Sunday, September 14, 2014

लव्ह जिहादवरील अमेरिकन उतारा - तरुणभारत १४.०९.२०१४

लव्ह जिहादवरील अमेरिकन उतारा

तारीख: 14 Sep 2014 00:49:26
अमेरिकेतील डेट्रॉईट शहर. सय्यद बोझार्ग मूडी हा इराणी इसम व्यवसायाने रुग्णाला भूल देणारा डॉक्टर होता. त्याला आपण सोयीसाठी मूडी म्हणू या. व्यवसायादरम्यान एका लहान मुलाची शस्त्रक्रिया चालू असताना त्या मुलाचा मृत्यू झाला तेव्हा मूडीला निलंबित करण्यात आले होते. बेटी नावाच्या अमेरिकन महिलेशी त्याचे प्रेमसंबंधातून लग्न झाले होते. बेटीला पूर्वीच्या लग्नापासूनची ज्यो आणि जॉन अशी दोन मुले होती. लग्नानंतर त्यांना महतोब नावाची मुलगी झाली होती. पहिल्या विवाह संबंधातून झालेली मुले आजोळी राहत. अशी लग्ने आणि तीही परधर्मीयांशी ही अमेरिकेतली खूप नवलाईची गोष्ट नाही, पण असे विवाह फारसे जुळूनही येत नाहीत.

इराणमध्ये क्रांती शहा परागंदा

इराणमध्ये बादशाहा मोहम्मद रझा शहा पहलवीची कारकीर्द सुरू होती. तो विलासी, उधळ्या, सुधारणावादी, अमेरिका धार्जिणा, महिलांना मतदानाचा अधिकार असला पाहिजे या मताचा होता, असे मानतात. तो इस्लाम विरोधक, परंपरा न मानणारा असल्याचा आक्षेप घेऊन इस्लामी धर्ममार्तंड आयातोल्ला खोमिनी यांच्या नेतृत्वाखाली उठाव करून शहाला पदच्युत करण्यात आले व इस्लामी राज्यघटना तयार करण्यात आली. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण स्थापन झाले. शहाला पदच्युत केले आणि देशोधडीला पाठविले. शहा कसाही असला तरी सुधारणावादी होता. पण त्याची राजवट संपल्यानंतर महिलांनी सतत बुरखा घालून वावरले पाहिजे, यासकट अनेक निर्बंध या राज्यात महिला आणि अन्य लोकांवर घालण्यात आले. अर्थात सगळ्यात जास्त पीडन झाले ते महिलांचे.

पत्नीला फसवून इराणला

जाण्यास राजी केले

मुंबईतून जसे चार तरुण धर्मयुद्ध लढण्यासाठी इराकमध्ये गेले तसाच प्रकार परदेशात राहणार्‍या अनेक इराणी लोकांच्या बाबतीत घडला. मूडीच्या मनाचाही इराणमधील धर्मयुद्धात सहभागी होण्याचा निश्‍चय केला. आपण इराणला काही दिवसांसाठी जाऊ असा प्रस्ताव त्याने आपल्या-पत्नीसमोर - बेटीसमोर ठेवला. बेटी सुरवातीला तयार नव्हती, कारण इराणमध्ये काय चालू आहे, हे ती पहात होती. पण काहीच दिवसांचा तर प्रश्‍न आहे, हे मूडीने तिला पटवले. एका बेसावध क्षणी ती इराणला जायला तयार झाली. आणि ते दोघे आणि त्यांची पाच वर्षांची मुलगी महातोब विमानाने इराणला गेले. बेटी आणि महतोब तेहरानला पोचले तेव्हा त्यांचे स्वागत करण्यासाठी शेकडो लोक विमानतळावर आले होते. एखाद्या विजयी वीराचे व्हावे, असे आपले स्वागत का होते आहे, हे तिला कळेना! तेहरान विमानतळावर बेटीला आणि महातोबला मुस्लिम महिलांना साजेसा पोशाख देण्यात आला आणि बेटीच्या मनात पाल चुकचुकली. पण आता काही करण्यासारखे नाही आणि काही दिवसांचाच तर प्रश्‍न आहे, असा विचार करून ती गप्प बसली. पण महातोबला तो पोषाख आवडला नाही. तिची कुरकुर सुरू झाली. एका मेंढीला अर्धवट मारून तिला ओलांडून जाण्यास बेटी, महातोब आणि मूडीला सांगण्यात आले. यामुळे महातोब भेदरून रडू लागली. इराणमध्ये पहिल्या दोन आठवड्यातच पोषाखावरून मुलगी महातोब हिला अनेकदा टोकण्यात आले. काही दिवसांनी काहीतरी सबब सांगून बेटीचा पासपोर्ट तिच्या हातून काढून घेण्यात आला. बेटीला जे सांगण्यात आले होते त्यानुसार ते इराणमध्ये फक्त दोन आठवडेच राहणार होते, पण आता मूडीने आपला मूड बदलला. म्हणणे असे होते की, युद्धात जखमी झालेल्या लोकांची शुश्रूषा करण्यासाठी ते इराणमध्ये राहत आहेत. हे आता आवश्यक झाले आहे, असे तो म्हणायचा.

