Friday, May 4, 2018

कर्नाटकात कसलेल्यांच्या कसरती

कर्नाटकात कसलेल्यांच्या कसरती
वसंत गणेश काणे,     बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 
नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०    
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee?  
  कर्नाटक या शब्दांचा अर्थ आहे श्रेष्ठ राष्ट्र! म्हणजे मोठे राष्ट्र म्हणजेच महा(न)राष्ट्र! कर्नाटक व महाराष्ट्र ही दोन राज्ये केवळ विठ्ठलभक्तनेच जोडली  गेली आहेत असे नाही तर या दोन राज्यात नामसादृश्य सुद्धा आहे. अशा दोन समान अर्थाच्या नावाच्या राज्यांपैकी कर्नाटक राज्यात 2018 सालच्या मे महिन्यातील 12 तारखेला राज्यभर एकाच दिवशी निवडणूक तर 15 तारखेला निकाल असा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे.
2013 ची पक्षनिहाय स्थिती
कर्नाटक विधान सभेत 224 जागा आहेत. काॅंग्रेस 122; जनता दल(एस) 40;  भाजप 40;  येदुरप्पांचा कर्नाटक जनता पक्ष 6; इतर 16. असे सध्या पक्षांचे बलाबल आहे.
1) काॅंग्रेसने 122 जागा व 37% मते मिळवून 2008 च्या तुलनेत  42 जास्त जागा व 1.8 % अधिक मते मिळविली.
2) जनता दल(एस)ने 40 जागा व 20 % मते मिळवून 2008 च्या तुलनेत 12 जास्त जागा व 1.1 % अधिक मते मिळविली.
3) भाजपने 40 जागा व 20 % मते मिळवून 2008 च्या तुलनेत 70 कमी जागा व 13.9 % कमी मते मिळविली.
4) कर्नाटक जनता पक्षाने 6 जागा व 9.8% मते मिळविली. (2008 मध्ये येदुरप्पा भाजप मध्ये होते, आता पक्ष भाजपमध्ये विलीन)
5) इतरांनी 16 जागा व 13.2 %मते मिळविली.
 लिंगायत धर्माचे राजकारण - आजवर भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आलेले दक्षिणेतील एकमेव राज्य असे कर्नाटकाचे वैशिष्ट्य आहे. तसेच कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाची राजवट आरोपांच्या घेण्यात सापडली होती, हेही खरे आहे. सध्या काॅंग्रेसचे शासन देशातील चारच राज्यात असून पंजाब व कर्नाटक ही त्यात दोन मोठी राज्ये आहेत. काॅंग्रेसला या राज्यातील आपली सत्ता टिकविण्यासाठी कोणत्याही टोकाला जाण्यात संकोच वाटू नये, हे सहाजीकच आहे. म्हणूनच लिंगायत समाजाला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्याची शिफारस काॅंग्रेसने दुसऱ्यांदा केली आहे. चार वर्षांपूर्वी अशीच शिफारस काॅंग्रेस सरकारने केंद्राकडे केली होती. तेव्हा दिल्लीत मनमोहनसिंगांचे सरकार होते. त्या सरकारने ही शिफारस तेव्हाच फेटाळली असूनही आता केंद्रात मोदी सरकार असल्यामुळे त्याला अडचणीत टाकण्याचा हा काॅंग्रेसचा हा डाव आहे, हे उघड आहे. जी शिफारस केंद्रात काॅंग्रेसचे शासन असतांना नाकारली गेली होती, तीच शिफारस आज कर्नाटकातील काॅंग्रेस पक्ष कशी काय करीत आहे? पण जनतेची स्मरणशक्ती अल्पजीवी असते, असे म्हणतात. त्यामुळे हे सत्य काॅंग्रेसला अडचणीचे ठरू नये, असा काॅंग्रेसचा कयास असावा.
 खरे लक्ष्य 2019-  कर्नाटक राज्यात यश मिळाल्यास काॅंग्रेस पक्षात उत्साहाचे वातावरण निर्माण होईल. 2019 मध्येच म्हणजे वर्षभरातच लोकसभेच्या निवडणुकी आहेत, हे लक्षात घेतले म्हणजे या विजयाचे काॅंग्रेसला किती महत्त्व आहे, ते लक्षात येईल. विरोधी पक्षांची एकच मोट मोदींविरुद्ध बांधण्याचा खटाटोप सुरू आहे. त्यातही सळसळ निर्माण होण्यास कर्नाटकातील काॅंग्रेच्या विजयाचे साह्य होणार आहे, हेही लपून राहिलेले नाही. 
