Monday, September 6, 2021

अफगाणिस्तानमधील सत्ताबदलाचे पडसाद वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? अफगाणिस्तानातील सध्याच्या घडामोडीतून जगभरातल्या दहशतवाद्यांचे मनोधैर्य उभारी घेणार आहे, हे स्पष्ट आहे. पण याचबरोबर किंवा याचमुळे काही जुन्या संघर्षांनाही उजाळा प्राप्त होणार आहे. या निमित्ताने अफगाणिस्तानप्रमाणे अमेरिकेवर भोळसटपणे विश्वास ठेवू नका, अशी मोहीम मध्यपूर्वेत जोर पकडतांना दिसते आहे. या मोहिमेचे नेतृत्व सध्यातरी इराण करतो आहे आणि या मोहिमेला जनमताचा उदंड प्रतिसाद मिळतो आहे, हे विशेष. इराक, सीरिया, लेबॅनॅान, येमेन आणि लीबिया यांची सगळी मदार अमेरिकेवर होती आणि आजही आहे. उज्वल भवितव्य आणि प्रगती यांच्या चाव्या अमेरिकेडेच आहेत, असे ते मानून चालले आहेत. अफगाणांनी हीच चूक केली आणि तिचे परिणाम आज ते लोक भोगताहेत, अशी टिप्पणी या 5 देशातील वृत्तमाध्यमातून प्रचार स्वरुपात केली जाते आहे. याच्यामागचा बोलविता धनी कोण आहे, ते न सांगताही कळण्यासारखे आहे. ‘हेचि फळ काय मम तपाला’, असे म्हणत कपाळावर हात मारण्याची पाळी अमेरिकेवर आली आहे. अफगाणिस्तानमध्ये एक नाही, दोन नाही, मोजून 20 वर्षे प्रयत्न केले, प्रचंड पैसा ओतला, आधुनिकतम शस्त्रास्त्रे पुरविली, 2,500 अमेरिकनांचा बळी दिला, 25,000 वर सैनिक जखमी झाले आणि शेवटी फलित काय, तर चढाईखोर तालिबान्यांसमोर घनी राजवट पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली. सशस्त्र सैनिक न लढता शरण गेले. ज्या घाईघाईने अमेरिका अफगाणिस्तानमधून बाहेर पडली आणि एकच गोंधळ उडाला त्यावरही या देशांमधली माध्यमे तुटून पडली आहेत. इराण तर बोलून चालून अमेरिकेचा वैरीच आहे. त्याची आणि इराणमधील माध्यमांमधली टीका बाजूला सारली तरी बाकीच्यांचे काय? तेही टीका करताहेत. अमेरिकेवर वचनभंगाचा आरोप आता यानंतरही अमेरिकेवर विश्वास ठेवायचा का, असा प्रश्न इराकमध्ये विचारला जातो आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये 2001 मध्ये प्रवेश केला होता. इस्लामिक स्टेट किंवा इसिस च्या पारिपत्यासाठी अमेरिका इराकवर 2003 मध्ये चालून गेली. तेव्हापासून ती तिेथे ठाण मांडून आहे. अफगाणिस्तानप्रमाणे इराकमधूनही अमेरिकन सैन्य परत गेले तर इस्लामिक स्टेट किंवा इसिस पुन्हा डोके वर काढणार नाही, याची काही हमी आहे का? इराकबाबत अमेरिकेची भूमिका नक्की काय असणार आहे? इराकमधून सैन्य परत घेऊ असे म्हणायला त्यांनी सुरवात तर अगोदरच केली आहे. या सर्वाचा एकच स्पष्ट अर्थ निघतो तो हा की अमेरिकेच्या विश्वसनीयतेला धक्का बसला आहे. दहशतवाद्यांची हिंमत वाढली तालिबान्यांच्या विजयामुळे सर्व दहशतवाद्यांचे मनोधैर्य वाढले आहे. तालिबानी सुन्नी तर आहेतच. त्याचबरोबर ते अतिकडवी देवबंदी विचारधारा मानणारे आहेत. त्यामुळे त्यांना सुन्नी तालिबान जिंकल्याचा आनंद होतो आहे, हे ठीक आहे. पण सर्वच दहशतवादी गटांना मग ते शिया असोत वा सुन्नी, सर्वांनाच निरतिशय आनंद झालेला आढळतो, ही बाब भविष्यात सर्व दहशतवादी गट एकत्र येण्याची नांदी तर ठरणार नाहीना, असे काही राजकीय निरीक्षकांना वाटते आहे आणि म्हणून ही चिंतेची आणि चिंतनाची बाब आहे, असे या निरीक्षकांचे मत आहे. तर ही घटना शिया आणि सुन्नी हो दोन्ही दहशतवादी गट एकत्र