Thursday, December 1, 2016

फ्रान्समध्येही ट्रंपायन
वसंत गणेश काणे,
सध्या फ्रान्समध्ये पाचवे गणराज्य कार्यवाहीत आहे. फ्रान्सच्या पार्लमेंटची दोन सभागृहे असून सिनेट हे वरिष्ठ सभागृह आहे, तर नॅशनल असेम्ब्ली हे ५७७ सदस्यांचे (डेप्युटी) कनिष्ठ सभागृह आहे. हे डेप्युटी दुहेरी मतदान फेरीने (टू राऊंड व्होटिंग सिस्टीम) निवडले जातात.
२०१२ साली झालेल्या निवडणुकीत मिळालेले विविध पक्षांचे बलाबल पुढील प्रमाणे आहे. सोशॅलिस्ट -२९२, रिपब्लिकन - १९९, यूडीआय - ३०, ग्रीन - १७, सोशल लिबरल - १६, लेफ्ट - १५, अपक्ष- ८.
सोशॅलिस्ट पार्टी हा १९०५ साली स्थापन झालेला एक प्रमुख पक्ष असून त्याने २९२ जागा जिंकून सत्ता संपादन केली आहे. उद्योगांवर व अर्थकारणावर शासनाचे नियंत्रण असावे, लोकशाही व गणराज्य संकल्पनांचा समर्थक, राष्ट्रीयीकरण, लोककल्याणकारी राज्य, नियोजनबद्ध आर्थिक विकास, शासनाद्वारे निवास व्यवस्था, औद्योगीकरण, नागरी स्वातंत्र्य, स्थानिक स्वराज्य यांचा पाठीराखा असलेला, नागरी साधनसुविधा यांचा पुरस्कार करणारा, नाटो व युरोपियन युनीयनची सदस्यता यास अनुकूल असलेला व उत्तम पक्षबांधणी ही विशेषता असलेला हा पक्ष असून फ्रॅंको आॅलंड हे सध्याचे फ्रान्सचे अध्यक्ष आहेत.
रिपब्लिकन पक्ष १९९ जागा जिंकून क्रमांक दोनचा पक्ष असलेला , १९२४ साली स्थापन झालेला, काहीसा उदारमतवादी तसेच व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता असलेला , टोकाची भांडवलशाही व साम्यवाद या दोन्हीचा विरोध करणारा, ख्रिश्चन आदर्श व शिक्षण व्यवस्थेचा पुरस्कर्ता असलेला, देशपातळी व प्रांतपातळी पर्यंत बऱ्यापैकी पक्षबांधणी करण्यात यशस्वी झालेला हा पक्ष आहे.
युडीआय  ३० जागा जिंकून युनायटेड डेमोक्रॅट वॲंड इनडिव्हिज्युअल्स  हा उजवीकडे झुकलेला हा एक वेगळाच पक्ष असून यातील घटक पक्ष आपापले पक्ष कायम ठेवून असलेली ही आघाडी आहे, असेही म्हणता येईल. उदारमतवादी, ख्रिश्चन धर्माचे अधिष्ठान मानणारा तसेच युरोपीयन संघराज्याचा समर्थक असलेला हा पक्ष आहे.
ग्रीन पार्टी १७ जागा जिंकून १९७४ साली स्थापन झालेला हा पक्ष २०१० मध्ये युरोप इकाॅलाॅजी पक्षात विलीन झाला. प्रागतिक,  पर्यावरणवादी व डावीकडे झुकलेला पक्ष आहे.
सोशल लिबरल १६ जागा जिंकणारा व्यक्तिस्वातंत्र्य व सामाजिक न्यायावर भर देणारा पक्ष आहे.
लेफ्ट पार्टी (डावा पक्ष) १५ जागा जिंकून लोकशाहीवादी व समाजवादी असे या पक्षाचे स्वरूप आहे.
  याशिवाय काही छोटे पक्षही आहेत. पण सध्या त्यांचा विचार न केला तरी चालण्यासारखे आहे.
फ्रॅंको आॅलंड यांचा विजय कसा झाला?- फ्रान्समध्ये अध्यक्षीय निवडणूक एप्रिल २०१२ मध्ये झाली. मतदानाच्या पहिल्या फेरीत सोशॅलिस्ट पक्षाचे फ्रॅंको आॅलंड व रिपब्लिकन पक्षाचे निकोलस सारकोझी हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर होते. यापैकी कुणालाही बहुमत नसल्यामुळे (५० टक्के किंवा निर्धारित मते) बाकीच्या उमेदवारांना बाद करून या दोघातच मतदानाची दुसरी फेरी पार पडली. त्यात ५१.६४ % मते मिळवून सोशॅलिस्ट पक्षाच्या फ्रॅंको आॅलंड यांनी रिपब्लिक पक्षाच्या निकोलस सारकोझी (मते ४८.३६ %) यांना मात दिली.
