Friday, November 11, 2016

डोनाल्ड ट्रंप यांच्या विजयामागचे रहस्य
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?

अमेरिकेच्या अध्यक्षीय इतिहासात प्रचंड उलथापालथ घडून दिनांक ८ नोव्हेंबर २०१६ ला डोनाल्ड ट्रंप हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार हिलरी क्लिंटन या डेमोक्रॅट पक्षाच्या उमेदवाराचा २९० विरुद्ध २१८ असा फरक राखून विजयी झाले. ही घटना यथावकाश इतिहासाचा हिस्सा बनेल. पण हा चमत्कार घडला कसा याचा शोध पुढची अनेक वर्षे घेतला जात राहील.फ
एक्झिट पोल (मतदान करून बाहेर पडणारा मतदार कोणाला मत दिले ते सांगतो) हा या शोधाचे बाबतीतला एक विश्वसनीय व तात्काळ माहिती देणारा मार्ग आहे. अमेरिकन लोक स्पष्ट वक्ते, आपण कोण हे सांगणारे, आपली सगळी ओळख देणारे व मोकळेपणाने बोलणारे मानले जातात, त्यामुळे या माहितीची विश्वसनीयता इतर देशवासियांच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळे अमेरिकेतील एक्झिट पोलद्वारे मिळणारी माहिती जनमताचा कानोसा घेण्याचे बाबतीत अभ्यासकांना खूप महत्त्वाची वाटते, यात आश्चर्य नाही. अर्थात एकूणएक मतदाराशी बोलता येत नाही, हा मुद्दा दुर्लक्षून चालणार नाही. या मर्यादेत राहूनच निष्कर्षांचा विचार केला पाहिजे.
१. या निवडणुकीत गोऱ्यांची जबरदस्त व्होट बॅंक तयार झाली होती. डोनाल्ड ट्रंप यांनी याबाबतचे सर्व उच्चांक मोडले आहेत. ८४ टक्के गोऱ्या मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. ही वर्णाधिष्ठित दरी अमेरिकेची पाठ नजीकच्या भविष्यकाळात तरी सोडणार नाही.
२. अपेक्षेप्रमाणे महिला मतदारांची लाट निर्माण झाली नाही. डझनावारी महिलांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या महिलांबाबतच्या कृती व उक्तीबाबत टोकाचा रोष व्यक्त केला होता. यामुळे महिला अभूतपूर्व संख्येत मतदान करतील, असा अंदाज होता. मतदारात महिलांचे प्रमाण ५२ टक्के इतके आहे. २०१२ साली ते ५३ टक्के होते. हिलरी क्लिंटन यांना डोनाल्ड ट्रंप यांच्यापेक्षा महिलांची फक्त १२ टक्के जास्त मते मिळाली आहेत. २०१२ साली बराक ओबामा यांना राॅम्नी या रिपब्लिकन पक्षापेक्षा फक्त ११ टक्के जास्त मते मिळाली होती. हिलरी क्लिंटन यांना फक्त एक टक्क्याची बढत मिळणे ही बाब महिलांची महिलेसाठी व स्त्रीलंपटाविरुद्धची लाट मानता यायची नाही.
असे का घडले असावे? याचे काहीसे विनोदी व काहीसे खरे कारण असे आहे की, एक महिला दुसरीली चांगले म्हणत नाही. दुसरे कारण असे आहे की, सैल, मुक्त व स्वैर स्त्री पुरुष संबंध अमेरिकेत आक्षेपार्ह मानले जात नाहीत. जबरदस्ती मात्र खपवून घेतली जात नाही. त्याबद्दल अनेक वर्षांनी आक्षेप घेतले जाणे व तेही निवडणुकीच्या ऐनवेळी  घेतले जाणे यामुळे त्याची परिणामकारकता कमी होते. ‘दी लेडी इज प्रोटेस्टिंग टू मच’, असेही वाटू शकते. तसेच सैल सुटलेल्या जिभेबद्दल आपल्याला लाज वाटते, ते प्रसंग व ती मैफिलही वेगळी होती हा खुलासा अमेरिकन जनतेने क्षमापनयोग्य मानला असे दिसते. खोटेपणा अमेरिकन जनतेला आवडत नाही. बिल क्लिंटन यांनी आपण लफडे नाकारण्याचा खोटेपणा केला अशी कबुली देऊन जनतेची माफी मागताच जनतेने त्यांना माफ केले होते. शिवाय नवऱ्याने लफडी करायची व हिलरीने ती सावरून घ्यायची व तक्रार करणाऱ्या महिलेला आपले वकिली कौशल्य वापरून सळो की पळो करून सोडायचे याचा महिलांना राग आला होता. काही पत्रकार महिलांनी तर हिलरी क्लिंटन यांना निषेधपर अनावृत पत्रे लिहिली होती. त्यामुळे हा मुद्दा दोन्ही उमेदवारांसाठी सारखाच वाईट ठरला असावा. म्हणून महिलांची गठ्ठा मते हिलरी क्लिंटन यांना मिळाली नसावीत.
