Monday, February 24, 2025

     ✅20250221 ट्रंप यांचे स्वप्न बृहन् अमेरिकेचे

लेखांक १ ला

तरूण भारत, नागपूर मंगळवार, दिनांक १०/१०/२०२३ हा लेख फोटोस्वरुपात व वर्ड फाईल स्वरुपात फेसबुकवर उपलब्ध असतो. तसेच. ‘kasa mee? या ब्लॅागवरही उपलब्ध असतो

 ✅20250221 ट्रंप यांचे स्वप्न बृहन् अमेरिकेचे

लेखांक १ ला

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 

   आजच्या घडीला युनायटेड स्टेट्स अॅाफ अमेरिका (युएसए) हे एक बलाढ्य राष्ट्र असून त्यात 50 राज्ये घटक स्वरुपात सामील झालेली आहेत. या 50 राज्यांनी आपले स्वामित्वाचे अधिकार एका संघराज्याबरोबर (फेडरेशन) वाटून घेतले आहेत. आजचा अमेरिकन नागरिक, हा तो ज्या राज्यात राहतो त्या राज्याचा आणि संघराज्याचा (फेडरेशन) आशा दोघांचाही नागरिक आहे. घटक राज्ये (स्टेट्स) आणि त्यांचे मिळून तयार झालेले संघराज्य (फेडरेशन) यांचे अधिकार कोणते असावेत, हे संघराज्याच्या घटनेत नमूद केलेले आहे. अशा प्रकारचे संघराज्य उभारल्यास एक शक्तिमान राष्ट्र उभे करता येईल ही कल्पना मांडणारे  डेलावेअर हे पहिले राज्य होते. असे संघराज्य निर्माण होत असेल तर त्यात आपण विनाअट सामील होण्यास तयार आहोत, असे डेलावेअरने 18 व्या शतकाचे 13 महिने शिल्लक असतांना जाहीर केले. ही कल्पना पेन्सिलव्हॅनिया आणि न्यू जर्सी या राज्यांनी उचलून धरली. यथावकाश अशी 13 राज्ये एकत्र आली. नंतर क्रमाक्रमाने इतर राज्ये यात सामील झाली. अलास्का, ल्युसियाना आणि हवाई या नावाने ओळखले जाणारे प्रदेश चक्क खरेदी करण्यात आले.  आंतरराष्ट्रीय व्यवहारासंबंधातले काही मोजके अधिकार संघराज्याकडे ठेवण्यात आले असून इतर सर्व अधिकार घटक राज्यांकडेच कायम ठेवण्यात आले आहेत. राज्यांनी या संघराज्यात सामील व्हावे म्हणून हे धोरण स्वीकारण्यात आले. आजचे बलशाली युनायटेड स्टेट्स अॅाफ अमेरिका हे 50 राज्यांचे संघराज्य कसे निर्माण झाले, त्याची जन्मकथा काहीशी अशी आहे. 

   एका पाहणीनुसार आज रशिया क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा देश आहे. त्याचे क्षेत्रफळ ठोळमानाने 17.1 मिलियन चौकिमी म्हणजे भारताच्या जवळजवळ 6 पट आहे. त्यानंतर नंबर लागतो कॅनडाचा.  त्याचे क्षेत्रफळ 9.98 चौकिमी म्हणजे भारताच्या 3 पटीपेक्षा जास्त आहे. आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे चीन. त्याचे क्षेत्रफळ 9,60 मिलियन चौकिमी म्हणजे भारताच्या 3 पटीपेक्षा जास्त  आहे. अमेरिकेचा नंबर आहे चौथा. तिचे क्षेत्रफळ आहे 9.59  मिलियन चौकिमी. म्हणजे भारताच्या 3 पटीपेक्षा जास्त आहे.

2024 च्या निवडणूक प्रचारात डोनाल्ड ट्रंप  यांचा नारा ‘एमएजीए- मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असा होता. आजच्या परिस्थितीत अमेरिकेला पुन्हा महान बनवायचे असेल तर  अमेरिकेचा भौगोलिक विस्तार होणे आवश्यक आहे, असे ट्रंप यांच्यासह अनेकांचे मत आहे. त्यासाठी काही भूभाग अमेरिकेला जोडले पाहिजेत, असे अमेरिकेचे नवनिर्वाचित ट्रंप यांच्या मनाने घेतले आहे. ट्रम्प यांनी सर्वप्रथम शेजारी देश कॅनडा या देशाची पहिल्या क्रमांकावर निवड केली आहे. 

  डोनाल्ड ट्रम्प यांनी  20 जानेवारी 2025 रोजी अध्यक्षपदाची शपथ घेतली. मात्र अधिकृतपणे देशाची सूत्रे हाती घेण्यापूर्वीच त्यांनी 'अखंड अमेरिका' योजना आखण्यास सुरुवात केली होती. यासाठी त्यांनी कॅनडा, ग्रीनलँड, पनामा कालवा आणि मेक्सिकोचे आखात यांची निवड केली आहे.  मुंगेरीलालचे स्वप्न म्हणून या मताची बोळवण करणे योग्य ठरणार नाही. याबाबत अमेरिकेचा आजवरचा इतिहास काय सांगतो, ते पाहणे उपयोगाचे ठरेल. 

