Wednesday, November 28, 2018

वाटेवेगळी जपानी राजकन्या- आयको

वाटेवेगळी जपानी राजकन्या- आयको
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२   (०७१२)२२२१६८९ / ९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
    जपानमध्ये सम्राटपद वारसा हक्काने पुढील पिढीकडे जात असले तरी तो वारस पुरुषच असला पाहिजे, अशी तरतूद जपानच्या घटनेत आहे. राजपुत्र नरुहिटो यांना वारस म्हणून आयको नावाची मुलगीच असल्यामुळे घटनेतील तरतुदीनुसार ती सम्राटपदी विराजमान होऊ शकणार नव्हती. आयकोचा जन्म झाल्यावर घटनेत बदल करून आयकोला - एका स्त्रीला - राजसिंहासनावर बसवण्याची तरतूद करण्याचा विचार पुढे आला. यासाठी २००५ मध्ये शासनाने तज्ञांची एक समिती नेमून तिला याबाबत शिफारस करण्यास सांगितले. या समितीने घटनेत दुरुस्ती करण्याबाबत अनुकूल मतही दिले. पण दरम्यानच्या काळात आयकोला भाऊ मिळाला म्हणजे हिसाहिटोचा - सम्राटाच्या नातवाचा - जन्म झाला आणि घटना दुरुस्तीचा विचार मागे पडला तो पडलाच.
आयको हे नाव तिच्या जन्मदात्यांनी - आईवडलांनी- ठेवले आहे. परंपरेनुसार नाव ठेवण्याचा अधिकार सम्राटाचा असतो. पण तसे घडले नाही. कदाचित ही आयकोच्या भावी जीवनशैलीत होणाऱ्या परिवर्तनाची नांदी असावी.आयको या शब्दाचा अर्थ आहे, ‘दुसऱ्यांवर प्रेम करणारी व्यक्ती’! तिचे राजदरबारी नाव आहे, ‘तोशी’!! तोशी या शब्दाचा अर्थ आहे, ‘दुसऱ्यांचा आदर राखणारी व्यक्ती! प्रेम करणारी व्यक्ती’! तोशी ही राजदरबारी पदवी समजली जाते.
  आयकोचे शालेय कारकीर्द
   शालेय शिक्षण घेतांना आयको अनेक दिवस अनुपस्थित रहायची. कारण वर्गातील मुले तिला त्रास द्यायची. हा रॅगिंगचाच एक प्रकार म्हटला पाहिजे. या प्रकाराचा बभ्रा होऊ नये, म्हणून काळजी घेण्यात आली. पण म्हणतात ना, सगळे पत्रकार इथून तिथून सारखेच. त्यांनी या वार्तेचे ‘मूल्य’ जाणून तिला वाचा फोडलीच. पण पुढे सारवासारव करून हे प्रकरण आवरते घेतले गेले.
   जपानच्या घटनेनुसार जपानचा सम्राट राष्ट्राचे व जनतेच्या एकतेचे प्रतिनिधित्व करतो. कुटुंबातील इतर सदस्य समारंभात सहभागी होऊ शकतात, सार्वजनिक स्वरुपाच्या कार्यातही सहभागी होऊ शकतात. पण राज्यकारभारशी त्यांचा कोणताही संबंध असत नाही. सम्राटाची कर्तव्ये व अधिकार त्याच्या पुरुष वारसाकडे वारसा हक्काने संक्रमित होत असतात.
 जगातील सर्वात जुना राजवंश?
   सातत्याचा विचार आधाराला घेतला तर जपानी राजवंश जगातील सर्वात जुना राजवंश ठरतो. अशा 125 राजांची परंपरा ख्रिस्तपूर्व 660 वर्षे मागे नेता येते. अशा वंशाचे अखिहिटो हे वर्तमान सम्राट आहेत.
  पहिल्या 29 राजवंशाना आजच्या मानकानुसार पुरेसा पाठिंबा देणारे पुरावे उपलब्ध नाहीत. पण नंतरच्या 1500 वर्षापूर्वीपासूनचे पुरावे आजच्या मानकानुसारही पुरेसे ठरतात.
    राजवंशातील इतर सदस्य
    राजवंशातील एक घटक या नात्याने राजकन्या आयको कुटुंबातील इतर सदस्यांप्रमाणे समारंभात सहभागी होऊ शकत होती. तसेच सार्वजनिक स्वरुपाच्या कोणत्याही कार्यातही सहभागी होऊ शकत होती. प्रत्यक्ष राज्यकारभारशी मात्र तिचा कोणताही संबंध नसे. याचेही महत्त्व कमी मानले जात नसे. हा तिच्यासाठीचा एक बहुमानाचा विषय होता. पण तिने एका जनसामान्याच्या प्रेमात पडून त्याच्याशी विवाहबद्ध होण्याचा निर्णय घेतला व 12 आॅगस्ट 2018 ला साखरपुडा साजरा करून तो अं.शत: अमलातही आणला. या विधीला जपानमध्ये म्हणतात, ‘नोसाई नो गी’. प्रत्यक्ष विवाहाचा महूर्त होता आॅक्टोबर 2018 मधला. तोही आता संपन्न झाला आहे. त्यामुळे ती आता राजकुटुंबाची सदस्य राहू शकणार नाही.
