लहानपणं देगा देवा-
माझी पहिली सहल
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
माझे लहानपण तसे खेड्यातच गेले आहे. त्याला फारतर गाव म्हणता येईल. लहान असो वा मोठे काही गोष्टी सर्वच ठिकाणी सारख्याच असतात.
आमच्या अंजनगाव- सुर्जीचेही तसेच होते. नित्यनियमाने सहली निघत. शालेय विद्यार्थी पायी चालत जाता येईल, अशा ठिकाणी जात. एखादे देऊळ, किल्ला किंवा आमराई अशी ठिकाणं असत. सोबत झुणका आणि भाकरी/ पोळी अशी शिदोरी घ्यायची. सकाळी उन्हं पडायच्या आत घरून निघायचं. बारा एक वाजता शिदोरीवर ताव मारायचा, खेळणं, हुंदाडणं झालं की संध्याकाळी सूर्य मावळायच्या आत घरी परतायचं.
माझे मोठे भाऊ मनू व बंडू नियमाने सहलीला जायचे. परत आल्यानंतर गमतीजमती सांगायचे. त्या ऐकून मलाही सहलीला जायची इच्छा व्हायची. पण मला कोणीही बरोबर घ्यायला तयार नसायचे. ‘मध्येच याचे पाय दुखतील, घरी परत जाऊ म्हणून हट्ट करील, ऐकणार नाही, सरळ जमिनीवर फतकल मारून बसेल’, असे मनू बंडूचे म्हणणे असायचे.
एक दिवस मी कहरच केला. सहलीला जायचेच म्हणून हट्ट धरून बसलो. पण माझ्या रडण्याओरडण्याकडे लक्ष न देता ते दोघेही ज्येष्ठ बंधू सहलीला निघून गेले. शेवटी वडील म्हणाले, 'त्यांना जाऊ दे. आपण दोघंच सहलीला जाऊ'. आईने पुन्हा झुणका तयार केला. सोबत दोन पोळ्या देऊन डबा तयार केला. मी आणि वडील सहलीला निघालो. थोडंस अंतर जातो न जातो तोच माझे पाय दुखायला लागले. रस्त्याच्या कडेला एक रिकामे मैदान होते. मैदानात बाभळीची झाडे होती. आम्ही त्यांचा डिंक गोळा करून आणित असू. त्या झाडाखाली आम्ही बसलो. मला लगेच भूक लागली. डबा खायचा का म्हणून वडलांना विचारले.
‘तूच खा. मला भूक नाही’, असे वडील म्हणाले. मी झुणका आणि पोळीवर ताव मारला. खाऊन झाल्यावर मला घरी परत जावेसे वाटू लागले. वडीलांना विचारताच ते लगेच हो म्हणाले.
आम्हाला इतक्या लवकर घरी आलेलं पाहून आईला आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, ‘हे काय इतक्या लवकर कसे परतलात? आटोपली सहल?’.
‘कसली सहल आणि कसलं काय! पुढच्यावेळी त्या दोघांसाठी डबा तयार कराल तेव्हा याच्यासाठी थोडासा झुणका आणि दोन पोळ्या वगळून ठेवत जा म्हणजे झालं’!
ताक्या वैद्य
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
परवा एका ठिकाणी जिरेपूड व मीठ घातलेले ताक पिण्याचा योग आला. ताक नळीने (स्ट्राॅ) शोषून पितापिता लहानपणची आठवण जागी झाली.
लहानपणी आमच्या घरी गाई म्हशी होत्या. दूधदुभत्याची रेलचेल होती. आम्ही चार भावंडे होतो. मनू, बंडू, मी(वसंता) व बहीण उषा. रोज सकाळी आई आम्हा चौघांसाठी पाटावर साखर घातलेल्या दुधाचे चार कप भरून ठेवायची. शेवटी प्रत्येक कपात एकेक चमचा साय घालीत असे. असे करून झाले की, मुलांनो, यारे दूध प्यायला, असे म्हणून हाक मारीत असे. मी सर्वात अगोदर धावत जाऊन प्रत्येक कपातील साय चमच्याने काढून खाऊन टाकीत असे. एक दिवस हे कोणाच्या तरी लक्षात आले. त्याने आईकडे तक्रार केली. आई मला रागवली. यापुढे तुझ्या कपात साय असणार नाही, असा तिने मला दम दिला. मला रडायला आले. तेव्हा ती म्हणाली की, असे पुन्हा करणार नाहीस, असे मला वचन दे. मी वचन देण्याच्या बाबतीत मुळीच हयगय करीत नसे. त्यामुळे मी तिला ताबडतोब पुन्हा कधीही दुसऱ्याच्या कपातील साय चोरून खाणार नाही, असे आश्वासन व वचन तिला दिले. माझ्याकडून तिला असे वचन अनेकदा घ्यावे लागत असे. असो.
ही हकीकत मी माझ्या नातवाला सांगितली, तेव्हा तो म्हणाला , ‘आबा, मी तुमच्या बरोबर असतो, तर माझ्या कपातली साय तुम्हाला रोज दिली असती. अहो, रोज इतके फॅट खाणे आरोग्याला चांगले नसते’. माझ्यासोबत तो तेव्हा नव्हता, याची मला हळहळ वाटली.
आमच्या घरी दर मंगळवार व शुक्रवारी ताक होत असे. आई रवीने ताक घुसळायची व चटकन लोणी काढायची. सोबत गरम पाणी तयार ठेवलेले असायचे. योग्य वेळी ते टाकले की लोणी ताकातून लगेच वेगळे व्हायचे. गरम पाणी टाकताच केवळ दोनचारदा घुसळले की, लोणी ताकातून वेगळे व्हायचे. हे दृश्य मला खूप आवडायचे. आईने ताक करायला घेतले की, मी तिथे जाऊन ते दृश्य बघत उभा राही. आई लोण्याचा गोळा हातात घेऊन हळूहळू तो झेलीत असे. असे केल्याने त्यातील ताक निथळून लोण्याचा घट्ट गोळा तयार वहायचा. मग आई मला प्रत्येकाला हाक मारायला सांगायची. ‘अगोदर मला लोणी दे, मग हाक मारीन’, अशी माझी अट असायची. ती पूर्ण होताच मी इतरांना बोलवीत असे. त्यांच्या हातावरही आई लोण्याचा लिंबाएवढा गोळा ठेवायची. यावेळी माझा हात पुन्हा समोर असायचा. मी मागच्या जन्मी बहुदा राक्षस असलो पाहिजे, असे तिला वाटायचे. तसे ती बोलूनही दाखवायची.
तिने असे म्हटले की, मी तिथून निसटून आरशासमोर उभे राहून आपला चेहरा न्याहळत असे. चेहऱ्यावरचे सगळे भाग इतरांसारखेच दिसायचे. फक्त समोरचे दोन दात तेवढे अंमळ मोठे होते. ते मी चाकूने तासून लहान करायला सुरवात केली होती. कुणाच्याही न कळत माझा हा दात लहान करण्याचा क्रम बरेच दिवस चालू होता. एकदा आईने माझा हा उपद्व्याप पाहिला व ती चांगलीच रागावली. दाताला पडलेल्या खाचा तिने बोट लावून तपासल्या होत्या व मला भूतो न भविष्यति असा दम भरला. पुन्हा असे केलेस तर वडलांसमोर उभे करीन, अशी ताकीदही दिली. दातांवर ते तासल्याच्या त्यावेळच्या खुणा अजूनही माझ्या दातांवर आहेत. दात घासतांना क्वचित आजही त्या बोटांना जाणवतात. असे झाले की आज माझे मलाच हसू येते.
आमच्या घरी दर मंगळवारी व शुक्रवारी ताक होते, हे ओळखीच्या सगळ्यांना माहीत झाले होते. ती लोकं ताक न्यायला येत. येणाऱ्याला संकोच वाटत नसे. देणाऱ्याला आपण काही खास मेहेरबानी करीत आहोत, असे वाटत नसे. काही लोकांसाठी तर आई ताक वगळून ठेवायची. एखाद वेळेस ते आले नाहीत, तर मला त्यांना बोलवायला पाठवायची. ‘त्यांना हवं असेल तर ते येतील की, बोलवायचे कशाला?’, माझी कुरकूर असायची. यावर आई म्हणायची, ’अरे, त्यांच्याकडे पथ्य आहे. ती लोकं सगळी औषध ताकासोबतच घेतात ना?’ मी ताक नेऊन देतो म्हटले तर आईला ते नको असे. ताक पुरतेपणी ज्याचे त्याला मिळेल की नाही, याची तिला शंका वाटत असावी. पण तिने तसे कधी बोलून मात्र दाखविले नव्हते.
आमच्या गावी हा वैद्य होता. त्याला सगळे ‘ताक्या वैद्य’ म्हणायचे. कारण त्याची सगळी औषधे ताकासोबतच घ्यायची असायची. लोक चेष्टा करायचे. पण त्याच्यावर लोकांचा विश्वासही होता. मला याची गंमत वाटायची. मी एकदा याबद्दल वडलांना विचारले. तेव्हा ते म्हणाले होते की, ‘ताज्या ताकाची तुलना काही विद्वान मंडळींनी अमृताशी केली आहे, इतके गुण ताज्या ताकात असतात.’
या आठवणीतून मी जागा झालो आणि जिरपूड व मीठ घातलेले प्लॅस्टिकच्या पिशवीतील ताक नळीने (स्ट्राॅ) शोषून पिण्यास सुरवात केली.
हाकेच्या अंतरावर राष्ट्रपती!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
१९५० ते १९५४ या काळात मी नागपूरच्या सायन्स कॅालेजमध्ये म्हणजे आताच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये शिकत असतांना माझे ज्येष्ठ बंधू डॉ बापूराव काणे यांची नागपूरच्या मेयो हॅास्पिटलमध्ये पॅथॅालॅाजिस्ट या पदावर नेमणूक झालेली होती. डॅा उद्दनवाडीकर हे त्यावेळी सिव्हिल सर्जन या पदावर नियुक्त होते. त्या वेळच्या मध्यप्रांत व वऱ्हाड या प्रांताचे मुख्यमंत्री मा. रविशंकर शुक्ल यांचे मंत्रिमंडळ आपल्या स्टाफसह उन्हाळ्यात दोन महिने पचमढी या थंड हवेच्या ठिकाणी मुक्कामी असायचे. या काळात नागपूरचे सिव्हिल सर्जन या नात्याने डॅा. उद्दनवाडीकर यांची व पॅथॅालॅाजिस्ट या नात्याने डॅा. बी जी काणे (बापूराव) यांचीही दोन महिन्यांसाठी पचमढीला बदली व्हायची. यावेळी सगळी काणे मंडळी व त्यांचे बहुतेक जवळची व दूरचीही नातेवाईक पचमढीला आलटून पालटून मुक्कामाला असत.
आम्हा मुलामुलांसाठी पचमढीचा उन्हाळ्यातील दोन महिन्यांचा मुक्काम ही एक पर्वणीच होती. त्या काळात जटाशंकर ही गुहा, छोटा महादेव, मोठा महादेव, ए, बी व डी फॅाल, हे धबधबे यासह बरीच धार्मिक व निसर्गरम्य स्थळे आम्ही पालथी घातली होती. जटाशंकर ही खोल दरीतील शंकराची निसर्गनिर्मित पिंड आहे. त्यावेळी आम्हाला केमेस्ट्रीच्या अभ्यासक्रमात स्टॅलेक्टाईट्स व स्टॅलेग्माईट्स अभ्यासाला होते. पाणी खाली पडून आटले तर एक प्रकारचे स्फटिकीकरण खाली जमिनीवर होते व पाण्याचे बाष्पीभवन वरून पडता पडताच झाले तर वरून खाली स्फटिक तयार होत जातात. शंकराच्या पिंडीचे व त्याच्या जटांचे हे वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे.
पचमढीला त्या काळी देशी आंब्याची असंख्य जंगली झाडे होती. आज तिथे आंब्याची सोडाच पण इतरही झाडे आपण शिल्लक ठेवलेली नाहीत. असो.
ब्रिटिश राजवटीतही ‘मंत्रिमंडळ’ पचमढीलाच उन्हाळ्यातील दोन महिने मुक्कामी असायचे. एका ब्रिटिश अधिकाऱ्याने या सर्व (शेकडो) देशी आंब्यांवर चांगल्या जातीच्या आंब्याचे कलम केले होते. दुसऱ्या एका ब्रिटिश अधिकाऱ्याने पाण्याच्या एका लहानशा ओहोळाला आडवून एक स्वीमिंग पूल तयार केला होता. यात एका बाजून पाणी निसर्गत: वाहत यायचे, मध्ये पूल (टाके) तयार केला होता व दुसऱ्या बाजूने पूल ओव्हर फ्लो होऊन पाणी पलीकडे वाहत जायचे व ओहोळाचा प्रवास पुढे अव्याहत सुरू रहायचा. या अधिकाऱ्याचे नाव या स्वीमिंग पुलाला दिले होते. त्यावरून या पुलाला ‘ट्वायनाम पूल’ असे म्हटले जायचे. आमचा रोजचा या पुलावर पोहण्याचा कार्यक्रम असायचा. आता मात्र पचमढीला यातील फारच कमी बाबी शिल्लक आहेत, असे ऐकतो. सर्व भूभाग ओसाड झाला आहे. ओहोळ, धबधबेही आटले आहेत. असो.