     यापूर्वी अमेरिकेने रशियाकडून अलास्का हा भूभाग खरेदी केला आहे. 1867 साली तब्बल 72 मिलियन डॅालर मोजून अमेरिकेने ही खरेदी केली. त्यावेळी अॅंड्र्यू जॅानसन अमेरिकेचे अध्यक्ष होते. या खरेदीनंतर उत्तर अमेरिकेतील रशियाचे अस्तित्व संपुष्टात आले. सामरिकदृष्टीने विचार केला तर अमेरिकेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल होते. या खरेदीमुळे अमेरिकेला पॅसिफिक महासागरात प्रवेश करण्याचा मार्ग उपलब्ध झाला. पुढे 3 जानेवारी 1959 ला अलास्का अमेरिकेचे 49 वे राज्य म्हणून अस्तित्वात आले. यामुळे अमेरिकेचे क्षेत्रफळ पूर्वीच्या तुलनेत जवळजवळ दुप्पट झाले. अलास्का तसा कॅनडाच्या जास्त जवळ होता पण एकतर 1867 साली कॅनडा स्वत:च देश म्हणून अस्तित्वात नव्हता. ती ब्रिटनची वसाहत होती. दुसरे असे की, ब्रिटन आणि रशियाचे तेव्हा वैर होते. आपल्या वैऱ्याला अलास्का विकण्याची रशियाची तयारी नव्हती. म्हणून रशियाने अमेरिकेची निवड केली. अमेरिकेने अशीच आणखी एक खरेदी केली. तिने फ्रान्सकडून लुसियाना 1803 मध्ये 15 मिलीयन डॅालरला खरेदी केले. त्यावेळी जेफरसन अमेरिकेचे अध्यक्ष होते. त्यावेळी नेपोलियन बोनापार्टला (1799 ते 1815) उत्तर अमेरिकेत काहीही लाभ दिसत नव्हता. त्यावेळी फ्रान्सचे ब्रिटनशी युद्ध सुरू होते. नेपोलियनला पैशाची गरज होती. म्हणून नको असलेला भूभाग नेपोलियनने अमेरिकेला विकला. हा एकूण व्यवहार जगाच्या इतिहासातला सर्वात मोठा सौदा मानला जातो. 

  डोनाल्ड ट्रंप यांना ग्रीनलंडवरही ताबा हवा आहे.  ग्रीनलंड विकायचे आहे का, अशी चौकशी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी आपल्या पहिल्या कारकिर्दीतच केली होती. यावर तुमचा प्रस्ताव हास्यास्पद व बिनडोक (ॲबसर्ड) आहे असे डॅनिश (डेन्मार्क) सरकारच्या पंतप्रधानांनी - मेटी फ्रेडरिकसन यांनी - नाराजीने व चिडून उत्तर दिले होते.  यामुळे  चिडून जाऊन डोनाल्ड ट्रंप यांनी मेटी फ्रेडरिकसन यांना एक घाणेरडी बाई म्हणून शिवी हासडली आणि नंतर आपले संबंध अधिक चांगले, मैत्रीचे व बळकट करण्याच्या हेतूने आखलेला डेन्मार्कचा दौराच  रद्द केला.

   ग्रीनलँड हा अजस्र भूभाग (2.2 मिलियन चौरस किमी) क्षेत्रफळ वेळ पडल्यास डेन्मार्ककडून हिसकावून घेऊ अशी धमकी मध्यंतरी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली होती. ती धमकी खरी होती की लुटुपुटूची, यावर अजूनही खल सुरू आहे. पण दोस्ती किंवा धमकीच्या माध्यमातून या बेटावर ताबा मिळवण्याचा त्यांचा निर्धार पक्का आहे. यातून अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होईल. कारण ट्रम्पना काय वाटते याबरोबरच, ग्रीनलँडवासियांना काय वाटते, ग्रीनलँडचा मर्यादित ताबा असलेल्या डेन्मार्कचे मत काय, यावरही चर्चा सुरू आहे. 10 रिपब्लिकन खासदारांनी याबाबत डेन्मार्कशी चर्चा करण्याचे अधिकार ट्रंप यांना देण्याबाबतचा ठराव मांडला आहे. ग्रीनलँड हे बेट निसर्गसंसाधनसंपन्न आहे. तसेच रशियाच्या वाढत्या आक्रमक हालचालींच्या पार्श्वभूमीवर या बेटाचे व्यूहात्मक स्थान आणि महत्त्वही अनन्यसाधारण आहे. अवघ्या 56 हजार लोकवस्तीचे ग्रीनलँड हे बेट म्हणजे मर्यादित स्वायत्तता असलेला डेन्मार्कचा भूभाग आहे. हे जगातील सर्वांत मोठे बेट आहे. ते भौगोलिक दृष्ट्या उत्तर अमेरिका खंडात गणले जाते. पण सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या ते कित्येक वर्षे युरोपशी जोडले गेले आहे. जवळपास हजारेक वर्षे हे बेट नॉर्वे आणि डेन्मार्कच्या मालकीचे मानले जाई. कारण या भागांमध्ये याच दोन देशांचे दर्यावर्दी समुद्रभ्रमण करत असत. या भागात त्यांच्याही आधी कॅनडा व उत्तर अमेरिकेतून इनुइट जमाती आल्या होत्या. हेच येथील मूळ निवासी मानले जातात. 17 व्या शतकात डॅनिश आणि नॉर्वेजियन दर्यावर्दी ग्रीनलँडमध्ये पुन्हा आले आणि त्यांनी येथे वसाहती स्थापन केल्या. 1814 मध्ये एका मोठ्या भूभागाचे विभाजन होऊन  डेन्मार्क आणि नॉर्वे अशी दोन राष्ट्रे जन्माला आली. त्यावेळी ग्रीनलँडचा ताबा डेन्मार्ककडे आला.   


   ——



No comments:

Post a Comment