Sunday, November 20, 2016


घड्याळाचे उलटे फिरलेले काटे व अमेरिका
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? 




 खाउजाची म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण व जागतिकीकरणाची लाट जगभर पसरलेली असतांना किंवा पसरत असतांना रशियात राष्ट्रवाद उफाळून यावा हा नियतेने घेतलेला सूडच म्हणावा लागेल. जगातील कामगारांनो, एक व्हा, अशी साद ज्या रशियातून घातली गेली होती त्या सोव्हिएट रशियातील एकेक सोव्हिएट (प्रांत) वेगळा झाला, होऊ दिला गेला किंवा त्याचे वेगळे होणे थांबवले गेले.  शब्द कोणतेही वापरले तरी पोपट मेल्याचे जगाला कळले. राष्ट्रवादाची कास रशियाने स्वीकारली. हे खरेतर  दुसऱ्यांदा घडले आहे. 
  दुसऱ्या महायुद्धात जर्मनीने जेव्हा रशियात खोलवर मुसंडी मारली होती, तेव्हा ‘जगातील कामगारांच्या मुक्तीसाठी लढा’, हा नारा उुपयोगी पडणार नाही, हे स्टॅलीनने वेळीच ओळखले व त्याला स्मरण झाले, ‘पिटर दी ग्रेट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या राष्ट्रपुरुषाचे! यांचे स्मरण रशियन जनतेला करून देऊन, त्याच्या स्मृती जागवून रशियाने आपल्या नागरिकांना साद घातली व युद्धात अहमहमिकेने लढण्यास प्रवृत्त केले. मास्को येथे ९ जून १६७२ मध्ये जन्मलेल्या या रशियन झारने (रशियात १७ व्या शतकापर्यंत राज्यकर्त्याला झार म्हणत) रशियाला जगातील एका मोठ्या राजसत्तेचा मान मिळवून दिला होता. शस्त्रदले, शिक्षण व प्रशासन यात आमूलाग्र बदल तर या थोर पुरुषाने घडवून आणलेच पण धर्ममार्तंडांच्या कर्मकांडांपासूनही जनतेची सुटका केली.
 ब्रेग्झिट हे आणखी एक उदाहरण समोर आहे. ब्रिटनने युरोपियन युनीयन मधून बाहेर पडण्याचा निर्णय जून २००६ ला सार्वमत घेऊन ५२ टक्यांच्या मताधिक्याने घेतला आहे. ब्रिटिश एक्झिट या शब्दप्रयोगाचे  ब्रेक्झिट हे लघुरूप आहे.
या दोन उदाहरणांचा दाखला आता कशाला? ८ नोव्हेंबर २०१६ ला अमेरिकेत सत्तांतर घडून आले. हिलरी क्लिंटन यांचा पराभव झाला, डोनाल्ड ट्रंप निवडून आले. या बदलासाठीची जी अनेक कारणे संभवतात आणि तशी ती आहेतही, त्यातले एक कारण लक्षात घ्यावे, असे आहे. जागतिक राजकारण गेलं चुलीत प्रथम घराकडे पहा, हा डोनाल्ड ट्रंप यांचा नारा त्यांना निवडणुकीत प्रामुख्याने  तारता झाला, असे म्हटले व मानले जाते. ही अमेरिकन राष्ट्रवादाला घातलेली साद होती व तिला अमेरिकन जनतेने प्रतिसाद देऊन त्यांच्या पारड्यात भरभरून मते टाकली. पण या निमित्ताने वाद विसंवादही निर्माण झाले आहेत, काही नव्याने उफाळून आले आहेत. त्यावर उतारा शोधण्याची गरज आहे. डोनाल्ड ट्रंप यांना / यांच्या सल्लागार चमूला ही जाणीव आहे, असा निष्कर्ष काढायला जागा आहे.