त्या काळी डॅा राजेंद्रप्रसाद भारताचे राष्ट्रपती होते. त्यांना श्वासाचा (बहुदा दम्याचा) त्रास असावा/होता. पचमढीचे हवामान या प्रकृतीच्या व्यक्तींसाठी चांगले समजले जायचे. त्यावेळच्या मध्यप्रांत व वऱ्हाडच्या शासनाने राष्ट्रपती महोदयांना मोठ्या अगत्याने पचमढीला हवापालटासाठी निमंत्रित केले होते. एका उन्हाळ्यात ते पचमढीला मुक्कामाला आले असतांना एके दिवशी संध्याकाळी आमचे मुलामुलांचे टोळके रस्त्याने टवाळकी करीत जात होते. समोरून साक्षात राष्ट्पती पायी चालत येतांना आम्हाला दिसले. त्यांच्या सोबतीला आजच्या सारखा लवाजमा नव्हता. सुरक्षा रक्षक व दोनचार अन्य व्यक्ती असाव्यात. आम्ही सर्व त्यांना समोर हाकेच्या अंतरावर पाहून स्तंभितच झालो. आऽ वासून त्यांच्याकडे एकटक पाहत राहिलो. राष्ट्रपतींना समोर भारताची उगवती पिढी दिसत असावी. पण तिचे स्वरूप कसे आहे याची त्यांना बहुदा कल्पना असावी, म्हणूनच बहुदा त्यांनीच प्रथम आमच्याकडे पाहून हात जोडून नमस्कार केला असावा. मग मात्र आम्हाला जाग आली. आम्हीही आदरपूर्वक नतमस्तक होऊन त्यांना वंदन केले. हाकेच्या अंतरावर पाहिलेला हा माझ्या आयुष्यातील पहिला राष्ट्रपुरुष होय. दुसरी विशेषता ही की, मी त्याला वंदन करण्यापूर्वी त्यानेच मला नमस्कार केला होता!
लहानपण देगा देवा
भाकरी आईच्या हातची.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३० E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
आमच्या लहानपणी वॅाशिंग मशीन्स नव्हत्या. कपड्याने हाताने साबण लावून धुवावे लागत. अगोदर धुण्याचा सोडा टाकून ठेवलेल्या पाण्यात भिजवून ठेवावे लागत. केसांना खूप तेल चोपडण्याची पद्धत तेव्हा होती. कधीकधी तर माझ्या कपाळावर तेलाचे ओघळ ओघळायचे. त्यामुळे कपड्यावर तेलाचे व त्यांवर धूळ बसून काळे झालेले डाग पडायचे.
कपडे धुण्याचे काम आईचे असायचे. ती कपडे खसाखसा घासून धुवायची. एकदा कपड्यात चुकून राहिलेली सुई का टाचणी तिच्या तळहातात अगदी आरपार गेली. पोटिस लावण्यासकट सगळे प्रकार झाले. हात सुजला, तो दुखायचा, ठणकायचा. ताप यायचा. शेवटी एकदाची जखम पिकली. चमचाभर रक्तमिश्रित पूसोबत टाचणीही बाहेर आली. पण यावेळेस तिच्या हातची करंगळी जी वाकडी झाली होती, ती पुढे कधी सरळ झालीच नाही.
याचा एक परिणाम झाला. तिने थापलेल्या भाकरीवर करंगळीचा वेगळा ठसा स्पष्ट उमटायचा. आईने थापलेली भाकरी आम्ही त्यामुळे ओळखू लागलो. कारण वाकड्या झालेल्या करंगळीचा ठसा भाकरीवर उमटलेला असायचा. आम्ही तो एकमेकांना दाखवीत असू. ते पाहून आई फक्त हसायची. हसण्यामागचे कारण मात्र तिने आम्हाला कधीच सांगितले नाही.
१)‘आईने विस्तव मागितला आहे’.
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
माझे बालपण खेड्यात/ लहान गावात गेले. माझे वडील शिक्षक होते. गावात शिक्षक, पोलिस अधिकारी, डॅाक्टर/वैद्य, सावकार ही तशी मान्यताप्राप्त मंडळी असत. आमच्या घरी आगपेटी असायची पण आदल्या दिवशी राखेखाली झाकून ठेवलेल्या निखाऱ्यांच्या साह्याने आम्ही दुसऱ्या दिवशीची चूल पेटवत असू. चुली दोन प्रकारच्या होत्या. अंघोळीचे पाणी तापवायची चूल स्वयंपाकघरापासून दूर असायची. आमच्या घरी तर पाणी तापवायची खोलीच होती. त्या खोलीत चूल नव्हे तर भला मोठा चुला असायचा. पाणी तापवण्यासाठी त्या चुल्यावर भले मोठे पातेले असायचे. बाजूलाच सरपण (चुलीत जाळायची लाकडे) रचून ठेवलेले असे. स्वयपाकघरातील चूल रोज शेणाने सारवली जायची. त्यामुळे ती रोज साफ करून त्यातली राख बाजूला काढून ठेवली जात असे. पाणी तापवायच्या चुलीचे काम झाले की, आई अर्धवट जळलेली लाकडे व उरलेले निखारे विझवतांना काही निखारे बाजूल करून चुलीतच राखेत झाकून ठेवीत असे. दुसऱ्या दिवशीची चूल या राखेखाली झाकून ठेवलेल्या निखाऱ्यांच्या साह्यानेच पेटवली जायची. निखाऱ्यांवरची राख फुंकून बाजूला केली की, निखारे पुन्हा धगधगू लागत. ते झाऱ्यावरून स्वयपाकघरात नेऊन दुसऱ्या दिवशीची स्वयपाकाची चूल पेटवली जायची. निखाऱ्यावरची राख फुंकून दूर करण्याचेही शास्त्र असायचे. मी हा प्रयत्न करून पाहिला होता पण उडालेल्या राखेने तोंड काळे तर झालेच पण गरम राखेने चेहऱ्याला चटकाही बसला. तेव्हापासून हे काम आपले नाही, हे मला पटले.
सकाळी दात तीन पद्धतीने घासले जात. कुणी चुलीतल्या राखेने, तर कुणी कडूलिंबाच्या काडीने, तर कुणी बाभळीच्या काडीने, दात घासायचे. मी राखीने दात घासीत असे. कारण कडुलिंबाची किंवा बाभळीची काडी अगोदर चावून चावून तिचा ब्रश करावा लागायचा. अगोदर ब्रश तयार करायचा व मग त्याने दात घासासायचे. रोज नवीन काडी व नवीन ब्रश. यात वेळ जायचा. त्यापेक्षा मला राख बरी वाटायची. घरी पाहुण्यारावळ्यांसाठी बिटकोच्या काळ्या टूथ पावडरची बाटली असे. दात बिटको कंपनीच्या पावडरने घासणे चांगले की राखेने की कडुलिंबाच्या काडीने की बाभळीच्या काडीने याबाबत मतमतांतरे होती. बिटको कंपनीच्या पावडरला नावे ठेवली जात. काही पाहुणे सुद्धा दात घासण्यासाठी बाभळीच्या किंवा कडुलिंबाच्या काडीचाच वापर करीत. टूथब्रश व टूथपेस्टचे नावही आम्हाला माहीत नव्हते. मी स्वत: नोकरी करायला लागेपर्यंत म्हणजे १९५४ सालपर्यंत दंतमंजनानेच दात घासल्याचे आठवते.
आमच्या घरी दर उन्हाळ्यात एक बैलगाडीभर बाभळीची लाकडे विकत घेतली जात. वडील व आम्ही तीन भावंडे रोज सकाळी कुऱ्हाडीने लाकडे फोडून झिलप्या व चुलीत घालता येतील एवढ्या लांबीच्या काड्या तयार करीत असू. मोठी लाकडे वडील फोडीत. झाडाला जिथे फांदी फुटते, तो भाग रुंद झालेला असे. त्याला ‘गाठ’ असे नाव असे. गाठी लवकर फुटत नसत. ते काम आम्ही वडलांसाठी राखून ठेवीत असू.
लाकडे फोडण्याचेही एक शास्त्र आहे. लाकडाचे दोन भाग करायचे तर इंग्रजी व्ही च्या अक्षरातील दोन तिरप्या रेषेप्रमाणे लाकडावर आलटून पालटून घाव घालावे लागायचे. उभा घाव घालून लाकडाचे दोन भाग करता येत नाहीत. हे आम्ही अनुभवाने शिकलो होतो. लाकडाची काडी उभी फोडायची झाली तर एका मोठ्या लाकडाच्या बेचकेत ती काडी ठेवून मग घाव घालावा लागे. मी एकदा लाकडाची काडी एका पायाने दाबून घाव घालण्याचा ‘शॅार्टकट’ करून पाहिला होता. पण कुऱ्हाडीचा घाव लाकडाऐवजी पायावरच बसला. जखम झाली, रक्त ओघळले, आग होत होती, टिंक्टर आयोडीन जखमेवर टाकताच दाह आणखीनच वाढला, बऱाच ओरडा व तेवढ्याच थपडा असा प्रसादही मिळाला. पण अनुभवाने येणाऱ्या शहाणपणाचा मी धनी झालो, याचा मला आजही अभिमान वाटतो. ही फोडलेली लाकडे रचून ठेवण्याचेही शास्त्र होते. तशी न रचल्यास एक काडी काढता काढता सगळा डोलाराच कोसळतो.
आम्ही बाभळीचीच लाकडे वापरीत असू. ती महाग असत. पण ती बराच वेळ जळत राहतात, जास्त उष्णता देतात व पेटवल्यावर खूप कमी धूर देतात, असा आमचा समज होता व तो बरोबरही होता.
आमच्या घरी दिवसाचे चोवीसही तास निखारे राखेने झाकून तयार असत. बाभळीच्या लाकडाचे निखारे राखेने झाकून ठेवल्यास दुसऱा दिवस उजेडेपर्यंत शिल्लक रहात असत. वरची राख फुंकणीने उडवली की ते लगेच धगधगू लागत. सकाळी सकाळी अनेकदा शेजारपाजारची मुले तवा घेऊन येत, ‘काकू, आईने निखारे मागितले आहेत’,असे म्हणत. आपले निखारे त्यांना देण्यावर माझा आक्षेप असे. पण आई म्हणायची, ‘अरे, आपल्याकडे बाभळीचे निखारे असतात ना, म्हणून ते दुसऱ्या दिवशीपर्यंत टिकून राहतात. दिले दोन निखारे तर काय बिघडलं?’ पण राखेने झाकलेले निखारा नेताना, निखारा नेणारी व्यक्ती दोन व्यक्तींमधून निखारा नेत नाहीना, याची ती काळजी घेत असे. असो
सकाळी जाग लवकर आल्यामुळे हा मजकूर मी लिहीत बसलो आहे. पण आता उजाडले आहे. स्वपाकघरात संगीताने लायटरने गॅस पेटवल्याचे जाणवते आहे. तेव्हा लिहायचे थांबून ब्रशने दात घासलेले बरे. नाही का?
२) विहीर
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
माझे बंधू १९५२ ते ५४ या काळात मुलताईला नोकरी करीत होते. कॅालेजला सुट्या लागल्या आणि मी मुलताईला सुटी ‘घालविण्यासाठी’ गेलो. घरी पोचलो तो तिथे काहीशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. घराच्या अंगणातील विहिरीत एक चिमणी मरून पडली होती. विहीर तशी बरीच मोठी होती. पाणी काण्यासाठी रहाट व खिराडी अशा दोन्ही व्यवस्था होत्या. पण रहाट मोडला होता व त्याची लाकडे पाण्यात पडून सडत होती. पण धुणीभांडी करायला तेच पणी एरवी वापरले जायचे. पण आता चिमणी मरून पडल्यामुळे पाणी बाहेरून आणावे लागत होते. पाण्यात उतरून चिमणी बाहेर काढायला कुणीच तयार नव्हते. याच वेळी मी तिथे पोचलो. मला पोहणे येत असल्यामुळे मी विहिरीत उडी मारली चिमणीचे कलेवर अलगद बाहेर फेकले. पाण्यात तरंगत असलेले रहाटाचे लाकडी अवशेषही एकेक करून बाहेर फेकले आणि दोराला धरून बाहेर आलो. साहेबाचा कॅालेजमध्ये शिकणारा भाऊ नागपूरहून आला आणि लगेच उपयोगी पडला म्हणून माझे इतरांनी कौतुक केले. मी आपला ‘कसंचं, कसंचं’, म्हणत विनयानं वागण्याचा प्रयत्न करीत होतो. मला विहिरीत उडी मारून पोहण्याची सवय होती. महालातल्या नबाबाच्या विहिरीत मी अनेकदा पोहत असे.
