Monday, November 26, 2018

प्रभावी नेतृत्वाच्या अपेक्षेत युरोप


प्रभावी नेतृत्वाच्या अपेक्षेत युरोप
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ,
नागपूर ४४० ०२२
 (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   युरोपात अनेक छोटीछोटी राष्ट्रे आहेत. या सर्वांचे मिळून एक संघटन उभारता आले तर घटक राष्ट्रे तर अधिक संमृद्ध होतीलच शिवाय जागतिक राजकारणात युरोप अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडू शकेल, या कल्पनेने युरोपियन युनियन उभारण्याच्या कल्पनेला बळकटी प्राप्त झाली. त्या दिशेने ब्रिटन, फ्रान्स व जर्मनी यांनी विशेष पुढाकार घेतला. पण मध्येच ब्रिटनचा विचार बदलला व त्याने युरोपियन युनियनमधून वेगळे व्हायचा निर्णय घेतला. हा प्रकार ब्रेक्झिट या नावाने विशेष परिचित आहे. ब्रिटनमधील लोकमत या प्रश्नाबाबत जवळजवळ दुभंगलेले आहे. पण आज ना उद्या ब्रिटन युरोपियन युनियनशी पूर्णपणे संबंधविच्छेद करणार, असे आजचे चित्र निर्माण झाले असतांनाच पंतप्रधान थेरेसा मे यांच्या सहकाऱ्यांनी राजीनामे देऊ केल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.
नजीकच्या काळातील पाश्चात्य नेतृत्व
    ब्रिटनमध्ये गेल्या काही वर्षात चार पंतप्रधान होऊन गेले आहेत. टोनी ब्लेअर (1997 -2007), गाॅर्डन ब्राऊन (2007-2010), डेव्हिड कॅमेराॅन (2010-2016) व थेरेसा मे (2016 ते आजपर्यंत) अशी या चार पंतप्रधानांची कारकीर्द आहे.
   फ्रान्समध्ये जॅक्वस चिराक (1974-1976 व 1986-1988 पंतप्रधान म्हणून आणि 1995 -2007 अध्यक्ष या नात्याने), निकोलस सारकोझी (2007-2012), फ्रॅंकाॅइस अोलांड (2012-2017, व  इमॅन्युएल मॅक्राॅन (2017 ते आजपर्यंत) अशी या चार नेत्यांची कारकीर्द आहे.
  अमेरिकेत जाॅर्ज बुश (2001- 2009), बराक ओबामा (2009 - 2017) व डोनाल्ड ट्रंप 2017 ते आजपर्यंत) अशी अध्यक्षीय कारकीर्द आहे.
 जर्मनीत अॅंजेला मर्केल (2005 ते आजपर्यंत) अशी एकटीची प्रदीर्घ कारकीर्द आहे. त्यांनी ब्रिटनच्या मार्गारेट थॅचर (1975 ते1990 अशी 11 वर्षांची कारकीर्द) यांनाही मागे टाकले आहे. तशी त्यांची कारकीर्द 2021 पर्यंत असणार आहे. 1982 - 1998 या प्रदीर्घ कालखंडात हेलमट कोल यांची 16 वर्षीय  अध्यक्षपदीय राजवट जर्मनीत होती. तसेच काॅनरॅड अॅडेनाॅवर यांनी जर्मनीचा कारभार अध्यक्ष या नात्याने 1942 ते 1963 या कालखंडात पाहिला होता. मग राहतो फक्त बिसमार्क ज्याचे जवळजवळ दोन दशकांचे आधिपत्य जर्मनीवर होते.
  शताब्दीच्या कार्यक्रमात मर्केल यांची निवृत्तीची घोषणा
  11 नोव्हेंबर 2018 ला पहिल्या महायुद्धाला संपल्याला 100 वर्षे झाली. त्या ऐतिहासिक महत्त्वाच्या दिनानिमित्त जगातील सर्व बडे नेते एकत्र आले होते. या दिवशी ॲंजेला मर्केल यांनी एक महत्त्वाची घोषणा केली ती अशी की 2021 मध्ये त्यांची चान्सेलरपदाची चौथी कारकीर्द संपेल आणि यानंतर त्या अध्यक्षपदासाठीच्या (चान्सेलर ) उमेदवार नसतील. त्यांच्या कार्यकाळात जर्मनीची भूमिका मवाळप्रकारची होती. हिटलरच्या एकहाती व हुकमशाही राजवटीच्या तुलनेत जर्मन राष्ट्राच्या मनोभूमिकेत झालेला हा बदल नजरेत भरणारा व लक्षणीय होता. हा बदल जसा जर्मनीसाठी महत्त्वाचा ठरला तसाच तो युरोपसाठीही महत्त्वाचा होता. नव्हे जागतिक राजकारणातही जर्मनीला एक नैतिक अधिष्ठान त्यांच्या कार्यकाळात प्राप्त झाले होते. पण जर्मनीला नेमस्तपणा मानवत नाही की काय कोण जाणे कारण जर्मनीत पुन्हा एकदा उग्रवादी डोके वर काढतांना दिसत आहेत. विशेषत: अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांच्यासारखा धसमुसळा गडी सत्तेवर आल्यानंतर तर जर्मनीचा मवाळपणा प्रकर्षाने जाणवू लागला होता.