आजची परिस्थिती - लवकरच म्हणजे येत्या मे महिन्यात फ्रान्समध्ये निवडणूक होऊ घातली आहे. फ्रेंच अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी झालेल्या रिपब्लिकन पक्षांतर्गत स्पर्धेतून माजी अध्यक्ष निकोलस सार्कोझी यांचा धक्कादायक पराभव झाला आहे व निकोलस सार्कोझी यांचे उजवे हात मानले जाणारे माजी पंतप्रधान फ्रान्स्वॉं फिलॉन सौम्य प्रकृतीचे नेते दुसऱ्या स्थानावर यावेत, हेही आश्चर्यच आहे. सार्कोझी हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्त्व आहे. जहाल उजवी मते, भ्रष्टाचाराचे आरोप, भंपक वक्तव्ये अशा गोष्टींमुळे ते नेहमीच वादात राहिलेले. तरीही त्यांच्या रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी झालेल्या निवडणुकीत त्यांचेच पारडे जड होते. येत्या मे महिन्यात फ्रान्समध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.  निकोलस सार्कोझी यांच्याकडे भावी अध्यक्ष म्हणून पाहिले जात असे. पण ते पक्षांतर्गत निवडणुकीतच पराभूत झाले आहेत. इतर बड्या पक्षांना बाजूला सारून आपण एका अगदी लहान पक्षाचाच विचार करू. यामागे तसेच कारण आहे.
नॅशनल फ्रंट - हा राष्ट्रवादी, पुराणमतवादी, कायदा व सुरक्षेचा खंदा पुरस्कर्ता, स्थलांतराचा अतिकडवा विरोधक व अतिरेकीउजवा म्हणून ओळखला जाणाऱा व २०१२ च्या निवडणुकीत फक्त साडे तेरा टक्के मते व केवळ दोनच जागा मिळवणाऱा  पक्ष आहे. या पक्षातर्फे जहाल नेत्या मेरीन ले पेन यांची  उमेदवारी जाहीर झाल्यातच जमा आहे. या ले पेन म्हणजे फ्रान्समधील लेडी डोनाल्ड ट्रम्पच आहेत, असे म्हणता येईल. त्यांच्याशी दोन हात करण्याची क्षमता  निकोलस सार्कोझी यांच्यातच होती/आहे, असे मानले व म्हटले जाते. पण त्यांचा रिपब्लिकन पक्षांतर्गत निवडणुकीत पराभव होऊन तुलनेने सर्वच बाबतीत उणे असलेल्या फ्रान्स्वॉं फिलॉन हेच आता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असू शकतात, हे स्पष्ट झाले आहे. पण त्यांचा मेरीन ले पेन  यांच्यासमोर निभाव लागेल, अशी सुतराम शक्यता नाही. रिपब्लिकन पक्षाच्या निकोलस सार्कोझी यांनी मात्र समजुतदारपणे आपली हार मान्य केली आहे व फ्रान्स्वॉं फिलॉन यांना आपला पाठिंबा, सल्ला व सहकार्य देऊ केले आहे.
स्थलंतरितांमुळे धोका - स्थलांतरितांचा प्रश्न सध्या फ्रान्समध्ये ऐरणीवर आला आहे. सीरियामधून परगंदा होऊन युरोपभर पसणाऱ्यांमध्ये इसीसचे कडवे अतिरेकी छुपेपणे प्रवेश करीत असून संधी मिळताच उत्पात घडवून आणीत आहेत. यांच्या स्थलांतराला फ्रान्समध्ये विरोध असण्यामागचे आणखीही एक कारण आहे. ते कारण समजून घेण्यासाठी बरेच मागे जावे लागेल.