मला आश्चर्य वाटले, ते आईचे. तिने माझे भरभरून कौतुक केले. दृष्ट काढायचीच कायती बाकी ठेवली.
मी तिला म्हटले,’एवढं कौतुक कराण्या सारखं मी काय केलयं गं? कुस्ती मारून आलोय, की लढाई जिंकून आलोय?’ यावर ती म्हणाली माझ्या जुन्या आठवणी या निमित्ताने जाग्या झाल्या आहेत. तू लहानपणी कसा होतास आणि आता कसा झाला आहेस, ते पाहून मला आनंद झालाय.’
‘अगं तुझा गैरसमज झालायं. मी तेव्हा होतो तसाच आहे. लहानपणी साय चोरून खात होतो नं, ती माझी सवय अजूनही तशीच आहे, हे तुला लवकरच कळेल’, मी म्हणालो.
आई म्हणाली, ‘मीच तुला चांगली वाटीभर साय साखर घालून देईन. चोरून कशाला, चांगला उजागरीनं खा. या प्रसंगामुळे माझ्या जुन्या आणखीही काही आठवणी जाग्या झाल्या आहेत. तेव्हा मी नुकतीच लग्न होऊन काण्यांची सून झाले होते. माझ्या सासूबाई म्हणजे तुझी आजी अतिशय साधी, सज्जन व सोज्वळ बाई होती. त्यांनी मला लेकीसारखेच वागवले. मला सासुरवास माहितीच नाही. त्याकाळी सासुरवास न होणे हीच नवलाईची बाब होती. बहुतेक सासवा सुनांचा छळ करीत. कुणी म्हटले, टोकले तर म्हणत, मी नाही का सासुरवास सहन केला? माझी लेक नाहीका सासुरवास सहन करते आहे? मग मी सुनेला शिस्तीत वागवले तर चुकले कुठे?’
‘मामंजी, म्हणजे तुझे आजोबा मात्र कडक शिस्तीचे व रागीट होते. ते घरात आले की, सगळे कसे चिडीचूप असायचे. एक दिवस मी विहिरीतून पाणी काढत होते. कशी कुणास ठावूक पण माझी सोन्याची पाटली विहिरीत पडली. मी घाबरून गेले, मला काही कळेना. विहिरीवर पाणी भरायला आलेल्या सगळ्या जणींना वाटले की, हिची आता काही खैर नाही. कदाचित मार सुद्धा पडेल. मी रडत रडत घरी आले सासुबाईंना सगळी हकीकत सांगितली. त्याही घाबरल्या. हे भलतेच काय करून बसलीस, असे म्हणाल्या. मामंजी बाहेरून आले. सासुबाईंनी घाबरतच त्यांना माझी पाटली विहिरीत पडल्याचे सांगितले. आता काय होणार, या भीतीने सर्व श्वास रोखून अंग चोरून उभे होते. थोडा वेळ विचार करून ते म्हणाले, ‘तिला कोणी काही बोलले का? तिला पाटली नको का होती? तिने काय मुद्दाम पाटली विहिरीत टाकली? तिला कुणी काहीही म्हणायचे नाही’.
विहिरीत उतरून पाटली काढण्यासाठी कुणी तयार होईना. कारण विहिरीला ढोल पडली होती. ती आतून खचत चालली होती. शेवटी मामंजींनी दोन रुपये द्यायचे कबूल केल्यावर एकाने विहिरीत उतरून पाटली शोधशोध शोधत शोधून काढली.
आजही विहिरीत उतरायला कुणी तयार नव्हते. या विहिरीच्या बाबतीत निरनिराळ्या कथा आहेत. तू सरळ उडी मारलीस आणि काम केलेस. माझ्या मुलानं गावाहून आल्याआल्या अडचण दूर केली.
मला त्या विहिरीबाबतच्या कथा माहीत असत्या तर मी विहिरीत उडी मारली असती का, या प्रश्नाचे उत्तर मी आजही देऊ शकत नाही.
३) लहानपण दे गा देवा - मी म्हशीची धार काढायला शिकतो.
वसंत गणेश काणे
लहानपणच्या आठवणी सलग स्वरुपात आठवत नाहीत. आज सकाळी सकाळी का कुणास ठावूक एकाएकी घरच्या गाईम्हशींची आठवण झाली. त्यावेळी आमच्या घरी दोन गाई व एक म्हैस होती.
म्हैस विकत घ्यायला मी वडलांसबत बाजारात गेलो होतो. तीन चार म्हशी आम्ही पाहिल्या. एक म्हैस मला आवडली(?) होती. पण वडलांचे मत काही वेगळेच होते. मी हट्ट करून पाहिला. पण वडील मला रागवले, ‘तुला यातलं काही कळतं का? यापुढे मी तुला बरोबर आणणारच नाही’, असं म्हणून त्यांनी मला गप्प केले.
म्हैस विकणारा म्हशीची किंमत १४० रु सांगत होता, ही १९४४ च्या सुमारासची गोष्ट आहे. घासाघीस होऊन ११० रुपयाला ती म्हैस आम्ही घरी घेऊन आलो. ती अगोदरच व्यायलेली होती. त्यामुळे रेडकू (म्हशीचे पिल्लू) सोबत घेऊन आलो होतो. धार काढायला गुराखी होता. ती त्याला धार काढू देईना. प्रत्येक म्हशीच्या काही खोड्या (सवयी) असतात.
काहींचे मागचे पाय बांधून मगच त्यांची धार काढतात. म्हणून तिचे पाय बांधण्याचा प्रयत्न केला. पण ती पाय बांधू देईना. बहुदा ही सवय तिला नसावी. पण खटपट/झटापट करून तिचे पाय बांधले. तिला ते मुळीच आवडले नसावे. ती थयथय नाचू लागली. पायांना काच बसत होता. पायातून रक्त येऊ लागले.
काही म्हशींची धार काढतांना धार काढतांना शीळ ऐकायची सवय असते, असे कुणीसे म्हणाले. वसंता कुठे आहे?, वडलांनी चौकशी केली. मी हजर झालो. ‘नेहमी शीळ घालीत उनाडक्या करीत असतोस. बघू बरं कशी शीळ घालतोस ते?’, मी शीळ घालू लागलो, पण म्हशीवर परिणाम होत नव्हता. जरा मोठ्यानं शीळ घाल की. नाहीतर एरवी आम्हाला ऐकून ऐकून बेजार व्हावे लागते. पण माझी शीळ काही म्हशीच्या पसंतीस उतरली नसावी. ‘चल, हो बाजूला’, वडिलांनी बखोट धरून मला बाजूला केले. आपली शीळ म्हशीला सुद्धा आवडत नाही, हे कळून मी खट्टू झालो. त्यानंतर उभ्या आयुष्यात मी कुणालाही शीळ म्हणून घातल्याचे आठवत नाही.
काही म्हशींची धार काढतांना शेतकऱ्याची बायको समोर उभी राहते. धार काढणारा सगळी धार काढतो की नाही, हे पहायला ती उभी असते. या म्हशीला ही सवय तर नाही ना ? लगेच आई पदर खोचून म्हशीसमोर उभी राहिली. म्हैस खाली मान घालून घमेल्यातले वैरण खात होती. तिने मान वर करून पाहिले सुद्धा नाही. वैरणात पाणी घातलेले काहींना आवडत नाही, काहींना सरकीच हवी असते, ती सुद्धा अगोदर भिजत घातलेली. एक ना दोन. सगळे प्रयोग झाले म्हैस काही दूध काढू देईना. तिची कास भरलेली असायची. सड फुगून तट्ट झाले होते. शेवटी ती म्हैस आम्ही तीस रुपयांना विकून टाकली. ज्याने ती विकत घेतली होती, त्याच्याकडे ती व्यवस्थित धार काढू देत होती. पण तो मात्र आपण फसलो, तीस रुपये वाया गेले, म्हणून आमच्या समोर हळहळत असायचा.
तरी मी म्हटले होते की, ती दुसरी म्हैस विकत घ्या म्हणून? पण आमचं कोण ऐकतो? मागे वडील उभे होते, हे माहीत नसल्याने मी बोलून गेलो. पुढचा प्रसंग ऐकण्यात वाचकांना रुचि नसावी, म्हणून सांगत नाही.
मग आमचे ठरले की, पहिल्या वितीचीच म्हैस विकत घ्यायची. म्हणजे तिला खोडी नसतील. आपण लावू त्या सवयी धार काढतांना तिला लागतील.
मला गाईची धार काढता येत असे. म्हशीची धार काढायची म्हणजे अंगठा आणि पहिल्या बोटात चांगलाच जोर असावा लागतो. धार काढणाऱ्यांच्या बोटांना सुद्धा घट्टे पडतात. गाईची धार काढतांना अंगठा मिटण्याची गरज नसते. मी म्हशीची धार काढू का, असे विचारताच, आरशात तोंड पहा एकदा? भावाबहिणींनी खिजवले. शेवटी मी धार काढणाऱ्याशीच गट्टी जमविली. पण त्याने स्वतंत्र भांडे आणायला सांगितले. ते कसे आणणार? माझे बिंग फुटले असते. शेवटी मी एक युक्ती केली. टिप्याला(आमच्या घरच्या कुत्र्याला) आम्ही एका भांड्यात दूध देत असू. ते भांडे मी घेऊन आलो.त्यातच दूध काढू लागलो. पण त्या दुधाचं करायचं काय? मग ते टिप्यालाच प्यायला घालू लागलो. तो खुशीने शेपटी हलवीत ते दूध प्यायचा. पण एक दिवस आईने हे पाहिले. ती रागावली. ‘एवढे दूध तू कुत्र्याला पाजतोस? काय म्हणू तुला? त्या धार काढणाऱ्याला बरेच झाले आहे. तो मुद्दामच दिवसेदिवस अधिकाधिक दूध काढायचे बाकी ठेवत असणार. ते काही नाही. उद्या पासून घरातले चांगले भांडे घेत जा. किती दूध काढतोस ते मला दाखवीत जा. नंतर नंतर कंटाळा करशील. दूध पुरते काढले नाही तर दुसऱ्या दिवशी म्हैस तेवढे दूध कमी देते म्हणतात’. आईने धार काढणाऱ्याचीही चांगलीच सटक काढली. पण एक मात्र झाले. मी म्हशीची धार काढायला शिकलो.
६. माझ्या वडिलांना झालेला क्षयरोग
लहानपण देगा देवा!
वसंत गणेश काणे
कारण सांगता येणार नाही. पण अचानक एखादी आठवण जागी होते. आजवर अशा काही आठवणी लिहून मी फेस बुकवर टाकल्या आहेत. ही सहावी आठवण. खूप कालांतराने जागी झालेली.
त्या काळी (१९३०साली) माझे वडील पदवीधर होते. पण खरे तर मॅट्रिकची परीक्षा पास केल्यानंतर कुटुंबाचा भार वाहण्यासाठी त्यांनी एका कापडाच्या गिरणीत नोकरी करायला सुरवात केली होती. ती नोकरी टिकली असती, तर खूप मोठ्या पदावर ते पोचले असते. कारण अगदी लहान वयात त्यांनी नोकरीला सुरवात केली होती व मिल (गिरणी) मधील नोकरीत पदोन्नतीला भरपूर वाव होता.
पण असे झाले नाही. त्यांना यंत्रांची धडधड सहन होईना. डाॅक्टरांनी सांगितले तुमचे हृदय कमजोर आहे. तुम्ही ही नोकरी सोडा व एखादी शिक्षका सारखी कमी शारीरिक श्रमाची नोकरी बघा. त्यप्रमणे ते शिक्षक झाले व खाजगीरीत्या त्यांनी पदवी संपादन केली. पण कदाचित या निमित्ताची शिक्षकाची नोकरी व अभ्यास ही धडपड/ धावपळही त्यांना सहन झाली नसावी. रोज ताप येऊ लागला. डाॅक्टरांनी क्षयाची बाधा झाल्याचे निदान केले व माझ्या काकांना सांगितले की, तुमच्या भावाचे आयुष्य फारतर आणखी सहा महिने किंवा फारतर एक वर्ष इतकेच आहे.
