शांघाय सहयोग संघटनेचे बिश्केक संमेलन
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
१५ जून २००१ रोजी शांघाय येथे स्थापन झालेल्या, शांघाय सहयोग संघटन (शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनच्या -एससीओ) च्या चीन, रशिया, कझख्स्तान, किरगिझस्तान, तजिकिस्तान व उझबेकिस्तान या मूळच्या सदस्य देशांच्या आणि 2017 पासून सदस्यत्व प्राप्त असलेल्या भारत आणि पाकिस्तान या देशांच्या, प्रमुखांचे संमेलन किरगिझस्तानाची राजधानी बिश्केक येथे नुकतेच संपन्न झाले. बेजिंग येथे मुख्यालय असलेली आणि चिनी व रशियन या अधिकृत व्यवहार भाषा असलेली ही युरेशियातील (युरोप व आशिया खंडातील) संघटना राजकीय, आर्थिक आणि संरक्षण या विषयांशी संबंधित आहे.
रशियाची गरज
रशियाने प्रथम क्रीमियाला सामील करून घेतले, हा घास पचताच युक्रेन हा युरेनियम संपन्न देशही कोणताही विधिनिषेध न पाळता काबीज करण्याचा प्रयत्न सुरू केला. ही उदंडता अमेरिकादी राष्ट्रांना अर्थातच सहन झाली नाही. त्यांनी नाटो व जी 8 मधून रशियाची हकालपट्टी केली. पण रशियाने या कारवाईला भीक घातली नाही. विघटन होण्यापूर्वी कझख्स्तान, किरगिझस्तान, तजिकिस्तान, उझबेकिस्तान आदी देश सोव्हिएट रशियाचेच भाग होते. ते अमेरिकेच्या छत्रछायेखाली जाण्याचा धोका होता. सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर दुरावलेल्या या देशांना पुन्हा आपल्या पंखाखाली घेणे, ही रशियाची व असा आधार मिळावा, ही या देशांचीही इच्छा होती. याशिवाय चीनला सोबतीला घेऊन अमेरिकेविरुद्ध एक आघाडी उभी करणे हा मुख्य हेतूही रशियासमोर होताच. त्यामुळे चीनने प्रस्ताव ठेवताच हे संघटन उभे करण्यास रशियाने अनुकुलता दाखविली, असे मानले जाते. या निमित्ताने चीन व रशियातील सीमावादावरही तोडगा निघाला तर तेही रशियाला हवेच होते.
सुरवातीला चीनचे दोन्ही डगरीवर हात
सुरवातीला चीनचे कधी रशियाशी दोस्ती तर कधी अमेरिकाशी दोस्ती असे दोन्ही डगरीवर हात ठेवून पाहिले. कारण चीनला अमेरिकेशी व्यापारी संबंध हवे होते तर रशियाशी चीनची सैधांतिक जवळीक होती. तसेच सोव्हिएट रशियाच्या विघटनानंतर केवळ अमेरिकेच्या छत्रछायेखालचे एकधृवीय जग रशियाप्रमाणे चीनलाही नकोच होते. चीन व रशिया एकत्र असले तर कोण कुणावर कुरघोडी करणार हा मुद्दा रशियासाठी महत्त्वाचा आहे पण चीनला अशी चिंता कधीच नव्हती व नसतेही. कारण अशा बाबतीत आजवर तरी चीनला कुणीच मात दिलेली नाही. त्यामुळे चीनने योजना मांडणे व रशियाने त्यात सामील होणे अपेक्षितच होते व तसे ते जुळून आले.
भारत व पाकिस्तानला का व कसे सामील करून घेतले.
भारताला या गटात सामील करून घेण्याची रशियाची इच्छा होती. चीनला हे नको होते. कारण चीन भारताला प्रतिस्पर्धी मानतो. न्युक्लिअर सप्लाय ग्रुपमध्ये सुद्धा चीनला भारत नकोच होता आणि आजही नकोच आहे. ही कोंडी दूर करण्याची भारताची धडपड सुरू होती. रशियाने भारताला शांघाय कोआॅपरेशन आॅर्गनायझेशनमध्ये सामील करून घेण्याचा प्रस्ताव ठेवताच, उघड विरोध करणे शक्य व इष्ट नसल्यामुळे, मग पाकिस्तान का नको, अशी भूमिका चीनने घेतली. रशियाने चीनची भूमिका मान्य केली व अशा प्रकारे भारत व पाकिस्तान हे दोघेही देश शांघाय सहयोग संघटनेत 1917 मध्ये सामील झाले.
अमेरिका, भारत व चीन यातील व्यापारसंबंध
किरगिझस्तानाची राजधानी असलेल्या बिश्केक येथील वार्षिक संमेलनाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात फावल्या वेळात चर्चा झाली. या बैठकीआधी शिष्टमंडळ पातळीवर बैठकीही झाल्या होत्या. यावेळी पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया आणि पाक पुरस्कृत दहशतवाद हे मुद्दे प्रामुख्याने चर्चिले गेले. दहशतवादी कारवाया आणि चर्चा एकाचवेळी चालू शकत नाहीत, हे स्पष्ट करीत, पाकिस्तानच्या कुरापती आणि दहशतवादी कारवाया यांच्याविरोधात भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करणे कसे आवश्यक होते हे देखील मोदी यांनी जिनपिंग यांना स्पष्ट शब्दात सांगितले. सध्या अमेरिका आणि चीनमध्ये व्यापारयुद्ध भडकले आहे. करांचा हत्यारासारखा वापर करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणाविरुद्ध संयुक्त आघाडी उभारण्याच्या आवश्यकतेवर जिनपिंग यांनी भर दिला. भारताबाबतही अमेरिकेने असाच कठोर पवित्रा घेतला आहे. त्यामुळे भारत आणि चीनच्या संबंधांमधील या सकारात्मक बदलांना महत्त्व आले आहे, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. तसेच भारत आणि चीन संबंधांची 70 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच अनुषंगाने दोन्ही देशांदरम्यान प्रत्येकी 35 असे 70 कार्यक्रम आयोजित करण्याचा प्रस्तावही ठेवण्यात आला.
