Monday, January 31, 2022

धुमसता युरोप पेटेल का? वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड, एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 Email - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? सध्या युक्रेन प्रकरणी वातावरण अतिशय तापलेले असून अमेरिका आणि अन्य देशांनी युक्रेमध्ये शस्त्रात्रादी मदत पठवायला सुरवात केली आहे. रशियन सैन्याच्या हालचाली पाहता, रशियाचा युक्रेनवर चढाई करण्याचा हेतू निदान दिसतो तरी आहे. तणावाची स्थिती निर्माण होऊन बराच काळ लोटला असला तरी आता रशियन बाजूकडून होत असलेल्या सैन्यदलाच्या विविध सीमांवरच्या हालचाली बघून तिसऱ्या महायुद्धाला तोंड तर फुटणार नाहीना, या चिंतेने सर्व जगाला ग्रासले आहे. खुद्द पोपना याची दखल घ्यावी लागली आहे, हे विशेष. ही वेळ रशियाला सोयीची सैनिकी कारवाई करण्याच्या दृष्टीने पाहिले तर ही वेळ रशियासाठी खूप सोयीची दिसते आहे. युद्ध सुरू झाले तर युरोपीयन युनीयनला आपल्या वचनाला जागून युद्धात युक्रेनची बाजू घेऊन उतरावे लागेल, यात शंका नाही. युरोपीयन युनीयन मध्ये 27/28 राष्ट्रे असली तरी त्यातले महत्त्वाचे देश दोनच आहेत. ब्रिटन आज युरोपीयन युनीयनमधून बाहेर पडले असले तरी नाटो (नॅार्थ अटलांटिक ट्रिटी अलायन्स) मधला एक महत्त्वाचा देश या नात्याने तोही महत्त्वाचा आहे. सर्वात आग्रही आहे, ती अमेरिका. अमेरिका जरी तशी बरीच दूर असली तरी युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरविण्याच्या बाबतीत मात्र आघाडीवर आहे. ब्रिटनमध्ये सध्या पंतप्रधान बोरिस जॅानसन यांच्याविरुद्ध जनमत खवळले असून त्यांना राजीनामा तर द्यावा लागणार नाहीना अशी शक्यता निर्माण झाली आहे. कोरोनाकहरामुळे लॅाकडाऊन असतांनाही जॅानसन यांनी कार्यालयात स्वत:च्या वाढदिवसानिमित्त नृत्य आणि मद्यपानादी कार्यक्रम सर्व बंधने धाब्यावर बसवून आयोजित होऊ दिल्यामुळे संपूर्ण देश त्यांच्यावर संतापला आहे. फ्रान्समध्ये येत्या एप्रिलमध्ये सार्वत्रिक निवडणुका असल्यामुळे मावळते अध्यक्ष या नात्याने एमॅन्युअल मॅक्रॅान युद्धासारखा महत्त्वाचा निर्णय घेतांना दहादा विचार करतील. जर्मनीमध्ये आता चान्सेलर ॲंजेला मर्केल यांच्यासारखी खमकी व्यक्ती निर्णय घेण्यासाठी उपलब्ध असणार नाही. जर्मनीत नवीन आघाडी तयार करण्यातच बराच वेळ गेला आणि सध्याचे चान्सेलर ओलाफ शोल्झ यांची राजवट तशी नवीनच आहे. एवढेच नाही तर ब्रिटन, फ्रान्स आणि जर्मनी नाटोचे सदस्य या नात्याने अधिकृतरीत्या युक्रेनसोबत आहेत हे खरे असले तरी या तिघांच्या युक्रेन बाबतच्या भूमिका वेगवेगळ्या आहेत. ब्रिटन कडक कारवाई करण्याच्या आणि युक्रेनला शत्रास्त्रे पुरविण्याच्या विचाराचे तर आहेच, तसेच प्रसंगी युद्धात प्रत्यक्ष सहभागी व्हावे लागले तरी हरकत नाही या विचाराचे आहे. तर फ्रान्स युरोपची स्वतंत्र सुरक्षा व्यवस्था असावी, ती नाटोवर अवलंबून असू नये या विचाराचा आहे. अशा प्रकारे नाटोचे महत्त्व कमी करता आले तर त्यांना हवे आहे. कारण युरोपच्या स्वतंत्र सुरक्षाव्यवस्थेत फ्रान्सच्या मताला अधिक वजन असेल, असे फ्रान्सला वाटते. डोनाल्ड ट्रंप यांनी युरोपला वाऱ्यावर सोडले होते, असे सर्व युरोपीयन देशांचे मत झाले आहे. त्यामुळे स्वतंत्र सुरक्षाव्यवस्था निर्माण झाली तर ते त्यांनाही हवे आहे. म्हणून सध्या ताणतणाव कमी करण्यासाठी रशियाशी चर्चा करावी आणि सामोपचाराने काही निष्पन्न होते का, याची चाचपणी करावी, असे फ्रान्सला वाटते. ही भूमिका घेण्यात फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॅान यांचा आणखीही एक अंतरीचा हेतू आहे. तो असा की, एप्रिलमध्ये फ्रान्समध्ये निवडणुका होणार आहेत, त्यावेळी ही भूमिका त्यांचा फ्रान्समधील प्रभाव वाढण्यास कारणीभूत होईल, असे त्यांना वाटते आहे. एकमेकांबद्दल अविश्वास ब्रिटनचा जर्मनीवर असा आरोप आहे की, ब्रिटनची विमाने रणगाडाभेदी शस्त्रे घेऊन युक्रेनकडे निघाली असता जर्मनीने त्यांना आपल्या प्रदेशावरून उड्डाण करण्यास अनुमती न दिल्यामुळे त्यांना लांबची वाट निवडून उत्तर समुद्र आणि डेन्मार्कवरून जावे लागले. यामुळे चार तास जास्त लागले. यावर जर्मनीचे म्हणणे असे आहे की, नकार देणारच कसा.? ब्रिटनने अनुमती मागणारा अर्जच केला नव्हता, तर नकार देण्याचा प्रश्न उद्भवतोच कसा? पण अशी लंगडी सबब जर्मनीला एस्टोपियाबाबत मात्र मिळू शकली नाही. जर्मनीने एस्टोपियाला तोफा दिल्या आहेत. त्या युक्रेनला देऊ नका असे जर्मनीने एस्टोपियाला फर्मावले. यावर मात्र ब्रिटन, युक्रेन आणि एस्टोपिया जर्मनीवर विलक्षण चिडले आहेत. यावेळी मात्र जर्मनीला मूग गिळून गप्प बसावेच लागले. जर्मनीची अडचण वेगळीच आहे. लष्करी सामग्री नेणाऱ्या विमानांना आपल्या प्रदेशावरून जायला अनुमती द्यावी तर आघाडीतली सहकारी ग्रीन पार्टी नाराज होणार. तिने पाठिंबा काढला तर चान्सेलर ओलाफ शोल्झ यांचे बहुमत जाऊन, त्यांनाच राजीनामा द्यायची वेळ यायची. बरे लष्करी साहित्य नेणाऱ्या विमानांच्या उड्डाणाला अनुमती नाकारावी तर नाटोमधले सहकारी नाराज होणार. अशा शृंगापत्तीत (डायलेमा) ओलाफ शोल्झ सापडले आहेत. युरोपमध्येच दोन मते युरोपमध्येही दोन मते आहेत. जे पूर्वेकडील देश रशियाच्या जवळ आहेत, त्यांना रशियाविरुद्ध कडक भूमिका घ्यावी, असे वाटते. कारण आज जी पाळी युक्रेनवर आली आहे, ती उद्या आपल्यावरही येऊ शकते, अशी त्यांना भीती वाटते आहे. रशियाला अडवण्याचे त्यांच्यात न सामर्थ्य आहे न हिंमत. त्यामुळे रशियाला परस्पर अद्दल घडली तर त्यांना ते हवेच आहे. याउलट जे देश रशियापासून दूर आहेत, अशा पश्चिमेकडच्या देशांना रशियाकडून सध्या कोणताही त्रास होत नसतो आणि भविष्यात त्रास होईल, अशीही शक्यता त्यांना दिसत नाही. त्यामुळे त्यांना युद्ध नको आहे. त्यामुळे त्यांची भाषा सामोपचाराची, चर्चेने प्रश्न सोडवावा अशी आणि गरज पडल्यास सीमा थोड्याफार मागेपुढे सरकवून तडजोड घडवून आणावी, अशी आहे. युरोप इंधनासाठी रशियावर अवलंबून इंधन म्हणून युरोपला जो नैसर्गिक वायू (नॅचरल गॅस) लागतो, त्यातला 40% गॅस रशियाकडून पुरवला जात असतो. युद्ध सुरू झाले तर हा पुरवठा बंद होणार आणि अख्ख्या युरोपवर गारठण्याची वेळ येणार. त्यामुळे अनेक देश युद्ध टाळावे या विचाराचे आहेत. अमेरिकेची भूमिका मात्र काय वाटेल ते झाले तरी, रशियाने युक्रेनवर आक्रमण केले तर त्याला धडा शिकवायचाच असे आहे. सोव्हिएट युनीयनचे विघटन झाले आणि युक्रेन स्वतंत्र राष्ट्र म्हणून वावरू लागला. त्याचे अमेरिकादी राष्ट्रांशी स्वतंत्र संबंध निर्माण झाले. रशियापेक्षा त्याला हे देश बरे वाटू लागले. पण युक्रेनमध्ये रशियन लोकांची संख्याही बरीच आहे. हे लोक रशियाला लागून असलेल्या भागात जास्त आहेत. त्यांचा ओढा रशियाकडे आहे. रशियालाही युक्रेन पुन्हा आपल्याकडे घ्यायचा आहे. यामागचे प्रमुख कारण असे आहे की, युक्रेन, युरेनियम आणि इतर खनीजांनी संपन्न असून अतिशय सुपीकही आहे. दुसरे असे की, युक्रेन रशियाच्या भीतीमुळे नाटोमध्ये सामील होऊ इच्छितो आणि असे झाले तर रशियाची त्याला त्रास देण्याची हिंमत होणार नाही, असे त्याला वाटते. हे तर रशियाला मुळीच नको आहे. युक्रेनसारखे मोठे आणि संपन्न राष्ट्र जर नाटोचे सदस्य झाले तर नाटोचा सदस्य असलेल्या राष्ट्राची सीमा खुद्द रशियालाच येऊन भिडेल. हे रशियाला सहन होण्यासारखे नाही. एकेकाळी युक्रेनचाच भाग असलेला लहानसा क्रिमीया रशियाने अगोदरच गिळंकृत केला आहे. पण भौगोलिक दृष्ट्या क्रिमीया युक्रेनपेक्षा रशियाच्याच अधिक जवळ होता, तसेच दुसरे असे की, क्रिमीयाची जनताही रशियात सामील होण्यास अनुकूल होती. