अमेरिकेतील एकतर्फी निवडणुकीचे वेगळेपण
तरूण भारत, नागपूर. मंगळवार, दिनांक 19/11/2024 हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॅागवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक अटीतटीची होईल हा राजकीय निरीक्षकांनी वर्तवलेला अंदाज साफ चुकीचा ठरला. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक राज्यांमध्ये जोरदार मुसंडी मारली. याला पेनसिल्वेनिया, जॉर्जिया, व्हिस्कॉन्सिन आदी बेभरवशाची राज्येही (स्विंग स्टेट्स) अपवाद ठरली नाहीत. या राज्यांची इलेक्टोरल मते निर्णायक ठरली. डोनाल्ड ट्रंप यांच्यासारखे पुनरागमन अमेरिकेत गेल्या अनेक वर्षात पहायला मिळाले नव्हते.
तिहेरी विजय
रिपब्लिकन पक्षाने अध्यक्षपद जिंकले आहे. सिनेटमध्येही 100 पैकी 53 जागा (पण सुपरमेजॅारिटीला 7 कमी) रिपब्लिकन पक्षाकडे आहेत. 435 सदस्य संख्या असलेल्या हाऊसच्या निवडणूकीतही सद्ध्याच 435 पैकी 218 जागा, म्हणजे बहुमत, रिपब्लिकन पक्षाला मिळाले आहे. शिवाय अजून 9 जागांचे निकाल यायचे आहेत. रिपब्लिकन पक्षाचे हे तिहेरी यश असणार आहे. मात्र सिनेटमध्ये अनेक प्रश्नी सुपरमेजॅारिटी (60% मते) ठरावाच्या बाजूने असेल तरच तो ठराव पारित होतो. ही उणीव शिल्लक आहे. यापूर्वी रिपब्लिकन पक्षाला 28 जानेवारी 2017 ते 3 जानेवारी 2019 या काळात तिहेरी यश मिळाले होते तर डेमोक्रॅट पक्षाला 20 जानेवारी 2021 ते 3 जानेवारी 2023 या काळात तिहेरी यश मिळाले होते. याही अगोदर डिसेंबर 1932 ते 1946 या काळात तिहेरी यशाचा विक्रम डेमोक्रॅट फ्रॅंकलीन रुझवेल्ट व हॅरी ट्रुमन यांच्या नावे आहे. तर 1897 ते 1911 या काळात रिपब्लिकन पक्षाचा असाच विक्रम विल्यम मॅकिन्ले, थिओडॅार रुझवेल्ट व विल्यम टॅफ्ट यांच्या नावे होता, अशी नोंद आहे. तिहेरी यश असेल तर त्या पक्षाला निर्वेधपणे आपला कार्यक्रम राबवता येतो. सनातनी विचारांचे 6 न्यायाधीश सर्वोच्च न्यायालयात आहेत. एकूण 9 तहाहयात न्यायाधीशांपैकी 6 हीही सुपरमेजॅारिटीच आहे. आत्तापर्यंत 14.5 कोटी म्हणजे 93.5 % टक्के मतांची मोजणी झाली आहे. डेमोक्रॅट पक्षाला 7.1 कोटी म्हणजे 48 टक्के मते मिळाली आहेत आणि रिपब्लिकन पक्षाला 7.5 कोटी म्हणजे 50.5 टक्के मते मिळाली आहेत.
7 स्विंग स्टेट्समधील एकूण 93 इलेक्टोरल व्होट्स आणि रिपब्लिकन पक्षाच्या बढतीची टक्केवारी अशी आहे. (1)अॅरिझोना-11जागा बढत 6.2% (2) जॅार्जिया-16, बढत 2.2% (3)मिशिगन 15जागा, बढत 1.4 % 4) नेवाडा 6 जागा बढत 3.2 % (5) नॅार्थ कॅरोलिना 16 जागा बढत 3.4 % (6)पेन्सिलव्हॅनिया 19 जागा बढत 2.1% (7) व्हिस्कॅान्सिन 10 जागा बढत 0.8% . अमेरिकेतील बहुतेक राज्यात 2020 च्या तुलनेत 2024 मध्ये रिपब्लिकन पक्षाला जास्त मते मिळालेली दिसतात. अशाप्रकारे यावेळी संपूर्ण देशातच रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने एक लहर निर्माण झाली होती.
पत्नी प्रचारापासून दूर का?
ट्रम्प यांनी स्थलांतरितांच्या मुद्दा अतिशय चतुराईने हाताळला. त्यांची पत्नी स्वत: इटलीतून आलेली स्थलांतरित आहे. ट्रंप यांनी तिला प्रचारात उतरवलेच नाही. तशात हॅरिस यांचे स्वतःचे स्थलांतरित व गौरेतर असणे ही तर ट्रम्प यांच्यासाठी अतिशय सोयीची बाब ठरली. ट्रंप यांच्या प्रचाराची दिशा अशी होती. बाहेरून येणारे अमेरिकेत सुरक्षाविषयक प्रश्न निर्माण करीत आहेत, ते ‘इथल्यांचे’ रोजगार घेतात, ‘इथल्यांच्या’ पाळीव प्राण्यांना मारून खातात, ते कर भरत नाहीत, बेकायदेशीर राहूनही सगळ्या सोयीसुविधांचा लाभ घेतात. डेमोक्रॅटिक सरकार पुन्हा सत्तेवर आल्यास भूमिपुत्रांची गळचेपी होईल, हे ट्रंप यांनी मतदारांच्या मनावर बिंबवले. पण आजचे अमेरिकन गोरे हेही भूमिपुत्र ठरत नाहीत, तेही स्थलांतरीतच आहेत, हा मुद्दा उपस्थित करायला मूळ भूमिपुत्रांना आजच्या गोऱ्या अमेरिकनांनी शिल्लकच ठेवलेले नाही. त्यामुळे हा मुद्दा कोण उपस्थित करणार? या मुद्द्यांचा पारपंरिक रिपब्लिकन मतदारांवरच नव्हे, तर तरुण मतदारांवरही परिणाम झाला.
