Monday, May 23, 2016

चिखलफेक - अमेरिकन स्टाईल
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
याॅर्क, अमेरिका
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee?
  रिपब्लिकन पक्षाचे गृहीत उमेदवार(प्रिझंप्टिव्ह कॅंडिडेट) श्री डोनाल्ड ट्रंप हे आपल्यालाच रिपब्लिकन पक्ष अधिकृत उमेदवार घोषित करणार असे गृहीत धरून चालले आहेत. जुलैच्या मध्यानंतर होऊ घातलेलेल्या राष्ट्रीय संमेलनात आपली उमेदवारी पक्की होणार असे मानून ते पुढची पावले टाकीत आहेत. मुख्य म्हणजे काहीही करून आपण प्रसिद्धीच्या झोतात कसे राहू हा त्यांचा सुरवातीपासूनचा प्रयत्न दुप्पट उत्साहात सुरू आहे. सोशल मीडियावर त्यांनी प्रारंभापासूनच पकड जमवली असून त्यांच्याच्या बेछुट, बेलगाम, भडकावू व अडदांड भूमिकेवर अमेरिकन तरुणाई निदान आजतरी बेहद्द खूष आहे. महिलांविषयीच्या आपल्या काही वक्तव्यांवर झालेल्या टीकेची तीव्रता कमी करण्याच्या हेतूने त्यांनी नुकतीच एक घोषणा केली आहे. अमेरिकन अध्यक्षाला न्यायाधिशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार असतो. आपण सर्वोच्च न्यायालयात कुणाकुणाची नेमणूक करू, हे त्यांनी जाहीर करून टीकाकारांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याता प्रयत्न केला आहे. ही अंतिम यादी नाही यात आणखी नावे समाविष्ट होऊ शकतात, हे नमूद करून त्यांनी जनतेत आणखी कोण असू शकतात हा विषय हळूच सोडून दिला आहे. इजिप्तचे विमान कोसळले ते दहशतवाद्यांमुळे, असे त्यांनी ठोकून दिले आहे. चौकशीत बहुदा हाच निष्कर्ष निघेलही, पण ट्रंप यांनी हा प्रश्न आपल्यापुरता अगोदरच निकालात काढला आहे. सध्याची जनमानसाची स्थिती अशी आहे की, असा निष्कर्ष तुम्ही कशाच्या आधारे काढला, हे विचारण्याची आवश्यकता कुणालाही वाटत नाही. उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखाशी आपण चर्चा करू असे विधान त्यांनी केले. यावर उत्तर कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांनी हा अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीतील राजकारणाचा भाग आहे, असे म्हणून या विधानाची संभावना केली, हे जरी खरे असले तरी या वृत्ताने सोशल मीडियात व वृत्तसृष्टीत ट्रंप यांचे नाव पुन्हा एकदा झळकलेच. जागतिक वृत्तसृष्टीनेही या वृत्ताची कशी का होईना पण दखल घेतलीच. एनकेन प्रकारेण प्रसिद्धी मिळालीच.
मेक्सिको हा अमेरिकेला लागून असलेला देश आहे. या देशातून अनेक लोक अमेरिकेत बेकायदा प्रवेश करीत असतात, तस्करीही होत असते. म्हणून या दोन देशात चीनप्रमाणे पण मेक्सिकोच्या खर्चाने एक अजस्त्र भिंत बांधली पाहिजे, असे विधान ट्रंप यांनी केले. अर्थातच मेक्सिकोने हा प्रस्ताव साफ धुडकावून लावला. आता ही भिंत बांधण्यासाठी तुम्ही पैसा कसा उभा करणार म्हणून लोक पृच्छा करू लागले, तेव्हा मात्र ट्रंप यांनी या विषयाबाबत मौन बाळगणे पसंत केलेले दिसते.
चलाख व चतुर ट्रंप -  ट्रंप हे एक चलाख व चतुर व्यक्तिमत्त्व आहे. आपला सामना हिलरी क्लिंटन यांच्याशीच आहे, हे ते गृहीतच धरून चालले आहे. हिलरींना देशात काय किंवा देशाबाहेर काय प्रसिद्धीसाठी खास प्रयत्न करण्याची गरज नाही. गेली जवळजवळ तीन दशके देशांतर्गत राजकारणात व देशाबाहेरील राजकारणातही त्यांचे नाव सर्व परिचित व सुपरिचित आहेत. याउलट कालपर्यंतची आपली एक ‘धनदांडगा बिल्डर’ असलेली प्रतिमा पुसून, निदान धूसर करून, राजकीय सारीपटावर आपले नाव आणण्यासाठी आपल्याला खास प्रयत्न करावे लागतील हे ते जाणून आहेत. धनदांडगा बिल्डर ते राष्ट्रपतीपदाचा उमेदवार हा खूप मोठा पल्ला आहे, हे ते जाणून आहेत. तसेच हिलरींच्या पतीची - बिल क्लिंटन यांची - महिलांच्या संबंधातली लफडी म्हणजे बलात्काराच प्रकार नाही का, अशी शंका उपस्थित करीत ते एकीकडे महिलांना चुचकारित आहेत तर दुसरीकडे प्रतिपक्षाची प्रतिमा डागाळावी असा प्रयत्न करीत आहेत.