अमेरिकन राष्ट्रवादाला साद : निवडून आल्यावर आता मतभेद, वाद, उखाळ्या पाखाळ्या संपल्या, आता मी सर्व अमेरिकनांचा अध्यक्ष आहे, आपण सर्व मिळून अमेरिकेला पुन्हा वैभव प्राप्त करून देऊया, अशी जी  साद डोनाल्ड ट्रंप यांनी सर्व जनतेला घातली आहे ती पाहता वरील निष्कर्षाला दुजोरा मिळेल. या भूमिकेप्रमाणे ते वागले तर देशात एकोपा निर्माण होऊ शकेल व अडचणीच्या वेळेला राष्ट्रवादच अमेरिकेच्याही मदतीला आला, असे म्हणता येईल.ब्रिटनप्रमाणे अमेरिकाही अशीच राष्ट्रवादाची कास धरून कालक्रमण करू शकेल. पण हा आर्थिक उत्थानाच्या बंधांनी साधलेला राष्ट्रवाद असेल. नियतीच्या उदरात काय साठवले आहे, हे सांगणे कठीण असले तरी ही भावी अमेरिकेच्या प्रगतीची एक नवीन दिशा आहे, हे मात्र नक्की. या संदरभात निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अमेरिकेत जे जे घडले, त्याचा मागोवा, घेणे उपयोगाचे ठरणार आहे.    
डोनाल्ड ट्रंप यांची बाळबोध  प्रचार यंत्रणा : अमेरिकेतील राजकीय स्थितीचा विचार केला तर हिलरी क्लिंटन किंवा डेमोक्रॅट पक्ष यांची प्रचार यंत्रणा कशी होती व डोनाल्ड ट्रंप यांच्या प्रचार यंत्रणेपासून ती कशी व किती वेगळी होती, हे बघितले पाहिजे . हिलरी क्लिंटन यांच्या  यंत्रणेच्या द्वारे मुख्यत: तीन मुद्दे मांडले गेले. पहिला मुद्दा हा की, डोनाल्ड ट्रंप हे अध्यक्षपदासाठी अयोग्य उमेदवार आहेत. ते करबुडवे, दिवाळखोर, महिलांना क्षुद्र मानणारे, अनैतिक वर्तन करणारे आहेत. दुसरे असे की, ते अपात्रही आहेत. त्यांना राजकीय समज नाही. युरोप, दक्षिण कोरिया व जपान बाबतची त्याची मते अज्ञानजन्य व असमंजसपणाची परिचायक आहेत. तिसरे म्हणजे त्यांच्या योजना केवळ चुकीच्याच नाहीत तर विक्षिप्त आहेत. (मेक्सिको व अमेरिका यात भिंत बांधण्याचा त्यांचा हट्ट, हा  भारताची राजधानी दिल्लीहून  दक्षिणेत आणणाऱ्या व इतिहासाने वेड्या ठरवलेलंया महंमदाला  मागे टाकणारा आहे, हे खरेच आहे).   त्यामुळे त्यांच्या नेतृत्त्वाखाली देश सुरक्षित राहणार नाही. या हिलरी क्लिंटन यांच्या  प्रचाराचा परिणाम मतदारांवर झाला नाही असे नाही. पण तो ३0 ते ३५ टक्के मतदारांवरच झाला. याउलट डोनाल्ड ट्रंप यांचा प्रचार बाळबोध पण लोकमनाला थेट जाऊन भिडणारा झाला. गेल्या आठ वर्षात आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे, बेकारी वाढली आहे, नोकर्‍या परक्यांना मिळत आहेत, सर्व जगाची काळजी अमेरिकेलाच वहावी लागते आहे. मी हे बदलीन. असा कोणताही बाळबोध मुद्दा हिलरी क्लिंटन यांच्या प्रचारात नव्हता.
