Monday, February 17, 2020


    जगातील साथीचे रोग आणि रोगांच्या साथी
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर ४४० ०२२
९४२२८०४४३०  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   करोना व्हायरसच्या विद्युतवेगी संचारामुळे अख्खे जग हवालदिल झाले असतांना वैर विसरून परस्पर सहकार्याची भावनेला बळ मिळतांना दिसते आहे. तसेच या निमित्ताने मानवाच्या जुन्या स्मृतीही जागृत होणे सहाजीकच म्हटले पाहिजे. साथीच्या रोगांनी (एपिडेमिक/ व जागतिक स्तरावर असतात तेव्हा पेंडेमिक) यांनी जगाला अनेकदा ग्रासले आहे. कॅालरा, प्लेग, देवी आणि फ्ल्यू हे त्यातले काही प्रमुख रोग आहेत. यांनी आजवर निदान 10 वेळा तरी मानवाच्या जीवावर मोठ्या प्रमाणात घाला घातला आहे. जसे की, प्लेग 3 वेळा, कॅालरा 2 वेळा, फ्ल्यू 4 वेळा तर एड्स 1 दा अशा साथी विशेष गाजल्या आहेत. यात देवीचा उल्लेख नसला तरी तिचा मान फार मोठा आहे. गत 12,000 वर्षांचा इतिहास सांगतो की, निदान 50 कोटी लोकांचा तरी बळी या रोगाने घेतलेला आहे. देवीची लस निघाली आणि देवीने भूतलावरून काढता पाय घेतला आहेपण देवीचा विक्रम अजून तरी इतर कोणत्याही रोगाने मोडलेला नाही.
   लागणीची चढती कमान - चीनमधील करोना व्हायरसची जगाला सर्वात आधी माहिती देणाऱ्या डॉक्टरचा - ली वेनलियांगचा- करोना व्हायरसमुळेच अत्यंत दुर्देवी मृत्यू झाला आहे. चीनमधील वुहान शहरात करोना विषाणूचे रोगी दिसल्यानंतर बऱ्याच दिवसांनी म्हणजे 23 जानेवारी रोजी वुहान शहराबाहेर पडण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली. पण तोपर्यंत ५० लाख नागरिक शहराबाहेर गेले होते. करोना विषाणूने 8 फेब्रुवारी 2020 पर्यंत चीनमध्ये शंभरावर बळी घेतले असून संपूर्ण जगातील मृतांची एकूण संख्या 1000 च्या वर गेली आहे, तसेच ३७ हजारांबाबत रोगाचे निश्चित निदान झाले आहे. हॅांगकॅांग - 25, जपान - 96, सिंगापूर -  40, थायलंड - 32, दक्षिण कोरिया- 25, तैवान- 16, अमेरिका- 12, ॲास्ट्रेलिया - 14,  अशी 8 फेब्रुवारी पर्यंतची लागण झालेल्यांची आकडेवारी सतत वाढती आहे, तसेच नवीन देशातही या रोगाचा प्रवेश झाल्याचे/होत असल्याचे आढळून येत आहे.
   करोनाचा प्रसार - हा विषाणू कसा पसरतो याबद्दल सध्या दोन मते समोर आली आहेत. एक म्हणजे एयरोसोल ट्रान्समिशन म्हणजे हा विषाणू हवेत मिसळतो आणि श्वासोच्छवासामुळे याचा संसर्ग होत जातो.
  दुसरे मत असे आहे की, हा थेट संपर्क होऊन पसरतो. म्हणजे असे की,  जर बाधित व्यक्तीला शिंक किंवा खोकला आला, तर विषाणू जवळच्या श्वास घेणार्‍या व्यक्तीमध्ये तोंड, नाक, किंवा डोळे यांच्याद्वारे प्रवेश करतात.