३. डोनाल्ड ट्रंप यांचा स्पॅनिशबहुल मेक्सिकोच्या सीमेवर अजस्त्र भित बांधून घुसखोरांना अडविण्याचा प्रयत्न बहुतेकांना हास्यकारकच नव्हे तर हास्यास्पद वाटला. या भिंतीचा खर्च मेक्सिको या देशाकडून वसूल करणे, मेक्सिकोतून गुन्हेगार व बलात्कारी अमेरिकेत येत आहेत, असा आक्षेप नोंदवणे, मेक्सिकन जजकडून ट्रंप विद्यापीठाला न्याय मिळणार नाही,असा संशय व्यक्त करणे ह्या बाबी जागृत व बुद्धिमान अमेरिकनांना पटल्या नाहीत. मेक्सिकोतून येणाऱ्या लोंढ्यांमुळे लगतची राज्ये बेजार झाली होती, सेवासुविधांवर ताण पडत होता, निरुपायामुळेच लोक मुकाट्याने हात चोळीत बसले होते. त्यांच्या बुद्धीला ट्रंपचे म्हणणे पटत नवहते, तरी मनाचा कौल वेगळा होता.
स्थायिक झालेल्या मेक्सिकन मतदारांमध्ये आपल्या घुसखोर बांधवांबद्दल सहानुभूती निर्माण होईल व ट्रप विरोधात लाट उत्पन्न होईल, असे निरीक्षकांचे भाकीत होते पण स्थायिक झालेल्या मेक्सिकन अमेरिकन नागरिकांनी आपल्या घुसखोर बांधवांची बाजू घेतली नाही, असे दिसते. व अशी लाट आली नाही.
अमेरिकेत ११ टक्के (मूळचे स्पेनचे असलेले) मेक्सिकन मतदार आहेत. घुसखोरी इतकी आहे की, गेल्या चार वर्षात त्यांची संख्या एक टक्याने वाढली आहे. आश्चर्याची बाब ही आहे की, २०१२ मध्ये मेक्सिकन मतदारांनी रिपब्लिकन पक्षाला जेवढी मते दिली होती, त्यापेक्षा जास्त मते ट्रंप यांना दिली आहेत. मेक्सिकन मतदार दुखावले जाऊ नयेत म्हणून हिलरी क्लिंटन यांनी सौम्य भूमिका घेऊन हा मुद्दा थंड्या बस्त्यात टाकला होता तर डोनाल्ड ट्रंप यांनी अव्यवहार्य पण रोखठोक भूमिका घेत हा मुद्दा खूप तापवला होता, पण त्यांनी अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्या मेक्सिकन नागरिकांना चुचकारले. तुम्ही कष्टाळू आहात, तुमच्या मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय झाली पाहिजे; अहो, तसा मी मेक्सिकन लोकांशी जवळीक ठेवूनच आहे. याच भागात माझी रेस्टाॅरंट्स आहेत, मला मेक्सिकन अन्नपदार्थही आवडतात. अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्यांबद्दल माझी तक्रार नाही. येणाऱ्या घुसखोर गुन्हेगार व बलात्कारींना थोपविण्याची माझी भूमिका आहे. हे म्हणणे अनेक स्थायिकांना पटलेले दिसते.