डेमोक्रॅट पक्षाचे अमेरिकेतील मुस्लीम मतदारांना  आवाहन : अमेरिकेत मुस्लीम गट बर्‍यापैकी मोठा आहे. यांचे दोन/तीन भाग करावे लागतील. यातले काही लोक आफ्रिकन अमेरिकन आहेत. हा कृष्णवर्णी गट डोनाल्ड ट्रंप यांच्या विरोधात होताच.  दुसरा गट आहे मध्यपूर्व व आशियातून स्थलांतर करून आलेल्या मुस्लिमांचा. आजमितीला यांच्या अनेक जुन्या पिढ्यांचे वंशज अमेरिकेत राहत आहेत. ते अमेरिकन जनजीवनाशी एकरूप झाले आहेत. खीज व गझाला खान हे असेच अमेरिकेत स्थायिक झालेले दांपत्य आहे.यांचा पुत्र कॅप्टन हुमायून खान हा अमेरिकेचा एक सैनिकी अधिकारी म्हणून लढत असताना मध्यपूर्वेत धारातीर्थी पडला. त्याला शौर्यपदक देऊन गौरवण्यात आले होते. खान दांपत्याला डेमोक्रॅट पक्षाने पक्षाच्या अधिवेशनात बोलवून त्यांचाही गौरव केला होता. डेमोक्रॅट पक्षाने मुस्लिमांची मते मिळविण्यासाठी हे नाटक रचले, अशी टीका डोनाल्ड ट्रंप यांनी केले होते. मुस्लीम मतांचे धृवीकरण होऊन त्यांनी डेमोक्रॅट पक्षाला एक गठ्टा मते दिली, असे मानतात.
तिसरा गट आहे गेल्या काही वर्षात अमेरिकेत आश्रयाला आलेल्या लोकांचा. यात सौदी अरेबिया व तत्सम देशातून आलेले धनवंत आहेत. हे ख्रिश्‍चनांचे धर्मांतर करून गरीब ख्रिश्‍चन मुलींना इस्लाम धर्म स्वीकारण्यास प्रवृत्त करतात. प्रत्येक कारखान्यात हजारात चार/पाच उदाहरणे तरी आढळतात. याचा फारसा बोभाटा होत नाही. अगोदर काही दिवस निरनिराळी भेट वस्तू स्वीकारणारी मुलगी एक दिवस अचानक हिजाब बांधून आली की तिचे धर्मांतर झाल्याचे कळते. दुसरे असे की, 
आश्रयाला येणार्‍या मध्यपूर्वेतील निर्वासितांमध्ये अतिरेकीही असतात. डोनाल्ड ट्रंप यांचा आक्षेप खरेतर या लोकांवर आहे निदान असायला पाहिजे. सर्व मुस्लिमांना एकाच तराजूने तोलणे चुकीचे आहे, हे त्यांना बहुदा यथावकाश कळेल. निवडून आल्यानंतर आजपर्यत तरी मुस्लिमांबद्दल कोणतीही अनुकूल/ प्रतिकूल प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रंप यांनी व्यक्त केलेली नाही. पण या दिशेने त्यांना सकारात्मक पावले उचलावी लागतील, हे उघड आहे.