देवेगौडांची भूमिका किंगमेकरची की स्वत: किंग होण्याची? - कर्नाटकात व्होकलिंग हा दुसरा एक जागृत समाज असून तोही संख्याबळात लिंगायत समाजाच्या बरोबरीचाच आहे. माजी पंतप्रधान एच. डी देवेगौडा (वय वर्ष 85) व त्यांचे चिरंजीव कुमारस्वामी (वय वर्ष 59) हे जनता दल (एस) चे सर्वेसर्वा आहेत. त्यांनी गेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाइतक्याच म्हणजे 40 जागा जिंकल्या होत्या. त्यांना सारखीच म्हणजे 20 टक्के मतेही मिळाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्वर्यू शरद पवार (वय वर्ष 77) कर्नाटकात जाऊन माजी पंतप्रधान एच. डी देवेगौडा यांचे कान भरून आले आहेत. भारतीय जनता पक्षाने तडजोडीचा प्रस्ताव ठेवला तर बळी पडू नये, असा कानमंत्र त्यांनी जनता दल (एस) ला दिला आहे. ते स्वत: किंग, निदान किंगमेकर तरी नक्कीच बनू शकतात, हे त्यांच्या मनावर बिंबवण्यात हा शहाणा राजा यशस्वी झाला आहे. जनता दल (एस) ची पहिली यादीच 126 उमेदवारांची आहे. यावेळी मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने जनता दल (एस) शी युती केली आहे. गेल्या निवडणुकीत 175 जागा लढवून 174 जागी अनामत रक्कम गमावून व 1 टक्यापेक्षाही कमी मते मिळविणाऱ्या बहुजन समाज पक्षाने यावेळी शहाणपणाचा मार्ग स्वीकारलेला दिसतो आहे. तीच गत समाजवादी पक्षाची म्हणावी लागेल. पण गेल्यावेळी या पक्षाला एक जागा मिळाली होती. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम या पक्षाने मुस्लिम मते खेचण्याचा प्रयत्न केला होता. पण मतविभाजनाचा लाभ भारतीय जनता पक्षाला मिळू नये म्हणून एमआय एमने आपले उमेदवार उभे न करता जनता दल (एस) ला पाठिंबा दिलेला आहे.
 नक्की खरी आकडेवारी कोणती? - कर्नाटकात लिंगायत व व्होकलिंग यांची संख्या अनुक्रमे 15 व 17 टक्के आहे असे मानले जायचे. पण कर्नाटकचे मुख्य मंत्री श्री सिद्धरामय्या यांनी वेगळीच आकडेवारी मिळविली आहे, असे म्हणतात. ही आकडेवारी अशी आहे.
लिंगायत - 9.65%; व्होकलिंग - 8.01%; कुरुबास - 7.11%; वाल्मिकी नायक - 5.4%; मडिगा - 5.4%; चालवदिस - 4.7%; एडिगा - 2.29%;  ब्राह्मण - 2.1%; शेड्युल्ड कास्ट (एकूण 180 उपजाती) - 17.7%; मुस्लिम - 12.27%; शेड्युल्ड ट्राईब (एकूण 180 उपजाती) - 6.8%. 
  मडिगा, शेड्युल्ड का स्ट व शेड्युल्ड ट्राईबमधील उपजातींवर भारतीय जनता पक्षाने लक्ष केंद्रित करून त्यातील प्रभावशाली व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. प्रत्येक जाती/उपजातीचे मठ व संस्थाने कर्नाटकातही आहेत, जशी ती देशभर आहेत/असतात, याची आठवण अनेकांना नसते/नाही. कर्नाटकही त्याला अपवाद नाही. कर्नाटकात तेलगू मतेही कमी नाहीत. 
तेलगू भाषिक अल्पसंख्यांक - टीडीपीच्या चंद्राबाबूंनी भारतीय जनता पक्षापासून फारकत घेतली आहे. म्हणून तेलगू भाषिक मतदारांची मते भारतीय जनता पक्षाला मिळावीत यासाठी शहांनी तोलामोलाच्या व्यक्तींवर जबाबदारी सोपवून स्वतंत्र योजनाच आखली आहे. बेल्लारी व आसपासचा भाग यादृष्टीने विशेष महत्त्वाचा आहे. यालाच म्हणतात मायक्रो प्लॅनिंग!
