Monday, September 27, 2021

मनातले पख्तुनिस्तान प्रत्यक्षात येईल? वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यामधील सीमा 2,670 किमी लांबीची असून ती एका टोकाला इराणला तर दुसऱ्या टोकाला चीनला स्पर्श करते. 1893 साली ब्रिटिशशासित भारत आणि अमिरात ॲाफ अफगाणिस्तान यातील ही सीमा मॅार्टिमर ड्यूरॅंड यांनी आखली आणि एक पश्तूनबहुल भाग द्विभाजित झाला. क्वेटा, पिशिन, हर्नाई, सिबी, कुर्रम आणि खैबर हे पश्तूनबहुल प्रदेश ब्रिटिशांकडे आणि पुढे आजच्या पाकिस्तानकडे वारसा हक्काने आले. हा पाकिस्तानकडे आलेला पश्तूनबहुल भाग एकूण पश्तूनबहुल भागाच्या जवळजवळ अर्धा आहे. या भूभागातून 1901 साली वायव्य सरहद्द प्रांत (नॅार्थ-वेस्ट फ्रॅांटिअर प्रॅाव्हिन्सेस) हा पश्तुनांसाठी एक पश्तूनबहुल प्रांत ब्रिटिशांनी वेगळा केला. तसेच स्वात, दिर, चित्रळ आणि ॲंब या सारख्या पश्तूनबहुल भूभागांनाही ब्रिटिशांनी संस्थाने म्हणून वेगळी ओळख दिली आणि भांडणे कशीबशी आणि काहीअंशी मिटवली. पण वझिरिस्तानी आणि अन्य टोळीवाले मात्र ब्रिटिशांशी भांडतच राहिले. रशिया आणि त्यावेळचे ब्रिटिश इंडिया यात अफगाणिस्तान हे एक बफर स्टेट (दोन बलाढ्य राष्ट्रातले एक छोटेसे राज्य) असावे, अशी ब्रिटिशांची योजना होती. ड्यूरॅंड लाईनने म्हणजेच आजच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यातील सीमारेषेने पश्तूनवंशीय लोक विभागले गेले आहेत. ड्यूरॅंड सीमारेषेला आंतरराष्ट्रीय मान्यता असली तरी तिला तेव्हाच्या किंवा आताच्या पदच्युत अफगाणिस्तान शासनाचीही मान्यता नव्हती. हमीद करझई यांनी तर ही सीमा मान्य करण्यास सपशेल नकार दिला होता. नवीन तालिबान शासनही आजतरी पश्तून शासनच आहे आणि निदान नजीकच्या भविष्यकाळात तरी ते तसेच राहणार आहे. ते ड्युरॅंड लाईनबाबत काय विचार करते, ते लवकरच कळेल. दोन शक्यता आता दोन शक्यता दिसतात. भविष्यात एकतर संपूर्ण अफगाणिस्तानवर पाकिस्तानचा ताबा असेल किंवा पाकिस्तानमधील पश्तूनबहुल प्रदेश पाकिस्तानपासून वेगळा होऊन अफगाणिस्तानमध्ये तरी सामील होईल. तालिबान आणि हक्कानी गटातील मतभेद तीव्र होत जाण्याचीही शक्यता आहे. मुल्ला बरादरची हत्या झाली असल्याच्या वार्ता सर्वत्र पसरल्या होत्या. पण बरादर यानेच आपण जिवंत आणि सुखरूप असल्याचे जाहीर केल्यामुळे हा विषय संपल्यासारखा वाटत असला तरी सध्या सुरू असलेल्या हाणामारीत कोणता तरी एक गट विजयी होईल आणि त्यानंतर हक्कानीसकट सर्व पश्तून एका छत्राखाली आणण्याची म्हणजेच पख्तुनिस्तानच्या निर्मितीची चळवळ प्रभावी होईल, अशी शक्यता आहे. सर्व दहशतवाद्यांची मुक्तता अमेरिकन फौजा परत गेल्यानंतर आणि अफगाण शासनाचे पतन झाल्यानंतर सध्या अफगाणिस्तानमधील तुरुंग रिकामे केले जात आहेत. पण जे सुटले ते कोण होते? ते निरनिराळ्या दहशतवादी संघटनांच्या आत्मघातकी गटातले होते, सुटल्यानंतर ते आपापल्या देशात रवाना झाले आहेत. सर्वच दहशतवादी संघटनांना आता तालिबान्यांच्या विजयामुळे नवसंजीवनी प्राप्त होणार आहे. यात अल-कायदा, लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहंमद, इसिस-के या सारख्या संघटना प्रमुख आहेत. हे सर्व अमेरिकेवर भयंकर चिडले