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर थोडीफार खळखळ झाली पण क्रिमियाचे सामिलीकरण सहज शक्य झाले. यामुळे 24 मार्च 2014 ला रशियात होऊ घातलेली जी8 ची शिखर परिषद रद्द करण्यात आली. तसेच रशियाला जी8 मधून निलंबितही करण्यात आले. पण रशियाने क्रिमीया गिळंकृत केला तो केलाच. पण युक्रेन प्रकरणी रशियाचे धोरण पाहून 1 एप्रिल 2014 ला नाटोने रशियासोबतचे सर्व राजकीय संबंध थांबवले. पण नॅार्थ अटलांटिक ट्रिटी अलायन्स आणि रशिया यांचे मिळून असलेले काऊन्सिल (एनआरसी) मात्र कायम ठेवले. युक्रेन - एक स्वतंत्र राष्ट्र क्रिमीया रशियाने गिळंकृत केला खरा, पण युक्रेनचे तसे नाही. एकतर तो क्रिमीयाच्या तुलनेत बराच मोठा आहे. आणि दुसरे असे की, सीमालगतचा भाग सोडला तर युक्रेनमधील उरलेली सर्व जनताही रशियात सामील व्हायला तयार नाही. शिवाय असेही की, स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करणाऱ्या अनेक ऐतिहासिक खुणा युक्रेन देशात ठिकठिकणी आढळतात. अशाप्रकारे एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून युक्रेनची प्राचीनकाळापासूनची ओळख आहे. हे रशियाला मान्य नसले तरी. एव्हिलीन निकोलेट फारकस या अमेरिकेच्या सहराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (आपल्या अजित डोभाल यांच्या सारख्या) आहेत. त्या असिस्टंट सेक्रेटरी ॲाफ डिफेन्स फॅार रशिया, युक्रेन ॲंड युरेशिया या पदावरही होत्या. ‘यावेळी रशियाची गय केली तर तो सोकावेल. रशियाने सरहद्दीतही जबरदस्तीने बदल करण्याचा प्रयत्न केला तरी त्या अटकाव केलाच पाहिजे’, असे त्यांनी सर्वांना विशेषत: अमेरिकेला बजावले आहे. शेवटी ठरले काय? काहीही करून आपापसातले मतभेद आवरा. कारण या मतभेदांचा फायदा रशियाला आणि त्याच्याशी हातमिळवणी करणाऱ्या चीनला होतो आहे. म्हणून आता शिष्टाई करण्यासाठी अमेरिकेचे सेक्रेटरी ॲाफ स्टेट एंटोनी ब्लिंकेन कंबर कसून सर्व संबंधितांच्या भेटी घेत शेवटी धीर देण्यासाठी युक्रेनमध्ये दस्तूरखुद्द दाखल झाले आहेत. भारताचे दोन्ही पक्षांशी चांगले संबंध आहेत. भारताने मध्यस्थी करावी, अशीही अमेरिकेने अपेक्षा व्यक्त केली आहे. याचे काय होईल ते होवो. पण मग पुढे काय? अहो, या राजकारण्यांच्या मनात काय चालले आहे, हे त्या परमेश्वराला तरी कधी कळले असेल का? मग आपणा पामरांची काय कथा? आता हेच पहाना, फ्रान्सचे अध्यक्ष एमॅन्युअल मॅक्रॅान यांच्या अधिकृत निवासस्थानी फ्रान्स, जर्मनी, युक्रेन आणि रशिया यांच्या प्रतिनिधींच्या चतुष्कोणीय चर्चेत विनाअट कायम स्वरुपी युद्धविराम करण्यावर सहमती झाल्याची (?) वार्ता प्रसृत झाली आहे.

Monday, January 24, 2022

मध्य आशिया किंवा ‘5 स्तान’ वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? भारताच्या 73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने भारताने कजाखस्तान, किरगिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तान या नैसर्गिक संपत्तीचे वरदान लाभलेल्या भूवेष्टित देशांच्या राष्ट्रप्रुखांना प्रमुख पाहुणे म्हणून पाचारण केले होते. पण कोरोनाकहरामुळे हे पाहुणे पाहुणचारासाठी सदेह किंवा आभासी पद्धतीनेही सहभागी होऊ शकणार नाहीत, याचे वाईट वाटते. हे 5 विकसनशील देश ‘5 स्तान’ म्हणूनही ओळखले जातात. ‘स्तान’ हा शब्द पर्शियन भाषेतून आला असून त्याचा अर्थ स्थान असा आहे. सोव्हिएट युनीयनचे विघटन झाल्यानंतर हे पाच देश स्वतंत्र झाले आहेत. यानंतरच मध्य आशिया हा शब्दप्रयोग या 5 भूवेष्टित देशांना संबोधण्यासाठी वापरात आल्याचे दिसते. मध्य आशियामुळे युरोप आणि आशिया एकमेकांना जोडले गेले आहेत. मालाची वाहतुक करण्यासाठी बांधलेला सिल्क रूटही मध्य आशियातून जातो. पण या मार्गाने मालाच्या सोबतीने विचार, संस्कृती आणि मानवांचेही दळणवळण सुरू झाल्याचे इतिहास सांगतो. हाच परिणाम पृथ्वीवर जेव्हा जेव्हा आक्रमणे झाली, सत्तांतरे घडून आली, मानवांचे स्थलांतर स्वाभाविकपणे किंवा आश्रयार्थी म्हणून झाले, तेव्हा तेव्हाही झालेला दिसून येतो. युरेनियम, सोने, चांदी, तांबे, टंगस्टन, ॲल्युमिनीयम यासारखे अमूल्य आणि बहूपयोगी धातू, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू ही इंधने यांची मुबलकता या पाच देशात आहे. पण हे सर्व देश भूवेष्टित असल्यामुळे बाह्यजगाशी संबंध प्रस्थापित करतांना यांना वेढून असलेल्या देशांनी निर्माण केलेल्या अडचणींचा सामना करावा लागतो. वांशिक वाद, दहशतवाद, फुटिरतावाद, धार्मिक उन्माद आणि कट्टरता, कायदा हाती घेण्याची वृत्ती, अत्याचार, गुन्हेगारी आणि तस्करी यांनी अख्खा मध्य आशिया ग्रासला आहे. कजाख, किर्ग, ताजिक, तुर्कमेनी, उझबेग आणि अन्यही वंशाच्या लोकांची सरमिसळ मध्य आशियात जवळजवळ सर्वत्र आढळते. त्यामुळे वाद, विसंवाद, वितंडवाद यातून कुरघोडीचे प्रकारही काही कमी होत नाहीत. मानवीहक्क निर्देशांकांचा विचार करता हे देश चांगलेच माघारलेले आहेत. भ्रष्टाचार, मानवीहक्कहनन, छळ, लहरीनुसार तुरुंगात डांबणे, अतिमर्यादित धार्मिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्य या देशांच्या नागरिकांच्या वाट्याला आले आहे. मध्य आशियाच्या सीमा चीनलाही लागून आहेत. चीनचा अनुभव घेऊन झाल्यानंतर या देशातील नेतृत्व आता भारताकडे खऱ्याखुऱ्या सहकार्याच्या आशेने आणि अपेक्षेने पाहत आहे. या पार्श्वभूमीवर भारताने या देशांच्या राष्ट्रप्रमुखांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवून राजकीय परिपक्वतेचा परिचय दिला होता. या राष्ट्रप्रमुखांना खास निमंत्रण देण्यामागे भारताचा जसा विशेष हेतू होता, तसेच या मुस्लीमबहुल राष्ट्रप्रमुखांनाही भारताशी स्नेहाचे व सहकार्याचे संबंध ठेवण्याची इच्छा आहे, हेही विशेषच म्हटले पाहिजे. 