इराणच्या राज्य घटनेतील ती तरतूद

इराणच्या घटनेनुसार एखाद्या स्त्रीने इराणी नागरिकाशी लग्न केले तर ती आपोआप इराणची नागरिक बनते. लग्न जर इराणमध्ये झाले तर तिचा पासपोर्ट काढून घेतला जातो. तिने घटस्फोट घेतला किंवा तिचा नवरा मेला तर ती इराणच्या नागरिकत्वाचा त्याग करू शकते पण तिच्या मुलांना तसे करता येत नाही. प्रारंभी बेटी, तिची मुलगी महातोब आणि नवरा मूडी हे त्याची बहीण अमेह बोझोर्ग हिच्याबरोबर राहत होते. पुढेपुढे बेटी आणि अमेह यांचे बिनसू लागले म्हणून तिने मुडीचे मन वळवले आणि ते वेगळे राहू लागले. बेटीवर सतत पाळत ठेवली जात होती. तिला कुणाचे फोन येतात, ती कुठे जाते, किती वेळ बाहेर असते, याची वर्दी मुडीला सतत मिळत असे. बेटी आणि तिची मुलगी महातोबला ख्रिसमस साजरा करता आला नाही. त्यांचा घरमालक एकतर अमेरिकेत राहून आला होता, तसेच त्याला इराणमध्ये झालेला बदल मान्य नव्हता. त्याची पुन्हा अमेरिकेत येण्याच इच्छा होती. त्यामुळे तो बेटीला धोका पत्करून फोन वापरू देत असे.

चिमुरडीची चतुराई

पुढेपुढे बेटीला घरात कोंडून ठेवण्यात येऊ लागले. तिला निरनिराळ्या प्रकारे यातना दिल्या जाऊ लागल्या. पाच वर्षांच्या महातोबला मूडी आपल्या सोबत जवळच्याच नातेवाईकाकडे नेत असे आणि ती आणि तिची आई कुठे जाते, कुणाशी बोलते या विषयी खोदून खोदून विचारात असे. पण पाच वर्षांच्या चिमुरडीने आपल्या बापाची डाळ शिजू दिली नाही. शेवटी मायलेकींना (बेटी आणि महातोबला) एकत्र राहू देण्यात आले. काही दिवसांनी एका कुराण शिकवणी क्लासमध्ये बेटीची एका अमेरिकन कुटुंबाची भेट झाली. या वर्गात बेटी आणि एलेन नावाची अमेरिकन महिला यांची चांगलीच गट्टी जमली. एकदा एलेन बरोबर बेटीला बाहेर जाण्याची सबब मिळाली. ती हे निमित्त साधून स्विस एम्बसीमध्ये गेली आणि तिने आपल्या कुटुंबीयांशी संपर्क केला. पण लगेचच एलेनचे अवसान गळाले आणि तिने सर्व हकीकत आपल्या नवर्‍याला सांगितली. याची शिक्षा म्हणून मूडीची नोकरी गेली. आता इराणमध्ये मूडी नोकरी करू शकत नव्हता किंवा खाजागीरीत्या वैद्यकीय व्यवसाय करू शकत नव्हता, कारण आवश्यक ती कागदपत्रे त्याच्याजवळ नव्हती. शेवटी नोकरी मिळाली पण ठरल्यापेक्षा कमी पगार दिल्यामुळे मूडीने ती सोडली आणि अनुमती नसताना सुद्धा आपला खाजगी दवाखाना सुरू केला. आता त्यांना पैशाची चणचण भासू लागली. इकडे महातोबला शाळेत सारखे रडू कोसळत असे. त्यामुळे तिला शाळेतून घरी आणावे लागत असे. त्यामुळे बेटीला तिच्यासोबत शाळेत थांबावे लागत असे. तिने आजूबाजूच्या लोकांशी संपर्क वाढविण्यास सुरवात केली. हळूहळू बेटी शाळेतल्या महिलांना इंग्रजी आणि त्या तिला फारसी शिकवू लागल्या. शाळेजवळ बॉम्बस्फोट झाले पण ते रात्री झाले आणि तसे शाळेपासून जरा दूर झाले त्यामुळे शाळा शाबूत राहिली. बागेत खेळणार्‍या मुलांना बंदुकीचा धाक दाखवून नेत आणि सैनिकी शिक्षण देऊन युद्धावर जाण्यास प्रवृत्त करीत. बेटी हे सर्व मुकाट्याने पहात होती.