त्यावेळी क्षयावर उपायच नव्हता. काकांनी डाॅक्टरांना विचारले की, क्षयावर काहीच उपाय नाही का? यावर डाॅक्टर म्हणाले क्षयावर औषध नाही. पण ताजी हवा, फळफळावळ, दूध व नियमित आहाराने आयुष्य दोन/तीन वर्षे वाढते, असे आम्ही वैद्यकक्षेत्रातले लोकही मानतो. प्रयत्न करून बघायला हरकत नाही. या दोघा भावांनी गावाबाहेर १०० फूट गुणिले शंभर फूट क्षेत्रफळाचा प्लाॅट घेतला. स्वत: श्रम करून झोपडी बांधली. घरच्याघरी भाजीपाला घ्यायला सुरवात केली व फळझाडेही लावली. गाईम्हशी घेतल्या. घरच्या घरी दूधदुभते मिळविले. दुपारी एका वेळला जेवण व संध्याकाळी फळे व दूध असा आहार घ्यायला सुरवात केली. मोकळ्या हवेत नियमितपणे फिरायला जायची सवय लावून घेतली. क्षयाची बाधा हळूहळू कमी झाली माझे वडील वयाच्या ८२ व्या वर्षी निजधामाला गेले . डाॅक्टरांच्या अंदाजाप्रमाणे वयाच्या २५ व्या वर्षीच जायला हवे.
पुढे हा मुद्दा विस्मृतीत गेला. म्हातारपणी एकदा एक्स रे काढण्याचा प्रसंग आला. तोपर्यंत असा प्रसंगच आला नव्हता. एक्स रेत दिसले की, त्यांच्या डाव्या फुप्पुसात एक क्रिकेटच्या चेंडूच्या आकाराची गाठ होती. ही कसची ते कळेना. त्या वयात आॅपरेशन करण्याचा प्रश्नच नव्हता.
डाॅक्टरांनी जुने एखादे दुखणे होते का म्हणून विचारले. तेव्हा क्षयाची आठवण झाली. गत इतिहास नव्याने समोर आला डाॅक्टर म्हणाले, त्या गाठीत काय आहे हे माहिती नाही. आज ते पाहता यायचे नाही. पाहूनही उपयोग नाही. पण जर तरूणपणी क्षयाचे निदान झाले असेल तर एक प्रकार संभवतो. शरीर त्या क्षयाच्या जंतूंचा नाश करू शकले नसावे पण त्यांच्या भोवती पेशींचे कवच घालून शरीराने त्या जंतूंना कायमचे बंदिस्त करून ठेवले असावे. आता ते त्यांच्या बरोबरच जातील. हे निदान(?) झाल्यानंतरही वडील ५/६ वर्षे वावरत होते व वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी वृद्धापकाळामळे (क्षयामुळे नव्हे) जगाचा निरोप घेतला.
५. घर पाहिले बांधून-३
लहानपण देगा देवा
वसंत गणेश काणे
घराची मूळ चौकट उभी झाली. लाकडी काम सुताराने वेगाने पार पाडले. आता घराच्या चारी बाजूला पडव्या काढायचे ठरले. प्रत्येक पडवी ७ फूट रुंदीची असावी असे ठरले. पाया फार खोल घ्यायचा नव्हताच. तो २/३ फूट खणून दगड, गिट्टी, टाकून भरला वर विटांची आठ फूट उंचीची भिंत बांधायचे ठरले. दोन टोकांना ओळंबा वापरून गवंडी विटा लावून द्यायचा. कारण भिंत जमिनीला काटकोन करून उभी असणे आवश्यक होते मग माती व गवत वापरून केलेला गारा मसाला म्हणून वापरून विटांची जुडाई आम्ही करीत असू. मध्येच भिंतीचे पोक निघत असे. ते गवंडी ठीकठाक करीत असे. छोटे मालक काय भिंत बांधणार, असे म्हणून तो आमच्या कारागिरीकडे गमतीने व काहीसा उपहासानेच पाहत होता. पण काही दिवसांनी आमची गट्टी जमली. आमच्या डोक्याइतकी भिंतीची उंची येण्यापूर्वीच वरची जुडाई त्याने आपल्याकडे घेतली. तोपर्यंत खालची जुडाई वाळली होती. भिंतीचे बाहेरून दर्जे भरायचे होते. म्हणजे दोन विटांमधली जुडाईची माती थोडीशी काढायची व ती फट चुना व रेतीचा मसाला भरायचा असे ते काम होते. फट तयार करण्याचे काम आम्ही केले दर्जे भरून प्लास्टर करण्याचे काम गवंड्याने केले. चारी बाजूंना पुरतील, एवढी मंगलोरी कौले नव्हती. ज्या पडवीत झोपण्याचे पलंग असणार होते तिथे पत्रे टाकायचे ठरले. एका पडवीत कोपऱ्यात मोरी, पुढे पिण्याच्या व स्वयपाकाच्या पाण्याचे गुंड नंतर स्वयपाकाच्या चुली, पुढे देव व नंतर जेवणाची खोली अशी योजना केली होती. एक खोली डार्क रूम व एक कोठीघर केले. मधला हाॅल खूपच मोठा वाटत होता त्यात मध्ये भिंत घालून त्याचे दोन भाग केले. त्यामुळे माळा करता आला बांबू उभा अर्धा कापून माळ्याचा सरफेस तयार केला.
माळा तव्यासारखा आंतरगोल झाला. तो तसा राहणे धोक्याचे होते. त्याला मधोमध आधार देणारी बल्ली बसवून आधार देण्याची आवश्यकता होती. बल्ली आणली पण ती ठोकणार कोण? व कशी? त्याच सुमारास बापूराव लढाईहून परत आले होते. मेयोत परत जाॅइन होण्याअगोदर अंजनगावला आले होते. त्यांनी बल्ली ठोकून माळ्याला मधोमध आधार देण्याचे काम हाती घेतले. बल्ली भिंतीला टेकेपर्यंत सहज आत गेली नंतर ती भिंतीत ठोकून बसवायची होती. बापूराव स्टुलावर चढले हातोडीने बल्ली ठोकू लागले. आम्ही सर्व कौतुकाने पण श्वास रोखून उभे होतो. भिंतीला छिद्र पडून बल्ली आत गेली तर ठीक. पण धक्के बसून भिंतच कोसळली तर काय करता? बापूराव हातोडीने बल्ली ठोकत होते. आम्ही बांधलेल्या भिंतीची जडण इतकी पक्की होती की तिला लगेच छिद्र पडले व बल्ली ठीकठाक बसली. आता माळ्याला मधून आधार मिळाला होता. मी सर्वात अगोदर माळ्यावर चढून नाचू लागलो. आईने मला थांबवले. एवढ्यातच त्या माळ्याची परीक्षा नको, असे तिचे मत होते. अशा प्रकारे माळा सज्ज झाला. पुढे दोन तीन दिवस बापूरावांना अधूनमधून, आपणच आपल्या दंडांना मालीश करतांना मी पाहत होतो. दादांना(वडलांना) बापूरावांचे खूपच कौतुक वाटले. ते म्हणाले, बघा आपला बापूराव चार दिवसांसाठीच आला होता पण त्याने केवढे काम केले ते बघा. आईच्या डोळ्यात कौतुकाचे अश्रू होते.
एका पडवीची आम्ही डार्क रूम केली. तिचा आम्ही दोन कामांसाठी उपयोग करीत असू. दिवसा दूर मैदानात आरसा ठेवून आम्ही प्रकाश किरणे वापरून फिल्मच्या तुकड्यातील नटनटींची चित्रे पाहत असू. तो आमचा घरगुती सिनेमा होता. अनेकदा येणाऱ्या जाणाऱ्याच्या पायाचा धक्का आरशाला लागायचा. तसे झाले की, आमचा सिनेमा बंद पडायचा व मग आम्ही दार उघडून मैदानात धाव घेत असू व आरसा ठीक करीत असू.
डार्क रूमचा उपयोग दिवसा काढलेले फोटो डेव्हलप करण्यासाठी होत असे. रात्री अंधार झाला की, कंदिलाभोवती पारदर्शक लाल कागद लावून जो लाल प्रकाश यायचा त्यात आम्ही फोटो डेव्हलप करीत असू. वडील काळी घोंगडी घेऊन कॅमेऱ्यामधला निगेटिव्ह असलेला कागद काढून तो डेव्हलपर द्रावणात बुडवीत. थोड्यावेळाने तो बाहेर काढून लाल प्रकासशात फोटो किती गडद झाला ते आम्ही बघत असू. पुरेसा उमटला की नंतर डेव्हलपर द्रावणातून काढून हायपोमध्ये टाकीत असू. हायपोचे काम फोटो फिक्स करण्याचे असायचे. दिवसभर काढलेल्या फोटोचे निगेटिव्ह पंधरा तरी असायचे. ते फिक्स झाले की डार्क रूममधून आम्ही घामाघूम अवस्थेत बाहेर येत असू. कंदिलाला लावलेला लाल कागद काढून आमच्या फोटोग्राफीची करामत आम्ही कौतुकाने पहात असू. मला सर्वात अगोदर झोप यायची. बाकीची मंडळी आवराआवर करून अर्ध्या तासाने झोपी जायची.
एका पडवीचा उपयोग झोपण्यासाठी करीत असू. ओळीने सात पलंग होते. पलंगांच्या फळ्या पलंगावर बसताच वरखाली व्हायच्या व बसणाऱ्याच्या बुडाला चिमटा बसायचा. म्हणून प्रत्येक पलंगावर सतरंजी कायम टाकलेली असायची. प्रत्येकाची वेगळी गादी, उशी, पांघरूण व मच्छरदाणी होती. एकदा गावात चोर शिरल्याची माहिती कळली. ते घरफोडी करायचे, घरच्यांना मारहाण करायचे व चीजवस्तू लुटून न्यायचे. आमचे घर त्या भागात एकटे होते. आजूबाजूला घरे नव्हती. चोर आले तर काय करायचे. सगळ्यांनी एकदम ओरडायचे, असे ठरले. पण आवाज ऐकू येईल का? मी म्हटले मी ओरडतो. तुम्ही दूरवर जाऊन आवाज ऐकू येतो का, ते पहा. त्यापेक्षा आपण ओसरीला असलेले पत्रे वाजवले तर? मी पत्रे वाजवायला तयार झालो. पण आईने मला थांबवले. ती म्हणाली चोर आले की, मग वाजवा. आताच गाव गोळा करायला नको.
पण चोरांची वार्ता कळवण्याचे काम गोठ्यातली गुरे करायची. एके रात्री ती अस्वस्थ झाली. इतकी की आम्ही जागे झालो. वडील एका हातात कंदील व दुसऱ्या हातात सोटा घेऊन पहायला निघाले. चोर खरेच आले होते. पण ते कडबाचोर होते. आम्ही कडब्याच्या पेंड्या गुरांसाठी चारा म्हणून साठवून ठेवल्या होत्या. त्या चोरायला ते आले होते. आम्हाला जाग आलेली पाहताच ते पळून गेले. सकाळी आम्ही त्यांनी पळवण्यासाठी काढून ठेवलेल्या पेंड्या परत आणून ठेवल्या. यापेक्षा वेगळा चोरीचा अनुभव आमच्या वाट्याला आला नाही. चोरी कुणाकडे करायची याची अक्कल चोरांना नक्कीच असणार, असे आई म्हणायची. त्यामागचे कारण तेव्हा मला कळत नव्हते.
४. घर पाहिले बांधून-२
लहानपण देगा देवा
वसंत गणेश काणे
घर बांधायचे ठरले. वडील सेवानिवृत्त झाले होते. फंडाची रक्कम हाताशी होती. त्यामुळे आता नीट व चांगल्याप्रकारे घर बांधायचे असे ठरले. पहिले घर पाडायचे आणि त्याच जागी नवीन घर बांधायचे झाले तर मधल्या काळात रहायचे कुठे असा प्रश्न उभा राहिला. वडील म्हणाले त्यात काय गोठ्यात राहू काही दिवस. तीन महिन्यांचाच कायतो प्रश्न आहे. पण गोठा गुरांना बांधण्यासारखाही राहिलेला नाही, असे आम्हीच अगोदर पासूनच म्हणत असू. समजा आपण गोठ्यात राहिलो जरी, तरी मग गुरे कुठे बांधायची. बांधू काही दिवस मोकळ्यावरच, एक विचार समोर आला. पण तो सोडून द्यावा लागला कारण कुणीतरी सांगितले गुरांना गोठ्याची सवय झाली आहे. ती मोकळ्यावर राहणार नाहीत. दावे तोडून आत गोठ्यात येतील. यापेक्षा अगोदर गुरांसाठी नवीन गोठा बांधू. त्यात आपण काही दिवस राहू. घर बांधून झाले की, आपण घरात जाऊ. गुरे नवीन गोठ्यात बांधू व जुना गोठा तोडून टाकू. हा विचार पक्का झाला. त्याप्रमाणे गोठा बांधायला घेतला. अगोदर जमीन धुम्मस करून पक्की केली. सागवानाचे खांब डांबर लावून जमिनीत पुरले. वरती पत्रे घातले. बाजूलाही पत्रेच लावले. गोठा चांगलाच बंदिस्त झाला होता. मला वाटले आपण गोठ्यातच राहिलो तर काय हरकत आहे. मी आईशी बोललो. माझी आई चांगली शिकलेली होती. म्हणजे चौथा वर्ग पास होती. तिने मला मूर्ख म्हटले नाही. ती म्हणाली, आपण नाहीतरी काही दिवस तिथेच राहणार आहोत. घर बांधून झाले की ठरवू, कुठे रहायचे ते. तेव्हा तूच ठरव. मला तिचे म्हणणे पटले.