४. २०१२ मध्ये ओबामा यांना पदवीधर व अपदवीधर अशा दोन्ही गटातील  ५० टक्के मतदारांनी मतेदिली होती. २०१६ मध्ये हिलरी क्लिंटन यांना पदवीधर ५२ टक्के पण अपदवीधर गटातील  ४३ टक्के मतदारांनी मते दिली आहेत. म्हणजे पदवीधर मतदार किंचित जास्त प्रमाणात (एक टक्का) हिलरी क्लिंटनकडे वळले पण अपदवीधरांचा पाठिंबा ७ टक्यांनी घसरला. पदवीधरांपेक्षा अपदवीधरांची संख्या नेहमीत जास्त असते, हे लक्षात घेतले म्हणजे या प्रश्नाची गंभीरता जाणवेल. पदवीधरही फार मोठ्या प्रमाणात रिपब्लिकन पक्षापासून दूर गेले नाहीत, याचीही नोंद घ्यावयास हवी.
५. इव्हॅनजेलिस्ट नावाच्या सनातनी ख्रिश्चन मतदारांची संख्या २६ टक्के आहे. २०१२ मध्ये रिपब्लिकन पक्षाला ७८ टक्के मते मिळाली होती तर यावेळी ८१ टक्के मिळाली. आपली तीन लग्ने, लफडी व गटारी भाषा याची जाणीव असल्यामुळे ट्रंप स्वत:हूनच या मतदारांपासून दूर राहिले होते. पण हिलरी क्लिंटन यांची समलिंगी विवाह व गर्भपाताबद्दलची अनुकूल भूमिका लक्षात ठेवून यांनी स्वत:हून त्यातल्यात्यात बरा समजून डोनाल्ड ट्रंप यांना २०१२ मध्ये रिपब्लिकन पक्षाला दिली होती त्या पेक्षा ३ टक्के जास्त मते दिली आहेत.
६. नवीन मतदारांची मते यावेळी १० टक्के होती.यात हिलरी क्लिंटन व डोनाल्ड ट्रंप यांना अनक्पमे ५६ व४० टक्के मते मिळाली.
७. आर्थिक मुद्दा दहशतवादावर भारी पडला. हिलरी क्लिंटन यांचा भर अर्थकारणावर तर डोनाल्ड ट्रंप यांचा भर दहशतवादावर होता. ५२ टक्के हिलरी क्लिंटन यांना अनुकूल राहिले तर डोनाल्ड ट्रंप यांना ४२ टक्केच अनुकूलता होती. अमेरिकनांना दहशतवादापेक्षा आर्थिक उन्नती अधिक महत्त्वाची वाटते, असा काहीसा धक्कादायक निष्कर्ष या आकड्यांरून समोर येतो आहे.
८. ८३ टक्के मतदारांना बदल हवा होता. पण डोनाल्ड ट्रंप योग्य बदल घडवून आणतीलच असा अनेकांना विश्वास नव्हता. पण आठ वर्षांच्या ओबामा राजवटीला जनता विली होती. म्हणून पुरेशी खात्री वाटत नसतांनाही सर्व जरी नव्हे तरी अनेक  मतदारांनी डोनाल्ड ट्रंप यांना मते दिली, असे दिसते. पण डोनाल्ड ट्रंप पेक्षा चांगला उमेदवार मतदारांना अधिक आवडला असता.
९. ओबामाकेअर ही गरिबांना वैद्यकीय मदत मोफत पुरवणारी व तो भार सबल आर्थिक गटावर टाकणारी योजना या सबल गटाने (अर्थातच या गटात गोरे मतदार जास्त होते) कधीही मनापासून स्वीकारली नव्हती. त्यातच यात २५ टक्के भार आणखी वाढणार हे आॅक्टोबरमध्ये जाहीर झाल्यावर तर हा गट खूपच चिडला होता. आपण ओबामाकेअर रद्द करू, अशी डोनाल्ड ट्रंप यांची घोषणा होती. त्यामुळे या गटातले ८३ टक्के मतदार डोनाल्ड ट्रंप यांना अनुकूल झाले. अमेरिकेतील निम्यापेक्षा किचित कमी मतदारांवर ओबामाकेअरचा भार पडतो, हे लक्षात घेतले म्हणजे, या प्रश्नाचे महत्त्व लक्षात येईल.
