Saturday, May 12, 2018

व्हिकार व भटजी, भावानुवाद की अनुवाद?

  व्हिकार व भटजी, भावानुवाद की अनुवाद?
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२
(०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   आॅलिव्हर गोल्डस्मिथ नावाचा एक आयरिश लेखक 1728 ते 1774 या काळात या भूतलावर होऊन गेला, हे इंग्रजी साहित्याची जाण व आवड असलेल्या वाचकांना माहीत असणारच. ‘दी व्हिकार आॅफ वेकफिल्ड’, या नावाची कादंबरी त्याने लिहून 1766 मध्ये प्रसिद्ध केली आहे. ही आपलीच कथा आहे, अशी कल्पना करून त्याने ती मांडली असून व्हिक्टोरियन कालखंडातील व 18 व्या शतकातील ही एक अतिशय लोकप्रिय कादंबरी मानली जाते.
   ही कादंबरी प्रकाशनासाठी कशी विकली गेली, ते आॅलिव्हर गोल्डस्मिथचा मित्र डाॅ सॅम्युअल जाॅनसन याने सांगितले आहे, ते असे.
   एके दिवशी मला माझ्या गरीब बिचाऱ्या मित्राचा - आॅलिव्हर गोल्डस्मिथचा- निरोप आला की, तो अतिशय दु:खी असून, त्याला मला भेटायला येणे शक्य नाही, तेव्हा मीच त्याला शक्य तितक्या लवकर येऊन भेटावे. मी त्याला ताबडतोब काही पैसे पाठविले व तयार होऊन त्याच्या घरी गेलो. घरमालकिणीने त्याला भाडे थकवल्यावरून अटक करविली होती. तो अतिशय संतप्त झाला होता. मी पाठविलेल्या पैशाची दारू आणून त्याने ती ढोसली होती. समोरच पडलेल्या रिकाम्या पेल्यावरून हे ताडायला मला फारसा वेळ लागला नाही. मी बाटलीला बूच लावले, त्याला शांत होण्यास सांगितले आणि त्याच्याशी हळूहळू बोलायला सुरवात केली. त्याला अटकेतून कसे सोडवायचे याचा मी विचार करू लागलो. तो मला म्हणाला की, त्याने एक कादंबरी लिहिली असून ती प्रसिद्धीसाठी तयार आहे. त्याने ती पाने माझ्यासमोर ठेवली. मी ती थोडीफार वाचताच त्या लिखाणाचे महत्त्व माझ्या लक्षात आले. घरमालकिणीला लगेचच परत येतो, असे सांगून मी एका पुस्तकविक्रेत्याकडे गेलो व त्याला ती कादंबरी साठ पाउंडांना विकली. मी ते पैसे आॅलिव्हर गोल्डस्मिथला दिले. त्या पैशातून त्याने थकलेले भाडे भागवले पण आपल्याला दिलेल्या वागणुकीबद्दल घरमालकिणीला चांगलेच फटकारले सुद्धा.
   ‘दी व्हिकार आॅफ वेकफिल्ड’ हीच ती कादंबरी होय. पुस्तकविक्रेत्याने कादंबरीचे हस्तलिखित दोन वर्षेपर्यंत आपल्याजवळ तसेच पडू दिले.