पुढे नंतर गोठा म्हणून वापरायचे शेड तयार झाले. आम्ही सामान तिकडे हलवले. वडील परतवाड्याला जाऊन ट्रकभर फळ्या घेऊन आले. चौकोनी तुळया कापल्यानंतर उरलेल्या त्या सागवानी फळ्या होत्या. या लाकडातून दारे, खिडक्या, पलंग, रॅक्स, कपाटे अशा अनेक वस्तू त्या काळच्या पद्धतीनुसार व आमच्या ऐपतीनुसार आम्ही तयार करून घेतल्या होत्या. त्यातले एक कपाट आजही माझ्या घरी आहे. ते पाहिले म्हणजे तुळया कापून उरलेली फळकुटेही कशी व किती उपयोगाची ठरली असावीत, याची कल्पना येईल. कमी रुंदीच्या पण काही पाव इंच, काही अर्धा इंच तर काही एक इंच जाडीच्या फळ्या त्यातूनच निघाल्या. ठावे, चौकटीसाठीची लाकडेही त्यातून निघाली. उरलेला कचरा घर बांधून झाल्यावर आम्ही पाणी तापवायच्या चुलीत इंधन म्हणून बरेच दिवस वापरीत होतो. या सर्व लाकडासाठी ३५ रुपये मोजावे लागले होते. हा खर्च केला तर खरा पण वडील काळजीत पडलेले दिसले.
ही १९३९/४० सालची गोष्ट आहे. दुसरे महायुद्ध सुरू झाले होते. इंग्रजांच्या फौजांची पिछेहाट होत होती. महागाईचा भडका उडायला सुरवात झाली होती. एरवी जे लाकूड २५ रुपयाला मिळाले असते, त्यासाठी तब्बल ३५ रुपये मोजावे लागले होते. महागाई उत्तरोत्तर वाढतच जाणार हे स्पष्ट झाले. घरबांधणीच्या खर्चाचे अंदाजपत्रक कोलमडून पडणार अशी चिन्हे दिसू लागली. वस्तूंच्या भावांसोबत मजुरीचे भावही वाढायला सुरवात झाली होती.
दादांनी (वडलांनी) सुतार म्हणून ज्याची निवड केली होती, त्याची दादांवर भक्ती होती. त्याची मुले दादांनी ‘शहाणी करून सोडली’ होती. त्याने धीर दिला. गुरुजी, काळजी करू नका. आपण चार महिन्याऐवजी घर एक महिन्यातच बांधून काढू. मी भराभर चौकटी (दारे व खिडक्यांच्या) तयार करतो. पल्ले रंधा न मारताच तयार करू. कौले टाकायच्या कैच्या व उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मारायच्या रिफांना रंधा नकोच असतो. जमतील तेवढी जुनी कौलंच वापरू.
अशाप्रकारे सुतारकामाची सोय झाली. गवंडीकामाचे काय? जुन्या घराला होत्या तशा कुडाच्याच भिती बांधायचे ठरले चारी बाजूनी पडव्या निघणारच होत्या. त्यांच्या भिंतीपुरत्याच विटा वापरायचे ठरले. चुना न वापरता गाऱ्यातच विटांची जुडाई करायची. बाहेरच्या बाजूचे दर्जेच तेवढे चुन्याने भरायचे. दर्जे भरणे म्हणजे काय ते मला काही दिवसांनीच कळले. विटांची जुडाई मातीने करायची. बाहेरच्या बाजूने विटांना जोडणारी माती खरवडून खाचा करायच्या व त्यातच तेवढा चुना भरायचा. व हेही बाहेरच्या भिंतींनाच करायचे. रेती व चुन्याची गरज आता एक चतुर्थांश इतकीच उरली.
जुने घर बांधले त्यावेळचा अनुभव असलेले दोघेच उपलब्ध होते दादा (माझे वडील) व माझी आई. तिने त्या वेळी रेज्याचे काम केले होतेच. शिवाय आता हाताशी तीन किशोर होते. मनू (मनोहर केळकर माझा मावसभाऊ), बंडू (नारायण काणे माझा मोठा भाऊ) व वसंता ( मी वसंत काणे). मनू बंडू किशोर शोभले असते पण मी बालवयातच होतो. पण ती उणीव मी बडबड करून भरून काढीत होतो. माझी मावशी गोदुताई
(यशोदा केळकर) व धाकटी मावस बहीण उषा केळकर. मावशी शिक्षिकेची नोकरी करून घरी आल्यावर मदतीला असे. उषा आम्हा तिघांच्या शर्टाचे टोक आळीपाळीने धरून आमच्या सोबत वावरत असे.
माझे मोठे बंधू बापूराव ( डाॅ भगवान काणे) व बहीण सुमाताई ( सुमती काणे) नागपूरला राॅबर्टसन मेडीकल स्कूल मध्ये शिकत होते. खरे सांगायचे तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च परवडण्यासारखा नव्हता. वर्षभर बापूराव दोन शर्ट्स व दोन पॅंट्स व सुमाताई दोन साड्या एवढीच कपड्यांची चैन करू शकत होते, हे सांगितले म्हणजे आमची स्थिती किती ओढग्रस्तीची होती, हे वेगळे सांगायला नको.
लाकडांची चौकट तयार करायची, हे काम सुताराचे. बांबू कापून त्याच्यातून योग्य मापाच्या कमड्या तो सुरवातीलाच करून देत असे. चौकटीतील तीन उभ्या दांड्यांना कमड्या धनुष्याप्रमाणे वाकवून आम्ही लाकडी दांडे व कमड्या यांचा वापर करून भिंतीचा लाकडी सांगाडा तयार करू लागलो. तो तयार होताच गारा थापून कुडाची भिंत तयार करू लागलो. क्वचित काही अडले तर मदतीला एक मजूर व एक रेजा होती. ते आपले इतर काम सोडून तेवढ्या पुरते येत. अडचण दूर झाली की आपल्या कामाला परत लागत. अशाप्रकारे अतिशय कमी वेळात आम्ही घराचा मधील चौकोनी भाग तयार केला.
आता कैच्या चढवण्याचे काम मेहनतीचे व जोखमीचे होते. याकाळात सुताराने बारा/चौदा कैच्या तयार केल्या होत्या. त्या चढवून फिट करण्यासाठी दोन मजूर आणखी लावावे लागले. यथावकाश छताची लाकडी चौकट तयार झाली. त्यावर लाकडी फळ्या ठोकल्या व कौले बसवायला सुरवात झाली. आता उरल्या होत्या पडव्यांच्या भिंती. त्या विटांच्या करण्याचे ठरले होते. पाया घेऊन या भिंती बांधायच्या, हेही ठरले होते.
३. घर पाहिले बांधून-१
लहानपण देगा देवा
वसंत गणेश काणे
आम्ही दोनदा धर बांधले. पहिले घर बांधले तेव्हा माझा जन्मच झाला नव्हता. त्यामुळे त्या घराची ऐकीव माहितीच गाठीशी आहे. पण सुरवात पहिल्या घरापासूनच करायला हवी. कारण तो अनुभव लक्षात घेऊनच आम्ही दुसरे घर बांधले होते.
माझे वडील मिलमध्ये नोकरी करीत होते. पण मिलमधील यंत्रांची धडधड सहन न झाल्यामुळे त्यांनी ती नोकरी सोडली. नंतर क्षयरोगाचे निदान झाले. डाॅक्टरांनी सहा महिन्यांचे आयुष्य यापुढे शिल्लक आहे, असेही माझ्या काकांना सांगितले. त्यावेळी क्षयावर उपचार असे नव्हतेच. डाॅक्टरांनी मोकळी ताजी हवा, खाण्यात फळफळावळ व दूघ आणि दुधाचे पदार्थ, जेवणात भाजीपाला व चालण्याचा व्यायाम असे उपचार करून पहा, अशी सूचना केली. त्यानुसार वडलांनी गावाबाहेर रेल्वे स्टेशनपासून दोन फर्लांग अंतरावर एक १०० बाय १०० फुटाचा प्लाॅट ६० रुपयांना विकत घेतला. हा काॅर्नर प्लाॅट होता. रस्त्याकडच्या दोन बाजूंना मेंदीचे ( हाताला लावतात ती मेंदी) कंपाऊंड घातले. मजूर बोलवून विहीर खणून घेतली. तिला ३० फुटावरच अतिशय गोड पाणी लागले. यानंतर वडील काका (त्यांना तात्या म्हणत) आई, काकू आणि लहान मुले यांच्यासह प्लाॅटवर रहायला गेले. पथ्याचे कडक पालन सुरू केले व घर बांधायचेही ठरविले. सुरवातीला जमिनीत चार कोपऱ्यात चार सागवानी बल्यांचे खांब बसवले. त्यांच्या भोवती तट्टे लावून घर बांधायला सुरवात केली. या चार खांबांममध्ये थोडे कमी प्रतीचे खांब रोवून घराचा मुख्य चौकोनी आकार तयार करून घेतला लाकडी चौकटी बसवून सांगाडा तयार केला. एखादा मजूर मदतीला असे. बाकी कामे हे भाऊ व आई व काकू मिळून करायचे. तीन उभी लाकडे चौकटीत बसवायची. बांबूच्या कमड्या तयार करून त्या आलटून पालटून धनुष्याप्रमाणे बसवून भिंतीची सांगाडा तयार करायचा. त्यावर गारा थापायचा. गारा तयार करायला मजूर असे. माती व गवत (कसले ते आठवत नाही) मिसळून व पाणी टाकून त्यात पायी जागच्या जागी चालून हा गारा तयार होत असे. कुंभार अशाच पद्धतीने माती ‘तयार’ करतात, हे सांगितले म्हणजे अर्थबोध होण्यास मदत होईल. हा गारा थापण्याचे काम आम्हीच करीत असू, असे आई सांगायची हा दोन्ही बाजूंनी थापावा लागायचा. अशा सर्व भिंती तयार झाल्या. योग्य ठिकाणी दारे खिडक्यांसाठी जागा सोडलेली होती. दारे व खिडक्या सुतार व अाम्ही मिळून तयार केल्या होत्या. या भिंती पावसात टिकल्या नसत्या. म्हणून चारी बाजूला पडव्या काढल्या. त्यांची रुंदी सात फुटांची ठेवली होती. यांच्या भिंती पावसाने ओल्या होऊ नयेत, म्हणून व पायव्यात (खरे तर तो नव्हताच) पाणी शिरू नये म्हणून वळचणीचे पाणी दूर पडेल असे छत बेतले. एक पडवी झोपण्यासाठी होती. ती बांबू मधोमध उभे कापून व त्यांची चौकट करून बंद केली. एका पडवीत स्वयपाकघर, पाण्याचे गुंड ठेवण्याची खोली, एका कोपऱ्यात न्हाणीघर होते. बाकी पडव्यात खोल्या करून घेतल्या होत्या. असे ऐसपैस घर बांधले होते. मधला चौकोन पडव्यांपेक्षा उंच घेतला होता. त्याच्यावर लाकडाच्या कैच्या बसवणे त्यावर लाकडी रिफा घालणे व त्यावर मंगलोरी कौले बसवणे ही कामे सुतार व मजुरांकडून करून घेतली. पडव्या पत्र्यांनी झाकल्या होत्या. हे घर दहा वीस वर्षांपेक्षा जास्त दिवस टिकणे शक्यच नव्हते. तसेच झाले. भिंती वरून खचू लागल्या, त्यातून आकाश दिसू लागले.
या सर्व कालखंडात सर्व पथ्यपाण्याचे कसोशीने पालन करीत वडलांनी क्षयरोगावर ताबा मिळवला होता. म्हणजे नक्की काय झाले होते, ते त्यांच्या वृद्धापकाळीच कळले. फुप्पुसात ज्या भागात क्षयाची बाधा झाली होती त्याच्याभोवती शरीराच्या निरोगी कोशांनी आवरण घातले होते व त्याच जागी कायमचे स्थानबद्ध करून ठेवले होते. असे काहीसे या प्रकाराचे वर्णन करता येईल.