गोऱ्या मेक्सिकन लोकांनी निर्माण केलेल्या समस्या : अमेरिकेतील मेक्सिकन लोकांचा गटही मोठा आहे. मेक्सिको व अमेरिकेतील शेकडो मैल लांबीची सीमा ही पर्वत वा सागर यांनी र्मयादित केलेली नाही. साधी जमीन, वाळवंट, अमेरिकेतून मेक्सिकोत वाहत जाणार्‍या महाकाय नद्यांची विस्तीर्ण पात्रे यामुळे यामुळे ती सच्छिद्र आहे. ही भोके बुजवण्यासाठी थोडीथोडकी नव्हेत तर तीनशे/ साडे तीनशे चौक्या असूनसुद्धा रोज फार मोठय़ा संख्येत अनेक मेक्सिकन लोक अक्षरश: चालत अमेरिकेत येत असतात. काही सोबत अफू आणतात, काही अगदी अशिक्षित व अकुशल असतात. काही सशस्त्र अट्टल गुन्हेगारही असतात. यामुळे खून मारमार्‍या यातही काहींचा सहभाग असतो. यांच्यामुळे सर्व सोयी सुविधांवर निदान ताण तर नक्कीच पडतो. एकदा का अमेरिकेत यांनी प्रवेश केला की त्यांना ओळखणे कठीण, कारण सगळेच गोरे, ख्रिश्‍चन व स्पॅनिश बरोबर सफाईने इंग्रजीही बोलणारे. यांना ओळखायचे कसे? म्हणून डोनाल्ड ट्रंप यांना भिंत घालून ही सीमा सील करायची आहे. पण हा विचार, अव्यवहार्य व खर्चिक आहे. चीनच्या भिंतीनंतर या भिंतीचा दुसरा नंबर लागेल. पण जनसामान्यांना भिंतीची कल्पना भावली आहे. सीमेलगतच्या राज्यात मेक्सिकन लोक भरपूर आहेत. सुरुवातीला डोनाल्ड ट्रंप सर्वच मेक्सिकन लोकांना शिव्या घालीत. पण त्यातले जे आता अमेरिकन नागरिक व मतदार आहेत, त्यांना नाराज करून चालणार नाही, हे या राजकारणातील अननुभवी पण चतुर व्यावसायिकाला पुरेसे लवकर उमजले. त्यांनी टीकेचा रोख बेकायदा प्रवेश करणार्‍या मेक्सिकनांकडे वळवला.
स्थायिक झालेल्या मेक्सिकन मतदारांमध्ये आपल्या घुसखोर बांधवांबद्दल सहानुभूती निर्माण होईल व ट्रंप विरोधात लाट उत्पन्न होईल, असे निरीक्षकांचे भाकीत होते. पण स्थायिक झालेल्या मेक्सिकन अमेरिकन नागरिकांनी आपल्या घुसखोर बांधवांची बाजू घेतली नाही, असे दिसते व अशी लाट आली नाही.
असे वळवले मेक्सिकन मतदार: : अमेरिकेत ११ टक्के (मूळचे स्पेनचे असलेले) मेक्सिकन मतदार आहेत. आता मेक्सिकोतून यांची घुसखोरी इतकी वाढली आहे की, गेल्या चार वर्षात त्यांची संख्या एक टक्याने वाढली आहे. आश्‍चर्याची बाब ही आहे की, २0१२ मध्ये मेक्सिकन मतदारांनी रिपब्लिकन पक्षाला जेवढी मते दिली होती, त्यापेक्षा जास्त मते ट्रंप यांना दिली आहेत. मेक्सिकन मतदार दुखावले जाऊ नयेत म्हणून हिलरी क्लिंटन यांनी सौम्य भूमिका घेऊन हा मुद्दा थंड्या बस्त्यात टाकला होता तर डोनाल्ड ट्रंप यांनी अव्यवहार्य पण रोखठोक भूमिका घेत हा घुसखोरांचा मुद्दा खूप तापवला होता पण  कसा? त्यांनी अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्या मेक्सिकन नागरिकांना चुचकारले व घुसखोरांनाच फटकारले. तुम्ही स्थायिक झालेले मेक्सिकन कष्टाळू आहात, तुमच्या मुलांच्या शिक्षणाची चांगली सोय झाली पाहिजे; अहो, तसा मी मेक्सिकन लोकांशी जवळीक ठेवूनच आहे. याच भागात माझी रेस्टॉरंट्स आहेत, मला मेक्सिकन अन्नपदार्थही आवडतात. अमेरिकेत येऊन स्थायिक झालेल्यांबद्दल माझी तक्रार नाही. येणार्‍या घुसखोर गुन्हेगार व बलात्कारींना थोपविण्याची माझी भूमिका आहे. हे म्हणणे अनेक स्थायिकांना पटले कारण या घुसखोरांचा स्थायिक झालेल्या मेक्सिकन लोकांनाही त्रास व उपद्रव होत होताच. हिलरी क्लिंटन दोन्ही मेक्सिकन गटांना चुचकारत राहिल्या. घुसखोर खूष झाले पण ते मतदार नव्हते. स्थायिक मेक्सिकन लोकांना घुसखोरांसोबत मानले, तोलले व गणले जाणे मान्य व सोयीचे नव्हते. हा अंतर्प्रवाह जाणण्यात डोनाल्ड ट्रंप यशस्वी झाले.


