Monday, February 24, 2020

दुंदुभी निनादणार, अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या!


 दुंदुभी निनादणार, अमेरिकन अध्यक्षीय निवडणुकीच्या!
वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड
एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022
94228 04430  
E mail - kanewasant@gmail.com
Blog - kasa mee?
   अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांची भारतभेट बरेच दिवस ताजीच असणार आहे. भारत आणि अमेरिका या दोन देशातील मैत्रीला नव्याने उजाळा देण्याचे दृष्टीने व विशेषत: व्यापाराला चालना देणारे नवीन आयाम जोडण्याचे दृष्टीने ही भेट उपयोगाची ठरो, अशीच सर्वसामान्य भारतीयांची इच्छा असणार, तर भारत व अमेरिका यातील व्यापार अमेरिकेसाठी अधिक फायदेशीर व्हावा, असा डोनाल्ड ट्रंप यांचा प्रयत्न असणार हेही तेवढेच स्वाभावीक असणार! तसेच या वर्षी अमेरिकेत अध्यक्षपदाची निवडणूक होते आहे. या भेटीचा उपयोग अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांची मते आपल्या अनुकूल व्हावीत, हा उद्देश या भेटीने साध्य होईल, अशी डोनाल्ड ट्रंप यांची अपेक्षा असल्यास आणि त्यासाठीच हा खटाटोप असल्यास, तेही चूक म्हणता यायचे नाही. अमेरिकेत होऊ घातलेली ही निवडणूक जगभरात एक औत्सुक्याचा विषय असते, तसेच या निवडणुकीच्या निकालाचा जागतिक राजकारणावरही परिणाम होत असतो.
निवडणुकीचे स्थायी वेळापत्रक
  अमेरिकेत अध्यक्षपदाची ही निवडणूक 2020 च्या नोव्हेंबर महिन्यातील पहिल्या सोमवारनंतरच्या पहिल्या मंगळवारी म्हणजे 3 नोव्हेंबरला होऊ घातली आहे. 2016 ची निवडणूक याच नियमानुसार 8 नोव्हेंबर 2016 ला घेण्यात आली होती. तर 2024 ची अध्यक्षपदाची निवडणूकही याच नियमानुसार  5 नोव्हेंबर 2024 ला होईल, हे आजच नक्की आहे. तसेच ही अध्यक्षपदाची निवडणूक दर चार वर्षांनी होत असते. आणि ते वर्षही समअंकी वर्ष असावे लागते. म्हणजे वर्षाचा शेवटचा अंक 0, 2, 4, 6, 8 यापैकीच कोणतातरी एक असतो. आजवर याच नियमानुसार अमेरिकेत 58 वेळा निवडणुकी झाल्या आहेत व घटनेतील तरतुदीत बदल झाला नाही तर पुढेही होत राहतील. महिना, वार आणि वर्ष यात बदल होणे नाही.
 तिकीट कुणाला?
  पक्षाचे तिकीट कुणाला मिळावे, हे अमेरिकेत पक्षाचा अध्यक्ष किंवा पक्षश्रेष्ठी ठरवीत नाहीत. मग ते पद कोणतेही असो. पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी स्पर्धा आयोजित केली जाते. त्यासाठी प्रत्येक पक्ष देशभरातील 50 राज्यातून प्रतिनिधी (डेलिगेट्स) निवडतो. राष्ट्रीय संमेलनात हे प्रतिनिधी आपापल्या पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवाराची निवड करतात. हेही प्रत्येक पक्षाला कायद्याने बंधनकारक आहे.
  अशाप्रकारे डेमोक्रेटिक पक्षाचे एकूण 4,763 डेलिगेट्‌स अगदी तळपातळीपासून वर निवडून आलेले असतील. अध्यक्षपदाची उमेदवारी मिळण्यासाठी यापैकी निम्मे अधिक एक म्हणजे 2,382 डेलिगेट्‌सचे मत मिळणेआवश्यक आहे तर रिपब्लिकन पक्षाचे एकूण 2,472 डेलिगेट्‌स असतील त्यामुळे उमेदवारी मिळण्यासाठी यापैकी याच नियमानुसार 1,237 डेलिगेट्‌सचे मत मिळणे आवश्यक आहे. फेब्रुवारीत सुरू झालेली ही प्रक्रिया जूनअखेरपर्यंत चालेल.
                                डेलिगेट निवडीच्या दोन पद्धती
अ) प्रायमरी पद्धती -  याचे दोन प्रकार आहेत.
1) ओपन प्रायमरी : यात पक्षाचे सदस्य नसले, तरीही सर्व मतदारांना भाग घेता येतो. म्हणजे रिपब्लिकन पक्षाचे समर्थक डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रायमरीमध्ये मतदान करू शकतात आणि डेमोक्रेटिक पक्षाचे समर्थक रिपब्लिकन पक्षाच्या प्रायमरीमध्ये मतदान करू शकतात व डेलिगेट्स निवडतात. हे डेलिगेट्स पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरवितात.
2) क्‍लोज्ड प्रायमरी : यात फक्त त्या पक्षाचे सदस्यच मतदानामध्ये भाग घेऊ शकतात.
 ब) कॅाकस पद्धती-   कॅाकस ही पक्ष समर्थक आणि सदस्यांची सभा असते. त्यांच्या पक्षातील पसंतीच्या उमेदवारास पाठिंबा दर्शवितात. प्रत्येक उमेदवाराला मिळालेल्या पाठिंबाची टक्केवारी काढली जाते आणि त्या टक्केवारीनुसार त्या राज्यातील डेलिगेट्‌सचे उमेदवारांमध्ये वाटप केले जाते.
