Monday, September 22, 2014

ही शल्ये तीन मनी

ही शल्ये तीन मनी
वसंत गणेश काणे
बी एससी; एम ए (मानसशास्त्र);एम एड  
एल् बी ७, लक्ष्मीनगर,
पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर -४४० ०२२
९४२२८०४४३०

आजकाल शिक्षणक्षेत्राबाबत रोज काहीना काही ऐकायला आले नाही, असा दिवस जात नाही. एका दृष्टीने ही बाब चांगली आहे, पण जे ऐकायला येते ते चांगले नसते, हा अडचणीचा मुद्दा आहे. क्वचितच काही चांगले वर्तमानही ऐकायला येते पण ते तुलनेने खूपच कमी असते. असे का व्हावे? सामान्यत: ज्या अनेक चिंताजनक बाबी कानावर येत आहेत, त्यांचे तीन मुख्य प्रकारात वर्गीकरण करता येणे शक्य आहे. चौथा प्रकार नसेलच असे नाही पण त्यामुळे फारसे अडणार नाही. फार तर जो मुद्दा/मुद्दे विचारात घेणार आहोत, ते या क्षेत्राचे पूर्ण चित्रण करीत नाहीत, असे ठरेल. या वादात आपण पडूया नको.
शिक्षणहक्क कायद्याची सदोष अंमलबजावणी
आपण शिक्षणहक्क विधेयक पारित केले. पण त्याच्या अमलबजावणीबाबत दोन प्रमुख अडचणी समोर येत आहेत. एक असे की, आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने जे मागास घटक मानले जातात, त्यांच्या पाल्यांसाठी पंचेवीस टक्के जागा राखून ठेवून या जागांवर याच घटकातील मुलामुलींना प्रवेश देण्यात यावेत, हे   कलम काही शिक्षणसंस्था धुडकावून लावत आहेत. पुण्याचे डॉ. विखे पाटील फाऊनडेशन एक शाळा चालवत आहे. पंचेवीस टक्के आरक्षणांतर्गत चाळीस विद्यार्थ्यांना प्रवेश देणे नियमानुसार आवश्यक होते. हा नियम या शाळेने पाळला नाही, तसेच शिक्षणाधिकारी यांनी या संदर्भात दिलेल्या आदेशाचे पालनही केले नाही. शेवटी हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयासमोर निर्णयासाठी आले. न्यायालयाने या चाळीस मुलांना सात दिवसांचे आत प्रवेश द्यावा, असे आदेश दिले. संस्था/शाळा सर्वोच्च न्यायालयात जाते किंवा कसे हे बघावे लागेल सध्या हा निर्णय अंतिम आहे, असे आपण गृहीत धरून चालूया. दुसरे असे आहे, की ज्या शाळा हे नियम पाळतात, त्यांचीही एक तक्रार आहे. अशा विद्यार्थ्यांच्या  शुल्काची  ‘शासकीय दराने’ भरपाई करून देण्याची तरतूद शिक्षणहक्क कायद्यात आहे. ही भरपायी शासकीय दराने व्हावी की, शिक्षणसंस्था अन्य विद्यार्थ्यांनाडून ज्या दराने शुल्क आकारते, त्या दराने केली जावी, याबाबत शिक्षणसंस्था आणि शासन यात मतभेद आहेत. हा मुद्दाही आपण सध्यापुरता बाजूला ठेवूया. पण ‘शासकीय दराने’ भरपाई व्हावयास हवी, याबद्दल दोन मते असण्याचे कारण नव्हते. पण आजपर्यंत एकाही शाळेला भरपाई झालेली नाही. याचे कारण काय? काही शाळांची बिले चुकीची असतील, असेही गृहीत धरून चालूया. पण एकाही शाळेला शासनाकडून भरपाई मिळू नये, ही बाब काय दाखवते?