कादंबरीचे कथानक
  व्हिकार म्हणजे धर्मोपदेशक. डाॅ चार्ल्स प्रिमरोज नावाचा धर्मोपदेशक, साधी राहणी व उच्च विचारसरणी या उक्तीला अनुसरत एका चर्चमध्ये पत्नी डेबोरा, मुलगा जाॅर्ज, दोन मुली आॅलिव्हिया व सोफिया  आणि शिवाय तीन मुलांसह कालक्रमणा करीत होता. एका पूर्वजाने केव्हातरी गुंतवलेल्या पैशाच्या व्याजाच्या रकमेमुळे तसा तो श्रीमंतच होता, असे म्हणायला हवे. या रकमेतून तो स्थानिक अनाथालयाला आणि युद्धात शौर्य गाजवणाऱ्या योध्यांना मदत करीत असे. त्याचा मुलगा जाॅर्ज याचा विवाह अॅराबेला विलमाॅंट नावाच्या श्रीमंत मुलीशी ठरतो आणि त्याचवेळी चार्ल्स प्रिमरोजच्या पूर्वजांनी गुंतवलेली रकम एका व्यापाऱ्याच्या दिवाळखोरीमुळे बुडते व गुंतवणुकदारही बेपत्ता  होतो व कुटुंबाची अन्नान्न दशा निर्माण होते.
  ॲराबेलाचा बाप आपल्या मुलीचे ठरलेले लग्न मोडतो कारण पैशाचे महत्त्व जाणणारा धोरणी म्हणूनच त्याची खरी ओळख असते. जाॅर्जचे शिक्षण आॅक्सफर्डमध्ये झालेले असते. तसा तो आता आपल्या पायावर उभा राहण्या योग्यही झालेला असतो. त्याला शहराकडे उदरार्जनासाठी पाठविले जाते. उरलेले कुटुंब एका नवीन व लहानशा चर्चमध्ये स्थलांतरित होते. हे चर्च स्क्वायर थाॅर्नहिल नावाच्या व्यक्तीच्या मालकीच्या जागेवर कसेबसे उभारलेले असते. स्क्वायर थाॅर्नहिल कमालीचा स्त्रीलंपट असतो. नवीन जागी आसऱ्याला जात असतांनाच चार्ल्स प्रिमरोजला आपल्या नवीन मालकाची ही कीर्ती कळते. मालकाच्या काकाला - सर विल्यम थाॅर्नहिलला - मात्र प्रतिष्ठित व दानशूर म्हणून आसमंतात मान्यता असते.
   नवीन जागी जात असतांना एका धाब्यावर प्रिमरोज कुटुंबाची भेट बर्शेल नावाच्या गरीब आणि एककल्ली व्यक्तीशी होते. तो सोफियाला बुडताबुडता वाचवतो. ती दोघे एकमेकांकडे आकर्षित होतात पण मुलीच्या महत्त्वाकांक्षी आईला - डेबोराला- हे मान्य नसते. यात तिला कमीपणा वाटतो.  ती सोफियाच्या भावनेला उत्तेजन देत नाही.
  यानंतरचा बराच काळ तसा सुखासमाधानातच गेला, असे म्हटले पाहिजे. असे म्हणण्याचे कारण असे की, स्त्रीलंपट स्क्वायर थाॅर्नहिल व बर्शेल या दोघांचीच नियमित भेट कायती मध्येच व्यत्यय आणीत असायची. आॅलिव्हियावर स्क्वायर थाॅर्नहिलचे पोकळ मायाजाल मोहिनी घालायचे, हे तर होतेच, पण त्याचबरोबर पण स्क्वायर थाॅर्नहिल डेबोराच्या व तिच्या मुलींच्या अवाजवी सामाजिक महत्वाकांक्षेला खतपाणी घालून हास्यास्पद स्तरापर्यंतही चढवीत असे.
   शेवटी आॅलिव्हिया पळून गेल्याचे वृत्त कानावर येते व ब्रुशेलवर संशय घेतला जातो. डाॅ प्राइमरोज कसून तपास करतो. लक्षात येते ते भलतेच. आॅलिव्हिया स्क्वायर थाॅर्नहिल बरोबर पळून गेलेली असते. तो म्हणे तिच्याशी गुपचुप लग्न करणार असतो. त्याचा खरा बेत तिच्याशी लग्न करून नंतर तिला एकटीलाच सोडून पळून जायचा असतो. यापूर्वीही त्याने अनेक महिलांबाबत असेच केलेले असते.