भारत, चीन व रशिया यांची त्रिपक्षीय बैठक
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतिन यांच्याशीही पंतप्रधान मोदी यांची स्वतंत्र भेट झाली. त्यावेळी परस्पर संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतला गेला. याच चर्चेतून भारत, चीन व रशिया अशा त्रिपक्षीय बैठकीचा विचार पुढे आला आहे. जूनच्या अखेरीला जपानमध्ये होत असलेल्या ‘जी-20’ सदस्यदेशांच्या परिषदेच्या वेळी फावल्या वेळात ही त्रिपक्षीय बैठक होण्याचे घाटते आहे. रशियाच्या पूर्वेकडील प्रांतांचा आर्थिक विकास व्हावा आणि तेथे परकीय गुंतवणूक वाढावी, यासाठी रशियात सप्टेंबरमध्ये ‘ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम’ ही वार्षिक परिषद व्लादिवोस्तोक येथे होत आहे. यंदा या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रमुख पाहुणे म्हणून रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आमंत्रित केले आहे. मोदी यांनी त्यांचे आमंत्रण स्वीकारले असून ते रशियाला सप्टेंबरमध्ये भेट देणार आहेत.
संमेलनाची फलश्रुती
बिश्केक संमेलनात सर्व सदस्यांसमोर मोदींचे सहकार्य आणि विकास तसेच विभागीय व जागतिक स्थैर्य या विषयावर भाषण आयोजित होते. या भाषणात आरोग्य, आर्थिक सहकार्य, पर्यायी उर्जा, संस्कृती, पर्यटन, मुक्त समाज आणि मानवी चेहरा असलेले सहकार्य हे सकारात्मक मुद्दे मांडून झाल्यावर दहशतवादाचा धोका सर्व जगाला आहे, हे ठासून सांगत, दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या व आर्थिक मदत करून खतपाणी घालणाऱ्या देशांना आवरण्याची आवश्यकता मोदींनी व्यक्त केली.
भारताच्या आर्थिक विकासासाठी युरेशियात संपर्क जाळे निर्माण करणे आवश्यक आहे. तसेच कझख्स्तान, किरगिझस्तान, तजिकिस्तान, उझबेकिस्तान या देशात खनिज तेल व नैसर्गिक वायू भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे, हेही महत्त्वाचे आहे अमेरिकेच्या दबावामुळे इराणकडून होणारा तेलपुरवठा थांबला आहे. तेव्हा तेल व नैसर्गिक वायूसाठी भारत पर्यायाच्या शोधात आहेच.
गुड ॲंड बॅड टेररिस्ट
निरीक्षक म्हणून अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यावेळी उपस्थित होते. यांच्याशीही मोदींनी चर्चा केली. दहशतवादाचा उपद्रव अफगाणिस्तानलाही होत आहेच. अमेरिका व रशिया या दोघांनाही अफगाणिस्तानमध्ये शांतता हवी आहे. मात्र हे होत असतांना आपले त्या देशातील महत्त्व कमी होऊ नये, यासाठी दोघेही धडपडत आहेत. रशियाच्या विरोधातील तालिबानी दहशतवादी अमेरिकेला ‘गुड टेररिस्ट’ वाटतात. तालिबान्यांमध्ये किंवा दहशतवाद्यांमध्ये ‘गुड’ आणि ‘बॅड’ असा प्रकार नसतो, हे दोघांनाही पटवून देण्याचे कठीण काम मोदींसमोर उभे राहिले आहे. शांघाय सहयोग संघटनेचे व्यासपीठ या दृष्टीनेही भारताला उपयोगी पडू शकेल, असे आहे.
मोदी व इमरान खान भेट
भारत आणि पाकिस्तान यातील तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोदी व इमरान खान समोरासमोर आल्यावरही त्या दोघात संवाद होणार नव्हताच. भेट व्हावी, अशा अर्थाचे पत्र इमरान खान यांनी मोदींना लिहिले होते. स्टेट गेस्ट हाऊसमध्ये रशिया व भारत वगळता इतर देशांचे प्रतिनिधी उतरले होते. याची दोन कारणे सांगितली जातात. एक असे की भारताचे शिष्टमंडळ खूप मोठे होते. दुसरे असे की पाकिस्तानचे इमरानखान व मोदी एकाच ठिकणी असतील तर तोंडावर तोंड पडणारच. हे टाळण्यासाठी भारताच्या शिष्टमंडळाच्या उतरण्याची व्यवस्था वेगळ्या ठिकाणी केली होती. पण शेवटी लाॅनवर फेरफटका मारतांना तोंडावर तोंड पडल्यामुळे नमस्कार चमत्कारादी औपचारिकता पार पडून मोदी व इमरान खान आपापल्या देशात परतले. दहशतवादाचा बुरखा टराटर फाडण्यात मोदी आणि घेतलीच की नाही भेट हे सांगण्यास इमरान खान यशस्वी झाले, ते असे.