प्रवेशाबाबत सक्ती करायची आणि शुल्क भरपाई देण्याची कायदेशीर तरतूद असूनही ती करायची नाही, याचा अर्थ काय समजायचा? त्यापेक्षा अमेरिकेत ओबामा केअर योजनेतील (तपशीलात न जाता) तरतूद चांगली म्हणायला हवी. गरीब लोकांच्या औषधपाण्यासाठी होणारा खर्च श्रीमंतांसाठी जो खर्च केला जातो त्यात समाविष्ट करावा, अशी काहीशी ती तरतूद आहे, असे म्हणतात. सामाजिक बांधिलकीच्या तत्त्वाला अनुसरून हा खर्च, स्वत:चा खर्च स्वत:च करणार्यांनी वाटून घ्यायला तिथले अनेक नागरिक तयार झाले होते. याच पद्धतीला अनुसरून शुल्क भरणार्या पंचाहत्तर टक्के लोकाकडून ही पंचेवीस टक्के शुल्क सवलतदारांचे शुल्क वसूल करावे, अशी तरतूद कायद्यातच केली असती तर एकवेळ बरे झाले असते. नाहीतरी आज हाच प्रकार, एकतर शाळा छुप्या प्रकारे अमलात आणीत असतील किंवा त्यांचे खर्चाचे बजेट तरी कोलमडत असले पाहिजे. शासन वेतनेतर अनुदानाचे बाबतीतही असाच प्रकार अमलात आणत  आहे. तुम्ही शुल्क आकारायचे नाही आणि आम्ही भरपाई करणार नाही, असा प्रकार केवळ अनैतिकच नाही तर शाळांना आर्थिक डबघाईला आणणारा आहे. प्राथमिक स्तरावर शिक्षणाची जी परवड होते आहे, त्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे.
माध्यमावर अवाजवी भर दिल्यामुळे ज्ञान माघारले
सध्या सर्वत्र इंग्रजी माध्यमाचा बोलबाला आहे.भाषेचा अभ्यास अनेक दृष्टींनी परिणाम करीत असतो, हे आपण  लक्षातच घेत नाही. भाषा ज्ञानसाधनेसाठी कशी आवश्यक असते, तशीच ती समाज परिवर्तंही घडवून आणीत असते. भाषा हे केवळ प्रबोधनाचे(व्यावहारिक भाषेत शिक्षणाचे) साधन नाही. ती नवनिर्मिती घडवून (व्यावहारिक भाषेत प्रगतीसाठी) आणण्याचे दृष्टीनेही महत्त्वाची असते. हे मुद्दे आपण एकतर गौण मानले किंवा या मुद्यांचा आपण विचारच केलेला नाही. ज्ञानभांडार फक्त इंग्रजी भाषेतच आहे, असे नाही. ते जिथे कुठे असेल तिथून आपल्या भाषेत आणले पाहिजे. यात कमीपणा नाही. ‘विश्वातील चांगले विचार आमच्याप्रत पोचोत’, अशा आशयाचे वेदवचन आहे. पण जो समाज स्वत;च्या भाषेत ज्ञान संपादन करी नाही, त्याची भाषा हळूहळू लोप पावते, असा इशारा इतिहासाचे गाढे अभ्यासक कै. वी का राजवाडे यांनी ‘त्याकाळीच’ दिलेला आहे. जे विद्यार्थी इंग्रजी माध्यम घेऊन शिकले आहेत, त्यांच्यात बेकारीचे प्रमाण किती आहे, हे एकदा तपासून पाहिले पाहिजे. माध्यमामुळे बेकारी दूर होणार असती, तर आज अमेरिकेला बेकारीने ग्रासले असते का? नदीप्रमाणे प्रवाहित्व हा ज्ञानाचाही विशेष आहे. नदीचे एका ठिकाणचे पाणी जसे सतत बदलत असते तसेच द्न्यानाचेही आहे. दर पाच ते दहा वर्षांनी निम्मे ज्ञान कालबाह्य होत असते. जुन्या काळी जे ज्ञान पदवी