गाफील डेमोक्रॅट पक्ष :   डेमोक्रॅट पक्षाचा फार मोठा अपेक्षाभंग हे २0१६ सालच्या अध्यक्षीय निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. जेमतेम काही दिवस अगोदर ज्येष्ठांना बदललेल्या वातावरणाची चाहूल लागली होती. माजी अध्यक्ष बराक ओबामा सहकुटुंब प्रचारात उडी घेते झाले, ते ही जाणीव झाली म्हणूनच. पण ऐनवेळी केलेली उपाययोजना यशस्वी झाली नाही. ते शक्यच नव्हते. पक्षाची धाकटी पाती आपण जिंकणार, असे मानून चालली होती. जुने जाणते हादरले होते पण सर्मथक आणि सहानुभूतीदार आपल्याच विश्वात मशगूल होते. एरवी बोलघेवडा म्हणून प्रसिद्ध असलेला श्वेतवर्णी अमेरिकन हाताची घडी व तोंडावर बोट ठेवून ८ नोव्हेंबरची वाट पाहत होता. त्याने अनपेक्षित असा अभूतपूर्व धक्का दिला. हिलरी क्लिंटन यांनी औपचारिक शुभेच्छा दिल्या व त्यांनी स्वत:ला घरात कोंडून घेतले.  
निकालाची त्सुनामी : डोनाल्ड ट्रंप यांचा विजय जागतिक, अमेरिकन व अमेरिकेतील गावपातळीवर त्सुनामी सारखा परिणाम करता झाला.  देश पातळीवर पेप्सीकोच्या भारतीय वंशाच्या इंद्रा नुयींना तर रडू आवरेना. सर्व अश्‍वेतवणीर्यांच्या (काळे, सावळे व पिवळे -चिनी जपानी) जिवालाच धोका आहे, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. गाव पातळीवर ताणतणाव निर्माण झाले आहेत. ७ तारखेचा सलोखा, मैत्री, अगत्य एकदम तकलादू वस्तूप्रमाणे भंगले. परकीयांची ही अवस्था समजण्यासारखी आहे. पण रीतसर नागरिकत्त्व धारण करणार्‍यांना कृष्णवर्णीयांना तर अतिशय बिकट प्रसंगांना तोंड द्यावे लागत आहे.
शिक्षणसंस्था : एका गावात एकूण सात मोठय़ा जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. अमेरिकेत या शाळांमधील विद्यार्थी देखील आपल्या शालेय विश्‍वात देशासोबत निवडणुका मॉक इलेक्शन्स घेत असतात. सातपैकी सहा शाळात डोनाल्ड ट्रंप विजयी झाले. या शाळात श्‍वेतवर्णीय विद्यार्थी बहुसंख्येने आहेत. सातवी शाळा संमिर्श स्वरूपाची आहे. या शाळेत झालेल्या मतदानात मात्र हिलरी क्लिंटन जिंकल्या. प्राथमिक शाळातही असेच मतदान झाले. तिथेही हाच अनुभव थोड्याफार प्रमाणात आला. विद्यार्थ्यात लोकशाही संस्कार रुजावेत म्हणून अशा लटुपटूच्या निवडणुका अमेरिकेत आयोजित करतात. माध्यमिक स्तरावर एका शाळेत श्‍वेतवर्णी व अश्‍वेतवर्णी विद्यार्थिनीत झालेल्या किरकोळ वादाचे रुपांतर अश्‍वेतवर्णी मुलीच्या झिंज्या उपटण्यापयर्ंत गेले. कर्णभूषणे ओरबाडून काढल्यामुळे तिच्या कानांच्या पाळीतून रक्त ठिपकू लागले. शाळेतील विद्यार्थ्यात भांडणे अमेरिकेतही होत असतात. पण ८ नोव्हेंबरपयर्ंतची भांडणे व ९ नोव्हेंबर २0१६ नंतरची भांडणे यात गुणात्मक फरक पडला आहे. आता तुम्ही आपल्या देशात केव्हा परत जाणार, असा प्रश्न श्‍वेतवर्णी विद्यार्थी अश्‍वेतवर्णी विद्यार्थ्यांना विचारू लागले आहेत. त्यांचे पालक एच१बी या व्हिसानुसार अमेरिकेत नोकरीसाठी आलेले आहेत.