1 कजाखस्तान - याचे क्षेत्रफळ सुमारे 27 लक्ष 25 हजार चौकिमी पण लोकसंख्या मात्र 1 कोटी 90 लक्ष एवढीच आहे. कजाखस्तानच्या उत्तरेला आणि पश्चिमेला रशिया, पूर्वेला चीन, दक्षिणेला किरगिस्तान, उझबेकिस्तान, आणि तुर्कमेनिस्तान आहेत. अस्ताना हे राजधानीचे शहर आहे. कजाखस्तान हा जगातला सर्वात मोठा भूवेष्टित देश आहे. हा राजकीय आणि आर्थिक दृष्टीने प्रभावशाली देश आहे. खनिज तेल, खनिजे आणि नैसर्गिक वायूचे वरदान या देशाला लाभले असल्यामुळे येथे संपन्नताही आहे. हा स्वत:ला धर्मातीत (सेक्युलर) आणि लोकशाहीवादी म्हणवणारा देश विविध सांस्कृतिक वारशांनी नटलेला आहे. अनेक जागतिक आणि प्रादेशिक संघटनांची सदस्यता या देशाला लाभली आहे. कास्यम- जोमार्ट टोकायेव हे कझाक राजकारणी आणि परराष्ट्रव्यवहार निपुण नेते या देशाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. या देशाने 13 व्या शतकात चंगीजखानच्या साम्राज्याचा वरवंटा अनुभवला आहे. 15 व्या शतकात आजचा कजाखस्तानखऱ्या अर्थाने आकाराला आला. पण 1991 मध्ये सोव्हिएट युनीयनच्या विघटनानंतर कजाखस्तान हा स्वतंत्र देश जन्माला आला. 2 किरगिस्तान - किरगिस्तान हा सुमारे 2 लक्ष चौकिमी क्षेत्रफळ आणि 60 लक्ष लोकसंख्या असलेला पर्वतमय भूवेष्टित देश आहे. याच्या उत्तरेला कझाखस्थान, पश्चिमेला उझबेकिस्तान, दक्षिणेला ताजिकीस्तान आणि पूर्वेला चीन आहे. बिश्केक हे सर्वात मोठे शहर या देशाच्या राजधानीचे शहरही आहे. या देशात एकापेक्षा जास्त वंशाचे लोक राहतात. हे बहुतेक सगळे सुन्नी मुस्लीम असून सुद्धा त्यात त्यांच्यात एकी नाही. इराणी, मोगल आणि रशियन संस्कृतीचा परिणाम या देशातील जनतेवर झालेला आहे. एक प्रखर राष्ट्रवादी आणि जनप्रिय नेते, सद्यार नुरगोझोएविच जापारोव हे किर्गिज राजकारणी 28 जानेवारी 2021 पासून किरगिस्तानचे अध्यक्ष आहेत. या देशातूनही सिल्क रूट गेलेला आहे. अति संघर्षमय अशा इतिहासकाळात या देशाला अस्कर एकानेव यांचे नेतृत्व लाभले होते. त्यांनी या देशात काहीशी लोकशाहीप्रधान राजवट आणली. त्यात बदल होत होत आज या देशात अध्यक्षीय लोकशाही राजवट कशीबशी नांदते आहे. वांशिक आणि आर्थिक संघर्ष, वेगवेगळ्या राजवटी यामुळे आणि साम्यवादी राजवटी पासून तो लोकशाही राजवटीमुळे या देशाचा प्रवास लक्षवेधी ठरला आहे. किरगिस्तान अनेक जागतिक आणि प्रादेशिक संघटनांचा सदस्य आहे. सोने, कोळसा आणि युरेनियम या भौतिक संपन्नतेचा पुरेसा लाभ या देशाला घेता आलेला नाही. अध्यक्ष जापारोव हेही भारताशी मैत्री करून चीनवरील अवलंबित्व कमी करण्याच्या विचाराचे आहेत. 3 ताजिकिस्तान - या भूवेष्टित देशाचे क्षेत्रफळ 1 लक्ष 42 हजार चौकिमी आहे. लोकसंख्या जवळजवळ 90 लक्ष आहे. दुशांबे ही राजधानी आहे. ताजिकिस्तानच्या दक्षिणेला अफगाणिस्तान, पश्चिमेला उझबेकिस्तान, उत्तरेला किरगिस्तान, आणि पूर्वेला चीन आहे. ताजिक वंशाचे लोक अफगाणिस्तान आणि उझबेकिस्तानमध्येही आहेत. एमोमाली रहमोन ताजिक हे नेते आजच्या ताजिकिस्तानचे 1994 पासूनचे अध्यक्ष आहेत. एमोमाली रहमॅान यांची या देशात एकाधिकारशाही 1994 पासून सुरू आहे. ताजिक लोक अनेक भाषा बोलतात. 90 टक्के भूभाग पर्वतीय आहे. 98% जनता इस्लामधर्मीय आहे. कापूस आणि ॲल्युमिनीयम ही उत्पन्नाची प्रमुख साधने आहेत. ताजिकिस्तानही अनेक जागतिक संघटनांचा सदस्य आहे. 4 तुर्कमेनिस्तान - तुर्कमेनिस्तान हा 4 लक्ष 88 हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळ आणि 60 लक्ष अशी विरळ लोकसंख्या असलेला मध्य आशियातील भूवेष्टित देश आहे. वायव्येला कझाखस्तान, उत्तर, पूर्व आणि ईशान्येला उझबेकिस्तान, आग्नेयेला अफगाणिस्तान, दक्षिण आणि नैरुत्येला इराण आणि पश्चिमेला कॅस्पियन समुद्र हा भूवेष्टित समुद्र (?) आहे. अश्घाबाद हे राजधानीचे शहर सर्वात मोठे शहरही आहे. गुर्बनगुली बेर्डिमुहामेडोव उर्फ अर्काडेग हे तुर्की राजकारणी तुर्कमेनिस्तानचे अध्यक्ष आहेत. विशेष असे की, या देशातून अनेक देशात जाता येते. सिल्क रूट या देशातूनही जातो. नैसर्गिक वायूचा (नॅचरल गॅस) विचार करता, हा जगातला चौथ्या क्रमांकाचा देश आहे. या देशात वीज, पाणी आणि नैसर्गिक वायूसाठी पैसे द्यावे लागत नाहीत. तसेच आश्चर्याची बाब हीही आहे की या देशात मृत्युदंड घटनेने वर्जित आहे. 5 उझबेकिस्तान - उझबेकिस्तान हा 4 लक्ष 49 हजार चौकिमी क्षेत्रफळ आणि 3.42 कोटी लोकसंख्या असलेला दुहेरी भूवेष्टित देश आहे. म्हणजे असे की, याला वेढून असलेले 4 देश स्वत:ही भूवेष्टितच आहेत. उत्तरेला कझाखस्तान, ईशान्येला किरगिस्तान, आग्नेयेला ताजिकिस्तान, दक्षिणेला अफगाणिस्तान, नैरुत्येला तुर्कमेनिस्तान हे स्वत:ही भूवेष्टित देश आहेत. सर्वात मोठे शहर ताश्कंद हेच राजधानीचे शहर आहे. इस्लाम कारिमोव्ह सतत 25 वर्षे उझ्बेकिस्तानचे अध्यक्ष होते. 2 सप्टेंबर 2016 ला हे अल्लाला प्यारे झाले. नंतर शेवकेट मिर्झियोयेव अध्यक्ष म्हणून निवडून आले. ही निवडणूक मुक्त वातावरणात झाली नाही, असा आक्षेप घेतला जातो. उझबेग भाषा बोलणारे हे लोक सुन्नी मुस्लीम आहेत. उझबेकिस्तान पूर्व इराणमधून आलेल्या भटक्यांनी वसवला असे मानतात. तो पर्शियन साम्राज्याचाही भाग होता. पुढे मुस्लिमांनी पर्शिया जिंकल्यानंतर सगळे भटके हळूहळू इस्लामधर्मी झाले. समरकंद, खिवा आणि बुखारा यांच्या विकासाला सिल्क रूटमुळे चांगलाच हातभार लागला होता. ओमर खय्याम सारखी अलौकिक प्रतिभेची व्यक्तिमत्त्वे याच भागातली आहेत. मोगल राजवंशाच्या कालखंडात निरनिराळे भाग विशेषत: समरकंद प्रसिद्धी पावले. बाबराचा दबदबा पूर्व भागात निर्माण झाला होता. याच बाबराने पुढे भारतावर आक्रमण करून मोगल साम्राज्याची स्थापना केली होती. सोव्हिएट रशियाचे विधटन 1991 मध्ये झाले आणि आजचा काहीसा प्रगत उझ्बेकिस्तान अस्तित्वात आला. आजचा उझबेकिस्तान अध्यक्षीय प्रणालीचे धर्मातीत (सेक्युलर) राष्ट्र आहे. बारा विलायती (प्रदेश), ताश्कंद हे शहर आणि कराकालपाकस्तान हे स्वायत्त प्रजासत्ताक यांचा मिळून आजच्या उझबेकिस्तानचा डोलारा उभा आहे. मर्यादित नागरी हक्क असलेले हे राष्ट्र होते. तरीही नंतरच्या राज्यकर्त्यांनी अनेक सुधारणा घडवून आणून उझबेकिस्तानला मध्य आशियात महत्त्वाचे स्थान मिळवून दिले आहे, असे मानतात. किरगिस्तान, ताजिकिस्तान आणि अफगाणिस्तान यात आज विशेष सख्याचे संबंध आहेत. उद्या अफगाणिस्तानमध्ये काही बदल घडणार असतील किंवा कुणी घडवणार असेल तर त्यावेळी या देशांना वगळून चालणार नाही. उझ्बेगचे अर्थकारण जागतिक अर्थकारणाशी सुसंगत भूमिका घेत आहे. कापसाची निर्यात, मुबलक नैसर्गिक वायूचा साठा, विजेचे विपुल उत्पादन, भरघोस आर्थिक विकास आणि कमीतकमी कर्ज ही या देशाची विशेषता आहे. म्हणून आज उझबेकिस्तानला जगात एक प्रतिष्ठित राष्ट्र म्हणून मान्यता मिळालेली आहे. मध्य आशियातील ‘5 स्तान’ आणि भारत यात एकमेकांना देण्यासारखे पुष्कळ आहे. भारत यांची अन्नधान्याची गरज भागवू शकेल तर तर त्याची भरपाई म्हणून हे देश भारताला युरेनियम, सोने, चांदी, तांबे, टंगस्टन, ॲल्युमिनीयम यासारखे अमूल्य आणि बहूपयोगी धातू, खनिज तेल आणि नैसर्गिक वायू पुरवू शकतील. परस्परावलंबित्व स्थायी मैत्रीचा पाया म्हणून महत्त्वाचे मानले गेले आहे. त्यामुळे हे देश आणि भारत एका व्यासपीठावर आल्यास यांच्यातील परस्परपूरकतेमुळे आंतरराष्ट्रीय सहकार्याचा आदर्श उभा करण्याचा अपूर्व योग घडून येईल.