आल्याची सूचक नाही, असे इतर काहींचे मत आहे. इतकेच नव्हे तर सर्व सुन्नी दहशतवादी गटही एकत्र येण्याची सुतराम शक्यता यांना दिसत नाही. अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या विजयानंतर लगेच तुमची अमेरिकेबरोबर दोस्ती आहे आरोप करीत अमेरिकेला आणि तालिबानलाही धडा शिकवण्यासाठी इस्लामिक स्टेटचा खोरासन गट (इसिस-के) सिद्ध झाला आहे. त्याने काबूल विमानतळावर आत्मघातकी स्फोट घडवून आणले, हा मुद्दा हे निरीक्षक उदाहरणादाखल पुढे करतात. तर या संघटनेच्या दोन म्होरक्यांना अमेरिकेने नांगरहार प्रांतामध्ये नेमके हेरून ठार केले आहे. यापैकी एक इसिस-के प्रमुख अस्लम फारुकी होता. तसेच काबूल विमानतळाकडे निघालेल्या इसिस-के च्या आत्मघातकी हल्लेखोरांना वाटेतच गारद केले आहे. पण तालिबानींनी या घटनेचा निषेध केलेला नाही, हेही उदाहरण म्हणून पुढे केले जाते. तालिबानी आणि इसिस-के यातील संबंध भविष्यात कसे असतील याचा अंदाज यावरून करता येईल. खुद्द अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांना विरोध करण्यासाठी लोक ठिकठिकाणी रस्त्यावर उतरत आहेत. हा लढा जसा तालिबान्यांच्या विरोधातला आहे तसाच तो पश्तून वर्चस्वाविरुद्धही आहे. यात महिलाही आहेत, हे विशेष. पंजशीर खोरे तर तालिबान्यांशी निकराने लढते आहे. हे लोक सुन्नी असले तरी ताजिक वंशीय म्हणजे पश्तुनेतर आहेत. इराकी वृत्तसृष्टीतील बोलके व्यंगचित्र इराकमधील पॅाप्युलर मोबिलायझेन फोर्सेस हा एक लष्करी गट आहे. यांच्या वाहिनीवर अमेरिकेच्या अफगाणिस्तानमधून बाहेर पडण्याच्या निमित्ताने एक क्रूर विनोद केला आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्यंगचित्रात अमेरिकी विमानातून एक मनुष्य खाली पडतांना दाखविला आहे. काबुलमधून उडालेल्या विमानावर बसून प्रवास करताना पडलेल्या माणसाचा संदर्भ या व्यंगचित्राला आहे, हे स्पष्टच आहे. फरत एवढाच आहे की, विमानातून पडणाऱ्या माणसाला इराकचे पंतप्रधान मुस्तफा-अल-काधिमी यांचे नाव दिले आहे. मुस्तफा-अल-काधिमीला हा पॅाप्युलर मोबिलायझेन फोर्सेस आपला कट्टर शत्रू मानतात. त्याचे अमेरिकेशी विशेष स्नेहाचे संबंध असल्याचे मानले जाते. त्याच्या नशिबीही भविष्यात काय वाढून ठेवले आहे, ते हे व्यंगचित्र स्पष्ट करते आहे. कोणत्याही तर्कशुद्ध आणि तपशीलवार लेखापेक्षाही हे व्यंगचित्र अधिक परिणामकारक ठरते आहे. खरे इस्लामी कोण? अफगाणिस्तानमध्ये भविष्यात काय काय घडणार आहे, हे अजून कळलेले नाही. ते कळायला काही वेळ लागणार आहे. त्यामुळे तालिबान्यांचा अफगाणिस्तानमध्ये झालेल्या विजयाला आज मध्यपूर्वेत फक्त भावनिक महत्त्वच तेवढे आहे. पण आज ना उद्या अफगाणिस्तानमध्ये तालिबानी सरकार स्थापन होईलच. सुन्नींची सनातनी नीती प्रत्यक्षात उतरेल पण ती पुरेशी सनातनी नाही म्हणून इसिसचा खोरासन गट (इसिस-के) तालिबान्यांच्या विरोधात उभा राहील. तर ही मध्ययुगीन जुनाट रानटी राजवट आहे असे म्हणत महिला आणि तरूण पिढी तिचा विरोध करतील. पण काही जुने दाखलेही अंदाज बांधायला उपयोगी पडू शकतील. 1996 ते 2001 या काळात अफगाणिस्तानवर तालिबान्यांची सत्ता होती. या काळात शेजारी असलेला पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिरात हे तीनच सुन्नीबहुल देश असे होते की, त्यांनी अफगाणिस्तानशी राजनैतिक संबंध स्थापन केले होते. पुढे अमेरिकेने अफगाणिस्तानवर हल्ला केला तेव्हा मात्र यापैकी कुणीही अमेरिकेवर उघडउघड टीका केली नाही. तसेच पाकिस्तानच्या मूकसंमती आणि साह्याशिवाय अमेरिका पाकिस्तानमध्ये दडून बसलेल्या लादेनचा खातमा करू शकली असती का? 