  आस्था एकेकाची - भारताने चीनमधून आपले व मालदीवचे बहुतेक विद्यार्थी स्वदेशी आणले असून पाकिस्तानने म्हटल्यास त्यांनाही घेऊन येऊ असे म्हटले आहे. पण बांग्लादेशाच्या विमान कर्मचाऱ्यांनी मात्र चीनमध्ये जाण्यास सपशेल नकार दिला आहे. तर पाकिस्तानने आपल्या विद्यार्थ्यांच्या विनवणीला अजूनतरी प्रतिसाद दिलेला नाही. जगभरातून चीनला मदत देऊ केली जात असून पंतप्रधान मोदींनी शी जिनपिंग यांना सर्व प्रकारचे साह्य देऊ केले आहे. या साथीचा जगाच्या अर्थकारणावर विपरीत परिणाम होत असून पर्यटन क्षेत्राचे खूप नुकसान झाले आहे. रोगांच्या साथी व साथीचे रोग तसे आपल्याला नवीन नाहीत. याचे इसविसनाच्या प्रारंभापासूनचे तपशील उपलब्ध आहेत.
   ॲंटोनियन प्लेग या नावाच्या रोगाची साथ इसवि सन 165 साली आशिया मायनर मध्ये पसरली होती. आशिया मायनरमध्ये, इजिप्त, ग्रीस, अल्बानिया, मॅसेडोनिया, बल्गारिया, तुर्कस्थान, लिबिया, इस्रायल, लेबॅनॅाम आणि इटाली हे देश येतात. 50 लाखांचा बळी घेऊनच ही साथ शमली. साथ कशी पसरली, नक्की कारण कोणते होते ते शेवटपर्यंत कळलेच नाही. बहुदा हा देवी किंवा गोवर यांच्या सारखा आजार असावा. असे म्हणतात की, इसवि सन 165 साली मेसापोटेमियात लढायला गेलेल्या सैनिकांनी नकळत हा आजार युद्धावरून परत येतांना रोमला आणला. म्हणून बळींमध्ये रोमचेच 10% सैनिक होते. अज्ञान, उपायांबाबतची अनभिज्ञता यामुळे  उपाय फारसे करताच आले नाहीत. हा आजार आपोआपच, जसा आला तसा, जणू आपणहूनच शमला. यावेळी दररोज 5,000 माणसे दगावल्याचे दाखले सापडतात. शहरे व भूमध्यसमुद्राला लागून असलेल्या भूभागातील 40% लोक दगावल्यामुळे काही गावे तर ओसच पडली होती.
   गाठीचा प्लेग - प्लेगची रीतसर नोंद झालेली पहिली मुख्य साथ  बबॅानिक प्लेग किंवा गाठीच्या प्लेगाची असून ती  इसवि सन 541-542 साली युरोपामध्ये पसरली होती. या प्रकोपात युरोपची निम्मी लोकसंख्या म्हणजे 2.5 कोटी लोक प्राणाला मुकल्याची नोंद आहे. बायझॅंटाईन साम्राज्य, आणि भूमध्य समुद्राची बंदरे विशेष प्रभावी झाली होती. बायझॅंटाईन साम्राज्यात आजचे तुर्कस्थान, ग्रीस, इटाली, लिबिया, इजिप्त, इस्रायल, सायप्रस, बल्गॅरिया, सीरिया व मोरोक्को हे देश येत. जवळजवळ एक वर्षभर लोक भयभीत होऊन जीव मुठीत धरून जगत होते. मानवाची गाठीच्या प्लेगाशी पडलेली ही पहिली नोंद झालेली गाठ मानली जाते. यात काखेत व जांघेत गाठी येत असत.
    ब्लॅक डेथ - 1343 ते 1353 या प्रदीर्घ कालखंडात ब्लॅक डेथ नावाने कुप्रसिद्ध झालेला रोग हा सुद्धा गाठीचा प्लेगच होता. याने 20 कोट लोकांना यमसदनी पाठविले होते. या रोगाचे थैमान युरोप, आशिया आणि आफ्रिका खंडात तब्बल 10 वर्षभर कमीअधिक प्रमाणात सुरू होते. पहिला प्रादुर्भाव आशिया खंडात झाला होता. व्यापारी जहाजांवरील उंदरांच्या शरीरावर आढळणाऱ्या पिसवांमुळे (फ्ली) याची लागण झाली होती. सहाजीकच बंदरे व शहरे सुरवातीला बळी पडली. त्याकाळी (त्याच काळी कशाला, आजही स्थिती काही वेगळी आहे का?) शहरात आणि बंदरात  उंदीर व पिसवांचा सुळसुळाट असायचा. प्लेगच्या जंतूंची वाढ एवढ्या झपाट्याने झाली की अल्पावधीत  तीन खंड प्लेगने ग्रासले गेले. 11 वर्षे हे कांड सुरू होते.