स्थानिक कृष्णवर्णीय : पेट्रोल पंपावर एक आफ्रिकन अमेरिकन नागरिक पेट्रोल भरत असतांना चार श्‍वेतवर्णींयांचे टोळके कुठूनसे आले. त्या अश्‍वेतवर्णी व्यक्तीच्या अंगावर थुंकले. त्याला पायदळी तुडवून निघून गेले. सुरुवातीलाच उल्लेख केलेल्या महिला डॉक्टरला तिच्यासोबत अनेक वर्षे काम करणार्‍या व गुण्यागोविंदाने राहणार्‍या श्‍वेतवर्णी मैत्रिणीने विचारले, तू केव्हा परत जाणार आहेस गं? विचारणारी महिला श्‍वेतवर्णी होती एवढेच. पण आपल्या देशातून परागंदा होऊन अमेरिकेत आर्शयाला आलेल्यांपैकी एक होती. या भारतीय महिला डॉक्टरने तिला म्हटले, बाई गं, उद्या तशीच वेळ आली तर कुठे जायचे हे मला माहीत आहे. मी भारतात परत जाईन. पण तुझं काय गं? तू कुठे परत जाणार? तू वर्णाने गोरी आहेस, पण परागंदा होऊन इथे आली आहेस. परत गेलीस तर तुझ्या देशात तुझ्यासाठी काय वाढून ठेवलं आहे, ते मला देखील माहीत आहे मग तुला तर ते माहीत असेलच.
एच१ बी धारकांचे अनुभव : नोकरीसाठीचा व्हिसा घेऊन येणार्‍यांचा हा अनुभव पुरेसा बोलका आहे. अमेरिकेतील एका विख्यात भारतीय डॉक्टर पतिपत्नींकडे पाहण्याची स्थानिकांची भूमिका ८ नोव्हेंबर २0१६ नंतर अवघी चोवीस तासात बदलेली दिसली. एरवी वरवर गोड बोलणारी माणसं एकदम वेगळीच भाषा बोलू लागली.
एच१ बी हा नोकरीनिमित्त अमेरिकेत जाणार्‍या परदेशी नागरिकांचा परवाना असतो. हे लोक अमेरिकन नागरिक नसतात, त्यांना नागरिकांसारखा सिक्युरिटी नंबरही नसतो पण ते अमेरिकेत घर विकत घेऊन राहू शकतात. यांनी अमेरिकेत रहावे, हे अमेरिकेच्या हिताचे असते. कारण यांच्या भरवशावर चालणार्‍या उद्योगात हजारो अमेरिकनांना रोजगार मिळाला आहे. ओबामा राजवटीत एच१बी व्हिसाबाबत भारतीय नागरिक खूपच मागे ढकलले गेले होते. मुस्लीम व चिन्यांची चलती होती. डोनाल्ड ट्रंप यांच्या राजवटीत हे धोरण बदलेल, अशी अपेक्षा बाळगण्यास जागा आहे. परकीय व अमेरिकन असा विचार केला तर अमेरिकन जनमानसात भारतीयाबाबत त्यातल्यात्यात कमी राग आहे. डोनाल्ड ट्रंप यांची निवडणुकीपूर्वीची भाषणे व अमेरिकेत नोकरीसाठी गेलेल्या भारतीय मानवी संसाधनाची गुणवत्ता पाहता ओबामा राजवटीत मिळालेल्या वागणुकीपेक्षा बरी वागणूक डोनाल्ड ट्रंप यांच्या राजवटीत मिळेल, अशी अपेक्षा आहे.