   आॅलिव्हिया वडलांबरोबर घरी परत येतात तो काय ! घर अग्नीच्या भक्ष्यस्थानी पडलेले असते. घरातील सर्व चीजवस्तू, किडुकमिडूक बेचिराख झालेले असते. अशा परिस्थितीतही स्क्वायर थाॅर्नहिल मात्र भाड्यासाठी अडून बसतो. धर्मगुरू अर्थातच भाडे देऊ शकत नाही, त्यामुळे त्याला पकडून तुरुंगात टाकण्यात येते.
   यानंतर संकटे एकामागोमाग एक येऊ लागतात. आॅलिव्हियाचा मृत्यू झाल्याची  वार्ता येते. सोफियालाही कुणीतरी पळवू नेते. जाॅर्जला तर रक्तबंबाळ अवस्थेत,  साखळदंडांनी बांधून तुरुंगात टाकण्यात येते कारण त्याने स्क्वायर थाॅर्नहिलला, त्याच्या दुष्कृत्याबद्ल जाब विचारून  द्वंद्वासाठी आव्हान दिलेले असते.
  शेवटी बर्शेल परत येतो व सर्व प्रश्नांची सोडवणूक करतो. तो सोफिया सोडवून आणतो.  आॅलिव्हिया प्रत्यक्षात मेलेली नसते. सर विल्यम थाॅर्नहिल हाच बर्शेल असतो. तोच वेशांतर करून वावरत असतो. शेवटी लग्नाचे दोन बार उडवले जातात. जाॅर्जचा विवाह अगोदर ठरलेला असतो त्यानसार ॲराबेलाशी होतो तर सर विल्यम थाॅर्नहिलचे सोफियाशी लग्न होते. स्क्वायर थाॅनहिलच्या नोकराने आपल्या मालकाची फसवणूक केलेली असते. स्क्वायर व आॅलिव्हियाचे लग्न लुटुपुटूचे नव्हते तर ते खरेच झालेले असते. आता व्हिकारची संपत्तीच कायती परत मिळायची राहिलेली असते. तीही परत मिळते कारण दिवाळे काढून पळून गेलेला व्यापाऱ्याचाही शोध लागतो.
  आॅलिव्हर गोल्डस्मिथच्या या 18 व्या शतकातील कादंबरीला अफाट लोकप्रियता मिळाली होती.
व्हिकारची जातकुळी कोणती?
  इंग्रजी साहित्याच्या इतिहासात व्हिकार आॅफ वेकरफिल्ड एक भावनोत्कट कादंबरी मानली जाते. शेवटी मानवातील चांगलेपणाचा विजय या कादंबरीत दाखवलेला आहे. काही समीक्षक या कादंबरीकडे एक विडंबनाचे उदाहरण म्हणूनही पाहतात. कादंबरीतील भावनोत्कटता व मूल्ये यांना या पापी जगात काहीच किंमत नसते, हेच ही कथा दाखवत नाहीका? सर विल्यम थाॅर्नहिलच्या मदतीशिवाय सज्जन चार्ल्स प्राइमरोज स्वत:हून एकाही संकटाचा सामना करू शकत नाही. प्राचीन ख्रिस्ती लिखाणात बुक आॅफ जाॅबचा उल्लेख आहे. जाॅब हे माणसाचे नाव असून तो सरळ, सज्जन व देवाला मानणारा होता. चार्ल्स प्रिमरोजची तुलना त्याच्याशी करण्याचा मोह अनेक समीक्षकांना झाला आहे. पण मग जगात मुळात दुष्टावा असतोच का, असावाच का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो.
  वाईकर भटजी व व्हिकार आॅफ वेकफिल्ड साम्य व भेद स्थळे
  आॅलिव्हर गोल्डस्मिथच्या या कादंबरीचा मराठी भावानुवाद धनुर्धारी (कै. रामचंद्र विनायक टिकेकर) यांनी वाईकर भटजी या नावाने केला आहे. जन्मल्यापासून मरेपर्यंत, जी स्थिती प्राप्त होईल ती नकोशी असणे व नसेल ती हवीशी वाटणे, इत्यादी मनुष्यस्वभावाचे चित्र ‘वाईकर भटजी’त फार चांगल्या रीतीने रेखले आहे.
