही बहुमत मिळाले तरी आम्ही आपल्याला आता आणि 2027 नंतरही सहकार्यच करू”. पण मॅक्रॉन तिसऱ्यांदा अध्यक्षपदाची निवडणूक लढण्यास पात्रच  नाहीत, हे काय मारी ला पेन यांना माहीत नसेल होय? 23 जून 2024ला झालेल्या जनमत चाचणीत मारी ला पेन. यांच्या उजव्या आघाडीला 35.5%, डाव्यांना 29.6% तर  मॅक्रॅान यांच्या मध्यममार्गी आघाडीला फक्त 19.5% मते मिळाली व तिसरे स्थान स्वीकारावे लागले.

   युरोपियन पार्लमेंटमध्ये या 2024 च्या  निवडणुकीनंतरही मध्यममार्गी (सेंटरिस्ट) आघाडीलाच 720  सदस्य असलेल्या सभागृहात बहुमत मिळाले आहे. पण युरोपीयन युनीयनच्या सात सदस्य देशांमध्ये आजच उजव्या विचारसरणीची सरकारे सत्तेवर आहेत. मध्यपूर्वेतील देश आणि आफ्रिका येथून येणाऱ्या स्थलांतरितांबाबतचे धोरण, तसेच महिला आणि ‘एलजीबीटीक्यू’ समुदायाचे हक्क, हरित ऊर्जा अशा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरील मतदानाच्या वेळी उजवे गट मध्यममार्गींना  निर्णय घेतांना अडचणीचे ठरू शकतात. कारण ते गटातटात विभागले आहेत. सध्याच्या उर्सुला व्हॅान डर लेयेन यांनाच युरोपीयन कमीशनच्या अध्यक्षा म्हणून आणखी एक संधी मिळणार असली तरी त्यांची कारकीर्द ही एक तारेवरची कसरतच ठरणार आहे.