असून त्यांनी अमेरिकेला धडा शिकवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. बगराम येथील तुरुंग तर क्युबाजवळ ग्वांटानामो उपसागराच्या किनाऱ्यावरील तुरुंगाची प्रतिकृती वाटावी असा मजबूत आणि अभेद्य आहे. अतिकट्टर दहशतवाद्यांना या तुरुंगात कैद करून ठेवले होते. एकेका दहशतवाद्याला अतिशय परिश्रम आणि पराक्रम करून तर कधी शिताफीने बंदिस्त केले होते. हे सर्व दहशतवादी आता मोकाट सुटून बाहेर आल्यामुळे काश्मीरसह इतरत्रही दहशतवादी कारवायांना ऊत येईल, अशी भीती व्यक्त होत आहे. पण एक शक्यता अशीही व्यक्त होते आहे की, यांच्या आपापसातच वर्चस्व आणि श्रेष्ठत्वासाठी चकमकी होत राहतील. अफगाणिस्तानमध्ये मध्यंतरी झालेले स्फोट याची साक्ष देतात. अफगाणिस्तान आणि व्हिएटनाम ज्याप्रमाणे काहीही पर्यायी व्यवस्था न करता व्हिएटनाममधून नामुष्की पत्करून अमेरिका बाहेर पडली तोच कित्ता तिने अफगाणिस्तानबाबतही गिरवला आहे. पण नंतर फारशा कटकटी न होता व्हिएटनाम एक झाला आणि स्वतंत्र राष्ट्र म्हणून आज तो भूतलावर वावरतो आहे. अफगाणिस्तानमध्ये तसेच घडेल का? तर तशी शक्यता खूपच कमी आहे. कारण अफगाणिस्तानमध्ये पश्तून, ताजिक, हजारा, उझबेक या प्रमुख जमाती एकमेकींशी फटकून वागत आल्या आहेत. त्यांच्यात पराकोटीचा वैरभाव आहे. आजचे तालिबानी मुख्यत: पश्तूनच आहेत. व्हिएटनाममध्ये असे नव्हते. ते सर्व व्हिएटनामीच होते. अफगाणिस्तानचे तसे नाही. त्यामुळे अफगाणिस्तानचे लचके तोडायला अनेक लांडगे समोर येतील. यातला पहिल्या क्रमांकाचा लांडगा असेल पाकिस्तान, नव्हे आहेच. त्याला तर अख्खा अफगाणिस्तानच गिळंकृत करायचा आहे. पण अफगाणिस्तान आणि पाकिस्तान मधील पश्तूनांमध्ये आपण एकत्र येऊन एक पश्तून राष्ट्र निर्माण करावे, ही पूर्वीपासूनच अस्तित्वात असलेली एकराष्ट्रीयतेची भावना जर प्रबळ झाली तर भयंकर रक्तपात होऊन पाकिस्तानचेच तुकडे होण्याची शक्यता आहे. या निमित्ताने खूप वर्षांपूर्वी पाहिलेले एक व्यंगचित्र आठवले. यात एक नावाडी जलाशयात गळ टाकून बसलेला दाखवला आहे. त्याच्या गळाला एक मासा लागलेलाही दाखवला आहे. पण तोच खूप मोठा आहे. तो मासा नावाड्याला म्हणतो आहे, ‘थांब, आता मीच तुला खातो’. शरिया आणि पश्तुनवाली इतिहास काळातील अफगाण साम्राज्याचे संस्थापक (फाऊंडर मेंबर) मानले जाणारे पश्तून (पठाण) हे बहुसंख्येने सुन्नी मुस्लिम आहेत. अगदी नक्की सांगता येत नसले तरी पाकिस्तानमध्ये अफगाणिस्तानपेक्षा पश्तुनांची संख्या कितीतरी जास्त आहे. तसे पाहिले तर पश्तून जमात एकसंध नसून त्यांच्यात निदान 60 उपजमाती आहेत. पण पश्तुनांना पाश्तो भाषेने जोडून ठेवले आहे. तसेच पश्तुनांचे स्वत:चे जीवनविषयक तत्त्वज्ञानही सांगणारी एक स्वतंत्र अशी पश्तुनवाली किंवा पठाणवाली या नावाची जीवनविषयक संहिता (कोड) आहे. यात आदरातिथ्य, न्याय, धैर्य, निष्ठा, दिलेल्या वचनाला जागणे, प्रामाणिकता, आत्माभिमान, स्त्रीदाक्षिण्य या सारख्या बाबतीतली तत्त्वे नमूद केलेली आहेत. अफगाणिस्तानात पश्तून जमातीचे लोक 50% जरी नसले तरी सर्वात जास्त म्हणजे 42% आहेत, तर पाकिस्तानमध्ये 15 टक्के पश्तून ही दुसऱ्या क्रमांकाची जमात आहे. पण पाकिस्तानातील