   हिलरींची सावध चाल- या उलट हिलरी क्लिंटन ट्रंप यांच्याबद्दल स्वत: मोजकेच बोलल्या आहेत. ट्रंप हे अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार नाहीत, त्यांच्या हाती अमेरिकेचे भवितव्य सोपविणे योग्य ठरणार नाही, अशी रोखठोक विधाने करून मग मात्र त्या स्वत: थांबल्या आहेत. ट्रंप यांच्या प्रत्येक टीकेला आपण उत्तर देऊच असेही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पण हे प्रकरण दिसते इतके साधे नाही. डेमोक्रॅट पक्षाच्या वतीने व हस्ते परहस्ते ट्रंप यांच्या विरुद्ध मोहीम सुरू झाली आहे. पहिला बाॅंबगोळा आहे, ट्रंप यांच्या आर्थिक व्यवहारांबाबतचा. ‘ट्रंप आपले टॅक्स रिटर्न्स जाहीर करा’, अशी मोहीम सुरू झाली आहे. याबाबत ट्रंप यांचे स्पष्टीकरण शंका निर्माण करते आहे. कधी ते म्हणतात,’ मी ते जाहीर करणारच आहे’, तर कधी म्हणतात ‘इतक्यात नाही, योग्यवेळी जाहीर करीन’, ‘मला ते जाहीर करायचेच आहे’, ‘ मी ते कधीही जाहीर करीन’, अशा त्यांच्या कोलांटउड्यांमुळे, या प्रश्नाबाबतचा संशय दिवसेदिवस अधिकाधिक दाट होत चालला आहे. याशिवाय क्लिंटन कुटुंबाशी जवळीक असलेल्या एका प्रसिद्धी यंत्रणेने लक्षावधी डाॅलर खर्चून ट्रंप विरुद्ध जाहिरारबाजी सुरू केली आहे.
हिलरी शांत का?-  स्वत:हिलरी सध्या शांत असून प्रसिद्धीच्या झोतात फारशा येत नाहीत. याचे एक कारण असेही असेल की, त्यांचे नाव अमेरिकेत सर्वतोमुखी आहे. कुणी त्यांच्या विरोधात असतील तर कुणी त्यांच्या बाजूचे असतील. पण त्या राजकीय क्षितिजावर ट्रंपसारख्या एखाद्या धूमकेतूसारख्या अचानक उगवलेल्या नाहीत. ‘शी नीड्स नो इंट्रोडक्शन’, त्यांचा परिचय करून देण्याची आवश्यकता नाही, असे त्यांचे समर्थक म्हणतात. सध्या हिलरी तुलनेने शांत दिसत आहेत, याचे दुसरे कारण असेही असू शकते की, अजून डेमोक्रॅटिक पक्षातील अंतर्गत स्पर्धाच आटोपलेली नाही. हिलरी यांचे पारडे चांगलेच जड असले तरी बर्नी सॅंडर्स त्यांना जोरदार टक्कर देत आहेत. अमेरिकेत जरी सगळेच पक्ष उजवे असले तरी बर्नी सॅंडर्स उजव्यातले डावे समजले जातात. त्यामुळे कामगार वर्गात तसेच मध्यम वर्गात ते चांगलेच लोकप्रिय आहेत. पण याला दुसरीही किनार आहे. अमेरिकेत साम्यवादाचा वास आलेला सुद्धा चालत नाही. असा हा दुधारी प्रकार आहे. पण हिलरी विरुद्ध बर्नी हा सामना आता लवकरच निकालात निघेल. तोपर्यंत हिलरी आपला दारुगोळा बाहेर काढणार नाहीत, असे दिसते. तिसराही एक मुद्दा आहे. बराक ओबामा यांचे गेल्या निवडणुकीत प्रचार यंत्रणेचे कर्तेधर्ते असलेले स्टीव्ह शेल हे पक्षाचे कार्यकर्तेही आहेत. त्यांचे मत असे आहे की, ट्रंप यांना काय बोलायचे ते बोलू द्या. एकवेळ अशी येईल की, त्यांचे मुद्देच संपतील. मग आपण आपला दारूगोळा बाहेर काढू. ओबामा यांचीच धोरणे आपण पुढे चालू ठेवू, एवढेच सध्या हिलरींनी म्हटले आहे. हे विधान वरवर दिसते तेवढे साधे नाही.
ओबामा केअर नाॅन इश्यू व्हावा - ‘ओबामा केअर’ ही गरीब व गरजवंतांना वैद्यकीय सोयीसुविधा पुरवणारी योजना आहे. तिला रिपब्लिकन पक्षाने एकेकाळी उघड व छुपा विरोध केला होता. ती आता अमलात आली आहे. आता या विषयावर कुणीच बोलत नाही. याचे कारण असे की, या योजनेचा फायदा मिळालेल्यांची एक मतपेढी तयार झाली आहे. तिला कुणीच दुखवायला तयार नाही. पण या योजनेला विरोध करणारेही खूप होते. त्यांचा विरोध मावळावा,म्हणून या योजनेचा आज कुणी पुरस्कारही करत नाही( तसा करण्याची आवश्यकताही नाही, कारण ती योजना आता अमलात आहे) म्हणून हा विषय ‘नाॅन इश्यू’ व्हावा,थंड्या बस्त्यात जावा हे उभयपक्षी सोयीचे आहे. पण ओबामांचीच धोरणे आपण पुढे चालवू म्हणून हिलरी यांनी सांगायचे ते सांगून न सांगितल्यासारखेही केले आहे.
   सध्या हिलरी स्वत: बोलत नाहीत. पण ट्रंप यांच्या आक्षेपांना डेमोक्रॅटिक पक्ष उत्तर देतो आहे. निवडणूक ८ नोव्हेंबरला म्हणजे तशी अजून दूर आहे. त्यामुळे सध्यातरी फारसा विरोध न करता ट्रंप यांच्या प्रचाराचा डोलारा तसाच उभा राहू द्यायचा आणि योग्यवेळ येताच आपल्या भात्यातील बाण बाहेर काढायचे, असे डेमोक्रॅटिक पक्षाने ठरविलेले दिसते.

No comments:

Post a Comment