   प्रख्यात इंग्लिश साहित्यिक व कवी ऑलिव्हर गोल्डस्मिथ यांची सर्वज्ञात व सर्वमान्य कादंबरी व्हिकार ऑफ वेकफील्ड ही मूळची इंग्रजी कादंबरी प्रथमत: सन १७६६ साली प्रसिद्ध झाली. गोल्डस्मिथचे बहुतेक आयुष्य अत्यंत दारिद्र्यात व कर्जबाजारीपणात गेले. त्याने ही कादंबरी केवळ करमणुकीखातर लिहिली व आपल्या आयुष्यांतील सर्व अनुभव त्याने या कादंबरीत ओतला. गोल्डस्मिथचे चित्रकार मि. फॉर्स्टर म्हणतात, ‘ या लिखाणात गोल्डस्मिथचा बेधडकपणा दिसून येतो. त्याचा स्वभाव, अनुभव, वेदना, कर्मठपणा, माधुर्य यांनी युक्त असे चित्रविचित्र जीवन (हा सगळा मालमसाला!) त्याने या कादंबरीत वापरले आहे. तिची लोकप्रियता दिवसेनदिवस वाढत गेली. प्रसिद्ध कादंबरीकार वॉल्टर स्कॉट, प्रसिद्ध मुत्सद्दी एडमण्ड बर्क, जर्मनीचा प्रसिद्ध कवि गटे यांच्यासारख्या मोठमोठ्या विद्वानांनी व ग्रंथकर्त्यांनी गोल्डस्मिथच्या या लहानशा कादंबरीची थोरवी गाईली आहे. युरोपातील दहा-बारा भाषांमध्ये त्या कादंबरीची भाषांतरे झाली आहेत व ती ते आपल्या त्यावेळच्या इंग्रजी शाळांतून मुलांनाही शिकवीतही असत.
   वाईकर भटजी ची गोष्ट त्या कादंबरीचे अनुकरण असले तर या कादंबरीतले वातावरण त्या काळातील महाराष्ट्रातील सनातनी ब्राह्मण कुटुंबातील आहे. वस्तुत: मुळातल्या बहुतेक गोष्टी यात नाहीत असे म्हटले तरी चालेल. साम्य आहे ते चार्ल्स प्रिमरोज व वाईकर भटजी या दोन व्यक्तिरेखांच्या धाटणीत. दोघेही सारखेच सत्वशील दाखविले आहेत. दोन्ही कादंबऱ्यातील इतर पात्रेही त्या त्या जातकुळीचीच वाटतात. प्रत्यक्षात एक ख्रिश्चन कुटुंब व त्याचा सगळा गोतावळा, 18 व्याच शतकातल्या सनातनी, कर्मठ व कर्मकांडातच ग्रस्त व व्यस्त असलेल्या ब्राह्मणी परिवेशात आणणे ही गोष्ट तेव्हा काय किंवा आताही काय साधी सोपी नाही/नव्हती. मूळच्या कादंबरीत ३२ प्रकरणे आहेत. वाईकर भटजीने हा पसारा फक्त ११ प्रकरणात उरकला आहे. मूळचा इंग्लिश भटजी आपली बायको, आपले कुटुंबीय आपली परिस्थिती चटकदार शब्दात पण थोडक्यात मांडतो आहे. तर आपल्या वाईकर भटजीला हा आटोपशीरपणा मानवत नाही. तो पहिल्या प्रकरणाचा बराचसा भाग आपल्या ‘गुणवती व समजूतदार’ गृहिणीचे शब्दचित्र रेखाटण्यातच खर्ची घालतो. हा हळवेपणा केवळ त्याचाच आहे. पुढे वडील मुलगा गोविंदा ऊर्फ बाळा, दोन मुली आवडी व बगडी यांच्या लग्नासंबंधाची हकीकत 18 व्या शतकातील ब्राह्मण कुटुंबातील वाटावी अशी सांगितली आहे.हेही वेगळ्याच जातकुळीचे आहे.  इंग्लिश भटजीस चार मुलगे व दोन मुली अशी सहा मुले होती, तर वाईकर भटजींस पाचच अपत्ये-तीन मुलगे व दोन मुली अशी संतती होती,  इंग्लिश खेडे - वाई, डॉ. चार्ल्स - त्रिंबकभटजी,  ऑलिव्हिया व सोफिया - आवडी व बगडी. डॉ. प्रिमरोझची बायको डेबोरा- वाईकर त्र्यंबक भटजीची अर्धांगिनी अन्नपूर्णाबाई, हे सारखेपण जरी आपसुकच समोर येते.