विसंवाद दूर करण्याचे डोनाल्ड ट्रंप यांचे प्रयत्न : स्थानिक पातळींवरचे हे विसंवाद दूर करण्याचा प्रयत्न खुद्द डोनाल्ड ट्रंप यांनी करावा, ही समाधानाची बाब असून याचे दोन अर्थ लागतात. एक अर्थ असा की, निवडणुकीच्या ज्वरातील राणा भीमदेवी थाटाची भाषणे व राज्यशकट हाकताना स्वीकारावयाची धोरणे यात फरक केला पाहिजे, ही व्यावहारिकता डोनाल्ड ट्रंप यांच्यात आहे किंवा त्यांनी निवडलेली सल्लागारांची चमू परिपक्व विचारांची व जबाबदारीची जाणीव असलेली आहे. त्यांना योग्य सल्ला देत आहे. 
जुन्या खपल्या मात्र उघडून भळभळ वाहत आहेत: वर उल्लेख केलेली ८ नोव्हेंबर नंतरची ही संघर्षांची उदाहरणे तशी प्रातिनिधिक स्वरूपाची आहेत. पण प्रत्यक्षात सर्वत्र असेच घडेल, असे नाही. या घटनांचा उल्लेख यासाठी केला की, संबंधांना तडे गेले होतेच. बांगडी पिचली होतीच. तुकडे पडायला सुरुवात ८ नोव्हेंबर नंतर झाली आहे. पण अमेरिकेत तसं पाहिलं तर सगळेच उपरे आहेत. मूळच्या रेड इंडियन लोकांचा वंशविच्छेद झाला आहे. आज एकटदुकट अमेरिकनाच्या डोक्यावरचे लाल केस दिसले की, वंशविच्छेदातून वाचलेल्या रेड इंडियन महिलांवर झालेल्या बलात्कारातून जन्माला आलेली ही प्रजा एकेकाळच्या मूळ निवासी असलेल्या लोकांची आठवण करून देत असते. आफ्रिकन अमेरिकन लोक तर विकत घेऊन आणलेल्या किंवा जिंकून आणलेल्यांची संतती आहे. आपल्या मूळ निवासाच्या खुणा त्यांच्याबाबतीत इतक्या पुसट झाल्या आहेत की, त्यांचा असा देशच ते सांगू शकत नाहीत. त्यांचा देश आता अमेरिकाच आहे. वर्णद्वेशामुळे त्यांच्या मनात निर्माण झालेली सल त्यांना अस्वस्थ करीत असते. इतरही घटक अस्वस्थ आहे. त्यात महिला, समलिंगी, कामगार, अश्‍वेतवर्णी (विशेषत: काळे, सावळे) यांचाही समावेश आहे.