Thursday, January 20, 2022

लहानपणं देगा देवा.२०. ०१. २०२२ आमची वस्त्रप्रावरणे आणि अभ्यंगस्नान वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? आमच्या लहानपणी मी आणि बंडू हे दोघे सख्खे भाऊ आणि मनू आणि उषा (मनोहर आणि उषा केळकर) मावस भाऊ बहीण असे एकत्र वाढलो. माझ्या आणि बंडूच्या नावाची खरंतर अदलाबदल व्हायला हवी होती. कारण बंडू सरळ स्वभावाचा, सज्जन, शांत, अभ्यासू, कामसू, आज्ञाधारक असा होता. तर मी याच्या अगदी उलट होतो. पण मी वसंताच राहिलो आणि तो मात्र नारायणाचा बंडू झाला. हे कोडे मला कधीही उलगडले नाही. पण आमच्या आईबापांना आमचे पाय पाळण्यात नेमके कसे आहेत हे न दिसल्यामुळे ही नावांची अदलाबदल झाली असेल तर त्यांना तरी दोष कसा देता येईल? . गोरेपणात माझी अन्य भावंडे उजळ होती. माझ्यात गोरेपणाचा किंचित (?) अभाव होता. पण तरीही ह्याला सोनूताईने (माझ्या आईने) कुणातरी बाईला पायलीभर ज्वारी देऊन घेतलेला दिसतो, असे म्हणून, समजून आणि मानून मला लहानपणी गोंड्या म्हणत असत. दसऱ्याच्या अगोदर आम्हाला नवीन कपडे शिवले जायचे. प्रत्येकी दोन हाफ शर्ट आणि दोन हाफ पॅंट (चड्ड्या) शिवले जायचे. केव्हातरी आम्हा तिघांना वडील कापडाच्या दुकानात घेऊन जात. कुणाला कोणत्या रंगाचे कापड ‘शोभून’ दिसेल, याचा निर्णय बहुदा तो कापड दुकानदारच करायचा. वडलांचा आग्रह एकच असे. कापड स्वदेशी हवे. जपानी कापड चांगले दोन आणे स्वस्त असे. पण आम्ही ते कधीही घेतले नाही. आमच्यासारखी विक्षिप्त मंडळी दुकानदाराला माहीत झाली होती. त्यामुळे त्यानेही कधी विदेशी कापड घेण्याचा आग्रह धरला नाही. कापड घेऊन झाले की तिथून आम्ही तडक शिंप्याकडे जात असू. तो मापे घ्यायचा. आठ दिवसांनी या म्हणायचा. इतके दिवस कशाला लागतात म्हणून विचारले तर म्हणायचा, हे कापड तुम्ही धुवून आणलेलं नाही. ते मला अगोदर धुवावे लागेल. धुतल्यानंतर ते आटेल. मग कापून शिवीन. तसेच कापड न धुता शिवले तर कपडे लांडे होतील. सॅनफोराईज्ड कापड हा प्रकार आम्ही नागपूरला आल्यानंतरच मला कळला. सुरवातीला कापड सॅनफोराज्ड आहे किंवा कसे ते विचारून किती घ्यायचे ते विचारून किती घ्यायचे ते ठरवीत असू. सॅन फोराइज्ड कापड धुतल्यानंतर आटत नसे. आता सगळीच कापडं सॅनफोराइज्ड असतात. त्यामुळे शिंप्यांचा किंवा घरच्या मंडळींचा कोरे कापड अगोदर पाण्यातून काढून वाळवण्याचा खटाटोप वाचला आहे. त्याकाळी सुताच्या गुंड्या लावल्या जायच्या. सुरवातीला त्या काज्यात बसत नसत. पुढे वारंवार धुतल्या गेल्यामुळे आक्रसून किंवा झिजून काज्यात टिकत नसत. गुंड्या पुन्हापुन्हा लावायची वेळ सारखी यायची. कारण थोड्याच वेळात त्या काज्यातून पुन्हा बाहेर यायच्या. चड्डीच्या बाबतीत लक्ष राहिलं नाही की फजितीची वेळ यायची. पण पुढे लगेच नवीन वर्षाचा दसरा यायचा. एक वर्ष पूर्ण झालेलं असायचं. एक चक्र पूर्ण होते ना होते तोच आम्ही पुन्हा कापडाच्या दुकानाच्या पायऱ्या चढायचो. ही अशाप्रकारे नवीन चक्राची सुरवात व्हायची. यावेळी आत्ताच्या गुंड्या नुकत्या कुठे व्यवहारात यायला लागल्या होत्या. ‘तू त्या का लावीत नाहीस?’, असे आम्ही काहीसे रागावून शिंप्याला विचारले. यावर तो म्हणाला की, जुना स्टॅाक संपायचा आहे आणि आमच्या घरीच सुताच्या गुंड्या तयार होतात, त्यांचे काय करायचे?’. पुढे काय झाले ते सांगत नाही. पण त्यानंतर निदान आमच्या कपड्यांना आजच्या गुंड्या लावल्या जाऊ लागल्या. पण त्या तुटायच्या. कपडे धुणे हा एक कार्यक्रम असायचा. शाईचे डाग कपड्यावर पडले की ते निघता निघत नसत. कपाळावरून ओघळलेल्या तेलामुळे चेहरा तेलकट दिसत असे. आणि मानेवरून ओघळलेल्या तेलामुळे सदऱ्याची कॅालर आणि पाठ तेलकट होऊन धूळ बसून काळे डाग पडत. ते साबणानेही लवकर निघत नसत. त्यासाठी वॅाशिंग सोडा वापरला जायचा. स्वदेशी आणि विदेशी असे साबणांचे दोन प्रकार असायचे. अंगाला लावायचा हमाम आणि कपड्यांसाठी वापरायचा तो 501 साबण हे स्वदेशी होते. तर (बहुदा) लक्स हा विदेशी साबण अंगाला लावण्यासाठी आणि सनलाईट हा विदेशी साबण साबण कपड्यांसाठी वापरला जायचा. महाग असून सुद्धा आमच्या घरी स्वदेशी साबण वापरला जाई. वारंवार घासल्यामुळे कापड झिजायचे, विरायचे शेवटी फाटायचे सुद्धा, पण अनेकदा डाग मात्र निघायचे नाहीत. त्या काळी आमच्यासाठी सणासुदीला घालण्यासाठी जरीच्या टोप्या घेतल्या जायच्या. तिची जर काढण्याचा मला छंद होता. ‘पुढच्या वेळेला तुला जरीची टोपी घेतेका बघ ’, असे आईचे धपाटा घालतांना म्हटलेले वाक्य दरवेळी ऐकल्यामुळे लक्षात राहिले आहे. धपाटा घालतांना आईच्या हातातल्या बांगड्यांचा आवाज व्हायचा. तो मला सवयीने आवडू लागला होता. रोजच्या वापरासाठी पुठ्ठा घातलेल्या काळ्या टोप्या असत. त्यातल्या पुठ्ठ्याचा ताठरपणा आम्ही खपवून घेत नसू. त्यामुळे तो पुठ्ठा शरणागती पत्करून लवकरच लुळा पडायचा. डोक्यवरचा घाम आणि पचापचा लावलेले तेल यामुळे टोपीचा डोक्याला स्पर्श करणाऱ्या वर्तुळाकृती भागावर एक तेलकट आणि धूळ खाल्लेली काळपट पट्टी तयार व्हायची. टोपी न घालता बाहेर गेल्यास, ‘कारे, तुमच्या घरचं कोणी गेलं वाटतं?’, असे हटकले जायचे. त्याकाळी चपला घेतल्या जायच्या पण चपला घातल्यानंतरच्या कोणत्याही संस्मरणीय आठवणी नाहीत. चपलेनी किंवा बुटांनी चावल्याच्या आठवणीही नाहीत. त्या पुढे अंजनगावहून नागपूरला आल्यानंतरच्या आहेत. दिवाळीत मात्र उटणं लावून आंघोळी व्हायच्या. पण आमच्या वेळी आमच्यापैकी कोणतेही बालरत्न, ‘उठा, उठा; दिवाळी आली, कार्तिक स्नानाची वेळ झाली’, असे सभ्य, सुसंस्कृत आणि सुमधुर आवाज ऐकून उठल्याचे स्मरत नाही. ज्या आठवणी आहेत, त्या सांगण्यासारख्या नाहीत.
लहानपणं देगा देवा आमच्या घरची तलवार आणि जंबिया वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? एखाद दिवशी मध्येच केव्हातरी रात्री झोप उघडल्यावर का कुणास ठावूक लहानपणच्या आठवणी जाग्या होतात. असे का होत असावे, ते कळत नाही. आज अचानक आमच्या घरच्या खऱ्याखुऱ्या तलवारीची आठवण झाली. ही तलवार आमच्या घरी कशी आली ते माहीत नाही. आम्हा मुलांना तिच्याबद्दल कुतुहल असे. पण आईने तलवारीबद्दल कुठेही बोलायचे नाही, असे बजावून सांगितले होते. याचा आमच्यावर इतका परिणाम झाला होता की, आम्ही आपापसात सुद्धा तिच्याबद्दल कुजबुजच बोलत असू. आमचे अंजनगाव -सुर्जी हे गाव तसे शांत असायचे. पण एक दिवस अफवा पसरली की, गावात कुणी क्रांतिकारक आला आहे. त्याच्याजवळ शस्त्रे आहेत आणि त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस घरोघर जाऊन झडती घेणार आहेत. आता आपल्या घरच्या तलवारीचे काय करायचे.? दादा (माझे वडील) म्हणाले, आपण ती घराच्या (तुळईवर) एखाद्या आडव्या खांबावर ठेवून देऊ. तिथे कोणाचे लक्ष जाणार नाही. पण नंतर कोणी तरी म्हणाले की, पोलिस अशाच तर जागी शोध घेत असतात. आई म्हणाली, माझ्या मनात एक विचार आला आहे. आता ती तलवार कुणाला हवी आहे का? ती अर्थातच कुणालाच नको होती. ती अगोदरच्या पिढ्यांपैकी कोणीतरी आणून ठेवली होती, एवढेच आम्हाला माहीत होते. पण त्या तलवारीशी आमचे भावनिक नातेही जुळले होते. त्यामुळे ती टाकायची तरी कशी ? तसेच कशी टाकायची? असा विचार होता. आई म्हणाली तलवार घरीच राहील पण वेगळ्या रूपात. तुम्हाला चालेल का? नाही म्हणणे शक्यच नव्हते. आईने लोहाराला निरोप पाठवला. त्याला त्या तलवाराची विळी तयार करून देतोस का? म्हणून विचारले. तो म्हणाला की, विळी करता येईल पण ती खूपच मोठी होईल. शेवटी तिच्या चार विळ्या करायचे ठरले. पण लोहीरालाही भीती वाटत होती. तो म्हणाला, मला भीती वाटते. पोलिसांनी मला पकडले तर काय करू. शेवटी रात्री भट्टी लावायची आणि विळ्या तयार करायच्या, असे ठरले. पण लोहार घाबरतच होता. शेवटी आईने त्याला दोन आणे (आजचे बारा पैसे) मजुरी जास्त देईन म्हणून कसेबसे तयार केले. अशाप्रकारे विळ्या तयार झाल्या. पण तुमच्या घरी चार विळ्या कशा? असे झडती घ्यायला आलेल्या पोलिसाने विचारले तर काय करायचे? मी शंका विचारली. आई म्हणाली, काळजी करू नका. दोन माझ्यासाठी आणि एकेक माझ्या दोन जावांसाठी. अशा एकदम चार घेतल्यामुळे स्वस्तात मिळाल्या असे सांगेन मी. पुढे झडतीची अफवाच होती, हे कळले आणि आम्ही सुटकेचा निश्वास सोडला. आईने एक विळी स्वत:साठी ठेवून तीन विळ्या आपल्या मैत्रिणींना दिल्या. पुढे आम्ही नागपूरला आलो. आमच्या मेयो हॅास्पिटलच्या बंगल्यात गावातले सामान हलवले तेव्हा ती विळी बरोबर आली होती. पण ती आता मधोमध झिजली होती. तिच्यावर ऊस तोडतांना ती एक दिवस काडकन तुटली आणि शेवटी भंगारात गेली. आमच्या घरी जंबियाही होता. तो मात्र दादांनी संरक्षणासाठी घेतला होता. त्याचे काम कधीच पडले नाही. जंबियाला पाते झाकण्यासाठी कसलेतरी म्यान होते. कधीमधी तो बाहेर काढला जायचा. मी तो हातात घेऊन पहात बसायचो. पुढे माझी मोठी बहीण सुमाताई डॅाक्टर झाली. बापूराव (माझे मोठे बंधू) आणि सुमाताई दोघेही नागपूरच्या रॅाबर्टसन मेडिकल स्कूलमध्ये शिकून डॅाक्टर झाले होते. पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर सुमाताईला मुर्तिजापूरला लक्ष्मी हॅास्पिटलमध्ये पोस्टिंग मिळाले. एकटे रहायचे म्हणून काळजी होती. सुमाताईला रहायला क्वार्टर होता. तिची बाल मैत्रीण सुशी तिच्या बरोबर सोबतीला म्हणून मुर्तिजापूरला जाणार होती. सुमाताई मुर्तिजापूरला जायला निघाली तेव्हा दादांनी तिला जातांना तो जंबिया दिला होता. व्हिझिटवर एकटीला रात्री बेरात्री जावे लागू शकते, अशावेळी हा जंबिया बरोबर ठेवीत जा, असे बजावून सांगितले होते. तिचा निरोप घेतानाचा तो प्रसंग मला आजही आठवतो. तेव्हा आईच्या डोळ्यात पाणी आलेले मी पाहिलेले होते. पुढे दोन वर्षांनी सुमाताईचे शेगावला पोस्टिंग झाले. तिचे शेगावलाच टायफॅाईडने निधन झाले. एक दिवस ती अडलेल्या बाईची सुटका करून घरी आली. घरी आल्याआल्या लगेचच तिला ताप भरला. तो टॅायफॅाईड निघाला. त्यातच ती गेली. तिचे सामान घरी आणले, पण त्यात तो जंबिया नव्हता.

