Monday, July 22, 2024

 तरूण भारत, नागपूर.   मंगळवार, दिनांक २३/०७/२०२४ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.   

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?   

  

ब्रिटनमध्ये मजूरपक्षाची दिग्विजयी दमदार दौड!


(उत्तरार्ध)

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

   ब्रिटिश मतदारांनी मे 1979 साली सत्ता मजूर पक्षाकडून हुजूर पक्षाकडे सोपविली होती. मार्गारेट थॅचर या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत्या. त्या 11वर्षे आणि 209 दिवस (4 मे 1979 ते 28 नोव्हेंबर 1990) पंतप्रधानपदी होत्या. दुसऱ्या महायुद्धानंतर एवढा मोठा कालखंड कोणाच्याही वाट्याला आला नव्हता. त्या कडक स्वभावाच्या, अतिनिग्रही आणि ठामेठोक भूमिका घेणाऱ्या म्हणून ओळखल्या जात. लोक त्यांना ‘आयर्न लेडी’ म्हणत असत. 28 नोव्हेंबर 1990 ला जॅान मेजर यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे थॅचर यांच्याकडून स्वीकारली. त्यांची कारकीर्द 2 मे 1997 पर्यंत होती. 

   कधी हा तर कधी तो!

  ब्रिटिश मतदारांनी 1997 मध्ये मात्र मजूरपक्षाला 418 जागांवर विजय मिळवून दिला.  टोनी ब्लेयर यांच्या वाट्याला  अभूतपूर्व यश चालून आले.  2 मे 1997 ते 27 जून 2007 या 10 वर्ष 57 दिवसांच्या कालखंडात ते पंतप्रधानपदावर होते.  अमेरिकेवर  झालेल्या 9/11 च्या हल्ल्यानंतर  राष्ट्राध्यक्ष  जॅार्ज बुश यांनी अफगाणिस्तान आणि इराक यांच्या विरोधात सुरू केलेल्या  युद्धांना ब्लेअर यांनी बिनशर्त व संपूर्ण पाठिंबा दिला. ब्रिटनच्या इतिहासात अशी गोष्ट पूर्वी कधीही घडली नव्हती. त्यामुळे अनेक टीकाकार त्यांना ‘बुशचा चमचा’ म्हणून हिणवू लागले होते. मजूर पक्षाच्याच गॅार्डन ब्राऊन  यांनी 27 जून 2007 – 11 मे 2010 या काळात ब्रिटनचे पंतप्रधानपद सांभाळले. नंतर पुन्हा हुजूर पक्षाचे डेव्हिड कॅमेरॅान 2010 ते 2016 या कालखंडात   ब्रिटनचे पंतप्रधान होते. 2010 ते 2015 या कालखंडात मात्र कॅान्झर्व्हेटिव्ह पक्षाला (हुजूर पक्ष)  लिबरल डेमोक्रॅट्स पक्षाशी तडजोड करीत उपपंतप्रधानपद देऊन  आघाडीचे सरकार चालवावे लागले होते. दुसऱ्या महायुद्धानंतर ब्रिटनच्या वाट्याला असा नामुष्कीचा प्रसंग प्रथमच आला होता. पण 2015 मध्ये मात्र ब्रिटिश मतदारांनी कॅान्झर्व्हेटिव्ह पक्षाला (हुजूर पक्ष) 331 जागी पुन्हा निवडून आणीत स्पष्ट बहुमत बहाल करून सर्वांना आश्चर्यचकित केले. डेव्हिड कॅमेरून हे पुन्हा ब्रिटनचे पंतप्रधान झाले. पण त्यांनी हात दाखवून अवलक्षण ठरावा असा अजब व अनावश्यक निर्णय घेतला. ब्रिटनच्या इतिहासात असा अजब प्रकार प्रथमच घडला असावा. पार्लमेंटमध्ये स्पष्ट बहुमत असतांनाही ब्रिटनने युरोपियन युनीयन मध्ये ‘रहावे, की बाहेर पडावे (ब्रेक्झिट)’ यावर त्यांनी 23 जून 2016 ला जनमत चांचणी (रेफरेंडम) घेतली. त्यात ‘रहावे’ च्या बाजूने 48% तर ‘बाहेर पडावे’ या बाजूने 52% मते पडली. पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून हे खुद्द ‘रहावे’ या मताचे होते व तसा त्यांनी प्रचारही केला होता. पण 52% जनमत ‘बाहेर पडावे’ या बाजूने आल्यामुळे त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. हुजूर पक्षाच्याच थेरेसा मे या पंतप्रधान झाल्या. पण  सत्ताधारी हुजूर पक्षाच्याच 100 पेक्षा जास्त सदस्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेत 202 विरुद्ध 423 अशा भरपूर मताधिक्याने ‘बाहेर पडावे’ ही जनमताची भूमिका फेटाळून लावली. जनमत एका बाजूचे तर पार्लमेंटचे सदस्य अगदी विरुद्ध, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली. थेरेसा मे यांनी 8 जूनला पार्लमेंटची पुन्हा निवडणूक घेतली. पण आता हुजूर पक्षाचे बहुमत जाऊन शिवाय 9 जागा कमी पडल्या. या त्रिशंकू स्थितीत आघाडीचे सरकार बनवावे लागले. पार्लमेंटमधला तिढा कायमच राहिला. पार्लमेंट काहीकेल्या बाहेर पडण्यास (ब्रेक्झिट) संमती देईना. शेवटी थेरेसा मे पायउतार झाल्या  व 24 जुलै 2019 ला हुजूर पक्षाचेच बोरिस जॅानसन पंतप्रधान झाले. पण पार्लमेंटची नकारघंटा कायमच राहिली. शेवटी जॅानसन यांनी तिसऱ्यांदा 12 डिसेंबर 2019 ला निवडणूक घेतली. या निवडणुकीत मात्र ब्रिटिश मतदारांनी हुजूर पक्षाच्या पदरात 365 जागा टाकल्या व युरोपियन युनीयनमधून बाहेर पडण्याचा मार्ग प्रशस्त करून दिला. मतदारांनी शहाणपण शिकविले पण नेत्यांची नामुष्की व्हायची ती झालीच!