खेळाडूची प्रातिनिधिक भूमिका : याचे उदाहरण नुकतेच प्रकाशात आले आहे. कॉलीन किपरनिक नावाचा प्रसिद्ध अमेरिकन खेळाडू आफ्रिकन अमेरिकन आहे. खेळाचा सामना सुरू व्हायच्या अगोदर राष्ट्रगीत गाण्याची प्रथा त्या देशात आहे. या खेळाडूने राष्ट्रगीत गायले जात असताना आपण उभे राहणार नाही, अशी घोषणा केली. वांशिक अल्पसंख्यांकांना अमेरिकेत जी वागणूक मिळते, तिचा निषेध म्हणून आपण हे पाऊल उचलले आहे, असा त्याने खुलासा केला. ही घटना आहे २८ ऑगस्ट २0१६ ची. या निमित्ताने संपूर्ण देशभर एकच गदारोळ उठला. बहुतेकांनी त्याला शेलक्या शिव्या हासडल्या. काहींनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. गुलामगिरीची प्रथा एका श्‍वेतवर्णीयानेच - अब्राहम लिंकनने बंद केली व ही त्याची भूमिकाच त्याच्या खुनासाठीचे एक कारण ठरली होती. कॉलीन किपरनिकचे प्रकरण घडले त्यावेळी मी अमेरिकेतच होतो. त्या खेळाडूचा राग एकवेळ समजून घेता येईल. पण त्याचा राग राष्ट्रगीतावर का? कुणी काही बोलत नव्हते. एकाने दबक्या आवाजात विचारले की, तुम्ही राष्ट्रगीतातले तिसरे कडवे वाचले आहे का? मला अमेरिकन राष्ट्रगीताचा पहिला शब्द सुद्धा माहीत नव्हता. शेवटी इंटरनेटला शरण गेलो. अमेरिकेचे राष्ट्रगीत हे ब्रिटिश आक्रमकांविरुद्धची लढाई जिंकल्यांतर एका कवीने रचलेले विजय गीत आहे. कवीचे नाव आहे, फ्रान्सिस स्कॉट की. १८१२ मध्ये बॅटल ऑफ बाल्टीमोर या नावाने प्रसिद्ध असलेली ही लढाई लढली गेली. ही अमेरिकनांची ब्रिटिश आक्रमकांविरुद्धची अमेरिकन फौजांनी लढलेली व जिंकलेली लढाई आहे. या गीतातले तिसरे कडवे वाचले. या कडव्यात कवी असे काहीसे म्हणतो , पळून जाणार्‍या त्या भाडोत्री गुलामांना जीव वाचविण्यासाठी फुरसतच मिळाली नाही. 
आता गुलाम कोण? तर अश्‍वेतवर्णी काळे. म्हणून कॉलीन किपरनिकचा राग होता. उत्तरादाखल व कॉलीन किपरनिकची समजूत काढण्यासाठी जे लेख छापून आले होते, त्यात खुलासा होता की, हे गुलाम होते, हे खरे आहे. पण ते ब्रिटिशांच्या बाजूने लढत होते. त्यांना मारले यात चुकले काय? दुसरे असे की, राष्ट्रगीताचे हे तिसरे कडवे, आजकाल फारसे गायले जातही नाही. राष्ट्रगीताची किती कडवी गावीत याबाबत अमेरिकेत निश्‍चित नियम नाहीत. अशा सगळ्या गोष्टींची माहितीत भर पडली. वर्णभेदाचा मुद्दा अमेरिकेत किती ताणतणाव निर्माण करतो आहे, याचे हे उदाहरण परिचायक आहे.
यावर डोनाल्ड ट्रंप यांना उपाय करावाच लागेल. अमेरिकन  आफ्रिकन हा अमेरिकेतील अल्पसंख्यांकांचा मोठा गट आहे. त्याला असंतुष्ट ठेवून चालणार नाही. सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की, डोनाल्ड ट्रंप यांच्या रिपब्लिकन पक्षात अनेक अश्‍वेतवर्णी नागरिकही आहेत. ते पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्तेही आहेत. त्यामुळे सबुरीची भाषा व भूमिका निवडणुकीनंतर रिपब्लिकन पक्षाला घ्यावीच लागणार व अर्थकारणाची कास धरत एक अमेरिकन राष्ट्र उभे करण्याचा प्रयत्न कसोशीने करावा लागणार.







Sent from my iPad

No comments:

Post a Comment