  टिकेट किंवा जोडगोळी
   अध्यक्षपदाची उमेदवारी मिळालेला उमेदवार पक्षाशी सल्लामसत करून आपला उपाध्यक्षपदाचा साथीदार निवडतो. यांच्या जोडगोळीला टिकेट असे म्हणतात. 2020 च्या निवडणुकीत डेमोक्रॅट पक्ष व रिपब्लिकन पक्ष यांची टिकेट्स नक्कीच असणार आहेत. 2016 मध्ये डेमोक्रॅट पक्षाचे टिकेट होते हिलरी क्लिंटन व टिम केन तर रिपब्ब्लिकन पक्षाचे टिकेट हेते डोनाल्ड ट्रंप व माईक पेन्स. इतर पक्षांचीही टिकेट्स होती, पण ती असून नसल्यासारखीच होती. कारण ती निवडून येण्याची शक्यताच नव्हती. मतदाराला टिकेटची म्हणजे जोडगोळीचीच निवड करावी लागते. एक उमेदवार एका जोडीतला व दुसरा दुसऱ्या जोडीतला असे करता येत नाही. एकही जोडी पसंत नसेल तर मतदार स्वत: एक टिकेट (जोडगोळी) सुचवू शकतो. मतपत्रिकेवर तसे लिहिण्यासाठी रिकामा रकाना सोडलेला असतो. अर्थात अशी जोडी निवडून येण्याची सुतराम शक्यता नसते. पण हा अधिकार अमेरिकेची राज्यघटना मतदारांना देत असते, हे विशेष उल्लेखनीय आहे.
अमेरिकेतील राजकीय पक्ष
   अमेरिकन  राजकारणामध्ये डेमोक्रेटिक आणि रिपब्लिकन या दोनच प्रमुख राजकीय पक्षांचे वर्चस्व आहे. लिबर्टेरियन पक्ष, ग्रीन पार्टी व अन्य पक्ष यांच्या उमेदवारांना फारशी मते मिळत नाहीत. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप हेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार असतील  याबद्दल शंका नाही. पण डेमोक्रॅट पक्षात मात्र निरनिराळे उमेदवार जास्तीतजास्त डेलिगेट्स आपल्या बाजूने वळावेत यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यापैकी बर्नार्ड उर्फ बर्नी सॅंडर्स हे डेमोक्रॅट पक्ष पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील असून आजतरी ते अत्यंत प्रबळ दावेदार मानले जात आहेत. ज्यो बिडेन, तुलसी गॅबार्ड, एलिझाबेथ वॉरेन हेही बर्नी सँडर्स यांचे तगडे प्रतिस्पर्धी आहेत.
  बर्नी सॅंडर्स
  बर्नी सॅंडर्स हे एक स्वयंघोषित समाजवादी अमेरिकन असून आपली उमेदवारी म्हणजे अमेरिकेतील नव्या क्रांतीची सुरुवात असल्याचा त्यांचा दावा आहे. मुक्त भांडवलशाहीचा आणि पराकोटीच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा  पुरस्कार करणारा अमेरिका हा देश आहे. या देशात समाजवादी विचारांचा उमेदवार कसा काय? याचे कारण असे आहे की, अमेरिकेतील आर्थिक विषमता सध्या पराकोटीला गेली आहे. सॅण्डर्स हे शोषणाचा विरोध तसेच गरीब आणि मध्यमवर्गाचे कैवारी यादृष्टीने समाजवादी असले तरी ते डेमोक्रॅट पक्षात आहेत. उमेदवारांचा विचार करता सॅण्डर्स हे एक टोक आहे तर ट्रम्प हे दुसरे. भाषणे पाहिली तर हे दोघेही स्वत:ला मध्यमवर्गाचे, गरिबांचे कैवारी आपणच असल्याचा दावा करणारे आहेत. ट्रंप सप्तस्वरात ओरडणारे तर सॅंडर्स सौम्य व गोड भाषा बोलणारे. ट्रंप गोऱ्यांचे खास कैवारी तर सॅंडर्स सर्वसामावेशकतेचा पुरस्कार करणारे. एक टोकाचा उजवा तर दुसरा, थोडे डावीकडे वळा म्हणणारा. कालप्रवाह कुणावर मेहेरबान होईल? पण घोडा मैदान तसे अजून खूप दूर आहे.
इलेक्टोरल व्होट्स अध्यक्ष ठरवतील पॅाप्युलर व्होट्स नाही
  2016 मध्ये ठोकळमानाने 32 कोटी लोकसंख्येपैकी 21 कोटी मतदारातून 55.7% मतदान झाले होते. यावेळी अमेरिकन जनमत (पॅाप्युलर व्होट) हिलरी क्लिंटन यांच्या बाजूचे होते.  हिलरी क्लिंटन यांना 48.2 % मते (6,58,53,514) मिळाली होती. तर डोनाल्ड ट्रंप यांना 46.1  %मते ( 6,29,84,828) होती.  म्हणजे हिलरींना 28,68,686 मते जास्त मिळाली होती. पण निकाल पॅाप्युलर व्होट्सच्या आधारे लागत नाही. तो इलेक्टोरल व्होट्सच्या आधारे लागतो. डोनाल्ड ट्रंप यांना 304 इलेक्टोरल व्होट्स होती तर हिलरी क्लिंटन यांना 227 होती. पॅाप्युलर व्होट्स कमी असली तरी, 50 पैकी 30 राज्ये डोनाल्ड ट्रंप यांच्या बाजूने तर 20 राज्येच हिलरींच्या बाजूने होती. त्यामुळे डोनाल्ड ट्रंप विजयी झाले होते पॅाप्युलर व्होट्स व इलेक्टोरल व्होट्सचे गौडबंगाल हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. तो मुद्दाही यथावकाश समोर येईलच.

No comments:

Post a Comment