2001 नंतर मात्र सौदी अरेबिया आणि युनायटेड अरब अमिरात यांनी तालिबान्यांशी असलेले संबंध तोडले. पाकिस्तानने मात्र एकीकडे तालिबानशी संबंध कायम ठेवले आणि दुसरीकडे त्यांचा नेता लादेन याचा शोध घेण्याचे कामी अमेरिकेला गुपचुप मदतही केली. आज मात्र निवडून आल्यापासून आजपर्यंत बायडेन इम्रानखानांशी बोललेले नाहीत. पशू आणि पक्षांच्या लढाईतली वटवाघळाची नीती प्राण्यांप्रमाणे मानवांमध्येही यशस्वी झालेली दिसत नाही. यानंतर कतारने मात्र पुढाकार घेऊन तालिबान आणि अन्य यांच्यात यजमान या नात्याने चर्चा घडवून आणली. 2013 पासून तर तालिबान्यांच्या राजकीय मंडळाला यजमान या नात्याने स्थान देणारा कतार हा एकमेव देश ठरला. अमेरिकेसारख्या बड्या देशाचा पुढाकार आणि चीन किंवा रशिया सारख्या देशाची मूक संमती असल्याशिवाय कतारसारखे चिलूट ही हिंमत करणार नाही. इराण आणि अफगाणिस्तान इराण हा शियाबहुल देश आहे तर अफगाणिस्तान सुन्नीबहुल आहे. या दोन देशांना विभागणारी सीमारेषा फार मोठी आहे. शिया आणि सुन्नीमधून विस्तव जात नसला तरीही या दोन देशातील संबंध मात्र पूर्णत: वैराचे नाहीत तर संमिश्र स्वरुपाचे आहेत. मध्यपूर्वेतील घडामोडीच अशा घडत असतात की या प्रदेशातील देशांना ताठर भूमिका घेताच येत नाही तर ती लवचिकच ठेवावी लागते. अफगाणिस्तानमधले भांडण सुन्नी अफगाण सरकार आणि सुन्नीच असलेल्या तालिबान्यांमधले होते. शियाबहुल इराण दोघांशीही संबंध राखून होता/आहे. पण सुन्नी सौदी अरेबियाशी मात्र इराणचे जुळत नाही. अफगाणिस्तानमध्ये जेव्हा 1996 ते 2001 मध्ये तालिबान्यांची राजवट होती तेव्हा इराण तालिबान विरोधी नॅार्दर्न अलायन्सला पाठिंबा देत होता. नॅार्दर्न अलायन्स हे पश्तून जमात वगळून तयार झालेले अन्य बिगर पश्तूनजमातींचे संघटन होते. याचवेळी इराणची पडद्याआड अमेरिकेशीही चर्चा सुरू होती. विषय कोणता होता तर एकीकडे सुन्नी अल-कायदाला पायबंद घालणे आणि अफगाणिस्तानमधील अमेरिकेच्या प्रभावाने निर्माण झालेल्या सुन्नी राजवटीला मात्र बळकटी मिळावी यासाठी साह्य करणे. पुढे डोनाल्ड ट्रंप यांच्या कारकिर्दीत मात्र अमेरिका आणि इराणमधले संबंध पार बिघडले. 1996 ते 2001 याच काळात अफगाणिस्तानमधील शिया मुस्लिम तालिबान्यांच्या छळामुळे परागंदा होऊन इराणमध्ये आश्रयाला आले आहेत. त्यांना सैनिकी शिक्षण आणि शस्त्रास्त्रे पुरवून इराणने 60,000 सैनिकांची फतेमियॅान ब्रिगेड या नावाची सेना उभारली आहे. ही सेना इराक आणि सीरियामध्ये सुन्नी अल-कायदा विरुद्धच्या लढ्यात सहभागी झाली होती. यापैकी काही सैनिक आज अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांशी लढण्यासाठी गेले आहेत, असे म्हणतात. पण हे खरे असले तरी सध्या अफगाणिस्तानमध्ये स्थिरपद होत असलेली राजवट बाहेरून जबरदस्त पाठिंबा मिळाल्याशिवाय उलथून टाकता येणार नाही, असे सैनिकी डावपेच जाणणाऱ्यांचे मत आहे. तसेच असा पाठिंबा भविष्यात मिळणे आजच्या जगात अशक्य नाही, हेही ते जाणून आहेत.

No comments:

Post a Comment