   कॅालरा - भूतलावर आजवर 7 वेळा कॅालऱ्याचा प्रकोप झाल्याची नोंद आढळते. या रोगाने 10 लाख लोकांचा बळी घेतला आहे. 7 पैकी तिसरा प्रकोप 19 व्या शतकातला आहे. तो 1852 ते 1860 या काळात झाला होता. पहिल्या दोन साथींप्रमाणेच हाही भारतातून गंगेच्या त्रिभूज प्रदेशातून आशिया, युरोप, उत्तर अमेरिका आणि आफ्रिकेत पोचला होता. ब्रिटिश डॅाक्टर जॅान स्नोने लंडनमधील एका झोपडपट्टीतून मागोवा घ्यायला सुरवात करून कॅालऱ्याचे जंतू पाण्यातून पसरले होते, हे सिद्ध केले. पण तोपर्यंत ब्रिटनमधील 23,000 लोकांनी आपला जीव गमावला होता.
   फ्ल्यू 1889 ते 1890 सालचा -  या कालखंडात 10 लाख लोकांचा बळी घेणारा हा आजार एशियाटिक फ्ल्यू किंवा रशियन फ्ल्यू म्हणून ओळखला जातो. वैद्यकशास्त्रात थोडीशीच प्रगती झाली असल्यामुळे, हा व्हायरस एच3एन8 हा होता, हे बऱ्याच उशिराने कळले. पहिल्या  केसेस मे 1889 मध्ये एकमेकापासून दूर असलेल्या तीन निरनिराळ्या ठिकाणी आढळून आल्या होत्या. पहिली केस तुर्कस्थानमधील बुखारा इथली , दुसरी कॅनडामधील ॲथाबास्का इथली  तर तिसरी ग्रीनलंडमधली होती. 19 व्या शतकात पृथ्वीवरील जनसंख्या शहरी भागात वेगाने वाढत होती. यामुळे फ्ल्यूचा प्रसार वेगाने झाला आणि हाहा म्हणता जवळजवळ सर्व जगच आजारी पडल्यासारखे झाले. या काळात बॅक्टेरिॲालॅाजीचेही ज्ञान विकसित होत होते. एकूण 10 लाख लोकांचा बळी घेऊन 1890 मध्ये हा रोग विरला.
  कॅालऱ्याची मोठी साथ 1910 व 1911 मध्ये भारतातून जगभर पसरली होती. मध्यपूर्व, उत्तर आफ्रिका, पूर्व युरोप आणि रशियातही तिने कहर माजविला होता. ही अमेरिकेत सुद्धा पोचली होती. पण अमेरिकेला आता या रोगाच्या नियंत्रणाचे तंत्र कळले होते. त्यांनी बाधितांना इतरांपासून वेगळे (आयसोलेशन) केले. त्यामुळे फक्त 11च लोक प्राणास मुकले. 1923 पर्यंत जगात कॅालरा आटोक्यात आला होता. पण भारतात मात्र तो अधूनमधून तोंड वर काढीतच राहिला.
    1918 -1920 चा फ्ल्यू - अडीच ते 5 कोटी लोक या फ्यूच्या साथीने दगावले आहेत. हा सर्व भूतलावर पसरला होता. लागण तर जगातील एकतृतियांश लोकसंख्येला झाली होती. मृत्यूदर 10 ते 20 % टक्के होता. यातले निम्मे लोक पहिल्या आठवड्यातच गेले होते. या अगोदरच्या साथीत व या साथीत एक मुख्य फरक होता, तो हा की, अगोदरच्या साथीत किशोर, वयस्क आणि मुळातच अशक्त असलेले लोकच दगावयाचे. पण यात मात्र धट्टीकट्टी व निरोगी माणसेच मेली. मुलांच्या व अशक्तांच्या वाटेला हा फ्ल्यू गेला नाही. वास्तवीक पाहता मुलांची प्रतिकार शक्ती विकसित झालेली नसते तर अशक्तांची कमकुवत असते. या फ्ल्यूने जणू ठरवून, जगातील तरूण आणि कर्तबगार पिढीलाच आपले लक्ष्य केले होते.
