Monday, June 25, 2018

चि श्री प्रथमेश व चि सौ कां राधिका यासी,

श्री
चि श्री  प्रथमेश व चि सौ कां राधिका यासी,
अनेक शुभाशीर्वाद. आपल्या विवाह समारंभाचे निमंत्रण मिळाले. आपणाउभयतांचे वैवाहिक जीवन सुख, संमृद्धी आणि वैभवाचे जावो. विवाहसोहळा मौजेचा आणि आनंदाचा होवो. या आनंद्प्रसंगी काही विचार आपणासमोर ठेवण्याची अनुमती घेतो. हे विचार तसे आमचे नाहीत, ही गोष्ट प्रथमच सांगून टाकतो. आपल्या पूर्वजांनी/ ऋषीमुनींनी हे विचार संस्कृत मंत्रांच्या स्वरूपात पद्यात मांडले आहेत. कालमानानुसार हेच विचार आता गद्य स्वरूपात आणि मराठीत मांडले तर ते सहज आणि लवकर समजतील, असे वाटते. म्हणून नुसते ‘नांदा सौख्य भरे’, असे म्हणून आणि ‘वाजवा रे वाजवा’, अशी वाजन्त्रीवाल्याला सूचना देऊन मोकळे होताहोता, सवडीने हे विचार आपण उभयतांनी एकत्र बसून वाचावेत आणि त्यावर विचार करावा, अशी विनंतीवजा सूचना करीत आहोत. हे वाचून आपणाउभयतांना काय वाटले ते कळविण्याइतकी सवड काढणे शक्य झाले, तर आम्ही आपले विशेष आभारी होऊ.
विवाह समारंभ वैदिक पद्धतीने होणार नसणाऱ्याचे बाबतीतही हे विचार सार रूपाने लागू पडतील, असे त्यांचे स्वरूप आहे.
आता प्रत्यक्ष विवाह समारंभाकडे वळू या. 
साखरपुड्याचे वेळी म्हणतात, तुमचा हेतू एक असो, तुमची मते एक असोत, तुमची हृदये एकरूप असोत. तुमच्या सर्व संघटनास सामर्थ्य येईल, असे वागा.
‘तदेव लग्नं सुदिनं तदेव...’ ला सुरवात होताच एकच तारांबळ उडते. कारण मुहूर्त साधायचा असतो. या मंत्राचा अर्थ असा आहे. ‘हे लक्ष्मीपते, तुझ्या चरणांचे मी स्मरण करतो. हे स्मरण हीच उत्तम लग्नवेळ. हाच उत्तम दिवस. नक्षत्रे, चंद्र, विद्या आणि दैव यांची हीच अनुकुलता होय.
विवाहप्रसंगी वर म्हणतो, मी आकाश आहे, तू पृथ्वी आहेस. मी सामवेद आहे, तू ऋग्वेद आहेस. आपण एकमेकांवर प्रेम करू, एकमेकास शोभवू, एकमेकास आवडती होऊ, एकमेकांशी निष्कपटपणे वागून शतायुषी होऊ.
सप्तपदीचे वेळी वर म्हणतो, हे वधू, तू सासुसासऱ्यावर, नणदा, दीर, जावांवर प्रेमाची सत्ता चालवणारी हो.
गृह्प्रवेशाचेवेळी म्हणतात, हे वधू, तू या कुळात येत आहेस. येथे संतातीयुक्त होऊन तुला आनंद मिळो. या घरात खऱ्या गृहिणीची कर्तव्ये तू दक्षतेने पार पाड. येथे पतीसहवर्तमान आनंदाने रहा. तुम्ही या घरात बहूतकाळ राहून झालात, असे लोक म्हणू देत.
चाळणीने धान्य शुद्ध करून घेतात, त्याप्रमाणे या घरात शुद्ध, संयमपूर्वक वाणीचा उपयोग केला जातो. म्हणून थोरामोठ्यांची या घरात मैत्री जमते. अशी गोड भाषा बोलणाऱ्याचे जिभेवर लक्ष्मी वास करते. 
लग्न म्हणजे दोन हृदयांचे मीलन, मनांचे मीलन, एकमेकांची निर्मळ हृदयपुष्पे एकमेकास समर्पित करणे. अग्निभोवतीची सात पावले म्हणजे, जन्मोजन्मीच्या सहकाराची ग्वाही. पतिपत्नी सुखात वा दु:खात सदैव बरोबर असतील. बरोबर चढतील, बरोबर पडतील. 
भोवती सूत गुंडाळले म्हणजे काय? आता पतिपत्नींचा जीवनपट एकत्र विणला जाणार. ताणाबाणा एकत्र येणार. आता पृथक, अलग, वेगळे असे काहीही राहणार नाही. 