फ्रान्समधल लोकसंख्या -  एका पाहणीनुसार फ्रान्समध्ये ५६ टक्के लोक ख्रिश्चन, ३२ टक्के कोणताही धर्म न मानणारे/पाळणारे, ६ टक्के इस्लाम धर्म मानणारे, १ टक्के ज्युडाइझम मानणारे व अन्य ३ टक्के आहेत. थोडक्यात असे की, इस्लाम हा फ्रान्समधील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे. तसेही युरोपातील सर्वात जास्त मुस्लीम फ्रान्समध्येच आहेत. यांची संख्याही वेगाने वाढते आहे. त्यातून हे सर्व मुख्यत: सुन्नी या कट्टर पंथाचे अनुयायी आहेत.
फ्रान्स एक धर्मातीत राष्ट्र- फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्स देशाचा असा कोणताही धर्म असणार नाही, असे ठरले आहे. म्हणजे फ्रान्स हे धर्मातीत (सेक्युलर) राष्ट्र आहे. प्रत्येकाला आपल्या इच्छेनुसार हव्यात्या धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य फ्रान्समध्ये आहे. तरीही इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांपासून फ्रेंच लोकांच्या एकतेला धोका निर्माण होत होताच. हा धोका आता सीरियातून येणाऱ्या निर्वासितांमधल छुप्या अतिरेक्यांमुळे खूपच वाढला आहे. फ्रान्समधील इस्लाम धर्म पाळणारे वर्णाने काळे, गोरे व सावळे असे तिन्ही वर्णाचे आहेत. या इस्लाम धर्मीयांच्या कडवपणामुळे वेळोवेळी ताणतणाव निर्माण होत असतात. काही इमाम व धर्मवेडे फ्रान्स  देशाचे कायदे, नियम व रीतिरिवाज यांना सतत विरोध करीत असतात/आले आहेत.
फ्रान्समधील मुस्लीम - फ्रान्समधील मुस्लिमांचे तीन प्रमुख गट पाडता येतील.
 १. बहुसंख्य  मूक मुस्लिम (सायलेंट मेजाॅरिटी) - हे धर्मातीत भूमिका स्वीकारून वावरणारे असून त्यांचे प्रमाण मुस्लिमांमध्ये ४६ टक्के आहे. हे देशाचे कायदे पाळणारे आहेत.
२. अभिमानी मुस्लिम (प्राऊड मुस्लिम) - यांची संख्या २५ टक्के असून सुद्धा त्यांनी सुद्धा बुरखा व हिजाब वरील बंदी व धर्मातीत राज्याची अन्य वैशिष्ट्ये  स्वीकारली आहे.
३. कडवे मुस्लिम ( हार्ड लाइनर)-  यांचा संख्या २८ टक्के असून हे नकाब व बहुपत्नित्त्वाचे  पुर्सकर्ते आहेत. आश्चर्याची बाब ही आहे की, हे मुख्यत: वयाने तरूण व अकुशल कामगार असून ते सामान्यत: गावकुसाबाहेर राहणारे, सनातनी वृत्तीने आपली वेगळी व स्वतंत्र ओळख राखणारे व बंडखोर स्वभावाचे आहेत. देशाच्या कायद्यापेक्षा त्यांना शरीयतप्रणित कायदेकानून त्यांना अधिक महत्त्वाचे वाटतात. फ्रान्समध्ये ठळकपणे नजरेस पडणारी धार्मिक प्रतीके (सिम्बाॅल्स) जसे हिजाब (महिलांनी डोक्यावर रुमाल बांधणे) सार्वजनिक ठिकाणी - जसे शाळा- परिधान करण्यावर मनाई आहे. हे या इस्लाम धर्मीयांना मान्य नाही.
सर्व प्रमुख राष्ट्रात नो-गो-झोन्स - मुस्लिमांची संख्या फ्रान्सभर समप्रमाणात विखुरलेली नाही. समुद्र किनाऱ्यानजीकच्या स्थानी मुस्लिमांच्या दाट वस्त्या आहेत. जसे मार्सेलिस बंदर. एकट्या फ्रान्समध्येच नाहीत तर अमेरिका व ब्रिटन या सारख्या देशातही अशा वस्त्या आहेत. त्यांना नो- गो- झोन्स असे नाव आहे. या भागात शरीयत कायदा चालतो. मुस्लिमेतर लोकांना या भागात प्रवेश करण्यास मज्जाव असतो. पोलीसही या भागात प्रवेश करू शकत नाहीत. चेक पोस्टवर तपासणी करूनच आत प्रवेश दिला जातो. काही उपाययोजना करू म्हटले तर संघर्ष उफाळतो, काही करू नये तर काळ सोकावतो, अशा पेचात ही राष्ट्रे वावरत आहेत.