पश्तुनांची एकूण संख्या अफगाणिस्तानमधील पश्तुनांच्या एकूण संख्येपेक्षा जास्त आहे. ऋग्वेदात पक्था जमातीचा उल्लेख आहे. तेव्हा हे लोक आजच्या अफगाणिस्तानमध्ये राहत असत. या आणि अन्य दाखल्यांवरून असे दिसते की, पश्तून या भागात पूर्वीपासून राहत असले पाहिजेत. काही संशोधक पश्तुनांचे मूळ निवासस्थान आजच्या इराणच्या पूर्व भागातले आहे, असे मानतात. तर इतर काही संशोधकांच्या मते पश्तून ही संमिश्र जमात असून ती कुशान, हूण, अरब, मुघल यांची मिश्र जमात आहे. भारताच्या फाळणीनंतर अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील पश्तूनबहुल प्रदेशांचे मिळून पख्तुनिस्तान नावाचे नवीन राष्ट्र निर्माण करावे असा विचार कडव्या पश्तुन राष्ट्रवाद्यांच्या मनात निर्माण झाला असून तो आजही जिवंत आहे. पश्तुनाचा स्वत:चा इतिहास आहे. गझनवी, लोधी या पश्तून घराण्यांनी तर एकेकाळी दिल्लीवर राज्य केलेले आहे. आधुनिक काळातील हमीद करझई आणि अशरफ घनी हे अफगाणिस्तानचे माजी अध्यक्ष आणि नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझई हे पश्तूनच आहेत. खान अब्दुल गफ्फार खान हे पश्तून नेते महात्मा गांधींचे अनुयायी होते. त्यांना जनतेने सरहद्द गांधी ही पदवी दिली होती. फाळणीला मान्यता देणाऱ्या कॅांग्रेसला उद्देशून ते म्हणाले होते की, ‘तुम्ही आम्हाला लांडग्यांसमोर टाकून दिले आहे’. त्यांना भारताने भारतरत्न पदवी देऊन सन्मानित केले होते. ते 20 जानेवारी 1988 ला अल्लाघरी गेले. पख्तुनिस्तान प्रत्यक्षात येईल? आज पख्तुनिस्तान अस्तित्वात नाही. पण या भूभागात पश्तून लोक निदान गेली 1हजार वर्षे तरी वसतीकरून आहेत. आत्ताआत्ता म्हणजे 1893 साली ड्युरॅंड लाईनने त्यांची विभागणी केली आहे. 1940 पासून या दोन्ही भागात पुन्हा एक होण्याची भावना वाढीला लागलेली आढळते. पख्तुनिस्तानच्या निर्मितीला खरा विरोध पाकिस्तानचा आहे. पाकिस्तानने आपल्या ताब्यातील पश्तूनबहुल भागात आधुनिक सोयीसुविधा निर्माण होऊ दिलेल्या नाहीत. पाश्तो भाषेचे शिक्षण देण्यावरही प्रतिबंध घातले. त्यामुळे काय वाटेल ते करून पाकिस्तानच्या तावडीतून बाहेर पडायचेच हा पश्तुनांचा निर्धार आहे. एका खलिफाच्या अमलाखाली आणि शरिया कायद्याखाली एक इस्लामी राज्य स्थापन करणे हा हेतू उराशी बाळगून पश्तून आज प्रयत्न करीत आहेत. गुन्हे, राजकारण आणि अर्थकारण हे सार्वजनिक जीवनातील विषय शरियातील आदेशानुसार हाताळले जावेत. वैयक्तिक जीवनातील म्हणजे स्त्रीपुरुष संबंध, आरोग्य, खाणेपिणे, प्रार्थना हे विषयही शरियातील तरतुदीनुसारच आचरणात आणले जावेत यावर त्यांचा आग्रही भर असतो. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यातील ब्रिटिशांनी आखलेली सीमारेषा (ड्युरॅंड लाईन) पश्तुनांना मान्य नाही. सर्व पश्तून, शरिया कायद्यानुसार आपले जीवन जगण्यास स्वतंत्र असावेत, असे त्यांना वाटते. आजचे तालिबानी, कालचे अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी हे पश्तूनच आहेत. आजचे पाकनियंत्रित हक्कानी नेटवर्क हीही पश्तुनी तालिबान्यांचीच शाखा आहे. म्हणून वाट आहे, दुहीच्या शापावर मात करून हे सर्व एकत्र येण्याची!

No comments:

Post a Comment