Sunday, May 6, 2018

सुरवात एका नव्या पर्वाची !

सुरवात एका नव्या  पर्वाची ! 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०   
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  भारत व चीन या दोन देशात स्नेह असावा, या दोन्ही महान देशांनी जागतिक राजकारणाला योग्य ती दिशा देण्यासाठी मिळून प्रयत्न करावेत, या व यासारख्या आकांक्षा उराशी बाळगून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पुढाकार घेऊन प्रयत्न केले व पंचशील सिद्धांत करार रूपात 1954 मध्ये आकाराला आला. 1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केल्यानंतर हा करार कागदावरच राहिला व ज्या कागदांवर हा करार लिहिला गेला असेल त्या कागदांच्या किमतीइतकीही किंमत या कराराला उरली नाही.
   नातवाचे प्रयत्न 
 पंडित नेहरूंचे नातू श्री राजीव गांधी यांनीही स्वत: पुढाकार घेऊन 1988 साली चीनशी संबंध सुधारावेत म्हणून प्रयत्न केले. सीमावाद परस्पर सौहार्द व सामोपचाराने सुटावेत, असा प्रयत्न करण्याचे उभयपक्षी मान्य करण्यात आले. पण याची फलश्रुती काय झाली, ते सर्वांना माहीत आहे. याशिवाय अरुणाचलचा वाद, दलाई लामांना भारताने दिलेला आश्रय, पाकिस्तानला भारताच्या विरोधात चीन देत असलेली साथ यासारखे प्रश्नही वेळोवेळी डोके वर काढीत ते वेगळेच.
  डोकलामचा तिढा 
 त्यातच डोकलामचे प्रकरण उद्भवले.तब्बल 73 दिवस भारत व चीनचे सैनिक अधूनमधून एकमेकांना ढकलाढकली व रेटारेटी करीत लढत होते. लढाई हा शब्दप्रयोग अनेकांना योग्य वाटणार नाही. कारण उभयपक्षी कोणीही गोळीबार किंवा तत्सम कृती केली नव्हती. पण याचे कारण वेगळे होते/आहे. चुकून कुणाच्या तरी हातून गोळी सुटली व यद्ध भडकले, असे होऊ नये म्हणून सीमेवर पहारा देणाऱे दोन्ही बाजूंचे सैनिक नि:शस्त्र असावेत असे ठरले होते. त्यामुळे ढकलाढकली व रेटारेटीला पर्यायच उरला नव्हता.
 अशी फुटली डोकलामची कोंडी 
 विश्वसनीय सूत्रांची माहिती अशी की डोकलामची कोंडी फुटण्याच्या प्रक्रियेची सुरवात जर्मनीत हॅमबर्ग येथे झाली. जी-२० बैठक सुरू होण्यापूर्वी जिथे शी जिनपिंग बैठक सुरू होण्याची वाट पाहत उभे होते, तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:हून चालत गेले. प्रत्यक्षदर्शी सांगतात की, मोदींना शी जिनपिंग यांना भेटायला अचानक समोर आलेले पाहून चिनी चमूला धक्काच बसला. असे जर झाले नसेल तर ती निदान भांबावलीच, असे म्हटले पाहिजे. ऐनवेळी व अल्पकाळ झालेल्या अनौपचारिक बोलण्यात मोदींनी झी जिनपिंग यांना, भारत व चीन यांनी नेमस्त केलेल्या दोन खास प्रतिनिधींनी - एनएसए अजित डोभाल व स्टेट काऊंसेलर यांग जिची यांनी- पुढाकार घेऊन डोकलाम येथील तणाव दूर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे सुचविले’. ‘डोकलाम सारख्या लहानशा मुद्यापेक्षा आपले राजनैतिक संबंध खूपच महत्त्वाचे आहेत’, असे मोदी जिनपिंग यांना म्हणाल्याचे वृत्त आहे. हे ऐकून आश्चर्यचकित झालेल्या शी जिनपिंग यांनी जवळजवळ अर्धा मिनीट विचार करून कदाचित थोड्याशा नाखुशीनेच संमती दिली. दोन्ही देशांच्या खास प्रतिनिधींनी भेटून उभयपक्षी एकमताचे मुद्दे सापडतात का ते शोधायचे काम या दोन खास प्रतिनिधींवर सोपवायचे ठरले. याची परिणीती डोकलामची कोंडी फुटण्यात झाली. 
  भेटीसाठी चीनचा पुढाकार
  26/27 एप्रिल 2018 च्या भेटीची पार्श्वभूमी कशी वेगळी आहे/ होती, हे समजून घेणे आवश्यक आहे. यावेळी पुढाकार चीनने घेतला आहे. राजीव गांधी यांना त्या वेळी (1988) चीनच्या दौऱ्यात मदत करणारा तरुण भारतीय अधिकारी हा सध्या भारताचा परराष्ट्र सचिव आहे. विजय गोखले हे त्यांचे नाव. आणखी एक योगायोग म्हणजे राजीव गांधी यांच्याप्रमाणेच नरेंद्र मोदी यांची चीन भेटदेखील निवडणूकपूर्व वर्षांतच होत आहे/झाली आहे. या दुसऱ्या पंचशीलचे सूतोवाच चीनने केले असून निमंत्रण यजमान या नात्याने चीनने दिले आहे. या भेटीअगोदर परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज व संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन या दोघी चीनला जाऊन आल्या आहेत. त्यांची समपदस्थांशी बोलणी झाली आहेत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल व परराष्ट्र सचिव श्री विजय गोखले यांच्या चीनला भेटीगाठी हा तर नित्याचाच भाग आहे.