   1956 ते 1958 चा एशियन फ्ल्यू ने 20 लाख लोकांचा बळी घेतला होता. याचे साक्षीदार आजही हयात असतील. याची लागण सर्वात अगोदर चीनमध्ये झाली होती. या फ्ल्यूचा विषाणू ‘ए’ गटातील एच2एन2  या उपगटात मोडत होता. चीनमधून याचा सुरू झालेला प्रवास सिंगापूर, हॅांगकॅांग मार्गे अमेरिकेत झाला होता. जागतिक आरोग्य संघटनेने मृत्यूंची संख्या 20 लाख निश्चित केली होती त्यापैकी 70,000 अमेरिकेतील होते. भारतातील कुन्नूर येथील पाश्चर इन्स्टिट्यूटच्या अहवालानुसार भारतात एक हजार लोक मृत्यू पावले होते व लागण 45 लाखापेक्षा जास्त लोकांना झाली होती. रोगावरील औषध तयार करण्यात आलेले यश, शाळा कॅालेजे, बाजार, चित्रपटगृहे बंद ठेवून संपर्काची शक्यता व प्रसंग कमी केल्यामुळे फारसा उपद्रव झाला नाही. दुसरे असे की, हा काय किंवा दुसरा कोणताही आजार, एकाकडून दुसऱ्याकडे जसजसा संक्रमित होत जातो, तसतशी त्याची तीव्रता कमी होत जाते तसेच लोकांमधली प्रतिकार शक्ती वाढत जाते, असे एक मत आहे.
  1968 सालचा हॅांगकॅांग फ्ल्यू - हा एच3एन2 व्हायरसमुळे झाला होता. पण हा सिंगापूर आणि व्हिएटनाममध्ये पसरायला 17 दिवस लागले. नंतर 3 महिन्यात हा फिलिपीन्स, भारत, ॲास्ट्रेलिया, युरोप आणि अमेरिकेत पोचला होता. याचा मृत्युदर कमी होता. तरी तो 10 लाखांना सोबत नेऊनच उसंत घेता झाला. यात खुद्द हॅांगकॅांगचेच 5 लाख लोक होते. हॅांगकॅांगची लोकसंख्या धाडकन 15% ने कमी झाली होती. पण लोकांची प्रतिकार शक्ती वाढली होती, शाळा महाविद्यालयांना सुट्या दिल्यामुळे संपर्क थांबला होत्या, वैद्यकीय ज्ञान व सोयीसुविधा वाढल्या होत्या, परिणामकारक ॲंटिबायोटिक लगेच उपलब्ध होत होते, यामुळे साथीच्या रोगाांचा प्रसार व लोकांमधली भीती कमी कमी होत गेली होती. आफ्रिका खंड मात्र सर्वात जास्त प्रमाणात बाधित झाला होता. कारण स्पष्ट आहे.
   एड्स व्हायरसचे तांडव- हे 2005 ते 2012 या काळात सुरू होते. यावेळी  3.5 कोटी लोक मृत्युमुखी पडले. 1976 मध्येच याची ओळख पटली होती व असुरक्षित संभोग हे एक महत्त्वाचे कारण असल्याचेही कळले होते. आजमितीला जवळजवळ 4 कोट लोकांना एड्सची बाधा झालेली आहे. जनजागृती व काहीशी प्रभावी उपचार पद्धती यामुळे हा हळूहळू नियंत्रणात येतो आहे. एड्सची लागण झालेले लगेच मरत नाहीत, त्यामुळे उपचार करण्यास वेळ मिळतो. त्यांचेही जीवन सुखदायी निदान सुसह्य व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  अज्ञानाचे अंधार युग जसजसे सरत गेले, ज्ञानाचा प्रकाश जसजसा फाकत गेला तसतसे रोगावर नियंत्रण करण्यात अधिकाधिक यश येऊ लागले आहे. आजचेच उदाहरण द्यायचे झाले तर ऑस्ट्रेलियातील अनिवासी भारतीय शास्त्रज्ञाने करोना विषाणूवर आपण लवकरच लस तयार करू, असा दावा केला आहे! नवीन विषाणू, नवीन लस!! पुन्हा एक नवीन विषाणू, पुन्हा एक नवीन लस!!! जीवन ऐसे नाव, ते हेच का?

No comments:

Post a Comment