Monday, February 10, 2025

 तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण

तरूणभारत, नागपूर

मंगळवार दिनांक 11. 02. 2025

हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee?’ या ब्लॅागवरही त्याचवेळी टाकला जातो. वर्ड फाईल व ब्लॉगवरील मजकूर मॅग्निफाय करूनही वाचता येईल.  

तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 

नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  

E mail - kanewasant@gmail.com 

Blog - kasa mee? 

20250211  तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण

   26 नोव्हेंबर 2008 चा  मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. 26  नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात 34 परदेशी नागरिकांसह कमीतकमी 197 जण ठार झाले, तर 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दल यांनी 9 दहशतवाद्यांना ठार केले व उर्वरित एकाला जिवंत पकडून  परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.  अजमल कसाब हा जिवंत पकडला गेलेला एकमेव दहशतवादी होता. रीतसर खटला चालवून त्याला फाशी देण्यात आले.

  मुंबईतील या हल्ल्याशी संबंधित पाकिस्तानी उद्योजक तहव्वूर  हुसेन  राणा हा सद्ध्या अमेरिकेत वेगळ्या कारणास्तव शिक्षा भोगत आहे. त्याला भारताच्या स्वाधीन करण्याचा प्रश्न आजवर मार्गी लागत नव्हता. अमेरिकेची या बाबतीतली उदासीनता आणि अमेरिकन न्यायालयांतील दिरंगाई ही दोन कारणे या मागे होती, असे सांगितले जाते. अमेरिकेतील जुळ्या मनोऱ्यांवरील 9/11च्या हल्ल्याची दखल संपूर्ण जगाने अतिशय गंभीरतेने घेतली. यानंतर जगातील अनेक राष्ट्रे  दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकाच व्यासपीठावर एकत्र झाली. भारताच्या दृष्टीने ही बाब स्वागतार्ह असल्यामुळे भारतही या संबंधातील पुढच्या मोहिमांमध्ये सहभागी झाला.   पण पाकिस्तान या मोहिमेत सहभागी होईना. कोणते ना कोणते निमित्त पुढे करून पाकिस्तानने चालढकल चालविली होती. असे म्हणतात की, शेवटी भरपूर लाच घेऊनच पाकिस्तान या व्यापीठावर सहभागी झाला. खुद्द अमेरिकेवर हल्ला झाला तरच, ती चिडून उठते. संबंधिताला जबर अद्दल घडविल्याशिवाय ती थांबत नाही. जुळ्या मनोऱ्यांवरील 9/11च्या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या लादेनला तिने महत्प्रयासाने हुडकून काढले आणि त्याला समुद्रात अज्ञात स्थळी पुरून मगच उसंत घेतली. 

   पण अशी तत्परता  अमेरिकेने मुंबईच्या हल्ल्याबाबत कधीच दाखविली नाही. अमेरिकेवर झालेला दहशतवादी हल्ला आणि इतर कुठे झालेला दहशतवादी हल्ला याबाबत अमेरिका कारवाई करतांना भेदभाव करते. मुंबईवर झालेल्या हल्ल्याचे बाबतीत याचा भारताला चांगलाच अनुभव आलेला आहे.  पण आता अमेरिकन न्यायालयांनी तब्बल 15 वर्षानंतर नुकताच एक महत्त्वाचा निर्णय 21 जानेवारी 2025 ला दिला आहे. त्यानुसार तहव्वूर  हुसेन राणाला भारताच्या स्वाधीन करण्यास हरकत नसल्याचे म्हटले आहे. त्याने दाखल केलेला  ‘रिट ॲाफ सर्टिओररी’, कोर्टाने फेटाळून लावला. भारत आणि अमेरिका यात  प्रत्यार्पण करार असल्यामुळे आपल्या ताब्यात असलेल्या गुन्हेगार व्यक्तीला त्या  देशाने  करार केलेल्या देशाच्या स्वाधीन  करावे असे आहे. पण या करारानुसार जर गुन्हेगाराला एका देशात शिक्षा झाली असेल तर त्याला दुसऱ्या देशात त्याच गुन्ह्यासाठी शिक्षा करता येत नाही. या तरतुदीला ‘नॉन बिस इन आइडेम’ असे म्हणतात. या तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तीला एकाच आरोपासाठी दोनदा  शिक्षा करता येणार नाही, हे खरे असले तरी राणावरचे भारताचे आणि अमेरिकेचे आरोप वेगवेगळे असल्यामुळे अमेरिकन कोर्टाने राणाची त्याला भारताकडे न सोपविण्याची विनंती अमान्य केली.  त्यामुळे आता राणाला भारतात आणल्यानंतर पुढील न्यायिक प्रक्रिया सुरू करता येणे शक्य झाले आहे. 

   अमेरिका स्वत:साठी एक मापदंड लावते तर इतरांसाठी वेगळा मापदंड लावते. स्वत:चे हितसंबंध सुरक्षित ठेवण्यावरच अमेरिकेचा भर असतो. दहशतवादाकडे पाहण्याचा सर्वांचा एकच मापदंड असावा, असा विचार अमेरिकेने आजवर तरी कधीही केलेला नाही, सर्वशक्तिमानतेचा दावा करणाऱ्या अमेरिकेला तर ही दुटप्पी भूमिका मुळीच शोभणारी नाही.