१५ जानेवारी २०१५ ला विडंबनपर लिखाण प्रसिद्ध करणाऱ्या चार्ली हेब्दो या नावाच्या नियतकालिकाच्या कार्यालयावर हल्ला करून अतिरेक्यांनी १२ कर्मचाऱ्यांना यमसदनी पाठविले होते. प्रेषित महंमदसाहेबांच्या अपमानाचा सूड घेण्याचे हेतूने हा हल्ला करण्यात आला होता. या निमित्ताने जी शोध मोहीम हाती घेतली होती, त्यात ही बाब (नो-गो-झोनचे अस्तित्त्व) प्रकर्षाने जाणवली. फ्रान्स, ब्रिटन, स्वीडन, जर्मनी  या देशात अशी नो-गो-झोन्स असून त्या भागात त्या त्या देशांचा अंमल चालत नाही. या भागात पोलीस जाऊ शकत नाहीत. हे भाग त्या त्या देशात असले तरी तसे स्वायत्तच असतात/आहेत.
अतिरेक्यांच्या निशाण्यावर फ्रान्स-  इस्लामिक मूलतत्त्ववाद्यांचा फ्रान्सवर विशेष रोष आहे. कारण फ्रान्स हे खरोखर धर्मातीत (सेक्युलर) राष्ट्र आहे. आपल्यासारखे भंपक नाही. धर्मातीततेची वीण जपण्यासाठी हे राष्ट्र वेळप्रसंगी कठोरातील कठोर भूमिका घेतांना मागेपुढे पहात नाही. आपल्या येथे धर्मातीततेच्या नावाखाली हिंदुत्ववाद्यांचीच अवहेलना करण्यात हे निधर्मवादी कृतकर्तव्यता मानीत असतात. चार्ली हेब्दो हे विडंबनपर लिखाणाला वाहिलेले नियतकालिक येशू ख्रिस्त व प्रेषित महंमद पैगंबर या दोघांचीही टिंगल उडवीत असे. त्यामुळे त्याला इस्लामी अतिरेक्यांच्या रोषाला पात्र व्हावे लागले. असे म्हणतात की, इसीसच्या आत्मघातकी पथकात निदान एक हजार तरी फ्रेंच मुस्लीम आहेत. पण फ्रान्स या कशाचीही पर्वा न करता आवश्यक ते कठोर निर्णय घेतो. मुलींच्या वस्त्रप्रावरणाबाबतचा निर्णय याच जातकुळीचा होता/आहे. सीरियातही इसीसचा पाडाव करण्यासाठीच्या प्रयत्नात फ्रान्स आघाडीवर आहे. त्यामुळे इसीसचीही फ्रान्सवर विशेष मेहेरनजर (?) आहे. हमरस्त्यातील रहदारीत ट्रक घालून शेकडो निर्दोष नागरिकांना चिरडणारा ट्रक एक अतिरेकी चालवीत होता, हे फ्रान्समधील वृत्तजगताने ठामेठोकपणे मांडले. आपल्या येथील एका बड्या वृत्तपत्रात मात्र मथळा होता, ‘ट्रकने नागरिकांना चिरडले’. जणू चिरडण्याचे कर्तेपण ट्रकचेच होते. तो चालविणाऱ्याचा मागोवा घेण्याचे कारणच काय?.
जनमानसातील खदखद - हा सर्व तपशील विस्ताराने नमूद करण्याचे कारण असे की, या सर्व प्रश्नाचे बाबतीत फ्रान्समधील जनमत विलक्षण संतापले आहे. हाच धागा पुढे चालवत फ्रान्समधील नॅशनल फ्रंट हा राष्ट्रवादी, पुराणमतवादी, कायदा व सुरक्षेचा खंदा पुरस्कर्ता, स्थलांतराचा अतिकडवा विरोधक व अतिरेकीउजवा म्हणून ओळखला जाणाऱा व २०१२ च्या निवडणुकीत फक्त साडे तेरा टक्के मते व केवळ दोनच जागा मिळवणाऱा  पक्ष पुढे सरसावला आहे. या पक्षातर्फे जहाल नेत्या मेरीन ले पेन यांची  उमेदवारी जाहीर झाल्यातच जमा आहे. यांच्या उमेदवारीच्या निमित्ताने फ्रान्समध्येही अमेरिकेप्रमाणे  ‘ट्रंपायन’ घडले तर आश्चर्य वाटायला नको.

No comments:

Post a Comment