 अहिंदची तीनपेडी व्यूव्हरचना- हा (डावपेच) ही सिद्धरामय्या यांची खास खोज मानली जाते. या व्युव्हरचनेमुळेच त्यांना 2013 च्या विधानसभा निवडणुकीत यश मिळवून दिले होते असे मानतात. 2018 मध्ये सुद्धा हेच तारू काॅंग्रेसला तारेल, असे मानले जाते. पण अहिंद म्हणजे काय? (अ) म्हणजे अल्पसंख्यांक; (हिं) म्हणजे हिंदलीडवारू किंवा मागासवर्गीय; (द) म्हणजे दलित किंवा दलितारू.
 अशाप्रकारे कर्नाटकात लिंगायत, व्होकलिंग व अहिंद असे तीन गट मानले जातात. यापैकी कर्नाटकात अहिंद या नावाचा गट नव्याने प्रयत्न करून निर्माण केलेला गट आहे, असे मानतात. याचे श्रेय आज सिद्धरामय्या घेत असले तरी ही मोट मुळात आणीबाणीत श्रीमती इंदिरा गांधींनी बांधली असे मानतात.
 जातीपातीच्या राजकारणाला कर्नाटकात ऊत आला आहे. कर्नाटक राज्याची आणखीही एक वेगळीच मानसिकता आहे. इथे टिपू सुलतानचा जेवढा उदोउदो केला जातो तेवढा कृष्णदेवरायचा केला जात नाही. पण ही स्थिती फक्त कर्नाटकाचीच आहे का?
 कर्नाटकात तिरंगी सामने - अ) जनता दल (एस) चे हमखास यश देणारे ठरावीक मतदार संघ आहेत. इतर मतदार संघातही या पक्षाची हमखास मते आहेत. त्यांच्याआधारे देवघेव करून काही मतदार संघ पदरात पडतील किंवा कसे याचा ह्या पक्षाचा प्रयत्न आहे. त्रिशंकू स्थिती निर्माण झाली तर सत्तेच्या चाव्या आपल्या हाती रहाव्यात, यासाठी जास्तीतजास्त जागा मिळविण्यासाठी या पक्षाची धडपड आहे. देवेगौडा हे अतिशय चाणाक्ष नेते असून डावपेचातही तरबेज आहेत. कर्नाटकातील प्रत्येक मतदार संघाचा त्यांचा बारिक अभ्यास आहे.
ब) काॅंग्रेस एक मास बेस्ड पार्टी ? - मास बेस्ड पार्टी ही आजवर काॅंग्रेसची विशेषता राहिलेली आहे. तिचे प्रचाराचे मुद्दे व प्रचाराच्या पद्धती वेगळ्या असत. मात्र  काॅंग्रेस पक्षानेही बूथ कमेट्या स्थापन केल्या असून घरोघरी संपर्क साधण्याची योजना आखली आहे. निदान निवडणुकीपुरती तरी काॅंग्रेसने केडर बेस्ड पार्टी व्हायचे ठरविलेले दिसते. या प्रयत्नात काॅंग्रेसला कितपत यश मिळते ते यथावकाश दिसेलच. लिंगायतांची मते फुटून आपल्याकडे येतील व अहिंदची  (अल्पसंख्यांक, मागासवर्गीय व दलित) मते आपल्याकडेच कायम राहून आपल्याला बहुमत मिळवून देतील, असा त्या पक्षाला विश्वास वाटतो. उमेदवारीवरून निदान दहा मतदार संघात बंडखोरीची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत. सिद्धरामय्या ( वय वर्ष 70), खर्गे ( वय वर्ष76) व शिवकुमार (वय वर्ष 56) एकमेकांवर चिखलफेक करीत असून असंतुष्टांनी सिद्धरामय्यांना तघलगाची उपमा दिली आहे.
हे कोणते नवीनच पिल्लू?