संपादन करणार्यांनाही मिळाले नव्हते, ते ज्ञान आज नववी दहावीचे विद्यार्थी प्राप्त करतांना आपण पाहतो, या अर्थ हाच आहे. इंग्रजी माध्यम घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे इंग्रजीचे ज्ञान  बेताचेच असते  आणि तीच स्थिती मातृभाषेबाबतही असते. आज लोक इंग्रजीच्या मागे का धावत आहेत? कारण त्या भाषेतील ज्ञानभांडार  तुलनेने जास्त आहे. उद्या हीच स्थिती भारतीय भाषांचे बाबतीत घडून आली तर काय होईल? म्हणून मातृभाषा ज्ञानभाषा कशा होतील याचा विचार आपण केला पाहिजे नाहीतर एक दिवस मातृभाषा लोप पावतील, हे सत्य तरी स्वीकारले पाहिजे. याचा सरळ अर्थ असा आहे की, ध्यास ज्ञानाचा घेतला पाहिजे, माध्यमाचा नाही. भविष्यात जी भाषा ज्ञानसमृद्ध असेल, तीच टिकेल, हे कटू वाटत असले तरी सत्य आहे. आपले ज्ञानकौशल्य नवीन करून सतत कालसंगत ठेवले पाहिजे. असे जो समाज करतो तो केवळ ज्ञानसंपादनातच नाही तर ज्ञाननिर्मितीतही आघाडीवर राहील. ज्याकाळी आपल्या देशात हे घडत होते, त्याकाळी आपण सर्व जगाला मार्गदर्शन करीत होतो.
जगातील पहिल्या दोनशे विद्यापीठात आपले एकही विद्यापीठ का नाही?
आपल्या देशातील किती विद्यापीठात ज्ञानसाधना होते आणि किती विद्यापीठे घाणेरड्या राजकारणांनी ग्रासलेली आहेत, ढासळलेल्या प्रशासन व्यवस्थेने पंगू झाली आहेत, हा एक संशोधनाचाच विषय ठरावा, अशी स्थिती आहे. पण उद्या हे आणि इतर सर्व दोष दूर झाले तर ही विद्यापीठे जागतिक स्तरावर स्पर्धेत उभी राहू शकतील का? जगातील प्रगत विद्यापीठे कशी आहेत? प्रत्येकाला ज्ञानसाधनेचा प्रदीर्घ वारसा आहे. आपली मुंबई, कलकत्ता, अलाहाबाद आणि मद्रास विद्यापीठे प्रदीर्घ वारसा असलेली जरूर आहेत. पण हा वारसा ज्ञानसाधनेचा, संशोधनाचा आहे का? शिक्षणाची आणि संशोधानाचीही एक संस्कृती असते, तिचा विकास या विद्यापीठात झालेला आहे का? का वाढत्या वयाबरोबर ही फक्त वठली आहेत? शिक्षणाची आणि संशोधानाची  संस्कृती विकसित व्हायची असेल तर पायाभूत सोयीसुविधा ही प्रथम गरज असते (अर्थात ही प्रमुख गरज नव्हे). या सोयी या विद्यापीठात आहेत का? विद्यापीठाच्या आर्थिक गरजा शासनाने पूर्ण केल्या पाहिजेत, हे खरे पण समाजानेही त्यांचे पालकत्व स्वीकारले पाहिजे. अशी स्थिती आहे का? शिक्षण देणाऱ्या आणि  घेणाऱ्याचा घटकांचा स्तर, वृत्ती आणि क्षमता कशी असते/ कशी असावी? अर्थार्जनाची क्षमता नसलेले, मानसिकतेचा, सुसंस्कृत पणाचा  विकास न झालेले, सर्वच बाबतीत अर्धे कच्चे असलेले बेकारांची निर्मिती करणारे कारखाने असे आपल्या विद्यापीठांचे स्वरूप झाले आहे, असे म्हटल्यास ते चुकेल काय? आपण नुसते उसासे सोडतो, उपाययोजना करीत नाही.