सुटकेसाठीचे प्रयत्न

बेटीला आता पुरता भ्रमनिरास झाला होता. पण सावधगिरीचा उपाय म्हणून तिने मूडीशी सलोखा करण्याचे धोरण स्वीकारले. तिचे हृदयपरिवर्तन होत आहे, हे पाहून मूडी सुखावला. त्याच्या नकळत बेटी सुटकेसाठी योजना आखू लागली. तिला एकटीला आपली सुटका करून घेणे तुलनेने सोपे होते. पण इराणमधील महिलांची स्थिती तिने पाहिली होती. अशा वातावरणात आपल्या मुलीला (महातोबला) सोडून जाणे ही कल्पनाच तिला सहन होत नव्हती. जाऊ तर दोघीही नाही तर इथेच जिवाचे बरे वाईट करून घेऊ, असा तिने निश्‍चय केला होता.
एक दिवस मुडीला दवाखान्यातून तातडीचे बोलावणे आले ही संधी साधून बेटी आणि महातोब या मायलेकींनी पळ काढला. त्याचे असे झाले होते की, त्याचवेळी शेजार्‍याकडचे भोजनाचे निमंत्रण आले होते. भेटवस्तू खरेदी करण्यासाठी मूडीचा मित्रच त्यांना दुकानात घेऊन गेला. कारण त्यांना एकटे बाहेर पडण्याची मनाई होती. हवा छान पडली आहे, तेव्हा आपण पायीच घरी येऊ, असे मूडीच्या मित्राला पटवून त्यांनी त्याला वाटेला लावले आणि त्याच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. थंडी मी म्हणत होती. बेटी आणि महातोब या मायलेकी कुडकुडतच पुढे पुढे जात राहिल्या. पण लहानग्या महातोबने सुद्धा किंचितही कुरकुर केली नाही. काही दिवस त्यांनी तेहारानमध्येच लपतछपतच जीव मुठीत धरून काढले.
सुटकेसाठीच्या पहिल्या योजनेनुसार तेहरानहून दक्षिणेकडील अब्बास बंदरावर जायचे आणि तिथून स्पीड बोट पकडून सौदी अरेबियात जायचे, असे ठरले होते. पण बेटी आणि तिची मुलगी महातोब काही दिवस अगोदरच मुडीची नजर चुकवून घरून भोजनाचे निमित्त साधून पळाल्या होत्या. त्यामुळे त्यांना हा बेत अमलात आणता आला नाही. कारण स्पीड बोट काही दिवसांनी येणार होती.
त्यामुळे दुसरी योजना अमलात आणायचे त्यांनी ठरविले. यानुसार तेहारानहून तस्करांच्या साह्याने पाकिस्तानमधील क्वेटाला जायचे आणि तिथून सुटकेचा प्रयत्न करायचा. पण दरम्यानच्या काळात मूडीला त्या पळून गेल्याचे लक्षात आले होते. आपली पत्नी आणि मुलगी (बेटी आणि महातोब) बेपत्ता झाल्याची वर्दी त्याने देशभर दिली होती. सर्व सीमा भागात पोलिस तैनात केले होते. त्यामुळे तेहरान सोडण्यात धोका होता. तिथेच कुठेतरी लपून राहणे भाग होते.
आता तिसरी योजना आखण्यात आली. एका इराणी कुटुंबाचे सदस्य म्हणून टेब्रीजला सटकायचे. तिथे रेड क्रॉसची रुग्णवाहिका तयार राहणार होती. तिने तुर्कस्थानमधील अंकारा येथे पोचायचे. तिथे अमेरिकेची वकिलात आहे, वकिलातीत आश्रय घेतला की त्या सुरक्षित होणार होत्या. शेवटी ही योजना यशस्वी झाली. फक्त रुग्णवाहिकेऐवजी त्यांना घोड्यावर बसून जावे लागले. कारण आता सीमा सुरक्षा दलाचे रक्षक पाळतीवर होते. ते सर्व वाहनांची कसून झडती घेत. घोड्यावरून जाणारी बुरखाधारी महिला आणि तिची लहानगी मुलगी त्यांची नजर चुकवून निसटल्या.
वाटेत अनेक बरे-वाईट प्रसंग वाट्याला आले. बलात्काराच्या प्रसंगातूनही नशीब बलवत्तर म्हणून त्या बचावल्या. शेवटी ३ ऑगस्ट १९८४ ते २९ जानेवारी १९८६ पर्यंतचा हा बंदिवास (बंदिवास कसला नरकवास) संपून त्या ७ फेब्रुवारी १९८६ ला मिशिगनला अमेरिकेत पोचल्या. अमेरिकेत बेटीचे वडील आपल्या मुलीच्या आणि नातीच्या भेटीसाठी आतुर झाले होते. बेटीच्या वडलांना कॅन्सर झाला होता. तीन ऑगस्ट रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांची मुलगी बेटी आणि तिची मुलगी (म्हणजे यांची नात) महातोब त्यांच्या शेजारी होते. वडील चिरनिद्रेसाठीच्या प्रवासाला प्रयाण करताना चिंतामुक्त होते. कारण त्यांची मुलगी आणि नात या दोघी नरकयातना भोगून का होईना पण इराणहून अमेरिकेत सुखरूप परत आल्या होत्या. त्या दोघी सुखरूप परत आलेल्या पाहण्यासाठीच जणू त्यांचे प्राणपक्षी कॅन्सरला आणि त्यामुळे होणार्‍या वेदनांना दाद न देता खोळंबले होते. ही गोष्ट तशी जुनी आहे. पण आपल्या देशातील सद्य:स्थितीशी लागू पडणारी आहे. या सत्यकथेवर आधारित चित्रपट ‘नॉट विदाऊट माय डॉटर’ हा चित्रपट सुद्धा आता तसा जुना झाला आहे.