  वाईकर भटजीचे वेगळेपण
  तरी या नंतर मात्र वाईकर भटजी ही स्वतंत्र कलाकृती वाटते. हे प्रतिबिंब असेलही. नव्हे ते तसे आहेच.पण मूळच्या बिंबाशी आपल्याला काय करावयाचे आहे? वाईकर भटजी ही एक स्वकपोलकल्पित गोष्ट आहे असे का न समजावे? तिचे कथानक कसे आहे, ते कितपत मनोरंजक आहे,  कादंबरीची भाषा कशी आहे, त्यातले व्यक्तिचित्रण कितपत जिवंत वाटते, याच मुख्य बाबी नाहीत का? पण मग समीक्षक, पुस्तक परीक्षक व टीकाकार  यांनी दुसरे करायचे तरी काय? व्हिकार व भटजी यांच्या दोघांच्याही संसारयात्रेचे कथन बोधप्रद तसेच मनोरमही आहे. कर्तासवरता मुलगा म्हणून ज्याच्याकडे अन्नपूर्णामाता मोठ्या आशेने पाहत होती, जुन्या काळची एखादी राधा (अन्नपूर्णा) असो वा आजची अनुराधा, या दोघींचाही जीवित हेतू एकच असतो. मुलाच्या यशात त्या आपले यश पहात असतात. अशा स्थितीत हातातोंडाशी आलेला आपला गोपाळा ख्रिस्ती होणार, हे जेव्हा त्या माउलीला/अन्नपूर्णेला कळते, तेव्हा ती जो टाहो फोडते, आकांत मांडते, त्याची काव्यगत यत्ता जशी श्रेष्ठ प्रतीची आहे तसाच तिचा वाचकाच्या अंत:करणात उमटणारा प्रतिध्वनीही तेवढाच हृदय पिळवटून टाकणारा असतो. हे वाईकर भटजी या कादंबरीच्या यशाचे मुख्य मर्म आहे.
 आस्वाद तेव्हाचा व आताचा
 वाईकर भटजी हे आम्हाला मॅट्रिकच्या परीक्षेला शीघ्र वाचनासाठी ( रॅपिड रीडिंग) होते. तेव्हा ते एका इंग्रजी कादंबरीचे भाषांतर आहे, एवढेच ऐकून होतो. आज या वयात हा धनुर्धारींचा (रामचंद्र विनायक टिकेकर) भावानुभव श्रेष्ठ की आॅलिव्हर गोल्डस्मिथची मूळ कादंबरी, हा मुद्दा अप्रस्तुत वाटतो. कारण हॅट व विजारीऐवजी धोतर व शेंडी असा बदल, एवढाच फरक या दोन कादंबऱ्यात नाही. भावानुवादाची जातकुळी वेगळीच असते, अनुवाद हा त्याच्या पासंगालाही पुरणार नाही, हेच खरे नाहीका?

No comments:

Post a Comment