देहावर प्रेम असण्याने खरे प्रेम जडत नाही. आपण प्रारंभ देहापासून करू, पण देहातीत होऊ. माणूस अंगणातून ओसरीवर येतो, माजघरात येतो, मग देवघरात जातो. तसेच वधूवरांनी परस्परांच्या  हृदयातील देवघरात शिरले पाहिजे. पतीला पाहताच पतीतील दिव्यता पत्नीला जाणवावी, पत्नीला पाहताच ती पतीला देवता वाटावी.
माझ्या कुळात कोणी खोटे बोलणार नाही. माझ्या कुळात कोणी अपमान सहन करणार नाही, माझ्या कुळात अतिथीला नकार मिळणार नाही. अशा रीतीने कुळाची परंपरा आता पुढे चालवायची आहे.
विवाहाचे वेळी टाळी वाजवताच अंतरपाट दूर केला जातो. वधूवरात आता अंतर नको. आता जीवन एकरूप झाले. आता परस्परास शोभवू, संतोषवू. माझे ते तुझे आणि तुझे ते माझे.
वरातीचे वेळी सोळा दिव्यांनी ओवाळले जाते. झाल प्रत्येकाच्या माथ्याला लावली जाते. हे सोळा दिवे म्हणजे चंद्राच्या सोळा कला. चंद्राला मनाची देवता मानले आहे. चंद्राच्या मागे सदैव कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाचे शुक्लकाष्ठ लागलेले असते. चंद्र कधी अर्धा, कधी पाव तर कधी मुळीच नाही. आपल्या मनाचेही तसेच आहे. कधी अत्यंत उत्साही तर कधी अगदी निराश. कधी सात्विक वृत्तीने उचंबळलेले, तर कधी द्वेषमत्सराने बरबटलेले. तुम्हा वधूवरांच्या संबंधात मात्र या चंचल मनाचा पूर्णरीत्या विकास होवो. झालीतील झळाळणाऱ्या ज्योतीप्रमाणे तुमच्या आत्मचंद्राचा प्रकाश पडो. 
अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे. पुरुष कठोर असतो. स्त्री मृदू असते. पुरुषाने स्त्रीपासून मृदुता शिकायची. स्त्रीने पतीपासून कठोर व्हावयास शिकायचे. प्रसंगी मेणाहून मऊ तर जरूर तेव्हा वज्राहून कठोर होता आले पाहिजे. केवळ पुरुष अपूर्ण आहे. केवळ स्त्रीही अपूर्ण आहे. दोघांच्या गुणांच्या मीलनात पूर्णता आहे. गृहस्थाश्रम म्हणजे पतीपत्नींनी पूर्ण व्हायची शाळा. 
आपल्या विवाह संस्काराच्या वेळी म्हटल्या जाणाऱ्या मंत्रांचा अर्थ हा असा आहे. विवाह समारंभ नेहमीच घाईगर्दीत पार पडतो. त्यावेळी मंत्रांचा अर्थ कुणी सांगत नाही आणि सांगितला तरी तिकडे कुणाचे फारसे लक्षही नसते. अगोदर त्यांचा किंवा त्यातील प्रतिकांचा अर्थ कळला तर त्या सोहळ्याची गोडी अधिक वाढेल. नंतरही कळला तरी तो संपूर्ण सोहळा आपल्या डोळ्यासमोर पुन्हा उभा राहील आणि एक वेगळाच आनंद आपल्याला अनुभवाला येईल. पुन:प्रत्ययाचा आनंदही खूप सुखऊन जातो, असे म्हणतात.
आपल्या विवाहाचे निमंत्रण मिळाले. साधे शुभेच्छा पत्र पाठविण्याऐवजी हे लांबलचक पत्र पाठवीत आहे. कारण आपल्याकडील अगत्यपूर्वक पाठविलेले निमंत्रण मिळाले, त्याचवेळी एक सुखी दाम्पत्य भेटीला आले होते, त्यांना विवाह संस्काराचा अर्थ उमगला होता तसाच तो आपल्यालाही उमगावा म्हणून हा आपल्या परीने केलेला एक अल्पसा प्रयत्न आहे.
पुन्हा एकदा शुभेच्छा.
आपला स्नेहाकांक्षी 
वसंत काणे (वसंत काणे परिवाराच्या वतीने )
blog – kasa mee? asa mee? my experiences, observations and inferences
(0712)22216899422804430                                                               

No comments:

Post a Comment