Monday, January 17, 2022

सुदानवर सैनिकी वरवंटा वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? मुळातल्या मोठ्या आणि नावालाच एकसंध असलेल्या सुदानचे 2011 मध्ये विभाजन होऊन आजचा सुदान आणि दक्षिण सुदान असे दोन देश अस्तित्वात आले. आजचा सुदान हा ईशान्य आफ्रिकेतील देश असून तो मोजून 7 देश आणि लाल समुद्र (रेड सी) यांनी वेढलेला भूभाग आहे. हे 7 देश आहेत, इजिप्त, लिबिया, छड, सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, दक्षिण सुदान, इथिओपिया आणि इरिट्रिया. यानंतर येतो, लाल समुद्र (रेड सी). सुदानचे क्षेत्रफळ भारताच्या निम्म्यापेक्षा जास्त आणि लोकसंख्या मात्र फक्त 4.5 कोटी इतकीच आहे. खार्टूम हे राजधानीचे शहर काहींना ऐकून माहीत असेल. पोर्ट ॲाफ सुदान हे लाल समुद्रावरचे मोठे आणि महत्त्वाचे बंदर आहे. ख्रिस्तपूर्व 2500 वर्षापासूनचा या देशाचा इतिहास ज्ञात आहे. ‘सैनिक आम्ही देवाचे अन देशाचे’ या आशयाचे गीत आजच्या सुदानचे राष्ट्रगीत आहे. संक्षिप्त पूर्वेतिहास 19 व्या शतकात आज ज्या भागाला सुदान म्हणतात, तो भाग इजिप्तने जिंकला. या राजवटीतच सुदानच्या सीमा निश्चित झाल्या. तसेच राजकीय, शेतकी आणि आर्थिक विकासालाही गती मिळाली. पुढे सुदानमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण झाली आणि सुदानने इजिप्त विरुद्ध बंड पुकारले. हळूहळू इजिप्तची सुदानवरील पकड सैल गेली पण आता ब्रिटनने सुदानवर ताबा मिळविला. सुदानमध्ये खिलाफत स्थापन करण्याचे प्रयत्न कट्टर धर्मांधांनी केले. पण यावेळी इजिप्त आणि ब्रिटन एक झाले आणि त्यांनी धर्मांधांचे मनसुबे उधळून लावले आणि सुदानवर इजिप्तची सत्ता पुन्हा एकदा प्रस्थापित झाली पण प्रत्यक्षात ब्रिटिशांचा वरचष्मा जबरदस्त असल्यामुळे इजिप्त आणि सुदान नावापुरतेच स्वतंत्र राहिले. सुदानचे विभाजन 1952 मध्ये इजिप्तचा अध्यक्ष मुहंमद नजीबने क्रांती घडवून इजिप्त आणि सुदानला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त केले. मुहंमद नजीबच्या मनात सुदानविषयी खास आस्था होती. याची कारणे दोन होती. एक म्हणजे नजीब अर्धा सुदानी होता. दुसरे असे की तो सुदानमध्येच वाढला होता. 1 जानेवारी 1956 ला सुदानने आपण स्वतंत्र राष्ट्र असल्याची घोषणा केली. पण यानंतरही अस्थिरतेने सुदानची पाठ सोडली नाही. कधी संसदीय लोकशाही तर कधी लष्करी अंमल असा प्रकार होत होता. जाफर निमेरीने इस्लामी शासन सुदानवर लादण्याचा प्रयत्न केला. सुदानमध्ये इस्लामला मानणारे उत्तरेतच बहुसंख्य होते तर दक्षिण सुदानमध्ये ख्रिश्चन आणि ॲनिमिस्ट यांची संख्या जास्त होती. ॲनिमिस्ट म्हणजे प्राणी, वनस्पती, वस्तू, डोंगर, नद्या अशा सर्वांनाच आत्मा असतो असे मानणारे लोक असा आहे. भाषा, धर्म, राजकीय विचार यात भिन्नता असल्यामुळे दक्षिण सुदान भूवेष्टित स्वरुपात वेगळा झाला आणि इस्लामबहुल सुदान आणि ख्रिश्चन आणि ॲनिमिस्टबहुल दक्षिण सुदान असे दोन देश 2011 मध्ये अस्तित्वात आले. ओमर अल - बशीरची जुलमी राजवट 1998 ते 2019 या 21 वर्षांच्या कालखंडात 2011 पर्यंत अखंड सुदानवर आणि नंतर इस्लामबहुल सुदानवर ओमर अल - बशीर याची हुकुमशाही राजवट होती. या राजवटीत मानवी हक्कांचे हनन, छळ, दहशतवादाला प्रोत्साहन, वंशविच्छेद याशिवाय सुदानच्या वाट्याला काहीही आले नाही. या काळात 4 लाख लोकांचे प्राण गेले, असे वृत्त आहे. ओमर अल बशीर यांच्या सत्ताकाळातली सुदानमधील हुकुमशाही राजवट कुणालाच हवीशी वाटत नव्हती. ओमर अल बशीर यांच्या हाती केंद्रीत झालेल्या सत्तेमुळे लोकांना जीव नकोसा झाला होता. शेवटी जनतेच्या असंतोषाचा स्फोट झाला. सर्वसामान्य जनता बंड करून उठली आणि तिने ओमर अल बशीर आणि त्यांचा राजकीय पक्ष नॅशनल कॅांग्रेस पार्टी (एनसीपी) यांची हुकूमशाही राजवट 11 एप्रिल 2019 ला उलथून टाकली. तात्पुरती व्यवस्था म्हणून ट्रान्झिशनल मिलिटरी काऊन्सिल (टीएमसी) तयार करून त्याच्या हाती देशाचा कारभार सोपविला गेला. पण यानंतरही सुदानचे नष्टचर्य काही संपले नाही. बुर्हानची दुसरी जुलमी राजवट यानंतर 2021 या वर्षी सुदानमध्ये लष्करी क्रांतीचे दोन प्रयत्न झाले. लष्कराचा सप्टेंबरमधला बंडावा पहिला प्रयत्न फसला. पण ॲाक्टोबरमधला दुसरा प्रयत्न मात्र यशस्वी झाला आणि बशीरची राजवट संपून दुसऱ्या लष्करशहाची म्हणजे अब्देल फतेह अल- बुर्हान यांची तशीच जुलमी राजवट सुरू झाली. बुर्हानने पंतप्रधान अब्दुल्ला हॅमडोक यांनाच कैद केले. अब्देल फतेह अल- बुर्हान यांनी आणीबाणी लागू करून पंतप्रधान अब्दुल्ला हॅमडॉक यांचे संयुक्त सरकार बरखास्त तर केलेच त्याचबरोबर त्यांच्यासह संपूर्ण मंत्रिमंडळालाही अटक केली. आज महागाई, अन्नधान्याचा तुटवडा आणि औषधांचाही अभाव हे आणखी एक वेगळेच संकट सुदानच्या समोर उभे राहिले आहे. सुदानमध्ये गरज भागेल एवढे धान्य कधीच पिकलेले नाही. गरजेच्या निम्मे एवढ्याच गहू आणि अन्य पिकांचे उत्पादन होत असते. बाकीचे आयात केले जायचे. आता तर आयातही बंद झाली आहे. कारण बंदरावर जहाजातून आलेले धान्य रीतसर उतरवून घेणेच शक्य होत नाही. संयुक्त राष्ट्रसंघाने मदत म्हणून पाठविलेले जे धान्य कसेबसे उतरवून घेतले गेले, ते नियोजित स्थळी पोचण्या अगोदरच लुटले गेले. देशातील धान्याची गोदामे तर केव्हाच लुटण्यात आली आहेत. जनतेत प्रचंड असतोष निर्माण झाला आहे. बेजा जमातीच्या लोकांनी आणि असामाजिक तत्त्वांनी हत्या करणे, रस्ते अडवणे, लुटालूट करणे सुरू केल्यामुळे देशातील वाहतुकव्यवस्था पार कोलमडून पडली आहे. देशातील घडामोडी कळविणारी यंत्रणा तर आता अस्तित्वात राहिलेली नाही. परदेशी वृत्तपत्रांच्या वार्ताहरांनी आणि बीबीसी, अल् जझिरा यांच्यासारख्या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था यांनी गोळा केलेल्या वृत्तांमधून किंवा यांच्याच शोधपत्रकारितेतूनच वृत्ते कधी झिरपत झिरपत तर कधी धडाक्यात बाहेर येत असतात. सुदानप्रश्नी चर्चा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेण्यात आली. पण चीन आणि रशिया यांनी अडवणुकीची भूमिका घेतल्यामुळे निर्णय घेता आला नाही. सुदानप्रश्नी जगातील अन्य देश लुडबुड करीत आहेत, अशी भूमिका रशिया, चीन किंवा अन्य कुणालाही घेता येणार नाही. ‘जगात कुठेही काहीही विपरीत घडत असेल तर त्याची चिंता करण्याचा अधिकार इतरांना नाही का’, असा प्रश्न एका प्रसिद्ध जर्मन वृत्तप्रसार माध्यमाने उपस्थित केला आहे. सुदानमध्ये जे घडते आहे, त्याचा परिणाम केवळ आफ्रिका खंडावरच नव्हे तर जगातील तर देशांवरही होतो आहे. सुदानमध्ये पुन्हा लोकशाही राजवट यावी, यासाठी प्रयत्न करण्याचा अधिकार जगातील लोकशाही राष्ट्रांना निश्चितच आहे. पण सुदानमध्ये अनेक राष्ट्रांचे हितसंबंध गुंतलेले आहेत. ते परस्परविरोधी असल्यामुळे एकमत होणे आणि सर्वांनी मिळून कारवाई करणे कठीण होऊन बसले आहे, हेही तेवढेच खरे आहे. बीबीसीच्या मते सुदानमधील संघर्ष प्रस्थापित सरकार विरुद्ध लष्करशहा असा राहिलेला नसून तो आता सामान्य नागरिक विरुद्ध लष्कर असा झाला आहे. यात लष्कराला आज ना उद्या माघार घ्यावीच लागणार आहे, हे नक्की. जनतेच्या रेट्यापुढे कुणीही अगदी लष्करही टिकू शकणार नाही. आपली मर्यादा ओलांडणाऱ्या लष्कराला आज ना उद्या माघार घ्यावीच लागेल, असे राजकीय विश्लेषक विश्वासाने सांगत आहेत. खरेतर नोव्हेंबर मध्ये लष्करशहा अब्देल फतेह अल- बुर्हान आणि पंतप्रधान अब्दुल्ला हॅमडॅाक