    प्रेमाखातर प्रतिष्ठेचा त्याग
    आयकोने प्रेमाखातर आपल्या राजकीय किताबाचा त्याग केला आहे. सामन्यकुलातील महिलेने राजघराण्यातील पुरुषाशी विवाह केला तर तिचे राजप्रासादात स्वागत होत असते पण याउलट राजघराण्यातील स्त्रीने सामान्य पुरुषाशी विवाह केला तर तिला मात्र राजकिताबाचा त्याग करावा लागतो. ही प्रथा आता जपानी जनतेत चर्चेचा विषय झाली आहे. तिच्या प्रियकराचे/पतीचे नाव आहे, मोरिया. या दोघांच्या विवाहानंतर राजकुटुंबात आता 17 च सदस्य उरणार आहेत.आयको ही जपानचा सम्राट अकिहितोच्या चुलतभावची म्हणजेच दिवंगत राजे ताकामाडो यांची कन्या होय. तिनं ३२ वर्षांच्या केई मोरीयाची लग्नगाठ बांधली आहे. केई हा एका शिपिंग कंपनीचा - निप्पाॅन शिपिंगचा - कर्माचारी आहे. सोमवारी (२९ ऑक्टोबर) पारंपरिक जपानी पद्धतीनं या दोघांचा विवाहसोहळा टोकियो येथील पवित्रस्थानीपार पडला. लगेचच तिची सामान्य जपानी नागरिक म्हणून नोंदही करण्यात आली. तिला मतदानासकट सामान्य नागरिकाला असलेले सर्व अधिकारही प्राप्त होणार आहेत.
  जा मुली जा, दिल्या घरी…...
  सासरी जाण्यापूर्वी अगोदर आठ दिवसापूर्वीच आयकोने सम्राटांचा साश्रू नयनांनी निरोप घेतला होता.  जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी 1000 पेक्षा जास्त आप्तस्वकीय अगत्याने आले होते. यावेळी राजकन्येनं जपानचा पारंपरिक पेहराव किमोनो परिधान केला होता.
   आयकोला देणगी दाखल 7,80,000 पाऊंडही बहाल करण्यात आले आहेत.   तिला पूर्वीच्या राजकीय इतमामानाने जरी राहता येणार नसले तरी, पैशाची कमतरता पडू नये, यासाठी ही तजवीज करण्यात आली आहे. माको नावाची तिची बहिणी सुद्धा अशाच एका सामान्य व्यक्तीशी - की कोमुरोशी- 2020 मध्ये विवाह करणार आहे. तशी गेल्या तीन पिढ्यांपासून जपानमधल्या राजघराण्यातील सदस्यांना सामान्य व्यक्तींसोबत विवाह करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानुसार राजपदावरील कोणतीही व्यक्ती राजघराण्याव्यतिरिक्त जनसामान्याशी विवाह करू शकते. मात्र जर राजघराण्यातील स्त्रियांना असा विवाह करायचा असेल तर त्यांना मात्र राजपद आणि ऐशोआरामाचा त्याग करावा लागतो. आयको व मोरिया यांची भेट तिच्या आईनेच म्हणजे हिसाकोने करून दिली होती. पण त्यामागे त्या दोघांनी विवाह करावा, हा मात्र तिचा हेतू नव्हता. एका सामाजिक कार्यात ती दोघे सहभागी होणार होती. तशा आयकोची आई हिसाको व मोरियाची आई या एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. पण विहीणपणाचे नवीन नाते अनुभवायला त्या दोघीही आज जगात नाहीत.
   जपानी जनमानस अंतर्मुख झाले.
   केवळ पुरुषच सम्राटपद प्राप्त करू शकेल या प्रथेबाबत आता जपानमध्ये चर्चा व्हायला सुरवात झाली आहे. जपानी जनतेत एक वेगळ्याच प्रकारची शालीनता आढळून येते. बंडखोरी वगैरे सारखे तीव्र स्वरुपाचे मार्ग तिथे अनुसरले जात नाहीत. अत्यंत सुसंस्कृत पद्धतीने जपानी राजकन्या आपली वेगळी वाट अनुसरत आहेत. यात परंपरागत अन्याय्य प्रथेचा निषेध आहे पण तोही काहीशा  वेगळ्या प्रकारे. यामुळे जपानी जनमानस अंतर्मुख झाले आहे, यात मात्र शंका नाही.

No comments:

Post a Comment