2024 च्या निवडणुकीतील नोंद घेतलीच पाहिजे, असे मुद्दे
1) 50 पैकी 31 राज्ये ट्रंप यांच्या बाजूने. 2) डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूने 19 राज्ये. 3) रिपब्लिकन पक्षाला 7 कोटी 46 लाख पॅाप्युलर व्होट्स आणि 312 इलेक्टोरल व्होट्स तर डेमोक्रॅट पक्षाला 7 कोटी 9 लाख पॅाप्युलर व्होट्स आणि 226 इलेक्टोरल व्होट्स. 4) 24 वर्षानंतर सातही स्विंग स्टेट्स पहिल्यांदाच रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने. 5) डोनाल्ड ट्रंप यांचा प्रति मतदार खर्च कमला हॅरिस यांच्या प्रति मतदार खर्चापेक्षा 8 डॅालरने कमी. 6) अध्यक्षपदी आरूढ होताना डोनाल्ड ट्रंप यांचे वय 78 वर्षे 219 दिवस इतके असेल. म्हणजे डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेचे सर्वात ज्येष्ठ अध्यक्ष असतील.7) डोनाल्ड ट्रंप हे अमेरिकेचे 45 आणि 47 वे अध्यक्ष असतील. कारण 46 वे अध्यक्ष ज्यो बायडेन असणार आहेत. यापूर्वी ग्रोव्हर क्लिनलंड हे 22 वे आणि 24 वे अध्यक्ष 1885 ते 1889 आणि 1893 ते 1897 या काळात होते. 😎 डोनाल्ड ट्रंप एलॅान मस्कवर जाम खूष आहेत, एवढी अभूतपूर्व कामगिरी त्यांनी या निवडणुकीत पार पाडली आहे. 9) ‘मी अमेरिकनांवरील कर्जाबरोबर करही कमी करीन’, डोनाल्ड ट्रंप 10) ‘माझे उपाध्यक्षपदाचे साथीदार जे डी व्हान्स आणि त्यांची भारतीय सौंदर्यवती पत्नी उषा’, हे एक अपूर्व जोडपे आहे, इति ट्रंप 11). ‘मी युद्धे थांबवणारा अध्यक्ष सिद्ध होईन’.12) ट्रंप यांना विजयाबद्दल अभिनंदन करणारे संदेश देशभरातून आणि जगभरातून आले आहेत. वैर विसरून शी जिनपिंग यांनी पाठविलेल्या अभिनंदनपर संदेशात ते म्हणतात, ‘दोन्ही देशांनी संवाद करावा, मतभेदाचे योग्य व्यवस्थापन करावे, परस्पर सहकार्य वाढवावे. दोन्ही देशांनी एकत्र येऊन काम केले तर नक्कीच फायदा होईल’.13) अमेरिकेच्या डेमोक्रॅट अध्यक्षांपेक्षा रिपब्लिकन अध्यक्षांचेच भारताशी अधिक स्नेहाचे संबंध राहिलेले आहेत. कमला हॅरिस तशा भारतीय असतीलही पण त्या आपला आफ्रिकन वारसाच अधिक उघडपणे सांगत आल्या आहेत. त्या पाकिस्तानधार्जिण्या असून त्यांची काश्मीरविषयक भूमिका पाकिस्तानला अनुकूल राहिलेली आहे.
डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूने अमेरिकेत लहर का निर्माण झाली?
1) ज्यो बायडेन भडकलेल्या महागाईला आवर घालू शकले नाहीत. 2) अमेरिकेतील घुसखोरी मी थांबविणारच, ट्रंप यांचा निर्धार. 3) ‘ट्रंप आपला माणूस आहे’, सामान्य अमेरिकन पुरुषांचे मत. 4) ‘अमेरिका हा उजव्या गोऱ्या ख्रिश्चनांचाच देश राहिला पाहिजे’. 5) इव्हॅन्जिअलिस्ट या ख्रिश्चनांमधील सनातनी, कर्मठ, रुढीवादी व परंपरानिष्ठ मतदारांच्या प्रभावी गटाने ट्रंप यांच्या गर्भपात आणि समलिंगीविवाहविरोधी मतामुळे प्रभावित होऊन दिलेली ‘एक गठ्ठा’ मते. 6) कोण ‘कमला हॅरिस तर ती अर्धी एशियन-आफ्रिकन’, ती आपली नाही, त्यातही ती महिला’, सामान्य गोऱ्या अमेरिकन पुरुषांचे मत! असेच मत अनेक महिलांचेही होते!! आता बोला!!!
No comments:
Post a Comment