असा प्रसंग कुणावरही येऊ नये म्हणून देशभर मोहीम

आपण फसलो मात्र इतरांना सावध करण्याचे काम जिद्दीने पुढे चालवणार्‍या या महिलेचा लढा जसा नाट्यमय आहे तसाच तो डोळ्यात अंजन घालणाराही आहे. मूडीने आपल्या पत्नीची आणि मुलीची समजूत काढण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांचा गैरसमज झाला होता, असे त्याने प्रेमाच्या आणाभाका घेऊन त्यांना पटवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी त्याचा फोन किंवा इमेल या कशालाच दाद दिली नाही. चिमुकली महातोब सुद्धा बापाच्या भूलथापांना भुलली नाही. २३ ऑगस्ट २००९ ला मूडी अल्लाला प्यारा झाला. आता मात्र मायलेकींच्या मागचे शुक्लकाष्ठ कायमचे संपले.
बेटीने अनेक पुस्तके लिहून आपले इराणमधील अनुभव आणि इराणमधील महिलांची अवस्था कथन केली आहे. आपली कर्मकथा सांगत ती अमेरिकेत सतत फिरत असते. जो प्रसंग आपल्यावर गुदरला तो इतर कुणा अमेरिकन महिलेच्या वाटेला येऊ नये, म्हणून तिने आपल्या पायांना भिंगरीच लावून घेतली आहे. तेच आता तिच्या जीवनाचे उद्दिष्ट आहे. पण ही जागृती अमेरिकेपुरती सीमित राहू नये. लव्ह जिहादची शिकार होऊन भरकटणार्‍या आपल्या प्रगत बहिणींच्या कानावरही ही कथा जायलाच हवी. आपल्या देशातही अशीच मोहीम हाती घ्यायला हवी.
- वसंत गणेश काणे
९४२२८०४४३०

वसंत काणे यांचा लेख

‘लव्ह जिहाद’वरील वसंत काणे यांचा लेख, भारतीय मुलींच्या दृष्टीने खूपच प्रबोधनात्मक आणि भारतातील मुलींचे डोळे उघडणारा आहे. मुलींना लव्ह जिहादच्या मोहजालात फसविण्याचे प्रकार वाढत्या प्रमाणात घडत आहेत, असे दिसते. त्याला शह देण्याकरिता विश्‍व हिंदू परिषदेनेही कंबर कसली आहे, असे नुकतेच वाचनात आले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर काणे यांनी वर्णिलेल्या कथेचा प्रसार प्रामुख्याने मुलींमध्ये जास्तीत जास्त प्रमाणात होणे आवश्यक आहे, जेणेकरून या लव्ह जिहाद प्रकाराची दाहकता आणि त्यातून उद्भवणार्‍या संभाव्य त्रासाची/पीडेची वास्तवता त्यांच्यापुढे उभी राहील. त्या दृष्टीने तो प्रकार जास्तीत जास्त प्रमाणात वृत्तपत्र, दूरदर्शन, आकाशवाणीच्या माध्यमातून सर्वांच्या नजरेस येईल. शक्य झाल्यास या घडलेल्या प्रकाराची कॅसेट/सीडी बनवून तिच्याद्वारेही सर्वत्र, फक्त भारतातीलच नव्हे, तर इतरत्रही, जिथे जिथे असे प्रकार घडत असतील तेथील जनता सतर्क होईल. त्या दृष्टीने विश्‍व हिंदू परिषदेने पुढाकार घ्यावा, असे सुचवावेसे वाटते.
-  वसंत कुळकर्णी
नागपूर

No comments:

Post a Comment