Monday, June 25, 2018

हे काय? प्रणवदा, तुम्हीसुद्धा?

हे काय? प्रणवदा, तुम्हीसुद्धा? 
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशात्र), एम.एड 
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, 
नागपूर ४४० ०२२ 
E mail - kanewasant@gmail.com 
Blog - kasa mee? 
  माजी राष्ट्रपती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्गाच्या समारोप कार्यक्रमाला येणीर हे कळताच वृत्तसृष्टीत अनेकांच्या प्रतिभेला घुमारे फुटू लागले आहेत. मुळात प्रश्न उपस्थित होतो तो हाही हा वार्तेचा विषय का व्हावा? ते एकेकाळी राष्ट्रपती होते म्हणून? ते एकेकाळचे काॅंग्रेस कार्यकर्ते होते, म्हणून? माजी राष्ट्रपतींनी देखील काही औपचारिक पथ्ये पाळावीत, अशी अपेक्षा असते, त्यांचे उल्लंघन झाले आहे का? 
 प्रणव मुखर्जींची सहा दशकांची राजकीय कारकीर्द कशी होती? भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून 2012 ते 2017 पर्यंत राष्ट्रपतीपदी विराजमान असलेल्या प्रणवदांचा जन्म 11डिसेंबर 1935 ला झाला होता. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते, भारत सरकारमध्ये अनेक मंत्रिपदे सांभाळणारे कार्यक्षम मंत्री म्हणून ते 2009 पर्यंत काॅंग्रेसचे समस्यानिवारक (ट्रबलशूटर) मानले जायचे. ते डाॅ मनमोहनसिंग मंत्रिमंडळात अर्थमंत्री होते.
 असे म्हणतात की, इंदिरा गांधी व नंतर राजीव गांधी  यांच्या हत्येनंतर त्यांना पंतप्रधानपद पक्ष देईल, अशी लोकांची अपेक्षा होती व खुद्द प्रणवदांनाही तसे वाटत होते, पण तसे झाले नाही. त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काॅंग्रेसही स्थापन केली होती पण राजीव गांधींनी त्यांची समजूत काढल्यानंतर 1989 मध्ये त्यांनी आपला पक्ष कांग्रेसमध्ये विलीन केला होता. पी व्ही नरसिंव्हराव यांनी त्यांना योजना आयोगाचे प्रमुख म्हणून 1991 मध्ये व परराष्ट्रमंत्रिपदाचा मान 1995 मध्ये दिला होता. 1998 मध्ये सोनिया गांधीचे अध्यक्षपदी आरोहण होतांना प्रणवदांची भूमिका प्रमुख होती, नव्हे हे घडवून आणण्याच्या कल्पनेचे व योजनेचेही ते प्रमुख शिल्पकार होते, असे मानले जाते.  2004 ते 2012 पर्यंत ते लोकसभेचे सदस्य व मंत्रिमंडळात क्रमांक 2 चे मंत्री होते. पण पंतप्रधानपदाची माळ डाॅ मनमोहनसिंग यांच्या गळ्यात पडली. यामुळे ते नाराज झाले पण तरीही पक्षनिष्ठेला जागून ते पक्षातच राहिले. न जाणो उद्या काही दगा फटका झाला तर काळजी घेतलेली बरी, या शहाणापोटी त्यांना राष्ट्रपतीपदी पिंजऱ्यात बंदिस्त करण्याचे कारस्थान शिजले, अशा वावड्याही त्यानंतर उठत होत्या आणि व्यवहारी प्रणवदांनी पळत्या पंतप्रधानपदाच्या नादी न लागता चालून आलेले राष्ट्रपतीपद स्वीकारले, असेही म्हटले जाऊ लागले.
  आता संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रणवदांनी उपस्थित राहण्याचे ठरवताच काहींची प्रतिक्रिया तर ‘ब्रूटस, यू टू!!’, अशी होती. सीझर विरुद्ध त्याचे सरदार बंड करून उठले होते. त्याबद्दल त्याला वाईट वाटले नव्हते पण ब्रूटस हा निष्ठावंत सहकारी व मित्रही त्यांना सामील झालेला पाहून सीझर उद्गरला होता, ‘ब्रूटस, यू टू?, ब्रूटस तू सुद्धा? देन फेल सीझर’. पण सध्या रिमोट, रिमोटदेशी असल्यामुळे त्यांनी स्वत:ला आवरले/सावरले असावे.