नवागतांचे शाही स्वागत
माझ्या अमेरिकेतील मुक्कामात तिथल्या पेन्सिलव्हानिया विद्यापीठाला भेट देण्याचा योग आला. हे विद्यापीठ बेन्जामिन फ्रान्कलीनने स्थापन केलेले आहे. हा केवळ वैज्ञानिक म्हणून आपल्यापैकी अनेकांना माहित आहे. पण आधुनिक अमेरिकेच्या जडणघडणीत त्याचा फार मोठा वाटा आहे.  जगातल्या पहिल्या दहा विद्यापीठातील या विद्यापीठाचे स्थान वर्षानुवर्षे कायम आहे. या विद्यापीठात एक परिचित विद्यार्थिनी प्रवेश घेणार होती. तिला निरोप देण्यासाठी आम्ही व तिचे आईवडील आलो होतो. प्रवेशाची वर्दळ सुरु होती. पहिला प्रश्न होता कार कुठे ‘पार्क’ करायची हा. कारण सर्व पार्क ‘फुल’ झाले होते. पण ठिकठिकाणी ‘सिनिअर्स’ प्रवेशासाठी येणारर्या आपल्या बांधवांच्या स्वागतासाठी सज्ज होते. त्यांनीच आम्हाला कार पार्क करण्याबाबत मार्गदर्शन केले. त्यांच्याजवळ थंड पाण्याच्या बाटल्या (बिसलरी टाईप) होत्या. ‘पाणी हवे का?’, अशी त्यांनी अगत्याने चौकशी केली. नि:शुल्क ‘जलसेवा’ देत ते तिथे दिवसभर उभे राहणार होते. आमच्या  सोबत असलेल्या विद्यार्थिनीने कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आहे, याची चौकशी करून मार्गदर्शन केले. ही एक विद्यानगरीच होती. इमारती जुन्या होत्या पण टोलेजंग होत्या. आतील बांधकाम आणि सजावट आधुनिक होती. एखाद्या मॉलमध्ये  किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये आल्यासारखे वाटत होते. जागोजागी सिनिअर्स (मुलेमुली) स्वागत आणि मार्गदर्शन करीत उभी होती, एकाच अभ्यासक्रमासाठी असलेले सिनिअर्स आणि ज्युनिअर्स एकत्र आले की मिळून गीत गाऊन स्वागताची आणि आभाराची आदानप्रदान होत होती. प्रवेशाबाबतचे सर्व सोपस्कार संगणकीय साह्याने अगोदरच पूर्ण झालेले होते.
निवास व्यवस्था
आता प्रश्न होता राहण्याचा. विद्यापीठाच्या इमारतीसमोरच ‘सिंगल रूम’ अपार्टमेंटस असलेल्या टोलेजंग इमारती होत्या. आमच्यापैकी कुणाच्याच डोक्यावर टोपी नव्हती म्हणून बरे, नाहीतर वर पाहतांना ती नक्कीच खाली पडली असती. एका खोलीत दोन विद्यार्थी राहू शकतील अशी व्यवस्था यात होती. खोलीला लागूनच सुसज्ज किचन (फ्रीज, ओव्हन, मायक्रोवेव्ह यासह) आणि स्नानागृह होते.बाहेरचे खाणे परवड नाही. म्हणून मुले खोलीवरच स्वयंपाक करतात. आपल्याकडे मुलीचा किंवा सुनेचा ‘संसार लावून’ देण्यासाठी आई किंवा सासू जायच्या. अमेरिकन आया या कामासाठी आपल्या मुलाच्या/मुलीच्या सोबत आल्या होत्या. त्यांनी अवजड पेट्या आणल्या होत्या. त्या वाहून नेण्यासाठी ‘सिनिअर्स’ मदत करीत होते. सर्वत्र लगबग दिसत होती. पण हाय हलो शिवाय आवाज नव्हता. आपल्या येथील  रागिंगची आठवण झाली.
कोणता अभ्यासक्रम घ्यायचा हे कसे ठरते?