 अगत्य! अगत्य!! अगत्य!!!
 चीनमधील वूहान शहरातील इस्ट लेक परिसरात एक ऐतिहासिक वास्तू आहे. माओ यांचे विश्रांतीसाठीचे हे आवडते स्थान आहे, असे म्हणतात. यात एकूण सात बैठकी झाल्या. पहिली बैठक मुळात अर्ध्या तासाची ठरली होती पण ती चांगली दोन तास चालली. या एकाच मुद्यावरून बैठकींची अनौपचारिकता लक्षात यावी. चीनने स्वत: या बैठकींचे वर्णन ‘हार्ट टू हार्ट’ चर्चा या शब्दात केले आहे.  ‘तू है वही, दिल ने जिसे अपना कहा’, हे ‘ये वादा रहा’, या चित्रपटातील गाणे ऐकतांना मोदींच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. यावरूनही बैठकींचे नियोजन करतांना किती बारिक तपशील लक्षात घेऊन अगत्यपूर्ण आखणी केली होती, हे लक्षात यावे. 
 भेटीची फलश्रुती काय?
  भारताचा चीनच्या महत्वाकांक्षी रस्त्याला (बेल्ट ॲंड रोड इनिशिएटिव्ह) विरोध आहे. पण तो मैत्रीच्या आड येणार नाही, असे चीनकडून सांगण्यात आले. अफगाणिस्तानमध्ये चीन व भारत एकत्र काम करून काही प्रकल्प पूर्णत्वाला नेतील,यावर एकवाक्यता झाली. ही पाकिस्तानला सणसणीत चपराकच आहे. पाकिस्तानची कड घेऊन भारताला अफगाणिस्तानमधील विकास कामांपासून दूर ठेवण्याची भूमिका चीनने आता सोडलेली लक्षात येते. 
 भारत व चीनच्या गस्ती तुकड्या अनेकदा समोरासमोर येऊन उभ्या ठाकतात व नंतर तणाव निर्माण होतो. अशावेळी तणतणत न बसता परिस्थिती कशी निवळेल, यासाठी प्रयत्न करावा, अशा आशयाच्या सूचना, उभयपक्षी आघाडीवरील सेनाधिकाऱ्यांना द्याव्यात व महोल बिघडणार नाही, अशी काळजी घ्यावी, यावर एकमत झाले व अशाप्रकारे सरहद्दीवर तणाव निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत, याला दोन्ही बाजूंनी मान्यता दिली; सीमेवरील चिनी सैनिकांनी हिंदी भाषा शिकावी व भारतीय सैनिकांनी चिनी भाषा (मेंडरिन) शिकावी कारण यामुळे परस्पर संपर्कात राहणे सहज शक्य व सोईचे होईल; सैनिकांजवळ शस्त्रे नसावीत, म्हणजे चुकुनही संघर्षाला वाव राहणार नाही; भविष्यात डोकलामसारखी प्रकरणे उद्भवणार नाहीत, याची काळजी घ्यावी; विश्वासाचे व सहकार्याचे वातावरण निर्माण होईल, असा प्रयत्न असावा;    आपापल्या लष्करासाठी व्युव्हात्मक मार्गदर्शक तत्त्वे दोन्ही देशांनी अमलात आणावीत; उभय देशांनी कृषि, तंत्रज्ञान, उर्जा व पर्यटन या क्षेत्रात परस्पर असलेले सहकार्य उत्तरोत्तर वाढवत न्यावे; भारत व चीन यातील व्यापार परस्पर हिताचा असावा, व्यापार व गुंतवणुकीत संतुलन साधावे; दोन्ही देश दहशतवादाला एकत्र विरोध करतील, तालिबान व हक्कानी नेटवर्कला आश्रय देऊ नये; नाथुला खिंडीतून मानस सरोवराची यात्रा पुन्हा सुरू व्हावी; सीमेवर ताण निर्माण होऊन वाद वाढण्याअगोदरच संवाद सुरू करावा; दोन्ही देशांच्या सैनिकांचे आजवर 6  मैत्रीपूर्ण सराव पार पडले आहेत, 7 वा संयुक्त सराव डोकलाम येथील 73 दिवसांच्या कोंडीमुळे (डेडलाॅक) होऊ शकला नाही, तो तर सुरू व्हावाच पण त्याचबरोबर  ताबा रेषेवरील दोन्ही देशांच्या तुकड्यांनीही एकत्र सराव करीत असावे; ताबारेषेवरील ताणतणावावर उपाय म्हणून व सामरिक बाबतीत आपापल्या सैनिकांना मार्गदर्शन करता यावे, असाही उद्देश समोर ठेवून दोन्ही देशात तात्काळ संपर्क यंत्रणा (हाॅट लाईन) सुरू करावी, हे मुद्दे फलश्रुती म्हणून सांगता येतील.