दूधदुभत्यासाठी गायी म्हशी घेतल्या. गोठाही बांधला. दूध, तूप यांची रेलचेल होती. आम्ही दूध विकत नसू, ते आम्हाला घरातच लागत असे. ताक मात्र पुष्कळसे वाटून टाकीत असू. एक दिवसाआड विरजण घुसळून ताक केले जायचे. आईचे ताक चटकन घुसळले जायचे लोण्याचा मोठा गोळा तयार होत असे. तो हातातल्या हातात थोडासा वर फेकून ती झेलायची. यामुळे ताक निथळून जात असे. आईची लोण्याचा गोळा झेलतांनाची मूर्ती आजही माझ्या दृष्टीसमोर उभी राहते. अशाप्रकारे सर्व ताक केव्हा एकदाचे निथळते याची वाट पहात आम्ही बालगोपाल बाजूला आशाळभूतपणे बसलेलो असायचो. प्रत्येकाच्या हातावर लिंबाएवढा लोण्याचा गोळा पडायचा. घुसळणाचा माठ ताकाने जवळजवळ अर्धा भरलेला असायचा. शेजारपाजारचे लोक ताकासाठी भांडी घेऊन यायचे. प्रत्येकाला हवे तेवढे ताक मिळत असे. कुणाला जास्त हवे असले तर तो तसे मागून घ्यायचा.
लहानपण देगा देवा
२. बाभूळ
वसंत गणेश काणे
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी हे माझे जन्मगाव. लहानपणी मित्रमंडळींसह बाभळीच्या झाडावर चढायचे आणि डिंग गोळा करायचा, परत येता येता जमेल तेवढा खायचा आणि उरलेला आईच्या हवाली करायचा, हा रोजचा संध्याकाळचा क्रम होता. कधीकधी काही डिंक खिशातच रहायचा. सदरा तसाच धुवायला गेला की तो खिशाला चिकटायचाआणि सदरा धुताधुता बराच वेळ जायचा व त्रासही व्हायचा. मग आईची बोलणी खावी लागत.
बाभळीच्या झाडाला मोठाले काटे असतात. आमच्या लहानपणी दुसरे महायुद्ध सुरू होते. तोफादी शस्त्रे तयार करण्यासाठी लोखंडाची गरज भासे. त्याकाळी भारतात टाचण्या तयार होत नसत. किंवा एखादा कारखाना असलाच तर असेल. त्यामुळे टाचण्यांची सुद्धा इंग्लंडमधून आयात होत असे. ती युद्धामुळे बंद झाली. ते लोखंडही शस्त्रासाठी वापरले जाऊ लागले. पण मग कागद टाचायचे कसे? एका सुपीक डोक्यातून उपाय बाहेर आला. टाचणीऐवजी बाभळीचे काटे वापरावेत. झाले, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकडे काटे गोळा करण्याचे काम असे. यासाठी फारसे कष्ट पडत नसत. कारण कार्यालयाच्या आवाराच्या कुंपणात बाभळीची झाडे असत.
घरी स्वयंपाक चुलीवर असे. अंघोळीचे पाणीही चुलीवरच तापवले जायचे. बाभळीच्या लाकडांची गाडी आम्ही दरवर्षी खरेदी करीत असू. ती लाकडे फोडून त्याच्या झिलप्या तयार करायच्या. मोठी लाकडे वडील फोडीत असत. खोडावर ज्या ठिकणी फांदी उगवलेली असे, तो भाग फोडण्यास खूप कठीण जाई. हे काम वडील करीत. बाकीची लाकडे आम्ही फोडत असू. त्याला गाठ म्हणत. गाठ फोडणे ताकदीचे व कौशल्याचे काम मानले जायचे. या गाठी वडील फोडत. लाकूड तोडण्याचे/फोडण्याचे एक तंत्र असे. उभा घाव घालायचा नाही. तिरपे घाव घालायचे. लाकडावर इंग्रजी व्ही अक्षरासारखी खाच तयार झाली पाहिजे. म्हणजे लाकडाच्या फांदीचे दोन तुकडे सहज करता येतात. घरातील चूल पेटवतांना एक/दोन मोठी लाकडे व बाकी झिलप्या अशा रचायच्या की हवा खेळू शकली पाहिजे. आगपेटीची एकच काडी ओढायची. दुसरी लागायला नको. अनेकदा रात्री थोडासा तरी प्रकाश मिळावा म्हणून चिमणी पेटती ठेवलेली असे. तिच्या ज्योतीत धरून एक लहान काडी पेटवायची व तिचा उपयोग करून चूल पेटवायची. काही लोकांना हेही परवडत नसे. ते सकाळी विस्तव मागायला येत. रात्री चूल विझवतांना आई काही निखारे चुलीतच राखेखाली झाकून ठेवायची. सकाळी फुंकणीने राख उडवताच निखारे पुन्हा धगधगायचे. बाभळीची लाकडे जळतांना इतर लाकडांच्या तुलनेत फारसा धूर देत नसत. ती हळूहळू जळत. त्यांचे निखारेही बराच काळ जळत/टिकत. म्हणून स्वयंपाकासाठी बाभळीची लाकडेच वापरली जात.
बाभळीचा डिंक डिंकाचे लाडू करायला वापरला जायचा. डिंक तुपात तळला की त्याची लाही व्हायची. ही वापरून बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू तयार करीत. बाभळीवर चढतांना काटे टोचायचे. आम्ही दररोज खोडावरचे काटे काढून ते साफ करीत असू. अशा 'तयार' झाडावर चढतांना काटे टोचत नसत. झाडाला इजा झाली त्या जागी आतून जो द्रव पदार्थ स्रवतो, तो वाळला की डिंकाचा खडा तयार व्हायचा. तो काढला की पुन्हा त्याच ठिकणी दोनतीन दिवसात नव्याने स्रवलेला डिंक वाळून नवीन खडा तयार होत असे. म्हणून आम्ही चाकूने झाडाची साल काढून आतील भागी खाच तयार करीत असू. दोन दिवसांनी तिथे डिंकाचा खडा तयार झालेला असायचा. तो अलगद काढून खिशात टाकायचा. कधी कधी ही जागा हेरून कुणीतरी डिंक अगोदरच काढून नेलेला असे. यावर झाडावर खास जागेत आम्ही खाच करीत असू. ती जागा दुसऱ्याकुणाला दिसत व कळत नसे. पण कधीतरी या जागेचा पत्ता लागायचा व दुसराच कुणीतरी डिंक काढून न्यायचा. पण इतरांच्या खास जागा आम्ही शोधून काढीत असू. अशा प्रकारे फिटंफाट व्हायची.
बाभळीच्या वाळलेल्या शेंगांची भिंगरी तयार कर णे हा आमचा एक आवडता उद्योग असायचा. भिंगरी तयार करायला निदान तीन पेरांची शेंग लागे. कुणाची भिंगरी किती मोठी अशा शर्यती होत. मी पंधरा पेरांच्या शेंगेची भिंगरी करून शर्यत जिंकली होती. यात दोन अडचणी असत. एक म्हणजे एवढी मोठी शेंग मिळायला हवी आणि दुसरे असे की ती सरळ असायला हवी.
बाभळीच्या शेंगातील दाणे जनावरांनाही पचत नसत. हे दाणे त्यांच्या शेणात सापडायचे. अशा दाण्यातूनच बाभळीचे नवीन झाड उगवते अशी आमची समजूत होती. वस्तुस्थिती काय आहे, हे अजूनही माहीत नाही. त्यावेळची एक गोष्ट ऐकलेली आठवते. एकदा खूप दुष्काळ पडला होता. अन्नधान्य मिळेनासे झाले. गरीब लोक हे शेणातले दाणे गोळा करायचे. यांना दामोटे असे म्हणत. हे दाणे वाळवायचे. नंतर भाजायचे. भाजले की वरचे टरफल सोलून काढता येते. आतील बीला दोन डाळिंब्या असतात. ही डाळ दळून त्या पिठाच्या भाकरी करून लोक खात व दुष्काळ संपेपर्यंत दिवस काढीत असत, असे ऐकले होते.
बाभळीच्या काडीने आम्ही दात घासीत असू. कडुलिंबाची काडीही वापरीत असू. काडीचा समोरचा भाग चावून चावून त्याचा ‘टूथब्रश’ करीत असू. हे शक्य न झाल्यास राखुंडीने (चुलीतल्या राखेने) दात घासीत असू. तेव्हा ‘बिटको कंपनीची काळी टूथ पावडर’ बाजारात आली होती. तसेच खडूची(?) पांढरी टूथ पावडरही बाजारात आली होती. कापूर, थंडाई व अस्मानतारा एकत्र केले एक द्रव तयार होतो व तो कोळशाच्या भुकटीत मिसळून बिटको कंपनी टूथ पावडर तयार करते, अशी आमची समजूत होती. पावडर खरखरीत व्हावी यासाठी धानाची तुसे भाजून तयार केलेली कोळशाची भुकटी बिटको कंपनी वापरते, अशीही आमची समजूत होती. हे काहीही साधले नाही तर आम्ही मीठ वापरीत असू.
त्याकाळी बाभळीची झाडे रस्त्याच्या कडेला लावलेली असत. ही प्रथा इंग्रज येण्या अगोदरपासून अस्तित्वात होती, असे ऐकले आहे. अशी ही बाभूळ आमच्या त्या काळच्या जीवनाशी निगडीत झाली होती.
लहानपण देगा देवा
वसंत गणेश काणे
१. सारसा परीला
लहानपणची एक आठवण का कुणास ठाऊक एकदम जागी झाली. त्यावेळी मासिकात/ वर्तमानपत्रात ‘सारसा परीला’ या औषधाची जाहिरात येत असे. वाचतांना अनेक जण (विशेषत: मुले) ती जाहिरात चुकीची वाचीत. ‘सारसा परीला’ असे न वाचता ‘सासरा पळाला’ असे वाचीत. ती जाहिरात वामन गोपाळ यांची होती. संपूर्ण जाहिरात “ डाॅ वामन गोपाळ यांचा सारसा परीला”, अशी होती. ती “वामन गोपाळ यांचा सासरा पळाला”, अशी अनेक मुले वाचायची. खरं सांगायचं तर मुलंच कशाला मोठी माणसं सुद्धा ही चूक करायचे.
कुणीही नवीन असला की आम्ही त्याला ही जाहिरात वाचायला सांगायचो. त्याने ती ‘सासरा पळाला’, अशी वाचली की आम्ही खो खो करीत हसायचो. काही जण ती बरोबर वाचीत. असे झाले की आमचीच विकेट पडत असे.
आम्ही कोण?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
आम्ही मूळचे तसे कोकणातले. पण कोकणातले आमचे गाव कोणते होते, ते आम्हाला माहीत नाही. कुणी सांगत, तुम्हीना ताम्हनमळ्याचे. कुणी म्हणत तळे घोसाळ्याचे. एक दिवस केसपुरीचे दत्तात्रय काशीनाथ काणे शोध घेत माझ्या घरी आले. त्यांनी सांगितले की, तुम्ही केसपुरीचे. तिथे लक्ष्मीकेशवाचे मंदीर आहे. त्याचे जोसपण काण्यांकडे आहे. पेशव्यांनी दिलेल्या सनदा आहेत. मंदीर आता जुने झाले आहे. मिठीत मावणार नाहीत एवढा घेर असलेले खांब आता आतून पार पोखरले गेले आहेत. मंदिराचा जीर्णोद्धार करायचा विचार समोर ठेवून ते भेटीला आले होते.
त्यांनी आम्हा काण्यांचा सांगितला तो मूळ इतिहास काहीसा असा आहे. आम्ही मूळचे जोशी. जोशी म्हणजे पुजारी. आमच्याकडे जोसपण परंपरागत होते. पण मग जोशांचे काणे कसेकाय झालो? त्याबाबतचा त्यांनी सांगितलेला इतिहास काहीसा असा आहे. जोशांपैकी काहीनी शेती केली. म्हणून ते खोत म्हणून ओळखले जाऊ लागले. काहींनी कुळकर्णीपण (हिशोबनीस) स्वीकारले. ते कुळकर्णी झाले. एक जोशी काणा होता. त्याला लोक काणा जोशी म्हणू लागले. पुढे काण्या जोशातले जोशी गळून काणे शिल्लक राहिले. असे आहोत आम्ही काणे. काही जोशी मात्र जोशीच राहिले. एकूण काय जोशांमधले काही खोत झाले, काही कुळकर्णी झाले, काही काणे झाले तर काही जोशांचे जोशीच राहिले. हे सगळे शांडिल्यगोत्री आहेत. मला सांगितलेला व लक्षात राहिलेला इतिहास काहीसा असा आहे.