या दोघात तडजोड झाली होती आणि बुर्हानचे नियंत्रण अध्यक्ष या नात्याने कायम ठेवायचे आणि नागरी प्रशासन अब्दुल्ला हॅमडॅाक यांच्या पंतप्रधानपदाच्या आधिपत्याखाली स्थापित करण्याचे मान्य करण्यात आले होते. त्यानुसार 2019 या वर्षी स्वीकारलेल्या घटनेला अनुसरून देशाचा कारभार हाकण्यावर सहमती झाली आणि अब्दुल्ला हॅमडॅाक यांनी पुन्हा पंतप्रधानपदाची धुरा सांभाळलीही होती. अध्यक्षीय राजवटीत प्रत्यक्षात सर्वसूत्रे अध्यक्षाच्याच हाती असतात. सध्या सूदनमध्ये अस्थायी संघराज्य आहे. म्हणायला संसदेची दोन सभागृहे आहेत. नॅशनल असेम्ब्ली हे कनिष्ठ सभागृह आणि प्रांतांच्या प्रतिनिधींचे वरिष्ठ सभागृह अशी रचना आहे. न्यायखाते घटनेतील तरतुदीनुसार स्वतंत्र आहे पण प्रत्यक्षात मात्र नाही. ॲागस्ट 2019 मध्ये या ट्रान्झिशनल मिलिटरी कऊन्सिलने (टीएमसी) स्वत:चे विसर्जन केले आणि सॅाव्हरिनटी काऊन्सिल ॲाफ सुदानची स्थापना केली. या काऊन्सिलने आवश्यक त्या सर्व प्रक्रिया पूर्ण करून 2022 मध्ये देशात पुन्हा लोकशाही स्थापन करावी असे ठरले. पण ॲाक्टोबर 2021 मध्येच लष्कराने उठाव करून सॅाव्हरिनटी काऊन्सिलचे विसर्जन केले आणि प्रशासनव्यवस्थाही आपल्या ताब्यात घेतली. नागरी राजवट (सिव्ह्लिल रेजीम) आणि लष्करी राजवट ( मिलिटरी रेजीम) यातल्या खो खो च्या खेळाला जनता आता पार विटली असून सुदानमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे जनतेच्या हालअपेष्टात भरच पडली आहे. त्यामुळे शेवटी वैतागून आणि हताश होत अब्दुल्ला हॅमडॅाक यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. लष्कर विरुद्ध जनता सुदानमध्ये सुरू असलेले लष्कर विरुद्ध जनता हे गृहयुद्ध देशाला पंगू तर बनवतेच आहे पण त्याचबरोबर समाजजीवनाची वीणही नष्ट करते आहे. अशा युद्धात आजवर कुणीही जिंकलेला नाही. दोघेही पराभूतच होत आले आहेत. इतिहासाने हा धडा प्राचीन काळापासून मानवाला शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण जगातल्या कोणत्याही राष्ट्राने निदान आजवरतरी तो शिकलेला दिसत नाही. या पार्श्वभूमीवर सुदानच्या राष्ट्रगीताची आठवण होते. ‘सैनिक आम्ही देवाचे अन देशाचे’ या आशयाचे गीत आजच्या सुदानचे राष्ट्रगीत आहे. पण आजचे सैनिक न आहेत देवाचे, न देशाचे. ते राक्षसाचेही सैनिक असू शकणार नाहीत. कारण राक्षसी महत्त्वाकांक्षेच्या मर्यादाही सुदानमधील लष्करशाहीने केव्हाच ओलांडल्या आहेत.

Monday, January 10, 2022

सेमीकंडक्टरच्या विश्वात भारताचा दमदार प्रवेश वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? आपल्या सारख्या सामान्य माणसांना सेमीकंडक्टर हे नाव माहीत झाले असले, त्याची खूप आवश्यकता आहे हेही कळले असले आणि आपण याबाबत पूर्णपणे परावलंबी आहोत, हेही जाणवले असले तरी सेमीकंडक्टर म्हणजे नक्की काय याची पुरेशी माहिती आपल्यापैकी अभ्यासक वगळता इतरांना क्वचितच असेल. शास्त्रीय परिभाषा जास्तीतजास्त वगळून सर्व सामान्यांना याबाबत थोडीशी कामचलाऊ माहिती जरी मिळाली तरी त्यांना ती हवीशी आणि बोधप्रद वाटू शकेल. शाळेत शिकत असतांना विद्युत वाहून नेण्याच्या क्षमतेनुसार पदार्थांचे दोन प्रकार पडतात, हे आपल्याला माहीत आहे. विद्युत वाहून नेणारे, जसे धातू आणि विद्युत वाहून नेऊ न शकणारे जसे, लाकूड, काच यासारखे अधातू हे बहुतेकांच्या लक्षात असेल. विद्युत वाहून नेणारे ते वाहक किंवा कंडक्टर्स आणि वाहून नेऊ न शकणारे ते विद्युतरोधक किंवा इनशुलेटर्स किंवा नॅान कंडक्टर्स. पण सेमीकंडक्टर म्हणजे काय? सेमीकंडक्टर हा विद्युतवाहक आणि विद्युतरोधक यातील मधली स्थिती म्हणता येईल. सेमीकंडक्टर हा एक असा पदार्थ आहे की जो दोन धातूंमध्ये वाहकाचे काम करतो. जसे सिलिकॅान किंवा वाळू आणि गार. याशिवाय जर्मॅनियम नावाचा विद्युत वाहून नेऊ शकणारा असा मूलपदार्थ असा आहे की ज्यात काही गुण धातूंचे तर काही गुण अधातूंचे असतात. तसेच गॅलियम आर्सेनाईड किंवा कॅडमियम सेलेनाईड यासारखे संयुक्त पदार्थ हे सुद्धा असेच वाहकाचे काम करणारे पदार्थ आहेत. पण या वाहकांचे वैशिष्ट्य असे आहे, की ते विद्युतवहनाची गती नियंत्रित म्हणजे कमी किंवा जास्त करू शकतत. सेमीकंडक्टरचा हा गुण उद्योगांसाठी वरदान ठरला आहे. सेमीकंडक्टरचा सर्वत्र वापर निरनिराळी डिव्हायसेस (साधने) तयार करण्यासाठी उद्योगात सेमीकंडक्टरचा वापर केला जातो. चीप्स, ट्रान्झिस्टर, इंटेग्रेटेड सर्किट्स, कॅाम्प्युटर्स, इलेक्ट्रॅानिक डिव्हायसेस, डायोड्स ही नावेही काहींना माहीत झाली असतील. अतिसूक्ष्म आकार ही सेमीकंडक्टरची विशेषता आहे. सेमीकंडक्टरमधील सघनता (कॅामपॅक्टनेस), विश्वसनीयता (रिलायबिलिटी), इंधनाची बचत (पॅावर एफिशियन्सी) आणि स्वस्तता (लो कॅास्ट) या गुणांमुळे आता असे क्वचितच एखादे यंत्र किंवा उपकरण असेल की ज्यात सेमीकंडक्टरचा वापर होत नसेल. सेमीकंडक्टरमुळे प्रक्रिया वेगाने पडतात, तसेच त्या अचूक आणि उच्च दर्जाच्या असतात. या गुणांमुळे सेमीकंडक्टर उद्योग चांगलाच फोफावला आहे. या उद्योगात कोट्यवधी डॅालर्सच्या उलाढाली होऊ लागल्या आहेत. मक्तेदारी संपवलीच पाहिजे आज सेमीकंडक्टर उद्योगात अमेरिका, चीन, चिमुकले तैवान, दक्षिण कोरिया, जपान आणि नेदरलंड अशांचीच मक्तेदारी निर्माण झाली आहे. या देशांनी सेमीकंडक्टरचा पुरवठा करण्यात हात आखडता घेतला तर जगभरातील एकूणएक उद्योग जणू गुदमरून जातील. ही स्थिती भारतासारख्या देशाला तर मुळीच परवडणारी नाही. आत्मनिर्भरतेचा ध्यास घेण्यामागचे हे एक प्रमुख कारण आहे. सध्या भारत सेमीकंडक्टरसाठी चीनवर फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. त्यामुळे पुरवठा शृंखला तोडून किंवा पुरवठा कमी करून किंवा किंमत वाढवून चीन भविष्यात भारताला शह देण्याच्या प्रयत्न करू शकतो. काही महिन्यांपूर्वी चीनच्या अडवणुकीमुळे भारतात सेमीकंडक्टरचा तुटवडा निर्माणही झाला होता. अनेक कारखाने विशेषत: ॲाटो उद्योग बंद पडले होते. करोनाचा तडाखा आणि सेमीकंडक्टर चिप्सचा जगभर पडलेला तुटवडा यापैकी अधिक हानिकारक कोण अशी तुलना अनेकांना करावीशी वाटली यावरून सेमीकंडक्टरच्या तुटवड्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या गांभीर्याची कल्पना येऊ शकेल. सेमीकंडक्टरच्या बाबतीत चीनवरील अवलंबित्व तर भारताला मुळीच परवडणारे नाही. कारण तो देश कृत्रिम तुटवडा केव्हा निर्माण करील, ते सांगता यायचे नाही. तसेच आयात केलेल्या सेमीकंडक्टर्सपेक्षा देशात निर्माण होणाऱ्या कंडकर्सची किंमत केव्हाही कमी असेल आणि त्यामुळे वस्तू स्वस्त होतील, हेही दुर्लक्षिण्यासारखे नाही. गेमचेंजर सेमीकंडक्टरच्या तुटवड्याची ही अडचण लक्षात घेऊन भारताने 16 डिसेंबर 2021 ला एक महत्त्वाचा निर्णय घेतला. 