  चर्चेत न आलेले मुद्दे 
  पाकिस्तानमध्ये दडून बसलेल्या व भारताविरुद्ध सतत उचापती करीत असलेल्या मसूद अझरचा उल्लेख चर्चेत झाला नाही; भारताच्या न्युक्लिअर क्लब सदस्यतेला चीन सतत विरोध करीत आला आहे, त्याबद्दल कोणताही उल्लेख नाही; पाकिस्तानबाबतही कोणताही उल्लेख नाही; चीनला सार्क परिषदेची सदस्यता हवी आहे, यासाठी नेपाळ व पाकिस्तान चीनची सतत वकिली करीत असतात, पण भारताचा चीनच्या सदस्यतेला विरोध आहे, याबद्दलही कोणताही उल्लेख नाही; चीनच्या रस्तेबांधणी प्रकल्पाला जणू उत्तर म्हणून भारताने पुढाकार घेऊन आॅस्ट्रेलिया, जपान व अमेरिका यांच्यासह संयुक्त पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे ठरविले आहे, त्याबाबतही कोणताही उल्लेख नाही.
  काळाच्या उदरात दडलेली उत्तरे 
  भारत व चीन एकत्र येऊन सहकार्याने काम करू लागले तर ही जगातील जवळजवळ 40 टक्के लोकसंख्या होते. या मैत्रीमुळे जगात एककेंद्री नव्हे, द्विकेंद्रीही नव्हे तर बहुकेंद्री सत्तास्थाने निर्माण होऊ शकतील. पण याची जाणीव चीनला झाली असेल का? आपल्या देशाच्या सीमा सतत आपल्याला सोयीच्या होतील, अशाप्रकारे वाढवत न्यायच्या, ही चीनची सवय सुटेल का? भारताची सीमा ओलांडून सैनिक आत पाठवायचे व भारताने तक्रार करताच हा भाग मुळात आपलाच आहे, असा कांगावा करायचा, हे थांबणार आहे का? भारताचे लष्करी व आर्थिक सामर्थ्य चीनपेक्षा कितीही कमी असले तरी आजचा भारत वेगळा आहे, तो 1962 चा भारत नाही, हे चीनला समजले असणारच पण ते त्याला उमगणार का? 
   लद्दाख ते अरुणाचल प्रदेश अशा जवळजवळ 4000 किलोमीटर लांबीच्या सीमारेषेवर (ताबारेषेवर) दोन डझन जागा वादग्रस्त आहेत. दरवर्षी शेकडो वेळा चिन्यांनी सीमोल्लंघन(!) केल्याची उदाहरणे आहेत. एकमेकांचा पाठलाग करायचा नाही, असे ठरले असून सुद्धा प्रत्यक्ष ताबारेषेवर मात्र याचे पालन होताना दिसत नाही. निदान यापुढे तरी चिनी सैनिक सबुरीने वागतील का? संयम दाखवतील का? आपापल्या भूमिकेवर कायम राहतांनाही तणातणी टाळता येणार नाही का? ध्वज बैठकीत (फ्लॅग मीटिंग्ज) प्रत्येक पक्ष आपली बाजू मांडू शकतोच की. 
  चीनचे अमेरिकेशी बिनसले असून ते उत्तरोत्तर अधिकाधिक बिनसत जाणार आहे, एक मित्र म्हणून व संमृद्ध बाजारपेठ म्हणूनही भारतच भरवशाचा आहे, याची जाणीव चीनला झाली असेल का? या व अशा प्रश्नांची उत्तरे काळच देईल.
 सतत जागरूक व सावध असले पाहिजे 
 एकमेकांची मने जोडली जावीत यासाठी ही भेट होती. ती किती जोडली गेली याचे काही प्रमाणपत्र दिले जात नाही, चीनच्या बाबतीत तर ते मुळीच देता येणार नाही. ही भेट यशस्वी की अयशस्वी? ते काहीही असो, पण हा प्रयत्न निरतिशय सुंदर  होता. चीनमधील अंतर्गत संघर्ष आता संपला आहे. देशातील विरोधक नष्टप्राय झाले आहेत. विरोधकांना तोंड देता यावे म्हणून शी जिनपिंग यांना पूर्वी भारतावर गुरगुरणे भाग होते.पण आता ते अप्रिय निर्णय घेण्यास मोकळे आहेत. भारतातही आज पूर्ण बहुमत असलेले सरकार आहे. पण आजवरचा अनुभव पाहता सावध राहण्याची आवश्यकता आहे. या जगात टिकून रहायचे असेल तर सतत जागरूक व सावध असले पाहिजे. त्याला पर्याय नाही.

No comments:

Post a Comment