Friday, March 24, 2023

 लहानपणं देगा देवा!

माझा टिप्या 

वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड  

एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 

मोबाईल 9422804430  E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 


 1940 चा सुमार असावा. सकाळी मी नेहमीप्रमाणे अंगणात टिवल्याबावल्या करीत होतो. कुठूनसं आलेलं एक कुत्र्याचं पिलू माझ्या पायात घोटाळू लागले. मी त्याला उचलून लगेच त्याच्या पायांची नखे मोजली. आता नक्की आठवत नाही, पण आमचा असा समज होता की, विशिष्ट संख्येइतकी नखे असतील, तर ते कुत्रं ऊच्च प्रतीचे मानलं जायचं. हे पिल्लू तसेच होते. मी लगेच ते कुत्रे पाळायचे असा निर्णय घेतला. मनू बंडूना हे कळायला वेळ लागला नाही. त्यांनी वसंता कुत्रं पाळणार असल्याचं जाहीर करून टाकलं. आई म्हणाली, ‘याला कुत्रीच सापडायची. ते काही नाही. ताबडतोब त्याला दूर सोडून ये. त्याला सवय झाली की ते आपलं घर सोडणार नाही’, मी म्हटले, अगं ते चांगल्या जातीचं आहे. मी मोजली आहेत, त्याची नखं. मी नाव सुद्धा ठेवलय त्याच. ‘टिप्या’. आई म्हणाली, ‘त्याचं करणार कोण?’. मी म्हटले, ‘मी करीन’. ‘तोंड पहा करणाऱ्याचं! शेवटी सगळं माझ्याच गळ्यात येऊन पडतं’,  आईनं अनुभव सांगितला. मी तिच्या गळ्याकडे पाहिलं. गळ्यात मणी मंगळसूत्रंच तेवढं मला दिसलं. आपल्या पुत्ररत्नाचा मर्यादित शब्दकोश आणि भाषेचं ज्ञान तिला  माहीत होतं. बहुदा म्हणून ती म्हणाली, ‘त्याचं सगळं मलाच करावं लागणार आहे’. वडील म्हणाले कुत्रं घरात नकोच. चावलं बिवलं तर पोटात चौदा इंजक्शन घ्यावी लागतात. शेवटी मी माझं हुकमी अस्त्र बाहेर काढलं. ‘आमचं कुणालाच काही आवडत नाही’, म्हणून मी कोपऱ्यात जाऊन बसलो. आई म्हणाली, ‘तो ऐकणार आहे थोडाचं? होऊ दे त्याच्या मनासारखं. चावलं की कळेल त्याचं त्यालाचं’. मी म्हटलं, ‘हे कुत्रं चांगल्या जातीचं आहे. अशी कुत्री चांगल्या लोकांना चावत नसतात’. ‘पण म्हणजे ते तुला नक्कीच चावणार!’, मनूबंडूंनी मला चिडवायची संधी साधली. कुत्रं पाळायला मिळणार याचाच मला आनंद होत असल्यामुळे मी त्यांच्या चिडवण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं.

   आपली बाजू घेणारा कोण आहे, ते टिप्याला कळले असावे. त्यामुळे माझी आणि टिप्याची चांगलीच गट्टी झाली. माझे वेटाळातल्या मुलांशी मुळीच पटत नसे. कुणीही माझ्याशी दोस्ती करायला तयार नसायचे. मी एक उपाय योजला. जो माझ्याशी दोस्ती करणार नाही, त्यांच्या अंगावर मी टिप्याला सोडीन, असा मी सगळ्यांना धाक घातला. एव्हाना टिप्या चांगलाच धष्टपुष्ट झाला होता. त्याच्या भुंकण्यानेच सर्व घाबयायचे. टिप्याच्या धाकामुळे सगळ्यांनी माझ्याशी दोस्ती केली. सगळे माझ्याशी गोड बोलत. हे आईच्या लक्षात आले. ती म्हणाली, ‘काय पाहतेय मी! तुझ्याभोवती आजकाल बराच गोतावळा जमा झालेला दिसतोय!’. मी तिला आपली युक्ती सांगितली. यावर ती म्हणाली,’अरे, असा धाक दाखवून का कुठे मैत्री होते? ते तोंडावर तुझी वरवर करतील. मनातून राग करत असतील ते सगळे.’

  एकदा टिप्या एका मुलाला चावला. मी घाबरलो. वडलांनी मला बजावले होते की, ‘ते कुत्रं कुणालाही चावलं तर मी तुला बदडून काढीन’. आईने मला अशा अनेक अडचणींतून बाहेर काढले होते. मी आईला ही गोष्ट सांगितली. ती म्हणाली, ‘जा, त्या मुलाला मी बोलवलय म्हणून सांग’. मी त्या मुलाला बोलवून आणलं. टिप्या ओझरता चावला होता. रक्त आलं नव्हतं. आईनं त्याचा पाय साबण लावून धुवून काढला. त्याला साय आणि दोन चमचे साखर घातलेलं कपभर दूध प्यायला दिलं. धीर दिला. ‘कुत्रं पाळलेलं आहे. पिसाळलेलं नक्कीच नाही. घाबरू नकोस’, अशी त्याची समजूत घातली. ‘मी भेटायला येणार आहे, असं तुझ्या आईला सांग’. त्यानं घरी काहीच सांगितलं नव्हतं. तसा तो फारसा घाबरलाही नव्हताच. शर्करायुक्त आणि साय घातलेल्या दुग्धप्राशनानं त्याला प्रसन्नही वाटू लागले होते, ते वेगळेच.

   ‘धाक दाखवून का कुठे मैत्री होते?’, आईचे हे वाक्य आजही माझ्या चांगलेच लक्षात आहे

  

No comments:

Post a Comment