76 हजार कोटी रुपयाच्या प्रोत्साहन निधीची घोषणा केली. पुढील काही वर्षे हा निधी उपलब्ध असेल. सुरवातीला एवढी मोठी रक्कम अडकवून ठेवणे सामान्य गुंतवणूकदाराला शक्य होणार नाही म्हणून ही तजवीज शासनाने केली आहे. हा निर्णय परिस्थितीत आमूलाग्र बदल करणारा (गेम चेंजर) ठरू शकतो. या आधारावर भारतात सेमीकंडक्टर उद्योग नजीकच्या भविष्यकाळात मूळ धरून विकास पावायला प्रारंभ होईल. लाखोच्या संख्येत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार उभे होतील. नुसते इंजिनिअर्सच 1 लाखाच्या जवळपास लागतील. इतर सहाय्यकांची संख्यातर यापेक्षा कितीतरी जास्त असेल, हे उघड आहे. पण हा मुद्दा तसा गौण आहे. ज्या बाबीसाठी आपण जगावर पूर्णत: अवलंबून आहोत आणि वेळोवेळी खऱ्या किंवा कृत्रिम तुटवड्याचा, अडवणुकीच्या धोरणाचा सामना करीत आलो आहोत, ती अडचण कायमची दूर करण्यासाठी उचलेले हे पाऊल आहे. सेमीकंडक्टरचे नित्य बदलणारे तंत्रज्ञान सेमीकंडक्टरक्षेत्र हे अत्यंत गुंतागुंतीचे आणि नित्य बदलणाऱ्या तंत्रज्ञानावर आधारित क्षेत्र आहे. अशा क्षेत्रात प्रचंड भांडवली गुंतवणूक करावी लागते, फार मोठी जोखीम उचलण्याची तयारी ठेवावी लागते, भांडवल गुंतवणुकीतून मिळणारा परतावा खूप उशिराने मिळणार असल्यामुळे तेवढा धीर असावा लागतो. तंत्रज्ञानक्षेत्रात नित्य नव्याने बदल होत असल्यामुळे अगोदर केलेली गुंतवणूक अनेकदा वाया जाण्याची भीती असते. हा धोका पत्करण्याचीही तयारी असावी लागते. खाजगी भांडवलदार यासाठी सहसा तयार होत नाहीत. असे असूनही वेदांत आणि व्हिडिओकॅान यांनी भांडवल गुंतवण्याची तयारी दाखविली आहे, हे विशेष. संकल्प, भारताला सेमीकंडक्टरचे केंद्र बनविण्याचा ! इंटेल ही अमेरिकन बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली एक प्रमुख कंपनी आहे. ती भारतात सेमीकंडक्टर उत्पादन युनिट स्थापन करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने सेमीकंडक्टरचे संशोधन आणि नावीन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्याचा आणि सेमीकंडक्टर उत्पादनाचे केंद्र (हब) तयार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्याला अनुसरून इंटेल कंपनीनेही युनिट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. माहितीतंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स खात्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी इंटेलच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनात सेमीकंडक्टर अतिशय आवश्यक असल्यामुळे या प्रकारच्या सेमीकंडक्टर्सना सर्वत्र फार मोठी मागणी आहे. सेमीकंडक्टर उत्पादनाचे भारत हे एक मोठे केंद्र व्हावे या दिशेने भारताचे प्रयत्न कसे सुरू झाले आहेत, याची यावरून माहिती मिळेल. दुसरे असे की, भारत आणि तैवान यांच्यात एका वर्षाच्या आत भारतात सुमारे ५५ हजार कोटी रुपये गुंतवणुक करून सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग प्लँट स्थापन करण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. या प्लँटमधून ५जी उपकरणे, इलेक्ट्रिक कारची चिप यासारख्यांची निर्मिती होईल. भारतात जमीन, वीज, पाणी आणि कुशल मनुष्यबळ यांची तशी अडचण नाही. पण सेमीकंडक्टरच्या निर्मितीत लाखो गॅलन अतिशुद्ध (अल्ट्रा-प्युअर) पाणी लागते. त्यामुळे प्लॅंट उभारणीसाठी मुबलक पाणी पुरवठा सतत होऊ शकेल अशी जागा सहजासहजी उपलब्ध होऊ शकणार नाही. ती शोधावीच लागेल. तैवानमध्ये सोमीकंडक्टरसाठी इतके पाणी वापरले गेले की शेवटी जलसंकट उभे राहिले होते. भारत आणि तैवान यात करात सूट आणि सवलतींबाबत चर्चा सुरू झाली असून उभयपक्षी घासाघीस होणे तसे अपेक्षितच आहे. याशिवाय तैवानला भांडवली खर्चातही भारताची भागीदारी हवी आहे. सध्या आपण गरजवंत आहोत, हे लक्षात ठेवून आणि भावी लाभ लक्षात घेऊन भारताला योग्य भूमिका घ्यावी लागेल. भारताची 2025 सालची सेमीकंडक्टरची आयात 7 ते 8 लाख कोटी रुपयांची असणार आहे. त्यामुळे हा सौदा भारतालाही लाभदायकच ठरणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चिपच्या पुरवठ्याच्या प्रश्नावर क्वॉड बैठकीत चर्चा केली होती. चिप्स सिलिकॅानच्या बनलेल्या असतात. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकी दौऱ्यावर असतांना क्वालकॉम कंपनीचे सीईओ क्रिस्टियानो ई अमोन यांच्यासोबत भारतात गुंतवणुकीबाबत चर्चा केली होती. क्वालकॉम ही कंपनी सेमीकंडक्टर, सॉफ्टवेअर आणि वायरलेस तंत्रज्ञान या तिन्ही क्षेत्रातली एक अग्रगण्य कंपनी आहे, हे विशेष. भारताचे भूषण असलेला टाटा समूह भारतात 2200 कोटी रुपये खर्चून कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणा यापैकी एका राज्यात सेमीकंडक्टरचा कारखाना उभारण्याच्या विचारात आहे. टाटा समूहाचा कामाचा कामाचा उरक पाहता या वर्षाअखेर हा कारखाना सुरू करण्याचा त्यांचा मनोदय प्रत्यक्षात उतरेल, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. हा एक आउटसोर्स्ड सेमीकंडक्टर असेंब्ली आणि टेस्ट प्लांट (OSAT) असणार आहे. अशा कारखान्यात, सिलिकॅानवर निरनिराळ्या प्रक्रिया करून चिप्स तयार केल्या जातील. या प्रक्रियांना पॅकेजिंग, असेम्बलिंग आणि टेस्टिंग अशी नावे आहेत. थोडक्यात असे की, यात कच्या मालापासून वस्तू तयार होणार आहेत. ही निर्मितिप्रक्रिया सुटे भाग आयात करून भारतात फक्त जोडणी करण्यापुरती मर्यादित असणार नाही. टाटा समूह सॉफ्टवेअरच्या बाबतीत सध्याच आघाडीवर आहे. आता तो हार्डवेअरमध्येही आपले आपले पाय रोवण्याच्या आकांक्षेने उतरतो आहे. आपण सॅाफ्टवेअरमध्ये बऱ्यापैकी स्थान राखून आहोत पण हार्डवेअर क्षेत्रात तेवढेच कच्चे आहोत. या क्षेत्रात वर्ष संपण्याअगोदरच टाटांचा कारखाना संकल्पानुसार सुरू झाला तर ती त्यांच्याइतकीच संपूर्ण देशासाठीही अभिमानाची बाब असेल.

Monday, January 3, 2022

तबलिघी जमात - एक प्रश्नचिन्ह? वसंत गणेश काणे, बी एस्सी,एम ए (मानसशास्त्र), एम.एड एल बी ७, लक्ष्मीनगर, पाण्याच्या टाकीजवळ, नागपूर 440 022 मोबाईल 9422804430 E mail - kanewasant@gmail.com Blog - kasa mee? सौदी अरेबिया हा मध्यपूर्वेतील सुन्नी मुस्लीमबहुल देश. हा वाळवंटी प्रदेश असून क्षेत्रफळाने आजूबाजूच्या देशांच्या तुलनेत खूपच मोठा म्हणजे 22 लक्ष 50 हजार चौ.किमी आहे. खनीज तेल आणि नैसर्गिक वायू यांनी या देशाला आर्थिक सुबत्ता प्राप्त झाली आहे. अरब जगातात हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा देश असून याची लोकसंख्या मात्र क्षेत्रफळाच्या मानाने खूप कमी म्हणजे 3.5 कोटी आहे. रियाध ही सौदीची राजधानी असून आधुनिकतेचा पुरस्कार करणारा सलमान हा सौदीचा राजा आहे. मक्का मदिना ही इस्लामींची पवित्र स्थळे सौदी अरेबियात आहेत. मोहंमदांचा जन्म मक्केचा मानला जातो. मदिना हे दुसऱ्या क्रमांकाचे पवित्र स्थळ आहे.यामुळे सौदी अरेबियाचे सुन्नी मुस्लीम जगतात महत्त्वाचे स्थान आहे. सौदी अरेबियात बंदी! अशा सौदी अरेबियाने तबलिघी जमात आणि दावा गटावर बंदी घातली आहे. या दोघांना मिळून अल अहबाब म्हणून ओळखले जाते. तबलिघी जमात या शब्दाचा शब्दश: अर्थ, ‘समावेशी जमात’ असा होईल. सर्व सुन्नींना एकत्र आणून प्रेषिताच्या काळात ज्याप्रकारे धर्माचरण होत असे, त्यानुसार सर्व सुन्नींचे आचरण असले पाहिजे, असे आग्रहाने प्रतिपादन करणारी ही मंडळी आहेत, असे सांगितले जाते. पण वस्तुस्थिती अशी आणि एवढीच आहे का? मुस्लीम समाजातच परिवर्तन घडविण्याची आवश्यकता अनेकांच्या मते तबलिघी हे प्रामुख्याने असे प्रचारक आहेत की ज्यांना, केवळ धर्मांतरच नव्हे तर, आजच्या विस्मृत मुस्लीम समाजातही परिवर्तन घडवून आणायचे आहे. म्हणून ही चळवळ मुख्यतः सामान्य मुस्लिमांवरच लक्ष केंद्रीत करीत असते. त्यांचा धर्मावरील विश्वास पुनरुज्जीवित व्हावा, त्यांना धार्मिक विधी, पोषाख आणि आचरण या विषयांवर मार्गदर्शन करावे, हा त्यांचा उद्देश असतो. ती मुस्लीम लोकात धर्माला अपेक्षित असलेले आचरण असावे यावर भर देत असते. याबाबतच्या प्रसिद्ध पुस्तकांमध्येही हाच दृष्टीकोन मांडलेला दिसतो. तबलिघींना