  मर्केल पाश्चात्य जगातील सर्वात प्रभावशाली मानल्या गेल्या आहेत. विशेषत: ट्रंप यांचा अमेरिकेत उदय झाल्यानंतर या प्रश्नावर शंका उपस्थित करण्याचा प्रश्नच उरला नाही. जी 7 व युरोपियन युनियनमध्ये एक प्रभावी व समतोल विचार असलेली राष्ट्रप्रमुख या नात्याने त्यांची उपस्थिती सर्वात मोठ्या कालखंडाची गणली जाईल. जी7 मध्ये कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटाली, जपान, ब्रिटन, व अमेरिका ही राष्ट्रे येतात. जगातील 58 टक्के संपत्ती या राष्ट्रात एकवटली आहे, हे लक्षात घेतले म्हणजे या मुद्द्याचे महत्त्व स्पष्टपणे जाणवेल. ॲंजेला मर्केल युरोपियन युनियनमध्येही प्रभाव राखून आहेत.
   13 वर्षांची त्यांची जर्मनीच्या चान्सेलर या नात्याने पार पडणारी कारकीर्द टक्याटोणप्याची व चढउताराची राहिली आहे. या काळात 2008 मध्ये युरोपला महामंदीचा आघात सोसावा लागला, त्यांच्या कार्यकाळात अरब जगतात प्रचंड उलथापालथ झाली आणि तिथल्या निर्वासितांची त्सुनामी युरोपवर बरसली, रशियानेही क्रिमिया गिळला व युक्रेनवर चढाई केली. ही परिस्थिती युरोपियन युनियनसाठी अतिशय बिकट  होती/आहे. सध्या ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडतानाची क्लिष्ट प्रक्रिया पूर्णपणे पार पाडायची आहे. युरोपियन युनियनच्या पार्लमेंटच्या निवडणुकाही जवळ येऊन ठेपल्या आहेत. या निमित्ताने कुणीही अलबते गलबते नेतृत्व निवडून आलेले चालणार नाही. या काळात युरोपियन युनियनला मर्केल यांची कधी नव्हती एवढी आवश्यकता आहे. पण 2021 नंतर आपण पुन्हा निवडणूक लढणार नसून निवृत्त होणार आहोत, अशी घोषणा मर्केल यांनी केली आहे. त्यामुळे मर्केल यांची जागा घेऊ शकेल असा कर्तबगार नेता युरोपियन युनियनला लवकर मिळण्याची शक्यता नाही.
  मर्केल यांची जागा कोण घेणार?
  मर्केल यांची जागा घेऊ शकेल असा सौम्य प्रकृतीचा एकच नेता सध्यातरी समोर दिसतो आहे. तो आहे इमॅन्युएल मॅक्राॅन, नुकताच फ्रान्सचा अध्यक्ष म्हणून निवडून आलेला नेता. पण त्यांनाही मर्केल यांची अनुपस्थिती चांगलीच जाणवेल. कारण तसे ते नवीन आहेत. त्यांचे नेतृत्व खुद्द फ्रान्समध्येच सिद्ध व्हायचे आहे. पण त्यांच्या नेतृत्वाची ‘झलक’ दिसू लागली आहे. एक असे की, निवडून आल्याबरोबर त्यांनी जागतिक राजकारणावर लक्ष केंद्रित केलेले जाणवते. पहिल्याच वर्षात त्यांनी 25 पेक्षा जास्त देशांना भेटी दिल्या. जवळजवळ 70 दिवस ते प्रवसात होते. आपल्या पूर्वसुरींना त्यांनी या बाबतीत चांगलेच मागे टाकले आहे. ते मागे पडतात ते फक्त  भारताच्या नरेंद्र मोदींच्याच मागे. दुसरे असे की, रोखठोक भूमिका घ्यायला ते चुकत/ कचरत नाहीत. ब्रिटनचा युरोपियन युनियमधून बाहेर पडण्याचा निर्णय अनेकांना चुकीचा,दुर्दैवी वआत्मघातकी वाटतो. पण या वाईटातून एक चांगली घटना घडली ती ही की, फ्रान्सचे मॅक्राॅन व जर्मनीच्या मर्केल हे दोन नेते अल्पावधीतच वैचारिक पातळीवर एकमेकाच्या जवळ आले ते ब्रेक्झिटमुळेच. हे दोन नेते एका भूमिकेवर आल्यामुळे युरोपियन युनियनला एक प्रभावी नेतृत्व मिळाले आहे/होते. पण मर्केल यांच्या निवृत्तीमुळे मॅक्राॅन एकटे पडतील. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी वैचारिक पातळीवर दोन हात प्रथम कुणी केले असतील तर ते मॅक्राॅन यांनी. युरोपचे रक्षण करण्याच्या हेतूने स्थापन झालेली नाटो (नाॅर्थ अटलांटिक ट्रिटी आॅर्गनायझेशन) ही लष्करी संघटना अमेरिकेवर आर्थिक व अन्य मदतीमुळे बहुतांशी अवलंबून आहे. या मुद्याचा आधार घेऊन डोनाल्ड ट्रंप हडेलहप्पीपणा करू लागताच मॅक्राॅन यांनी संरक्षणासाठी अमेरिकेवर अवलंबून न राहता युरोपियन आर्मी उभारण्याची कल्पना त्यांच्या उपस्थितीत सर्वांसमोर मांडून डोनाल्ड ट्रंप यांची या विषयाबाबतची बोलतीच बंद केली. सुरवातीला  ट्रंप महाशय चडफडले, तणतणले व बेसुमार बडबडले सुद्धा! पण व्यर्थ!
   युरोप सध्या एका कणखर नेत्याच्या शोधात आहे. ही अपेक्षा पूर्ण करणाऱ्या मर्केल निवृत्त झाल्यावर ती जागा मॅक्राॅन नक्कीच भरून काढू शकतात. पण त्यांनी जागतिक राजकारणात प्रवेश केल्याला उणीपुरी 2 वर्षेच होत आहेत. ही त्यांच्या समोरची अडचण आहे. युरोपियन युनियनमध्ये 28 देश आहेत. सध्यातरी ही बजबजपुरीच आहे. ही सर्कस सांभाळण्याचे, माणसाळविण्याचे व हाताळण्याचे अवघड काम मर्केल व मॅक्राॅन ही जोडगोळी सांभाळत होती. मर्केल यांच्या राजकीय निवृत्तीनंतर मॅक्राॅन हे एकटे पडणार आहेत.
 मॅक्राॅन यांचे उजवेपण
   पण एका बाबतीत मॅक्राॅन हे मर्केल यांच्या तुलनेत उजवे ठरतात, ते असे. डोनाल्ड ट्रंप हे केव्हा व/वा कसे वागतील याचा नेम नसतो. एकदा तर त्यांनी मर्केल यांच्याशी हस्तांदोलन करण्यास नकार देऊन त्यांचा अभूतपूर्व असा अपमान केला होता. त्यानंतर अनेक महिने ही दोघे एकमेकांचे तोंडही पहात नव्हती. पण जागतिक राजकारणात अशी कट्टी कामाची नसते. मेणाहून मऊ व वज्रापेक्षा कठीण भूमिका प्रसंगोपात्त घेता आली पाहिजे. याबाबत मॅक्राॅन यांची भूमिका उठून दिसते. मॅक्राॅन सुद्धा डोनाल्ड ट्रंप यांना ठणकावण्यास मागेपुढे पहात नाहीत.पण त्यांनी डोनाल्ड ट्रंप यांचेशी संबंध तुटू दिले नाहीत. दोघेही एकमेकांना ओळखून आहेत, असे म्हणता येईल.
   हे जग कुणाही साठी थांबत नसते. आज ना उद्या मर्केल यांचा राजकीय सारीपटावरून अस्त होणार हे आता नक्की झाले आहे. काही काळ त्यांची अनुपस्थिती खटकेल व चांगलीच जाणवेलही. पण यथावकाश मॅक्राॅन मर्केल यांच्या अनुपस्थितीमुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढतील, असा राजकीय पंडितांना  विश्वास वाटतो. राजकारणात पोकळी फारकाळ कायम राहत नाही. कुणीतरी/ कुणी ना कुणी ती भरून काढणारच. तो कुणीतरी मॅक्राॅनच असू शकतात, अशी आजची स्थिती आहे. कर्तृत्वाचे नाणे खणखणीत असेल तर नवखेपणाकडे दुर्लक्ष करून युरोपियन राष्ट्रे त्यांचा नेता म्हणून स्वीकार  का म्हणून करणार नाहीत?

No comments:

Post a Comment