  तहव्वूर हुसेन राणा हा पाकिस्तानी नागरिक आहे. तो व्यवसायाने डॅाक्टर आहे. तो सैन्यदलातही होता. त्याची पत्नी सुद्धा डॅाक्टर आहे. त्याने 2001 मध्ये  कॅनडाची नागरिकता स्वीकारली. पुढे तो लष्कर- ए-तोयबाच्या संबंधात आला. लष्कर ए तोयबा ही दक्षिण आशियातील एक मोठी इस्लामी संघटना आहे. ती मूलतत्त्ववादी आणि दहशतवादी संघटना आहे. भारत, पाकिस्तान, अमेरिका, ब्रिटन, युरोपीयन युनीयन, रशिया आणि ऑस्ट्रेलिया या देशात या संघटनेवर बंदी आहे, हे लक्षात घेतले म्हणजे तिचे उपद्रव मूल्य लक्षात येईल. लष्कर -ए- तोयबाला मदत केल्याच्या आरोपावरून राणाला 2011 मध्ये अटक करण्यात आली होती. एका डॅनिश वृत्तपत्राविरुद्ध कट रचल्याचाही आरोप त्याच्यावर होता. 2008 च्या मुंबई हल्ल्यामध्ये सामील असल्याचा आरोप तर त्याच्यावर आहेच. 

   तहव्वूर हुसेन राणाला अमेरिकन कोर्टाने 14 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा केली आहे. तो मूळचा पाकिस्तानी आणि नंतर कॅनेडियन उद्योजक आहे. भारताने त्याला भगोडा म्हणून जाहीर केले आहे. त्याचा 2008 च्या मुंबई हल्ल्यात हात आहे, हे मान्य करून अमेरिकन कोर्टाने त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यास संमती दिली आहे.

   ॲाक्टोबर 2009  ला  राणा आणि हेडली यांनी ‘जैलॅंड पोस्टन’ या वृत्तपत्राच्या कार्यालयावर  हल्ला केला होता.  मोहंमद साहबांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र छापल्याबद्दल हा हल्ला केल्याचा आरोप यांच्यावर आहे. याबाबतची चौकशी सुरू असतांनाच्या काळात राणा मुंबईला आला होता. आपण मुंबईला पत्नीसह गेलो होतो. कॅनडात नागरिकता स्वीकारण्याची इच्छा असलेल्यांच्या मुलाखती आपणास घ्यावयाच्या होत्या अशी सबब राणाने बचावादाखल दिली होती. त्याने यासाठी मुंबईत एक कार्यालयही सुरू केले होते. आपण शांततावादी असून हेडलीने आपल्याला खोट्या आरोपाखाली अडकवल्याचे राणाने कोर्टाला सांगितले होते. प्रत्यक्षात राणा आणि हेडली हे बालपणापासूनचे घनिष्ट मित्र आहेत.

   ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेने मुंबई हल्ल्याचे कारस्थान रचले आणि पाकिस्तानी लष्करातील काही अधिकाऱ्यांनी त्यासाठी आवश्यक ती रसद पुरविली. हल्ल्याच्या पूर्वी ‘लष्कर’शी संबंधित दहशतवाद्यांनी मुंबईत येऊन पाहणी केली होती. या हल्ल्याच्या मुख्य सूत्रधारांपैकी एक असलेला डेव्हिड कोलमन हेडली हा त्यांपैकीच होता. या संपूर्ण कारस्थानात तहव्वूर राणा हा त्याचा साथीदार होता. मुंबई हल्ल्यासाठी लागणारी साधनसामग्री राणाने ‘लष्कर-ए-तैयबा’ या दहशतवादी संघटनेला पुरविली होती, राणाच्या मुंबईतील  कार्यालयात एक कर्मचारी म्हणून हेडली मुंबईत येऊन थांबला  होता. 

   सध्या अमेरिकेत लॉस एंजेलिस येथे राणाला ठेवण्यात आले आहे. त्याला आपल्या ताब्यात घेण्यासाठीची तयारी भारतीय यंत्रणांनी केली असून, लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक तुकडी तिथून त्याला भारतात आणण्यासाठी रवाना होते आहे.

    राणाचा ताबा मिळताच चौकशीतून हल्ल्याच्या 26/11च्या कटातील त्याच्या सहभागाचा तपशील तर समोर येईलच, शिवाय  पाकिस्तान एक देश म्हणून या कटात किती मोठ्या प्रमाणात सहभागी होता, तेही जगासमोर ठेवता येईल.  या हल्ल्याचे कारस्थान शिजविण्यासाठी पाकिस्तानी यंत्रणांनी त्यांच्या देशाचा वापर तर करू दिला होताच शिवाय या यंत्रणा दहशतवाद्यांना सर्व प्रकारची मदतही करीत होत्या. 

  या खटल्याच्या निमित्ताने दोन गोष्टी साध्य होणार आहेत. मुंबई हल्ल्यातील राणाचा सहभाग जसा समोर येईल, तसेच पाकिस्ताचे कपटही जगासमोर उघड होईल.