   हुजूर पक्षाचा सुमार कारभार 

  सुरवातीचे  पंतप्रधान बोरिस जॅानसन (2019 ते 2022) हे बेभरवशाचे व खोटारडे म्हणून अगोदरपासूनच कुप्रसिद्ध  होते. 2022 मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर फक्त 44 दिवसांसाठी विक्षिप्त लिझ ट्रस या पंतप्रधानपदी होत्या.  2022 मध्येच ऋषि सुनक हे फक्त 1वर्ष 8 महिने आणि काही दिवसांसाठीच पंतप्रधानपदी होते. त्यामुळे एवढ्या अल्पावधीत स्वपक्षातील भ्रष्टाचाऱ्यांचे व्यवहार, बेरोजगारी आणि महागाई या समस्या त्यांना हाताळता आल्या आल्या नाहीत. तसेच हुजूर पक्षाच्या विश्वासार्हतेला लागलेली घसरगुंडीही त्यांना थांबवता आली नाही. हुजूर पक्षाला चपराक मारीत मतदारांनी आज ब्रिटनमध्ये मजूर पक्षाला विक्रमी जागा मिळवून दिल्या आहेत. 

जागा व मतांची टक्केवारी(2024)

  1. मजूर पक्ष – 410 जागा व 34% मते,

2 ) हुजूर (कॅान्झर्व्हेटिव्ह) –120 जागा व 24% मते  

3 ) लिबरल डेमोक्रॅट पक्ष  – 71जागा व 12% मते,

4) स्कॉटिश नॅशनल पार्टी(एसएनपी) - 9 जागा व 2% मते

5) रिफॅार्म पार्टी - 5 जागा व  14% मते

 6) ग्रीन पार्टी -  4 जागा व 7% मते 

  ‘मतांची जास्त टक्केवारी पण कमी जागा’, यामुळे ब्रिटनमध्ये निवडणूक पद्धतीवर नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे किंवा कसे यावर विचारमंथन सुरू झाले आहे.

  आता ब्रिटनला युरोपीय महासंघात परतणे शक्य होणार नाही. मात्र युरोपबरोबरचे संबंध अधिक मजबूत करण्यावर स्टार्मर भर देऊ शकतील. भारताबाबत बोलायचे तर आज भारताला ब्रिटनची जेवढी आवश्यकता आहे, त्यापेक्षा ब्रिटनलाच भारताच्या मदतीची गरज जास्त आहे, हे स्पष्ट आहे.   

  निवडणुकीपूर्वीच   द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यासाठी भारत-ब्रिटन या देशांनी मुक्त व्यापार करारासाठी पुढाकार घेतला होता. दोन्ही देश परस्पर देशांमधील गुंतवणूक आणि सेवा व्यापाराला चालना देण्यासाठीचे निकष सुलभ करण्यावर भर देणार होते. त्याबरोबरच उभय देशांमधील व्यापार केलेल्या जास्तीत जास्त वस्तूंवरील आयात शुल्क कमी करणे, यावर भर दिला जाणार होता. आता या प्रश्नी नव्याने  पण अनुकूल विचार होईल.

2024 मध्ये हुजूर पक्षाचे  ऋषी सुनक आणि मजूर पक्षाचे नेते कीर स्‍टार्मर या दोघांनीही ब्रिटनमधील खलिस्तान्यांची आणि पाकिस्तान्यांची परवा न करता हिंदू मते आपल्याकडे वळविण्याचा भरपूर प्रयत्न केला.  ऋषी सुनक यांनी श्री स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. तिथे त्यांनी हिंदूंना वचन दिले की, ‘मी समाजाला अभिमान वाटेल, अशी कामगिरी करीन’. मजूर पक्षात अनेक  हिंदूविरोधी नेते असून ते खलिस्तानवाद्यांची आणि पाकिस्तानची बाजू घेत असतात. म्हणून मजूर पक्षाचे स्टार्मर यांनी त्यांना बाजूला सारले आणि स्वत: स्वामीनारायण मंदिराला भेट दिली. तिथे त्यांनी भारतासोबत धोरणात्मक संबंध अधिक मजबूत करीन, असे आश्वासन दिले. ब्रिटनमधील हिंदू संघटनांनी एक ‘हिंदू जाहीरनामा’ही घोषित केला आहे. त्यामध्ये त्यांनी लोकप्रतिनिधींनी हिंदूविरोधी द्वेषाचा सामना करण्याबाबत तसेच हिंदू धर्मस्थळांचे संरक्षण करण्याबाबत आश्वासन मिळविले आहे.  


No comments:

Post a Comment