नवीन प्रवेश घेणारे विद्यार्थी अभ्याक्रमाची पूर्व तयारी करून आले होते. कोणत्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा, हे अकरावीतच वर्षाखेर ठरलेले असते. बारावीत या अभ्यासक्रमासाठीची पूर्वतयारी करावयाची असते. विद्यार्थी चांगल्या विद्यापीठात प्रवेश घेण्यासाठी तर विद्यापीठे चांगले विद्यार्थी मिळावेत म्हणून धडपडत असतात. दहाव्या वर्गातील हुशार विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठात प्रवेश घ्यावा म्हणून शाळेतील अशी मुले निवडून त्यांना आपली विद्यापीठे ‘दाखविण्याचा’ कार्यक्रम ती ती विद्यापीठे आयोजित करीत असतात. प्राध्यापक आणि सिनिअर्स त्यांचे ‘गाईड’ म्हणून काम करत असतात.
 आमच्या बरोबरची विद्यार्थिनी प्रचंड उत्साहित होती. आईबापांचे डोळे मात्र अधूनमधून पाणावत होते. तो आवरून आई जणू मनोमन म्हणत होती, ‘जा मुली जा प्रवेश घेतलेल्या विद्यापीठात तू विद्यार्जन करीत रहा’. ती आता आठ तास अंतरावर राहणार होती. आठ तास अंतर म्हणजे ‘ताशी सत्तर मैल वेगाने जाणार्या कारने आठ तासात कापलेले अंतर’. मुले वीक एन्डला सुद्धा घरी यायला तयार नसतात. कारण विद्यापीठातील निरनिराळ्या क्लब्जनी (मंडळांनी) शनिवार आणि रविवारी भरगच्च कार्यक्रम आखलेले असतात.
दीर्घकाळ चालणारा वैद्यकीय अभ्यासक्रम
आमच्याबरोबर आलेल्या मुलीने मेडिकल लाईन घेतली होती ती आठ वर्षांनी साधी वैद्यकीय पदवी संपादन करणार होती. नंतर पदव्युत्तर शिक्षण आणि त्या नंतर स्पेशलायझेशन. हे ऐकले आणि आईच्या मनाची एवढी घालमेल का होत होती, ते जाणवले. प्रत्येक स्तरावर काही किमान अध्ययन करायचे श्रेयिका(क्रेडीट) मिळवायच्या आणि पुढली पायरी ओलांडण्यासाठी पात्रता मिळवायची हा क्रम आता निदान बारा वर्ष सुरु राहणार होता. आपल्या येथून वैद्यकीय डिग्री प्राप्त करणार्याला तिथे पुन्हा काही अभ्यासक्रम पूर्ण का करावा लागतो, तेही लक्षात आले. हा सर्व तपशील मांडायचा झाला तर तो एका स्वतंत्र लेखाचा विषय होईल.
मुलीचा निरोप घेऊन परतत असतांना आपल्या येथील शिक्षणक्षेत्रातील विविध ‘प्रकार आणि पराक्रम’ आठवले. आनंददायी आणि भावी शिक्षणाचा पाया घालणारे आणि भावनिक विश्व विकसित करणारे उच्च माध्यमिक पर्यंतचे शिक्षण देणार्या माध्यमिक शाळा आणि परिपूर्ण पात्रता प्रदान करणारे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी महाविद्यालये आणि विद्यापीठे आपल्या येथे का नसावीत? आपल्या ‘तरुणभारताच्या’ तरुणाईच्या अपेक्षा पूर्ण करण्याची क्षमता असलेले शासन नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात सत्तारूढ झाले आहे. काही कठोर निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेले संख्याबळ आणि तसेच मनोबलही या शासनाजवळ आहे. त्यामुळे शिक्षणक्षेत्राला ग्रासणारे बजबजपुरीचे ग्रहण दूर होईल, अशी अपेक्षा बाळगण्यास हरकत नाही.                                                        



               
                                                             


No comments:

Post a Comment