१०. डोनाल्ड ट्रंप यांचे व्यक्तिमत्त्व कोणालाही आवडावे, असे नाही. त्यांचा विजय त्यांच्यावर असलेल्या विश्वासाचे द्योतक मुळीच नाही. ३० ते ४० टक्के मतदारच त्यांना विश्वसनीय, भरवशाचा व अध्यक्षपदासाठी योग्य मनोभूमिका असलेला मानतात. असे असूनही डोनाल्ड ट्रंप काजिंकून आले.? याचे उत्तर असे की, जनता ओबामा यांच्या ८ वर्षांच्या राजवटीला पार विटली होती. कुणीही चालेल पण पुन्हा डेमोक्रॅट पक्ष नको, ही भावना खूप प्रबळ होती. त्यातून हिलरी क्लिंटन यांची प्रतिमा ईमेल्स व क्लिंटन फाऊंडेशनमुळे डागाळलेली होतीच. याबद्दलचा संशय दूर करणे हिलरी क्लिंटन यांना साधले नाही.त्यांचा फाजील विश्वासही त्यांना नडला. शेवटीशेवटी हिलरी क्लिंटन समर्थकांना जाणील झाली. स्वत: ओबामाही भरपूर फिरले पण तोपर्यंत जनतेचा राजवटबदलण्याचा इरादा पक्का झाला होता, असे दिसते. जास्त चांगला म्हणून नाही तर कमी वाईट म्हणून त्यांनी डोनाल्ड ट्रंप यांच्या पारड्यात मते टाकलेली दिसतात.
११. ईमेल्स हिलरी क्लिंटन यांची पाठ सोडत नव्हत्याच. शेवटीशेवटी एक बादरायण संबंध दाखवणारे प्रकरण समोर आले. ते अगोदरच  दूषित असलेले मत आणखी दूषित करण्यास पुरेसे ठरले. ऐनवेळी एफबीआयने या नव्याने बाहेर आलेल्या ईमेल्सची दखल घ्यायची आवश्यकता नाही, असे सांगितले. पण ते पालथ्या घागरीवर टाकलेल्या पाण्याप्रमाणे वाया गेले.
१२. मुळातच दर तीनपैकी एकालाच देशाचा कारभार ठीक चालू आहे, असे वाटत होते. या ‘एकापैकी’ नववद टक्के मतदारांनी हिलरी क्लिंटन यांना मत दिले. पण याचा अर्थ असाही नाही का की दर तीनपैकी दोन मतदारांना देशाचा कारभार समाधानकारक रीत्या चालू नाही, असे वाटत होते. या ‘दोनपैकी’ ६९ टक्के मतदारांनी, नाइलाजाने असेल कदाचित, पण डोनाल्ड ट्रंप यांना मते दिली. ‘सगळे काही तुंबले आहे पण मी ते दुरुस्त करीन’, हाडो ट्रंप यांचा स्ट्रॅटेजिक स्ट्राईक ठरला. त्याने किमया केली.
१३. ज्या डिबेट्सचा खूप गवगवा झाला, हिलरी क्लिंटन यांनी डोनाल्ड ट्रंप यांना चारी मुंड्या चीत केले असे म्हले जाते, त्या डिबेट्स मध्ये डोनाल्ड ट्रंप यांची कामगिरी खूप वाईट नव्हती. कुठे एक विद्वान, अभ्यासू, राजकारणात मुरलेली, चतुर विदुषी आणि कुठे एक धच्चोट, अननुभवी बिल्डर? पण मतदारांनी डोनाल्ड ट्रंप यांचेकडे सहानुभूतीने पाहिले. त्यांच्या अननुभवजन्य बावळटपणा, त्यांचे कधीकधी निरुत्तर होणे, कधी मुद्याला सोडून बोलणे हे सर्व जनता बघत होती. पण तिला भावला त्यांचा बेधडकपणा, बेदरकारपणा, रांगडेपणा, स्पष्टवक्तेपणा. शेवटी एक लहानसा मुद्दा. हे गुण महिलांनाही आवडतात, म्हणे.

No comments:

Post a Comment