संघटनेच्या कामाच्या निमित्ताने कोकणात प्रवास करण्याचा योग आला. मातला देवीचे प्रस्थ आमच्या घराण्यात बरेच होते. (प्रस्थ हा शब्दप्रयोग चूक की बरोबर ते सांगता येत नाही.) तिचे मंदीर कोकणात कुठेतरी आहे, असे ऐकून होतो. कुणीतरी कल्याण जवळ असे मंदीर आहे, असे म्हणाले. पण ते ‘ते’ नाही, असेही कळले. मंदिराचा शोध लागला नाही.
कुणीतरी सांगितले की ही देवी नव्हतीच म्हणून. आमच्या मूळ पुरुषाचा जन्म झाला आणि त्याची आई तो जन्मताच वारली. या अनाथ बाळाला आपले स्तन्य पाजून एका देवीसमान कुणबिणीने वाढवले. तिचे नाव होते, मातला. या बाळाने मोठा झाल्यानंतर आपल्या या दुसऱ्या मातेला देवीचा दर्जा दिला. ही देवीसारखीच म्हटली पाहिजे. पण तशी ती लौकिकदृष्ट्या देवी नव्हती. म्हणून तिचे मंदीर असण्याचे काहीच कारण नाही. तुम्ही शोध घेण्याच्या भानगडीत पडू नका. तुम्हाला ते कधीच सापडणार नाही. ही कथा खरी की खोटी ते माहीत नाही. खरीखोटी कशी का असेना या ‘देवीच्या’ कृपाप्रसादाने ‘त्या’ मूळ पुरुषाची वंशवेल पुढे फुलली, बहरली. तिच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बहुदा या पुरुषाच्या वंशजांच्या घरी या समाजाची सवाष्ण असते. असे म्हणतात. तिचा मान फार मोठा असतो. लहानमोठे तिला वाकून नमस्कार करतात. तिने भोजन केल्याशिवाय घरातले कुणीही अन्न ग्रहण करीत नाही.
रूट्स (Roots) हा ग्रंथवजा वृतांत वाचला. त्यातील नायकाने आपला मूळ पुरुष अचूक शोधून काढला. पण तशा प्रकारच्या नोंदी ठेवण्याची प्रथा आपल्याकडे नव्हती म्हणून म्हणा किंवा ठेवलेल्या नोंदी समजत नाहीत, म्हणून म्हणा, आपल्याकडे या बाबतीत अनंत अडचणी आहेत. पण आपण का व कुणामुळे आहोत, हे जरी कळले तरी खूप झाले की. पण तेही खरे की खोटे? पण त्या भानगडीत पडाच कशाला? आम्ही कोण? एका मानवाचेच वंशज हे तर नक्कीच आहेना. तेवढे पुरेसे नाही का?
लहानपण देगा देवा - सार्वजनिक झोका
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
माझा जन्म अंजनगावचा. जन्माची वेळ रात्री साडे आठची. हे कशावरून. तर सी पी रेल्वेची नॅरो गेज पॅसिंजर गाडी (नंतर लोक तिला शकुंतला गाडी म्हणू लागले), रात्री साडे आठला स्टेशनवर यायची. स्टेशनवर जायचा रस्ता आमच्या घरावरून जायचा. त्या रस्त्यावर उतारूंची ये जा सुरू झाली होती. म्हणजे रात्रीचे साडे आठ झाले असले पाहिजेत. आस्मादिकांची गाडीही मातेच्या उदरातून त्याचवेळी भूतलावर अवतरली होती. गाडी स्टेशनवर आल्याची शिट्टी झाली आणि त्याचवेळी आस्मादिकांनीही भूतलावर अवतरल्याची ग्वाही पहिला टाहो फोडून दिली. म्हणून आस्मादिकांचा जन्म रात्री साडे आठचा.
आमच्या प्लॅाटचे क्षेत्रफळ 100x100 फूट असे चांगले ऐसपैस होते. (अजूच्या घराचा प्लॅाट याहूनही मोठा आहे, बरंका!) त्याला काटेरी तारेचे कंपाऊंड होते. दोन खांबामधली जागा मेंदीची झाडे लावून झाकली होती. अंगणात कडुलिंबाची एकूण पाच भली मोठी झाडे होती. एक झाड तर एवढे मोठे होते की त्यामुळे उरलेली चार झाडे उंच वाढू शकत नव्हती. ती आडवी पसरली होती. त्यापैकी एका झाडाची एक फांदी आडवी वाढली होती. जमिनीला अगदी समांतर! तिने कंपाउंड ओलांडून बाहेर आपला विस्तार नेला होता. ही फांदी जमिनीपासून 20 फूट उंचीवर आडवी व जमिनीला समांतर अशी गेली होती.
माझे वडील तसे कल्पक होते. मुले घरात सारखा दंगा करतात, अशी आईची तक्रार असायचा. त्यातले मनू व बंडू हे अतिशय सज्जन होते. दंगा करू नका, म्हटले की, गप्प बसायचे. पण मी तसा नव्हतो. गप्प बैस, म्हटले की, याला आणखीनच चेव येतो, अशी आईची रास्त तक्रार होती. मुलांना काहीतरी ‘उद्योग’दिला पाहिजे, असा विचार करून वडलांनी बाजारातून काथ्याचा दोरखंड आणवला. आडव्या गेलेल्या फांदीला तो दोर बांधून त्यांनी झोका तयार करवून घेतला. पाय ठेवायला लाकडाची पट्टी लावली आणि जो कोणी दंगा करील त्याने झोक्यावर 25 उठाबशा काढायच्या, अशी शिक्षा फर्मावली. पण झाले भलतेच. आमच्यासाठी ते खेळणेच होऊन बसले. येताजाता आम्ही त्यावर झोके घेऊ लागलो. अगोदर नंबर कुणाचा, यावरून आमच्यात भांडणे होऊ लागली. मी सगळ्यात लहान म्हणून माझा नंबर पहिला, हे मी मनू व बंडू कडून कबूल करवून घेतले. पण उषाने मध्येच फांदी मारली. कारण ती सर्वात लहान होती. पण तिला झोका घेता येत नसे. तिला फळीवर बसवून आम्ही झोके द्यायचे, अशी तडजोड झाली. मनू व बंडू मोठे आहेत, त्यामुळे त्यांनी झोके देण्याची जबाबदारी घ्यावी. माझे काही चुकले आणि ती झोक्यावरून खाली पडली तर तिला लागायची भीती होतीना. माझा हा प्रस्ताव मान्य झाला.
तेव्हापासून अनेक वर्षे आम्ही त्या झोक्यावर मनमुराद झोके घेत असू. कोणाचा झोका उंच जातो, अगदी जमिनीला समांतर जातो, अशा आमच्या शर्यती लागायच्या. झाडाची फांदी व झोक्याची दोरी कंपाऊंडच्या बाहेर गेली होती. ती वाटेने येणाऱ्या जाणाऱ्याला लागू नये म्हणून झोक्याची फळी झोके घेऊन झाल्यावर कंपाऊंडच्या खांबाला आम्ही अडकवून ठेवीत असू.
हळूहळू आमचा हा झोका गावभर आवडता झाला. जोतो येताजाता मनसोक्त झोके घ्यायचा व नंतर तो कंपाऊंडच्या खांबला अडकवून ठेवायचा. यात रेल्वे स्टेशनवर जाणारे येणारे उतारू, हमाल हेही झोके घेण्याचा आनंद लुटायचे.
दिवसातला पहिला झोका घेण्याचा मान गावातल्या एका पखालजीचा असायचा. एका काठीच्या दोन्ही टोकांना रॅाकलचे रिकामे झालेले चौकानी पिपे भरून तो पाण्याची नेआण करीत असे. त्याचा मार्ग घरावरून जायचा. भल्या पहाटे तो घरापाशी यायचा. पाण्याने भरलेले डबे खाली ठेवायचा आणि मनसोक्त झोके घ्यायचा. झोके घेतांना दोराचा कऽरकऽर असा आवाज यायचा. तो आईला बरोबर ऐकू यायचा. तिच्यासाठी तो ’अलार्म’च होऊन बसला होता. झोक्याच्या आवाजाने ती जागी व्हायची. पखालजी आला, म्हणजे आता उठले पाहिजे, असे म्हणत ती कामाला लागायची. झोके घेऊन झाले की, पखालजी झोका खांबाला नीट अडकवायचा आणि आपले ओझे पुन्हा खांद्यावर घेऊन मार्गस्थ व्हायचा.
लहानपणं देगा देवा
घासाघीस
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२ (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
माझ्या लहानपणी, डोक्यावर टोपलं घेऊन एक महिला येत असे. ‘कपबशा, बरणी, भांऽऽऽडी’, अशी हाळी देत ती घरात शिरायची. ‘घे वं माऽऽय’, असं म्हणून ती डोक्यावरचं टोपलं खाली ठेवायची. माझी आई बाहेर यायची आणि म्हणायची, ’आलीसंच का तू पुन्हा! मागच्या वेळेलाच तुला येऊ नकोस, म्हणून सांगितलं होतं ना. फसवलंस तू मला त्यावेळेला. कपडे घेतलेस भाराभर आणि दिलस काय, तर फक्त दोन पातेली! तेव्हाच सांगितलं होतं तुला की पुन्हा येऊ नकोस म्हणून’.
माझ्यासाठी हा संवाद नवीन नसे. शब्दात थोडाफार फरक असायचा आणि मग त्या दोघीत जी घासाघीस सुरू व्हायची, ती मला खूप आवडत असे. मी कोपऱ्यात बसून ती घासाघीस ऐकत असे.
आईनं एक कपडा पुढे ठेवला की, ती एक छोटीशी पातेली पुढे ठेवायची.
आई म्हणायची, ‘एवढी छोटी पातेली नको मला. मोठी असेल तर दाखव’.
‘दाखवते माऽऽय, पन जरा जरीचं लुगडं लावशील की नाय?’, असं म्हणत ती मोठी पातेली समोर ठेवायची. आई जरीचं जुनं जुनेर समोर करायची आणि म्हणायची, ‘पण मग मला वरती झाकायला झाकणी आणि ढवळायला डाव पाहिजे’.
ती डाव समोर करायची अन म्हणायची ‘सायबाचा जुना कोट लाव, म्हंजे ताटली बी लावतो’.
आई कोट पुढे ठेवायची अन म्हणायची, ‘पण मग सोबत झारा सुद्धा दिला पायजे’.
ती कशालाही नाही म्हणायची नाही. झारा समोर ठेवायची अन माझ्याकडे पहात म्हणायची,’लेकराचा कुडता दे की जोडीला’.
असा तो संवाद चालायचा अन मग ती उठतांना म्हणायची, ‘माऽऽय, साफ बुडली म्या आज. मुदलबी सुटायचं नाय!’
आई म्हणायची, ‘मीच फसले. तू असं कर बरं. पुन्हा येऊच नकोस मुळी. दरवेळी लुटतेस मला’.
लांब जाताना तिच्याकडे पहात मी आईला म्हणत असे, ‘आई, ती पुढच्या वेळी आलीच नाही तर गं?’
अरे, तिला कोण आहे, माझ्याशिवाय?, बघशीलच तू.’
‘आणि तुला गं?’ माझा प्रश्न.
पातेली, ताटली, डाव, झारा असं सर्व साहित्य गोळा करत आई घरात जायची. तिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असायचं. मला वाटायचं. धावत जावं, त्या भांडेवालीच्या चेहऱ्यावरही असंच हास्य आहे का ते पहायला. पण ती खूपच दूर गेलेली असायची.