 'स्त्रियांच्या समस्यांवर विश्वासार्ह उत्तर शोधण्यासाठी' महिला सक्षमीकरण पक्षाची/ महिला एम्पाॅवरमेंट पार्टीची निर्मिती नुकतीच म्हणजे नोव्हेंबर 2017 मध्ये झाली आहे. खरे पाहता सर्वच राजकीय पक्षांनी महिलांच्या प्रश्नांबाबत व 33 टक्के प्रतिनिधित्त्वाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. पण यासाठी घटना दुरुस्ती आवश्यक आहे व आरक्षणात आरक्षण असावे किंवा कसे यावर मतभिन्नता आहे. हे मुद्दे निकालात निघत नाहीत तोपर्यंत प्रत्येक पक्षाने किमान 33 टक्के महिला उमेदवार द्यावेत, यासाठी दबाव गट निर्माण करणे, हे महिलांच्या हिताचे पाऊल ठरले असते. पण तसे न करता महिला सक्षमीकरण पक्ष/ महिला एम्पाॅवरमेंट पक्ष  स्थापन करून काॅंग्रेसची मुस्लिम महिलांची मते कुजविण्याचा, हा भारतीय जनता पक्षाचा डाव आहे, असा काॅंग्रेसचा आरोप आहे. कर्नाटकात अमित शहा ठिय्या देऊन उगीचच बसलेले नाहीत, असे काॅंग्रेसचे मत आहे. तर हे काॅंग्रेसचेच पिल्लू असून भाजपकडे वळू शकणारी सुशिक्षित मुस्लिम महिलांची मते कुजविण्याचा हा डाव आहे, असे भाजपचे मत आहे. अशाप्रकारे भारतीय जनता पक्ष व काॅंग्रेस अशा दोघांनीही असा विश्वमित्री पवित्रा घेतला आहे. मुस्लिम मतदार, मुस्लिम उमेदवाराला नव्हे तर, भाजपला पाडू शकणाऱ्या उमेदवाराला मतदान करून डावपेचाचे मतदान (स्ट्रॅटजिक व्होटिंग) करतात, असाच अनुभव आहे. यावेळची वस्तुस्थिती 15 मे ला मतमोजणी नंतरच स्पष्ट होईल. 
 यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम या पक्षाने मुस्लिम मते खेचण्याचा प्रयत्न केला होता. आगामी निवडणुकीत कर्नाटकात एमआयएम वगळता एमईपी (महिला एम्पाॅवरमेंट पक्ष/ महिला सक्षमीकरण पक्ष)  आणि सोशल डेमॉक्रटिक पार्टी ऑफ इंडिया (एसडीपीआय) याच उद्देशाने निवडणूक लढविणार आहेत. कर्नाटकात मुस्लिम मते जवळजवळ 13 क्के आहेत. काॅंग्रेसने प्रत्येक जिल्ह्यात किमान एक मुस्लिम उमेदवार उभा करावा, असे केल्यास किमान 28 ते 30 मुस्लिम उमेदवार निवडून येतील, अशी मुस्लिमांची मागणी आहे. असे न झाल्यास सर्व मतदार संघात आम्ही निवडणूक लढवू, अशी धमकी त्यांनी दिली आहे. 224 पैकी निदान 100 मतदार संघात मुस्लिमांची मते इतकी आहेत की ती निवडणुकीच्या निकालावर परिणाम करू शकतील. त्यामुळे असे उमेदवार उभे झाले तर ते भारतीय जनता पक्षालाच सोयीचे ठरेल, असे काॅंग्रेसला वाटते. कदाचित भारतीय जनता पक्ष उत्तर प्रदेशाप्रमाणे स्वत: एकही मुस्लिम उमेदवार उभा करणार नाही. पण 100 मुस्लिम उमेदवार उभे राहतील, अशी व्यवस्था नक्की करू शकेल. महिलांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठीच एमईपी (महिला एम्पाॅवरमेंट पक्ष/ महिला सक्षमीकरण पक्ष) स्थापन झाल्याचे पक्षाच्या संस्थापक डॉ. नौहेरा शेख सांगतात. पक्षाच्या वेबसाइटवर 'मानवतेसाठी न्याय' अशी घोषणा आहे. 