   त्यामुळेच वाटणारे आश्चर्य चेहऱ्यावरून पुसून त्यांनी, सिटिझन मुखर्जींना (ते ट्विटरवर आपला उल्लेख सिटिझन मुखर्जी असा करतात) चार शहाणपणाच्या गोष्टी ऐकवल्या असाव्यात. दीपराज तर म्हणाले, ‘काय ? लक्षात आहेना, संघ काय भयंकर चीज आहे ते? कायते त्यांचे संकुचित तत्त्वज्ञान! कायती जन्मजात असहिष्णुता!! कायती सेक्युलॅरिझमविरोधी भूमिका!!! प्रणवदा, तुम्ही त्यांना संकुचितता सोडून विशालता स्वीकारण्याचे, असहिष्णुता टाकून सहिष्णुता अंगी बाणवण्याचे, हिंदूंना वगळून इतर सर्वांना उरी कवटाळण्याचे कडू डोज पाजाच. हा काही संघाचा दसऱ्याचा मेळावा नाही. त्यात सामान्य स्वयंसेवक असतात. ही 600 मंडळी वेगळी आहेत. हेच संघाचे उद्याचे कर्ते धर्ते असणार! यात किती चहावाले असतील याचा काही नेम आहेका? एकानंच किती उच्छाद मांडलाय पहाता आहात ना?’
 प्रणवदांचे एकेकाळचे मंत्रिमंडळातील सहकारी पी चिदंबरम, त्यांची कन्या व दिल्ली काॅंग्रेस पक्षाची प्रवक्ती शर्मिष्ठा मुखर्जी व खाजगी सचिव यांच्या प्रतिक्रियाही लक्षात घेण्यासारख्या आहेत. चिदंबरम म्हणतात, ‘प्रणवदा तुम्ही तिथे जा, पण त्यांना त्यांचे तत्त्वज्ञान कसे चुकीचे आहे, ते समजावून सांगा, बरं का.’ शर्मिष्ठाबाई तर प्रश्न ऐकून भडकल्याच, ‘हा काय काॅंग्रेसच्या प्रवक्त्याला विचारायचा प्रश्न झाला? तुम्ही त्यांनाच जाऊन विचारा ना.’ प्रणवदांना, खाजगी सचिवांसारखे दुसरे कोण ओळखत असणार? ते म्हणाले, तुम्हाला वाटतं तसं ते काहीच बोलणार नाहीत. बघालच तुम्ही?.’
 एक वयाने व अनुभवाने ज्येष्ठ नेते बेरकीपणाने म्हणाले, ‘प्रणवदांची तब्येत ठणठणीत आहे. ते काय नागपूरच्या 50 डिग्री तापमानाची पर्वा करतात?’.
 एकाने आपली विषण्णता व्यक्त करीत म्हटले काय दैवगती आहे पहा. जो आता आता पर्यंत काॅंग्रेस कार्यकर्त्यांकडून  सेक्युलॅरिझमचे धडे गिरवून घेत होता, तो आता जातीयवाद्यांच्या जमावासमोर बोलणार आहे!’
 एक पत्रमित्राने परदेशात असलेल्या राहूलजींनाच आपलेपणाचा सल्ला दिला आहे. ते म्हणतात, ‘संघाकडे पाहण्याचा साम्यवाद्यांचा चष्मा टाकून द्या. त्यापायीच आज 44 वर आला आहात, हे विसरू का’.
  सर्वात जास्त खकाणा उडाला आहे तो साम्यवादी क्षेत्रात! संघ काय चीज आहे, ते माहीत असणाऱ्यांनी संघाच्या वाऱ्यालाही उभे राहू नये, असे त्यांना वाटत असते. कारण त्यांच्यावर इतरांच्या बोलण्याचा काहीही परिणाम होत नाही, असे त्यांचे ठाम मत आहे. पालथ्या घागरीवर पाणी घालण्यासारखे आहे ते. त्यातून तुमच्यानंतर सरसंघचालक बोलणार. याचा अर्थ काय? यदाकदाचित काही परिणाम झाला असेलच, तर तो साफ धुतला जाणार. जुने दाखले आहेत तसे.
 एकूण काय? प्रणवदा येणार आहेत. भाषण देणार आहेत. ते काय बोलणार, हे खुद्द त्यांच्याशिवाय दुसऱ्याकुणाला कसे माहीत असणार? पण तोपर्यंत वावड्या उडवायलाच हव्यात. रोजी रोटीका सवाल है भाई!

No comments:

Post a Comment