सुन्नींचाच विरोध पण जमातीची ही भूमिका खुद्द सुन्नींनाच मान्य नाही. याचे एक कारण असे असावे की, या निमित्ताने सुन्नींमध्ये एक पुराणमतवादी नेतृत्व नव्याने उभे होऊ पाहते आहे आणि हे प्रस्थापित आधुनिक नेतृत्वाला मान्य नसावे. सर्वसाधारण समजूत आहे त्याप्रमाणे मुस्लीम समाज एकसंध नाही. सुन्नी, शिया, बोहरा, वाहाबी, अहमदिया ही आणि अशी आणखी काही नावे आपल्यापैकी अनेकांना निदान ऐकून माहीत असतील. सुन्नी हा मुस्लिमांमधला फार मोठा म्हणजे 80 % एवढा गटसुद्धा एकसंध नाही. या सगळ्या सुन्नींना एका सूत्रात बांधण्याची ही चळवळ आहे. सर्व सुन्नींमध्ये धर्मकांडे (रायच्युअल्स), पोषाख आणि वैयक्तिक वर्तन याबाबत प्रेषिताच्या काळात जे संकेत पाळले जायचे ते अगदी जसेच्या तसे पाळण्यावर यांचा भर आहे. कर्मकांड म्हणजे काय? तर धार्मिक विधीतील रूढ संस्कार किंवा प्रथा. या चळवळीचे 25 कोटी अनुयायी आहेत, असे मानतात. ते मुख्यत: दक्षिण आशियात म्हणजे श्रीलंका, भारत, बांग्लादेश, भूतान, नेपाळ, पाकिस्तानात राहतात. तसे पाहिले तर जवळजवळ 200 देशात यांचे अनुयायी आहेत. 20 व्या शतकातील ही मुस्लिमांची एक महत्त्वाची आणि मोठी धार्मिक चळवळ मानली जाते. दावा म्हणजेच काय? मुस्लिमांनी अल्लांची पूजा पवित्र कुराण आणि प्रेषित मुहंमद यांनी सांगितल्याप्रमाणे करावी, यावर दावाचा भर आहे आज उलेमांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. इस्लामवरील संकट आधुनिकतेचा पुरस्कार करणाऱ्या, सुधारणावादी, तसेच काहीसे प्रगतीपर धोरण स्वीकारू पाहणाऱ्या सौदी अरेबियाने या दोन्हींना सनातनी चळवळींना, म्हणजे तबलिघी आणि दावा यांना, समाजावरील संकट म्हणून घोषित केले आहे. या गटांच्या कारवाया 175 पेक्षा जास्त देशात पसरल्या आहेत. इस्लाममधील ही सर्वात मोठी आणि कट्टरतेचा आग्रह धरणारी धार्मिक चळवळ आहे. या चळवळीचा परिणाम दहशतवादी कारवाया सुरू होण्यात झाला आहे, असे सौदी अरेबियाने आरोप करतांना म्हटले आहे. याला अनुसरून इस्लामिक घडामोडीचे मंत्री अब्दुल लतीफ अल शेख यांनी सर्व मशिदींमधील प्रवचनकारांना दर शुक्रवारी ह्या गटांच्या खऱ्या स्वरुपाची जाणीव करून देण्यासंबंधी आदेश दिले आहेत. ‘धर्मजागृतीच्या नावाखाली समाजाची दिशाभूल करणाऱ्या, कायद्याला धरून न वागणाऱ्या, समाजाला धोका निर्माण करणाऱ्या, शिवाय तरुणांना दहशतवादाकडे प्रवृत्त करणाऱ्या या लोकांपासून सावध राहण्यासाठी सूचना प्रसारित करा. त्यांच्या भुलथापांना बळी पडू नका’, असे म्हणत सौदी अरेबियातील लोकांवर, तबलिघी आणि दावा गटाशी संबंध ठेवण्यावर सौदी सरकारने बंदी घातली आहे. तबलिघींचा खरा इतिहास कोणता? तबलिघी जमात याच नावाची एक वेगळी चळवळ बरीच अगोदर म्हणजे 1927 साली मौलानै मुहंमद इलियास या नावाच्या एका इस्लामिक विद्वानाने स्थापन केली होती. ही सुद्धा सनातनी सुन्नी मुसलमानांची कडक धर्मकांडांचा पुरस्कार करणारी चळवळ होती. या चळवळीचे बोधवाक्य होते, ‘मुस्लिमांनो, मुस्लीम व्हा’. मुस्लिमांनो, नुसते नावालाच मुस्लीम राहू नका तर खऱ्या अर्थाने मुस्लीम व्हा, असा या बोधवाक्याचा अर्थ आहे. हे जर खरे असेल तर सौदी सरकारने या दोन तबलिघींपैकी कोणत्या तबलिघींवर बंदी घातली आहे किंवा या दोन्हीवरही बंदी घातली आहे का, हे स्पष्ट झालेले नाही. 2013 मध्ये कझखस्थानने कडक कर्मकांडांचा पुरस्कार करणाऱ्या तबलिघी जमातीला जहाल (एक्सट्रिमिस्ट) ठरवून तिच्यावर बंदी घातली होती. पण यांची कोणती विधाने जहाल स्वरुपाची आहेत, हे मात्र कुणी कधीच, अगदी न्यायालयांनीही, स्पष्ट केले नव्हते. पण मग इराण, रशिया, तजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, आणि उझबेकिस्तान यांनीही तबलिघींवर उगीचच बंदी घातली असेल का, असाही प्रश्न केला जातो. देवबंदची सौदीवर टीका इस्लामिक सेमिनरी दारूल उलूम देवबंदने सौदी अरेबियावर कडक शब्दात टीका केली आहे. दहशतवादाचे खापर तबलिघी जमातीवर फोडता येईल असा कुठलाही आधार समोर आलेला नाही, असे देवबंदचे म्हणणे आहे. शिर्क म्हणजेच अनेक देवांवर विश्वास. ते नको. बिदत म्हणजे नवनवीन धार्मिक कल्पना. त्याही नकोत. हा तबलिघींचा प्रमुख आग्रह असतो. ते दहशतवादाचे समर्थन करीत नाहीत. तरीही तबलिघीवर तसे आरोप केले जातात, ते अर्थहीन आणि निराधार आहेत, असे म्हणत सौदी सरकारने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि बंदी हुकूम मागे घ्यावा, असा आग्रह देवबंदने धरला आहे. आजच्या तबलिघी चळवळीने 200 देशात हातपाय पसरले आहेत. ही जगातली सर्वात मोठी इस्लामिक धर्मप्रचार करणारी चळवळ आहे. या चळवळीचे उगमस्थान शोधण्याचा प्रयत्न झाला तेव्हा लक्षात आले की, उगमाचे रहस्य देवबंद प्रथेत आहे. देवबंदच्या मदरशात फक्त लहान मुलांवरच संस्कार केले जातात. पण प्रौढांचे काय? प्रौढांवरही विस्मृतीत गेलेले संस्कार नव्याने करण्याची तेवढीच आवश्यकता आहे, हे जाणवल्यामुळे लहान मुलांसाठी जसे मदरसे, तिथे जसे लहान मुलांवर संस्कार केले जातात, तसेच ही लहान वयाची मर्यादा ओलांडून प्रौढांवरही संस्कार करण्याची आवश्यकता आहे, असे वाटून प्रौढांवरही पुन्हा संस्कार करण्यास सुरवात केली पाहिजे, असे धुरिणांना जाणवले असले पाहिजे. म्हणूनच तबलिघी ही प्रौढांवर संस्कार करणारी चळवळ सुरू झाली असली असणार. प्रगतीपथावरील इस्लाम म्हणजेच नैरुत्य आशियातील तबलिघी जमात, अशा शीर्षकाचा ग्रंथ लिहिला गेल्याची नोंद फरिश ए नूर यांच्या लिखाणात सापडते आहे. यावरूनही याच विचाराला बळकटी मिळते. भरकटलेल्या मुस्लिमांनी खरे मुस्लीम व्हावे या ग्रंथात तबलिघी हे वेगळ्या प्रकारचे धर्मप्रचारक असून भरकटलेल्या मुस्लीम समाजाला पुन्हा सत्याच्या मार्गावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा दावा केला आहे. मुस्लीम समाजातील सर्वसामान्य लोकात जागृती करून धर्मावरील विश्वासाचे पुनर्जागरण करणे हा या चळवळीचा हेतू आहे. याचा अर्थ असा होतो की, धर्मप्रचाराबरोबरच जे मुस्लीम धर्मात आहेत, तेच धर्माचरणापासून दूर चालले असून त्यांना मुस्लीम धर्माच्या कर्मकांडात, आचरणात आणि व्यवहारात आणण्याची आवश्यकता त्या धर्मातील धुरीणांना वाटू लागली आहे. एकीकडे जे मुस्लीम नाहीत त्यांना मुस्लीम धर्मात आणण्याइतकेच, जे नावापुरतेच धर्मात आहेत, त्यांनाही खऱ्या अर्थाने संस्कारित करून धार्मिक बनविण्याची आवश्यकता धर्मप्रमुखांना वाटू लागली आहे. म्हणूनच मुस्लिमांनो, मुस्लीम व्हा हा नारा त्यांनी दिला असावा. तबलिघी नक्की कसे? एका संशोधनानुसार तबलिगी जमातीचे बहुतेक सदस्य धर्मनिष्ठेने आध्यात्मिक उन्नतीसाठी प्रयत्न करीत असतात. हे खरे असले तरी निदान काही लोक तरी नक्कीच अतिरेकी घटकांशी संबंध ठेवून असतात, हे नाकारता यायचे नाही. कारण एकाने विमानात बॅाम्ब ठेवला होता तर दुसऱा तालिबानी सैनिकांना कट्टर धार्मिकतेचे शिक्षण देत होता. एक बाब मात्र खरी आणि समाधानाची आहे ती ही की, खुद्द मुस्लिमांमधीलच काही गट सुद्धा तबलिघींच्या कथनी आणि करनी बाबत साशंक असून त्यांच्यावर बरीक लक्ष ठेवून आहेत. तबलिघी जमातीतील व्यक्ती केवळ धर्मनिष्ठा आणि आध्यात्मिक उन्नती यासाठीच प्रयत्नशील असतात, असे जे म्हटले जाते, त्यावर विश्वास ठेवणे त्यांनाही कठीण वाटते आहे. साधनेचा पुरस्कार करणाऱ्या या पाक व्यक्ती आहेत, अशी खात्री भारतालाही नाही. तरीही हे कोण आहेत, असा साळसूद प्रश्न भारतातही का बरे विचारला जात असेल ?