लहानपण देगा देवा
आमच्या घरची तलवार आणि जंबिया
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
एखाद दिवशी मध्येच केव्हातरी रात्री झोप उघडल्यावर का कुणास ठावूक लहानपणच्या आठवणी जाग्या होतात. असे का होत असावे, ते कळत नाही. आज अचानक आमच्या घरच्या खऱ्याखुऱ्या तलवारीची आठवण झाली. ही तलवार आमच्या घरी कशी आली ते माहीत नाही. आम्हा मुलांना तिच्याबद्दल कुतुहल असे. पण आईने तलवारीबद्दल कुठेही बोलायचे नाही, असे बजावून सांगितले होते. याचा आमच्यावर इतका परिणाम झाला होता की, आम्ही भावंडे आपापसात सुद्धा तिच्याबद्दल कुजबुजच बोलत असू. आमचे अंजनगाव -सुर्जी हे गाव तसे शांत असायचे. पण एक दिवस अफवा पसरली की, गावात कुणी क्रांतिकारक आला आहे. त्याच्याजवळ शस्त्रे आहेत आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस घरोघर जाऊन झडती घेणार आहेत. आता आपल्या घरच्या तलवारीचे काय करायचे? दादा (माझे वडील) म्हणाले, आपण ती घराच्या (तुळईवर) एखाद्या आडव्या खांबावर ठेवून देऊ. तिथे कोणाचे लक्ष जाणार नाही. पण नंतर कोणी तरी म्हणाले की, पोलिस अशाच तर जागी शोध घेत असतात. आई म्हणाली, माझ्या मनात एक विचार आला आहे. आता ती तलवार कुणाला हवी आहे का? ती अर्थातच कुणालाच नको होती. ती अगोदरच्या पिढ्यांपैकी कोणीतरी आणून ठेवली होती, एवढेच आम्हाला माहीत होते. पण त्या तलवारीशी आमचे भावनिक नातेही जुळले होते. त्यामुळे ती टाकायची तरी कशी ? तसेच कशी टाकायची? असा विचार होता. आई म्हणाली तलवार घरीच राहील पण वेगळ्या रूपात. तुम्हाला चालेल का? नाही म्हणणे शक्यच नव्हते. आईने लोहाराला निरोप पाठवला. त्याला त्या तलवाराची विळी तयार करून देतोस का? म्हणून विचारले. तो म्हणाला की, विळी करता येईल पण ती खूपच मोठी होईल. शेवटी तिच्या चार विळ्या करायचे ठरले. पण लोहीरालाही भीती वाटत होती. तो म्हणाला, ‘मला भीती वाटते. पोलिसांनी मला पकडले तर काय करू?’ शेवटी रात्री भट्टी लावायची आणि विळ्या तयार करायच्या, असे ठरले. पण लोहार घाबरतच होता. शेवटी आईने त्याला दोन आणे (आजचे बारा पैसे) मजुरी जास्त देईन म्हणून कसेबसे तयार केले. अशाप्रकारे विळ्या तयार झाल्या. ‘पण तुमच्या घरी चार विळ्या कशा? असे झडती घ्यायला आलेल्या पोलिसाने विचारले तर काय करायचे?’, मी शंका विचारली. आई म्हणाली, ‘काळजी करू नका. दोन माझ्यासाठी आणि एकेक माझ्या दोन जावांसाठी. अशा एकदम चार घेतल्यामुळे स्वस्तात मिळाल्या असे सांगेन मी’. पुढे झडतीची अफवाच होती, हे कळले आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. आईने एक विळी स्वत:साठी ठेवून तीन विळ्या आपल्या मैत्रिणींना दिल्या. पुढे आम्ही नागपूरला आलो. आमच्या मेयो हॅास्पिटलच्या बंगल्यात गावातले सामान हलवले तेव्हा ती विळी बरोबर आली होती. पण ती आता मधोमध झिजली होती. तिच्यावर ऊस तोडतांना ती एक दिवस काडकन तुटली आणि शेवटी भंगारात गेली.
आमच्या घरी जंबियाही होता. तो मात्र दादांनी संरक्षणासाठी घेतला होता. त्याचे काम कधीच पडले नाही. जंबियाला पाते झाकण्यासाठी कसलेतरी म्यान होते. कधीमधी तो बाहेर काढला जायचा. मी तो हातात घेऊन पहात बसायचो. पुढे माझी मोठी बहीण सुमाताई डॅाक्टर झाली. बापूराव (माझे मोठे बंधू) आणि सुमाताई दोघेही नागपूरच्या रॅाबर्टसन मेडिकल स्कूलमध्ये शिकून डॅाक्टर झाले होते. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुमाताईला मुर्तिजापूरला लक्ष्मी हॅास्पिटलमध्ये पोस्टिंग मिळाले. एकटे रहायचे म्हणून काळजी होती. सुमाताईला रहायला क्वार्टर होता. तिची बाल मैत्रीण सुशी तिच्या बरोबर सोबतीला म्हणून मुर्तिजापूरला जाणार होती. सुमाताई मुर्तिजापूरला जायला निघाली तेव्हा दादांनी तिला जातांना तो जंबिया दिला होता. व्हिझिटवर एकटीला रात्री बेरात्री जावे लागू शकते, अशावेळी हा जंबिया बरोबर ठेवीत जा, असे बजावून सांगितले होते. तिचा निरोप घेतानाचा तो प्रसंग मला आजही आठवतो. तेव्हा आईच्या डोळ्यात पाणी आलेले मी पाहिले होते. पुढे दोन वर्षांनी सुमाताईचे शेगावला पोस्टिंग झाले. तिचे शेगावलाच टायफॅाईडने निधन झाले. एक दिवस ती अडलेल्या बाईची सुटका करून घरी आली. घरी आल्याआल्या लगेचच तिला ताप भरला. तो टॅायफॅाईड निघाला. त्यातच ती गेली. तिचे सामान घरी आणले, पण त्यात तो जंबिया नव्हता.
लहानपणं देगा देवा.२०. ०१. २०२२
आमची वस्त्रप्रावरणे आणि अभ्यंगस्नाने
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
आमच्या लहानपणी मी आणि बंडू हे दोघे सख्खे भाऊ आणि मनू आणि उषा (मनोहर आणि उषा केळकर) मावस भाऊ बहीण असे एकत्र वाढलो. माझ्या आणि बंडूच्या नावाची खरंतर अदलाबदल व्हायला हवी होती. कारण बंडू सरळ स्वभावाचा, सज्जन, शांत, अभ्यासू, कामसू, आज्ञाधारक असा होता. तर मी याच्या अगदी उलट होतो. पण मी वसंताच राहिलो आणि तो मात्र नारायणाचा बंडू झाला. हे कोडे मला कधीही उलगडले नाही. पण आमच्या आईबापांना आमचे पाय पाळण्यात नेमके कसे आहेत हे न दिसल्यामुळे ही नावांची अदलाबदल झाली असेल तर त्यांना तरी दोष कसा देता येईल? . गोरेपणात माझी अन्य भावंडे उजळ होती. माझ्यात गोरेपणाचा किंचित (?) अभाव होता. पण तरीही ह्याला सोनूताईने (माझ्या आईने) कुणातरी बाईला पायलीभर ज्वारी देऊन घेतलेला दिसतो, असे म्हणून, समजून आणि मानून मला लहानपणी गोंड्या म्हणत असत.
दसऱ्याच्या अगोदर आम्हाला नवीन कपडे शिवले जायचे. प्रत्येकी दोन हाफ शर्ट आणि दोन हाफ पॅंट (चड्ड्या) शिवले जायचे. केव्हातरी आम्हा तिघांना वडील कापडाच्या दुकानात घेऊन जात. कुणाला कोणत्या रंगाचे कापड ‘शोभून’ दिसेल, याचा निर्णय बहुदा तो कापड दुकानदारच करायचा. वडलांचा आग्रह एकच असे. कापड स्वदेशी हवे. जपानी कापड चांगले दोन आणे स्वस्त असे. पण आम्ही ते कधीही घेतले नाही. आमच्यासारखी विक्षिप्त मंडळी दुकानदाराला माहीत झाली होती. त्यामुळे त्यानेही कधी विदेशी कापड घेण्याचा आग्रह धरला नाही. कापड घेऊन झाले की तिथून आम्ही तडक शिंप्याकडे जात असू. तो मापे घ्यायचा. आठ दिवसांनी या म्हणायचा. इतके दिवस कशाला लागतात म्हणून विचारले तर म्हणायचा, हे कापड तुम्ही धुवून आणलेलं नाही. ते मला अगोदर धुवावे लागेल. धुतल्यानंतर ते आटेल. मग कापून शिवीन. तसेच कापड न धुता शिवले तर कपडे लांडे होतील. सॅनफोराईज्ड कापड हा प्रकार आम्ही नागपूरला आल्यानंतरच मला कळला. सुरवातीला कापड सॅनफोराज्ड आहे किंवा कसे ते विचारून किती घ्यायचे ते विचारून किती घ्यायचे ते ठरवीत असू. सॅन फोराइज्ड कापड धुतल्यानंतर आटत नसे. आता सगळीच कापडं सॅनफोराइज्ड असतात. त्यामुळे शिंप्यांचा किंवा घरच्या मंडळींचा कोरे कापड अगोदर पाण्यातून काढून वाळवण्याचा खटाटोप वाचला आहे.
त्याकाळी सुताच्या गुंड्या लावल्या जायच्या. सुरवातीला त्या काज्यात बसत नसत. पुढे वारंवार धुतल्या गेल्यामुळे आक्रसून किंवा झिजून काज्यात टिकत नसत. गुंड्या पुन्हापुन्हा लावायची वेळ सारखी यायची. कारण थोड्याच वेळात त्या काज्यातून पुन्हा बाहेर यायच्या. चड्डीच्या बाबतीत लक्ष राहिलं नाही की फजितीची वेळ यायची. पण पुढे लगेच नवीन वर्षाचा दसरा यायचा. एक वर्ष पूर्ण झालेलं असायचं. एक चक्र पूर्ण होते ना होते तोच आम्ही पुन्हा कापडाच्या दुकानाच्या पायऱ्या चढायचो. ही अशाप्रकारे नवीन चक्राची सुरवात व्हायची. यावेळी आत्ताच्या गुंड्या नुकत्या कुठे व्यवहारात यायला लागल्या होत्या. ‘तू त्या का लावीत नाहीस?’, असे आम्ही काहीसे रागावून शिंप्याला विचारले. यावर तो म्हणाला की, जुना स्टॅाक संपायचा आहे आणि आमच्या घरीच सुताच्या गुंड्या तयार होतात, त्यांचे काय करायचे?’. पुढे काय झाले ते सांगत नाही. पण त्यानंतर निदान आमच्या कपड्यांना आजच्या गुंड्या लावल्या जाऊ लागल्या. पण त्या तुटायच्या.
कपडे धुणे हा एक कार्यक्रम असायचा. शाईचे डाग कपड्यावर पडले की ते निघता निघत नसत. कपाळावरून ओघळलेल्या तेलामुळे चेहरा तेलकट दिसत असे. आणि मानेवरून ओघळलेल्या तेलामुळे सदऱ्याची कॅालर आणि पाठ तेलकट होऊन धूळ बसून काळे डाग पडत. ते साबणानेही लवकर निघत नसत. त्यासाठी वॅाशिंग सोडा वापरला जायचा. स्वदेशी आणि विदेशी असे साबणांचे दोन प्रकार असायचे. अंगाला लावायचा हमाम आणि कपड्यांसाठी वापरायचा तो 501 साबण हे स्वदेशी होते. तर (बहुदा) लक्स हा विदेशी साबण अंगाला लावण्यासाठी आणि सनलाईट हा विदेशी साबण साबण कपड्यांसाठी वापरला जायचा. महाग असून सुद्धा आमच्या घरी स्वदेशी साबण वापरला जाई. वारंवार घासल्यामुळे कापड झिजायचे, विरायचे शेवटी फाटायचे सुद्धा, पण अनेकदा डाग मात्र निघायचे नाहीत.
त्या काळी आमच्यासाठी सणासुदीला घालण्यासाठी जरीच्या टोप्या घेतल्या जायच्या. तिची जर काढण्याचा मला छंद होता. ‘पुढच्या वेळेला तुला जरीची टोपी घेतेका बघ ’, असे आईचे धपाटा घालतांना म्हटलेले वाक्य दरवेळी ऐकल्यामुळे लक्षात राहिले आहे. धपाटा घालतांना आईच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज व्हायचा. तो मला सवयीने आवडू लागला होता. रोजच्या वापरासाठी पुठ्ठा घातलेल्या काळ्या टोप्या असत. त्यातल्या पुठ्ठ्याचा ताठरपणा आम्ही खपवून घेत नसू. त्यामुळे तो पुठ्ठा शरणागती पत्करून लवकरच लुळा पडायचा. डोक्यवरचा घाम आणि पचापचा लावलेले तेल यामुळे टोपीचा डोक्याला स्पर्श करणाऱ्या वर्तुळाकृती भागावर एक तेलकट आणि धूळ खाल्लेली काळपट पट्टी तयार व्हायची. टोपी न घालता बाहेर गेल्यास, ‘कारे, तुमच्या घरचं कोणी गेलं वाटतं?’, असे हटकले जायचे. त्याकाळी चपला घेतल्या जायच्या पण चपला घातल्यानंतरच्या कोणत्याही संस्मरणीय आठवणी नाहीत. चपलेनी किंवा बुटांनी चावल्याच्या आठवणीही नाहीत. त्या पुढे अंजनगावहून नागपूरला आल्यानंतरच्या आहेत.
दिवाळीत मात्र उटणं लावून आंघोळी व्हायच्या. पण आमच्या वेळी आमच्यापैकी कोणतेही बालरत्न, ‘उठा, उठा; दिवाळी आली, कार्तिक स्नानाची वेळ झाली’, असे सभ्य, सुसंस्कृत आणि सुमधुर आवाज ऐकून उठल्याचे स्मरत नाही. ज्या आठवणी आहेत, त्या सांगण्यासारख्या नाहीत.
No comments:
Post a Comment