क) प्रत्येक निवडणूक सारख्याच गांभीर्याने घेणारा भाजप -   भारतीय जनता पक्षाची निवडणूक मोहीम शहा व मोदी यांच्या दौऱ्यानंतर एक सुनियंत्रित, सुनियोजित व नेमकेपणाने सुरू आहे. या मोहिमेचे शिल्पकार अर्थातच अमित शहा आहेत. अहिंद म्हणजे अल्पसंख्यांक, मागासवर्गीय व दलितांची मोट ही खरेतर आवळ्याची मोट आहे. त्यात ताणतणाव आहेत. याला एक प्रभावी पर्याय देण्याच्या प्रयत्नात शहा आहेत. जनमानसात ज्यांची प्रतिमा प्रभावशाली आहे, अशा अहिंदमधील उमेदवारांनाही भारतीय जनता पक्षाने तिकिटे दिली आहेत. अशाच प्रकारच्या प्रयत्नाला उत्तर प्रदेशाच्या विधान सभेच्या निवडणुकीत मिळालेले आपण पाहतो आहोत. हा पर्याय निर्माण होण्यासाठी मोदींची जनमानसात असलेली प्रतिमा उपयोगी पडते. असे म्हणतात की, प्रत्येक जाती उपजातीत मोदींचा चाहता वर्ग असतोच. यांचा शोध घेऊन त्यांच्या एकजुटीचे काम शहा जाहीर सभा गाजविल्यानंतर सातत्याने  व शांतपणे करीत असतात. स्वतंत्र धर्माची मागणी करून सिद्धरामय्या भारतीय जनता पक्षाच्या मतपेढीला सुरुंग लावू पाहत आहेत. पण मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बुकानाकेरे सिद्दलिंगप्पा येद्दुरप्पा (वय वर्ष 75)लिंगायत समाजातील एक प्रभावी नेते आहेत. त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाची मतपेढी सुरक्षित राखण्याचा त्या पक्षाचा प्रयत्न आहे. दुसरीकडे शहा अहिंदला खिळखिळे करून नवीन मतपेढी बांधण्याच्या कामी लागले आहेत. पण बंडखोरीची लागण भारतीय जनता पक्षालाही झाली आहे. उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध झाली व आता बंडखोरीत आणखी वाढ होईल, अशी चिन्हे आहेत. बंडोबांचा थंडोबा करतांना नेत्यांच्या नाकी नऊ येत आहेत.
   कर्नाटकात भारतीय जनता पक्षाने 224 मतदारसंघनिहाय विचार करतांना जवळजवळ 70, 000 मतदान केंद्रांचेही (बूथ) तीन गटात वर्गीकरण केले आहे. पहिल्या गटातील बूथ वर बहुमत मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त असेल तर तिसऱ्या क गटातील बूथवर बहुमत मिळण्याची शक्यता कमीतकमी असेल, अशाप्रकारे हिशोब केला जाईल. दुसरा ब गट हा न इकडच्या, न तिकडच्या बाजूचा. या गटवारीमुळे प्रत्येक बूथवर करावयाच्या प्रयत्नांची दिशा निश्चित करण्यास मदत होणार आहे. पन्नाप्रमुखाच्याही पुढे टाकलेले हे बूथ स्तरावरचे पाऊल, ही कर्नाटक मधील भारतीय जनता पक्षाच्या योजनेची विशेषता असेल. प्रत्येक बूथवर मागासवर्गीय, महिला व दलित कार्यकर्ते असतील. ब गटातील बूथ अ गटात कसे येतील व क गटातले बूथ ब गटात कसे येतील यासाठी प्रयत्न केले जातील. मतदारांपर्यंत पोचण्यासाठीची भारतीय जनता पक्षाची योजना, व्यवस्था व रचना सर्वोत्तम असेल, यावर सर्वांचे एकमत आहे. नुकतेच राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून गेलेले व्ही. मुरलीधरन हे तसे केरळमधील भाजपचे कार्यकर्ते आहेत. ते सध्या कर्नाटकातही संयोजनाची धुरा सांभाळत असून, त्रिपुरात सुनील देवधर यांनी जसे काम केले, तसे कर्नाटकात करण्याच्या प्रयत्नात आहेत, असे म्हटले जाते. यावेळच्या लढती अटीतटीच्या असतील, असा बहुतेक निरीक्षकांचा अंदाज आहे. इतक्या की काही मतदार संघात तर ईश्वर चिठ्टी उचलून निकाल लावावे लागतील, अशीही शक्यता वर्तविली जात आहे. तटीय कर्माटक मात्र भारतीय जनता पक्षाचा बाले किल्ला आहे. इथे भारतीय जनता पक्षाला 19 पैकी 17 जागा मिळतील, असा पक्षाला विश्वास आहे.
    भारतीय जनता पक्षाची चौकट कर्नाटकात एक भरभक्कम चौकट मानली जाते. तिला मोदींची जनमानसातील प्रतिमा व शहा इफेक्टची साथ मिळून कर्नाटकात उत्तर प्रदेशाची पुनरावृत्ती होणार की, काॅंग्रेसच्या अहिंदला लिंगायतांची साथ मिळून काॅंग्रेस बाजी मारणार हे 15 मे 2018 लाच कळेल.


No comments:

Post a Comment